Skip to main content

असलेलं नसलेलं

लेखक सुबक ठेंगणी यांनी सोमवार, 01/06/2009 या दिवशी प्रकाशित केले.
वाचकांसाठी सूचना
प्रस्तुत लेख हा भावनेच्या भरतीच्या काळात लिहिलेला आहे. त्यामुळे त्या भावना वाचकांच्या अंगावर आदळून वाचक भिजण्याची शक्यता आहे. कृपया रेनकोट घालून लेख वाचावा. ;) त्यादिवशी खूप दिवसांनी त्याला फोन केला तर त्याच्या कॉलर टयूनमधून नेहमीसारखाच रेहमान भेटला. युवराज चित्रपटातलं मनमोहिनी हे गाणं!
“लट उलझी सुलझा जा बालम… माथे की बिंदिया बिखर गयी है… अपने हाथ सजा जा बलमा”
अरेच्चा ही चीज ओळखीची असूनही अनोळखी का बरं वाटते आहे? भीमपलासच्या कोमल ग नी ची जादू असावी का? का रेहमानच्या पॉपचा परिणाम आहे? काही कळत नव्हतं. बसमध्ये, शाळेत, जेवताना सारखं मागे कुठेतरी हेच गाणं वाजत होतं. आणि मग एकदम चमकून गेलं! रेहमानने मूळ चीजेतून चक्क एक ऒळच गाळली आहे!
“लट उलझी सुलझा जा बालमा, हाथ में मेरे मेहेंदी लगी है, माथे पे बिंदिया बिखर गयी है, अपने हाथ सजा जा बालमा!”
मग रेहमानच्या सिंथसाईझरच्या सुरांचं बोट धरून ऍलिससारखी थेट माझ्या लहानपणीच्या वंडरलॅंड्ला जाऊन आले. पहिल्यांदा आठवला तो व्यास बाईंचा गाण्याचा क्लास. त्याला गाण्याचा क्लास का म्हणायचं हेच आधी मला कळायचं नाही. कारण ते तर एक छान गाणारं घरच होतं. बाबांबरोबर पहिल्यांदा मी तिथे गेले तेव्हा बाहेर हा चपलांचा खच पडला होता. “बाबा, एवढया लोकांसमोर मी काय गाणार? आपण घरी जाऊयात.” असं मी म्हटल्यावर बाबा म्हणाले होते, “ अगं देवळाबाहेर पण ब-याच चपला असतात. म्हणून काय माणसं देवळात जात नाहीत का?” तेव्हापासून आजपर्यंत मला गाणं म्हटलं, ऐकलं, गुणगुणलं की देवळात आल्याचाच भास होतो. शेवटी हो नाही करत करत आत पाय ठेवला. आजूबाजूला बघण्याची तर हिंमतच होत नव्हती. अलगद जाऊन समोर पाठमो-या बसलेल्या लोकांच्यात गुपचुप मिसळून जावं असं वाटत असतानाच एकदम सगळं शांत झालं. आणि आतापर्यंत दिसणा-या पाठींचे चेहरे होऊन वीसएक डोळे माझ्याकडे बघून लुकलुकायला लागले. तेवढयात लांबून एक आवाज म्हणाला, “ सरगम म्हणून दाखव पाहू!” पेटीच्या सुरात सूर लपवत म्हटलं एकदाचं सरगम. त्याबरोबर तो आवाज बाबांना म्हणाला, “चला आता तुम्ही बाहेर बसा. एका तासाने गाणं संपलं की पुढचं बोलूयात.” अशाप्रकारे फारसं नाट्यमय काहीही न घडता आमच्या गळ्यावर सुरेलपणाचं शिक्कामोर्तब झालं. आणि मग आठवड्यातून दोन दिवस डोक्याबरोबरच गळाही चालता व्हायला लागला. क्लासमधे अगदी नवीन नवीन असताना मी सगळ्यात मागे, कधीही पळून जाता येईल किंवा चपलांच्या ढिगातून चपला लवकर मिळतील अशा मोक्याच्या ठिकाणी बसायचे. पण एक दिवस पहिल्या फळीतल्या काही लोकांच्या अनुपस्थितीमुळे बाईंनीच मला पुढे बसायला बोलावलं. गृहपाठ, परिक्षा, मार्कं, प्रश्न ही भानगड नसल्यामुळे मीही लगेच पुढे गेले. आणि मग एवढे दिवस लांबून बघितलेला व्यासबाईंचा चेहरा एकदम झूम इन केल्यासारखा जवळ आला. आतापर्यंत बाईंच्या आवाजाशी माझी ओळख होती. पण आता त्यांच्या गालावरच्या खळीशी, मधेच लखकन चमकणा-या खड्याच्या चमकीशी, लता मंगेशकरांसारख्या लांब पण पातळ वेणीशी हळूहळू ओळख व्हायला लागली. बाईंच्या डाव्या हाताच्या बोटात सोन्याची अंगठी होती. गाणं शिकवत असताना बाई पेटी तर वाजवतंच पण पेटीच्या भात्यावर अंगठीवाल्या हाताने ताल देत. कुणी बेसूर होत असेल तर पेटीवरचा उजवा हात जोरात चाले आणि बेताल होत असेल तर भात्यावरचा डावा हात जोरजोरात ताल देऊ लागे. आमच्या घरी पेटी आणल्यावर मी बाईंची नक्कल करत तसंच भात्यावर ताल देत एक गाणं वाजवलं तर कुणीतरी म्हणालं, “व्वा! पेटीवर तबला चांगला वाजवतेस तू!” मग एक दिवस बिहागातली ही चीज शिकले. बिहाग शिकले तेव्हा त्यातल्या शुद्ध-ती्व्र मध्यमाच्या लपाछपीतून तयार होणारा तरल, अवखळ शृंगार कळण्याचं माझं वय नव्हतं. आता मात्र त्या सुरेल धुक्यामागे लपलेली प्रेयसीची आर्जवं, तगमग अस्पष्ट दिसते आणि शब्दांचं चित्र होतं.
