मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रंग माझा वेगळा - रंगाशी दोन हात

कंजूस · · तंत्रजगत
*** *** *** *** *** कंजूस  यांचे सर्व लेखन इथे पाहा *** *** *** *** ***
आपलं घर स्वच्छ, टापटीप आणि सुंदर दिसावं असं प्रत्येकालाच वाटतं. त्या सौंदर्यात लाकडी - लोखंडी सामानासह घराच्या रंगाचाही मुख्य वाटा आहे. दिवसेंदिवस शहरांमध्ये मोठ्या इमारतीमधला आपला एक ब्लॅाक/फ्लॅट असतो आणि चित्रामधलं टुमदार स्वतंत्र घर ही कविकल्पना होऊ लागली आहे. बाहेरचा रंगही कसा असावा हे आपल्या कक्षेबाहेरच गेलं आहे. आतल्या भिंतींचा रंग ठरवणे एवढेच उरले आहे. रंग काढायला झाला आहे हा विचार केव्हा चर्चेला येतो? घरामध्ये काही कार्य निघाल्यावर, सणासुदीच्या अगोदर,नवीन ब्लॅाक घेतल्यावर, केवळ पहिल्या रंगसंगतीचा कंटाळा आला म्हणून किंवा अगोदरचा रंग खराब झाल्यावर. कारण काहीही असो कोणता रंग द्यायचा आणि बजेट किती यासाठी इंटरनेटवर शोधणे, किंवा ओळखीपाळखीच्या लोकांना विचारणे सुरू होते. रंगाच्या आणि टुअरच्या बाबतीत कुणालाही विचारा "त्यांचा" माणूस किंवा निवड ही अल्टिमेटच असते. "मग अमुकवेळा दुसरीकडे का गेलात?" याचे उत्तर "तो अवेलबलच नव्हता हो." असो. मुख्य विषयाकडे वळूया. रंगकामाचे दोन प्रकार पडतील - अ) कॅान्ट्रॅक्टरकडून(ठेकेदार) करवून घेणे, ब) स्वत: ( डु-इट-युवरसेल्फ) करणे. पहिला अ प्रकारच भारतात प्रचलित आहे. यामध्ये ठेकेदार येतो,तुमच्या घराच्या भिंतींचे निरीक्षण करतो,तुम्हास कोणत्या प्रकारचा भारी/हलका रंग लावायचा आहे हे विचारतो, मापं काढतो आणि एस्टीमेट उर्फ खर्चाचा अंदाज सांगतो. हो म्हटल्यास थोडी रक्कम अडवान्स घेऊन साधारणपण चारचार दिवसात एकेक 'रूम' पूर्ण करतो. आणखी एक फाटा फुटतो तो म्हणजे पूर्ण कामच देणार का रंगसामान तुमचे, मजुरी आमची? इथे चक्रव्युहात फसण्याची शक्यता वाढते. वाघ्या म्हणा किंवा वाघोबा म्हणा तो खातोच. प्रकार ब एवढा रुळला नाहीये. इंटरनेटवर यासंबंधी बरीच माहिती परदेशी साइट्सवर उपलब्ध आहे. त्यांच्या आणि भारताच्या अर्थकारणात बराच फरक आहे. त्यांना निरनिराळी उपकरणं विकत घेऊनही काम स्वत: केल्यास फारच स्वस्त पडते. रंगकामाचा प्रकार कोणताही असो त्यासंबंधी थोडीफार माहिती देण्याचा प्रयत्न या लेखातून करणार आहे. मिसळपाव साइटवर गेल्या तीनचार दिवसांत "खरडफळ्यावर" थोडी प्रश्नोत्तरे झाली ती इथे येतीलच. शिवाय प्रतिसादांतून विचारलेल्या प्रश्नांतूनही अडचणी समजतील त्या कशा सोडवता येतील ते पाहू. सर्वांनीच आपापले अनुभव लिहिले की उत्तम संग्रह होईल. १) रंग छान का वाटतो - मुख्य म्हणजे रंगसंगती आणि रंगकामाचा सफाइदारपणा. शिवाय रंगाला व्यक्त होण्यासाठी जागा लागते ती आता कमी होत चालली आहे. खोल्या लहान आणि सामान वाढत आहे. मोठी कपाटं किंवा उंच फर्निचर- वॅाडरोबमुळे एक मोठा रंगवलेला चौकोन दिसतच नाही. घरात भरपूर प्रकाश येणे उत्तम. काही जुन्या रंगसंगती # हलक्या क्रीम कलरच्या भिंती + चेस्टनट ब्लॅकचे उभे खांब - केरळ स्टाइल. # पांढरी भिंत, आणि छत यामध्ये ब्रेक करण्यासाठी वरचा नऊदहा इंचाचा ओरेंज पट्टा , ओरेंज खांब - पोंडिचरी कॅाम्बिनेशन # खाली मातीचा रेडिश ब्राउन पट्टा ( लहान डेडो) वर पांढरा - गुजरातमधील गावात असतं तसं. २) रंग खराब का दिसतो? / उठून का दिसत नाही? -अपुरा प्रकाश. भिंतींचे प्लास्टर चांगले नसणे. भिंतींना ओल आल्याने पोफडे निघणे. रंगसंगती चांगली न निवडणे. फर्निचर/पडदे यांच्याशी मॅचिंग न होणे. प्लास्टरिंगमधल्या कमी प्रतिच्या साहित्यामुळे रंग काळवंडतो - चमक जाते. इत्यादी. इलेक्ट्रिकल ओपन वायरिंग हे