कुणी घर सांगता का घर?
परवा भांडारकर रस्त्यावरच्या रणजित हॉटेलला जायचं होतं. तसा कार्यक्रमांनिमित्त अनेकदा गेलो असेन तिथे. पण अजूनही ते प्रभात रोडला, की भांडारकर रोडला, हे अजून आठवत नाही. ते शोधताना आधी प्रभात रोड, मग भांडारकर, असे करत राहिलो. अखेर कार्यक्रम संपल्यानंतर पोचलो. तसा कार्यक्रम बुडवून फार काही नुकसान नव्हते, पण केवळ माझ्या वेंधळेपणामुळे तो बुडाला, हे महत्त्वाचे. :S
पत्ते शोधण्याची आणि लक्षात ठेवण्याची आमची ही नेहमीची बोंब! पुण्यात आता बारा वर्षे होतील, पण अजूनही लोखंडे तालमीपासून भरत नाट्य मंदिराला कसे जायचे, हे पक्के नाही सांगता येणार मला! :(
पत्ता शोधण्याचा केलेला एक आंतरराष्ट्रीय पराक्रम अद्याप लक्षात आहे. रानडे इन्स्टिट्यूटमध्ये शिकत असताना एकदा नियतकालिकाचे काम त्या रात्रीतच पूर्ण करायचे होते. आमची रत्नागिरीची एक मैत्रीण तिच्याकडचे लेख घरीच घेऊन गेली होती. ते तिच्याकडून मिळवून टाईप बिईप करून घ्यायचे होते. त्या काळी मोबाईल वगैरे काही नव्हते. (असं म्हणायची पद्धत आहे म्हणून नव्हे, पण खरंच तेव्हा नव्हते!) तिचा पत्ताही आम्हाला धड ठाऊक नव्हता. फक्त तिच्या सोसायटीचं नाव माहित होतं आणि कर्वेनगरमध्ये कुठेतरी राहते, एवढंच कुणीतरी सांगितलं होतं.
आम्ही रात्री अकरा वाजता अख्ख्या कर्वेनगरात तिचा पत्ता शोधायला प्रारंभ केला. >:D मी आणि एक मित्र. तिच्या सोसायटीच्या समजलेल्या नावाशी साधर्म्य असलेल्या सोसायट्या धुंडाळू लागलो. एकतर पुण्याच्या उपनगराचा तो भाग. रात्री साडेनऊ-दहालाच दारंखिडक्या लावून गुडूप होण्याची अहमहमिका. त्यामुळं तिचा पत्ता शोधणं समुद्रातून मोती शोधण्याएवढंच अवघड असल्याचं आम्हाला लगेचच लक्षात आलं. पण आमची चिकाटी कुणाच्या बापाला भीक घालणार नव्हती! >:)
काही सोसायट्या धुंडाळून नावांच्या पाट्या तपासल्या. त्यात कुठे ओळखीचं आढळलं नाही. तिचा पत्ता शोधताना आम्हाला लक्षात आलं, की तिचं सासरचं आडनावच आम्हाला ठाऊक नाहीये! आणि माहेरच्या आडनावावरून लक्षात राहायला ती काही माधुरी दीक्षित नव्हती!! तरीही विक्रमादित्यानं आपला हट्ट सोडला नाही. तो पुन्हा त्या सोसायटीच्या भिंतीपाशी गेला आणि मळकट-कळकट पाट्यांवरची नावे शोधण्याचे ते कष्टप्रद काम त्याने पुन्हा उरावर घेतले. ते शोधताना त्याच्या डोक्याची शंभर शकले होणार, हे स्पष्ट होते, तरीही!
काही सोसायट्यांच्या सेक्रेटरींना उठवलं. अमूक अमूक नावाची, रत्नागिरीहून आलेली कुणी मुलगी तुमच्या सोसायटीत राहते का, असंही विचारलं. बरं, तिच्या नवऱ्याचं नाव-आडनाव, हुद्दा, नोकरी-व्यवसाय, आम्हाला काहीच माहित नव्हतं. फक्त माहिती होतं तिचं माहेरचं नाव आणि वर्णन.
कर्वेनगराच्या त्या स्मशानशांततेत हे "गढे मुर्दे' उकरण्यात किती तास गेले कुणास ठाऊक! सुमारे साडेबारा-एकच्या दरम्यान आम्ही ही मोहीम थांबवली. :T
दुसऱ्या दिवशी सकाळी लक्षात आलं, की आम्ही भर अंधारात केलेली ही वणवण फारशी कुणाच्या उपयोगाची नव्हती. आमची पत्ते शोधण्याची खुमखुमी जिरली होती, एवढंच. लेख वेळेवर मिळाले नाहीत म्हणून, किंवा आमची वणवण वाया गेली म्हणून, कुणालाच सोयरसुतक नव्हतं! :( नंतर ती मैत्रीणही भेटली आणि ते लेखही. मात्र कायम स्मरणात राहील, असा एक उपद्व्याप आमच्या नावावर नोंदला गेला! ;)
वाचने
3746
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
हा हा .. मजेदार..