“लट उलझी सुलझा जा बालमा, हाथ में मेरे मेहेंदी लगी है, माथे पे बिंदिया बिखर गयी है, अपने हाथ सजा जा बालमा!”
सोळा शृंगार करून प्रियकराची वाट पहाणारी कुणी यौवना. पण ज्याच्यासाठी हे सगळं करायचं तो मात्र कुठेतरी दूर. मग तिचे मेंदीने भरलेले हात तिच्या मदतीला येतात. ती मनातच त्याला म्हणत्येय, “ह्या बटा बघ नां कशा गुंतून बसल्यात….आणि त्यातच ही बिंदी पण विस्कटली आहे…पण ह्या मेंदीने माझे हात बांधले आहेत रे… आता तूच ये आणि आपल्या हातांनी नीट करून जा”…एवढंच. ह्या चीजेत शृंगारिक असं काहीच नाही. पण शृंगार मुळी शब्दांत नसतोच. तो असतो मनात. गाण्याच्या दोन ऒळींच्यामधे फक्त आपलाच असा एक गाव असतो. सूर काय किंवा शब्द काय. ते आपले एखाद्या will-o-the-wisp सारखे आपल्याला फक्त त्या आपल्याच गावात घेऊन जातात एवढंच. म्हणूनच षड्जाला स्पर्श न करता अव्यक्तच रहाणारा “लट उलझी” मधला शृंगार मला खूप आवडतो. ही चीज ऐकली की आणखी एक आठवण झाल्याशिवाय रहात नाही. ती म्हणजे मेंदीची. मेंदीचे तयार कोन मिळत नव्हते तेव्हापासून मी मेंदी लावत आलिये. किंबहुना मेंदी प्रत्यक्ष हातांवर लागेपर्यंतच्या सगळ्याच गोष्टी माझ्यासाठी एक सोहळा होत्या. हिरव्या भुरभुरीत मेंदीचा रानटी वास, त्यात चहाचं लालभडक आधण मिसळलं जात असताना हळूहळू गडद होत जाणारा तिचा रंग, मऊशार पोत, निलगिरीचा उग्र वास हे सगळं मला काल केल्यासारखं आठवतंय. मला मेंदी लावायची जरी प्रचंड हौस असली तरी ती लावण्याचं कसब मात्र माझ्याकडे नाही. ब-याचदा पुस्तकात पाहून काढायला घेतलेल्या मेंदीची परिणिती वैतागून मेंदी हातांवर फासण्यात होत असे. मग आमच्या शेजारच्या मारवाडी कुटुंबातल्या बायड्यांना माझी दया येऊन शनिवारी रात्री तिचं काम आटपल्यावर मेंदी लावून देण्याचं आश्वासन देई. मग तो दिवस संपण्याची वाट पहाताना, ती विसरणार तर नाही नां म्हणून तिच्या अवतीभवती घुटमळताना वाटणारी बालसुलभ उत्सुकता, अपेक्षा, आनंद असे अनेक भाव मेंदी म्हटलं की आजही माझ्या मनात दाटून येतात. मेंदी लावताना कोनातून एका तालात झरणा-या, आपसूक एका सुबक आकृतीत पडणा-या ओल्या रेषा पहातंच रहाव्यात असं वाटे. कदाचित माझ्या उनाड स्वभावात नसलेला आखीवरेखीवपणा तात्पुरता का होईना पण मेंदीच्या रेषांतून माझ्या हातात आल्याचं समाधान मला तेव्हा मिळत असावं. माझ्या हातावर मेंदी “पुरे आता” इतकी रंगते. त्यामुळे माझे हात बघून कुणीतरी, “सासरी लाड होणार तुझे” असं थट्टेने म्हणालं होतं. पण मेंदी रंगल्याच्या आनंदापलिकडे दुसरा कसलाच विचार यायला तेव्हा मनात जागाच नव्हती. आईकडून मुद्दाम मागवलेला मेंदीचा कोन इथे कित्तीतरी दिवस फ्रिजमध्ये तसाच पडून आहे. त्यातली मेंदी कोरडी झाली असली तरी मेंदीशी जोडलेल्या आठवणी मात्र अजून ओल्याच आहेत. गुलजारच्याच शब्दांत सांगायचं तर…
“इकबार वक्त से लम्हा गिरा कहीं, वहां दास्तां मिली, लम्हा कही नहीं”
रेहमानने त्याच्या गाण्यातून वगळलेल्या ओळीच्या माझ्यापुरत्या आता आठवणी झाल्या आहेत. मनमोहिनी ऐकताना त्या नसलेल्या ओळीची जागा ह्या आठवणी घेतात आणि गाणं पूर्ण होतं. मूळ बिहागमधली चीज http://www.calaaonline.com/calaatv/Video24.html रेहमानचं मनमोहिनी http://www.youtube.com/watch?v=6q3EexVb1hY
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 11974
प्रतिक्रिया 27

