Skip to main content

निव्वळ आणि नितांत सुंदर , किले पुरंदर

लेखक कहर यांनी सोमवार, 25/05/2015 12:10 या दिवशी प्रकाशित केले.
धन्यवाद आपल्या साऱ्यांच्या मदतीसाठी. आपल्या माहितीच्या आधारे पुरंदर मोहिम शनिवारी फत्ते झाली. किल्ल्याबद्दल म्हणाल तर - " निव्वळ आणि नितांत सुंदर , किले पुरंदर" याहून दुसरे शब्द सुचत नाही. रस्ता माहित नसल्याने आणि रस्ता चुकायची जुनी सवय असल्याने जरा लवकरच म्हणजे सकाळी ६.३० ला घरातून निघालो, दुचाकीवरून हडपसर-दिवे घाट-सासवड-पुरंदर (गाव) करत किल्ल्याच्या माचीपर्यंत पोचायला ८:३० झाले. उन्ह फारसे नसल्याने प्रवास मस्त झाला. किल्ल्यावर प्रवेश ९ वाजता होतो असे तिथे समजले (ओळखपत्र आणि दुचाकीवर हेल्मेट अनिवार्य ). मग तोपर्यंत तिथेच TP केल. शनिवार असून फारसे पर्यटक दिसले नाहित. ९ ला फाटकातून gate entry करून आत सोडले. मुरारबाजींचा पुतळा, चर्च आणि काही पडीक घरे ओलांडल्यानंतर पार्किंग आहे तेथे पुन्हा in-time entry केली. तिथे आमचे mobile जमा करून घेतले (Camera मित्राने मधुचंद्रासाठी उसना नेल्याने सोबत नव्हता. नाहीतर उगाच ओझे वाहून तेथे फोटो काढताच आले नस्ते. जे होते चांगल्यासाठी होते ) तेवढ्यात तेथे प्रतिष्ठान चा बोर्ड लावलेल्या गाडीतून ७-८ मुले आली. कदाचित नेहमीचे कार्यकर्ते असावेत. गडावर बांधकाम आणि पाईपिंग चे काम चालू असल्याने अनेक ठिकाणी खोदून ठेवले होते. आर्मीच्या जवानाने दाखवलेल्या रस्त्याने आम्ही गड दर्शन चालू केले. ५-१० मिनिटात गडाच्या बुरुजांशी भेट झाली. पहिलीच भेट असल्याने स्वराज्याच्या त्या शिलेदारांना मिठी मारून आणि त्यायोगे सर्व ज्ञात अज्ञात हुतात्म्यांना नमन करण्याचा मोह आवरला नाही. सौना कळलेच नाही मी दगडांना का मिठी मारतोय. पण सर दरवाज्यातून आत गेल्यावर पहिली गोष्ट दिसली ती म्हणजे एक नवीन लावलेला भगवा जरीपटका काठी मोडून बुरुजावर बाहेरच्या बाजूस उलटा झालेला (आमच्या पुढे गेलेल्या प्रतिष्ठान च्या कार्यकर्त्यांना तो कसा दिसला नाही याचे आश्चर्य वाटले). तो तसा ठेऊन गड बघायला जाण्यासाठी पाउल उचलेना. तसाच वर चढून जिथे त्या ध्वजाचा स्तंभ मोडलेला तेथून फिरवून काढून ध्वज सरळ करून आणि बाजूला चालू असलेल्या बांधकामातून तार आणून तेथे सौंच्या मदतीने पुन्हा उभारला ( प्रचंड वाऱ्यामुळे आणि सौंना प्रयत्न करूनही बुरुजावर येता न आल्याने ध्वजाला हव्या त्या उंचीवर उभारू शकलो नाही हि खंत मनात कायम राहील ) त्यानंतर पुढे इमारतींचे पडलेले अवशेष पहात केदारेश्वर पर्यंत पोचायला १०:३०-११:०० वाजले. तिथल्या शेवटच्या बांधीव पायऱ्या सौंशी रेस लाऊन चढल्याने लागलेला श्वास काबूत आल्यानंतर केदारेश्वराचे दर्शन घेतले. शिवतांडवाचे (हे शिव शंकराचे एकच स्तोत्र येते ) पठन करून नंतर मंदिराबाहेर वाऱ्यात बसून सोबत आणलेल्या पराठे सॉस आणि हापूस आंब्यांचा नाश्ता