मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मौन २

अरुण वडुलेकर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
पूर्वसूत्र: सकाळी गडबडीत मी दात काढायला जातो आहे हेही घरात कुणाला सांगितले नव्हते. गडबडीत असं आपलं म्हणायचं पण, दात तर काढायला जातो आहे त्यात काय सांगायचंय असा वयाला साजेसा अहंकारही त्यात होताच. पण आता निदान कांही काळ तरी हे असे, मौनव्रत धारण करावे लागणार आणि त्यातून काय काय प्रसंग उद्‌भवणार या शंकेने मनात काहूर माजले. पहिला सामना झाला तो नातवाबरोबर. " तू उशील का केला.चल बाप्पाला ज्याऊ" माझी प्रभातफेरी झाली की आम्ही दोघे देवाला जाणे हा दिनक्रमाचा एक भाग होता. " ए शहाण्या, किती वाजलेत पाहिलंय कां. बाप्पाला काय जातोस, आबांची जेवायची वेळ झालीय." सूनबाई आतून कडाडल्या. खरंच की. मी घड्याळाकडे पाहिलं. दीड वाजायला आला होता. सूनबाईनी पाण्याचा पेला आणून पुढे ठेवला आणि.... " आज बराच उशीर झाला तुम्हाला. कुठे कांही महत्वाच्या.....अगबाई, आणि चेहरा किती उतरलाय तुमचा. बरं नाही की काय" तिचा स्वर कापरा झाला. डोळ्यातली भीति पाणावायला लागली. पण क्षणभरच. असं मला वाटायला लागलं. कारण, पुढच्याच क्षणी, " हेही सकाळपासून चारदां म्हणाले, बाबा कां आले नाहीत अजून म्हणून. ते इन्शुरन्सचं काम करायचं होतं ना तुम्हाला. तुमची बरीच वाट पाहिली त्यांनी. शेवटी तेच गेले ते पेपर्स घेऊन " कातर स्वर आता करडा व्हायला लागला होता. मी मनातल्या मनात जीभ चावली. गृहपाठ करायचा विसरलेल्या विद्यार्थ्यासारखी मी मान खाली घातली. निवृत्तीच्या कालातही मी स्वत:ला थोडसं व्यग्र ठेवलेलं होतं. वीज, टेलेफोन, पाणी वगैरे नैमित्तिक बिले भरणे, इन्शुरन्सची नूतनीकरणे करणे इत्यादि पेन्शनर्स जॉब मी माझ्याकडे घेतले होते. आज आणि आजच कांही इन्शुरन्स संबंधी कांही महत्वाची कागदपत्रे इन्शुरन्स कंपनीत सादर करणे आवश्यक होते. माझ्या दाताच्या भानगडीत मी ते साफ विसरलो होतो. माणसाचे वय वाढलं म्हणजे अंगी सगळा शहाणपणा येतोच असं नाही. किंबहुना कर्तुमकर्तुम असा एक वृथा अहंकार आणि त्यातून निर्माण होणारा फाजील आत्मविश्वास कधी कधी रुपेरी केसांना लाज आणतो. तशीच कांहीशी वेळ मी माझ्यावर आणून ठेवलेली होती. तूर्तास मौन हे माझं वास्तव होतं. त्याचं खरं कारण सांगायला कांही हरकत नव्हती. पण प्रत्येक माणसाच्या मनांत एक वात्रट मुलगा नेहेमी दडलेला असतो आणि अशावेळी तो हमखास कांहीतरी वात्रटपणा करायला लावतो. तोच वात्रट मुलगा माझ्या डोक्यात कधी घुसला ते कळलंच नाही. सूनबाईने जेवणाचे पान घेतले आहे असे सांगितल्यावर, पोटात कावळे कोकलत असूनही, मी मोठ्या नम्रपणाने (!) जेवायला नकार दिला. सूनबाई संभ्रमात. मग मी एक कोरा कागद घेतला आणि आज सकाळी मी एका साधुपुरुषाच्या सत्संगाला गेलो होतो आणि दोन दिवसांसाठी उपोषण आणि मौन व्रत धारण केले आहे