Skip to main content

गोष्टी योगायोगाच्या

गोष्टी योगायोगाच्या

Published on 07/09/2009 - 18:06 प्रकाशित मुखपृष्ठ
रत्नागिरीच्या दौऱ्याविषयी गेल्या वेळी लिहिलं होतं. याच प्रवासात आणखी एक गंमत घडली. "मोकळे' होण्यासाठी आम्ही मलकापूरच्या पुढे एका ठिकाणी सहज थांबलो. शेजारीच एक छोटा ओहोळ आणि त्यावर पूल होता. पलीकडे एक छोटीशी टपरी होती. अचानक हर्षदाला आठवलं, "अरे, रत्नागिरीच्या पहिल्या दौऱ्याच्या वेळी आपली एसटी इथेच बंद पडली होती!' मीदेखील आसपास पाहिलं आणि ओळखीच्या खुणा पटल्या. तीच छोटी टपरी, तोच सुनसान रस्ता आणि तेच वळण. लग्नानंतर पहिल्यांदा रत्नागिरीला गेलो, तेव्हाच्या प्रवासात आमची रात्रराणी बंद पडली होती तिथे. पहाटे चारचा सुमार असेल. अंधुकसं फटफटलं होतं. गाडी काही लवकर दुरुस्त होणार नव्हती. मग आम्ही आसपासच्या परिसरात टाइमपाससाठी हिंडत होतो. त्यातच एक आंब्याचं झाड मिळालं. भरपूर कैऱ्या लागल्या होत्या. दगडांना तोटा नव्हताच. वेळही घालवायचा होता. मग कैऱ्या पाडत बसलो. तसल्या आंबटचिंबट कैऱ्या खाल्ल्याही. (लग्न झालं असलं, तरी आंबट-चिंबट खावं लागण्याची वेळ तोपर्यंत आली नव्हती. कृपया गैरसमज नको!) नशीबावर फारसा विश्‍वास नाही आपला, पण योगायोगावर मात्र भयंकर आहे! योग असेल, तर कुठलाही माणूस कुठेही भेटू शकतो, असे अनेक अनुभव आलेत. प्रवासात त्याच ठिकाणी थांबण्याचा योग हा त्यातलाच एक. पूर्वी एकदा मुंबईला काही कामानिमित्त गेलो होतो. संध्याकाळी लगेच परतणार असल्यानं मामा किंवा आत्या कुणाच्या घरी गेलो नव्हतो, वा फोनही केला नव्हता. बोरिवली स्टेशनवर उतरलो आणि जिना चढताना नेमकी मामेबहीण पुढ्यात! भरपूर शिव्या खाव्या लागल्या मग. आई-वडिलांना सांगण्याची धमकीही दिली. मला जाणं शक्‍य नव्हतं, म्हणून कुणाला कळवलं नव्हतं. पण ही दत्त म्हणून हजर! मुंबईच्या एवढ्या तुफान गर्दीत, कुणाकडे बघायला कुणाला वेळही नसताना ती समोर अचानक भेटण्याचं प्रचंड आश्‍चर्य वाटलं होतं. लग्नासाठी आधी नकार देऊन, सहा महिन्यांनी पुन्हा तिच्यातच "आयुष्याचं सार्थक' शोधून तिला सहधर्मचारिणी बनविली, हा "योग' म्हणावा, की "भोग' याबाबत मात्र मी अजून संभ्रमात आहे!
लेखनप्रकार

याद्या 2257
प्रतिक्रिया 7

>>>हा "योग' म्हणावा, की "भोग' याबाबत मात्र मी अजून संभ्रमात आहे! नाडी बघा. खुलासा होईल :) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

In reply to by अवलिया

नाडी पेक्षा कुंडली मांडणे सोपे ;) * योगायोगाला जिवनामध्ये असाधारण महत्व असते असे माझे मत आहे !

In reply to by दशानन

अगदी बरोबर...पण कित्येक योगायोगाच्या गोष्टींमधे कूंडली पाहिली असो वा नसो, कधी ना कधी नाडीचा संबंध येतोच... ;) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

In reply to by अवलिया

नाडी पेक्षा कुंडली मांडणे सोपे ;) * योगायोगाला जिवनामध्ये असाधारण महत्व असते असे माझे मत आहे !

आपण आधी रत्नागिरी विषयी लिहिल्यानंतर आपल्याला हा किस्सा आठवणे...आणी आपण तो लिहिणे...हा पण योगायोग का??? अवांतर : किस्सा आवडला....बर्‍याच वेळा मला पण असा अनुभव आला आहे...

एखादा योगायोग आश्चर्यकारक आनंद वा दु:ख देतो. योगायोग हा संभवनियतेचा अविष्कार आहे.संभवनीयतेचे कितीतरी अनुभव तुमच्या दैनंदिन जीवनात येत असतात. उदा. तुम्ही एखाद्याची आठवण काढायला आणि ती व्यक्ती तुम्हाला भेटायला किंवा फोन यायला, तुम्ही एखादे गाणे गुणगुणायला आणि नेमके तेच गाणे रेडिओवर लागायला. एखाद्या घटनेची भीती व्यक्त करायला व ती घटना घडायला एकच वेळ येते. पण हीच संभवनीयता जर ज्योतिषाकडून व्यक्त झाली आणि त्याप्रमाणे घटना घडली तर मात्र ते प्रत्यंतर वा प्रचिती. या संभवनियतेविषयी दीड हजार वर्षांपूर्वी भट्ट नारायण लिखित 'वेणीसंहार` नाटकात दुर्योधनाच्या तोंडी एक वाक्य घातले आहे. ते म्हणजे- ग्रहाणां चरितं स्वप्नो निमित्तान्युपयाचितम् । फलन्ति काकतालीयं तेभ्य: प्राज्ञा न बिभ्यति ।। अर्थ :- ग्रहांच्या गती, स्वप्न, शकुन, नवस हे काकतालीय न्यायाने फळतात. शहाणे लोक त्यांना घाबरत नाहीत. [संदर्भ ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी...] प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

बघा काय योगायोग आहे. मी आपलाच विचार करत होतो. प्रवास तपपूर्तीचा नंतर काही लेख कसा आला नाही अजून असा विचार करत होतो तर हा लेख लगेच हजर! ----------------------------------- काय! तुमच्या घरी कॉटवरील गादीखाली, दुकानांत मिळणार्‍या प्लॅश्टीकच्या पिशव्या ठेवत नाही? नक्कीच! तुम्ही अतीउच्च वर्गीय आहात. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या