एखादं घर, इमारत, चाळ, सोसायटीतील माणसं. गाव आणि त्या आठवणी माणसाच्या मनात कायम खोलवर रुजलेल्या असतात. घर गाव, सोसायट्यामधील घरं ही इमारती नसतात, आपल्या आयुष्यातील कायम मनाच्या तळाशी साठवलेल्या त्या आठवणी असतात. त्या सर्व आठवणी आनंदाच्या आणि दुःखाच्याही असतात. आठवणींचा असा तो साठा कधी तरी उचंबळुन येतो आणि माणसं त्यात हरवून जातात.
अरविंद अडिगा यांच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारितअशाच एका सोसायटीच्या घराच्या आठवणीचा सुंदर चित्रपट ‘लास्ट मॅन इन टॉवर’. काल Zee5 ओटीटीवर पाहात बसलो आणि रमलो. हा चित्रपट नुसता केवळ एका जुन्या इमारतीच्या पुनर्विकासाचा किंवा एका माणसाच्या हट्टाचा चित्रपट नाही. तो माणसाच्या बदलत्या मानसिकतेचा, स्वार्थाचा, आर्थिक महत्त्वाकांक्षेचा, नात्यांमधील दुराव्याचा आणि आधुनिक विकासाच्या नावाखाली नष्ट होत चाललेल्या सामाजिक संस्कृतीचा अस्वस्थ करणारा वेध घेणारा चित्रपट आहे.
आजच्या महानगरीय जीवनाचा, झगमागाटीचा जवळ जवळ प्रत्येकालाच सोस आहे, काही अपवाद असतील सुद्धा. पण, मोठे घर हवं आहे, आलिशान सुविधा हव्या आहेत, सुरक्षित भविष्य हवे आहे आणि आर्थिक प्रगतीची स्वप्नं पूर्ण करायची आहेत. या स्वप्नांमध्ये काही गैर नाही. मात्र, ही स्वप्ने पूर्ण करताना आपण काय गमावत आहोत, आपल्या माणसांपासून किती दूर जात आहोत आणि आपल्या भूतकाळाशी जोडलेली नाती किती सहजपणे विसरत आहोत, हा महत्त्वाचा प्रश्न चित्रपट प्रेक्षकांसमोर उभा करतो.
चित्रपटाचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे तो विकास आणि परंपरा, पैसा आणि माणुसकी, वैयक्तिक स्वार्थ आणि सामूहिक अस्तित्व यांच्यातील संघर्षाला केवळ काळ्या-पांढऱ्या रंगात दाखवत नाही. प्रत्येक पात्राच्या भूमिकेमागील मानसिकता समजून घेण्याचा प्रयत्न करतो. ही कथा, मुंबईतील 'विश्राम सोसायटी' च्या जुन्या निवासी इमारतीची. या इमारतीमध्ये अनेक वर्षांपासून विविध कुटुंबे एकत्र राहत आहेत. या इमारतीच्या भिंतींमध्ये केवळ सिमेंट-विटांचे अस्तित्व नाही, तर अनेक वर्षांच्या आठवणी, सुख-दुःखाचे प्रसंग, शेजारधर्म, आपुलकी आणि परस्परांशी जोडलेली माणसं आहेत. लहान मोठ्या सोसायट्यांमधे हे द्रुश्य कायम असतं, म्हणून हा चित्रपट आपल्याला भिडतो.
अशा या सोसायटीच्या पुनर्विकासासाठी एक बांधकाम व्यावसायिक पुढे येतो. तो रहिवाशांना आकर्षक, आर्थिक मोबदला आणि आधुनिक सुखसोयींनी युक्त नवीन सदनिकांचे आश्वासन देतो. जुन्या इमारतीच्या तुलनेत प्रशस्त घरे, आधुनिक सुविधा आणि आर्थिक फायदा या गोष्टी रहिवाशांना आकर्षित करू लागतात. बहुसंख्य रहिवाशांना हा प्रस्ताव स्वीकारण्यात काहीच गैर वाटत नाही. त्यांच्या दृष्टीने हा एक चांगला व्यवहार आहे. मात्र, याच वेळी एक व्यक्ती या निर्णयाला विरोध करते. ही व्यक्ती म्हणजे निवृत्त शिक्षक योगेश मुर्ती, अर्थात 'मास्तरजी'. व्यवस्थेला भिडणारी माणसं मास्तराच्या माध्यमातून आपल्या आजुबाजूला दिसत असतात, सिनेमातही हे मुख्य पात्र आहे.
