✪ धावत पळत गाठलेली वायवा परीक्षा
✪ रिसर्चची पूर्तता!
✪ सबमिशन पर्व समाप्त
✪ हिंदुस्तान झिंकचा कँपस इंटरव्ह्यू
✪ न झालेला निरोप समारंभ
✪ खर्या अर्थाने एकत्र असलेलं कुटुंब
✪ वियोगाचे दिवस जवळ येत चालले
कर्वे इन्स्टिट्युटमध्ये मास्टर इन सोशल वर्क करतानाचा शेवटचा टपा! २००८ चा मार्च महिना आणि परीक्षा व सबमिशन्सचा हंगाम! रखडलेल्या सगळ्या सबमिशन्स हळु हळु पूर्ण होत गेल्या. शेवटचे काही महिने सगळ्याच गोष्टी एकदम आल्यामुळे थोडी गुणवत्ता कमी झाली होती. १५ फेब्रुवारी हा नियत दिवस असलेला प्रबंध पूर्ण करायला एप्रिल उजाडला. अनेक रात्र जागून जागून केलेलं काम! स्वत: लॅपटॉपवर टाईप करून पूर्ण केलेलं लेखन. रूलिंग पेपरवर लिहीलेले फिल्ड वर्कचे रिपोर्टस आणि इतर असाईनमेंटस! आणि रात्री बेरात्री हे करत असताना सोबत करणारी एफएम रेडिओवरची गाणी किंवा कोणाच्या मोबाईल/ आयपॉडमध्ये असलेली गाणी.
सगळ्या कामांमध्ये फॅकल्टीज शक्यतो विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त मेहनत करायला लावायच्या. विद्यार्थ्याची क्षमता व तयारी असेल तितकं पुढे जायला सांगायच्या. पण कधी कधी विद्यार्थी करू शकायचे नाहीत. तेव्हा मग फॅकल्टीज विद्यार्थ्यांना जमतं तितकं करू द्यायच्या व सोडायच्या. परीक्षाही अशाच धामधुमीत आल्या. पण कर्वेतल्या परीक्षांचं कधी दडपण आलं नाही. लेजिस्लेशनसारखे विषय किचकट होते, पण परीक्षेत माहितीपेक्षा अंडरस्टँडिंग बघितलं जायचं. त्यामुळे उत्तरं लिहीता यायची. आणि फिल्ड वर्कच्या असेसमेंटमध्येही काही वाटलं नाही. जे केलं ते सांगायचं होतं आणि तिथेही स्वत:ची समज- इनसाईट आणि दृष्टी मांडायची होती. त्यामुळे तेही सोपं गेलं. फिल्ड वर्कच्या वायवाला मात्र एक अनपेक्षित अडचण उद्भवली होती!
ह्या लेखाचा व्हिडिओ सारांश इथे बघता येईल. (ब्लॉगवर सगळे लेख एकत्र वाचता येतील.
विज्ञान प्रयोग, गणितातील गमती, ट्रेकिंग, ध्यान, सायकलिंग, फिटनेसबद्दलचे लेख वाचता येतील.)
ज्या दिवशी वायवा परीक्षा होती, त्याच दिवशी माझ्या फिल्ड वर्क एजन्सीच्या एका गावामध्ये निर्मल ग्राम संदर्भात एक इन्स्पेक्शन होतं. आणि तिथे त्या इन्स्पेक्शनमध्ये गावांची माहिती देण्यासाठी मी असायलाच हवं, असं माझे तिथले सर म्हणाले. ते गाव कसं निर्मल झालं, सद्यस्थिती काय आहे, लोक सहभाग कसा आहे असा त्या इन्स्पेक्शनचा विषय होता. त्यामुळे मला तिथे थांबणं भाग झालं. एकदा तिथल्या चर्चेत माझा रोल संपला की, देहूजवळून तुला तातडीने कर्वेनगरला नेण्याची सोय करतो, असं ते सर म्हणाले. आणि W पासून आडनाव असल्यामुळे वायवामध्ये माझा क्रमांक शेवटून दुसरा होता. तो मी त्या शेवटच्या क्रमांकावरच्या मित्राला- कैलास यसगेला- व फॅकल्टीजला सांगून माझं स्थान बदलून घेतलं. नंतर तिकडची इन्स्पेक्शनची भेट छान झाली. ती झाल्याबरोबर देहूवरून मोटरसायकलवर एका सरांनी हायवेने वारजेला सोडलं आणि तिथून कर्वेनगर! माझा शेवटच्या क्रमांकाचा मित्र- कैलास- वायवासाठी आत गेला होता. मी अगदी वेळेत पोहचलो. अशी गंमत! वायवा छान झाली. आणि मग यथावकाश परीक्षा पर्व संपलं! सबमिशन पर्व संपलं.