करून पुन्हा परतीचा मार्ग धरला. सोबत कॅमेरा नसल्याने फोटो साठी थांबण्याचा प्रश्नच नव्हता. उतरताना समोर आता डौलाने फडकणारा जरीपटका दिसत होता. वज्रगड समोर दिसत होता. परंतु तिकडचा प्रवेश तारांचे कुंपण टाकून बंद केला असल्याने जाउन पाहू शकलो नाही. येताना सौन्ना पुरंदरचा (माहित असलेला तसेच मिपा वरून समजलेला) इतिहास सांगत उतरलो. पुरंदरचा अर्थ, त्याचे इंद्रनील नाव, फत्तेखानचा आणि त्यारुपाने आदिलशाहीचा स्वराज्यातील पहिला मोठा पराभव, नेताजी पालकरांची किल्लेदारी, शंभू राजांचा जन्म, कापूरहोळ वरून येणारी त्यांची दुधाई. मिर्झा राजा जयसिंगांची स्वारी, पुरंदराचा वेढा, ४० मावळ्यांनी वेढ्यात शिरून निष्क्रिय केलेल्या तोफा, वज्र गडाचा पाडाव, पुरंदरची झुंज, उडालेला बुरुज , शत्रूने सुलतानढवा करण्याआधीच मराठ्यांचा अतितटीचा हल्ला , मुरारबाजींचे शौर्य, दिलेरखानाला दिलेले प्रत्युत्तर आणि बलिदान, किल्लेदार पडल्यानंतरहि बालेकिल्ल्यातून मराठ्यांनी चालू ठेवलेला प्रतिकार, आणि अखेर पर्यंतचे पुरंदरचे अजिंक्यत्व (माझ्या माहितीप्रमाणे झुंज चालू असतानाच पुरंदर तहात मोगलांकडे गेला, त्याचा पराभव झाला नाही कि त्याने शरणागतीहि पत्करली नाही) अशी जेवढी असेल नसेल तेवढी माहिती सौंना दिल्यानंतर मी बुरुजाला मिठी मारून नमस्कार केल्याचे कारण तिला समजले. येताना छान करवंदे (रानमेवा) जमा करीत उतरलो. खाली हॉटेल मधून पाणी घेताना जवळ पुरन्दरेश्वराचे मंदिर दिसले (थोडे आतल्या बाजूला असल्याने रस्त्यावरून सहजासहजी दिसत नाही) तेथेही बांधकाम चालू होते. पुरंदरेश्वरच्या दर्शना नंतर येताना चर्च आणि बिनी दरवाजा पाहिला. जवळ उभ्या असलेल्या जवानाला विचारून आठवण म्हणून थोडे फोटो काढले. आणि गडावरून उतरते झालो. (संभाजी राजांचे जन्मस्थान पाहू शकलो नाही. तिथे कोठेही मार्गदर्शक फलक वगैरे नसल्याने आणि केदारेश्वराच्या मुख्य रस्त्यावर ते नसल्याने त्याचे ठिकाण कळले नाही. हॉटेल मध्ये विचारणा केल्यानंतर ते वरच असल्याचे कळाले पण पुन्हा वर जाणे शक्य नसल्याने खास ते ठिकाण पहायला पुन्हा येण्याचे ठरवून आम्ही साधारण १:०० च्या सुमारास माचीवरून दुचाकी घेऊन खाली प्रस्थान केले ) परतीच्या रस्त्यावरून पुन्हा गडाच्या बुरुजाकडे नजर टाकली. येताना तेथे नसलेला जरीपटका आता डौलाने फडकताना दिसत होता. पुरंदरची ती हवा अभिमानाने उरात भरून घेतली आणि खाली उतरलो. येताना मिपा सदस्यांनी सुचवल्याप्रमाणे नारायणगावचे एकमुखी दत्त आणि केतकावळ्याचे प्रतीबालाजी यांचे दर्शन घेऊन हायवेने पुण्याकडे निघालो खाली काही छायाचित्र देत आहे. परंतु मोबाइल चा कॅमेरा आणि भर दुपारच्या उन्हामुळे खास फोटोग्राफी करावीशी वाटली नाही आणि करूही शकलो नाही पुरंदरेश्वर चर्च बिनी दरवाजा  मुरारबाजीं 1 जरीपटका ( परतीच्या वाटेवरून ) परतीच्या वाटेवरून परतीच्या वाटेवरून