असा फतवा जाहीर केला. मात्र राजगिर्‍याचा लाडू आणि दुध चालेल कां या सूनबाईंच्या पृच्छेला मी तात्काळ होकारार्थी मान हालवली. यावर, एखाद्या तर्‍हेवाईक, भंपक माणसाला पाहून शहाण्या माणसाचा होतो तसा सूनबाईंचा चेहरा झाला. अजून तोंडाची उघडझाप फारशी नीट होत नव्हती त्यामुळे दोन राजगिर्‍याचे लाडू मी दुधात भिजवले आणि चमच्याने खाल्ले. त्यावेळी नातू माझ्याकडे ज्या नजरेने पहात होता ती मला अस्वस्थ करीत होती. अखेर "यंटम्‌" असा मार्मिक शब्द उचारून (मी एव्हाना यंटम् दिसत असणारच) तो आतल्या खोलीत पसार झाला आणि.. इतका वेळ माझ्याबरोबरच मौन पाळलेल्या भ्रमणध्वनीने शंख वाजवला. मी जितक्या उत्सुकतेने तो हातात घेतला तितक्याच हताशपणे त्याच्या कडे बघत राहिलो. आता असे बघत राहणे क्रमप्राप्त होते. कारण मी बोलू शकत नव्हतो. माझ्याशी संपर्क साधू इच्छिणार्‍याचे भ्रमणध्वनीच्या पटलावर आलेले नांव आमच्या एका दाभाडे नांवाच्या परम मित्राचे होते आणि हे दाभाडे खरं म्हणजे वाभाडे काढण्यात पटाईत असें एक वाह्यात प्रकरण होतं. आमच्या अशाच एका ज्येष्ठ नागरीकांच्या संध्याकाळच्या अड्ड्याचे ते आद्य संस्थापक होते. अड्ड्यावरची सगळीच मंडळी तशी "पिकल्या पानाचा देठ कां हो हिरवा" म्हणावी अशी कांहीशी टवाळच होती. पण हे ह.भ.प. दाभाडे बुवा त्यातले शिरोमणी होते. अड्ड्यावर डच् किंवा सोल्जर्स बेसीस वर भजी मागवली तर इतरांची नजर चुकवून चार दोन भजी हळूच पळविण्याच्या कर्तृत्वामुळे त्यांना ही ह.भ.प. पदवी बहाल करण्यात आली होती. मी भ्रमणध्वनीकडे किंकर्तव्यमूढ असा पाहात असतांना पुन्हा सूनबाई माझ्या सहाय्यतेला धावल्या आणि मग आम्ही तूर्तास केलेल्या पराक्रमाची ब्रेकिंग न्यूज त्या आमच्या या परममित्राला देत्या झाल्या. दूरदर्शनच्या ‘आज तक’ किंवा तत्सम गुर्‍हाळ-वाहिन्यांच्या कानी या दाभाड्याचे नांव पडले असते तर त्यांनी लक्ष लक्ष रुपये मानधन देऊन या प्राण्याला नक्कीच साईन केले असते. माझ्या मौनव्रताची बातमी षट्‌कर्णी आणि कर्णोपकर्णी होण्याला आता कांही मिनिटे पुरेशी होती. पुन्हा भ्रमणध्वनी वाजायला लागणार या भयाने मी त्यालाही मौन (बंद) केला. आता मी दिवाणखान्यात भिंतीवरच्या घड्याळाच्या सेकंद काट्याकडे एकटक पहात आरामखुर्चीत एकाकी पहुडलो होतो. विचार करत होतो. कारण त्यापेक्षा अधिक मी कांही करूच शकत नव्हतो. "मौनं सर्वार्थ साधनम्‌" असं कुणीसं म्हटलं आहे हे आठवलं. तो कुणीसा जो कोणी असेल त्याने ती उक्ती लिहिण्या किंवा वदण्यापूर्वी स्वत: कधी मौन पाळले असेल कां? मी कोणता "सर्वार्थ" साधणार होतो. एरवी मी "वट्टार वट्टार" करणारा माणूस. मला ही मौनाची कल्पना कां सुचली? माणसाच्या मनांत नेहेमी दोन प्रवाह वहात असतात. एक प्रवाह ताच्यावरील संस्कारित प्रवृत्तींप्रमाणे दृष्य स्वरुपात वागायला लावतो आणि दुसरा प्रवाह अगदी विरुद्ध स्वरूपाने वागण्याची उर्मी निर्माण