हंपी नावाचा एक मराठी सिनेमा आहे. ठीकठाक आहे, पण तेव्हापासून हंपीचा ध्यास लागला होता.
हंपीला जाण्याआधी मी मिपावर जयंत कुलकर्णी यांची "विजयनगर साम्राज्याची मालिका" नीट वाचून काढली. युट्युबवर शेकडो व्हिडिओ पाहिले. प्रत्यक्ष हंपी फिरताना "सफर हंपी - बदामीची आणि गदग परिसराची" हे आशुतोष बापट यांचे पुस्तक सतत सोबत होते. एक-दोन ठिकाणी गाईड घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, तेही केले.
तरी घरी आल्यावर ते भग्न अवशेष, तरीही ती भव्यता हे सर्व कसे साकार झाले आणि मग हे सर्व कसे नष्ट झाले, याचे मनाला खूप कुतूहल होते. यासाठी मग पुस्तक वाचायला सुरुवात केली.
रोबर्ट सेल चे A Forgotten Empire: Vijayanagar – A Contribution to the History of India पुस्तक आणि Fritz & Michell चे Hampi Vijayanagara आंतरजालावर उपलब्ध आहे. या पुस्तकांत डोमिंगोस पेस (१५२०-२२) आणि फर्नाओ नुनिज (१५३५-३७) यांनी हंपीला भेट दिल्याचे वर्णन आहे. तसेच तारीख-ए-फरिश्ता (गुलशन-ए-इब्राहीमी) हे पुस्तकाचाही संदर्भ म्हणून वापर केला आहे
हे सर्व वाचून आकलन होण्यासाठी तीन महिने लागले. मी अजूनही या सर्वांचे बारकाईने वाचन करत आहे.
समजलेली माहिती उतरवून त्यावरून AI ने सुरेख चित्रे तयार केली, जी खरोखरच खूप रोचक आहेत.
मिपाची थोरवी पाहता, पूर्ण बारकाईने काही पैलू अभ्यासल्यावरच लिखित माहिती द्यावी, असा मानस आहे.
तूर्तास ज्यांना हंपीला भेट द्यायची असेल, त्यांच्यासाठी ही हंपी इतिहासाची चित्रमालिका आहे. हंपी स्थापत्याबाबत इथे निवांतपणे लिहिणारच आहे.
ही मालिका हंपी (विजयनगर साम्राज्य) चा इतिहास सोप्या, वाचनीय मराठीत आहे. पौराणिक कथा, राजवंश (संगम → सालुवा → तुलुवा → आरविडू), युद्धे, राजकीय डावपेच आणि सांस्कृतिक पैलू यांचा सविस्तर आढावा घेतला आहे. एकूण ७-८ भाग आहेत
१.उगम आणि पौराणिक कथा: पम्पा-शिव कथा, हेमाकुटा, विरुपाक्ष मंदिराचा इतिहास, किष्किंधा (रामायण काळ) यांचा उल्लेख. चालुक्य, होयसळ, कंपिली राजवटींचा परिचय. उत्तर भारतातील मुस्लिम आक्रमणे आणि दक्षिणेतील धोका याचे चित्रण केले आहे.भाग-१

२.संगम राजवंश (हरिहर-बुक्का): हरिहर-बुक्का बंधू, होयसळ साम्राज्याचा अंत, बहमनी सत्तेचा उदय (गंगू ब्राह्मण कथा), प्रारंभिक विस्तार. इब्न बतूताच्या वर्णनातून मदुराई सुलतानाची क्रूरता दाखवली आहे.
भाग-२
३.हरिहर द्वितीय,पंगळ युद्ध (बहामनींवर निर्णायक विजय).
भाग ३

४.देवराय प्रथम: अडोनी वेढा, गोवा-चौल जिंकणे, पार्थल (सोनाराची मुलगी) प्रेमकथा (फेरिश्ता नुसार, अतिरंजित असू शकते), देवराय प्रथमने सैन्य सुधारणा, घोडदळ मजबूत करणे यावर भर.
भाग-४

५.देवराय द्वितीय: बहमनी व गजपतींशी अनेक युद्धे, मुस्लिम धनुर्धाऱ्यांची भरती, दक्षिण व पूर्वेकडे विस्तार. संगम वंशाचा ऱ्हास.
भाग ५

६.सालुवा राजवंश: नरसिंह देवराय, गजपतींशी उदयगिरी युद्ध (पराभव), पश्चिम किनाऱ्यावरील बंदरे जिंकणे. छोटा पण महत्वाचा संक्रमण काळ.
