Skip to main content

वीरगळ आणि गधेगाळ

लेखक प्रचेतस यांनी रविवार, 13/05/2012 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
वीरगळ महाराष्ट्रात बर्‍याच ठिकाणी गावच्या वेशीजवळ, मंदिरांच्या प्रांगणात, किल्ल्यांच्या वाटांवर काही शिळाशिल्पे आढळतात. त्यावर युद्धातील प्रसंग तसेच धारातीर्थी पडलेले वीर आढळतात. तेच हे वीरगळ. वीरगळ हा शब्द वीर(संस्कृत) आणि कल्लू (कन्नड) अशा दोन शब्दांचा मिळून झाला आहे. कल्लू म्हणजे दगड अथवा शिळा. वीरपुरुषाची शिळा म्हणजेच वीरगळ. हे वीरगळ महाराष्ट्रात आणि कर्नाटकात बहुसंख्येने दिसतात. पूर्वीच्या प्रथेप्रमाणे एखाद्या वीरपुरुषाने गावावर आलेल्या परचक्राचा सामना केला, गाईगुरांना पळवून लावणार्‍यांपासून त्याचे संरक्षण केले, दरोडेखोरांकडून गावाचे संरक्षण केले आणि हे करता करता लढाईत त्याचे प्राणोत्क्रमण झाले तर त्याचे स्मारक ऊभारण्यात येई. उभट, आयताकृती दगड, त्याच्या चारही बाजूंना चौकटी कोरलेल्या, वर घुमटी अशी याची रचना. चारी बाजूंच्या चौकटींमध्ये युद्धाचे प्रसंग कोरलेले, एका चौकटीवर आडवा पडलेला वीर आणि घुमटीवर चंद्र सूर्य कोरलेले अशी यांची सर्वसाधारण रचना. वीरगळांवर वीराचे नाव कोरण्याची प्रथा नाही किंवा युद्धाची माहिती लिहिलेले शिलालेखही त्यावर आढळत नाहीत. काही वीरगळांवर सागरी युद्धेही कोरलेली आढळतात. मुंबईतल्या एका वीरगळावर जहाजांमधील युद्ध कोरलेले आहे. हा वीरगळ उत्तर कोकणातल्या शिलाहार राजवटीमध्ये खोदला गेला. महाराष्ट्रातील बहुतांश वीरगळ हे शिलाहारकाळ आणि यादवकाळात मोठ्या प्रमाणावर उभारले गेले. १. रतनवाडीतील अमृतेश्वर मंदिराच्या बाजूला असणारा वीरगळ २. राजमाचीच्या भैरवनाथ मंदिराच्या बाजूस असणारा वीरगळ ३. माहुली किल्ल्यावरील भग्नावस्थेतील वीरगळ गधेगाळ ही शिळाशिल्पे बहुतेक वेळा शापवाणी (कर्स मेकर्स) करण्यासाठी निर्मिली गेली. वीरगळांप्रमाणेच यांचा उगम शिलाहारकालीन. यादवकाळातही हे गधेगाळ कोरले गेले. वीरगळांसारखीच यांची रचना. उभट आयताकृती दगड आणि वर घुमटी. मात्र या गधेगाळांवर शिलालेख आढळतात. मुख्य म्हणजे हे शिलालेख देवनागरीत आहेत ते ही मराठी भाषेत. घुमटीवर चंद्र सूर्य कोरलेले, त्याखालच्या चौकटीवर शिलालेख कोरलेला. वर काही मंगलवचने तर खालच्या बाजूस अभद्र वचने कोरलेली. व त्या खाली अजून एक शिल्प कोरलेले. त्या शिल्पात स्त्रीचा गाढवाबरोबर संकर दाखवलेला. हे गाढव शिल्प म्हणजे गधेगाळ. काही वेळा ह्या असभ्य शिल्पांबरोबरच वरच्या बाजूस शिवलिंगाची पूजेचे शिल्प पण कोरले गेले आहे. नागाव, अलिबाग येथील अक्षी गावातील गधेगाळ शिल्प सर्वात प्राचीनतम मानले जाते. डॉ. शं. गो. तुळपुळे यांनी याचे संपूर्ण वाचन केले. गीं सुष संतु। स्वस्ति ओं। पसीमस- मुद्राधीपती। स्त्री कोंकणा चक्री- वर्ती। स्त्री केसीदेवराय। महाप्रधा- न भइर्जु सेणुई तसीमीनी काले प्रव्रतमने। सकु संवतु: ९३४ प्रधा- वी सवसरे: अधीकू दीवे सुक्रे बौ- लु। भइर्जुवे तथा बोडणा तथा नऊ कुवली अधोर्यु प्रधानु। महालषु- मीची वआण। लुनया कचली ज- शके ९३४ अर्थात इ.