वाचने 7097
प्रतिक्रिया 27

प्रतिक्रिया

एक मिनिट, तिथे काय फोटो काढायला परवानगी नाहीये?
तिथे आमचे mobile जमा करून घेतले (Camera मित्राने मधुचंद्रासाठी उसना नेल्याने सोबत नव्हता. नाहीतर उगाच ओझे वाहून तेथे फोटो काढताच आले नस्ते. जे होते चांगल्यासाठी होते )

मी अगदी ४/५ महिन्यांपूर्वी गेलो होतो तेव्हा तर फोटो काढायला कुणीच आडकाठी केली नव्हती ना मोबाईल जमा करुन घेतले होते.

हो… तिथे सर्वत्र मिलिटरी एरिया असल्याने फोटो काढायचे फलक लावलेले शिवाय कॅमेरा आणि मोबाईलहि जमा करून घेत होते. त्यामुळे आमच्या सोबत तिथे पोहोचलेला एक ग्रुप गड न पहाता खालूनच परत गेला (कदाचित गड पाहण्याऐवजी फक्त फोटोग्राफीत त्यांना जास्त रस असावा.) अर्थात सोबतचे साहित्य तपासत नसल्याने लपवून कॅमेरा किंवा मोबाईल गडावर नेणे शक्य होते पण आपल्या भारतीय सैन्य दलाने घातलेले निर्बंध मोडण्याची इच्छा झाली नाही.

In reply to by कहर

पण आपल्या भारतीय सैन्य दलाने घातलेले निर्बंध मोडण्याची इच्छा झाली नाही.>> सहमत आणि कौतुक

In reply to by सतीश कुडतरकर

इथे सैन्यदल ज़रा अतिच करतंय पण. गड ही हेरीटेज वास्तू असूनही सैन्यादलाची अनिर्बंध बांधकामे गडावर चालू आहेत ज्याने गडाचे मूळ स्वरुप फार बिघडून गेलेय.

In reply to by प्रचेतस

१००% सहमत… शिवाय त्याबाजूला फिरकू देत नसल्याने कसले बांधकाम आहे हेही समजण्याचा मार्ग नाही … अनेक ठिकाणी काटेरी कुंपणाने वाट बंद केल्या आहेत.

In reply to by प्रचेतस

वल्ली आपली कळकळ कळतेय आणि मलाही हा किल्ला सैन्याच्या ताब्यात जाण्याआधी मनमोकळेपणे पाहता आला नाही याची रुखरुख कायमची राहणार. हा किल्ला सैन्यदलाच्या ताब्यात देण्याआधी याचा विचार व्हायला पाहिजे होता. एकदा त्यांच्या ताब्यात दिल्यावर सुरक्षा, गुप्तता आणि त्या अनुषंगाने ते आपलं ते खर करणारच. असो! फक्त निराशा!

In reply to by सतीश कुडतरकर

खरेतर तसे त्याचे स्थान पहाता सुरक्षा किंवा इतर कोणत्या सैनिकी वापराच्या दृष्टीने त्या किल्ल्याचे तसे महत्व सध्यातरी दिसत नाही (दिवसभर फक्त बसून असल्याने पोट सुटायला लागलेले काही सैनिक पहायचा योग (?) आला) परंतु इंग्रजांच्या काळात तेथे त्यांची छावणी होती आणि तीच पुढे भारतीय सैन्याने चालू ठेवली आहे असे दिसते.

In reply to by कहर

गडावर पूर्वी सैन्यासाठी प्रस्तरारोहण तंत्र इथे शिकवले जायचे. वज्रगडाचे उभे खडक त्यादृष्टिने आदर्श आहेत. तिथे अगदी चिमनी पण आहे. पण हल्ली काय चाललेय काहीही समजत नाहिये.

In reply to by कहर

थोडीसी माहिती घेतली असती तर बरे झाला असते.त्या ठिकाणी सैन्यदलाचा कायस्वरुपी बेस बनवण्याचे काम चालु आहे त्याच बरोबर इन्फंट्रीची सगळ्यात मोठी शुटींग रेंज तिथे होत आहे त्यामुळे तेथे बरीच बंधने घालण्यात आली आहेत.तरी राजांचा गड असल्याने अद्याप जनतेस खुला आहे.या एकमेव किल्ल्याचा वापर आज सैन्य प्रशिक्षणाकरिता होत आहे या सारखी अभिमानास्पद गोष्ट दुसरी काय असावी.

In reply to by बाबा पाटील

प्रस्त्ररारोहणाच तंत्र आता खूपच विकसित झालेलं असल्याने घुसखोरी करण आता सोप झालेलं आहे, त्यामुळे सुरक्षेसाठी गडाच्या फक्त नैसर्गिक कातळकड्यांच्या भरवशावर अवलंबून नाही राहू शकत. त्यामुळे त्याना वेगळे उपाय योजावे लागणार हे उघड आहे. खंत एकच, की मोकळेपणाने गड पाहता येणार नाही. पण गड ज्या मावळ्यासाठी बांधला गेला होता त्यांचीच आधुनिक पिढी इथे प्रशिक्षण घेणार असल्याने आनंदच आहे.

