मेळघाट २: नरनाळा किल्ला
मेळघाट १: शहानूर-धारगड सफारी
आता दुपारी ३ च्या सुमारास जायचे होते नरनाळा किल्ला बघायला त्याविषयी पुढील भागात.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
शहानूरच्या वनखात्याच्या रिसॉर्टवर दुपारी जेवण केले. इथले जेवण अगदीच साधे, शिवाय चवदारपण नाही. अर्थात जंगलात फिरायला यायचे म्हटले तर खायचे प्यायचे चोचले जरा बाजूलाच ठेवावे लागतात. तर जेवण करुन थोडावेळ झोपलो आणि दुपारच्या नरनाळ्याच्या सफरीसाठी वनखात्याचा गाईड ठरवला. नरनाळा किल्ल्यावर जाण्यासाठी डांबरी रस्ता असून थेट किल्ल्यात गाडी जाते मात्र वनखात्याचा गाईड अत्यावश्यक असतो. ६०० रुपये किल्ल्याची प्रवेश फी आणि गाईडचे ३०० असे एकूण ९०० रुपयांची पावती फाडून आम्ही आमच्या गाडीतून मार्गस्थ झालो. शहानूर गेत मधून आत शिरताच लगेचच दोनेक किमी अंतरावर डावीकडे एक फाटा फुटून नरनाळा किल्ल्याची चढाई सुरु होते आणि सरळ जाणारा कच्चा रस्ता जंगलात शिरतो ह्याबद्द्ल मी मागच्या भागात लिहिलेच होते.
नरनाळा किल्ला
नरनाळा किल्ला हा नरनाळसिंग ह्याने बांधला असे मानले जाते. १० व्या शतकात नरनाळ सिंग ह्या गोंड राजाने ह्याची निर्मिती केली आणि १३ व्या शतकात हा किल्ला खिलजी सुलतानांच्या ताब्यात गेला. खिलजींच्या अस्तानंतर हा किल्ला बहुधा बहमनींच्या ताब्यात गेला , नंतर बहमनींची शकले होऊन हा किल्ला वर्हाडच्या इमादशाहीच्या ताब्यात आला व नंतर १५ व्या शतकात मुघलांच्या ताब्यात गेला. ह्या विभिन्न कालखंडात इथं तटबंदीयुक्त विभिन्न बांधकामे उभारण्यात आली. हा किल्ला अतिशय प्रचंड असून ह्याचे पूर्वेला जाफराबाद आणि पश्चिमेला तेलियागड असे दोन भाग आहेत. आजमितीस गडावर पूर्ण रान माजलेलं असून चालत गडभ्रमंती करण्यास परवानगी नाही. ३६२ एकर इतक्या प्रचंड परिसरात ह्या किल्ल्याचा विस्तार असून किल्ल्यावर वेगवेगळ्या बाजूस जवळपास ३६० बुरुज, ६ मोठे दरवाजे आणि २० लहान दरवाजे आहेत.
किल्ल्याच्या जवळपास ३/४ उंचीवर गडाचा पहिला दरवाजा लागतो. शहानूर दरवाजा.
इथून दिसणारी किल्ल्याची तटबंदी.
शहानूर दरवाजातून दिसणारी खालच्या बाजूच तटबंदी, डाव्या बाजूस शहानूर गाव आणि दूरवर धूसर अकोट नगर.
ह्यानंतर जवळपास एखादा किमी अंतर गेल्यावर गडाचा मेहंदी दरवाजा लागतो. तीन कमानींनी बनलेला हा दरवाजा गडाच्या मुख्य महाकाल द्वारसंकुलाचाच एक भाग आहे. दरवाजात पहारेकर्यांसाठी देवड्या, ओसर्या आहेत.
मेहंदी दरवाजा
मेहंदी दरवाजातूनच इथलं प्रमुख आकर्षण असलेल्या महाकाली दरवाजात जाता येते, मात्र गाडीसाठी बाह्यवळण असून तो मार्ग गडाच्या तटबंदीला वळसा घालत महाकाली दरवाजाच्या पुढच्या बाजूस येतो.
महाकाली दरवाजा
हे येथील एक प्रमुख आकर्षण. हा अत्यंत भव्य दरवाजा असून प्रवेशद्वारावर, बाजूच्या कोटांवर अतिशय सुबक नक्षी कोरलेली आहे. दरवाजाच्या दोन्ही बाजूंवर अत्यंत सुबक अशी कमळं कोरलेली आहेत. आजूबाजूला पहारेकर्यांसाठी देवड्या, त्यांवर नक्षीदार गवाक्षं, जाळीदार सज्जे आहेत. अंतर्गत कोरलेल्या जिन्यांतून महाकाली दरवाजाच्या माथ्यावर जाता येते. प्रवेशद्वारातच खोबण्यांमध्ये घुबडांचा निवास असून त्यांची उंदराची हाडे, केस इत्यादींचा समावेश असलेली त्यांची विष्ठा दरवाजात पडलेली असते.
प्रवेशद्वारावर फारसी भाषेतील दोन मोठे शिलालेख असून एक शिलालेख दरवाजाच्या सर्वात वरील बाजूस असून दुसरा शिलालेख प्रवेशद्वाराच्या दोन कमानींच्या मधल्या भागात मध्यभागी असलेल्या कमळाच्या खालच्या बाजूस आहे.