स. १०१२ मधला हा संकृत मिश्रीत मराठी शिलालेख मराठीतील सर्वात आद्य लेख आहे. श्रवणबेळगोळच्या गोमटेश्वराच्या सर्वमान्य आद्यलेखापेक्षाही जुना. ह्याचा अर्थ असा- कल्याण होवो. पश्चिम समुद्राधिपती श्री. कोकण चक्रवर्ती श्री. केसीदेवराय याचा महाप्रधान भइर्जू सेणुई याने शक संवत ९३४ प्रभव संवत्सर अधिक कृष्ण पक्ष शुक्रवार या दिवशी देवीच्या बोडणासाठी नऊ कुवली धान्य नेमून दिले. जगी सुख नांदो. ह्या खालच्या तीन ओळींत मात्र अभद्र वचन कोरलेले आहे. हे शासन कुणी भंग करील तेहाची माय गाढवे झबिजे व त्या खालच्या शिल्पामध्ये गाढव व स्त्रीचा संकर दाखवलेला आहे. ह्या शिलालेखाच्या वरील भागात चंद्र सूर्य कोरलेले असून मधल्या ओळी मात्र आता बर्‍याचशा पुसट झालेल्या आहेत. रतनगडाच्या पायथ्याशी रतनवाडीतल्या अमृतेश्वर मंदिराच्या प्रांगणात एक हत्तीगाळ जमिनीत अर्धवट रोवलेला आढळतो. घुमटीवर चंद्र-सूर्य कोरलेले असून मधल्या चौकटीत शिवपिंडीचे पूजन दाखवले आहे. तर खालच्या बाजूस हत्तीबरोबर संकर दाखवला आहे. शिलालेखाच्या ओळी पूर्णपणे बुजलेल्या आहेत. जो कोणी ह्या शिवलिंगाच्या पूजेचा अव्हेर करेल त्याची अशी अवस्था होईल असा ह्या शिल्पाचा अर्थ काढता येतो. हे शिल्प शिलाहार झंझ राजाच्या कारकिर्दीत घडवले गेले असावे (साधारण १० वे शतक) कारण अमृतेश्वराच्या मंदिराचा कर्ताही तोच आहे. मंदिराशेजारीच काही वीरगळ पण आहेत. अंबेजोगाई-वेळापूर इथल्या गधेगाळामध्ये संस्कृतमध्ये शापवाणी कोरलेली आहे. स्वदत्तां परदत्तां वा यो हरेत वसुंधरा | षष्टिं वर्ष सहस्त्रानि विष्ठायां जायते कृमि: || स्वकीय किंवा परकीय जो या वसुंधरेचे हरण करेल, असं करणारा सहा हजार वर्ष विष्ठेमधला कृमी बनेल तर काटी येथील गधेगाळात 'हे जो मोडी राजा अथवा प्रजा तेयाची मायेसि गाढोअ' अशा प्रकारची मराठी वाक्यरचना आहे. महाराष्ट्रातील काही गधेगाळ पुढीलप्रमाणे १. कदंब भरूडदेव याचा सावरगाव लेख (इ.स. ११६४) २. शिलाहार अपरादित्य याचा लोनाड लेख (मराठी) ३. शिलाहार अपरादित्य(द्वि.) याचा परळ लेख. ४. शिलाहार सोमेश्वरदेव याचा चांजे लेख( या लेखात शब्दरूपात गधेगाळ नसून शिल्परूपात आहे) ५. यादव रामचंद्र देव याचा पूर शिलालेख (इ.स. १२८५ फक्त शिल्परूपात) ६. यादव रामचंद्र देव याचा वेळापूर शिलालेख (इ.स. १२८५) ७. वेळूस शिलालेख (इ.स. १४०२) ९. शिलाहार राजा अनंतदेवाचा दिवेआगर शिलालेख(इ .स. १२५४) अशी हीन दर्जाची शापवाणी कोरीव लेखांमध्ये कशी काय वापरली गेली याचा काहीच अंदाज येत नाही. यादव-शिलाहारांच्या लेखांतच आणि मुख्यत्वे मराठी भाषेतच ती आढळली आहेत आणि त्यातही गधेगाळीबरोबर बरेच वेळा शिवलिंगही असल्याने शैवपंथियांमध्येच अशा प्रकारची शिल्पे जास्त प्रचलित असावीत. ५. रतनवाडीतील गधेगाळ ६. अक्षी येथील गधेगाळ(फोटो आंतरजालावरून) ७. पिंपळवंडी गधेगाळ(फोटो शैलेन भंडारे यांजकडून) संदर्भः १. प्राचीन मराठी कोरीव लेख’ व ‘मराठी वाङ्मयाचा इतिहास’ संपादक : डॉ. शं. गो. तुळपुळे २. महाराष्ट्राच्या इतिहासाचे साक्षीदार -प्रा. कल्पना रायरीकर, डॉ. मंजिरी भालेराव.