भाग ६

७.कृष्णदेवराय (सुवर्णकाळ): तुलुव वंश, रायचूर युद्ध (१५२०), गजपती मोहीम (उदयगिरी, कोंडाविडू, कटक), १४ लढाया जिंकणे, प्रशासन, साहित्य (अमुक्तमाल्यदा), पोर्तुगीज संबंध. त्यांचे व्यक्तिमत्त्व, योद्धा व राजा म्हणून विस्तृत वर्णन.
भाग ७

८.अंतिम काळ: रामराय, राक्षस-तंगडी (तालीकोटा) युद्ध (१५६५), पाच सुलतानांची युती, पराभव आणि साम्राज्याचा ऱ्हास.
भाग ८

मिसळपाव
प्रतिक्रिया
छान...
चित्रमय इतिहास सुंदर आहे. लेखनातला प्रयोग आणि लेखन आवडले.
लिहीते राहावे.
-दिलीप बिरुटे
किती दिवसांची सहल केली?
हंपी ,बदामी,लखुंडी . तिन्ही पाहिलं का?
इतिहासाचा आढावा चांगला अभ्यासूपणे घेतला आहे.
( मी फक्त Lonely Planet पुस्तकातील माहिती आणि नकाशे पाहून गेलो होतो. आता मुंबईतून थेट रेल्वे रोज जाते या सर्व ठिकाणी. बारा वर्षांपूर्वी थोडा खटाटोप करून रेल्वेने बदामीला गेलो आणि नंतर तिथून बसने फिरणे फारच सोपे होते. )
इकडे एखादी झटपट फेरी कुटुंबासह केली तरी नंतर एकट्यानेच दुसरी फेरी मारून पुन्हा सर्व सावकाशपणे बघणे उत्तम. कारण बऱ्याच जणांना हंपि कंटाळवाणे वाटते. हे माझे मत. हंपितून ( होस्पेटे रेल्वे स्टेशन) ते मडगाव रोज एक रेल्वे आहे सकाळी आणि त्या गाडीतून दूधसागर धबधबाही दिसतो.
___________
इतिहास अभ्यासूंसाठी लेख छान झाला आहे. हल्लीच्या पद्धतीने notes काढल्या आहेत. ब्लॉगवर लेख असल्याने तो इतर वाचकांनाही सापडेल.
नाही फक्त हंपी(अडीच दिवस)…
In reply to किती दिवसांची सहल केली? by कंजूस
नाही फक्त हंपी(अडीच दिवस) पाहिले. बदामी त्याच टप्प्यात खुप जवळ आहे हे माहिती नव्हते. हो येताना 1.40 दुपारी हॉस्पेट ते मुबंई रेल्वेनेच पुण्यापर्यंत आलो रात्री 1 वाजता तीच मुबंईल पहाट 5 ला पोहचते .
हो हंपी निवांत पाहायला हवं, अभ्यासू लोकांना एक सात दिवस पुरतील. पण दोन दिवस पुरेसे आहेत.
पण तिथली गर्दी पाहता, लोकांना हंपी आवडते असेच वाटले.हंपी वाईब कमाल आहे.
मला भेटलेल्या पैकी 70% लोक महाराष्ट्रातूनच आले होते.
हंपी एकदम बजेट trip आहे. मला ग्रुपकडून फिरायचा नव्हतं. त्यामुळे स्वतः प्लॅन केला. नाहीतर पुण्या-मुबंईहून दर शनिवारी खुप group ट्रिप घेऊन येतात.
***
हंपीला जायची तयारी..
हंपीला जाण्याचा सगळ्यात सोपा आणि किफायतशीर मार्ग म्हणजे रेल्वे. तुमच्या शहरातून किंवा जवळच्या रेल्वे स्टेशनमधून होसपेटे या स्टेशनचे तिकीट बुक करा.
दुसरा मार्ग म्हणजे तुमच्या शहरातून ट्रॅव्हल्स बुक करणे. स्वतःच्या वाहनाने बाय रोडही जाता येते.
मी पुण्याहून ट्रॅव्हल्स बुक केली होती, जिचा प्रतिव्यक्ती 1800 + टॅक्स असा खर्च आला. येताना ट्रॅव्हल्स कॅन्सल झाल्याने पैसे रिफंड मिळाले. तात्काळ रेल्वे काउंटरवरून जनरल तिकीट काढले, ज्याचा खर्च प्रतिव्यक्ती फक्त २२० रुपये पुण्यापर्यंत होता.