सुरक्षिततेच्या दृष्टीने उत्तम असते. वायर्स तापत नाहीत परंतू रंगाच्या उठावात कमतरता आणतात. त्यावर प्लास्टिक केसिंग असले तरीही एक अखंड रंगीत चौकोन दिसत नाही. ३) रंग देण्याची प्रक्रिया काय असते? किती तास लागतात? किती रंग लागतो? - सामान्यपणे भिंत विटांची, चुना/नेरु/सिमेंटची गिलावा केलेली, कोकण- केरळ किनारपट्टीला जांभ्या दगडाची असते. त्यावर चुना/नेरु/पिओपी ( जिप्सम)/ लांबीचा गिलावा (प्लास्टर) केले जाते. घासून गुळगुळीत केल्यावर त्यावर रंगाचे दोन हात ( coats) देतात. एका रंगकामाचे मेहनतीचे फक्त ( मध्यंतरी गिलावा/ रंग वाळण्याचे तास सोडून) चाळीस तास धरले तर त्यातले बत्तीस तास गिलावा करून भिंत 'तयार' करण्यात खर्ची पडतात, आठ तास रंगवण्यात. खडबडीत पृष्टभाग रंग अधिक "पितो", अधिक लागतो. दहा फुट x दहा फुट चौकोनाला एक ब्रास म्हणतात अशा खोलीत फरशी सोडून पाच ब्रास किंवा कमी जागा असते ( खिडक्या दरवाजांमुळे कमी). पाच किलो डिस्टेंपर, पाच किलो व्हाइटिंग पावडर, लांबीसाठी अर्धा लिटर पांढरा ऑइलपेंट लागेल. ४) रंग म्हणजे काय? तो खराब का होतो? - अगदी थोडक्यात - रंग/ पेंट =अ) कोणतीतरी टिकाऊ पूड किंवा माती ( पांढरी अथवा रंगीत ) +ब) चिकट द्रव्य /बाइंडर (नैसर्गिक किंवा कृत्रिम) + रंग द्रव्य / डाइ/ह्यू . अ आणि ब यांवर किंमतीत फरक पडतो. भिंत >> सिंमेटचा / चुन्याचा/पिओपी चा गिलावा केलेली कोरडी/ भिजणारी/दमटपणा येणारी . भिंती कोरड्या राहण्याची खात्री असल्यास महागडे रंग देता येतात. अन्यथा अक्रिलिक वॅाशबल डिस्टेंपर देणे उत्तम. डिस्टेंपरची एक नैसर्गिक मंद चमक असते ती कायम राहते. शिवाय रिपेअर लगेचच करता येतो. ओल्या भिंतीवरही रंग देता येतो. रंगातली पांढरी पूड = पांढरी माती/क्ले > चुना पावडर >> शिंपले पावडर>>झिंक ऑक्साइड>>टाइटेनिअम ऑक्साइड अशी उत्तरोत्तर महाग होते. शिवाय ती किती बारीक चाळली आहे यावरही किंमत वाढते. टाइटेनिअम वगळता इतरांस पिवळटपणा येतो. तो दिसू नये म्हणून नीळ( इंडिगो) अथवा कृ० जांभळा रंग ( फास्ट वाइलट) टाकतात. मॅट अथवा ग्लोस फिनिश अती बारीक सूक्ष्म मॅट फिनिश डोळ्यांस चांगला वाटतो तो डिस्टेंपरात नैसर्गिकच येतो. प्लास्टिक/इनेमल पेंटमधल्या बाइंडरमुळे आणि भुकटी बारीक असल्याने एक प्रकारची चकाकी( ग्लोस) रंगाच्या पापुद्र्यास येते ती ट्युबलाइटच्या प्रकाशात चमकते. तसं होऊ नये म्हणून रंग ओला असतानाच रोलर ( स्पंजचा) फिरवून मॅट फिनिश करावे लागते. पाणी रंगाचा शत्रू आहे. पोफडे पडतात,रंगाचे पापुद्रे निघतात. पाणी पाझरून उडतो तेव्हा क्षार तयार होतात ते रंगाला भिंतीपासून दूर ढकलतात. बाहेरच्या कंपाउंड वॅाल आणि इमारतीला दिला जाणारा सिमेंट पेंट आहे याचा मात्र पाणी मित्र आहे. पाण्यानेच तो अधिक घट्ट बसतो. तो भिंत ओली करूनच देतात. उन्हामुळे हा फिका पडतो. पण हा रंग फाइन नसतो. आतमध्ये देत नाहीत. बय्राच इमारतींच्या जिन्याच्या कोपय्रांत लोकांनी थुंकून घाण केलेली असते. अशा ठिकाणी त्यावर हा सिमेंट पेंट मारल्यास स्वच्छ जागा बघून तिथे कोणी घाण करत नाही. पाट्या आणि देवांची चित्रे लावण्यापेक्षा बरे. आतील रंग खराब होण्याचे ओल येण्याचे कारण आहे त्याशिवाय एक म्हणजे रंगाला "घसट" असणे. हे सर्वांकडे असेलच असे नाही. भिंतीजवळ बेड असल्यास टेकून बसल्याने रंग जातो,तेलकटपणा येतो. खुर्च्या सरकवण्याने एका रेघेत खरडा निघतो. खिडक्यांचे लांब पडदे वाय्राने हलतात,रंगाला घासतात. लहान मुले भिंतींवर रेघोट्या ओढतात. रस्त्याजवळच्या शहरातल्या घरांत जी धूळ रंगावर बसते ती डिजेलमिश्रीत असते. ती एक वेगळाच चिकट काळपटपणा आणते. ५) भिंतींना ओल येण्यामुळे रंग खराब होतो त्यावर काही उपाय करता येतील का? ओल जिथून येते ती बंद करणे हा खरा उपाय असला तरी ती ओल बाजुच्या/वरच्या ब्लॅाकच्या बाथरुममधून होत असल्यास त्यावर आपण काहीच करू शकत नाही. आपल्या बाजूने त्यावर येणारी बुरशी टाळण्यासाठी चुना वापरावा. पिओपी आणि तयार पुट्टी यांच्या भलामण जाहिरातींतून चुन्याचे प्लास्टर असतं हे आपण विसरूनच गेलो आहोत.