शिलालेख आणि नक्षीदार कमळं
देखणे नक्षीकाम
महाकाली दरवाजातून बाहेर आल्यावर
महाकाली दरवाजा पाहून आमची गडफेरी सुरु झाली. गडावरही वनखात्याचे एक चेकपोस्ट असून त्यात दोन्/तीन वनकर्मचारी मुक्कामास असतात. गाईडने दिलेल्या माहितीनुसार गडावर सध्या दोन अस्वले आणि एका वाघाचा वावर होता त्यामुळे त्याने गाडीतून न उतरण्याचा सल्ला दिला. त्या दिवशी शहानूरच्या जंगलातून नुकताच एक वाघ खालच्या बाजूस म्हणजे अकोटच्या दिशेने गेला होता त्यामुळे गडावरील सर्व वनकर्मचारी आणि शहानूरचेही वनाधिकारी त्याला वाघास शोधवयास व त्याला परत जंगलात पाठवण्यास अकोटला गेले होते त्यामुळे वर कुणीही नव्हते. गडाला गाडीतूनच फेरी मारता येते.
महाकाली दरवाजाजवळच घोड्यांची पागा आहे.
जवळच शक्कर तलाव आणि काही कमानदार बांधकामे आहेत.
आमच्याकडे वेळ कमी असल्याने तसेच खाली उतरण्यास परवानगी नसल्याने जमेल तसे अवशेष गाडीतूनच आणि गाईड सांगेल तिथेच मोजक्या ठिकाणी उतरुन पाहता येत होते.
किल्ल्यावरील फेरीचा रस्ता
किल्ल्यावर फिरताना विविध ठिकाणी विखुरलेले अवशेष दृष्टीस पडतात.
झाडीत दडलेले दरवाजे
महारुखांनी गिळंकृत केलेली बांधकामं
मोती तलाव
किल्ल्यावर जागोजागी वन्यप्राण्यांच्या निरिक्षणासाठी मचाणं उभारण्यात आली आहेत.
पूर्वी गडाचा एक प्रमुख असलेला उत्तरेकडील बाजूचा दरवाजा-दिल्ली दरवाजा आज पूर्णपणे झाडोर्यात बुडून गेला आहे, अशक्य रानामुळॅ तिथं उतरणं जवळपास असंभव आहे.
इथलं अजून एक आकर्षण म्हणजे इथली भली प्रचंड अशी नउगजी तोफ. अतिशय भव्य अशी ही तोफ असून ही बांगडी पद्धतीची आहे. म्हणजे लो़खंड ओतून बांगडीसारख्या रिंगा करुन त्या एकत्र सांधणं.
निश्चितच ह्या तोफेमुळे गडाचे मारगिरी करण्याचे सामर्थ्य कितीतरी पटीने वाढलेले असावे.
नऊगजी तोफेच्या इथून दिसणारा गडाचा एक दरवाजा
गडावर नैसर्गिक पाणवठे खूप असल्याने अतिशय समृद्ध वनजीवन आहे. अस्वल, वाघांसोबतच नीलगायी, सांबार, रानडुकरे, विविध पक्षी ह्यांचा सहवास तेथे आहे.
मोती तलावाच्या इथून दूरवर कड्याच्या टोकाशी असलेल्या एका फांदीवर सर्पगरुड दिसला.
मोती तलावाच्या इथेच भरपूर सांबार पण दिसले. आता जवळपास साडेपाच/ पावणेसहा वाजले होते, परतीची वेळ झाली होती, महाकाली दरवाजापाशी सांबारं उभी होती. आम्ही अतिशय स्तब्ध झाल्यामुळे त्यांना आमची चाहूल लागत नव्हती. सांबार अगदी जवळ आले होते, अचानक त्याला आमची चाहूल लागल्याने जोरात कॉल देत ते ख्यॅक करत धूमतटाक पळाले.
नरनाळा किल्ल्याची सफर पूर्ण झाली होती. संपूर्ण किल्ला तसेच काही महत्वाचे अवशेष मात्र बघता आले नाहीत तरी जितकं पाहिलं आणि अनुभवलं तितकं नक्कीच मनाला समाधान देणारं होतं. आता वेध लागले होते ते जंगलातील मचाणावरील रात्रीच्या मुक्कामाचे, त्याविषयी पुढच्या भागात.
क्रमशः
वाचने
13186
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
अरे वा...
In reply to अरे वा... by किल्लेदार
अकोटपासून चालत म्हणजे जवळपास
In reply to अकोटपासून चालत म्हणजे जवळपास by प्रचेतस
ओह्ह...
हाही भाग उत्तम.
वनक्षेत्राच्या आतच हा किल्ला
In reply to वनक्षेत्राच्या आतच हा किल्ला by कंजूस
हो. नरनाळा किल्ला कोअर
मस्त रे
छान.
In reply to छान. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्यवाद
महाकाली दरवाजा सर्वात देखणा दरवाजा असावा
दुरून नमस्कार.
कमळे भारी
जबर!
निव्वळ अप्रतिम
नरनाळा किल्ला आणि परिसराची
व्वा व्वा ! मजा आली!
भारी!!