नाहीच जमत बुवा काही गोष्टी!
लेखनप्रकार
मी खरं तर (यावरून काही अंदाज बांधता येतोय का?) विद्युत अभियांत्रिकीमध्ये एका बर्यापैकी नावाजलेल्या शासकीय महाविद्यालयातून (पुण्याचे नव्हे!) पदवी प्राप्त केलेला अभियंता आहे. पदवी मिळवून आता नऊ वर्षे होत आलीत. त्यानंतर त्याकाळच्या शिरस्त्याप्रमाणे इकडे-तिकडे फुटकळ उमेदवारी करून मी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात एका अत्यंत निरुपद्रवी आणि जिथे तांत्रिक गोष्टींचा अगदी कमी संबंध येतो अशा परंतु डोक्याचा भुगा करणार्या कार्यक्षेत्रात घुसलो. आता माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम सुरू करून मला पाच वर्षे झालीत. तसं माझं संगणकाच्या किंवा संगणकप्रणाली विकसित करण्याच्या तांत्रिक अंगांचं ज्ञान अगदीच नगण्य आहे.
अभियांत्रिकीला प्रवेश घेतल्यापासूनच मला अशी शंका होती की आपल्याला तंत्रज्ञानात गती नाही. अभियांत्रिकीच्या चार वर्षात ही गोष्ट प्रकर्षाने समोर आली. विद्युत अभियांत्रिकी मधले निरनिराळे नियम, सूत्रे मला खूप छळत असत. पॉवर फॅक्टर ही काय भानगड आहे, तो कमी-जास्त झाल्याने आपल्याला काय फरक पडतो, ट्रांन्स्फॉर्मर ही काय चीज आहे, ही चीज व्होल्टेज कमी-जास्त कशी काय करू शकते, मुळात व्होल्टेज काय आणि का असते, व्होल्टेज असतेच तर करंट, एनर्जी इत्यादी सगळे एकाच ठिकाणी सुखेनैव कसे नांदत असतात, इंडक्शन मोटर हे यंत्र फिरते कसे या व अशा अनेक अनाकलनीय गूढकथा मला कधीच उलगडल्या नाहीत. मोठमोठाल्या सर्किट आकृत्या काढून त्यातून वीज कुठून, कुठे, किती वाहते या प्रकारच्या गणितांनी माझ्या मेंदूमध्ये शॉर्ट सर्किट होत असे. नंतर हळू-हळू माझा विद्युत अभियांत्रिकीशी संबंध संपुष्टात आला.
पण प्रत्यक्ष आयुष्यातदेखील मला कधी जास्त खोलात शिरायला लावणारे घरगुती उपकरणांमधले किरकोळ बिघाड रुचले नाहीत. फारतर ट्युबलाईटचा स्टार्टर बदलणे मी समजू शकतो पण लगेच 'ट्युबलाईटला स्टार्टर का लागतो आणि ती पेटल्यानंतर जर तो काढून घेतला तरी ती विझत का नाही?' या बायकोने फेकलेल्या प्रश्नाला उत्तर देणे म्हणजे जरा मेंदूला जास्तच कामाला लावण्यासारखे वाटते. नेमके त्याचवेळेस गॅसवर ठेवलेले दूध उतू जात असेल तर आरडाओरडा करून उत्तर टाळणे मात्र मला झकास जमत आलेले आहे. :-) परवाच घरातला मिक्सर अचानक बंद पडला. बायको तणतणत माझ्याकडे आली. तिने मिक्सर बंद पडलाय असे सांगीतल्यावर माझी दातखिळी बसली. "बघ पुन्हा लावून किंवा थोडा लोड कमी कर, होईल सुरू" असं बोलून मी तिला कटवलं. पण कान तिकडेच होते. मिक्सरचा आवाज आला असता तर मला आवाज फुटायचे चान्सेस होते; अन्यथा काहीतरी करावे लागणार होते. थोड्या वेळाने बायको परत माझ्या अभियांत्रिकी ज्ञानाचा उद्धार करत आली. आता काय करावे? ती म्हणाली "उघडून बघा, एखादी वायर सटकली असेल." आता आली का पंचाईत. मी मोठ्या अनिच्छेने उठलो आणि जवळपास कुठले दुकान आहे का हे आठवू लागलो. तेवढ्यात माझे बाबा आले आणि त्यांनी मिक्सरच्या खालच्या बाजूला असलेल्या एका बटणाला दाबून मिक्सर पुन्हा सुरू करून बघण्यास सांगीतले. बाबा अशा बाबतीत एक्स्पर्ट आहेत. रुढ अर्थाने तांत्रिक विषयांचे कुठलेच ज्ञान नसतांना केवळ जिज्ञासेच्या बळावर ते अशा बर्याच गोष्टी करू शकतात ज्यांचा मी अभियंता असूनदेखील विचार देखील करू शकत नाही. शरमेची बाब आहे खरे पण आता काय करणार? :-) बायकोने ते बटण दाबले आणि मिक्सर सुरू झाले.