प्रतिक्रिया

सुंदर लेख.. एकदम नॉस्टॅल्जिक!!! खूप आवडला. :) लट उलझी माझी खूप आवडती चीज आहे. आठवण करून दिल्याबद्दल. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

सुंदर लेख.. एकदम नॉस्टॅल्जिक!!! खूप आवडला. असेच म्हणतो ! लट उलझी माझी खूप आवडती चीज आहे. आठवण करून दिल्याबद्दल.
गाण्यातले बारकावे काही कळत नाही, पण 'रेहमानचे...'लट उलझी सुलझा जा बालम' ऐकायला मजा आली ..थँक्स !!! अजून येऊ द्या असेच लेखन ! -दिलीप बिरुटे

मस्त लेख.. मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

सुंदर लेख. तात्यांनी गायलेली ही चीज यू-ट्युबवर बघीतल्याचं आठवतं. हापीसात यू-ट्युबवर बंदी आहे, नाहीतर लिंक देता आली असती. -अनामिक

वा! मस्त सुरेख लेख !! --अवलिया

एका ओळीचे बोट धरुन तिन्ही सप्तके फिरवून आणलीत! (तसं गाण्यातलं शास्त्र काही कळत नाही पण ऐकताना फार्फार बरं वाटतं एवढं नक्की!) (एक छोटी दुरुस्ती - “इकबार वक्त से लम्हा गिरा कहीं, वहां दास्तां मिली, लम्हा कही नहीं” असं आहे. हे गाणं इथे ऐका!) चतुरंग

In reply to by चतुरंग

गाण्याबद्दल आणि चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. लगेच दुरुस्ती करते.

... बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

ह्या वेळी बिपिनदांकडून तीन टिंबं तरी आली...बरं वाटलं... :P

"पण शृंगार मुळी शब्दांत नसतोच. तो असतो मनात. गाण्याच्या दोन ऒळींच्यामधे फक्त आपलाच असा एक गाव असतो.".... "मेंदी लावताना कोनातून एका तालात झरणा-या, आपसूक एका सुबक आकृतीत पडणा-या ओल्या रेषा पहातंच रहाव्यात असं वाटे. ...... माझ्या हातावर मेंदी “पुरे आता” इतकी रंगते. त्यामुळे माझे हात बघून कुणीतरी, “सासरी लाड होणार तुझे” असं थट्टेने म्हणालं होतं. .... आईकडून मुद्दाम मागवलेला मेंदीचा कोन इथे कित्तीतरी दिवस फ्रिजमध्ये तसाच पडून आहे. त्यातली मेंदी कोरडी झाली असली तरी मेंदीशी जोडलेल्या आठवणी मात्र अजून ओल्याच आहेत." 'तालात झरणा-या' शब्दांचं वाचत रहावं इतकं सुंदर लिखाण, लेख फार लवकर संपला असं वाटलं शेवटी. आणि त्या ओघात झालेली तात्यांच्या गाण्याची दृक-श्राव्य पुनर्भेट (आणि तिथून मिळालेले त्यांच्या गाण्यांच्या मैफिलींचे अनेक दुवे) यांनी तर संध्याकाळ सुखद झाली! धन्यवाद!

