Skip to main content

पावसात "रतनगड ते हरिश्चंद्रगड"

लेखक दिलीप वाटवे यांनी शुक्रवार, 27/10/2017 01:28 या दिवशी प्रकाशित केले.

पावसात "किल्ले रतनगड ते हरिश्चंद्रगड"

सुरूवात...

सप्टेंबर-ऑक्टोबर महिना म्हणजे पावसाळा संपल्या नंतरच्या ट्रेकींगच्या मोसमाची सुरुवात होण्याचा काळ. १० सप्टेंबरला नाखिंदा घाट, कोथळीगड आणि कौल्याच्या धारेचा पावसाळी ट्रेक संपवून घरी परतताना बसमध्ये जाहीर केलं की "०७-०८ ऑक्टोबरला 'आजोबा ऊर्फ आजा पर्वत' पाथरा आणि गुयरीदार अशा दोन घाटांसह करायचा आहे" त्यावेळी बसमधल्या प्रत्येकाने या ट्रेकला येण्याची तयारी दाखवली. पण हा ट्रेक अवघड प्रकारातला असल्यानं सर्वांना नेणं काही शक्य नव्हतं. अखेर मोजकेच सहभागी ठरले आणि त्या अनुषंगाने लगेचच व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप सुद्धा तयार केला आणि चर्चांवर चर्चा सुरू झाल्या..! संपत आलेला पाऊस परतुनी आला आणि जोरात बरसु लागला. डेहण्यातले परिचित बाळकृष्ण पाटेकरांशी दर चारदोन दिवसांनी तिथल्या एकूण परिस्थितीबद्दल चौकशी सुरु होती. शुक्रवारी रात्री निघायचं होतं आणि मंगळवार आला तरीही अजून आमचं काही नक्की ठरत नव्हतं. त्या रात्री पाटेकरांना एकदा शेवटचा फोन केला. त्यांच्या म्हणण्यानुसार निदान दिवाळी पर्यंत तरी ज्या वाटेने आम्ही आजोबावर जाण्याचं ठरवलं होतं त्या वाटेने जाणं शक्य नाही. शेवटी आम्हाला आजोबाची योजना रहीत करावीच लागली. पावसाळ्यात आजोबासारखा अवघड ट्रेक यासाठी नको होता की, ज्या वाटेने आम्ही आजोबा चढून जाणार होतो तो पाथरा घाट म्हणजे अक्षरशः "ब्लेड एज" आहे. वारा जोरात वाहत असेल तर काहीही अडसर नाहीये. त्यातून वाटही खुप निसरडी आहे. त्यामुळे पाटेकर तिथले स्थानिक असूनही त्यांना त्या वाटेने जाता येऊ शकेल याचा भरवसा वाटत नव्हता. दुसरं कारण असं की, आमचा एकमेव मुक्काम जो आजोबा माथ्यावर मोकळ्या पटांगणात असणार होता तिथे रात्री पाऊस पडला तर काहीच निवारा नव्हता. जवळपास वस्तीही नाही जिथून आम्हाला स्वयंपाकासाठी सुकलेलं सरपण मिळू शकेल. त्यामुळे आम्ही विनाकारण धोका पत्करणे टाळले. त्यामुळे शेवटच्या क्षणाला रतनगड ते हरिश्चंद्रगड या ट्रेकवर सर्वानुमते शिक्कामोर्तब झाले. रतनगड ते हरीश्चंद्रगड हा ट्रेक खरंतर आजोबाच्याच जवळपास आहे त्यामुळे हा पर्याय पावसात कितपत जमेल अशाही शंका निघाल्या पण हा ट्रेक पाऊस असला तरी करता येवू शकतो हे मला पक्कं माहिती होतं. दोन्ही किल्ले एकाच भागात असले तरी रतनगड ते हरिश्चंद्रगडला आजोबापेक्षा परिस्थिती थोडी वेगळी होती. एकतर बहुतेक वाटा सोप्या होत्या. वाटेत कुठंही मुक्काम करावा लागला तरी तिथं निवारा सहज मिळाला असता आणि प्रत्येक ठिकाणी सुकं सरपण किंवा वेळच पडली तर अगदी तयार जेवणही मिळू शकत होतं. बरं, अगदीच कोणत्यातरी छोट्या वाडीत जरी मुक्कामाची वेळ आली असती तरी त्या दृष्टीनं आधीच विचार करुन आम्ही रेशनही सोबत घेतलेलं होतं. पुर्ण ट्रेकमधे फक्त दोनच जागा अवघड वाटत होत्या, रतनगडापासून कात्राबाईची खिंड गाठणं आणि कुमशेतपासून पेठेची वाडी गाठणं. पहिल्या ठिकाणी दाट जंगल आहे तर दुसऱ्या ठिकाणी मुळा नदीच्या पात्रातून वाट आहे. नदी पात्रालगत असलेल्या पायलीच्या वाडीतुन नदी ओलांडून चढाई करून पेठेच्या वाडीत जावं लागतं. इथं नदीला भरपूर पाणी असलं तर नदी ओलांडणं थोडं अवघड होऊ शकत होतं. सर्व शक्यता लक्षात घेऊन शेवटी आम्ही सर्वजण शुक्रवारी ०६ ऑक्टोबरच्या रात्री रतनवाडीसाठी मार्गस्थ झालो. . नेहमीप्रमाणे नारायणगावच्या स्टँडसमोर मसाला दुध 'डबल मलई मारके' प्यायलो. नाशिक महामार्ग चारपदरी केल्यामुळे संगमनेरपर्यंतचा प्रवास खुपच सुखावह झाला. पण त्यामुळं झालेली वेळेची बचत संगमनेर ते रतनवाडी रस्त्यामुळं वाया गेली. हे जवळपास ऐंशी किलोमीटरचं अंतर कापून रतनवाडीला पोहोचायला सकाळचे पाच वाजले त्यामूळे आता झोपण्याचा प्रश्नच नव्हता. गाव हळूहळू जागं होत होतं. तिथल्याच एका घरात चहाची ऑर्डर दिली आणि तासाभरात सकाळची आन्हीकं उरकून बरोबर सहा वाजता ऑर्डर दिलेल्या घरात डेरेदाखल झालो.