करीत राहतो. ती उर्मी तो आतल्या आंत साठवीत जातो. मात्र त्याचे ते अदृष्य स्वरूप कधी कधी अभावितपणे प्रकट होते. त्यात त्याच्या स्वाभाविक व्यक्तिमत्वाला छेद जाण्याचाही धोका असतो. माणसाला वेड लागण्याची ती पहिली पायरी असते. हे असलं कांही तरी मी केंव्हातरी वाचलं होतं. मला ते सारं पुन्हा पुन्हा आठवायला लागलं. शब्द हा माझा दुसरा प्राण आहे असं वाटायला लागलं. आणि तो प्राण मी गमावला तर हा प्राणही कदाचित्‌ गमावेन की कांय या भयाने मघाशीच रिकामा झालेला पाण्याचा ग्लास मी पुन्हा पुन्हा ओठांना लावीत होतो. निदान एवढं तरी बरं की, हे मौन दोन दिवसांसाठी आहे असं जाहीर करण्याचा शहाणपणा अभावितपणे मला सुचला होता. पण हे दोन दिवस मी काय करणार होतो. संवाद हे जीवनाचे अविभाज्य अंग आहे. इथे मी बुद्ध्याच शब्दकळा बाजूला सारली होती. ‘शब्देविण संवादु’ कसा साधावा. या विचारांच्या गर्तेतून कसल्याशा आवाजाने बाहेर आलो. इतका वेळ मी घड्याळाकडेच पहात होतो. पण एव्हाना संध्याकाळचे सहा वाजले आहेत हे त्या आवाजाने मला दाखवले. तशीही माझी अड्ड्यावर जाण्याची वेळ झालीच होती अड्ड्यावरचा कोरम मी तिथे गेल्यावर पूर्णच झाला. आश्चर्य वाटावे अशी लक्षणीय उपस्थिती तर होतीच पण त्याहूनही अश्चर्यकारक अशी नि:शब्दता तिथे पसरलेली होती. एरवी " काय कुणी गचकला बिचकला की काय रे? की दांतखीळ बसावी असं कांही घडलंय?" असं एन्ट्रीचं वाक्य मी फेकलं असतं. पण आता मौनाचं बेअरिंग सांभाळणं भाग होतं. " बरं. सांग आता. काय झालं?" शेवटी रवी सराफ शक्य तितका खर्जात सुरु झाला. " काय, कुठे काय? " मी. मात्र केवळ हाताच्या खुणांनी. " फार बोलला का तो तुला? च्यायला ही हल्लीची कार्टी समजतात काय स्वत्:ला! " पहिलं वाक्य मला आणि दुसरं बाकी मॉबसाठी, जनरल. " अर्ण्या, पण तूही साला एक झक्कूच आहेस. होता है यार. ऐसा टकाटकी होताईच है. पण म्हणून हे असलं बोलायचं नाही म्हणजे काय बाबा?" इति सुभाष सातपूरकर. मला कांही उलगडा होई ना. पण संभ्रमात मी एकटाच नव्हतो. नाना जोशीने खूणेने माझ्याकडे बघत अगदी मख्ख चेह्र्‍याने काय चाललं आहे असा अर्थाचे अविर्भाव केले. आणि, " अरे या बाबाचं (म्हणजे मी) आणि चिरंजीवांचं कांही तरी वाजलंन्‌. तर हा डिप्रेशनमध्ये बोलायचाच बंद झाला" हे, गजा कर्वे, त्या दोन्ही कानाने बहिर्‍या नाना जोशीला ऐकू जावं म्हणून एवढ्या मोठ्याने बोंबलला की पलिकडच्या कल्व्हर्टवर बसलेल्या आणखी कांही पेन्शनरांचे कान टावकारले. मी मुका झालो होतो पण बहिरा झालो नव्ह्तो. हा काय प्रकार आहे हे मला समजेना. माझ्या मौनाची यथेच्च टिंगल होणार याची मला कल्पना होती. त्याला माझी मानसिक तयारीही होती. पण इथे हे काय चाललं आहे याचा उलगडा होईना. माझं आणि माझ्या मुलाचं कडाक्याचं भांडण झालं आणि म्हणून मी बोलायचा बंद झालो आहे असा कांहीसा जांवईशोध लागलेला दिसतो आहे इतपत उलगडा एव्हाना