नाव वाचून तुमच्या डोक्यात आलं असेल ते हे सिंगापूर नाहीये. हे कुठलं परदेशातलं सिंगापूर नसून आपल्याच देशातलं, आपल्याच मातीतलं, सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात वसलेलं एक लहानसं ठिकाण आहे. पुण्या पासून 90 एक किमी अंतरावर, तोरणा गडाच्या पायथ्याला असलेलं वेल्हा गावच्या परिसरात हे सिंगापूर वसलंय.
ट्रेकिंग मध्ये सक्रिय असलेल्या मंडळींना या गावाची चांगलीच ओळख असेल. 'लिंगाणा' ट्रेक साठी जाताना सिंगापूर हे छोटेखानी वस्ती असलेलं गाव लागतं.
कोणताही ट्रेक असो वा ट्रिप असो, भटकंती म्हणलं की बरेचसे सुखद अनुभव हे येत असतात. काही गोष्टी घडतात त्या आपल्या डोक्यात ठाण मांडून बसतात. अशा अनुभवाचा आपल्यावर काही प्रमाणात प्रभाव देखील पडतो ज्याने दैनंदिन आयुष्यात आपला काही गोष्टींकडे पाहायचा दृष्टीकोनच बदलून जातो. असा माझा वयक्तिक अनुभव आहे, ज्याची प्रचिती मला माझ्या आजपर्यंतच्या भटकंती मध्ये आली. सिंगापुरचा अनुभव व्यक्तिशः मला बरंच काही देऊन गेला, तो पुढीलप्रमाणे.
झालं असं की काही कामा निमित्ताने मला मढे घाटात जायचं होतं. त्या साठी मी महेश नावाच्या मित्राला तयार केलं. सर्व तयारी करून आम्ही सकाळी 8 दरम्यान पुण्यावरून निघालो. 10 वाजता वेल्हा गाठलं. नाश्त्यासाठी तोरणा गडाच्या पायथ्याला असलेलं 'तोरणा विहार' ला थांबलो. भटकंती साठी मी कुठंही गेलो की प्रथम तिथल्या स्थानिक लोकांशी गप्पा मारायची मला सवय आहे. त्याने होतं असं की, आपल्याला त्या भागातली बरीचशी माहिती तर मिळतेच व त्यानुसार आपण आपली भटकंतीची रूपरेषा ठरवू शकतो. हॉटेल मालकाशी च्या चाललेल्या गप्पा दरम्यान 'लिंगाणा' ट्रेक चा विषय निघाला. खूप दिवस लिंगाणा देखील मला खुणावत होता. तसा आमचा प्लॅन जरा बदलला आणि आम्ही मढे घाट ला येताना जाऊ असं ठरलं. वेळेचं असलेलं बंधन बघता आम्ही 'रायलिंग पठार' जे सिंगापूर च्या पुढे आहे जेथून लिंगाणाचं अफाट दर्शन होतं, तिथं थोडा वेळ देऊन मागं फिरायचं असा छोटेखानी प्लॅन बनवला आणि त्याप्रमाणे सिंगापूर कडे कूच केले.
केळद गांव च्या अलीकडं एक फाटा लागतो, तिथून आमचा सिंगापुरचा प्रवास सुरु झाला. वातावरण अचानक बदललं. रिमझिम पाऊस आणि धुकं दाटून आलं, तसं आम्ही आमची पावसाळी अंगवस्त्र चढवली.
सुरुवातीला रस्ता सुरेख होता, नंतर तो प्रचंड घसरडा होत गेला. चालू गाडी सोडा पण बंद गाडी पण ऐका ठिकाणी थांबेनाशी झाली. रस्ता संपूर्ण शेवाळलेला दिसू लागला. माझे संपूर्ण ड्रायविंग स्किल पणाला लावून मी बरंच अंतर कापलं,ज्यात 3/4 वेळा माझी घसरकुंडी खेळून झाली.मग या शेवाळलेल्या, हिरव्यागार रस्त्याच्या सन्मानार्थ मी माझी गाडी बाजूला व्यवस्थित पार्क करून पायीगाडी पकडली. कित्येक दिवसात या रस्त्या वरून एखादी गाडी गेल्याच चिन्ह दिसत न्हवंत. धुकं वाढत गेलं तसं मला लिंगाणा दर्शन धूसर होताना दिसू लागलं. पण आता इथवर आलोच आहे तर जरा प्रयत्न करू या आशेनं आम्ही झटपट पाऊलं टाकू लागलो.
