आयेश्वराच्या अंगणी
तशी बहुत वरुषांची गोष्ट. ८००/ १००० वर्षांपूर्वीची. तेव्हा इये देशी देवगिरीच्या यादवांची सत्ता होती. सेऊणदेशचे यादव. देवगिरी ही राजधानी म्हणून स्थापित व्हायची होती. यादव तेव्हा इथे राज्य करत होते ते राष्ट्रकूटांचे मांडलिक म्हणूनच. यादवांचीच एक शाखा अंजनेरीला होती. सेऊणचंद्र तिसरा ह्याचा शिलालेखच अंजनेरीच्या एका जैन मंदिरात आहे. अंजनेरीचे यादव हे बहुधा जैन धर्मीय होते. यादवांची दुसरी शाखा होती सिंदिनेरात, सिंदीनेर अथवा सिंदनगर म्हणजेच आजचं सिन्नर, नाशिकजवळचं.
ह्या सिन्नरातच यादवकालीन स्थापत्यशैलीचे काही अवशेष आहेत. त्यातलं प्रमुख म्हणजे गोंदेश्वर अथवा गोविंंदेश्वर मंदिर. हे मंदिर यादवराजा गोविंद ह्याने बांधले असावे असे मानले जाते. भूमिज शैलीतले हे महाराष्ट्रातले तुलनेने उशिरा निर्माण झालेले मंदिर. १३ व्या शतकातले. हे मंदिर बांधले गेले तेव्हा देवगिरी ही राजधानी होती. मात्र त्याहीआधीचे म्हणजे यादव हे मांडलिक असतानाचे आणि देवगिरी हे यादवांची राजधानी नसतानाहीच्या कालखंडात एक मंदिर सिन्नरात बांधले गेले होते. ते दुर्लक्षित मंदिर म्हणजे ऐश्वर्येश्वराचे. ह्यालाच आयेश्वर मंदिर असेही म्हणतात. यादव आईरमदेव ह्याने हे बांधले असावे असे मानले जाते. हा आईरमदेव म्हणजे सेऊणचंद्र द्वितिय ह्याच्या नंतरचा. आईरमदेवाचा कालखंड फारसा ज्ञात नाही. बहुधा हेमाद्रीच्या राजप्रशस्तीत ह्याचा उल्लेख आहे.
तर हे आयेश्वराचं मंदिर दिसायला अगदी लहानसं. अगदीच १०/१५ मिनिटात पाहून होईल असं. किंचित वेगळ्या शैलीच. द्रविड आणि वेस्सर अशा मिश्र शैलीचं. मूळचं शिखर आज गायब आहे त्यामुळे शैली नीटशी ओळखता येत नाही. ऩक्षीदार स्तंभांवर तोललेला सभामंडप, पुढे अंतराळ आणि मग गर्भगृह अशी त्याची रचना.
आयेश्वराचं प्रथम दर्शन
सभामंडपातले स्तंभ बहुत नक्षीदार. मधूनच सुरसुंदरींची शिल्पे स्तंभांवर कोरलेली दिसतात.
ही शालभंजिका
मी चुकत नसेन तर ही गंगाच आहे.
ही कर्पुरसुंदरी का कोण
हा देव नक्की कोणता ते ओळखता आलं नाही
हा मात्र विष्णूच
सर्वच स्तंभ फार नजाकतीने कोरलेले आहेत.
स्तंभावर मंदिराचा डोलारा आपल्या हातांनी पेलणारे भारवाहक यक्ष आहेत. ह्यांनाच किचक असेही म्हणतात. यक्षांची संकल्पना पश्चिमेकडून आली, म्हणजे ग्रीकांकडून.
-
गर्भगृहाच्या द्वारावर जे एक शिल्प आहे ते इथलं खरं वैभव. नटराज शिव. सिंपली फॅण्टास्टिक
मकरांच्या मुखातून निघालेली अर्धगोलाकार नक्षीदार शिल्पपट्टिका. दोन्ही बाजूंना शिवाचा एकेक अनुयायी मकरांचे सारथ्य करतोय. शिल्पपट्टीकेवर वादक वाद्य वाजवताहेत, भारवाहक यक्ष पट्टीका तोलत आहेत, मधेच शरभादिल प्राणी आहेत तर त्याच्या वरच्या पट्टीकेवरील मोरांची रांगच आहे. तर संपूर्ण पटाच्या मध्यभागी शिव तांडवनृत्य करतोय. त्याच्या एका बाजूला पार्वती आहे तर दोन्ही बाजूला अनुयायी आहेत. पखवाजसदृश वाद्य वाजवताना एकजण तर अगदी स्पष्ट दिसतोय.
ह्याच्यापुढे अंतराळ आणि त्यापलीकडे गर्भगृह आहे. अंतराळावरही कहई शिल्पे कोरलेली आहेत पण अंधारामुळे छायाचित्रे घेता आली नाहीत.
तसाच मंदिराच्या बाहेर येऊन फेरी मारायला बाहेर पडलो
मंदिराच्या बाह्यभिंतीच्या चौथर्यावर बाणासारखे सरळ वर जाणारे स्तंभ अशी बाह्यभागाची रचना. मधेमध्ये काही देखणी शिल्पेही कोरलेली आहेत.
मंदिराचा बाह्यभाग
मंदिराचा पार्श्वभाग
अर्धस्तंभाचे नक्षीदार शिखर
स्तंभांवरही भारोत्तोलन करता करता शरभ आदि प्राण्यांवर स्वार होणारे यक्ष आहेतच.
हा यक्ष मला फार आवडला. एका हाताने तो भिंत तोलून धरतोय त्याचे वेळी तो आपल्या वाहनावर चाबूकही उगारतोय.
तर हे यक्ष चक्क कसरती करताहेत
मधूनच काही भग्न शिल्पं आहेत. बरीचशी अनाकलनीय आहेत. एकंदरीत इथे संशोधनाला बराच वाव आहे.
हे राम, लक्ष्मण, सीता का कृष्ण बलभद्र सुभद्रा काहीच कळत नाही.
हे माझ्या अंदाजाप्रमाणे इंद्रजिताचे लक्ष्मणासोबतचे द्वंद्व असावे. अगदी अशाच प्रकारचा रामायणातील पट जवळच्याच गोंदेश्वर मंदिरात आहे.
सुरसुंदरींच्या विविध प्रकारांची शिल्पे मात्र येथे फार आढळत नाहीत. जितकी आहेत ती सभामंडपाच्या स्तंभांवरच.
इतके सारे अवघे बघून होता होईता संध्याकाळ दाटून आलेली असते. मन मात्र अजूनही आयेश्वरातच गुंतलेले असते. असं वाटतं की येथेच काही काळ तसंच बसून राहावं अशाच काही आठवणी काढत.
वाचन
27408
प्रतिक्रिया
0