कोयना अभयारण्य
लेखनप्रकार
तसे आम्ही अप्रवासी. पण मुलीच्या अक्षरनंदन शाळेतल्या मैत्रिणी व त्यांचे पालक यांच्यामुळे कोयनानगर अभयारण्यात जायचा बेत ठरला. उत्साही पालकांमध्ये मित्र असल्याने गाड्याबरोबर नळ्याची यात्रा म्हणुन आम्ही समाविष्ट झालो. आम्ही माणसाळलो हे पाहुन त्यांनाही आनंद झाला. इकडची काडी तिकडे करावी लागणार नसल्याने आमचीही ना नव्हती. हं आता वसंतव्याखानमालेतील एका मित्राचे व्याखान नेमके त्याच वेळेला असल्याने त्याचा बळी द्यायचा आम्ही ठरविले.(त्याचा म्हणजे व्याखानाचा मित्राचा नव्हे).
पुण्याहुन नियोजित ट्रॆव्हलर गाडीने आम्ही पाच कुटुंबे सोळानग पहाटे साडेपाच म्हणता म्हणता साडेसहाला निघालो. आमी किन्नर शीट पकडली. पुणे- सातारा रोडने अर्थात राष्ट्रीय महामार्ग क्र ४ ने प्रवास चालु केला.वाटेत शिरवळ जवळ लोकांनी वडापाव खाल्ला. आम्ही मात्र लाडू खाल्ले. पुणे ते सातारा साधारण ११० किमी आहे.तिथपर्यंत तीन टोलनाके आहेत. साता-याच्या पुढे उंब्रज ३२ किमीवर आहे तिथुन पाटण कडे जाणारा रस्ता उजवीकडे फुटतो. वाटेत लगेचच थोडे पुढे चाफळला जाणारा फाटा आहे. तिथुन चाफळ ५ किमी आत आहे. तिथे नदीकिनारी राममंदिर आहे, समर्थरामदासांची ध्यानगुंफा आहे, दासमारुती आहे. तिथे जाताना आम्ही भेट दिली. तेवढेच रामाला दर्शन देउन याव म्हणल. मंदिराचा जीर्णॊद्धार झाला असावा. पुरातन वाटले नाही. गाभा-यात मुलींनी मोबाईल कॆमेरा यांचा दंग्यासह क्लिकक्लिकाट केला. पुजारी रागावले. इथे फोटॊ काढायचे नाहीत. बाहेर तशी सुचनाही लिहिली होती. मीही पुजा-याला बरे वाटावे म्हणुन मुलींना रागावलो " ए फोटो काढला तर देवाचा कोप होतो बर का!" अर्थात यात मुलींना रागावण्यापेक्षा पुजा-याला टोमणा होता. मंदिराचे व्यवस्थापन बिर्ला ट्रस्ट कडे होते. भक्त निवासही तिथे उपलब्ध दिसले. चाफळवरुन आम्ही कोयनानगरच्या दिशेने निघालो. ३३ किमि वर पाटण हे तालुक्याचे गांव. १० किमी थोडे पुढे गेले कि कोयनानगरकडे रस्ता अगदी सरळ जातो. याही रस्त्यावर जिल्हापरिषदेचे एकुण दोन ठिकाणी टोल द्यावे लागतात. कोयनानगरला पोचल्यावर श्रमजीवी संस्थेचे श्री कोळेकर आम्हाला न्यायला आले होते.एव्हाना साडेअकरा वाजले होते. वनखात्याचा परवाना, बोटीची व्यवस्था, निवासाची ब्यवस्था त्यांनी केली होती. एवढ्या उन्हात स्ट्यांडवर काहींनी चहा घेतला तर आम्ही ताक घेतले. कोयनाधरणालगतच्या एका ठिकाणाहुन आम्ही अवसरी नावाच्या एका गावाजवळ धरणातुन बोटीने जाणार होतो. गाडी धरणाजवळ सशुल्क गाडीतळावर पार्क केली.बोटीने एक तास अंतरावर कोयना अभयारण्याच्या विश्रांतीगृहाच्या शेजारीच "श्रमजीवी" संस्थेचे निवासी पाहुणालय आहे. अवसरी गाव प्रत्यक्ष तेथुन एक तास पाउल वाटेने आत आहे. अवसरी व तत्सम बावीस गावात श्रमजीवी संस्थेचे स्वावलंबी प्रकल्प चालतो. बचतगट, महिलाउद्योग यासारख्या उपक्रमातुन. त्यांनी कामाचे जाळे निर्माण केले होते.संस्थेकडेच बोटी आहेत. काही दानशुर व्यक्तींच्या मदतीने एक जलद होडीही नुकतीच घेतली होती. अवसरी गावाजवळील डोंगरावर भरपुर पवनचक्क्या आम्हाला दिसल्या. येथुन वीजनिर्मिती होउन ती साता-यातील औद्योगिक वसाहतींना वीज पुरवली जाते अशी माहिती कोळेकरांनी दिली. कोळेकर स्थानिक असल्याने येथील परिसराची चांगलीच माहिती त्यांना होती. वाटेत ती ही माहिती देत होते. ६४ किमी चा हा कोयना बॆकवॊटर महाबळेश्वरजवळील तापोळा पर्यंत प्रामुख्याने होता. आमची बोट किना-याला लागली. पाण्याची पातळी खाली असल्याने आम्हाला थोडे चढुन पाहुणालयात यावे लागले. रखरखीत उन्हात आजुबाजुचा हिरवा रंग सुखद वाटतो. व्हरांडा काही खोल्या, फणसाखालचे सारवलेले अंगण व चौथरे, बाजुला भाज्या व फुलझाडांच्या बागा थोडे वरती गेल्यावर जगंलाचा भाग.