सिंगापूर जवळ आलं तसं लहान पोरांचा गलका ऐकू येऊ लागला, तेवढ्यात काही बारकी पोरं आमच्या पुढ्यात येऊन उभी राहिली.त्या पोरांशी जरा गप्पा गोष्टी झाल्या. धुकं प्रचंड होतं, रायलिंग पठारावरून लिंगाणा दर्शन व्हायची चिन्ह दिसत न्हवती.ती बारकी पोरं पण आम्हाला सांगू लागली, 'काय उपयोग नाय, तिकडं जाऊन,धुक्यात काय बी दिसणार नाय' तसा आमचा पण मागं फिरायचा विचार झाला होता कारण परत मढे घाटात पण जायचं होतं, आणि येताना घसरा-घसरीत पण आमचा बराच वेळ गेला होता. निघायच्या आधी कुठं चहा पाण्याची सोय आहे का विचारलं असता ती पोरं आम्हाला त्यापैकी एकाच्या घरी घेऊन गेली.
झोपडीवजा असं ते घर होतं. व्हरांड्यात एका टोपली मध्ये एक लहान बकरी ऊबं घ्यायला बसली होती. तिच्या बाजूला आम्ही बसलो. तेवढ्यात त्या पोराच्या आई ने आम्हाला बसायला घोंगड टाकलं.मी विचारलं "मावशी चहा भेटल का?" तशा त्या म्हणाल्या "व्हयं,करती की" आणि एक रंग उडलेलं पत्र्याचं कपाट उघडलं, आत कुठंतरी हात घालून त्यांनी एक लहानशी पुरचुंडी काढली, त्यात थोडी चहा पावडर दिसत होती. चहा बनवत आमच्या गप्पा सुरु झाल्या. पावसाळ्यात गावाची परिस्थिती, तिथल्या अडचणी, अशी चर्चा चालू होती. फार दुर्गम भागात ही वस्ती होती.तेवढ्यात चहा आला. बिन दुधाचा चहा देत म्हणाल्या "दूध नाय जी इकडं" असू दे म्हणत आम्ही त्या चहाचे घोट घेऊ लागलो. अर्थात तो चहा त्या वेळेस आणि त्या वातावरणात अमृताहून कमी नाही वाटला. तिकडं बाहेर पोरांचा गलका परत वाढू लागला तशी त्या पोराची आई पोरांना कायतरी सूचना देऊ लागली. मी विचारलं , ' काय चाललंय पोरांच?' तसं उत्तर मिळालं की 'काय नाय, घराला दरवाजा करत्यात ती' मी जरा आश्चर्याने परत विचारलं, दरवाजा?
चहा संपवत उंबऱ्यात उभं राहून मी पाहू लागलो. 10-12 वर्षातली ती पोरं त्यांच्या घराला दरवाजा बनवत होती. कोण बांबू आणतंय, कोण लाकडं तोडतय, काही जण बांबू चे बारीक पापुद्रे करून त्याला पीळ मारत होते.4 फुटाची पोरं 6-7 फुटांचा बांबू लीलया मधून चिरत होती, एक मोठा कोयता घेऊन त्याच्या काठ्या करत होते. मी आणि महेश सगळं कौतुकाने बघत होतो.
Corporate Culture मध्ये Team Management, Team Player,Team Building असलं कायतरी चालू असतं :) आणि कित्येक वेळा ते सगळं कृत्रिम वाटत मला. त्या सगळ्या Concept प्रत्यक्ष इकडं एका आडगावात, या बारक्या पोरांमध्ये बघत होतो. संपूर्ण मित्र-परिवार मिळून मित्राच्या घराचा दरवाजा बनवण्यासाठी झटत होते.भान हरपून सगळे त्या कामात खारुताई चा वाटा देत होते.