वाचने 71026
प्रतिक्रिया 90

प्रतिक्रिया

मी गेली एक वर्ष मिपावर आहे. येणारे प्रतिसाद वाचल्यावर असे दिसले की मिपावर प्रतिसाद लिहिणार्यामधे एक गैरसमज मला दिसला तो असा की इतर प्रतिसाद लिहिणारे अज्ञानी आहेत फक्त मीच हुशार असे अनेकाना वाटते. मी वीरगळ म्हणजे विठ्ठल का विचारले होते त्याला उत्तर मिळाले की अहो विठ्ठल या नावाच्या उपपत्ती अनेक आहेत. लिहिणार्याना असे वाटले नाही की इतराना पण त्या माहित असतील. लिहिणार्यानी आपण काय लिहितो ते नीट वाचावे व इतराचा अपमान होइल असे लिहु नये.लिहिणार्याच्या उत्तराने माझ्या ज्ञानात भरपडली नाही फक्त अपमान झाला.

In reply to by दिगोचि

आपल्या विचार भावना मनात दडपण्या पेक्षा मनमोकळेपणाने व्यक्त करणे चांगलेच पण प्रत्येकाने आपल्याशी सहमत झालेच पाहीजे हा आग्रह योग्य नव्हे. १) आपली कुणा सोबत खरडी अथवा व्यनितून खाजगी चर्चा अथवा इतर धाग्यावर चर्चा झाली असेल तर माहित नाही, या धाग्यावर प्रचेतस यांनी दिलेल्या उत्तरात मला कुठेही काही व्यक्तीगतता अथवा अपमानास्पद काही आढळले नाही किंवा प्रचेतस यांचा तसा उद्देशही दिसत नाही. विठ्ठल या नावाची उत्पत्ती वीरगळ या शब्दातून येऊ शकते या मताशी ते (प्रचेतस) सध्या तरी सहमत नसावेत एवढाच अर्थ होतो. २) तुम्ही अपरंपरागत शक्यता विचारात घेत आहात, अपरंपरागत नवा अथवा वेग्ळा विचार करून पाहण्यात त्या बद्दल चर्चा करण्यात वावगे काही नाही, पण आपल्या विचाराशी सहमत न होणारे आपला अपमानच करत आहेत असे परस्पर गृहीत धरणे योग्य नाही. ३) अपरंपरागत नवा अथवा वेगळा विचार मांडताना आपण बरोबरच आहोत असे गृहीत धरणेही योग्य नाही. प्रत्येक वेगळा विचार लोकांनी न स्विकारल्याने अभाळ कोसळते असेही नसावे किंवा इतरांनी असहमती दर्शवली तरीही इतरही अभ्यासकांसोबत आपण विचार विमर्श काळाच्या ओघात चालू ठेऊ शकता. ३) अपरंपरागत नवा अथवा वेगळा विचार मांडताना प्रचेतस यांनी त्यांच्या माहिती पुरते उत्तर दिलेले दिसते. अपरंपरागत नवा अथवा वेगळा विचार मांडणार्‍यांनी या पेक्षा खूप खूप अधिक कठीण चर्चांना आणि प्रसंगाना सामोरे जावे लागते.

In reply to by माहितगार

प्रचेतस यानी मला दिलेल्या उत्तराचा टोन मला पेट्रनायझिन्ग वाटला म्हणुन मी तसा प्रतिसाद लिहिला. त्यात कोठेहि मी बरोबर आहे असे म्हटलेले नाही. मी एक शन्का विचारली कारण कल्ट ऑफ विठोबा या पुस्तकात विट्ठल हा वीरगळ (हीरो स्टोन) आहे असे मी वाचले म्हणुन मी हे खरे आहे का हा प्रश्न विचारला. त्याला मला माहित नाही हा प्रतिसाद योग्य. कित्येकाना मला माहित नाही हे सान्गायला कदचित कठीण जाते असे वाटले. तुम्ही मात्र माझ्यावर काहीच्याबाही आरोप केले आहेत.

