मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शोध स्वरालयीचा, शोध गंधाराचा!

विसोबा खेचर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
राम राम मंडळी, आपल्याला एखादं गाणं का आवडतं? दोन ढोबळ उत्तरं - १) त्याचे शब्द आपल्याला आवडतात, २) त्याचं संगीत, त्याची चाल आपल्याला आवडते. आता चाल आवडते म्हणजे काय? तर त्यातील लय, स्वरावली, किंवा एखादा स्वर आपल्याला आवडून जातो. या लेखात वानगीदाखल म्हणून आपण शुद्ध गंधाराचा सुंदर उपयोग केलेलं एक गाणं पाहू. कसा आहे हो हा शुद्ध गंधार? शुद्ध गंधार हा मला नेहमीच अत्यंत तेजस्वी स्वर वाटत आलेला आहे. एखाद्या मिट्ट अंधार असलेल्या रस्त्यावर वीज चमकावी आणि क्षणात संपूर्ण रस्ता प्रकाशमान व्हावा तसा आहे शुद्ध गंधार. अत्यंत तेजस्वी, स्वभावाने चौकस परंतु तेवढाच हळवा देखील! उत्तम मिळालेल्या तानपुर्‍यातून आपल्याला अत्यंत विशुद्ध, जवारीदार स्वरुपाचा शुद्ध गंधार जेव्हा ऐकू येतो तेव्हा मन अगदी प्रसन्न होतं. मदनमोहन साहेबांचं 'बैय्या ना धरो' हे गाणं आपण सर्वांनी ऐकलं आहे. त्यातल्या 'ना करो मोसे रार' या ओळीतील 'रार' या शब्दावरचा शुद्ध गंधार किती सुंदर आहे पाहा. माझ्या मते त्यामुळे गाण्याची दिशाच एकदम बदलते. आधीच्या नुसत्या 'बैय्या ना धरो' या शब्दांतील कोमल धैवताचं काहीसं गंभीर वातावरण थोडं हलकं होतं. पुढे अंतर्‍यात हाच शुद्ध गंधार अजून मौज आणतो.. ढलेगी चुनरिया तनसे, हसेंगी रे चुडिया छनसे.. या अंतर्‍यातील 'हसेंगी रे चुडिया छनसे' या ओळीतील 'चुडिया' या शब्दावर शुद्ध गंधाराचा जो काही न्यास आहे त्याला तोड नाही. मला वाटतं तो न्यास स्वत: मदनमोहन साहेबांना देखील अतिशय आवडला असावा कारण त्यांनी 'छनसे' या शब्दावर छान दुहाई घेऊन पुन्हा एकवार 'हसेंगी रे चुडिया छनसे' या ओळीतून तो शुद्ध गंधाराचा देखणा न्यास अभिव्यक्त केला आहे. अर्थात, अध्ध्या त्रितालाशी खेळणारी 'छनसे'ची दुहाई आणि नंतरची 'हसेंगी रे चुडिया'ची सम, या दोन्ही गोष्टी लाजवाब. उच्चतम गायकीचा एक नमुना! अर्थात, तुम्हा-आम्हाला अत्यंत अवघड वाटणार्‍या अश्या स्वरालयीच्या हरकती सहज करून जाणं हीच तर मदनमोहन साहेबांची खासियत आणि त्या हरकती, त्या जीवघेण्या जागा लीलया पेलणं हीच तर 'लतादिदी' या नावामागची जादू! आपल्याला आवडलेल्या गाण्यातील एखाद्या स्वराचा, एखाद्या स्वरावलीचा अभ्यास करताना, शोध घेतांना, मागोवा घेतांना खरंच खूप आनंद होतो हेच खरं! स्वरालयीचा शोध! कधीही न संपणारा एक अनमोल ठेवा. मम सुखाची ठेव...! --तात्या अभ्यंकर.

वाचन 13230 प्रतिक्रिया 0