स्वतः स्वतःच्या घराचा दरवाजा बनवणं ही कल्पनाच मला सुखावून गेली.ते देखील या वयात. चौकशी केली असता समजलं की सर्वात मोठ पोरगं नववीला होतं बाकी पाचवी-सहावी ला होते. मला खरंच खूप कौतुक वाटलं या पोरांच्या टीमवर्कचं...
नकळत या सर्वाची तुलना मी करू लागलो,आपण दरवाजा बनवणे तर सोडा, पण दैनंदिन जीवनात किती लहान-सहान गोष्टींसाठी दुसऱ्यांवर अवलंबून असतो.एखादी नवीन गोष्ट बनवणे लांबच राहिले पण आहे त्या गोष्टी बिघडल्या, नादुरुस्त झाल्या तरी त्यात फार लक्ष न घालता जवाबदारी टाळू पाहतो, अंग काढू पाहतो. काही जण असतीलही की जे या गोष्टी गांभीर्याने घेत असतील.सर्वांना या गोष्टी लागू नाही पडत, शेवटी अपवाद सगळ्याच गोष्टीना असतात.निदान जी कामं आपल्या आवाक्यात असतील त्यात लक्ष घातले पाहिजे, मग त्या तुमच्या वैयक्तिक वस्तू-गोष्टी असतील किंवा काही असू दे. या सर्व लहान लहान कामातून आनंद तर मिळेलच पण त्याकडं पाहायचा दृष्टिकोन देखील बदलेल.थोड्या वेळात ही लहान पोरं बरंच काही शिकवून गेली.
मी भानावर येत घड्याळ पाहिलं तर बराच वेळ झाला होता. आठवण म्हणून पोरांसोबत फोटो काढले. निघताना त्यांना विचारलं 'पोरांनो पुढच्या टायमाला येणार का आमच्या बरोबर लिंगाण्याला?'
तसं लाजत सगळे म्हणू लागले 'व्हय येणार की'
जाताना परत एकदा सिंगापूरच्या दरवाजा वर नजर टाकली कदाचित पुढच्या खेपेला तो घराला लागलेला असेल याचा विचार करत आम्ही मढे घाटचा रस्ता धरला.
वाचने
8899
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर विचार ! त्या मुलांचा
फोटो टाकलाय... दिसत नाहीय पण ?
In reply to सुंदर विचार ! त्या मुलांचा by डॉ सुहास म्हात्रे
फोटो टाकताना तुम्ही
In reply to फोटो टाकलाय... दिसत नाहीय पण ? by विखि
आभारी आहे _/\_
In reply to फोटो टाकताना तुम्ही by डॉ सुहास म्हात्रे
सिंगापूरला जायला गाडीरस्ता
गाडीरस्ता होऊन ४ / ५ वर्षे
In reply to सिंगापूरला जायला गाडीरस्ता by एस
१६ नोव्हेंबर च्या मटा मध्ये
धन्यवाद..
In reply to १६ नोव्हेंबर च्या मटा मध्ये by उपेक्षित
झकास लेख !
_/\_ धन्यवाद
In reply to झकास लेख ! by चौथा कोनाडा
अरे व्वा ! मटावर झेंडा
In reply to झकास लेख ! by चौथा कोनाडा
खुपच सुंदर लेख !!
दुर्गविहारी आभारी आहे..
In reply to खुपच सुंदर लेख !! by दुर्गविहारी
ठाणे जिल्ह्यातील मुरबाड
अरे वा...
In reply to ठाणे जिल्ह्यातील मुरबाड by सोंड्या
लेख आवडला.
लेख आवडला
वर उल्लेख केलेला तोच सिंगापूर
In reply to लेख आवडला by कपिलमुनी
आणखी एक सिंगापुर सासवड
In reply to वर उल्लेख केलेला तोच सिंगापूर by सोंड्या
लेख आवडला.
झकास फोटू आणि लेखन.