आणि ट्रेक सुरू झाला...

. सकाळी लवकरात लवकर निघून रतनगड गाठायचा. फक्त गडदेवीचं दर्शन घ्यायचं आणि थोडं खाली उतरून उजवीकडे वळून पुढे जंगलातील वाटेने कात्राबाईची खिंड गाठायची. कात्राबाईचं दर्शन घ्यायचं आणि कुमशेत गाठायचं. वाटेत कुठेतरी चांगली जागा पाहून घरून नेलेला डबा खायचा आणि पुढे मुळा नदीच्या पात्रातली पायलीची वाडी गाठायची. पायलीच्या वाडीपासून पुढे मात्र हरिश्चंद्रगडावर जाण्यासाठी आमच्यासाठी दोन वाटा उपलब्ध होत्या. एक होती मुळापात्रातुनच जशी नदी जाईल तसं चालत जाऊन तडक पाचनईला चढायचं किंवा दुसर्‍या वाटेने नदी ओलांडून वरच्या बाजूस असणारी पेठेची वाडी गाठायची. तिथून कलाडगडाच्या पायथ्यातुन पाचनईला जायचं. अर्थात उपलब्ध वेळेनुसार आम्ही पुढची वाट ठरवणार होतो. या सर्वात जमल्यास कलाडगड पण पहायचा विचार होता. पण काहीही झालं तरी पाचनईतुन हरिश्चंद्रगडावरच जाऊन मुक्काम करायचा होता. त्यामुळं आजचा दिवस थोडा गडबडीचा होता. सकाळी चहा-बिस्कीटवर ताव मारला. पाण्याच्या बाटल्या भरुन घेतल्या, ब्रम्हराक्षसाचे बंध पाठीवर करकचून आवळले, प्रवरा नदी पुलावरून ओलांडली अन् शेताच्या बांधावरून तडक रतनगडाकडे निघालो त्यावेळी घड्याळात सकाळचे साडेसहा झाले होते. . . धरणाच्या पाण्याशेजारून वाट हळूहळू चढत जात होती. . . जिकडेतिकडे सोनकी आणि तेरडा फुलला होता. हिरव्याकंच झाडोर्‍यातुन मध्येच पिवळा धमक तर मध्येच लालचुटूक फुलोरा उठुन दिसत होता. . याआधी रतनगड सर्वांनी पाहील्यामुळं वाटेत फारसं कुठंही न थांबता तासाभरात वाटनाका गाठला. या नाक्यापासून उजवीकडे जाणारी वाट साम्रदला जाते. सरळ चढत जाणारी वाट गडावर जाते तर डावीकडची वाट कात्राबाईच्या खिंडीच्या दिशेने जाते. नुकत्याच उघडलेल्या नाक्यावरच्या हॉटेलात सॅक ठेवल्या आणि गडावरल्या रतनबाईच्या मंदीरात पोहोचलो. एकएक करत सगळे भीडू गोळा झाल्यावर सर्वांनी मिळून मस्तपैकी आरती केली. . रतनगडाच्या 'सेल्फीच्या कड्यावर' जाऊन पुढील वाट बघितली. खालच्या बाजूला वाघतळं, त्याच्या बाजूला कात्राबाईची वाट आणि अगदी समोर अग्निबाण सुळका दिसत होता तर त्याच्यामागे कात्राबाईची खिंड जाणवत होती. . . . . सव्वानऊ झाले होते त्यामुळे हळूहळू भुकेची जाणीव होवू लागली होती. पुढच्या वीस मिनीटात धावतच वाटनाका गाठला आणि लगेच चहाची ऑर्डर देऊन टाकली. दुपारच्या जेवणाला उशीर होणारच होता त्यामुळं घरातून सोबत आणलेल्या शिदोर्‍या सोडून भरपेट नाश्ता करुन घेतला वर फक्कड चहा मारला. . या वाटनाक्यापासून हाकेच्या अंतरावर वाघतळं आहे. त्यात पाण्याच्या बाटल्या पुन्हा भरुन घेतल्या. इथून पुढं वाट मस्तपैकी जंगलातून होती. उजवीकडं दिसणारा अग्निबाण सुळका मागे पडला आणि कात्राबाईकडे जाणारी वाट शोधू लागलो. मध्ये बर्‍याच वर्षांचा काळ लोटल्याने या वाटेचा हमरस्ता झाला होता. वाट हळूहळू चढू लागली आणि खिंडीच्या नाळेला भिडली. आजूबाजूच्या खडकावर बहूदा खेकड्यांचं मॅटर्निटी होम असावं, हजारोंनी त्यांची पिल्ल सैरावैरा पळत होती. त्यांची संख्या इतकी होती की पाय पडून चुकून दोनचार पिले सहज मेली असती. आता चढ अतिशय खडा झाला. पाठीवर ओझं जास्त असल्यानं दर दहा