रेल्वे किंवा ट्रॅव्हल्सने तुम्ही होसपेटेला पोहोचता. तिथून हंपी साधारण १३ किलोमीटर आहे. यासाठी बसचे २५ रुपये प्रतिव्यक्ती तिकीट आहे आणि रिक्षा केल्यास २००-३०० रुपये लागतात.
***
राहायचे कुठे?
साधारण साउथ हंपीला दोन दिवस आणि नॉर्थ हंपीला एक दिवस पुरतो. त्यामुळे दोन रात्री न्यू हंपी किंवा मूळ हंपीत होमस्टे बुक करा. थेट जाऊनही चांगले पर्याय मिळतात.
मी उन्हाळ्यामुळे न्यू हंपीत AC रूम बुक केली होती, जिचा खर्च १८०० रुपये प्रति दिवस होता. अवश्य बार्गेनिंग करा. India Heritageppanda यांनी मदत केल्याने मला सम्राट होमस्टे मिळाले. जे खूप स्वच्छ, भरपूर गरम पाणी, सुरक्षित भागात. मालकाने दिलेल्या सूचनांमुळे माझी कोरॅकल राईड घडली, नाहीतर प्लॅन फसला असता.
***
हंपीत फिरायचे कसे??
मला खूप निवांतपणे, माझ्या सोयीनुसार प्रेक्षणीय स्थळे पाहायची असतात. त्यामुळे पहिल्या दिवशी रूमपासून विरुपाक्ष मंदिरापर्यंत रिक्षा केली (१५० रुपये, बार्गेनिंग केले). पहिल्या दिवशी मी जवळपास १० किलोमीटर पायी फिरले. फक्त एका लांबच्या ठिकाणी रिक्षा घेतली.
पूर्ण दिवस रिक्षा टुरिझम १५००-२००० रुपये प्रतिदिवस असते. ज्यांना अजिबात चालायचे नसेल त्यांनी रिक्षाच करावी. दुसऱ्या दिवशी १००० आणि तिसऱ्या दिवशी १२०० रुपये असे माझे रिक्षा खर्च झाले.
पर्याय
हंपीत ८०० रुपये प्रतिदिवस टू-व्हीलर (स्कूटर/बाइक) रेंटने मिळते. २००-४०० पर्यंत सायकलही मिळते. (सध्याच्या दरानुसार स्कूटर ४००-९०० रुपये पर्यंत असू शकते, बार्गेनिंग करा.)
***
हंपी पाहायचे कसे??
हंपीला जाण्याआधी मी पूर्ण एक आठवडा विजयनगर साम्राज्याविषयी वाचन आणि व्हिडिओ पाहिले. जयंत कुलकर्णी यांच्या लेखांचा, सागर बोरकर
" उनाडक्या: हंपी: दिवस पहिला - हजारराम मंदिर आणि पानसुपारी बाजार - भाग ३ https://share.google/L3HFbci3Aq3iXZmL5 "
यांच्या हंपी ब्लॉगचा खूप फायदा झाला. केतन पुरी आणि आशुतोष बापट यांचे यूट्यूब व्हिडिओ ऐकले. आशुतोष बापट यांचे हंपीवरचे पुस्तकही विकत घेतले.
***
पोटोबाचा कसा करायचा
सकाळी भरपेट नाश्ता-ब्रंच (इडली, डोसा, उत्तपा, वडा) करायची सवय ठेवा. थेट सायंकाळी ५-६ ला जेवण. दरम्यान ज्यूस, रस, आयस्क्रीम, फळे आणि भरपूर पाणी — हायड्रेटेड राहा. (उन्हाळ्यात ४०°C+ तापमान असू शकते, म्हणून पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स घ्या.)
***
पहिल्या दिवशी
विरुपाक्ष मंदिर आणि त्याच्या परिसरातील हेमकूट पर्वत, दोन गणेश मंदिरे, कृष्ण मंदिर, लक्ष्मी नरसिंह, कोंदडराम अच्युतराय मंदिर आणि सूर्यास्त मातंग टेकडीवरून पाहायचा.
***
दुसऱ्या दिवशी
विजयविठ्ठल मंदिर, जुना राजवाडा परिसर, प्रसन्न विरुपाक्ष, म्युझियम, कोरॅकल राईड आणि सूर्यास्त तुंगभद्रा किनारी किंवा हेमकूट पर्वतावर.
****
तिसऱ्या दिवशी
अंजनेरी पर्वत, पम्पा सरोवर, शबरी गुहा, अनगुंडी किल्ला पाहायचे.