In reply to by दिगोचि

मी 'नाही' म्हटलं ह्याचा अर्थ विठ्ठलाची मूर्ती ही वीरगळ नाही असं ठामपणे म्हटलं. वीरगळ ही स्मारक शिळा (Memorial Stone)असते. तर विठ्ठल ही शिळा नसून मूर्त स्वरुप आहे. हा सर्वात मोठा फरक आहे. शिवाय वीरगळातील वीर हा नेहमीच सशस्त्र असतो. अगदी अपवादात्मकरित्याही मी नि:शस्त्र वीर कधीही पाहिला नाही. इतरही बरेच फरक आहेत. जिथे मला काही माहीत नाही तिथे मी मला माहीत नाही किंवा सांगता येणार नाही ह्या स्वरुपाचे कित्येक प्रतिसाद दिलेले आहेत जे तुम्ही खोदकाम करून बघू शकता.

In reply to by दिगोचि

मी विचारांची चिकित्सा करतो आणि चर्चेतील व्यक्तिवर व्यक्तीगत आरोप करणे टाळण्या बाबत काटेकोर असतो. मी आपल्यावर आरोप करतो आहे आणि तेही काहीच्या बाही असे तुम्हाला का वाटावे हे अनाकलनीय आहे. तरी सुद्धा इतर कुणा मिपाकरांना (अर्थात डूआयडीवरुन नको) वरील चर्चेतून मी आरोपबाजी केली आहे असे वाटले तर जरुर निदर्शनास आणावे, मला माझे प्रतिसाद लेखन इतरांच्या दृष्टीकोणातून समजावून घेण्यास की तुम्ही म्हणत आहात तसे मी खरेच कुठे चुकतो आहे किंवा चुकलो आहे का, आणि खरेच तशी जरुरी असेल तर सुधारणा करण्यासाठी तपासणे निश्चित आवडेल. प्रचेतसांना माहित नाही हे सांगणे अवघड गेले का, असहमती व्यक्त करणे सोपे गेले ते प्रचेतसच आपल्याला सांगू शकतील पण त्यांच्या मनमोकळ्या असहमती दर्शवण्यात मला व्यक्तिश: काही वावगे अथवा तुमचा अपमान व्हावा असे काही जाणवले नाही असो. शुभेच्छा

In reply to by माहितगार

प्रचेतस यानी मला दिलेल्या उत्तराचा टोन मला पेट्रनायझिन्ग वाटला म्हणुन मी तसा प्रतिसाद लिहिला. त्यात कोठेहि मी बरोबर आहे असे म्हटलेले नाही. मी एक शन्का विचारली कारण कल्ट ऑफ विठोबा या पुस्तकात विट्ठल हा वीरगळ (हीरो स्टोन) आहे असे मी वाचले म्हणुन मी हे खरे आहे का हा प्रश्न विचारला. त्याला मला माहित नाही हा प्रतिसाद योग्य. कित्येकाना मला माहित नाही हे सान्गायला कदचित कठीण जाते असे वाटले. तुम्ही मात्र माझ्यावर काहीच्याबाही आरोप केले आहेत.

जे उत्तर आज वाचले तेच जर तेव्हा मिळाले असते तर लिहायची वेळ आली नसती. तुम्ही पूर्वी मला माहित नाही असे असे सान्गितले आहे ते मला शोधाण्याची मला जरूर वाटत नाही. मागाना मल एक सान्गावेसे वाटते की मी १९६६ पासुन भारता बाहेर राहात आहे व तेथे आज पर्यन्त अनेक कमिट्यावर काम केले आहे त्यात माझ्यावर कोणीहि असे म्हटले नाही की हा फक्त आपण बरोबरच आहोत असे गृहीत धरतो व दुसर्यान्ची बाजु ऐकुन घेत नाही. माझा प्रश्न हा एका रिसर्च स्कॉलरच्या कामावरुनहोय्त त्यावर लेखकाचा काय विचर आहे हे मला पाहिजे होते. बस बाकी अधिक काही नव्हते. माझ्या विचाराशी सहमत व्हा असे मी लिहिलेले नाही फक्त त्यान्च्या उत्तराचा टोन मला आवडला नाही. आणि हो मी फोनवर मिपावरील कोणाशीहि चर्चा केलेली नाही व करेन असे वाटत नाही. मलाही कोणा व्यक्तिवर टीका केलेली आवडत नाही जी येथे केली गेली. म्हणून हा प्रपन्च. हा वाद येथेच थाम्बवतो.