मिनीटानी दम जिरवायला थांबावं लागत होतं. . मजलदरमजल करत बारा वाजता कात्राबाईच्या खिंडीत पोहोचलो. म्हणजे वाटनाक्यापासून खिंड गाठायला जवळजवळ दिडतास गेला होता. एकंदरीत आमचा इथपर्यंतचा प्रवास तरी बराच वेगात झाला होता. जसा रतनगडाखाली वाटनाका होता तसाच इथंही होता. या खिंडीत डावीकडून एक वाट शेंडी-रतनवाडी रस्त्यावरच्या कोलटेंभे गावातून येते. आमचा ट्रेक रतनगड ते हरिश्चंद्रगड असल्यानं आम्हाला रतनगडावर जायचंच होतं त्यामूळं आम्ही रतनवाडीतून ट्रेक सुरु केला नाहीतर कोलटेंभ्यातूनही तासाभरात कात्राबाईची खिंड गाठता येते. डावीकडचीच दुसरी वाट घनचक्कर, मुडा, पाबरगडाकडे जाते. उजवीकडील वाट हाकेच्या अंतरावर असलेल्या कात्राबाई मंदीरात, तर सरळ खाली जाणारी कुमशेतला. . . या खेपेला आमच्यातल्या एकानं नवीनच शक्कल लढवली होती. जिथं मंदीर लागेल तिथं आरती करायची. अर्थात ते सर्वांच्या पथ्यावरच पडलं होतं. आरती केल्यानं व्हायचं काय की, सर्वजण जमा होवून आरती करुन निघेपर्यंत सर्वांनाच आराम मिळे. त्यामुळं सगळा ग्रुपही एकत्र राही. कात्राबाईची आरती करुन निघायला सव्वाबारा झाले. . . आता नारायणरावही डोक्यावर आले होते आणि जंगलपट्टाही संपला होता. त्यामुळं इथून पुढचं चालणं त्रासदायक होणार होतं. एक बरं होतं की इथंपर्यंत बहुतेक चढ संपले होते. आता खिंडीतून थेट खाली उतरणारी वाट आम्हाला कुमशेतला घेवून जाणार होती. . समोरच 'कुमशेतचा कोंबडा' सुळका दिसत होता. खिंडीपुढची कुमशेतला उतरणारी वाट खुपच भन्नाट होती. खिंडीतून पाहिल्यावर प्रथमदर्शनी असंच वाटत होतं की ही वाट खुपच अवघड असावी पण एकूणच ही वाट अशी काही उतरत होती की, ज्या कुणी अज्ञातानी ही वाट तयार केली असेल त्याला मनोमन साष्टांग दंडवत घातलं. हळूवारपणे वाट कोंबड्याच्या पायथ्यात उतरली होती. खालून उतरुन आलेल्या वाटेकडे बघितले तर आपण याच वाटेने उतरुन आलोय यावर विश्वासच बसेना. सह्याद्रीत अशा बर्‍याच गमतीजमती आहेत की ज्या सांगून कधीच समजणार नाहीत तर त्यांचा प्रत्यक्ष अनुभवच घ्यायला हवा. . . . वाट आता पुर्णपणे सपाटीवर आली होती आणि तिचा रस्ता झाला होता. कुमशेतला पोहोचता पोहोचता दुपारचे दोन वाजले होते. . . मागे राहिलेल्यांकडून जेवायला थांबण्यासाठी हाका ऐकू येऊ लागल्या होत्या. एका झाडाखाली सर्वजण येईपर्यंत थोडावेळ स्टॉप घेतला. इथून नदीच्या खोर्‍यापल्याड पेठेची वाडी, कलाडगड आणि हरिश्चंद्रगड स्पष्ट दिसत होते. जेवायला या जागी थांबण्यापेक्षा अजून थोडं ताणलं तर मुळा नदीपात्र गाठणं सहज शक्य होतं. सर्वानुमते नदीपात्रातच थांबण्याचं ठरवलं. मुख्य रस्ता सोडून वाट हरिश्चंद्रच्या दिशेने निघाली आणि हळूहळू करत नदीपात्रात उतरली. एक मस्त झाड बघुन जेवायला थांबलो त्यावेळी बरोबर तीन वाजले होते. जेवणासाठी सर्वांनी फारवेळ घालवलाच नाही. केवळ अर्ध्या तासात उरकतं घेत आम्ही सर्वजण साडेतीनला निघालोसुद्धा. आकाशात वीजा चमकू लागल्या होत्या. लांबवर कुठेतरी गडगडाटाचे आवाज ऐकू येऊ लागले होते. एकंदरीत पावसाचं लक्षण दिसत होतं. त्यामुळे सर्वांनी कॅमेरे आणि मोबाईल सॅकमधे टाकले. त्यामुळे इथून पुढं अगदी रात्रीच्या मुक्कामापर्यंत