वातापी गणपती
कर्नाटकातील बदामी प्राचीन काळातील वातापी. लालसर-तपकिरी वाळूच्या खडकांनी वेढलेली ही नगरी दख्खनच्या इतिहासात केवळ एक प्राचीन राजधानी म्हणून नव्हे, तर स्थापत्य, शिल्पकला, धर्म आणि सांस्कृतिक परंपरांचा एक अद्भुत संगम म्हणून उभी आहे.
बदामी लेणी क्रमांक 1 शिल्पसमूहाकडे पाहताना जवळच दिसणाऱ्या गणेशाच्या उपस्थितीमुळे दृश्याला एक वेगळीच गोडी प्राप्त होते. पित्याचे नृत्य पाहणारा पुत्रही कल्पना मनात घेतली की या शिल्पाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलतो. ‘बाबा नाचत आहेत,मग आपणही नाचू शकतो का?’ अशी बालसुलभ उत्सुकता जणू या दृश्यातून जाणवते. अर्थात, ही शिल्पावर आधारित रसात्मक व्याख्या आहे. प्राचीन शिलालेख किंवा ग्रंथातून सिद्ध झालेली कथा म्हणून ती मांडलेली नाही . पण शिल्पाचा भावार्थ समजून घेण्यासाठी ती नक्कीच मोहक आहे.छोटा बालगणेश शिव नटराजप्रमाणे हाताची मुद्रा करत आहे.बालकांच्या ठायी उत्सुकतापूर्ण अनुकरण हा शिल्पात दाखवले आहे
तर रावलफडी मधला बाळगणेश लाडू /मोदक पात्र हाती घेऊन खाण्याच्या मुद्रेत आहे.
बदामी या शिल्पवैभवाची आठवण झाली की पुढे येते ती एका दुसऱ्याच गणपतीची कथा वातापी गणपतीची.
‘वातापी गणपतिं भजेहम्’ हे नाव भारतीय शास्त्रीय संगीताच्या रसिकांना अपरिचित नाही. कर्नाटक संगीताच्या त्रिमूर्तींपैकी एक असलेल्या मुथुस्वामी दीक्षितरांनी रचलेली ही संस्कृत कृती तामिळनाडूतील तिरुवारूर जिल्ह्यातील तिरुचेंकाट्टनकुडी येथील वातापी गणपतीला समर्पित आहे. हंसध्वनी रागातील ही रचना आज कर्नाटकी संगीताच्या मैफलींमध्ये विशेष लोकप्रिय आहे.
अशी आख्यायिका आहे की, गजमुखसुराला मारल्याच्या पापाबद्दल गणपतीने येथे शिवाची पूजा केली . गजमुखसुराला शिवाकडून अमरत्वाचे वरदान मिळाले होते आणि त्याने मातंगपुरम येथील आपल्या स्वनिर्मित राजधानीतून मानवांना अतोनात दुःख दिले होते.
हत्तीने गणपती देवाचा सामना केला आणि आपल्या तुटलेल्या उजव्या सुळ्याने त्या राक्षसाचा पराभव केला. असे मानले जाते की, त्या राक्षसाने सांडलेल्या रक्तामुळे येथील जमीन लाल झाली आणि म्हणूनच तमिळमध्ये या जागेला 'तिरुचेनकाट्टनकुडी' असे नाव पडले . जरी येथील मुख्य देवता शिव असले तरी, गणपतीलाच प्रथम सन्मानाचे स्थान दिले जाते.
वातापी गणपतीची मूर्ती बदामीहून तिरुचेंकाट्टनकुडी येथे कशी पोहोचली, याभोवती एक प्रसिद्ध मौखिक परंपरा आहे.
बदामी किल्ला परिसरातील ‘लोअर शिवालय’ हे सातव्या शतकातील एक सुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे.आज जरी शिवालय ओळखले जाते तरी इथे पल्लव आक्रमणाआधीएक गणेश मूर्ती होती, होय तीच प्रसिद्ध 'वातापी गणपती '!!
