Skip to main content

खिरेश्वर - नागेश्वर

लेखक प्रचेतस यांनी गुरुवार, 21/05/2026 13:18 या दिवशी प्रकाशित केले.

हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी असलेलं खिरेश्वर अस्सल डोंगरभटक्यांना प्रचलित नाही असे होणारच नाही, माळशेज घाटाच्या तोंडावर, हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी असलेलं हे छोटंसं गाव हटकेश्वर, सिंदोळा, हडसर, आडराईचे जंगल, पिंपळगाव जोगाच्या विस्तिर्ण जलाशयाने वेढलेलं आहे. जुन्नरच्या पुढेच गणेशखिंड ओलांडून जाताच जलाशयाच्या बाजूस असलेल्या निमुळत्या रस्त्यावरुन आपण खिरेश्वरला पोहोचतो.

 

गणेशखिंडीजवळ जाताच कृष्णधवल मेघ डोंगररांगांशी झट्या घेऊ लागले आहेत. जणू पाऊसकाळ अवतरल्याची ते सूचनाच ते देत आहेत.

सर्वतः हरितं भूमौ, श्वेतकृष्णा घना नभे।
शैलशृङ्गेषु धावन्ति, वर्षाकालस्य सूचकाः॥

 

 

निळ्या आकाशात कृष्णधवल पावसाळी ढग मनोहारी दिसत आहेत आणि हिरवीगार धरती निसर्गाचे अद्भुत सौंदर्य खुलवत आहे

नीलाम्बरे कृष्णधवलाः, वर्षमेघाः मनोहराः।
हरिता धरित्री रम्या, प्रकृतेः शोभा विराजते।।

गणेशखिंडीजवळचा डोंगर आकाशात उंच उठलेला आहे, जणू तो आभाळालाच स्पर्श करत असून निसर्गाचे महान वैभव दर्शवत आहे.

 

सह्याद्रीच्या अगदी निकट जाऊ लागताच खिरेश्वर गाव दिसू लागले आहे. . त्याच्या मागे पाहारा करणारा अजस्त्र हरिश्चंद्रगड आणि त्याची ती प्रसिद्ध टोलार खिंड अगदीच मनोरम भासत आहे.

डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या शेतांमध्ये छोटे जलाशय शांत पाण्याने भरून शोभत आहेत. त्यांच्या पाण्यात पडलेल्या प्रतिबिंबांतून आकाशातील ढग अधिकच रमणीय दिसत आहेत

गिरेः पादप्रदेशस्थितेषु क्षेत्रेषु
लघुजलाशयाः शान्तजलपूर्णाः शोभन्ते।
तेषां प्रतिबिम्बेषु नभसो मेघाः
रमणीयतां प्रकटीकुर्वन्ति।।

उत्तरेकडे भैरवगडाचा बेलाग सुळका धुकटाआडून डोकावत आहे.

मेघ जणू पर्वतांवर उसळत आहेत, पहाडाच्या छत्रछायेखाली वाड्या शांतपणे पहुडलेल्या आहेत.

शैलशृङ्गं समाश्रित्य, मेघा नृत्यन्ति सादरम्।
हरिताभा धरा सर्वा, रम्यं दृश्यं प्रजायते॥

अशाच निसर्गरम्य वातावरणात फांसना शैलीत शिखर असलेलं  प्राचीन नागेश्वर मंदिर सहस्त्र वर्षे उन्ह पाऊस वारा झेलत आजही उभे आहे. 

 

फासळ्यांसारख्या दिसणाऱ्या फांसना शैलीने हे शिलाहारकालीन मंदिर नटलेले आहे.

 

त्याच्या सभामंडपातील दिक्पालपट जरी झिजलेला असला तरी आजही त्याच्यातले दिक्पाल व्यवस्थित ओळखता येत आहेत.

दिक्पालांचे हे पट लोकपालांनी सुशोभित आहे. चार दिशा आणि कोनांत देवता रक्षण करत आहेत.  इंद्र पूर्व दिशा, वरुण पश्चिम दिशा, यम दक्षिण दिशा, कुबेर उत्तर दिशा, अग्नि आग्नेयत तर वायू वायव्येत, निर्ऋती नैरृत्यात आणि ईशान्येला ईशण स्थित आहे. अशा प्रकारे जगाच्या रक्षणासाठी दिक्पालांची दिव्य व्यवस्था आहे आणि ती अत्यंत शोभिवंत दिसत आहे.