लेख! सकाळ मस्त प्रसन्न झाली! बिहाग हा राग मुळातच सुरेल, सुरेख आहे. त्यातल्या बालम रे मोरे मनके, कान्हा जा रे, कैसे सुख सोवे अशा सगळ्याच चीजा /ख्याल गोडच आहेत. "लट उलझी" च्या निमित्तानं एक आठवलं. मध्यंतरी विविधभारतीवर संगीतसरिता या कार्यक्रमात शुभा मुद्गल यांनी सांगितलं होतं, की वृंदावन, मथुरा या भागात जी वैष्णव भजनं गायिली जातात, त्यात ही चीज गातात आणि त्यात राधेच्या साजशृंगाराचं वर्णन असणा-या ब-याच अंतरा असतात, जसं इथे मेंदी आणि बिंदियाचा उल्लेख आहे, तसंच कंगन, पायल अशा सगळ्याच अलंकारांची एकेक अंतरा असते. शुभाताईंनी ती पूर्ण गाऊन दाखविली होती. लिंक मिळाली, तर ऐकता येईल. मेंदीच्या आठवणी खास! तुला माहिती आहे, मेंदीला कन्नडमध्ये "मदरंगी"म्हणतात! [मला हे वाचल्यावर असं वाटलं होतं की अजून एक अक्षर जोडून त्याला "मदनरंगी" केलं, तर तो अधिक समर्पक होईल!] इतक्या सुंदर, अप्रतिम लेखाबद्दल धन्यवाद! :) क्रान्ति क्या पता किस मोडपर मिल जायेगा वो? गुमशुदा दिल को दिवाने ढूंढते हैं| अग्निसखा

In reply to by क्रान्ति

मदनरंगी! अहाहा...मेंदीची परंपरा उत्तरेत जन्मली असली तरी तिला इतकं समर्पक नाव दक्षिणेत असावं! मलाही आपण मेंदी "लावणे" म्हणण्यापेक्षा मेंदी "रचाना/सजाना" हेच जास्त आवडतं. पण मेंदीचा सोळा शृंगारात समावेश आहे का? हे कोणी मला सांगेल का?

लेख मस्तच झाला आहे बर्र का! :) बिहाग हा माझाही आवडता राग. एकदा केव्हातरी मिपाच्या संमेलनामध्ये मस्तपैकी बिहागची मैपल जमवू! :) लट उलझी ही बंदिश मीदेखील केव्हा केव्हा गुणगुणतो.. :) आपला, (गाण्याबजावण्यातला) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

तात्या तुम्ही गायलेल्या `लट उलझी' ची लिंक आजच मिळाली. आणि वाटलं बरं झालं लिहिलं. नाहीतर कधीच नसतं कळलं. बिहागची मैफल????....एकदम डन. आपली, (लट सुलझी) सुबक ठेंगणी

खरच खुपच सुरेल आणि सुरेख लेख....अशा ओल्या, हळुवार आठवणीत भिजायला नक्कीच आवडेल. पुलेशु! :)

सुंदर लेखन. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

लेख आवडला, स्वाती

मेंदिच्या आठवणी मनात पिंगा घालायला लागल्या बघ!!

सुंदर लेख. गाण्याच्या दुव्यांबद्दल आभार.

मी नेट वर यु टुब मध्ये हे बिहाग मधील लट उलझे शोधत होतो. पण मला ते मिळाले नाही... पाकिस्तान मधील जुन्या काळातील एक गाणे मिळाले... लट उलझी सुलझा जा रे बालम... पुढचे गाणे पूर्ण वेगळे आहे... पण सुन्दर आहे... बागेश्री मध्ये आहे. टिपिकल शमशाद बेगम स्टाईल.. ओर्कुट वर गजानन कागलकर या माझ्या अकाउन्टमध्ये विडिओ मध्ये ते आहे...