व्हायला लागला होता. पण कां? मी विस्मय, संताप, अगतिकता इत्यादि सर्व जाळ डोळ्यात आणायचा प्रयत्न करीत दाभाड्याकडे पाहिलं. कारण दुपारी त्याचाच फोन आला होता. दाभाडे कानांत काडी खुपसून कान खाजवीत बसला होता. दाभाडेनी शांतपणे काडी कानातून काढून डोळ्यासमोर धरली, काडीला मळ लागलेला नाही याची खात्री करून घेतली, माझ्या कडे स्थिर नजरेने पाहिलं आणि म्हणाला, " हां बोल. " दाभाडे " बोल काय बोल? काय चाललाय हा तमाशा" मी. शब्द नाही.फक्त खुणा. "शब्देविण संवादु" हा असा होतो आहे हे पाहून मी जरासा उत्तेजित झालो. " मी काय केलं. तू मौन पाळतो आहेस एवढंच मी गजाला कळवलं. त्यानं ते काय इंटरप्रीट ते त्यालाच ठाऊक" मी कपाळावर हात मारतो. " ए! साला, तूच म्हणालास ना यानं कांहीतरी इन्शुरन्सच्या पेपर्सचं लफडं केलं. म्हणून पोराने बापाला वाजवला म्हणून" गजा तडकला. " मी असं कुठं म्हणालो. अर्ण्या बोलायचा बंद झाला आहे आणि इन्शुरन्सच्या कामाचा कांही तरी घोळ झाला आहे एवढंच मला समजलं. एवढेच मी बोललो " दाभाडेच्या बोलण्याला साळसूद पणाचा वास येत होता. " पण तुला इन्शुरन्सच्या पेपराचं काय माहित?" मी.. पुन्हा खाणाखुणा! " मला मीनल म्हणाली तसं." मी पुन्हा कपाळावर हात मारून घेतला. सूनबाई दाभाडे काकांशी जरा जास्तच सलगीने बोलल्या होत्या हे खरं होतं. मी ते संभाषण पुसटसे ऐकले होते. पण त्या दोन निरनिराळ्या गोष्टींचा असा अर्थ दाभाडेने स्वत:च आणि बहुदा त्याच्या खवचट वृत्तीला साजेसा असा लावला होता. आणि विशेष म्हणजे तो काल्पनिक साधू, त्याचा मौनव्रताचा सल्ला याचा कुठे उल्लेख दिसत नव्हता. अखेर ती कथा साभिनय करून सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा पयत्न केला. पण कुणालाही त्यातले एक अक्षरही समजलेले नाही असे दिसायला लागले. " पण मी म्हणतो अर्ण्याच्या पोराने त्याला काम सांगायला नको होतं पण याला एवढीशी मदत करता येऊ नये?" " च्यायला, घोळ करून ठेवला तो ठेवला आणि वर मिजास पहा याची. राजश्री आपल्याशीही बोलायला तयार नाहीत." सातपूरकर " अहो तो बोलणार तरी काय? केल्या कर्माची लाज वाटत असेल आणि बसला वर आपणच फुरगटून" गजा कर्वे. " पण मी म्हणतो. पोराने तरी बापाला कामे कां सांगावीत. त्याची त्याला करता येऊ नयेत?" रवी सराफ "कां सांगू नयेत? नाही तरी घरीच बसणार ना हा इथे तिथे तोंड खुपशीत. थोडं काम केलं तर काय बिघडलं? पुन्हा दाभाडे." " पण एक मात्र आहे हां! आता विसरला असेल हा ते इन्शुरन्सचं पण म्हणून पोरांनी बापाला काय एवढा भोसडायचं?" रवी सराफ " ते कांही नाही वडुशेठ. मी म्हणतो जागे व्हा आणि एकदाचा काय तो निर्णय घेऊन टाका" रवी सराफ " काय बोलतोयेस काय तू रव्या. आणि निर्णय? कसला निर्णय घ्यायला सांगतो आहेस तू अर्ण्याला" दाभाडे " मी कांही सांगत नाहीये. तोच मागे म्हणाला होता गावाकडे जाऊन मस्त स्वतंत्र रहायचं म्हणून" रवी सराफ " हा एक (म्हणजे मी) शहाणा आणि त्याच्या बोलण्यावर हुरळून जाणारा तू दीड शाहाणा " दाभाडे " आयला, तू माझावर काय घसरतो आहेस. त्यालाच विचार ना. गावाकडे जाऊन मस्त मजेत राहायची आयडिया याचीच" रवी सराफ " हो ना! माझाही आयडियाच आहे. आयडियाची सर्व्हिस चांगली नाही हो. त्या पेक्षा एअरटेल चांगला आहे म्हणतात." नाना जोशी " घ्या! आता हे ऐका.