मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

व्हिएन्ना - बुडापेस्ट - भाग ३

मधुरा देशपांडे · · भटकंती
व्हिएन्ना - बुडापेस्ट - भाग १, भाग २ बुडापेस्टला जाण्यासाठी व्हिएन्नाच्या रेल्वे स्थानकावर पोहोचलो आणि गाडीची वाट बघत फलाटावर उभे होतो. आजूबाजूला मोजून एक दोन लोक. संचारबंदी लागू केल्यासारखे वाटत होते अगदी. कदाचित गाडी सुटायच्या वेळेवर येतील असे वाटले. पण ही संख्या काही वाढली नाही. पुन्हा एकदा 'हे राजधानीचे शहर असून इथे काहीच गर्दी कशी नाही, का नसेल, इत्यादीवर वायफळ चर्चा झाली. एरवी अशा पर्यटन स्थळी गर्दीचा त्रास होत असतो, इथे नाहीये म्हणून तेही वेगळे वाटत होते. http://4.bp.blogspot.com/-ez-ruReoDNg/VPdpE5eYu0I/AAAAAAAAEWU/eM7gSBhsIzU/s1600/20150207_095233.jpg http://2.bp.blogspot.com/-p8nVvjJdDG8/VPdpEnDVanI/AAAAAAAAEWQ/Jzs0BOS3bbs/s1600/20150207_095241.jpg गाडी निघाली आणि थोड्याच वेळात हंगेरीत प्रवेश झाला. इथे जरा चार डोकी चढली आणि जोरजोरात गप्पा, खादाडी, लहान मुलांची पळापळी, भांडणं असे सुरु झाले. जर्मन भाषिक देशातून बाहेर पडल्याचे या लोकांमुळे जाणवू लागले. एकीकडे बाहेरच्या शेतांमध्ये दूरवर फक्त बर्फच बर्फ दिसत होता. http://2.bp.blogspot.com/-k_5QpfEILSo/VPdp6qTt32I/AAAAAAAAEWo/Qq28QG79ywE/s1600/DSC_0207.jpg http://4.bp.blogspot.com/-dufFa477WzA/VPdp7Wj0VCI/AAAAAAAAEWw/2uI2iPF883k/s1600/DSC_0208.jpg बुडापेस्ट येण्याच्या अगदी दहा पंधरा मिनिटे आधी आता बॅग्स काढून ठेवू म्हणून उठलो आणि आमची बॅकपॅक दिसत नाही हे लक्षात आले. काही पैसे, बँकेची कार्ड्स, व्हिसा इत्यादी सगळे आमच्या जवळच ठेवले होते. पण एका पाऊच मध्ये पैसे, आमचे पासपोर्ट आणि घराच्या किल्ल्या हे नेमके त्या बॅकपॅक मध्ये होते. दोन मिनिटात डोळ्यासमोर काय काय येउन गेले. सगळा वेगळाच गोंधळ सुरु झाला. रेल्वे व्यवस्थापनाचा एक माणूस दिसला म्हणून त्याला विचारले. त्याने अजूनच उद्धटपणे हंगेरियन भाषेत काहीतरी उत्तर दिले. मग लोकांनी भाषांतराला मदत करत ते एक नाट्य सुरु झाले. आमची नजर गाडीत सगळ्या संशयित लोकांकडे, बॅग कडे लक्ष ठेवून होती. अख्ख्या गाडीत सगळीकडे शोधाशोध करून हाती काहीच लागले नाही. तोवर बुडापेस्ट स्थानक आले. खाली उतरलो आणि समोरच पोलीस दिसले. तुम्हाला इंग्रजी येतं का असे विचारल्यावर त्याने दुसऱ्या एका पोलिसाला हाक मारली. आम्ही काय घडले ते सांगितले. "तुम्ही थांबा मी येतोच" असे म्हणून हे मामा जे आत गेले, ते दहा मिनिटांनी परत आले. जेव्हा त्यांना विनंती केली की एकदा परत या ट्रेनमध्ये परत जाऊन बघून येतो, तेव्हा ते हो नाही करत अखेर तयार झाले. मग मी हंगेरियन पोलिस स्थानकात बसून एकीकडे त्यांच्या अगम्य भाषेतून काही समजतंय का याचा विचार करत आणि त्याहून त्रासदायक आता करायचे काय या प्रश्नावर डोके खात बसले होते. त्यांच्यापैकी ज्यांना ज्यांना आंग्ल भाषा येत होती, ते सगळे एकेक करून माझ्याकडे पुन्हा पुन्हा काय झाले, कसे झाले याची चौकशी करत होते आणि प्रत्येक नवीन