इ.स. ६४२ च्या सुमारास पल्लव राजा नरसिंहवर्मन प्रथम याने चालुक्यांची राजधानी वातापीवर विजय मिळवला. त्याचा सेनापती परंज्योती याने युद्धानंतर वातापी येथून गणपतीची मूर्ती आणली आणि आपल्या जन्मभूमीत तिची प्रतिष्ठापना केली, असे सांगितले जाते. पुढे हाच परंज्योती ‘सिरुत्तोंडर’ या नावाने शैव नायनार संतपरंपरेत प्रसिद्ध झाला, अशी आख्यायिका आहे.
मात्र इतिहास आणि आख्यायिका यांची सरमिसळ होऊ नये. परंज्योतीने वातापीतून हीच गणपतीची मूर्ती आणली, याला ठोस समकालीन लिखित पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळे ही कथा ‘मौखिक परंपरेनुसार’ किंवा ‘स्थानिक आख्यायिकेनुसार’ अशीच मांडणे अधिक शास्त्रीय ठरेल.
तिरुचेंकाट्टनकुडीतील उत्तरापतिश्वरस्वामी मंदिराशी वातापी गणपतीची परंपरा जोडलेली आहे. या मंदिरसमूहात गणपतीचे एक वैशिष्ट्यपूर्ण मानवी-मस्तक असलेले रूपही आढळते. त्यामुळे गणपतीच्या प्रतिमाविश्वातील विविधता आणि स्थानिक धार्मिक परंपरांचे परस्पर संबंधही येथे अभ्यासता येते.
दगडात कोरलेला नटराज, त्याच्या सान्निध्यातला गणेश आणि दूर तामिळनाडूत आजही घुमणारा ‘वातापी गणपतिम्’चा स्वर या सगळ्यांना जोडणारा धागा म्हणजे वातापी.
वातापी म्हणजे आजचे बदामी.ते दख्खनच्या स्मृतीत कोरलेले एक जिवंत सांस्कृतिक पर्व!!
‘वातापि गणपतिं भजेहम्’ ही मुथुस्वामी दीक्षितरांची संस्कृत कृती असून ती हंसध्वनी रागात रचलेली आहे.
वातापि गणपतिं भजेहम्
वातापि गणपतिं भजेहम् ।
वरणास्यं वरप्रदं श्रीम् ॥
मी वातापीच्या गणपतीचे भक्तिभावाने स्मरण व भजन करतो.सुंदर, विशाल मुख असलेल्या, भक्तांना वरदान देणाऱ्या त्या मंगलमूर्तीची मी उपासना करतो.
भूतादि संसेवित चरणम् ।
भूत-भौतिक-प्रपञ्च-भरणम् ।
वीतरागिणं विनुतयोगिनम् ।
विश्वकारणम् ॥
ज्यांच्या चरणांची पंचमहाभूतांसह सर्व सृष्टीतील शक्ती उपासना करतात,जे या संपूर्ण भौतिक विश्वाचे पालन-पोषण करतात,जे आसक्तीपासून मुक्त आहेत आणि योगिजन ज्यांची स्तुती करतात,त्या गणेशाला मी वंदन करतो.जो या संपूर्ण विश्वाच्या अस्तित्वामागील कारणस्वरूप आहे.
पुरा कुम्भ-सम्भव मुनिवर
प्रपूजितं त्रिकोण-मध्यगतम् ।
मुरारि-प्रमुखाद्युपासितम् ।
मूलाधार-क्षेत्रस्थितम् ॥
ज्यांची पूर्वी अगस्त्य ऋषींनी भक्तिभावाने पूजा केली,जे त्रिकोणाच्या मध्यभागी विराजमान आहेत,ज्यांची विष्णूसह श्रेष्ठ देवताही उपासना करतात,आणि जे योगशास्त्रातील मूलाधारचक्रात अधिष्ठित आहेत,त्या गणपतीला मी नमन करतो.