आहो जोशीबुवा ते कानाचं मशीन घरी काय पुजायला ठेवलंय कां" गजा नानावर घसरला " काय रे अर्ण्या, हा काय प्रकार आहे? तू वडुल्याला जाऊन राहाणार आहेस?" दाभाडे " ए, कुठाय्‌ रे हे वडुलं?" गजा कर्वे " कुठं कां असेना.तुला काय करायचंय त्याच्याशी." दाभाडे " च्यायला असं काय म्हणतोस. हा अर्ण्या जाणार असेल तर बरंय ना" गजा " काय बरंय?" "म्हणजे असं बघ. हा गावाकडे स्वतंत्र रहाणार. मग आपल्यालाही कधी जाता येईल याच्याकडे चार दिवस मजा करायला" रवी सरा " तिथं जाऊन काय मजा करणार?" दाभाडे " ते तो सांगेल ना. आपण काय, तेंव्हा पाहुणे असणार. तो आपली सग्गळी सोय करेलच ना?" सातपूरकर ही चर्चा कुठल्या कुठे चालली होती. मी हे असं कांही बोललो नव्हतो. गप्पाच्या ओघात आमच्या वडुल्याच्या वडिलोपार्जित इस्टेटी विषयी मी बोललो असेनही. पण हे तर्कट कुठून निघालं कुणास ठाऊक. वडुल्याला आमचं असं होतं काय आता. जे होतं ते माझ्याही जन्माच्याची आधी कूळकायद्यात गेलेलं होतं. मला खरं म्हणजे माझ्या मौना बाबत कांही तरी सांगायचं होतं. मी मनातल्या मनात त्याची तयारी करीत होतो. मौनाबाबत गीतेत कांही श्लोक आहेत कां, ते आठवत होतो. महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे अशा महान प्रभृती मौन पाळीत असत. मी त्यांचाशी माझी स्वत:ची मनोमन तूलना करीत होतो. आणि इथे कांही भलतेच चावळणे चालू होते. मी या चिंतनातून जरासा बाहेर येऊन मित्रमंडळींच्या चर्चेकडे वळालो तर दाभाडेचं वाक्य कानी आलं, " ते माझ्यावर सोपवा. जायचंय ना याला गावाकडे. याच्या पोराशी मी बोलतो. याची त्याला सांगायची हिंमत होणारच नाही. आईल् डू दॅट. च्यायला, दोस्तासाठी एवढं करायलाच हवं ना!" माझ्या पायाखालची जमीन सरकली. हा दाभाड्या कांही करू शकतो याची मला पूर्ण कल्पना आहे. आणि अशा आगी लावण्यात तर प्रत्यक्ष नारदमुनींना याच्यासमोर हार पत्करली असती. हे सारं "लळीत" माझ्या घरापर्यंत येऊन ठेपलं तर घरात काय महाभारत होईल या कल्पनेने मी उडालोच. आणि मोठ्ठ्याने ओरडलो, " बास करा रे हा तमाशा. कां जिवावर उठलात माझ्या?" दाभाडे खो खो करून हंसायला लागला तशी बाकी मंडळीही त्यात सामील झाली. कोपर्‍यावरून रमेश बागूल आपल्या लांब लांब ढांगा टाकीत,गालातल्या गालात हंसत आमच्याच रोखाने येत होता. गजा जोशी, यातले कांहीही समजलेले नसूनही सगळे हसताहेत म्हणून तोही हसत होता. पण तरीही सावधपणे ओरडला " अरे, पण चहा कोण पाजतोय्?" "मौनी बाबा !!" एकसुरात जल्लोष झाला. समाप्त.