अजुनही काही दुकानांत ओल्या चुन्याची पाचपाच किलोंची तयार पाकिटे मिळतात.सर्व भिंतीला नाही पण कमीतकमी ओल येणाय्रा भागास हे प्लास्टर करून बुरशी नक्की थांबवता येते. बुरशीचा एक नंबर शत्रू. चुना सेट होण्यास वेळ ( एक महिनासुद्धा) लागतो पण ढलपी अजिबात पडणार नाही. वरती मात्र साधा डिस्टेंपर रंग द्यायचा. ओल आल्यास तेवढ्याच भागाचा रंग निघेल पण पुन्हा लावणे अगदी सोपे.प्लास्टिक एनॅमलचा आख्खा पापुद्राच निघतो तसा नाही. एनॅमल पेंटचे कण भिंतींना जेवढे घट्ट धरतात त्यापेक्षा ते एकमेकांस अधिक घट्ट धरतात. डिस्टेंपरचे उलट असते. सिलींग/ छतातून पाणी टपकत असेल तरी चुना पातळ करून रंगासारखा लावला तर पडणार नाही. शिवाय पांढरेपणा छान असतो. आपल्याकडे डु-इट-युवरसेल्फ फार नाही पण काही सोपी कामे करायची तयारी ठेवली तर फारसं अवघड नाही. पद्धत : ५-१) जिथे ओल येऊन पाणी झिरपते तिथे रंग आणि प्लास्टर पडते आणि पांढरा बुरा दिसतो. पाण्यातले क्षार वाळतात. यास इफ्लोरेसन्सही म्हणतात. ५-२) बराचसा सैल भाग पत्र्याने( putty blade) काढून टाकायचा. ओल असल्याने यावर कोणताही प्राइमर बसणार नाही. सिमेंटचे पाणी/ पातळ सिमेंट ब्रशने लावायचे. सिमेंट पाण्यामुळेच पक्के होत असते आणि जुन्या भागास पकडते. ५-३) चुन्यात वाळू कालवून त्यावर लेवल करायचे. भिंतीला सिमेंट पकडते आणि सिमेंटला चुना पकडतो. ५-४) यावर एक पांढरा डिस्टेंपर पेंट ( नेरोलॅक किंवा एशियन) लावायचा. ५-५) चुना न मिळाल्यास नेरू लावायचा. सिमेंट विकणाय्राकडेच "नेरू" नावाची पांढरी,मऊ,जड पावडर विकत मिळते. सिमेंट लावल्यावर या नेरूला ओले करून वर लावल्यावर सिमेंटचा काळेपणाही दिसत नाही. सिमेंट अधिक वाळू अधिक नेरू ओले करूनही लावता येते. दुसय्रा दिवशी डिस्टेंपर लावायचा. ( चुन्याचं काम करण्यावेळी एक सेफ्टी चष्मा हवाच. ) जेव्हा येणारी ओल ही बाहेरून पावसाने भिंत भिजल्यामुळे येते तेव्हा बाहेरूनही काही उपाययोजना करणे आपल्याला शक्य असते. परंतू ही ओल इमारतीच्या दुसय्रा ब्लॅाकच्या बाथरूमच्या पाणाच्या गळतीमुळे होते तेव्हा आपण काहीच करू शकत नाही. त्याने केलेले कन्सील्ड प्लंबिंग किंवा टाइलमधून पाणी झिरपत असते आणि तो ते तोडायला तयार नसतो. आता हे माहित झाल्याने रंगाय्राने पैसे घेतले अन "चुना लगाया" असं कुणी म्हणणार नाही कारण याठिकाणी चुनाच तुमचे पैसे वाचवेल. ६) प्लास्टरिंग / गिलावा ६-१) विटांची भिंत असल्यास त्यावर सिमेंट अधिक नेरूचे प्लास्टर केलेले असते. सुरवातीस घरे बांधताना भिंती ओल्याच असतात त्यामुळे हे प्लास्टर महिन्याभरात घट्ट होते. ( setting.) यावर पिओपी ( जिप्सम)चे प्लास्टर करून रंग देतात. हे पिओपी पंधरा मिनिटांत सेट होते त्यामुळे रंगारी यासच पसंती देतात. खोटे छत उर्फ फॅाल्स सिलिंगसाठी याचे नवनवीन डिझिइनचे तयार पाट ( बोर्डस) मिळतात ते वर छताला लावतात. सध्या कन्सील्ड इलेक्ट्रिकल वाइअरिंगचा जमाना आहे. तर या वायरी छतामध्ये लपवता येतात ( पंखा आणि सुशोभित लाइटिंगच्या केबल दिसत नाहीत.) ६-२) पूर्वी वाळूमिश्रीत चुन्याचे प्लास्टर केले जायचे. हे सर्वोत्तम समजले जाते कारण त्याचा पाणीविरोधकपणा आणि उष्णतेने भिंतीचे होणारे प्रसरण याशी मेळ खाते. बुरशीही वाढू देत नाही. परंतू आता ( १९७० नंतर) चुना प्लास्टर गायबच झाले आहे. चुन्याला घट्ट होण्यास सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ लागतो. पण त्यानंतर तो कठीण आणि लवचिकही राहतो - भेगा पडत नाहीत. इथे थोडी चुन्याची अधिक रंजक माहिती बघुया - कित्येक जुन्या महालांत आणि देवळांत चुन्याचा गिलावा करून त्यावर भित्तीचित्रे काढली आहेत. चुना हा नैसर्गिक स्वरुपात जमीनीत,खाणीत चुनखडीचे खडक ( कॅल्शम कार्बोनेट) म्हणून मिळतो. त्याचे मोठे तुकडे उंच भट्टीत तापवले की पाणी आणि कार्बनडाइअक्साइड वायू निघून जाऊन चुनकळी मिळते. वापरण्याच्यावेळी यात पाणी घातल्यावर पाणी उकळते आणि चुन्याची विरी ( स्लेक्ट लाइम) तयार होते. याचा लगदा खूप मळतात त्याचा गिलावा करतात. शंखशिंपल्यांतही चांगले कॅल्शम कार्बोनेट असते (मोत्यांमध्ये याहूनही शुद्ध असते.) असे बेटवा नदीतले शिंपले भाजून त्याचे प्लास्टर ओर्छा ( झाशीजवळ अठरा किमी) येथील महालांत केले आहे. लिंपल्यानंतर नदीतलेच गोटे घेऊन ते घोटून गुळगुळीत केले आहे. निरनिराळ्या गेरू,वनस्पतींचे रंग,कोळसा इत्यादी वापरून चित्रे काढली आहेत. ही सर्व चित्रे म्युरल्स प्रकारातली म्हणजे गिलावा वाळल्यावर काढलेली आहेत. ( परदेशातली अशी भित्तीचित्रे फ्रेस्कोज प्रकारची म्हणजे चुना ओला असतानाच काढलेली आहेत.) केरळमधल्या देवळांत अशा चित्रांसाठी पांढरी माती वेलींच्या रसात वाटून लेप केला आहे. रंग नैसर्गिकच माती/वनस्पतींचे वापरले आहेत. इजिप्तमध्ये ज्या कबरी आहेत त्यातही सुंदर चित्रे आहेत. ६-३) लांबी प्लास्टर - खरं म्हणजे लांबी/putty/filler हे भिंतीवरचे बारीकसारीक खड्डे भरण्यासाठी आहे परंतू याचा उपयोग एक प्लास्टर म्हणूनच रंगारी करतात. कारण काम उरकणे. यासाठी व्हाइटिंग ( पांढरी/राखाडी शेडची शाडूची बारीक माती) वापरतात. तर ही व्हाइटिंग पाण्याने भिजवून नंतर ओइलपेंट घालून मळून लगदा बनवतात त्याचे प्लास्टर केल्याने एका दमात गिलावा आणि खड्डे बुजवले जातात. भिंतीवरचा अगोदरचा रंग पत्र्याने खरवडून काढल्यावर प्रथम प्राइमर रंगाचा एक हात ( coat) दिल्यावरच ही लांबी लावता येते. वाळल्यावर एमरी पेपर २२०ने घासून गुळगुळीत केले की रंगवण्यासाठी भिंत तयार होते. हीच लांबी दारे खिडक्यांच्या लाकडालाही वापरता येते. लांबी करताना सिमेंट प्राइमर,लिनसीड ओइल मिसळल्यास चमक येते पण कधीकधी रंग काळवंडतो. क्वालटी चांगली हवी. डिस्टेंपर लावणार असेल तर व्हाइटिंगमध्ये जो रंग देणार तोच मिसळायचा म्हणजे रंगाला मंद तजेला येतो. ७) कलर /शेड ठरवणे. ७-१) एशिअन अथवा नेरोलॅक कंपन्यांचे कलर कार्ड मिळते. त्यातल्या सर्वच शेड सर्वच प्रकारच्या रंगांत ( डिस्टेंपर, प्लास्टिक,इमल्शन, वॅाटरबेस्ट, नॅान वॅाटर बेस्ट ) उपलब्ध नसतात. ज्या शेडस आहेत त्या ठरवल्यावर त्या तिथेच दुकानामध्ये मिक्सरवर बनवून मिळतात. पुढेमागे रंग खराब झाल्यावर तो शेडचा नंबर सांगितल्यावर अचूक तोच रंग बनवून मिळतो. हा थोडा महाग पडतो. पेंटर लोक स्वत: हवी असलेली शेड बेस पेंटमधून बनवतात. यासाठी स्टेनर ( पातळ डाईज ५० -१०० एमएल बॅाटल्समध्ये मिळतात.) उदाहरणार्थ एक किलो डिस्टेंपर (६०रु किलो)मध्ये "फास्ट येलो ग्रीन" स्टेनरचे वीस थेंब टाकून ढवळून पोपटी रंगाची शेड मिळेल. डाइचे थेंब मोजून प्रथम कमीच टाकायचे. ते वाढवत गेले की गडद शेड मिळते. हे स्वस्त पडते. जेवढा रंग भारी तेवढे स्टेनरचे थेंब कमी लागतात हे लक्षात ठेवा. तयार मिक्सरचा रंग १००रु किलोने मिळतो. . ७-२) हा लेख लिहिण्याचे प्रयोजन ठरलेला प्रश्न - पांढरा {रंग/पेंट} कोणता लावावा? - पांढय्रा पेंटमध्ये