 

दिक्पालपटं दिव्यं, लोकपालैः विराजितम्।
चतुर्दिक्षु तथा कोणेषु, रक्षां कुर्वन्ति देवताः॥
इन्द्रः पूर्वां दिशं पाति, वरुणः पश्चिमां तथा।
यमः दक्षिणदिक्पालः, कुबेरः चोत्तरे स्थितः॥
अग्निः अग्नेय तु, वायुः वायव्यदिशि स्थितः।
नैरृत्यां निर्ऋतिः प्रोक्तः, ईशान्यां ईशन: स्मृतः॥
एवं लोकस्य रक्षार्थं, दिक्पालाः संव्यवस्थिताः।
ब्रह्माण्डस्य व्यवस्था सा, दिव्या शोभां प्रकाशते॥

 

 

मध्यभागी दशदिशांना प्रकाशित करणारा सहस्ररश्मी सूर्य स्थित आहे.

मध्ये स्थितः सहस्रांशुः, दशदिशाः प्रकाशयन्।
जगतः जीवनं दत्त्वा, तेजसा शोभते रविः॥

 

गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर अनंतशयनी भगवान विष्णू पहुडलेला आहे. लक्ष्मी त्याचे पाय चुरत आहे. झिजलेही ही मूर्ती आताही तिच्या देखणेपणामुळे इतका आनंद देत असेल तर ती तिच्या सुवर्णकाळात तर अतिशय शोभायमान होत असेल.

गर्भगृहद्वारशिखरे, अनन्तशयने स्थितः।
भगवान् विष्णुः शान्तात्मा, योगनिद्रां समाश्रितः॥
लक्ष्मीः तस्य पादौ च, स्नेहेन परिमार्जयेत्।
दिव्यं दृश्यं विराजते तत्र, भक्तानां हर्षवर्धनम्॥

कुण्या अनाम वीरांनी इथे देह ठेवलेलेही दिसत आहेत. 

 

कदाचित ह्या मंदिरापेक्षाही प्राचीन असे एक लयनस्थापत्य इथे मंदिराच्या जवळच एका खडकात कोरलेले दिसत आहे. बाहेर चार आणि आतमध्ये चार अशा आठ स्तंभांवर तोललेले हे लेणे आजतरी शैवालयुक्त पाण्यामुळे आत जाऊन पाहता येणे शक्य दिसत नाहीये.

 

 

हरिश्चंद्रगड हा शैलपर्वत आज मेघांच्या आवरणामुळे झाकला गेला आहे. त्याचे शिखर जणू अदृश्य झाल्यासारखे भासू लागले आहे.

हरिश्चन्द्रगडः शैलपर्वतः अद्य मेघावरणेन आच्छादितः।
अदृश्यः इव सञ्जातः, नेत्रगोचरात् विलुप्तः दृश्यते॥

 

माळशेजच्या बाजूने मात्र आता संपूर्ण हरिश्चंद्रगड व्यवस्थित दिसून येत आहे.

 


वाचने 367
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

एकदम समयोचित लेख प्रचेतसभौ!! पाउस अंदमानात दाखल झालाय म्हणे. 

उत्तम माहीतीपूर्ण लिखाण आणि प्रचि. पाहुन जुन्या आठवणी दाटल्या.

 

भर उन्हाच्या काहीलीत असे लेख वाचुन आणि प्रचि पाहुनच गारेगार वाटायला लागले आहे आणि मनात पावसाळी ट्रेकची जुळवाजुळव चालु झाली आहे. बाकी पुण्याहुन वन डे किवा ओव्हरनाईट (पाचनई बाजुने) करता येण्यासारखा आहे हरीश्चंद्र. पण खरी मजा घ्यायची असेल तर मुक्कामाला पर्याय नाही. खिरेश्वर मार्ग मुंबईकरांसाठी. साहसाची आवड असेल तर नळीची वाट किवा माकडवाट आहेच. तो भैरवगडाचा फोटोही मस्त आलाय. आता जावं लागतंय या पावसाळ्यात :)


In reply to by राजेंद्र मेहेंदळे

आजकाल खिरेश्वर मार्ग फारसा कुणी वापरत नाही. जवळपास ९०% जनता पाचनईमार्गेच जाते. रात्री १२ च्या पुढे ओतूर ब्राह्मणवाडा कोतूळ रस्त्यावर कित्येक टेम्पो ट्रॅव्हलर्स मोठमोठे ग्रुप घेऊन पाचनई किंवा साम्रदला जाताना दिसतात. खिरेश्वर खूप लांबलचक दमवणारा मार्ग आहे. पाचनई मार्ग एकदम सुलभ असून निसर्गसौंदर्यातही अधिक उजवा आहे.


पुन: पुन: जावेसे वाटणारे ठिकाण. 