५ एप्रिल २००८! आमचा निरोप समारंभ होता. नुकताच माझा प्रबंध सादर झाला होता. त्यावेळी कर्वे इन्स्टिट्युट कुटुंबामध्ये पेल्यातलं एक वादळ आलं. काही विद्यार्थी आणि एक फॅकल्टी ह्यांना वाटत होतं की, काही विद्यार्थ्यांवर अन्याय केला जात आहे. आणि ही भावना इतकी तीव्र होती की, निषेध म्हणून एक आंदोलन करायचं ठरलं. आणि त्याचा भाग म्हणून निरोप समारंभावर बहिष्कार- वॉक आउट करायचं ठरलं. आणि अनेक विद्यार्थी व एक फॅकल्टीला ह्या निषेध कृतीचा "फेस" मी व्हावा असं वाटत होतं. मी ह्यासाठी की, माझं सबमिशन व इतर ठीक असूनही मला हा विषय जाणवला हे सांगायला. हो, नाही करता मी तयार झालो. तो विषय मलाही पटला होता. कारण त्यातली मुलं माझे जवळचे मित्रच होते. काय करायचं, कसं करायचं हे सगळं ठरलं. निरोप समारंभाचं सूत्र संचालन माझ्याकडे आलं. आणि मी संस्थेमध्ये शिकवण्यात येणारी तत्त्व- समता, समानता, नैसर्गिक न्याय असा उल्लेख करून विद्यार्थ्यांवर होणार्या अन्यायाचा निषेध म्हणून आम्ही वॉक आउट करतो अशी घोषणा केली! आणि मग काही दिवस कुटुंबात एक वादळ येऊन थडकलं!
निरोप समारंभ झालाच नाही! पण मग आणलेल्या रिफ्रेशमेंटसचं काय! त्यासाठी मैत्रिणींनी पुढाकार घेतला व संस्थेतल्या मुलांना खाद्य पदार्थ दिले. सगळे थोडे हादरले होते. आणि माझं नाव अचानक प्रसिद्ध झालं! पुढे सगळ्या विद्यार्थ्यांच्या तक्रारींची नंतर नोंद घेतली गेली. सगळ्यांना त्यांना झालेल्या त्रासाची माहिती देण्याची संधी दिली गेली. नंतर त्यासाठी एक ओपन हाऊस चर्चा झाली. त्यात अनेकांनी आपल्या तक्रारी मांडल्या. सगळे फॅकल्टीज- डायरेक्टर सर हेही तिथे होते. त्यावेळी मी सगळ्यांचे मुद्दे नोंदवण्याचं- डॉक्युमेंटेशनचं काम केलं. त्याची डॉक्युमेंट बनवली. माझ्या डॉक्युमेंटशनची ती पहिली असाईनमेंटच ठरली.