परिसरात वीज आलेली होती. दूरसंचार फक्त बीएसएनएल ची ग्रामीण भागासाठी असलेली तरंग योजनाच. मोबाईल इथे चालत नाही.दोनच पाहुणालये. एक वनखात्याचे व एक श्रमजीवी संस्थेचे. पाहुणालयाला शौचालय व स्नानालय होती.पुरेशी व स्वच्छ होती. त्यात नळ होते. लागणा-या कड्या होत्या. बादली, मग होते. पाणी तलावाचेच. मोटारीने वर एका सामाईक टाकीत नेउन नळाने आणलेले.
लोकांचे भरपेट व आमचे फक्त पुरेसे जेवण झाल्यावर झाडाखाली अंगणात पहुडलो. काहींचे पत्ते चालू झाले. आम्हाला त्यातल काही कळत नाही. आम्हाला फक्त भिकार सावकार गेम येतो. लहानपणी बहिणी व शहरातुन आलेले इतर नातेवाईक पत्ते खेळायचे.३०४, झब्बू, नाटेकाटे ठोम, लॆडीज, बदामसात,रमी अशी काहीशी विक्षिप्त नावे असलेले खेळ खेळायचे. आम्हाला खेळायला घ्यायचे नाहीत. त्याचा राग म्हणून आमी एखादा दुसरा पत्ता हळूच आडात टाकून द्यायचा. परिणामी त्यांचा खेळ थांबत असे.मग आम्हाला आनंद होत असे. ही ष्टोरी कर्णॊपकर्णी मंजिरी (बायको) ला माहित असल्याने तिने ते लोकान्ला सांगितले. परिणामी आम्हाला खेळायचा कुणी आग्रह केला नाही
जवळच एक भुभी झाडाखाली ओलसर मातीत पहुडली होती. आम्ही तिच्याशी 'जवळीक' साधण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला तिने दुर्लक्ष केले पण नंतर अल्पकाळातील सहाअस्तित्वातून मैत्रीच नात तयार झाल. वय लिंग, जात, धर्म, पंथ (कंपु) इत्यादि संकुचित संकल्पनांपलिकडच नात तयार झाल. सदस्याचा सहअस्तित्वाचा कालावधी पहाण्याची गरज नव्हती. 'नसलेली दुरी' केव्हाच गळून पडली. अगदी अहंकार गळून पडावा तश्शी. अस काही गळून पडल की कस मोकळ मोकळ वाटत ना? आमाला अस मोकळ वाटण्याचा अनुभव होताच. पुण्याच्या पेशव्यांच्या 'डिझाईन' सुविचाराची आठवण झाली. 'एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला कि त्याच सर्टिफिट तयार होत. सिन्स १९८४.' आम्हाला युनिवर्सिटीने दिलेला डिग्रीचा कागद पेशव्यांच्या हाती लागला कि काय असही क्षणभर वाटुन गेल होत. असो पण एकंदरीत भुभीच आन आमच चांगल जमुन गेल. लाजुन हासणे आन हासुन ते पहाणे मी ओळखून होतो सारे तिचे बहाणे. तिच्या अदाकारीचे आम्हाला हवे तसे अर्थ काढत आम्ही तिच्याशी तलावाच्या किनार्र्यावर नंतर गुजगोष्टी केल्या.