प्रश्न माझ्या सहनशक्तीचा अंत बघत होता. दहा मिनिटात नवरा आला तो हातात बॅग घेऊनच. बॅग मधल्या आतल्या कप्प्यात आधी जिथे होते तिथेच पाऊच मध्ये पासपोर्ट, किल्ल्या हे तसेच होते आणि त्यातून पैसे सगळे काढून घेतले होते. पूर्व युरोपात इतर सगळीकडेच पाकीटमारी, चोर्या हे प्रमाण खूप जास्त आहे हे माहिती होते. यापूर्वीच्या प्रत्येक सहलीत सतर्क राहून सतत काळजी घेतली होती. पण तरीही विनाशकाले विपरीत बुद्धी. ती बॅकपॅक नेमकी त्याच दिवशी कशी वर ठेवली, बॅग आमच्यासमोरून कशी गेली, घाबरून आम्हाला काही सुचले नाही पण नंतर सापडली म्हणजे तिथेच कुणीतरी केले असणार, मग दिसले कसे नाही, असे असंख्य प्रश्न आणि "जर तर" डोके खात होते. पण मुख्य ते सगळे मिळाले यात समाधान मानण्यावाचून गत्यंतर नव्हते, अन्यथा काय काय करावे लागले असते याची आता कल्पना करवत नाही. हताश होऊन बाहेर आलो. हंगेरीचे चलन आहे हंगेरियन फ्लोरिंट (Florint). मध्य युरोपीय देशांच्या तुलनेत हा देश आर्थिक दृष्ट्या गरीब आहे. साधारण १ युरो म्हणजे ३००-३५० हंगेरियन फ्लोरिंट. त्यामुळे सगळ्या किमती युरोच्या तुलनेत कमी असल्या तरी आकडे फार मोठे वाटतात. म्हणजे एक चहा किंवा कॉफी साधारण ४००-५०० फ्लोरिंटला. जवळच करन्सी एक्सचेंज बघून आधी चलन बदलून घेतले. नकाशे घेतले, मेट्रोचे तिकीट काढले आणि हॉटेलवर आलो. फ्रेश होऊन बाहेर पडलो आणि पहिले खायची सोय शोधली, पोटोबा शांत झाले आणि पहिले कुठे जावे यावर विचार करून बाहेर पडलो. डोनाउ/डॅन्युब नदीच्या काठावर वसलेली ही हंगेरी देशाची राजधानी. 'हार्ट ऑफ युरोप', 'पर्ल ऑफ डॅन्युब", 'कॅपिटल ऑफ फ्रीडम' ही या शहराची विशेष ओळख. नदीच्या अल्याड "बुडा" आणि पल्याडला "पेस्ट" अशी ही दोन शहरे १७ नोव्हेंबर १८७३ पासून बुडापेस्ट म्हणून एकत्रितपणे ओळखली जातात. बुडा किल्ला, इतर काही इमारती, नदीचा परिसर, या दोन शहरांना जोडणारा प्रमुख चेन ब्रिज, पाप्रिका मार्केट ही बुडापेस्टची काही प्रमुख आकर्षणे. याबद्दल अधिक पुढच्या भागात येईलच. बुडापेस्टला पूर्वापार काळापासून लाभलेले गरम पाण्याचे झरे हे येथील अजून एक आकर्षण. यातील काही ठिकाणच्या पाण्यातील औषधी गुणधर्मामुळे पूर्वीपासून युरोपियन लोकांसाठी हे आवडते शहर होते. यातील काही झरे आजही अस्तित्वात आहेत परंतु बहुतेकांची जागा ही स्पा आणि रिसॉर्ट्स ने घेतली आहे. आता बुडापेस्ट 'कॅपिटल सिटी ऑफ स्पा अँड थर्मल बाथ' म्हणून ओळखले जाते. तसेही दुपारचे ४ वाजले आहेत तर फार काही बघणे होणार नाही, म्हणून पहिले पाप्रिका मार्केट कडे मोर्चा वळवला. मेट्रोने जाताना पहिला फरक दिसला की प्रत्येक स्थानकावर तिकीट तपासनीस उभे होते. बरेच वेळा अशा ठिकाणी मशिन्स असतात किंवा मग क्वचित कधीतरी तपासले जाते. पण हंगेरीची स्थिती बघता हे आवश्यक वाटत होते. तिथे गेलो आणि मार्केट बंद दिसले. शनिवार म्हणून लवकर बंद होते म्हणे. आता भाजी मार्केटच्या वेळा बघून जाव्या असे काही डोक्यात आले नाही. दोन दिवस अजून हातात होते त्यामुळे नंतर परत यायचे ठरवले. आधीच सकाळपासून काही बऱ्या घटना घडत नव्हत्या, त्यात