फोटो काही काढता आले नाहीत. आता पुढची वाट नदीपात्रातुनच होती. जशी नदी वळणं घेत होती तसंच तिच्या काठाकाठाने आमचं मार्गक्रमण चाललं होतं. एका वळणावर नदीपल्याड असलेल्या डोंगरावर पेठेची वाडी दिसत होती आणि तिच्या मागच्या बाजूला कलाडगडाचा माथा. पायलीच्या वाडीपर्यंत न जाता थोडं अलिकडूनच शॉर्टकट मारुन नदी ओलांडली. या भागात पाऊस थोडा कमी झाल्यानं नदीला पाणी कमी होतं म्हणून नदी ओलांडणं सहज शक्य झालं. चढाईला लागलो आणि दिवसभर दडी मारुन बसलेला पाऊस एकाएकी जोरानं कोसळू लागला. खरंतर पेठेची वाडी अगदी हाकेच्या अंतरावर होती पण गावात पोहोचेपर्यंत सर्वजण नखशिखांत भिजले. गावातल्या एका पडवीत पाऊस थांबायची वाट पहात असताना बाजूच्याच घरातून चहाची विचारणा झाली. अशा वातावरणात निदान चहाला तरी नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नव्हता. दहाच मिनीटात वाफाळलेला बिनदुधाचा चहा समोर आला. पावसात तो चहा एवढा भारी लागत होता की प्रत्येकाने कमीतकमी दोनदोन कप चहा घेतला. मग काय सगळ्यांच्या बॅटर्‍या एवढ्या चार्ज झाल्या की एका झपाट्यात कलाडगड मागे टाकला. कलाडला वळसा मारल्यावर हमरस्ता सोडून वाट डावीकडे वळून उतरु लागली. दोनचार चढ-उताराचे टप्पे पार करुन एकदाचे पुर्ण ओढ्यात उतरलो. या ओढ्यात एक अफलातून नजारा पहायला मिळाला. सांधणदरी जर पाण्याने वरपर्यंत भरुन वाहू लागली तर कशी दिसेल तशी एक साठ-सत्तर फुटांची कपार पाण्याने तडूंब भरुन वहात होती. कितीतरी वेळ हा नजारा बघून मन काही भरत नव्हतं पण हरिश्चंद्रगड गाठायचा असल्यानं फार वेळ न दवडता एक मोठा टप्पा चढून पाचनई गाठली. पेठेच्या वाडीतल्या चहानं बाकी किमया साधली होती कारण साडेचार वाजता पेठेची वाडी सोडूनही बरोबर पावणेसहाला म्हणजे फक्त सव्वातासात आम्ही पाचनईत पोहोचलो होतो. इथून हरिश्चंद्रगड आमच्या अगदी आटोक्यात आला होता. पाचनई सोडून हरिश्चंद्रगड चढायला लागल्यावर एक पॅगोडा लागला. सर्वजण खुपच दमले होते म्हणून तिथं सर्वांनी पंधरा मिनीटांची थोडीशी विश्रांती घेतली. चला म्हटल्यावर खरं म्हणजे सगळे अनिच्छेनेच उठल्याचं जाणवत होतं पण गडावर तर जायचंच होतं. आता इथून पुढची वाट एवढी प्रशस्थ होती की ती सारखीसारखी सिंहगडाचीच आठवण करुन देत होती. चढ तर मी म्हणत होता पण वाट काही संपत नव्हती. घाटवाट चढताना कशी वर उघडी कॅनॉपी दिसू लागली तरी घाटमाथा काही लवकर येता येत नाही अगदी तसंच झालं होतं. उठत-बसत, पाऊले मोजत कसेबसे एकदाचे गडावर पोहोचलो. वर पोहोचलो त्यावेळी मंदीरापर्यंत जाण्याचेही कुणात त्राण उरले नव्हते म्हणून समोर दिसणार्‍या पहील्याच हॉटेलमधे डेरा टाकला. रात्रीचे आठ वाजले होते आणि जेवायची वेळही झालीच होती. म्हणून फार वेळ न घालवता सोबत आणलेला शिधा हॉटेलवाल्याला देवून त्याच्याकडूनच जेवण बनवून घेतलं. जेवायला बसतो न बसतो तोच पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली. काही कळायच्या आत झोपडी एवढी गळायला लागली की आम्हा सर्वांची टाकलेले बिछाने उचलण्यासाठी एकच तारांबळ उडून गेली. कसंबसं एकदाचं जेवण उरकलं आणि कुणी हॉटेलात, कुणी मंदीरात असे इतरस्तः विखरुन सर्वजण झोपी गेले.