ज्या गिलाव्यावर लावला आहे त्यातल्या सर्व अशुद्ध अवांछित शेडस वर येणार आहेत. त्याची शुद्धिता फार महत्त्वाची आहे. अथवा ग्रेईश,पिवळसरपणा मिसळून अपेक्षित पांढरेपणा दिसणार नाही. पिओपीवर लावू नये हे माझे मत. बिरला पुट्टीवर एका ठिकाणी ट्राइ करून पाहा. चुना प्लास्टरवर फार पांढरे दिसेल परंतू भरड राहील. ८) हलका / भारी रंग यात वापरलेली पूड आणि बाइंडरचा दर्जा यावर दर्जा ठरतो हे आपण पाहिलेच आहे. "कवरिंग पॅावर" भारी रंगाची अधिक असते म्हणून त्यासाठीचा गिलावाही अधिक फाइन करावा लागतो. अन्यथा योग्य परिणाम दिसणार नाही. दुसरी एक जाणवणारी गोष्ट म्हणजे डिस्टेंपरला पाणी घालून तयार केल्यावर चार तास ठेवल्यावर डब्याच्या तळाशी जाड रंग साठू लागतो तसे भारी रंगाचे होत नाही. दोन दिवसांनंतरही भारी रंगाचा साका तळाशी जमत नाही. ९) आताच रंग लावून घेतला आणि पाचसहा महिन्यांत भिंतीला भेग पडली/ तळाकडून पाण्याने रंग सुटला पोपडे पडले/ बुरा धरला. काय करू? ब्रशने पाणी लावून तो भाग भिजवायचा. पडणारा सुटा झालेला भाग,प्लास्टर काढून सिमेंटचेच पाणी /ओलसर सिमेंट ब्रशने चांगले चोपडायचे. चारपाच तासांनंतर सिमेंट अधिक नेरू अर्धे मिक्स करून लगदा करून भरायचा/फासायचा - थोडी लेवल करायची. यावर रंगाचा एक हात द्यायचा. दोन दिवसांनी दुसरा हात द्यायचा. अगोदरच्या रंगाच्या शेडचा नंबर माहित असल्यास तोच रंग एक किलो बनवून आणायचा. शेड नंबर माहित नसल्यास रंगाचा सुटलेला एक पापुद्रा दुकानात घेऊन जायचा. त्यांच्याकडे दोनतीन हजार शेडसचे कलर पुस्तक असते त्यातून मॅच करून लगेच शेड बनवून देतात. ९९टक्के काम होईल. १०) लाकूड /लोखंडी वस्तुंचे रंगकाम १०-१) फर्निचर वर सांगितल्याप्रमाणे ओइलपेंट घातलेली लांबी लावून लेवल करायची. प्लाइवूडसाठी फेविकॅाल आणि प्लाइचेच पापुद्रे वापरून लेवल करायची. वर पुन्हा ओइलपेंट द्यायचा. १०-२) लोखंडी वस्तू उदाहरणार्थ पंखा किंवा कपाटाचा थोडासाच भाग खराब झाल्यास "कार पॅच" नावाची लांबी भरायची.( एक मिनिटात सेट होते,जलद काम करायचे.) हलकासा पातळ ओईलपेंट मारायचा. हल्ली लोखंडी सांगाड्यांचे फर्निचर -बेड,शु रॅक वापरणे वाढले आहे. याच्या "पावडर कोटिंग"चे टवके उडून वाइट दिसते. तिथे कार पॅच लावून ३२० नंबर एमरी पेपरने घासून लेवल करावे. वॅालनट/चेस्टनट ब्लॅा स्प्रे विकत मिळतो तो मारला की झाले. १०-३) लाकडाचे पॅालिश हे एकदाच करता येते. अगोदरचेच केलेले असेल तर पहिले पॅालिश पॅालिश -पेपरने संपूर्ण काढल्यावरच दुसरे चांगले बसते. नाहीतर चिकट होते. यासाठी एका बशीत डिनेचर्ड स्पिरिट(लाइसनशिवाय दुकानदार देत नाहीत) घेतात. दुसय्रा एका बशीत "रॅासेना नावाची पिवळी माती घेतात. कापडाची चिंधी स्पिरिटमध्ये आणि रॅासेनात बुडवून एकाच दिशेने लाकडावर फिरवायची. संपले की पुन्हा घ्यायचा पण अगोदरच्या जागेवर पंधरा सेकंदानंतर हात फिरवायचा नाही. चिकट होईल. प्रॅक्टिस हवी. तयार टचवुडसुद्धा मिळते. लाख अधिक स्पिरिटही वापरतात. अजून एक चंद्रूस पॅालिश म्हणजे पाइनवुड झाडाचा गोंद उर्फ राळ स्पिरिटमध्ये भिजवून लाकडाला अथवा जांभ्या दगडाच्या भिंतीला -दगडाला लावता येते. चमक येते, आतला रंग खुलतो, पाणी लागत नाही. १०-४) हल्ली लाकडी दारे खिडक्या जाऊन फ्लश प्लाइवुड आणि अलुमिनियमचा वापर वाढल्याने रंग द्यावा लागत नाही. अन्यथा लाकडी दरवाजे एकेक लिटर+ पेंट घेतात. थोडीफार प्रॅक्टिकल माहिती दिली आहे. सूचना आणि प्रश्नांचे स्वागत आहे. रंगाशी माझे दोन हात. रंग माझा वेगळा. *लेख लिहिण्यास उत्तेजन देणाय्रा सर्वांचे आभार. वाचकांनीही आपापले अनुभव अवश्य लिहावेत माहितीत भर घालावी.