परादि चत्वारि वागात्मकं ।
प्रणवस्वरूपं वक्रतुण्डम् ।
निरन्तरं निटिल-चन्द्रखण्डम् ।
निज-वामकर-विधृत-इक्षुदण्डम् ॥
जे परा, पश्यन्ती, मध्यमा आणि वैखरी या वाणीच्या चार अवस्थांचे स्वरूप आहेत,जे पवित्र ॐकाराचे मूर्त स्वरूप आहेत,ज्यांची सोंड वक्र आहे,ज्यांच्या कपाळावर चंद्रकोरी शोभते,आणि ज्यांच्या डाव्या हातात ऊसाचा दंड आहे.अशा वक्रतुण्ड गणपतीला मी वंदन करतो.
करंबुज पाश बिजापुरं
कलुषविदुरं भूतकरं हरादी
गुरुगुहा तोषिता बिंबं
हमसाध्वनी भूषित हेरंबम ।।५।।
आपल्या कमळधारी हातांमध्ये तो फास आणि लिंबू फळ धारण करतो. तो सर्व अशुद्धतेपासून दूर, सर्व जीवांचे साक्षात स्वरूप आहे. त्याची तेजस्वी प्रतिमा हर (शिव), इतर आणि गुरुगुह (स्कंद) यांना आनंदित करते. तो हेरंबा (दुर्बळांचा रक्षक) असून, हंसध्वनीच्या सुरावटीने अलंकृत आहे.
या स्तोत्रात गणपती केवळ विघ्नहर्ता किंवा वरदायक देवता म्हणून येत नाही. दीक्षितर गणपतीला विश्वाच्या मूलतत्त्वाशी जोडतात. मूलाधारचक्र, ॐकार, वाणीच्या चार अवस्था, पंचमहाभूते आणि विश्वाचे कारण या संकल्पनांमधून गणपतीचे एक अत्यंत व्यापक, तात्त्विक आणि योगपरंपरेशी संबंधित रूप उभे राहते.
म्हणून ‘वातापी गणपतिं भजेहम्’चा भाव केवळ “हे गणपती, माझे विघ्न दूर कर” इतकाच नाही. तो अधिक खोल आहे
“हे वातापी गणपती, तू विश्वाच्या अस्तित्वाचा आधार आहेस, वाणीचे आणि प्रणवाचे स्वरूप आहेस; योगी आणि देवताही तुझी उपासना करतात. त्या विश्वव्यापी, मंगलमय गणेशाला मी भक्तिभावाने वंदन करतो.”
राग: हंसध्वनी
ताल: आदि ताल
रचनाकार: मुथुस्वामी दीक्षितर
कालखंड: इ.स. १७७५–१८३५; त्यांचा जन्म २४ मार्च १७७५ रोजी झाला आणि निधन २१ ऑक्टोबर १८३५ रोजी झाले.
भाषा: संस्कृत
देवता: तिरुचेंकाट्टनकुडी येथील वातापी गणपती
परंपरा: कर्नाटक संगीताच्या मैफलीची सुरुवात गणपतीच्या मंगलस्मरणाने करण्यासाठी ही कृती विशेष लोकप्रिय आहे.
विशेष म्हणजे हंसध्वनी रागाची निर्मिती मुथुस्वामी दीक्षितरांनी केलेली नाही. हा राग त्यांच्या वडिलांना, रामस्वामी दीक्षितरांना, श्रेय दिला जातो. त्यामुळे वडिलांनी निर्माण केलेल्या रागात मुलाने गणपतीची ही अजरामर कृती रचली, हा संगीतपरंपरेतील सुंदर योग आहे.
आणखी एक विशेष बाब म्हणजे ‘वातापि गणपतिम्’च्या शेवटच्या भागात हंसध्वनीचा उल्लेख येतो, त्यामुळे ही कृती कोणत्या रागात गायची याचाही संकेत रचनेतच मिळतो.