वाचने 3822 वाचनखूण प्रतिक्रिया 17

परिकथेतील राजकुमार 02/05/2009 - 16:09
मौनव्रत संपले म्हणायचे. चला आता चहा घेउ या ;) ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

प्राची 02/05/2009 - 16:25
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) आजोबा,आम्हालापण चहा आणि बरोबर भजीपण. :P :P

विसुनाना 02/05/2009 - 16:40
थोड्याश्या तरुण म्हणजे गालफडात दाढा शिल्लक असलेल्या 'श्रीयुत गंगाधर टिपरे' यांच्या आयुष्यात हा गमतीदार प्रसंग नक्कीच शोभला असता. वा!वा! खुमासदार!

In reply to by विसुनाना

प्राची 03/05/2009 - 13:50
मलापण आबांची आणि त्यांच्या पेन्शनर मित्रमंडळींची(खारकरपण) आठवण आली. :)

अवलिया 02/05/2009 - 16:53
मस्त! खूपच आवडलं! --अवलिया

चन्द्रशेखर गोखले 02/05/2009 - 19:23
खूप आवडलं . काहीतरी खुमासदार वाचण्याचा आनंद मिळाला. अजून येवुद्यात !!

क्रान्ति 02/05/2009 - 20:35
खूपच मस्त फर्मास लिहिलंय! मजा येतेय वाचायला. =D> क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com

मराठमोळा 02/05/2009 - 20:42
खुप आवडले लिखाण. :) हे दाभाडे म्हणजे खुपच द्वाड प्रकरण आहे बॉ. रिटायर झाल्यावर लोकं जास्त खट्याळ होतात अस ऐकिवात आहे. ;) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

क्रान्ति 02/05/2009 - 20:44
खूपच मस्त फर्मास लिहिलंय! मजा येतेय वाचायला. =D> क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com

प्रमोद देव 02/05/2009 - 22:13
अरूणराव मस्त लिवलंया. आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

पिवळा डांबिस 02/05/2009 - 23:19
मौनीबाबांचं आख्यान खूप आवडलं... कातर स्वर आता करडा व्हायला लागला होता. वा! काय सुपर सेन्सेटिव्ह निरीक्षण आहे!!!:) आणि " ए, कुठाय्‌ रे हे वडुलं?" हा तर षटकारच!!! =))

सहज 03/05/2009 - 12:48
एकदम चाबूक लेख. अतिशय खुमासदार लेखन.