आता हेही बंद. मग आता नदीकिनारी फिरू असा विचार करून निघालो. पहिले समोर दिसले ते पार्लमेंट. इमारतीच्या सभोवताल फिरत त्यावरील काम बघत बघत काही फोटो काढणे सुरु होते. http://1.bp.blogspot.com/-I0JxReahj-E/VPi48HsmzZI/AAAAAAAAEXM/8sMHuy0bP3g/s1600/DSC_0222.jpg http://2.bp.blogspot.com/-jFfeZNELow0/VPi478DqpMI/AAAAAAAAEXE/jGkFKPxMHSw/s1600/DSC_0224.jpg http://2.bp.blogspot.com/-HHUv4z25CWc/VPi49L5BXjI/AAAAAAAAEXY/KzER34o4JAA/s1600/DSC_0226.jpg आम्ही पेस्ट मध्ये होतो आणि दूरवर हे बुडा दिसत होते. http://3.bp.blogspot.com/-N-CHP5xuvT4/VPi682imWSI/AAAAAAAAEXo/AWmYV0tHkwE/s1600/DSC_0238.jpg http://1.bp.blogspot.com/-S9NjzdTvIl4/VPi68leNKLI/AAAAAAAAEXk/BkmrI0BnVQc/s1600/DSC_0239.jpg नदीकाठाने फिरताना समोर हे दिसले आणि थबकलो. http://4.bp.blogspot.com/-FvRvIV1bGq0/VPi7GqcIsII/AAAAAAAAEX0/zaVrB74IG_s/s1600/DSC_0231.jpg याबद्दल वाचले होतेच फक्त नेमकी जागा माहिती नव्हती ती अशी अचानक समोर दिसली. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान ज्यू नागरिकांना नाझी काँसंट्रेशन कँप्स मध्ये जाण्यापासून वाचविण्याकरिता जे लोक सातत्याने कार्यरत होते, त्यांना ८ जानेवारी १९४५ च्या मध्यरात्री पकडून इथे उभे केले गेले. शूज काढायला सांगून नंतर पाठीमागून गोळ्या घातल्या गेल्या जेणेकरून मृतदेह नदीत कोसळतील आणि पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जातील. त्यांच्या स्मरणार्थ इथे आता ही कायमस्वरूपी पादत्राणे ठेवण्यात आली आहेत. अपार क्रूरतेच्या या घटना, अशा छोट्याशा पण अर्थपूर्ण स्मारकांतून खूप काही सांगून जातात. एकीकडे अंधार पडू लागल्याने समोरचा बुडा किल्ला आणि सगळेच शहर दिव्यांनी झगमगत होते आणि इथेच कायमस्वरूपी वसलेले हे इतिहासातील अंधार क्षण अंतर्मुख करणारे होते. असेच चालत चालत दूरवर आलो. अंधार पडला तसतसे बुडापेस्ट दिव्यांच्या रोषणाईने चमकत होते. http://1.bp.blogspot.com/-s_JcCWFkzQ4/VPi9GmkQNdI/AAAAAAAAEYE/cA0KG1b0Ywk/s1600/DSC_0260.jpg http://4.bp.blogspot.com/-mjlbWgu0zy4/VPjAHzgtdeI/AAAAAAAAEYk/Oh5d-o7bgGg/s1600/DSC_0257.jpg या पुलावरून चालत बुडा मध्ये आलो. या बाजूने दिसणारे दृश्य. हाच तो पूल जिथे 'हम दिल दे चुके सनम' चे शेवटचे दृश्य चित्रित झाले आहे. पुढच्या भागात याचे बुडा किल्ल्यावरून घेतलेले फोटो बघून खात्री होईल. http://2.bp.blogspot.com/-rcJLNUaTySU/VPi9JTPue5I/AAAAAAAAEYY/y1_ULP-Vjmo/s1600/DSC_0270.jpg आणि मग नदीच्या पलीकडून पार्लमेंटने लक्ष वेधून घेतले. http://2.bp.blogspot.com/--EmsdtX1HMI/VPjAr5RPQVI/AAAAAAAAEY0/HOwpUAZ0tm0/s1600/DSC_0286.jpg नदीवर वाऱ्याचा जोर अधिकच जाणवत होता. समोरचे दृश्य अप्रतिम असले तरीही फार काळ बाहेर थांबणे कठीण होऊ लागले. त्यामुळे हॉटेलवर परतायचे ठरवले. मनमोहक बुडापेस्टची पहिलीच झलक खूप आवडली होती. अजून दीड दिवस हातात होता, त्याबद्दल पुढील भागात. क्रमशः

वाचन 10150 प्रतिक्रिया 0