“वातापीच्या कातळांमध्ये कोरलेली गणपतीची स्मृती पुढे मुथुस्वामी दीक्षितरांच्या ‘वातापि गणपतिम्’मधून स्वररूपाने अमर झाली.आणि त्या स्वरांना लाभला हंसध्वनीचा मंगल नाद.”
-भक्ती
येसूदासने गायलेले वातापी गणपती 💫
मिसळपाव





प्रतिक्रिया
गणेश चतुर्थीच्या सर्वाना…
गणेश चतुर्थीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा आणि मिपाला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा!!
सध्या आर्या आंबेकर हिचे वातापी गणपती हे भजन सर्वदूर गाजत आहे. येसूदास व इतर कर्नाटकी संगीत गायकानी हे सुमधुर गीत तर अजरामर केलेच आहे.नुकतिच बदामी भटकंती झाली होती. तेव्हापासून वातापी (बदामी)ने खुप भुरळ घातली आहे. तेव्हा या गीताचा आणि वातापी गणपती व बदामीतील इतर गणपती शिल्पाचा आस्वाद गणेश चतुर्थी निमित्त शब्दांजलीतुन सादर केला आहे.
बाप्पा मोरया 💫
गणपती बाप्पा....
तुम्हांला असेच अनथक लिहिण्याचे वरदान देवो.
गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.
मस्त
वातापी गणपतिं ऐकले होते पण त्याबद्दल माहिती नव्हती
धन्यवाद
पैजारबुवा,
माहिती आवडली.
योग्य वेळी आला लेख.
+१
In reply to माहिती आवडली. by कंजूस
हंसध्वनी रागातील गानसरस्वती किशोरी आमोणकर यांनी गायलेली "गणपत विघन हरन गजानन" ही बंदीश देखील अप्रतिम आहे.
गणपत विघन हरन गजानन विराजत चंद्रमा भाल एकदंत चतुर्भुज आनंदकारण और गले सोहत मोत माल अष्टसिद्ध नवनीत मूषकवाहन विद्यावंत ध्यान विशाल चंचल शशिप्रभु स्तुति करत है शुभदायक बुद्धि कृपा कर
+१ गीत ४२ मिनिटांचे आहे?…
In reply to +१ by मूकवाचक
+१
गीत ४२ मिनिटांचे आहे??🙏
https://youtu.be/WyhDBHi7MT4?si=J_GtTx3csvnbXoCS
हम्म
In reply to +१ गीत ४२ मिनिटांचे आहे?… by Bhakti
शास्त्रीय गायकी आणि शब्दप्रधान गायकीत फरक असला, शास्त्रीय गायनात चार ओळींच्या बंदिशीचाच चार तास विस्तार करणे शक्य असले, तरी या व्हिडिओमधे साधाराण चाळीसाव्या मिनीटाला या संदर्भातली पं. शिवकुमार शर्मा यांची महत्त्वाची टिप्पणी आहे, ती आवर्जुन ऐकण्यासारखी आहे:
https://www.youtube.com/watch?v=ZZE0JsOuqOU
अवांतर : वातापि संज्ञा
अवांतर :
युटोपिया हा शब्द वातापि वरून तर आला नसेल? जुनं बदामी भारताबाहेरही बरंच फेमस होतं म्हणे.
-गा.पै.
लेख वाचताना बदामीच्या…
लेख वाचताना बदामीच्या कातळांपासून तिरुचेंकाट्टनकुडीपर्यंत आणि तिथून मुथुस्वामी दीक्षितरांच्या *“वातापि गणपतिं भजेहम्”* पर्यंतचा सुंदर सांस्कृतिक प्रवास मनात घडत असल्याची भावना उत्पन्न झाली.
विशेषतः इतिहास, आख्यायिका, शिल्पकला आणि संगीत यांची सांगड घालताना कुठे तथ्य आणि कुठे रचनात्मक कल्पना आहे, हे तारतम्य बाळगलेले आहे, हे विशेष.