अतिरिक्त टिप्स
बार्गेनिंग सर्व ठिकाणी करा,राहणे, रिक्षा, टू-व्हीलर, सर्व काहीत.😅
उन्हाळ्यात गर्दी कमी असते, त्यामुळे चांगले डील आणि शांत अनुभव मिळतो.
सकाळी लवकर बाहेर पडा आणि दुपारी सावकाश विश्रांती घेत फिरा.
चांगले चालण्याचे शूज, सनस्क्रीन, टोपी आणि रिचार्जेबल पॉवर बँक घ्या.
मोबाईल नेटवर्क काही ठिकाणी कमकुवत असू शकते.
ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये गेल्याने मला सोपं गेलं होतं
In reply to नाही फक्त हंपी(अडीच दिवस)… by Bhakti
होस्पेटातच राहिलो होतो. जाण्या येण्याचे बस तिकिट एवढाच खर्च केला होता. बाकी सर्व पायी फिरलो नऊ तास.
सुंदर…
सुंदर लेखन प्रयोग आणि माहिती.
वीस वर्षांपूर्वी हंपीला गेलो होतो. सायकलवर हळूहळू सगळं नीट बघत तीन दिवस हिंडलो पण किमान आठवडा हवा. अभिमान आणि दुःख या दोनही भावना उचंबळून यावा अशी जागा आहे ही.
कुठलं AI टूल वापरलं ?
तेवढा “गरिमा” शब्द मला का नेहमी खटकतो कुणास ठाऊक. संस्कृतोद्भव असला तरी मराठीला जवळचा वाटत नाही. “थोरवी” जास्त चांगला वाटतो.
हे आमचं उगीचच बरं का…भोचकपणाबद्दल क्षमस्व.
Chatgpt AI टूल वापरले.थोरवी …
In reply to सुंदर… by किल्लेदार
Chatgpt AI टूल वापरले.
थोरवी "केला बदल. शब्द आठवत नव्हता😊
वा...
वा... चित्रांसकट माहिती देण्याची कल्पना आवडली!
आजची स्वाक्षरी: DIL WAALE CHOR (Song) | PATI PATNI AUR WOH DO |
लेख आवडला.
लेख आवडला. हंपीला कधीतरी जायचे आहे. बघू कधी योग येतो ते.
हंपीबद्द्ल कितीही लिहावं,…
हंपीबद्द्ल कितीही लिहावं, वाचावं आणि बघावं ते कमीच.
लेख अभ्यासपूर्ण झालाय
वाखु साठवतोय, पण ती सुविधा अजून नाही असे वाटते. हंपीला अजून जायचा योग आलेला नाही. एवढया कडक उन्हाळ्यात गेलात म्हणजे धाडसच.
एआयने काढलेली चित्रे व माहिती चांगली आहे. तुमची मेहनत जाणवते. मला मात्र सरळ एकरेषीय मजकूर वाचायला आवडतो. डोक्याला ताप नाही, सरळ वरपासून खालपर्यंत सरळ वाचत जायचे. इतिहासावरील चित्रमय मजकूर वाचताना इथून तिथे जायचा निर्णय घेत रहावे लागते. त्यामुळे ले आउट एकरेषीय ठेवला असता तर जास्त बरे झाले असते. शिवाय चित्रे कृ बु ने काढल्याने खोटी आहेत हे जाणवत राहते.
हो ना
In reply to लेख अभ्यासपूर्ण झालाय by स्वधर्म
हो ना,
भक्तीताई इतके वैविध्यपूर्ण विषयांवर इतके सुंदर नेहमी लिहितात. गरजच नव्हती अशी एआय जनरेटेड ठिगळे लावायची. एकतर ही एआय चित्रे आता इतकी परिचयाची झाली आहेत की त्यात काही नवीन आणि क्रियेटिव्हही वाटेना. बरं इतकं करुन त्या चित्रातल्या मजकुरात खंडीभर चुका आहेत.
बाकी हंपी अजूनही लिस्टीतच आहे. बघू कधी जमते ते.
@अभ्याअहो मी तुमच्यासारखी…
In reply to हो ना by अभ्या..
@अभ्या
अहो मी तुमच्यासारखी चित्रकार नाहीये ना...नाहीतर हम्पीची खुप चित्रे रेखाट्ली असती😄. ए आय चित्रांबाबत अजुन पाळ्ण्यात आहे,तेव्हा चित्रात मजकुर १९-२० करत असतो.पण काय सांगायचे आहे ते कळून जाते.