हरिश्चंद्रगडावर...

दुसर्‍या दिवशी गडावरची तारामती, कोकणकडा आणि हरिश्चंद्रेश्वर मंदीर वगैरे ठिकाणं पहायची, गडावरच जेवण करायचं, थोडा आराम करून बालेकिल्ला पहायचा आणि जुन्नर दरवाज्याने खिरेश्वर गाठायचं. रतनवाडीत सोडलेली गाडी खिरेश्वरला आलेली असेल तिने पुण्याला परतायचं असं करायचं ठरलं होतं. तशी आज घाई नव्हती तरीपण नेहमीप्रमाणे सकाळी सहालाच जाग आली. तरीही सकाळी थोडं निवांतच आवरलं. हॉटेलात रात्रीची रस्साभाजी आणि खिचडी गरम होत होती तोवर हॉटेल मालकाशी काल चालून आलेल्या मार्गाबद्दल गप्पा झाल्या. काल आम्ही चालून आलेला एकूण मार्ग ऐकून तो अवाक झाला आणि म्हणाला 'आज गेली सोळा वर्ष मी गडावर राहतोय पण रतनगडापासून हरिश्चंद्रगडावर एका दिवसात चालून येणारे तुम्ही पहिलेच. त्यातही तुमच्यात चाळीशी ओलांडलेलेच सर्वजण दिसतायत. खरंच कमाल हाय तुमची'. तो चढवू इच्छित असलेल्या हरभर्‍याच्या झाडावर काही आम्हाला चढायचं नव्हतं त्यामूळं काहीही न बोलता चहा-नाश्ता करुन सव्वाआठला तारामती शिखरावर जाण्यासाठी निघालो. माथ्यावर वातावरण बर्‍यापैकी स्वच्छ होतं. . . . खिरेश्वर गावामागे पिंपळगाव-जोगे धरण, हडसर, निमगिरी-हनुमंत, सिंदोळा, दौंड्या, वर्‍हाडा, मोरोशीचा भैरवगड, भोरांड्याच्या दाराची बेचकी, नानाचा अंगठा, माळशेज घाट, काळूचं खोरं वगैरे व्यवस्थित दिसत होतं. . . . तारामतीवरुन तसंच कोकणकड्यापाशी उतरलो. वाटेत दोन ठिकाणी लोखंडी शिड्या लावून 'पर्यटकांची' चांगलीच सोय केलेली दिसली. . . . . . . रविवार असल्यानं कोकणकड्यावर भरपुर गर्दी होती. आम्हाला काही त्या गर्दीत काही थांबावसं वाटेना. शेवटी झटपट माकडनाळ, नाप्ता-कोंबडा, कलाडगड, आजोबा, शिरपुंजेचा भैरवगड, मुळेचं खोरं पाहीलं आणि हरिश्चंद्रेश्वर मंदीराकडे परत फिरलो. . . . परतीच्या वाटेवरुन येताना डावीकडे बैलघाटाची वाट आहे. ही वाट गडावरून पाचनई पठारावर उतरते. त्या वाटेच्या खोदलेल्या पायर्‍या आडबाजूला असूनही मुद्दामहून पहायला गेलो. . . . पायऱ्या पाहून हरिश्चंद्रेश्वर मंदीराकडे निघालो. . . . . हरिश्चंद्रेश्वर मंदिराबाहेर असलेल्या 'जांबुवंत' राक्षसाची भुकेची पुराणकथा ऐकवून मंदिरात दाखल झालो. नेहमीप्रमाणे आरती केली. . . . . . . . . बाजूलाच मंगळगंगेच्या पात्रातलं केदारेश्वर लेणेमंदीर पाहीलं. . . . हॉटेलकडे परतताना वाटेतल्या सप्ततीर्थ पुष्करणीला धावती भेट देऊन बरोबर पावणेबाराला हॉटेलात जेवण्यासाठी पोहोचलो. . . जेवणाची ऑर्डर सकाळीच देऊन ठेवल्यानं आल्याआल्या हात धुऊन जेवायलाच बसलो. पोटभर जेवण करुन परतीच्या मार्गाला लागलो तोवर साडेबारा झाले होते. . हरिश्चंद्रगडावर अनेकदा जाऊनही बालेकिल्ला बरेच जण पहात नाहीत पण आम्ही तो पहायचाच असं ठरवलेलं होतं. तसा तो काही फार उंच नाही त्यामुळे अर्ध्या तासातच माथ्यावर पोहोचलो. तसं बालेकिल्यावर दोनचार पाण्याच्या टाक्या आणि थोडीशी तटबंदी सोडली तर फारसं काही शिल्लक नाही. . . . . . . . दुपारचा दिड वाजला होता त्यामुळं फार वेळ न दवडता पंधरा मिनीटात गडफेरी आवरली आणि खाली उतरलो. हरिश्चंद्रगडावर येणारी बहूतेक मंडळी तोलार खिंडीतुनच ये-जा करतात पण आंम्हाला थोडं आडवाटेनं उतरायचं होतं आणि ती वाट होती जुन्नर दरवाजाची. बालेकिल्याला वळसा घालून जुन्नर दरवाजाच्या खिंडीपाशी उतरलो. तिथं असणार्‍या चौकीचे अवशेष शेवटची घटका मोजत होते. ही जुन्नर दरवाजाची वाट बाकी अफलातुन आहे. नाळेतुन खोबण्या आणि पायर्‍या खोदुन वाट तयार केली आहे. तोंडापाशी अतिशय चिंचोळी असणारी नाळ जसजसं उतरत जाऊ तशी विस्तीर्ण होत जाते. . . . . . साधारण अर्धी नाळ उतरल्यावर डाव्या बाजूला झाडोरा लागला तिच्यातुन आडवं जात नेढ्यापासुन उतरलेल्या धारेवर पोहोचलो. आता इथून खाली दिसणार्‍या खिंडीपर्यंत धारेवरुन उतरायचं होतं. 'इकडे आड तिकडे विहीर'या म्हणी प्रमाणं इकडे दरी आणि तिकडंही दरीच अशी आमची अवस्था होती. बरं अशा अडचणीच्या जागी पाऊस तरी कसा मागे राहील, तोही संगतीला आला. अगदी पंधराच मिनीटेच पण धो धो कोसळला. पण परीस्थिती कशीही असली तरी उतरण्याशिवाय पर्याय नव्हता. सावकाश, काळजीपुर्वक उतरुन एकदाची खिंड गाठली. . या ठिकाणाहून आम्हाला घरी पोहोचवणारी गाडी अगदी स्पष्ट दिसत होती. खिंडीच्या खालच्या टप्यावर काही गुरं चरताना दिसत होती त्यामुळे तिथून पुढची वाट अतिशय सोपी असणार हे नक्की होतं. त्यामुळं सर्वांनाच हायसं वाटलं. गुरांची वाट असल्यानं वाट सोपी तर होती पण खुप लांबुन फिरुन जाणारी होती. त्यामुळं ती काही केल्या लवकर संपेना. पण शेवटी कशीबशी एकदाची आमची पलटण एकएक करत खिरेश्वरच्या पठारावर पोहोचली. पुढच्या अर्ध्या तासात गाडीपाशी पोहोचलो त्यावेळी संध्याकाळचे साडेसहा झाले होते. एकंदरीत आमचा दोन दिवसांचा तंगडतोड ट्रेक सुफळ संपुर्ण झाला होता. .