लोकांचा चहावाचुन जीव तळमळु लागला.उन अजुनही होते. आम्हाला चहाच्या कल्पनेनेच मळमळू लागले. एकदाच चहा आला. आम्ही मात्र थंड ताक प्यालो. परिसरात फिरुन आलो. जंगल व तलावाचा किनारा उन्हामुळे फारसा उल्हसित वाटला नाही. संज्ञा (आमची मुलगी) भुभुप्रेमी असल्याने तिने भुभुच्या पिल्लांचा शोध लावला होता. पिल्ले किना-याजवळील एका मोठ्या दगडाच्या खाली झालेल्या कपारीत होती. कित्ती गोंडस होती. आमच्या मगाच्या मैत्रीण भुभीचीच पिल्ले होती. त्यांचे निळसर झाक असलेले कोकणस्थी डोळे भिरभिरत होते. पण अगदी निरागसपणे. त्यातल्या एकाला उचलून त्याचे गारगार नाक आमच्या कानाला व गालाला लावले. अहाहा काय रोमांच आले! पिल्ल्लुही मिष्कील होत. हळुच कानाला चोखु लागलं.

सुर्य मावळतील गेल्यावर सगळ्यांबरोबर किना-यावर गेलो. किना-या वरुन सुर्यास्ताचे दृष्य कॆमेरात टिपले. सुर्योदय व सुर्यास्त या तर रोजच्याच घटना आहेत. आपण खर तर अशा प्रसंगांची स्मृती टिपत असतो.नोंद म्हणुन अथवा पुरावा म्हणुन. प्रौढी म्हणुन अथवा शिदोरी म्हणुन.
पाहुणालयात परत आल्यावर अंगणात बसुन गप्पा चालू झाल्य़ा. मुलींना मोबाईल घेउन दिले ते योग्य कि अयोग्य? आहार आणि प्रकृती, निवडणुका व राजकारण, भारतातील विषमता, रोजगाराच्या संधी, व्यावसायिक नितिमत्ता वगैरे वगैरे... मुलींनी त्या ऐकल्या. नंतर मोबाईल या विषयावर गॊसिपिंग केल्याचा आरोप आमच्यावर ठेउन 'एवढ असेल तर नव्हता द्यायचा घेउन' असा बाणा दाखवुन पालकांच्या नाकीनउ आणले. रात्री भरपेट जेवण झाल्यावर गप्पा मारत झाडाखाली अंगणातच झोपलो. गाद्या उशा पांघरुण यांची व्यवस्था होतीच. रात्रीच तारका विश्व पहुडल्या पहुडल्या दिसत होत. एवढ्या मोठ्या विश्वात आपण किती क्षुद्र आहोत अशा वैचारिक उवांनी डोके खाजु लागले.डोके खाजु लागले विचारांना अधिकच उत येतो.मग वाहवत जातो. दगडधोंड्यातुन वहाणा-या पाण्यासारखा. खगोलावरील 'पॊवर ऒफ टेन' या ज्ञानपटाची अनुभुती आली. 'मी अमुक, मी तमुक' ' तो/ ती स्वत:ला काय समजतो/ते' 'एकेकाला बघुन घेईन' 'याला/ हिला फाट्यावर मारीन, त्याला/ तिला फाट्यावर मारीन' 'असशील तू मोठा/ठी आम्हाला काय घेण आहे?' 'तुमची विद्वत्ता तुमच्यापाशी' 'याल तर तुमच्यासह नाहीतर तुमच्याशिवाय' ' तुम्ही अक्कल शिकवायची गरज नाही' वगैरे वगैरे हे सगळ कुठुन येत? आपल्या मेंदुतील विचार व भावना हेच आपल विश्व. विश्व कितीही मोठ असो प्रसंगी ते (*) मध्ये कोंबता/ घालता येत. मग मोठ काय? विश्व कि विवक्षित ष्टार(*)? विचार करता करता झोप लागुन गेली.