मास्तरजींना आपले घर सोडायचं नाही. त्यांच्या घरात त्यांच्या दिवंगत पत्नीच्या आठवणी आहेत. त्या घराशी त्यांचे भावनिक नाते आहे. त्यांच्यासाठी घर म्हणजे केवळ मालमत्ता नाही, तर आयुष्यभर जगलेल्या क्षणांचा साठा आहे. त्यामुळे ते पुनर्विकासाच्या प्रस्तावाला नकार देतात, विरोध करतात. सुरुवातीला त्यांच्या भूमिकेकडे इतर रहिवासी सहानुभूतीने पाहतात. परंतु जसजसा पुनर्विकासाचा विषय पुढे सरकतो, तसतसे त्यांचे सहानुभूतीचे रूपांतर नाराजी मध्ये होते. कारण एका व्यक्तीच्या विरोधामुळे सर्वांच्या आर्थिक फायद्याचा मार्ग अडतो आहे, अशी भावना त्यांच्या मनात निर्माण होते. आणि इथूनच सुरू होतो माणसांच्या स्वभावाचा खरा संघर्ष. ज्यांच्यासोबत अनेक वर्षे चहा-पाणी घेतले, सुख-दुःख आणि सण-उत्सव साजरे केले, तीच माणसे आता मास्तरजींच्या विरोधात उभी राहतात.
एकेकाळी आपलेपणाने वागणारे शेजारी अचानक परके होतात. मैत्रीच्या जागी संशय येतो. संवादाच्या जागी आरोप-प्रत्यारोप सुरू होतात. सामूहिक जीवनाची वीण हळूहळू उसवू लागते. चित्रपटाच्या कथानकातील ही प्रक्रिया अत्यंत प्रभावी आहे. कारण इथे संघर्ष केवळ एका घराचा नाही, तर माणसांच्या बदललेल्या मूल्यव्यवस्थेचा आहे. चित्रपटाचा आत्मा म्हणजे मनोज बाजपेयी यांनी साकारलेले मास्तरजी हे पात्र. मास्तरजी हे निवृत्त शिक्षक आहेत. त्यांच्या आयुष्याला एक शिस्त आहे, विचारांची बैठक आहे आणि जगण्याबद्दल काही ठाम मूल्ये आहेत.
पत्नीच्या निधनानंतर त्यांचे जग अधिकच मर्यादित झालेले आहे. त्यांचा मुलगा स्वतःच्या आयुष्यात व्यस्त आहे. अशा परिस्थितीत जुनी इमारत आणि त्यातील आठवणी हाच त्यांच्या जगण्याचा आधार बनलेल्या आहेत. त्यांच्यासाठी पुनर्विकासाला विरोध करणे म्हणजे केवळ आर्थिक व्यवहाराला विरोध करणे नाही. तर स्वतःच्या अस्तित्वाशी जोडलेल्या गोष्टींचे संरक्षण करणे आहे. मनोज बाजपेयी यांनी या पात्रातील एकाकीपणा, असहायता, आत्मसन्मान आणि तत्त्वनिष्ठता अत्यंत संयत पद्धतीने साकारला आहे. त्यांच्या अभिनयाचे वैशिष्ट्य म्हणजे ते कुठेही अनावश्यक भावनिक उद्रेक करत नाहीत. चेहऱ्यावरील सूक्ष्म बदल, नजरेतील अस्वस्थता, संवादातील थांबे आणि देहबोली यांमधून ते मास्तरजींच्या मनातील संघर्ष व्यक्त करतात. विशेष म्हणजे मास्तरजींच्या भूमिकेत एक प्रकारचा विरोधाभासही आहे. ते योग्य गोष्टीसाठी उभे आहेत का ? की ते केवळ बदल स्वीकारण्यास तयार नाहीत ? हा प्रश्न चित्रपट प्रेक्षकांच्या मनात निर्माण करतो. त्याच्या मुलाच्या तोंडी एक वाक्य आहे, ' दुनिया के नजरो में आप एक पुरानी दीवार है, जो गिरने से इनकार करती है'
प्रत्येक बदल वाईट असतोच असे नाही आणि प्रत्येक जुनी गोष्ट जपलीच पाहिजे असेही नाही. मात्र, बदलाच्या प्रक्रियेत माणसाच्या भावनांना आणि इच्छांना काहीच महत्त्व उरत नसेल, तर त्या विकासाला नैतिक अधिष्ठान काय राहते ? मास्तरजींचे पात्र या प्रश्नाचे प्रतिनिधित्व करते. मनोज बाजपेयी यांचा अभिनय चित्रपटाला भावनिक खोली प्राप्त करून देतो, या पात्राबरोबर दिव्या दत्ता यांनी साकारलेली संगीता पुरी ही व्यक्तिरेखा विशेष लक्षवेधी आहे. दिव्या दत्ता यांनी या भूमिकेला अत्यंत प्रभावी न्याय दिला आहे.