अवांतर
उन्हाळ्याची सुट्टी आहे तर लेक भुणभुण करते,नवीन काहीतरी पाहिजे.तीला फॅशन डिजायनर व्हायचे तर चित्र रेखाटुन ए आय कडुन तसा ड्रेस तयार करयचे शिकवले,गाणी बनवायला शिकवली .लहान्पणी आम्ही सुट्टीत कॉम्प्युटर क्लास लावयचो ह्यांना ए आय चे क्लास लावावे लागतील🙃
हम्पी माझ्या आवडत्या पर्यटन…
हम्पी माझ्या आवडत्या पर्यटन स्थळांच्या यादीत बऱ्याच वरच्या स्थानावर आहे. तिथे अनेकदा गेलोय पण बहुतेक वेळा एखादा मुक्काम करून दीड-दोन दिवस फिरून पुढे निघालोय. मागच्या वेळी नोव्हेंबर २०२५ मध्ये एका मित्रासोबत गेलो होतो. विराट होमस्टे https://maps.app.goo.gl/QFCAkJ5rQrb2K4Bv7 इथे एक मुक्काम केला होता. बजेटच्या मनाने चांगले आहे.
एकदा वेळ काढून आठवडाभर राहण्यासारखं जायचं आहे.
सर्वांचे आभार! नक्कीच हंपी…
सर्वांचे आभार! नक्कीच हंपी सहल आयोजित करुन लवकर जा.पण असे सांगेन की ,थोडा अजुन अवधी घेउन बदमि,ऐहोळे,हळेबीडु आणि कर्नाटकातली अजुन मन्दिरे पण तेव्हाच पहा.
उत्तम..
उत्तम ! इतिहासाच्या या उजळणीनंतर तुमच्या भटकंतीचे अनुभव वाचणे ही आवडेल...
भेट देण्यास इच्छुकांसाठी स्वानुभवावरून काही अवांतर माहिती.... ...
हंपीच्या जोडीने बदामी-पट्टदकल-ऐहोळे ही करावेचं असे आहे, भेट देण्यास हिवाळा ऋतू सर्वोत्तम. बदामीवरून सुरवात करून, पट्टदकल-ऐहोळे व शेवटी हंपी करणे श्रेयस्कर. स्वतःचे वाहन वापरणे अत्यंत सोयीचे व प्रवास कालावधी वाचवणारे, स्वतःचे वाहन असल्यास, दीड दिवस बदामी (लेणी, किल्ला आणि भूतनाथ मंदीर समूह-अगस्त्य तलाव परिसर), दीड दिवस पट्टदकल+ऐहोळे मिळुन व हंपी तीन वा चार दिवस अशी विभागणी सर्वसामान्य पर्यटकांसाठी पुरेशी ठरावी. अभ्यासु, संशोधक वृत्तीच्या लोकांसाठी तर कितीही दिवस कमी पडावेत असा परिसर आहे.
सकाळी सहाला ही ठिकाणे उघडतात व त्यावेळी गर्दी अजिबात नसते व लगतच्या दाट मानवी वस्तीचा उपसर्ग ही मर्यादित असतो, त्यामुळे सकाळची ही वेळ गाठता आली तर अनुभव अजूनचं सुंदर होतो, तांबूस दगडी टेकड्यांवर कोवळी उन्हे उतरताना पाहणे 'खास' असते.
या सर्व ठिकाणी स्थानिक मार्गदर्शक(Guide) घेण्याविषयी तडजोड अजिबात करू नये, सर्वसामान्य पर्यटकांसाठी मार्गदर्शकाशिवाय ही ठिकाणे पाहणे मुर्खपणा ठरेल इतके ते महत्त्वाचे आहे, शिवाय स्वतःचे वाहन असले तरी भरपूर चालायची तयारी असणे गरजेचे....
होस्पेटमधील प्राणी संग्रहालय आणि तुंगभद्रा धरणाच्या केंद्रीय जल निगमच्या ताब्यातील भागातून संध्याकाळच्या वेळी धरण परिसराची सफर हा अनुभवही नक्की घ्यावा असा आहे, जल निगमच्या एखाद्या कर्मचाऱ्याची ओळख असेल तर खाजगी वाहन थेट वर गेस्ट हाऊसपर्यंत नेता येते व धरणाच्या भिंतीवर ही सहज प्रवेश मिळू शकतो, तिथल्या विस्तीर्ण जलाशयाच्या पार्श्वभुमीवरचा कातरवेळेचा अनुभव 'दुर्मिळ' असा ठरावा...