गोठलेले सरोवर
गेले १०-१२ दिवस म्युन्स्टर मधले तपमान साधारण -७ ते -१२ याच दरम्यान होते. दिवसभर थंडगार वारे, रस्त्याची कडेला गोठलेले दंव, झाडाच्या पानांवर त्याच हिमदवाची झालेली नक्षी असे एकंदरीत चित्र होते. 'अशी थंडी सतत तशीच आहे म्हणजे उद्या परवा 'आझे' नक्कीच गोठेल' गेल्या शुक्रवारी आम्ही असा विचार करत असतानाच आमच्याच इमारतीत वरच्या मजल्यावर रहाणारा श्रीनिधी शनिवारी सांगायला आला, ' मी आत्ताच बाहेर जाऊन आलो, आझे पूर्ण गोठला आहे. आज दुपारी जाऊया का तिथे?' आम्ही दोघं लगेचच उत्साहाने तयार झालो.
आझे म्हणजे 'आ' नावाच्या म्युन्स्टरमधील नदीवरचे मोठे सरोवर. हे सरोवर साधारण २.५ किमी लांब आहे. जर अनेक दिवस तापमान खूप कमी म्हणजे उणे असेल तर हे सरोवर गोठते आणि इथली नगरपालिका या सरोवरात उतरून चालण्याची, खेळण्याची परवानगी देते.
एरवी आझे असा दिसतो. (जालावरुन साभार)
शनिवारी दुपारी आम्ही बाहेर पडलो. इमारतीच्या बाहेर आल्याआल्याच थंडगार बोचर्या वार्यांनी आमचं स्वागत केलं. स्वेटर, जर्किन, हातमोजे इतकं सगळं घालूनही थंडी वाजतच होती. -१० मध्ये आपल्याला एवढी थंडी वाजत्ये तर -२५, -४० मध्ये लोकांचं काय होत असेल? असा विचार करतच आम्ही बसमध्ये बसलो. आझे पर्यंतचे अंतर फार नाही. १५ ते २० मिनिटेच लागतात. आमची बस आझे वरच्या पुलावरून जात असता बाहेर खूपच सुंदर दृश्य दिसत होते. लांबवर पसरलेला, पूर्ण गोठलेला आझे आणि त्यावर उतरलेली, खेळत असलेली अनेक माणसे. कधी एकदा उतरून तिथे जातोय असं आम्हाला झालं.
खाली बघून हळू चाला, कॅमेरे सांभाळा, खूप निसरडं आहे असं एकमेकांना सांगतच आम्ही सरोवरात उतरलो. बुटांच्या आतुनही खालच्या बर्फाचा थंडगार स्पर्श अंगावर शिरशिरी आणून गेला. कुडकुडतच एकेक पाऊल पुढे टाकू लागलो. गुळगुळीत थंडगार काचेवरून चालावे तसे वाटत होते. एकमेकांचा हात धरून हळूहळू जपून एकेक पाऊल टाकताना अजून ४०-४५ वर्षांनी साध्या रस्त्यावर सुद्धा आपण असेच चालू ना? :) असं म्हणत म्हणत आम्ही पुढे जात होतो. आमच्या आसपासच काही माणसे बर्फावर मजेत हॉकी खेळत होती. काही आई-बाबा आपल्या लहानग्यांना घेऊन आले होते. त्यांची छोटी छोटी मुले आईच्या हाताला धरून 'एक पाय नाचव रे गोविंदा' अश्या तालावर चालत होती. तर थोड्या मोठ्या मुलांना आई-बाबांचा हात सोडून एकट्यानेच चालायचे होते. मग ती २-३ पावलं टाकत होती, मग पडत होती, परत उठत होती.. असे त्यांचे मजेत चालले होते. काही माणसे आपले स्केटींगचे बुट घालून जोरजोरात इकडून-तिकडे स्केटींग करत होती, तर काहींनी आपल्या टॉमी, कोको, आणि डेझीलाही फिरायला आणले होते. एवढंच नाही तर आमच्या पलिकडून २ कॉलेजवयीन मुली चक्क आपली सायकल हातात घेऊन गप्पा मारत चालत गेल्या.
गेला जवळजवळ अर्धा तास आम्ही बर्फावरच होतो. आता मात्र पायाची बोटे आणि नखं दुखायला लागली. बाहेर पडावेसे वाटत होते. असेच अजून ५ -१० मिनिटे चालत किनार्यापाशी आलो. पायर्यांवरून चढून वरती आलो तरी पायात काही संवेदनाच नव्हत्या. आपण अजूनही बर्फावरच आहोत की काय असे वाटत होते. आता खरी गरज होती ती गरमागरम चहा प्यायची. आम्ही घरूनच जातानाच थर्मासमध्ये आम्हा चौघांसाठी चहा नेला होता. अहाहा.. तिथल्या काठावर उभे राहून आजुबाजूची मजा बघत वाफाळता चहा पिण्याची मजा औरच होती. आणि इथली लोकं रस्त्याच्या कडेला असणार्या चहाच्या टपरीशिवाय कशीकाय राहू शकतात असे प्रकर्षाने वाटून गेले. आता मात्र कधी एकदा घराच्या उबेत जातोय असं झालं होतं. भयानक थंडी वाजत होती. हाता पायाची बोटं अगदी दुखून आली होती. बसथांब्यावर आलो तर बसला यायला अजून १० मिनिटे अवकाश होता. बापरे.. अक्षरश: एकेक मिनिट जाता जात नव्हतं. गप्पाही मारवत नव्हत्या. अंगात अगदी हुडहुडी भरली होती. आता अजून फक्त २ मिनिटं, १ मिनिट अस करत करत बस आली एकदाची. बसमधली उबदार हवा अगदी हवाहवीशी वाटत होती.
--शाल्मली.
एरवी आझे असा दिसतो. (जालावरुन साभार)

वाचने
4549
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
मस्त वृत्तांत..
मस्त फोटो
सगळे फोटू
In reply to सगळे फोटू by रेवती
+१
लै भारी
सुंदर
अरे वा..
In reply to अरे वा.. by केशवसुमार
हो.. हो.. तेच
मस्त !
वा!! वा!! काय
गोठलेले
गोठलेले सरोवर मस्तच!
In reply to गोठलेले सरोवर मस्तच! by चतुरंग
-२२ सें ???
शाल्मली,
फार आवडले.
छान वर्णन
धन्यवाद!