संगीता, ही मास्तरजींच्या विरोधात उभी राहणारी प्रमुख व्यक्तिरेखा आहे. मात्र, तिच्या भूमिकेकडे केवळ स्वार्थी स्त्री म्हणून पाहणे अन्यायकारक ठरेल. तिच्या आयुष्यातही अनेक अडचणी आहेत. विशेष गरजा असलेल्या मुलाच्या भवितव्याची चिंता तिच्या मनात आहे. स्वतःच्या आयुष्यातील अपूर्णता आणि मर्यादा तिला जाणवत आहेत. त्यामुळे पुनर्विकासाच्या माध्यमातून मिळणारी आर्थिक सुरक्षितता आणि चांगल्या जीवनाची शक्यता तिला आकर्षित करते. तिच्या दृष्टीने मास्तरजींचा विरोध हा तिच्या आणि तिच्या मुलाच्या उज्ज्वल भविष्याच्या आड येणारा मुख्य अडथळा आहे.
संगीता आणि मास्तरजी यांच्यातील संघर्ष हा चित्रपटातील सर्वांत महत्त्वाचा भावनिक संघर्ष आहे. दिव्या दत्ता यांनी संगीता या पात्रातील अस्वस्थता, महत्त्वाकांक्षा, चिडचिड, असुरक्षितता आणि भावनिक गुंतागुंत उत्तमरीत्या व्यक्त केली आहे. त्यांचे पात्र प्रेक्षकांना एकाच वेळी समजतेही आणि अस्वस्थही करते. यातून चित्रपटाची व्यक्तिरेखनातील परिपक्वता दिसून येते.
बोमन इराणी यांनी साकारलेला बांधकाम व्यावसायिक धर्मेन शाह हा चित्रपटातील आणखी एक महत्त्वाचा घटक आहे. धर्मेन शाहचे व्यक्तिमत्त्व आधुनिक शहरी विकासाच्या मानसिकतेचे प्रतिनिधित्व करते. त्याच्यासाठी जमीन, इमारत आणि मालमत्ता यांना आर्थिक मूल्य आहे. त्याच्या व्यवहारात भावनिक नात्यांना फारसे स्थान नाही. त्याचे उद्दिष्ट स्पष्ट आहे. प्रकल्प पूर्ण करायचा, व्यवहार साधायचा आणि त्यातून आर्थिक फायदा मिळवायचा आहे. बोमन इराणी यांनी या भूमिकेत आवश्यक तो धूर्तपणा आणि व्यावसायिक आत्मविश्वास दाखवला आहे. चित्रपटाची जमेची बाजू अशी की बांधकाम व्यावसायिकाच्या व्यक्तिरेखेला केवळ खलनायकाच्या चौकटीत बंदिस्त केलेले नाही. त्याच्या व्यावसायिक महत्त्वाकांक्षेमागील व्यवहाराची मानसिकता चित्रपट दाखवतो. तरीही या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून एक प्रश्न प्रकर्षाने समोर येतो. आजच्या शहरी विकासात सामान्य माणसाचे स्थान नेमके काय आहे ?
मास्तरजींचा संघर्ष हा या अर्थाने एका वास्तूच्या संरक्षणापेक्षा आपल्या अस्तित्वाच्या, आठवणींच्या खुणा जपण्याचा संघर्ष आहे. मात्र, त्याच वेळी चित्रपट आपल्याला दुसरी बाजूही दाखवतो. जुन्या इमारतींमध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्या आठवणींशी तितकेच भावनिक नाते असेल असे नाही. काहींना नव्या घराची गरज आहे. काहींना आर्थिक सुरक्षितता हवी आहे. काहींना मुलांचे भविष्य महत्त्वाचे वाटते. त्यामुळे चित्रपटाचा विचार अधिक व्यापक बनतो.
आधुनिक इमारतींमध्ये प्रशस्त घरे आहेत, सुरक्षा व्यवस्था आहे, क्लब हाऊस आहे, स्विमिंग पूल आहे; पण शेजाऱ्यांच्या आयुष्यात काय घडते, याची माहिती अनेकांना नसते. पूर्वी घराचे दार उघडे असायचे. आता अनेकदा माणसांचे मन बंद झालेले दिसते. पूर्वी शेजाऱ्याच्या घरातील दुःख आपले वाटायचे. आज शेजारी कोण आहे, हेही माहीत नसते. 'लास्ट मॅन इन टॉवर' या बदलत्या वास्तवाचे अत्यंत संवेदनशील चित्रण करतो.