वाचने 39125 वाचनखूण प्रतिक्रिया 78

मार्मिक गोडसे Tue, 04/17/2018 - 10:15
उपयुक्त माहिती. इलेक्ट्रिकल ओपन वायरिंग हे सुरक्षिततेच्या दृष्टीने उत्तम असते. कंसील वायरींग आणि प्लंबिंग मध्ये काही प्रॉब्लेम झाल्यास दुरुस्तीचा खर्च मूळ कामा पेक्षा जास्त येऊ शकतो, खासकरून प्लंबिंगमध्ये.

चौथा कोनाडा Tue, 04/17/2018 - 10:15
वा, सुरेख लेख ! रंगकामाची इत्यंभूत माहिती ! पहिल्यांदा मला वाटलं की कविता किंवा आर्टिस्टिक पेंण्टीग बद्दल असेल ! :-) कंजूससाहेबांनी एवढी भारी माहिती लिहिलिय की त्यांच्या मार्गदर्शना खाली एक मिपारंगारीज नावांचा गट स्थापन करून मिपाकरांच्या घरोघरी रंग द्यायला जायचं ! ज्याच्या कडे मिपाकट्ट्याचे यजमानपद आहे, त्याला मिपारंगारीज तर्फे फ्री रंगकाम !

धर्मराजमुटके Tue, 04/17/2018 - 10:43
ब) स्वत: ( डु-इट-युवरसेल्फ) करणे. मी चाळीत रहात असताना घराचे रंगकाम, छोटे मोठे वायरिंग चे काम स्वतःच करत असे. आर्थिक परिस्थीतीमुळे म्हणा किंवा अजुन काही पण आजूबाजुची बहुतांश घरे स्वत:चे घर स्वतःच रंगवत असत. तिथे असले काम डाऊन मार्केट समजले जात नसे. नंतर फ्लॅट सिस्टिममधे राहायला आल्यावर सगळे उलटेच घडले. आमच्या घरी कामाला मोलकरीण नाही, बायको स्वतःच सगळे काम करते तर २-३ स्त्रियांनी तिला घरकाम करणारी बाई समजले. एक दोनदा मी दरवाज्यातल्या बल्ब चे कनेक्शन दुरुस्त करत होतो तर १-२ जणांनी मला तुम्ही वायरमेन आहात का असे विचारले. इथे स्वतःची गाडी पुसायची पण चोरी झालीये. न जाणो कोणी मला गाडी पुसण्याची ऑफर दिली तर काय घ्या ? त्यामुळे मी गाडी धुवायची असेल तर सकाळी अंधारातच धुवून घेतो. तेव्हाही गाडी धुणारे पोरं हा कोण आपला धंदा बुडवायला आलाय ह्या नजरेने पाहतात :) बाकी धागा आवडला हे वेगळे सांगणे न लगे !

In reply to by धर्मराजमुटके

=)) एक दोनदा मी दरवाज्यातल्या बल्ब चे कनेक्शन दुरुस्त करत होतो तर १-२ जणांनी मला तुम्ही वायरमेन आहात का असे विचारले. अश्या वेळी न लाजता, "हो आहे. पण माझे दर तुम्हाला परवडणार नाहीत" असे सांगायचे ! हाकानाका :)

पिलीयन रायडर Tue, 04/17/2018 - 11:31
धाग्यासाठी धन्यवाद!! प्रचंड माहिती आहे. सावकाश वाचावी लागेल. पण माझ्यासाठी अगदी योग्य वेळी आलेला धागा! (अरे! माझ्यामुळेच आलेला धागा!! ;) )

नंदन Tue, 04/17/2018 - 12:26
उपयुक्त माहिती आणि नेटकी मांडणी. वाचनखूण साठवली आहे.

अभ्या.. Tue, 04/17/2018 - 12:48
मस्त धागा कंकाका. पेंटर लोकांणा काहीही सांगायला जायचे नाही, शेवटी ते त्यांना हवे तेच करतात. आपण जास्त आडमुठपणा केला तर त्यांचा आडमुठपणा सहन करायला लागतोच शिवाय आपण सांगितलेल्या सल्ल्याची आणि रंगाची दोन्हीची माती व्हायची शुअर ग्यारंटी. ते मेटलचे डाय/स्टेन्सिल वापरुन, हात फिरवून करायचे रोयाल प्ले हे मस्त ऑप्शन आहे. क्रियेटिव्ह पेंटर असला की छान होते. पैसा जरा टाकावा लागतो.
"रॅासेना नावाची पिवळी माती घेतात.
तरी नशीब तुम्ही रॉसेना म्हनलात. रॉ सिएना नावाने आम्हाला कॉलेजात माहीत असलेला उच्चार पेंटर लोक रावसेना असा करतात. ;)

Nitin Palkar Tue, 04/17/2018 - 14:58
चाळीत असताना घराचे रंगकाम स्वतः, बरोबरीची भावंडे आणि खांद्यावर हात टाकून फिरू शकतो असे मित्र मिळून करत असू.साधारणपणे दर दोन तीन वर्षातून एकदा हा सोहळा होत असे. ते दिवस आठवले. रंगकामाविषयी माझ्या असलेल्या ज्ञानात (?) महत्वाची भर पडली. धन्यवाद.