पण अजूनही लोखंडे तालमीपासून भरत नाट्य मंदिराला कसे जायचे, हे पक्के नाही सांगता येणार मला!
गावातल्या वनवेच्या जाळ्यामुळे एखादे ठिकाण झटकन हुडकणे आणि लक्षात ठेवणे अवघडच आहे.
-- लिखाळ.
असाही एक अनुभव हवाच ना!
महात्मा गांधी की नेहरू असा कोणतासा रस्ता होता... शेजारी पिंपळाचा पार होता... ही पुलंची वाक्य आठ्वली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
मला एकदम अलिकडेच घडलेला किस्सा आठवला. काही मिपाकरच कोथरूडमधे जमलेलो होतो. आता जेवायला पेठकर काकांच्या यज्ञकर्ममधे जायचं म्हणून उठलो. कसं जायचं हे फक्त दोन लोकांना माहित आणि आम्ही लोकं साधारण १५, त्यातले पुण्यातले लोकं एकदमच कमी; त्यामुळे त्या तालमीच्या नंतरचा पाचवं डाव्या हाताचं बोळ, असल्या गोष्टी कळणं शक्यच नव्हतं. मी आपलं सुचवलं, "संगणक, इंटरनेट सुरू आहेच, जरा गुगल-मॅप्स उघड आणि दाखव." तर सगळे लोकं "तू जळगाव का अलिबाग" अशा नजरेने बघायला लागले. मग पाचेक मिनिटं घरातला आवाज फार वाढला. दोन-दोनच्या जोड्यांत एकमेकांना पत्ता सांगणं, शोधणं, समजावणं सुरू झालं. आणि मग कुठूनसा एक समुपदेशक टाईप आवाज कानावर आला, "ते तुझं म्याप काय ते दाखव बघू!".
अनेक कष्टांनंतर, इंडीकेटर मोडलेल्या बाईकच्या पाठीपाठी आम्ही सगळे 'यज्ञकर्म'मधे गेलो आणि अगदी मस्त जेवणं हादडलं.
अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
परवाच हे `यज्ञकर्म' पाहिलं. आधी वाचलही आहे मिपावर.
एकदा गेलं पाहिजे. पण शेजारी `कोंबडी वडे'पण आहे. त्याचा सुगंध नाही ना बाधा आणत या यज्ञात??
अवांतर : पुण्यात मिपाकर स्नेहसंमेलन वगैरे करता की काय? आम्हालाही घ्या की राव तुमच्यात!!
धन्य आहात. :)
आणि माहेरच्या आडनावावरून लक्षात राहायला ती काही माधुरी दीक्षित नव्हती!!:))
मला पत्ता शोधण्याच्या प्रयत्नात काही उत्साही रहिवाश्यांनी मदत केली म्हणुनच मला एक ज्येष्ठ मित्र मिळाले. माधव रिसबूड- एक कठोर फलज्योतिष चिकित्सक
इथे माझा हा पत्ता शोधण्याचा प्रयत्न पहाता येईल.
प्रकाश घाटपांडे
नाडीशास्त्र, फलजोतिष अशा पदधतींचा वापर करुन पत्ता शोधु शकतो काय?
पण एक मात्र खर की पुण्यात छोटे रस्ते(short-cut) माहीत असले की बरोबर जाता येत(जास्तीत जास्त ४५ मिनीटे,मी लोहगा॑व ते कात्रज्/हि॑जवडी ला बर्याच वेळा गेलोय.)
"फक्त विचारू नका कसे जायचे ते"चौकाची आणी रस्त्या॑ची नावे"माझ्या बापजन्मी मला पाठ होण॑ शक्य नाही..
सुहास(पत्ते सा॑गण्यास तत्पर असण्यार्या अस्सल पुणेकरापे॑की एक...)
गाडीवर ...लिहायच राहून गेल॑
In reply to गाडीवर ...लिहायच राहून गेल॑ by सुहास..सदेव हसनार्.. (verified= न पडताळणी केलेला)
आम्ही पण कल्याणी नगर ते बालाजी नगर ४०-४५ मिनिटात संध्याकाळी ७ च्या दरम्यान जातो.
हा हा ..