मुख्य मार्गावरून पिंपळजोगा धरणाच्या भिंतीवरून नागेश्वरला जाणारा रस्ता ( फंड्री चित्रपटाचे चित्रीकरण झालेला आहे) स्वर्गात जाणारा रस्ता सहा किमीटरचा आहे. ( भूजमध्ये धोलाविराकडे जाणाऱ्या रस्त्यालाही road to heaven म्हणतात.) पण आपल्या सह्याद्रीतला आहे हा. उजवीकडे धरण आणि डावीकडे काळू नदीचा भाग आहे. 

तीन वेळा गेलो पण अजून खिरेश्वर गावातले देऊळ पाहिले नाही. 

अप्रतीम.


In reply to by कंजूस

खरोखरच हा अक्षरस: स्वर्गात जाणारा रस्ता आहे. तुम्ही तीनवेळा जाऊनही नागेश्वर पाहिले नाही म्हणजे कमाल आहे. गावापासून अगदी जवळच आहे.


In reply to by प्रचेतस

हे रस्त्याच्या डावीकडे. पण खिरेश्वर गावात आणखी एक आहे देऊळ म्हणतात ते नाही पाहिले. नागेश्वरचा लेखही टाकला आहे मागे.


In reply to by कंजूस

खिरेश्वरचे मंदिर म्हणतात ते बहुधा नागेश्वर हेच असावे. बाकी खिरेश्वरमध्ये एक मंदिर बहुधा आहे पण अर्वाचीन आहे.


In reply to by कंजूस

मुख्य मार्गावरून पिंपळजोगा धरणाच्या भिंतीवरून नागेश्वरला जाणारा रस्ता ( फंड्री चित्रपटाचे चित्रीकरण झालेला आहे)  

फंड्री ??

नाळ -२ सिनेमा आहे ना तो.


कुठे गेल्या कविता, कुठे गेले पर्यटन

राजकारणापायी झाले सर्वांचे उच्चाटन

किल्लेदारांचे गड अन वल्लींचे बोलके दगड

मोरू,मोगू व्यतिरिक्त अजूनही विषय  रगड....

 

पण तुमची चित्रमय भटकंती अचानक  वाळवंटातल्या मृगजळा सारखी समोर आली. प्रत्यक्षात, मृगजळ नसून वाळवंटातला खराखुरा झरा भेटला.

 

नेहमीप्रमाणेच, माहितीपूर्ण  ,मनोरंजक आणी वाचनीय. धन्यवाद. 

 


अप्रतिम.. पावसाळी फोटो बघुन जेलस व्ह्ययला झाले..

तुझ्या फोटो वरुन वाटतेय की दिक्पालपट भग्न झालाय तरी २००२ साली जेव्हा पहिल्यांदा खिरेश्वर मंदीर बघितले तेव्हा तो अत्यंत सुस्थीतित होता आणी शेजारील लेण्या देखील ॲक्सेसीबल होत्या...


In reply to by स्वच्छंदी_मनोज

तेव्हा मंदिराची अवस्था बिकट होती, मात्र दिक्पालपट बऱ्यापैकी चांगल्या अवस्थेत होता. मध्यंतरी मंदिराचा जीर्णोद्धार झाला, पुढ्यात फरश्या, शेड वगैरे आल्यात. काळूवर देखील आता बंधारावजा पूल झालाय. बाकी लेण्यांमध्ये आता उन्हाळ्यात जाता येत असावे. मी गुदस्ता ऑगस्टमध्ये गेलो होतो तेव्हाचे हे फोटो आहेत. तेव्हा तर आत जाणे अशक्यच.


In reply to by प्रचेतस

मंदीराचा जिर्णोद्धार झालाय हे माहीत नव्हते... माझ्याकडे २००१ सालाचा सुस्थितीतील तेव्हाचा दिक्पालपटाचा फोटो आहे.. तुला शेअर करतो..

माझ्या माहीती प्रमाणे जुन्नर परिसरात १००० एक वर्षांपुर्वी राज्य करणाऱ्या राजा भोज ने १२ शिवमंदीरे बांधली होती.. हे खिरेश्वर त्यातलेच आहे बहुतेक.. इतर काही, कुकडेश्वर, अंबरनाथ, लोनाड, खिडकाळेश्वर, ....तुला जास्त माहीती असेल.. 

 


आहाहा, डोंगरांच्या प्रचि काय सुंदर आल्या आहेत.

स्वच्छंदी_मनोज शी सहमत, जेलस व्ह्यायला झालं खरं.

 

- (भटक्या) सोकाजी
 


मस्त!

नाणेघाटात तीनदा गेले आहे,मैत्रीणींनाही हा स्वर्ग पावसाळ्यात दाखवला.

नागेश्वर इतक्या जवळ असुनही गेले नाही.यंदा नक्कि जाणार!


के व ळ  अ प्र ति म  ! 

 

प्रेक्षणिय धागा ! 

 

प्रचि आणि श्लोक वाचून भारी वाटल ! 


मस्तच प्रचेतस!