चौकटराजा गुरुवार, 04/19/2018 - 10:15
माझे वय आता ६४ पूर्ण. ( मी ... वर होतो तेंव्हा मोड ऑन ). गेले चाळीस वर्श स्वतः एकट्याने रंग देत आहे. डबा धरण्याचे काम आई , मुलगी व बायको करीत. पिवडी ते अ‍ॅडव्हान्स अ‍ॅक्रीलिक एमल्शन असा प्रवास आहे. नुकताच २ बी एच के ला एकट्याने रंग दिला आहे. मागच्या वेळी तर बिल्डरने केलेले प्लास्टर स्वतः पाडून पुन्हा प्लास्टर केले होते. आता तसे करावे लागले नाही कारण घर नवे आहे. पण तरीही भिन्ती घासून घ्याव्या लागल्या. प्रायमर लावला नाही. दोन कोट दिले. काही जागी चुका झाल्याने तीन कोट द्यावे लागले. एकूण १२ लिटर रंग लागला. खर्व्च साधारण ६६००/- रू. आला. सिलिन्गला ही सर्वत्र रंग दिला. काही सूचना. १. कोणताही भारी रंग पुरेशा प्रकाशाविना व्यर्थ आहे. २. रंग आवश्यकते पेक्षा ५ टक्के तरी जास्त करावा. ३. दरवेळी लहान डब्यात फिनिशिम्ग साठी रंग राखून ठेवणे अत्यावश्यक. ४. चिकटपट्ट्या फिनिशिगला मदत करतात पण काही वेळेस रंग ओरबाडून नुकसान करतात. ५. ब्रश व लगोलग रोलर असा रंग देत जाणे . डब्लू या अक्षराच्या आकारात रोलर चालविणे. ६.तयार रंग घरी एकत्र केल्यास मस्त शेडस मिळतात पण त्याचे मिश्रण सदोष होते. ७. रंग देताना मधून मधून मिपावर यावे पण अस्तिक नास्तिक , मोदी अमोदी असा धाग्यावर जाउ नये. असे केल्यास कामाचा ताण कमी होईल. . लिव्हिंग रूम. सर्व इन्टेरिअर चौरा. सिलिन्ग लाईट फिटिन्ग घरी . हा फोटो दिवे लावले असतानाचा आहे. . या फोटोत किचनला जाताना. वॉल पेपर घरी आणून स्वतः लावला आहे. अर्र्रे ए काय निरीश्वर वाद्याच्या घरात देवघर ? हं म्हण्जे लोकशाही आहे ! . लिव्हिन्ग रूम चा फोटो क्रुत्रिम लाईटिंग नसताना.

In reply to by चौकटराजा

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 04/19/2018 - 10:48
मस्तं रंगकाम ! स्वतः रंगवलेल्या घरात वावरताना छाती अभिमानाने भरून सुखाचे दोन जास्त श्वास घेतले जात असतील, यात संशय नाही ! :) ७. रंग देताना मधून मधून मिपावर यावे पण अस्तिक नास्तिक , मोदी अमोदी असा धाग्यावर जाउ नये. असे केल्यास कामाचा ताण कमी होईल. एखादी भिंत 'पिकासो स्टाईल' रंगवायची असल्यास अश्या धाग्यांवर जोरदार हात चालवून मगच रंगाच्या ब्रशाचे हात मारायला घ्यावे. =))

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

चौकटराजा गुरुवार, 04/19/2018 - 18:39
. अन्तरजलावरून साभार मुलीच्या बेडरूम मधे रोयाल पेन्ट ( एशियन पेन्ट कम्पनी ) रंग वापरून वर सारखे पेन्टिंग ६ फूट बाय ४ फूट करायचा विचार आहे. थीम अशी की खिडकीतून हे असे दिसते आहे असे दाखवायचे .

In reply to by चौकटराजा

मार्मिक गोडसे गुरुवार, 04/19/2018 - 11:04
माझे वय आता ६४ पूर्ण. ह्या वयातही सिलींगला रंग दिला . ग्रेट! घरच्या घरी वॉलपेपर लावत असाल तर सिलिंगला रंग लावण्यापेक्षा साधा वॉलपेपर लावणे सोयीस्कर ठरते. साधा गम लावलेल्या खाकी रंगाच्या चिकटपट्ट्या पाण्याने भिजवून सहज निघतात, रंगही निघत नाही. लांबी लावणे व घासणे हे त्या त्या भिंतीच्या दिव्याच्या प्रकाशात करावे, भिंतीचा उंच सखलपणा समजण्यास सोपे जाते. नवीन घराचे काम चालू असेल तर भिंतीला फक्त वाळूच्या प्लॅस्टरचा हलकासा थर द्यावा.व महिनाभराने त्यावर जिप्सम फिनिशींग करून घ्यावे. नेरूपेक्षा छान फिनिशिंग येते, व रंगकामही झटपट होते.

In reply to by अभ्या..

सुबोध खरे Tue, 04/24/2018 - 10:15
चौराकाका, सुपर्ब, खतरन्नाक, अल्टीमेट. एकच लंबर. असेच म्हणतो कंजूस साहेब अगदी बारीक बारीक तपशिलासह लिहिलेला उत्तम लेख. एखाद्या गोष्टीतील तंत्रज्ञान सध्या सोप्या शब्दात समजेल असेच लिहिलेले आहे. अशा गोष्टी वाचल्या कि अर्धे आयुष्य गेले तरी आपल्याला काहीच येत नाही आणि आपण काहीच केले नाही असे वाटू लागते.

In reply to by सुबोध खरे

चौकटराजा Tue, 04/24/2018 - 11:24
अशा गोष्टी वाचल्या कि अर्धे आयुष्य गेले तरी आपल्याला काहीच येत नाही आणि आपण काहीच केले नाही असे वाटू लागते. अहो , डॉख , तुम्हाला माणसाच्या आत काय रंग आहेत ते कळतात हे काय कमी आहे ?. आम्हाला त्या सोनोग्राफीत काहीतरी हालचाल आहे इतकंच कळतं !