बरेच दिवस झाले माझ्याकडचे वायरलेस इंटरनेट कनेक्शन चालत नव्हते. मी कनेक्ट करायला सुरुवात केली की काहीतरी निरोप दाखवून माझा लॅपटॉप रडवेल्या बाळासारखा माझ्याकडे बघत बसे. दरवेळी मी बायकोवर चिडून लॅपटॉप बंद करून टीव्ही बघत बसे. परवा संध्याकाळी मात्र मला कहीतरी महत्वाच्या कामासाठी इंटरनेट लागणारच होते. पुन्हा सगळे तेच घडले. आता काय करावे. मी सगळे निरोप वाचले; निरोप कळले पण हा प्रश्न सोडवायचा कसा ते काही कळत नव्हते. तसाच तणतणत मी झोपलो आणि बायकोला सकाळी ग्राहक केंद्राला फोन करून ही अडचण सोडवून घ्यायला सांगीतले. मी सकाळी ऑफीसला निघून गेलो. सकाळी ११ वाजल्यापासून बायको ग्राहक केंद्राला फोन करायला लागली. ग्राहक केंद्रच ते, तिथे कुठला ग्राहकाला मान? बर्याच वेळाने एका माणसाने फोन उचलला. बायकोने त्याला सगळे सांगीतले. त्याने काहीतरी अगम्य खिडक्या उघडायला लावून शेवटी मोडेम आणि लॅपटॉप त्यांच्या नजीकच्या केंद्रात आणायला सांगीतले. तिने हा वृत्त्तांत मला फोनवरून सांगीतला. मग मी एकदा फोन केल्यावर त्याने पहिलाच प्रश्न केला, "तुमच्या लॅपटॉपवर विष्ठा आहे का?". मी जरा चक्रावलो. मला वाटलं कबूतर वगैरे असतात बरेच खिडकीजवळ, एखाद्या कबूतराला काहीतरी नवीन वाटलं असेल म्हणून त्याने हलकं केलं असेल पोट. पण त्याचा इंटरनेट सुरू न होण्याशी काय संबंध? मी भाबडेपणाने प्रश्न विचारला. "वा असं कसं? विष्ठाचं जरा वेगळं आहे सगळं. आम्हाला फारसं काही नाही येत त्यातलं." मग माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला की या महान माणसाला व्हिस्टा म्हणायच आहे. मी लगबगीने हो म्हणालो. तो म्हणाला की मिसेसना पाठवा केंद्रावर. जवळच असल्याने मी बायकोला लगेच जायला सांगीतले. मग तिथे पोहोचल्यावर तिने मला फोन केला.
"यांनी इथे सगळं तपासलं, ते म्हणतायत की लाईन मध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. लॅपटॉपमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे."
"मग त्यांना बघायला सांग ना."
"त्यांनी खूप प्रयत्न केला पण त्यांना काहीच कळत नाहीये. ते म्हणतायत की त्यांना लॅपटॉप हाताळण्याचा आणि व्हिस्टाचा काही अनुभव नाहीये."