दिग्दर्शक बेन रेखी यांनी चित्रपटाला अतिनाट्यमय स्वरूप देण्याऐवजी वास्तववादी मांडणी करण्यावर भर दिला आहे. चित्रपटातील घटना एखाद्या महान सामाजिक क्रांतीसारख्या घडत नाहीत. त्या अत्यंत सामान्य स्वरूपाच्या आहेत. लोक एकत्र बसतात, चर्चा करतात, मतभेद व्यक्त करतात, आर्थिक गणिते मांडतात आणि स्वतःच्या फायद्याचा विचार करतात. मात्र, याच छोट्या घटनांमधून मोठा संघर्ष निर्माण होतो. काही घटना, काही गोष्टी, उपकथांसह फार वेगाने नाही पण, हळुहळु पुढे सरकत राहतात. कथाकार सूनी तारापोरवाला यांनी अरविंद अडिगा यांच्या कादंबरीतील मध्यवर्ती संघर्ष चित्रपटाच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडला आहे.
चित्रपटातील छायाचित्रण हा आणखी एक उल्लेखनीय भाग आहे. जुन्या इमारतीतील अरुंद जागा, सामायिक परिसर, जिने, गॅलरी, घरांमधील साधेपणा आणि रहिवाशांच्या दैनंदिन जीवनातील तपशील यांचा वापर वातावरणनिर्मितीसाठी करण्यात आला आहे. विशेष म्हणजे जुन्या इमारतीतील बारकावे आणि आधुनिक आलिशान इमारतींची निर्जीव भव्यता यांच्यातील विरोधाभास प्रभावीपणे जाणवतो. एका बाजूला जुन्या इमारतीतील माणसांचे एकमेकांशी असलेले संबंध, तर दुसऱ्या बाजूला नव्या इमारतीतील आधुनिक सुविधा. या दृश्यात्मक विरोधाभासातून चित्रपटाचा मध्यवर्ती विचार अधिक स्पष्ट होतो. संगीत आणि पार्श्वसंगीतही कथानकाच्या भावनिक प्रवाहाला पूरक ठरते. अनावश्यक गाणी किंवा नाट्यमय संगीताचा अतिरेक न करता चित्रपटाची गंभीरता टिकवण्याचा प्रयत्न दिसतो.
चित्रपटाचा शेवटही प्रेक्षकांना अस्वस्थ करणारा आहे. कारण तो केवळ एखाद्या व्यक्तीच्या विजय किंवा पराभवाची गोष्ट सांगत नाही, तर माणसांच्या वर्तनाचे परिणाम समोर आणतो. आपण ज्यांच्यासोबत वर्षानुवर्षे राहतो, त्यांच्याशी असलेले संबंध किती नाजूक असतात, याची जाणीव करून देतो. पैशासाठी, नव्या घरासाठी किंवा चांगल्या भविष्याच्या आशेने आपण किती सहजपणे आपली माणसे गमावू शकतो, याचे वास्तववादी चित्रण करतो.
मनोज बाजपेयी यांचा संयत आणि प्रभावी अभिनय, दिव्या दत्ता यांची भावनिक गुंतागुंत, बोमन इराणी यांची व्यावसायिक वृत्ती दर्शवणारी व्यक्तिरेखा आणि बेन रेखी यांचे वास्तववादी दिग्दर्शन या सगळ्यांमुळे चित्रपट लक्षात राहतो. या चित्रपटातून एक महत्त्वाचा विचार समोर येतो. घर मोठे झाले म्हणजे आयुष्य मोठे होतेच असे नाही. इमारती उंच झाल्या म्हणजे माणसांची मनेही उंचावतात असे नाही. आधुनिक सुविधा वाढल्या म्हणजे माणसांमधील आपुलकी वाढतेच असे नाही.
आशयघन कथानक, दमदार अभिनय, सामाजिक वास्तवाचे चित्रण आणि मानवी नात्यांचा सूक्ष्म वेध यांमुळे 'लास्ट मॅन इन टॉवर' हा विचार करायला लावणारा चित्रपट ठरतो, काही ठिकाणी अधिक धारदार मांडणीची गरज जाणवली, कथेत वेग पाहिजे, असे असले तरी त्याचा मूलभूत आशय मात्र प्रभावी आहे. चित्रपट आवडला म्हणून हा प्रपंच.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
मिसळपाव
प्रतिक्रिया