कातळात कोरलेला गणपती आणि स्वरांत अजरामर झालेला गणपती दोघांनाही एका धाग्यात ओवणारे लिखाण
गणेशोत्सवाच्या धामधुमीतही…
गणेशोत्सवाच्या धामधुमीतही वेळ काढून लिहिलात हे कौतुकास्पद!
हो सर्व मांडणी डोक्यात तीन…
In reply to गणेशोत्सवाच्या धामधुमीतही… by कांदा लिंबू
हो सर्व मांडणी डोक्यात तीन दिवस आधीच होती.आणि संदर्भ शोध आधीच झाले त्यामुळे सोप्पे झाले😇
सर्वांचे खुप खुप आभार!
छान
गणेशोत्सवाच्या काळात वातापी गणपतीबद्दलची माहिती आवडली.
लिहिते राहा.
-दिलीप बिरुटे
चांगले लिहिलंय
गणपतीच्या मूर्ती विकासाच्या आरंभीच्या काळातील हे गणपती असल्याने आजचे गणपती आणि वातापि गणपतीच्या मूर्तीशास्त्रात थोडा फरक दिसतो. वातापि गणेश प्रामुख्याने द्विभुज आणि उभ्या अवस्थेततले दाखवले जातात. अगदी वेरुळ आणि घारापुरी येथील गणेशशिल्पांवर देखील वातापी रचनेचा प्रभाव दिसून येतो.
मस्त माहीतीपूर्ण लेख!!
लेख वाचताना पुन्हा पुन्हा वर जाउन लेखकाचे नाव प्रचेतस नाही ना ते बघुन घेतले (ही प्रशंसा आहे बरं का, खवचटपणा नाही)
😄 कहा राजा भोज कहा गंगु…
In reply to मस्त माहीतीपूर्ण लेख!! by राजेंद्र मेहेंदळे
😄 कहा राजा भोज कहा गंगु तेली🙃
धन्यवाद!!
प्रचेतस, Bhakti व इतर…
प्रचेतस, Bhakti व इतर प्रभृतींना एक सुचवणी -
येत्या हिवाळ्यात हंपी येथे एक विकांत मिपा कट्टा आयोजित करावा. इतिहास-पर्यटन-प्रेमी-मिपाखरे भिरभिर उडत तिथे येतील. तिथे इतिहास-अध्यात्म-शिल्पा-कातळ-लेणी-भग्नावशेष वगैरेची live चिवचिव करता येईल.
- (रसिक मिपाखरू) कांदा लिंबू
हिवाळ्यात हंपी येथे एक विकांत मिपा कट्टा आयोजित करावा. इतिहास-पर
मी माझे नाव रजिस्टर करतो.
समयोचित लेख
माहितीपूर्ण लेख आवडला. दिवसेंदिवस आपली लिहिण्याची शैली बहरत चालली आहे .
दिवसेंदिवस आपली लिहिण्याची…
In reply to समयोचित लेख by गोरगावलेकर
दिवसेंदिवस आपली लिहिण्याची शैली बहरत चालली आहे .
🙏🙏
😊हे कर्नाटकच्या प्रेमापोटी घडले असावे.
मनाने कायम कर्नाटकात असणारी भक्ती 😅😇
खूप सुंदर लेखन आणि मांडणी. …
खूप सुंदर लेखन आणि मांडणी. 'दाता तू गणपती गजानन' देखील हंसध्वनीवर बेतलेले आहे.
एक शंका, गणपतीने असुरवध डाव्या सुळ्याने केला की उजव्या? मूर्तींमध्ये शक्यतो डावा सुळा अर्धा दिसतो.
नवरा म्हणत होता ते वातापि…
In reply to खूप सुंदर लेखन आणि मांडणी. … by श्वेता व्यास
नवरा म्हणत होता ते वातापि नाही दाता तू आहे गाणे 😅 लोक तुला हसतील वातापि काय 😂त्यालापण लेख वाचायला दिला मग...
सुंदर !
सुंदर !