"थांब जरा, माझा मित्र सचिन आहे इथे. त्याच्याशी बोल. त्याला कळतं त्यातलं."
"हॅलो सचिन"
"तुम्हाला वायरलेस बटन दिसतय का कुठल्यातरी कोपर्यात? ते डिसेबल झालं असेल"
"नाही दिसत आहे. इथे व्हॉल्युमचा आहे पण वायरलेसचं नाहीये."
"कंट्रोल पॅनलमध्ये जा आणि नेटवर्क कनेक्शन्स मध्ये जाऊन राईट क्लिक करा...केलं का? काय येतय?"
"होत नाहीये. ते राईट क्लिक केल्यावर गायब होतय."
"बरं, रिस्टार्ट करून बघा."
"केलं, पुन्हा तेच."
"ते मग पर्सनली बघावं लागेल. समीर घेऊन येईल लॅपटॉप माझ्याकडे, मग मी बघतो"
सचिनने फोन माझ्याकडे दिला.
"हॅलो"
"काय गं, नाही जमत आहे का?"
"नाही. मी थकले. १-१.५ तास झाला आम्ही इथे प्रयत्न करतोय."
"जाऊ दे, तू जा घरी. मी शनिवारी सचिनकडे जाऊन करून घेईल" (इथेही मी आल्यावर बघतो वगैरे निघालं नाही माझ्या तोंडून, शाप आहे, दुसरं काय? २० किलोमीटर मी सचिनकडे घेऊन जायला तयार होतो पण स्वतः प्रयत्न करायला फारसा उत्सुक नव्हतो. दैव, दुसरं काय?)
थोड्या वेळाने मी घरी पोहोचलो आणि काय सुचलं कोणास ठाऊक, मी लॅपटॉप काढला. आता मोडेमचं फोनशी आणि पॉवरशी पुन्हा कनेक्शन करणे हे एक दिव्य होते. बायको सगळं घेऊन गेली होती ना. बराच वेळ झटापट करून आणि सगळ्या वायरींची सगळी टोके उपलब्ध असलेल्या सगळ्या छिद्रांमध्ये घालून बघून शेवटी एकदाचं नीट कनेक्शन करण्यात.......बायको यशस्वी झाली. मी जे जे सुचवलं ते बहुधा सगळं चुकीचं निघालं. बायकोचा देखील तांत्रिक गोष्टींशी दुरून-दुरूनही संबंध नाही. पण शेवटी म्हणतात ना की सगळ्याच प्रकारच्या बुद्धी सगळ्यांकडे असतातच असं नाही. (असं कुणी म्हटलय काय माहित!). आता मोडेमचे लुकलुकणारे दिवे लागले होते. इन्स्टाल करून देणार्या माणसाने जसे सांगीतले होते तसेच ते लागले होते म्हटल्यावर काही चिंता नव्हती. आता मुख्य प्रश्न होता इंटरनेट सुरु होण्याचा. पुन्हा १-१.५ तास सत्राशे साठ प्रकारच्या खिडक्या उघडून मी प्रयत्न करून पाहिला पण काही उपयोग होत नव्हता. सतत काहीतरी कुठेतरी अडतय या आशयाच्या खिडक्या येत होत्या पण पुढे काहीच होत नव्हतं. बरं वायर जोडून इंटरनेट वापरायचं म्हटलं तरी पुन्हा ते सेटिंग बदलणे आणि वायरलेस सुरु झाल्यावर पुन्हा बदलून घेणे या जरा भीतीदायक गोष्टी होत्या. मी पुन्हा-पुन्हा स्क्रीनच्या उजव्या कोपर्यात काही दिसतय का ते बघत होतो. बर्याच उलाढाली केल्यानंतर मला असं वाटायला लागलं की मॅन्युअल बघायला पाहिजे. मॅन्युअलमध्ये मी सरळ इंडेक्समध्ये जाऊन वायरलेस शोधले. तिथे पण बटणाचा उल्लेख होता. बर्याचदा कॉम्प्युटरवर क्लिक करण्यासाठी असलेल्या कळांना बटन म्हणतात. मी