वाचने 12349
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

जबरदस्त लिहीलयं !!! _________________________________/\____________________________________________ बर्याच नवीन सुधारणा दिसताहेत. तो महाराजांचा पुतळातर पहायलाच हवा. हरिश्चंद्रगड आता लिस्टमधे टॉपवर आला. पु.ले.शु.

आजोबांच्या पायथ्याच्या बाळकृष्ण पाटेकरांचा संपर्क क्रमांक मिळेल. मी किल्ल्याच्या पायथ्याच्या गाईडचे संपर्क क्रमांक असणारी पि.डी.एफ. तयार करतोय. बरीच यादी तयार झालेली आहे. ती व्हॉटस अ‍ॅपवरती पाठवली आहे. काही जणाना मिळाली असेल. अश्या यादीमुळे जे नव्याने त्या किल्ल्यावर जाणार आहेत त्यांची सोय होईल तर स्थानिक गावकरी लोकांना रोजगार आणि कमाईचे साधन मिळेल. धागा वाचणार्‍या शक्य त्या वाचकांनी असे संपर्क क्र्मांक असतील तर ईथे द्यावेत किंवा मला व्य, नि. करावेत. ज्यांना पि.डी.एफ. हवी आहे त्यांनीही संपर्क केला तरी चालेल.