In reply to by दिगोचि

तुम्ही कुठे आहात आणि कुठे कुठे काय काय काम केलेत ह्याच्याशी मला काही देणेघेणे नाही. येथे सर्व मिपाकर म्हणूनच येतात. बाकी तुमचा टोन मलाही अपमानास्पद वाटला. असो.

कोल्हापुरात खुदाई करताना ૪ फुटी प्राचीन शिळा सापडली.त्यावर खंडोबा व महादेवांची चित्रे आहेत.त्याबद्दल काही सांगता येईल का?

In reply to by उपयोजक

तुम्ही दुवा दिलेला दिसत नाही. गूगल सर्च करताना कोल्हापूरातली हि एक बातमी दिसली. बाकी सातारा जिल्ह्यातील हे एक लोकमत वृत्तही जिज्ञासूंना रोचक वाटू शकेल असे वाटते.

In reply to by उपयोजक

हा वीरगळ आहे. अतिशय सुस्थितीत आहे हे पाहून आनंद झाला. खंडोबा नाहीये. खंडोबाच्या शिल्पात सोबत बानू/म्हाळसा आणि कुत्रे असतात. शिल्पाची त्रिस्तरीय रचना इथे व्यवस्थित दिसते आहे. सर्वात खाली घोडेस्वारांचे युद्ध दाखवले आहे. मधल्या पट्टिकेत अप्सरा त्या धारातीर्थी पडलेल्या वीराला धरून स्वर्गात (कैलासात) नेत आहेत. आणि सर्वात वरच्या पट्टीत तो वीर सपत्नीक (?) शिवलिंगाची पूजा करतो आहे. प्रचेतस अजून सांगतीलच.

In reply to by एस

वीरगळच आहे. एस यांनी व्यवस्थित विशद करून सांगितलेच आहे. कोल्हापुरात काही देखणे वीरगळ आहेत. एक तर खुद्द महालक्ष्मी मंदिराच्या आवारातच आहे. हा सापडलेला वीरगळ पण अतिशय देखणा आहे.

हाय वल्ली. काल कराड आणि पुढे देवराष्ट्रला गेलो. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांचं गाव बघायचं होतं, तिथून जवळ असलेल्या देवराष्ट्रे या गावी गेलो. 'कृष्णकाठ' मधे उल्लेख आहे, म्हणून पुरातन महादेवाचे मंदिर बघायला गेलो, छान आहे, त्यास 'समुद्रेश्वर' म्हणतात. गावाचं दैवत म्हणून 'सागरोबा' असेही नाव आहे. तिथे बाहेर दोन वीरगळ दिसले. डोंगरातून तिथे पाणी झीरपत येते आणि एका खोलगट भागात पाणी साठवून असते, बारमाही पाणी असते म्हणे. तर, तिथे दोन वीरगळ दिसले.

veergal
वीरगळ

एकावर काही आकार तर, एक पूर्ण सपाट दगड झाला होता. वीरगळ बघीतल्यावर, तुम्ही आणि तुमच्या धाग्याची आठवण झाली. मग छायाचित्र काढले. आता माहिती सांगावी. पण या वीरगळात तीन स्त्रिया दिसत आहेत. वर महादेवाची पींड दिसत आहे. बाकी खालील भाग सपाट झालेला दिसतो. सविस्तर प्रतिसादाच्या प्रतिक्षेत. वीरगळ अनेक ठीकाणी दिसतात. छायाचित्र घ्यायचे राहून जाते. -दिलीप बिरुटे


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धन्यवाद सर, मधल्या पॅनलमध्ये तीन स्त्रिया नसून दोन्ही बाजूंना एक एक अप्सरा आहे आणि मध्यभागी मृत वीर आहे. त्याला त्या दोन अप्सरा स्वर्गात घेऊन जात आहेत. खालच्या पॅनलमध्ये ढाल तलवारीने युद्ध करणाऱ्या वीराचे शिल्पांकन आहे. वरच्या पॅनलमध्ये तो वीर स्वर्गवासी झालेला असून शिवाची आराधना करताना दाखवलेला आहे.

In reply to by प्रचेतस

असं आहे व्हय, ते सगळं. माहितीबद्दल धन्स. सगळी वीरगळं एक चित्र-लिपीच आहे. बाय द वे, तुम्ही या वीरगळावर एक पुस्तक करा. पुलेशु. -दिलीप बिरुटे