तसे बटन शोधत होतो. पण मॅन्युअल बघितल्यावर मला अशी शंका यायला लागली की हे कुठलेतरी बाहेरचे बटन असावे. सगळा लॅपटॉप उलटा-पालटा करून शेवटी मला एक बटन आणि त्याच्याजवळ असलेले वायरलेसचे चिन्ह दिसले. ते मी उजवीकडे सरकवले आणि काय आश्चर्य, वायरलेस डिसेबल्डच्या जवळचा लाल ठिपका हिरवा झाला आणि डिसेबल्डच्या जागी कनेक्टेड की इनेबल्ड असे काहीतरी झळकले. मी टुणकन उडी मारली आणि इंटरनेट जोडून बघितले आणि क्षणार्धात वेबसाईट सुरु झाली. एका क्षुल्लक गोष्टीचे ज्ञान नसल्याने कितीतरी लोकांनी किती वेळ यात घालवला होता. यापुढे आता नीट लक्ष देऊन काही रोजच्या उपयोगात येऊ शकणार्या तांत्रिक गोष्टींचे ज्ञान वाढविण्याचा मी विडा उचलला आहे. कालच आऊटलूक स्वतः कॉन्फिगर करून मी श्रीगणेशा केलेला आहे. :) बघू किती टिकतोय उत्साह ते. :-)
वाचने
19873
वाचनखूण
प्रतिक्रिया
50
वा!
In reply to वा! by दिपक
धन्यवाद
जय हो..........
लेख आवडला.
In reply to लेख आवडला. by अमोल नागपूरकर
असेच म्हणतो..
In reply to असेच म्हणतो.. by गोमट्या
म्या भी हाय की एक सर्किट!!
In reply to म्या भी हाय की एक सर्किट!! by केदार_जपान
हाहाहा...
In reply to असेच म्हणतो.. by गोमट्या
धन्यवाद
In reply to धन्यवाद by समीरसूर
१०० % सहमत.
वा...
In reply to वा... by श्रावण मोडक
+१,
In reply to +१, by छोटा डॉन
+२
In reply to +२ by आनंदयात्री
-१
अनुभव कथन
In reply to अनुभव कथन by सुमीत
अगदी बरोबर
आय.टी.
In reply to आय.टी. by चिरोटा
खरे आहे
In reply to खरे आहे by समीरसूर
अर्थात
In reply to अर्थात by मराठी_माणूस
नाही
झकास
जर काहि प्रोब्लेम असेल तर
In reply to जर काहि प्रोब्लेम असेल तर by घाशीराम कोतवाल १.२
धन्यवाद
फारच छान
छान छान!
छान, लिखाण
अरेच्चा
In reply to अरेच्चा by नितिन थत्ते
सहमत
In reply to अरेच्चा by नितिन थत्ते
सहमत.. लेखन शैली छान आहे..
In reply to सहमत.. लेखन शैली छान आहे.. by एक
धन्यवाद, एक
In reply to अरेच्चा by नितिन थत्ते
अगदीच तसे नाही
In reply to अगदीच तसे नाही by समीरसूर
शिक्षण पध्धती
अगोदरच
In reply to अगोदरच by नितिन थत्ते
ठ्ठो!!!
स्वानुभव
In reply to स्वानुभव by परिकथेतील राजकुमार
+१
मस्त अनुभव
खुसखुशीत!
In reply to खुसखुशीत! by क्रान्ति
हाहाहा..
प्रॉब्लेम?
मस्त
प्रामाणिक कथन आवडलं!
In reply to प्रामाणिक कथन आवडलं! by चतुरंग
एकदम सहमत
In reply to एकदम सहमत by नितिन थत्ते
मस्तच!
In reply to प्रामाणिक कथन आवडलं! by चतुरंग
खल्लास
अगदी बरोब्बर
छान लेख
In reply to छान लेख by आकाशस्थ
झोप
माझा लेक
सुंदर लेखन
धन्यवाद