In reply to by चौकटराजा

सुबोध खरे Wed, 04/25/2018 - 20:02
तो तर पोटापाण्याचा व्यवसाय आहे. प्रत्येक माणूस ते करतंच असतो. आता आय टी मधले लोक काय काय अगम्य भाषेत बोलत असतात ते कुठे काय समजतंय? जावा काय ( आमच्या वेळेस ती एक मोटारसायकल होती) आणि सॅप काय, एमबेडींग काय

अनिंद्य गुरुवार, 04/19/2018 - 12:16
@ कंजूस, रंगकामाची सांगोपांग माहिती आणि प्रॅक्टिकल सल्ले उत्तम. जमल्यास सध्या चलनात असलेल्या त्या NON-VOC पेंट बद्दलही थोडे सांगा. @ चौकटराजा, तुमच्या रचनात्मक उर्जेला सलाम !

कंजूस गुरुवार, 04/19/2018 - 14:41
चौकटराजा रंगातले व्यास आहेत! जबराट काम केलं आहे. माझा आवडता रंगप्रकार वॉशबल डिस्टेंपर. पॉलिशपेपर न वापरता , धुरळा न उडवता खोलीतले सामान फारसे न हलवता रोज तीनतीन तास देऊन करता येते. शिवाय वॉटरकलरचा टवटवीतपणा येतो. डु-इटयुवरसेल्फ चळवळ सुरुया.

पैसा गुरुवार, 04/19/2018 - 17:03
माहितीपूर्ण धागा! चौरा द ग्रेट! आमच्या गावच्या घराला रंग द्यायच्या प्रयोगात हातभार लावलेला आहे. =)) एक प्रकारचा रंग लेखात उल्लेख करायचा राहिला आहे. तो म्हणजे topcool. गच्चीवर हा रंग दिल्यास तापमान बरेच खाली येते आणि वॉटरप्रूफिंग आपोआप होते.

कंजूस गुरुवार, 04/19/2018 - 20:42
गच्चीवर विटा घालून पॅालिमर सिमेंटमध्ये मिसळून कोबा केलेला असल्यास गळण्याचे प्रमाण कमी राहते. त्यावर सिमेंटचे पाणी तुंबवून जिरवता येते आणि बारीक भेगा बुजवता येतात. अती पावसात कोकण पट्टीला सिमेंट कोब्याला शेवाळे धरते. वरती मोजेइक तुकडे बसवलेले गळतात. त्यावर Dr fixit वगैरे बसत नाही. ते फक्त उभ्या सरफेसवर कार्यक्षम आहे असे डब्यावरच लिहिलं आहे. छताला तीस अंशाचा उतार हाच गळतीला योग्य उपाय असावा. परंतू वरती मजला वाढवायचा का नाही या विचारात तसे करत नाहीत. पत्र्याचे छप्पर - १) अस्बेस्टॅास पत्रे - स्वस्त पडतात,गंजत नाहीत पण अती पावसात गळतात. २) कोटिंग केलेले पत्रे - महाग पडतात. घरात मोबाइलची रेंज येत नाही. पावसाचा आवाज येतो.

In reply to by कंजूस

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 04/19/2018 - 21:10
स्वतंत्र घराचे किंवा सर्वात वरच्या मजल्यावरच्या फ्लॅटचे छत थंड ठेवण्यासाठी हा उपाय तूनळीवर पाहिला...

कंजूस Fri, 04/20/2018 - 06:53
व्हिडिओत विटांऐवजी पोकळ पणत्या वापरल्या आहेत हा फरक आहे. सिमेंटचे आणि इतर वस्तुंचे उन्हाळ्यात प्रसरण कमीअधिक होते आणि तडकते/चिरा पडतातच. पूर्वी चुना आणि गुळ घाणीत एक दिवस मळून कोबा करत त्यावरूनच चुनेगच्ची हा वाक्प्रचार आला. गळू न देणे आणि थंड ठेवणे या दोन्ही गोष्टी शक्य होत. सोलर पॅनेल स्वस्त होतील तेव्हा तेही लावतील वरती.

In reply to by कंजूस

त्या मातीच्या भांड्यांच्या/पणत्यांच्या पोकळीत असलेल्या हवेमुळे छतावरची उष्णता घरात येण्यास प्रतिबंध होतो. त्या भांड्यांना थोडे तडे पडले तरी भांडी आवरणाखाली असल्याने हवा निसटून जाऊ शकत नाही. सोलर पॅनेल्स टेरेसभर आणि जरा उंचावर लावली तर त्यांचा छतासारखा उपयोग होईल. त्यामुळे... १. पॅनेल्सच्या खालचा टेरेस वापरात आणता येईल, २. छत आणि पर्यायाने घर थंड राहील आणि ३. सोलर पॅनेलने वीजनिर्मिती होईल ... अशी ट्रिपल् बेनेफिट स्कीम होईल ! :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

पैसा Fri, 04/20/2018 - 13:42
एवढा उपद्व्याप करण्यापेक्षा मंगलोरी कौले घालावीत ना! गच्चीवर तात्पुरता/कायम मांडव घालून वर मंगलोरी कौले/ पत्रे व सोलर पॅनल घातले तरी तोच परिणाम होईल.

In reply to by पैसा

अकिलिज Mon, 04/23/2018 - 20:11
स्थापत्य अभियांत्रिकीच्या दृष्टीकोनातून सांगू इच्छितो की विनाकारण छतावर कायमस्वरूपी वजन वाढणारा उपाय वाटतोय. जास्त वजनामुळे छताला तडे गेलेले पाहीले आहेत. त्यापेक्षा गच्चीच्या दोन्ही बाजूला मोठी झाडे लाऊन नैसर्गिक सावली केली तरी आतले तपमान ३ अंशाने कमी होईल.