In reply to by उमा @ मिपा

धन्यवाद … पण माझ्या आधी गड पहायला वर आलेल्या इतर मंडळींनी आणि तिथेच काम करत असणाऱ्या कामगारांनी चक्क या गोष्टीकडे दुर्लक्ष करावे हि चिंतेची बाब आहे …

खरंच कौतुक!छान लिहिलंय!

माहिती विचारून, लगेच जाऊन आल्यावर लिहिलेत असे सर्वचजण करतील तर --. मी दहा वर्षांपूर्वी यष्टीने सासवड +पूर येथे गेलो होतो तिथे पुरंदरविषयी कळले आणि जाण्याचे रहीत केले. आमच्या इकडे येवूरच्या सर्वात उंच असणाऱ्या डोंगरावर एरफोर्स ची एरक्राफ्ट ट्रैकिंग डिश आहे. आदिवासी सोडून कोणी आढळल्यास गोळी घालण्याचे आदेश आहेत. तिथे ड्युटीवर नसलेला कर्मचारीदेखील वर जाऊ शकत नाही. डयुटीवरच्या अधिकाऱयाबरोबर वर जाण्याचा{ पावसाळयात !!!}योग आला होता तेव्हा चारवेळा त्यालाही ड्युटीकार्ड दाखवावे लागले होते. सर्व सैनिक(पोटं न सुटलेले) तयार होते जणू काही आताच शत्रु/विमान येणार आहे.एवढेच नाही तर मेन गेटसमोर उगाच रेंगाळणाऱ्या एका माणसास हटकण्यात आले होते.

छान लिहिलंत! सांस्कृतिक ऐतिहासिक ठेवा असलेली ठिकाणे अशी सैन्याच्या सुद्धा ताब्यात देऊ नयेत. विशेषतः पुरंदरला शिवाजी महाराजांच्या आयुष्यात इतके महत्त्वाचे स्थान होते तो तर देऊच नये. मग त्यावर नवी बांधकामे वगैरे करणे तर दूरच राहिले. वज्रगड आणि पुरंदर वैशिष्ट्यपूर्ण जोडकिल्ले आहेत. बाबासाहेब पुरंदर्‍यांनी या लढाईबद्दल सविस्तर आणि त्यांच्या खास शैलीत लिहिलेले सगळे आठवले. तो वज्रगड पहायला बंदी आली असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे.

In reply to by पैसा

सगळे गड किल्ले आर्मीवाल्यांच्या ताब्यात द्यावेत,त्याचा खर्‍या अर्थाने सदुपयोग होइल.नाहीतर गड किल्ल्यांची काय अवस्था आपल्या दिवट्यांनी केलीय हे आपण पाहतोयच.गमतीचा भाग सांगतो,माझ्या लेकींना घेवुन पुण्याच्या जवळपासचे बहुतेक गडकिल्ले मी फिरत असतो.शेवटचा किल्ला पुरंदर पाहिला माझी लेकीने त्या वेळी प्रश्न वपपल्या, "पपल्या,हे मिलिटरी वाले अंकल लोक बाकीच्या किल्ल्यांवर का नाही ठेवत रे,असायला पाहिजेत ना" जर ७ वर्षाच्या बाळाला हे जाणवत असेल तर नक्कीच काहीतरी वेगळ आहे,याचा विचार देखिल झाला पाहिजे.

In reply to by बाबा पाटील

किल्ला व्यवस्थित राहील, निदान आणखी वाट लागणार नाही. पण अभ्यासकांनाही बघायाला मिळत नसेल तर लोकांनी काय करायचं!

In reply to by पैसा

सहमत. मिलिटरी च्या हाती किल्ला जरूर द्यावा पण तो राखायला द्यावा. त्याचा मिलिटरी बेस म्हणून वापरला जाऊ नये. उद्याच्या पिढीला दाखवण्यासाठी कमीतकमी छायाचित्रे तरी असावीत किल्ल्याची. आम्ही जायचो तेव्हा असा होता म्हणून .

In reply to by पैसा

धन्यवाद… मी या आधी सिंहगड आणि प्रतापगड पाहिले आहेत मी तुलना करत नाही पण पुरंदर खरेच मनाला खूप भावला (इतर गड पहाण्याची पहाण्याची मोहीम आता या पुरंदर पासून सुरु केली आहे). शिवशाहिरांच्या शब्दात सांगायचे तर खरेच "गड बेलाख आहे ". शिवचरित्रकथानातला मुरारबाजींचा प्रसंग आधी अनेकदा ऐकला होता पण प्रत्यक्ष गड पाहिल्यानंतरचा त्याचा श्रवणानुभव वर्णनातीत आहे .