In reply to by दुर्गविहारी

खूपच चांगली कल्पना. या पीडीएफचाच एक धागा मिपावर काढा. पीडीएफ एकदा बनवली की अद्ययावत करता येणे आणि पुन्हा फिरवणे जरा अवघड आहे. परंतु धाग्यातील संपर्कक्रमांक व इतर माहिती सतत अपडेट करत राहता येईल. इतर लोकही त्यांच्याकडील माहिती प्रतिसादांमध्ये देऊ शकतील. अशा तऱ्हेने एक चिर-नवीन स्रोत निर्माण होईल.

In reply to by दुर्गविहारी

हो हो नक्कीच. मला व्हॉट्स अ‍ॅप नंबर पाठवला तर त्यावर पाठवायला सोपं होईल आणि दुसरं म्हणजे पायथ्याच्या गाईडचे नंबरही घेता येतील.

सगळे डिटेल्स व्यवस्थित आलेत. साम्रद पाचनई मार्गावरील मैलाचे दगड अजून आहेत कां? लेखांत उल्लेख नाही. :) आरतीची आयडीया भारी!

In reply to by हेम

बर्‍याच वर्षांपुर्वी साम्रदहुन रतनगड केला होता त्यावेळी त्या वाटेवर जुने मैलाचे दगड (बहूदा ब्रिटीशकालीन, जसा नाणेघाटात एक आहे) दिसले होते तसे रतनगड वाटनाक्यापासून पाचनईपर्यंत एकही दिसला नाही. पण अलिकडच्या काळात वनविभागाने लावलेले बरेच दिसले. हे दगड एकतर नवीन आहेत आणि रस्ता शोधण्यासाठी त्याचा काहीच उपयोग नाही त्यामुळे त्याचा उल्लेख लेखात केला नाही.

मला माझ्या २०१५ मधे केलेल्या रतनगड ट्रेकची आठवण आली.

मजा आली फोटोंमुळे. वेगवेगळे गड करता येतात पण असे एकत्र जमत नाही. गाईडही घेत नाही. जुन्नर वाट फार कठीण आहे का?

In reply to by कंजूस

फारशी अवघड नाही. पावसाळ्यात मात्र नाळेतुन वाट असल्यामुळे निसरडी होते त्यामुळे पावसाळ्यात तरी या वाटेने कुणी स्थानिक जात नाहीत. वाटेवर गवत उगवल्याने वाट पटकन सापडत नाही. मी हीच वाट उन्हाळ्यात केल्याने साधारण वाट माहिती होती. पहिल्यांदा जायचे असेल तर शक्यतो उन्हाळ्यात जावे.

रतनगड सह्याद्रीतील सर्वात सुंदर किल्ला आहे. वरून दिसणारे दृश्य अफाट. तिथला कात्रा कडा मला कोकणकड्याहूनही सरस वाटतो. तुमचा ट्रेक जबरीच झाला. मजा आली वाचायला.

In reply to by प्रचेतस

रतनगड सह्याद्रीतील सर्वात सुंदर किल्ला आहे.
सर्वात ह्या शब्दावरुन काथ्याकुट करता येईल ! ख्या ख्या ! सर्वात आवडता म्हणुयात ! आमच्या सर्वात आवडता राजगड ! रतनगडही पाहिला नाहीये अन हरिश्रंद्रगडही :( परतल्यावर हाच सेम ट्रेक करावा म्हणतो ! बाकी लेख अप्रतिमच आहे ! फोटो ही सुंदर आलेत ! साधारण किती तास चालत होतात ? किती अंतर असेल अंदाजे ?

In reply to by प्रसाद गोडबोले

सकाळी साडेसहा वाजता रतनवाडीतून सुरुवात केली आणि रात्री आठ वाजता हरिश्चंद्रगडावर पोहोचलो, म्हणजे साधारण साडेतेरा तास चालत होतो. यात मधला काही वेळ जेवण आणि काही वेळ विश्रांतीसाठी गेला. सपाटीवर प्रत्येकाच्या वेगानूसार ताशी चार ते सहा किलोमीटर चाल होते पण डोंगरात असं काहीच सांगू शकत नाही. डोंगरयात्रा(ट्रेकींग) करताना चढ, उतार, जंगलातली तयार करत जावी लागणारी वाट, ओढ्यातली वाट, घसार्‍याची वाट, कातळटप्पे वगैरे वाटेत येत असल्याने 'किती किलोमीटर चालणं झालं' असं नक्की काहीच सांगू शकत नाही. हल्ली GPS वर अंतर दाखवतं खरं पण ते कितपत बरोबर असतं ते नाही सांगू शकत.