खर्या अर्थाने एकत्र कुटुंब
काही फॅकल्टीजचा विद्यार्थ्यांच्या अडचणींबद्दल सहानुभूती होती, पण मग हे आंदोलन अगदीच चुकीच्या मार्गाने झालं असं त्यांना वाटलं. ते समावेशक नव्हतं, कारण मुली कुठेच नव्हत्या. शिवाय लोकशाही पद्धतही नव्हती. माझ्या काही फ्रेंडसना वाटत होतं की, मला तिथे वापरलं जातंय. जे मला वाटत नव्हतं. मला मुद्दा रास्त वाटत होता म्हणूनच मी तयार झालो होतो. पुढे सगळ्या तक्रारींवर अनेक प्रकारे सुनावणी झाली. एका कुटुंबात कोणाला त्रास होत असेल किंवा अन्याय होत असेल तर अशा वेळेस कुटुंब प्रमुख जे करतात ते सिनियर फॅकल्टीजनी केलं. सगळ्यांची बाजू ऐकून घेतली. फॅकल्टीजचीसुद्धा बाजू होती. त्यांनीही आत्मपरीक्षण केलं. काही गोष्टी त्यानंतर हळु हळु बदलल्या. फिल्ड वर्क सुपरव्हिजनसारख्या गोष्टींमध्ये सुधारणा झाल्या.
आज इतक्या वर्षानंतर त्रयस्थपणे हे बघताना जाणवतं की, निश्चित काही गोष्टी चुकीच्या घडल्या असाव्यात. काही विद्यार्थ्यांवर अन्याय झाला असू शकेल किंवा चुकीची वागणूक कळत- नकळत दिली गेली असेल. पण नंतर हेसुद्धा जाणवतं की, काही विद्यार्थी असेही होते ज्यांना मेहनतीचा कंटाळा होता. ज्यांना सुटका हवी होती. किंवा अभ्यासात- प्रेझेंटेशनमध्ये सुधारणेसाठी त्यांच्यासोबत घेतलेले परिश्रम त्यांना जाचक वाटत होते. अशी मानसिकता असलेले विद्यार्थीही त्यात होते. असो.
अतिशय मोठी गोष्ट म्हणजे हे होऊनही पुढे कधीही कटुता जाणवली नाही. मी तर निषेधाचा "फेस" असूनही मला कोणत्याही फॅकल्टीने कधीच कटुतेने वागवलं नाही. उलट त्यानंतर लगेचच एका अभ्यास दौर्यामध्ये फॅकल्टीज सोबत होत्या. तेव्हाही काहीही कटुता जाणवली नाही. आणि जे लोक सच्चे असतात- ते नेहमीच आत्म परीक्षणासाठी आणि सुधारणेसाठी तयार असतात, हेच त्यातून दिसलं. आणि एका अर्थाने सच्चे लोक अजून उजळूनच निघाले. असो.
कॉलेज संपत आलं! कँपस इंटरव्ह्यूजचे वारे वाहायला लागले. एक कँपस इंटरव्ह्यूसुद्धा काहीसा चर्चेचा विषय ठरला. एका एजन्सीने फक्त थोड्या जणांचेच इंटरव्ह्यू घेतले. दुसरा राउंड नंतर घेऊ असं सांगितलं, पण पहिल्या राउंडमध्येच दोन मुलींना निवडलं. इतर मुलं त्यामुळे थोडे नाराज झाले होते. ह्या सुमारास हिंदुस्तान झिंक ही कंपनीसुद्धा आली. त्यांनीही कँपस इंटरव्ह्यूज घेतले. त्यांची पोजिशन HR साठी असल्यामुळे खरं तर लेबर वेलफेअर स्पेशलायजेशनसाठी इंटरव्ह्यूज होते. पण इतरही विद्यार्थी देऊ शकत होते. म्हणून मीसुद्धा दिला. निवड होईल अशी अपेक्षा नव्हती. हळु हळु कॉलेजच्या गोष्टी संपत चालल्या आणि जीवलगांच्या वियोगाचे दिवस जवळ आले!
पुढचा भाग: कर्वेतले दिवस १३: शेवटचा अभ्यास दौरा आणि "पेरले" गांव
-निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 2 नोव्हेंबर 2026.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
मिसळपाव
प्रतिक्रिया