पहाटे कोंबड्याच्या आरवण्याने, पक्षांच्या कुजबुजाटाने व जंगली किड्यांच्या किरकिराटाने जाग आली. हल्कासा व्यायाम व आन्हिके उरकुन जरा तलावाच्या किना-वरुन फिरुन आलो. सावकाश न्याहारी करुन बोटीने अर्धा तासाच्या अंतरावर असलेल्या अभयारण्यातील शिरशिंगे टेहळणी बुरुजावर गेलो. तिथे दाट अरण्य होते. सापाची कात दिसली.मुलींनी गोळा केली ती गळ्यात अडकवून जरा आत संचार करुन आलो. मुलींचे कॆमेरे सरसावुन फोटो काढणे चालू होते. पालकांचेही चालू होते. आमचा अशक्त स्मृतीपटलाचा olympus camera आम्हाला पुरवून पुरवून वापरायचा होता आणि इतरांचे कॅमेरे होतेच की.
अरण्यात मनसोक्त भटकल्यावर परत पाहुणालयात आलो. जेवण करुन थोडेसे पहुडल्यावर जायला परत निघालो. महाबळेश्वरला जाण्याची कल्पना अव्यवहार्य ठरल्याने कुंभार्ली घाटाच्या घाटमाथ्यावर जाउन हॊटेलात चहा व सरबत घेतले. खरतर आम्ही निसर्ग सौंदर्य पहायला गेलो होतो. पण तिथे गेल्यावर विसरलो. येताना साताराजवळ माहुली म्हणुन नदीकिनारी अविकसित तीर्थक्षेत्र आहे तिथे देवळांची मालिका पाहिली. पेशव्यांच्या काळातील होती. चांगली शिल्पकला १७८० सालातील असलेले देउळ आम्ही पाहिले. शंकराची पिंड , नंदी व कासव अगदी सरळ रेषेत असतात हे देवळात पाहिले. आवर्जून भेट देण्यासारखे.


अंधार पडायला लागल्याने अधिक पहाता आले नाही. तिथुन पुण्याच्या दिशेने रवाना झालो. वाटेत विरंगुळा नावाच्या खाद्यपेय केंद्रात लोकांनी हादडले. सेल्फ सर्व्हिस त्रासदायक वाटली. ग्राहकांपेक्षा केंद्रचालकांना ती अधिक सोयीची असते. उदरभरण नोहे जाणीजे यज्ञकर्म असा संदेश देणा-या खाद्य संस्कृतीला धार्मिकतेचा पुळका कसा काय येतो हे समजत नाही. जिव्हाचौचल्याला जरा धार्मिक अधिष्ठान दिले कि विपणन कसे सोपे जाते. भूक लागल्यावर काही चविष्ट खाता पिताना 'ज्यांना दोनवेळच अन्नदेखील धड मिळत नाही असे लोक आपल्या भारतात/ जगात आहेत' हा विचार नेहमीच अस्वस्थ करुन जातो.पण तो बोलून दाखवला कि इतरांचा रसनाभंग होतो म्हणुन आम्ही तो मनातच ठेवतो. इतरांना त्रास कशाला? आपल्या गरजेपुरतच आपण खावं हे उत्तम. अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरविशी जगदीशा असे सांगणारे व्यंकटेशस्त्रोतातील आर्त शब्द मनातल्या मनात विरुन जातात.खाद्यसंस्कृतीसोबत ओबेसिटीने देखील भारतात प्रवेश केला आहे. आता दाही दिशांचे अन्न एकाच बोटाच्या दिशेला मिळत." फूडमॊल".बटर रोटी खाईन जाडजूड होईन मग तू मला खा असे सांगत रोगालाही थोपवणा-या म्हाता-या इथेच दिसतात.
यावज्जीवम सुखं जीवेत ऋणं कृत्वा घृतं पिबेत । भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत: ॥
( आयुष्य आहे तोपर्यंत सुखाने जगाव, कर्ज काढुनही तुपरोटी खावी एकदा देहाची राख झाली म्हणजे परत कोण येणार आहे?)
अस म्हणत आबालवृद्धांना सामावून घेणारे ही बकस्थळे राष्ट्रीय महामार्गांवर स्वागतास सज्ज असतात. भविष्यात खाद्यालय व रुग्णालय ही परस्पर संगनमताने व्यवसाय करतील असे आमचे भाकीत आहेच. ती काळाची गरज देखील आहे.
विरंगुळा संपल्यावर आम्ही पुण्याच्या दिशेने फायनली कूच केले. रात्री साडेदहाला पुण्यात पोचल्यावर घरी शेषधारी विष्णुसारखा पहुडलो. बायकोने चरणकमलांना गुदगुल्या केल्यावर श्रमपरिहार झाला. यासारख सुख नाही.
वाचन
12236
प्रतिक्रिया
0