पहिला दिवस रतन, दुसरा दिवस कात्राबाईमार्गे हरीश्चंद्र पायथा व तिसरा दिवस हरीश्चंद्र उतरुन खिरेश्वर किवा बेलपाडा असा ट्रेक करता यईल का? रतन ते हरीश्चंद्र यादरम्यान रहायची गावात काही सोय आहे का? असल्यास नंबर द्यावा.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

हो नक्कीच करता येईल. Rather तुम्ही आखलेला प्लॅन खुप छान आहे. रतन ते हरीश्चंद्र दरम्यान कुमशेतमधे राहण्याची आणि जेवणाची सोय होते. पण एका दिवसात हरीश्चंद्रच्या पायथ्याशी असलेल्या पाचनईत सहज पोहोचता येते त्यामुळे तिथेच मुक्काम करणे योग्य होईल. तिथे भास्कर जो कोकणकड्यावरही राहण्याची हॉटेल कोकणकडा, ८३०८०८१९३९. हा पाचनईतही सोय करुन देईल. तिसर्‍या दिवशी खिरेश्वरला उतरणे सोपे आहे. खिरेश्वरला दोन वाटांनी उतरता येते. पहिली नेहमीची तोलार खिंडीची वाट आणि दुसरी लेखात दिलेली जुन्नर दरवाज्याची वाट. पहिली वाट सोपी तर दुसरी थोडी अवघड आहे. बेलपाड्यातही दोन मार्गांनी उतरता येते. पहिली वाट माकडनाळेची आणि दुसरी वाट सादडे घाटाची. पहिली वाट अत्यंत कठीण तर दुसरी थोडी अवघड आणि लांब अंतराची आहे. हरीश्चंद्र उतरताना सोबत असलेल्यांची संख्या आणि कुवत पाहून वाट निवडावी. (माकडनाळेची वाट उतरताना शक्यतो टाळावीच.)

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

हो नक्कीच करता येईल. Rather तुम्ही आखलेला प्लॅन खुप छान आहे. रतन ते हरीश्चंद्र दरम्यान कुमशेतमधे राहण्याची आणि जेवणाची सोय होते. पण एका दिवसात हरीश्चंद्रच्या पायथ्याशी असलेल्या पाचनईत सहज पोहोचता येते त्यामुळे तिथेच मुक्काम करणे योग्य होईल. तिथे भास्कर जो कोकणकड्यावर राहण्याची सोय करतो तो पाचनईतही सोय करुन देईल. हॉटेल कोकणकडा, ८३०८०८१९३९. तिसर्‍या दिवशी खिरेश्वरला उतरणे सोपे आहे. खिरेश्वरला दोन वाटांनी उतरता येते. पहिली नेहमीची तोलार खिंडीची वाट आणि दुसरी लेखात दिलेली जुन्नर दरवाज्याची वाट. पहिली वाट सोपी तर दुसरी थोडी अवघड आहे. बेलपाड्यातही दोन मार्गांनी उतरता येते. पहिली वाट माकडनाळेची आणि दुसरी वाट सादडे घाटाची. पहिली वाट अत्यंत कठीण तर दुसरी थोडी अवघड आणि लांब अंतराची आहे. हरीश्चंद्र उतरताना सोबत असलेल्यांची संख्या आणि कुवत पाहून वाट निवडावी. (माकडनाळेची वाट उतरताना शक्यतो टाळावीच.)

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

हो नक्कीच करता येईल. Rather तुम्ही आखलेला प्लॅन खुप छान आहे. रतन ते हरीश्चंद्र दरम्यान कुमशेतमधे राहण्याची आणि जेवणाची सोय होते. पण एका दिवसात हरीश्चंद्रच्या पायथ्याशी असलेल्या पाचनईत सहज पोहोचता येते त्यामुळे तिथेच मुक्काम करणे योग्य होईल. तिथे 'भास्कर' जो कोकणकड्यावर राहण्याची सोय करतो तो पाचनईतही सोय करुन देईल. हॉटेल कोकणकडा, ८३०८०८१९३९. तिसर्‍या दिवशी खिरेश्वरला उतरणे सोपे आहे. खिरेश्वरला दोन वाटांनी उतरता येते. पहिली नेहमीची तोलार खिंडीची वाट आणि दुसरी लेखात दिलेली जुन्नर दरवाज्याची वाट. पहिली वाट सोपी तर दुसरी थोडी अवघड आहे. बेलपाड्यातही दोन मार्गांनी उतरता येते. पहिली वाट माकडनाळेची आणि दुसरी वाट सादडे घाटाची. पहिली वाट अत्यंत कठीण तर दुसरी थोडी अवघड आणि लांब अंतराची आहे. हरीश्चंद्र उतरताना सोबत असलेल्यांची संख्या आणि कुवत पाहून वाट निवडावी. (माकडनाळेची वाट उतरताना शक्यतो टाळावीच.)