मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वैद्यकात वस्तुनिष्ठता

धनंजय · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
हल्लीच "अतींद्रिय शक्ती" या लेखात डॉ. दाढे यांचा प्रतिसाद वाचला. वैद्यकशास्त्रात खूप काही अगम्य असते याबाबत मी त्यांच्याशी सहमत आहे. परंतु त्या योग्य विचारांबरोबर त्यांनी वैज्ञानिकांच्या अहंमन्यतेबद्दल निष्कर्ष काढला होता. अहंमन्यता आणि वस्तुनिष्ठता यांच्यात पुष्कळदा गल्लत होते, असे मला वाटते. त्यावरून मागे रेडियोवर ऐकलेली एक मुलाखत आठवली. डॉक्टर रेचल नेओमी रेमेन या श्रद्धेबाबत, डॉक्टर-पेशंट संबंधाबाबत डॉक्टराने जागरूक असण्याबाबत मुलाखत देत होत्या. या सर्व बाबतीत मला त्यांच्याबद्दल आदर वाटतो. त्यांनी काही अहंमन्य डॉक्टरांबद्दल आपला एक अनुभव सांगितला आणि वैज्ञानिक वस्तुनिष्ठतेबद्दल आपली टिप्पणी सांगितली. मला ती कथा त्यांच्या दुसर्‍या एका मुलाखतीत येथे सापडली (दुवा) तिथून भाषांतरित करतो आहे. त्यापुढे मी रेडियो स्टेशनाला पाठवलेले पत्र (दुवा) भाषांतर करून देत आहे. - - - - "ही स्लोन केटरिंग हॉस्पिटलात रोग अद्भुतपणे बरा होण्याची ती सुंदर कथा... एका माणसाचा किमोथेरापी (कॅन्सरवरचा औषधोपचार) उपचार काम देईनासा झाला होता. तो हॉस्पिटलात आता मरायचे म्हणून गेला. हे बर्‍याच वर्षांपूर्वी झाले - त्या काळात "हॉस्पिस-सेवा" (अंतिम अवस्थेतील रुग्णांकरिता हॉस्पिटल) उपलब्ध नव्हती. चमत्कार व्हावा तसा तो बरा झाला. अशा गोष्टी नित्यच होत असतात, त्यांचे स्पष्टीकरण देता येत नाही, त्या कमालीच्या गूढ असतात. त्यांच्यापैकीच ही एक. हे किती न-अमेरिकन आहे - जीवन विज्ञानावर आधारित नसून गूढतेवर आधारित असावे. अशा गोष्टी घडाव्यात, त्या आपल्याला मोजता येत नाहीत की त्यांचे स्पष्टीकरण देता येत नाही. आपण त्या बघू शकतो, आणि त्यांच्यातून स्फूर्ती घेऊ शकतो - इतकेच काय करू शकतो. आपण विज्ञानात इतके गुरफटले गेलो आहोत, ..., तंत्रज्ञानात, जणू काही विज्ञान आपल्यासाठी जीवनाची व्याख्या करून देणार आहे. (त्यानंतर या रुग्णाबद्दल चर्चा करायला हॉस्पिटलातले डॉक्टर जमले. याचे स्पष्टीकरण देता येत नाही, म्हणून त्यांच्यात तळतळाटच फार झाला, आनंद जाणवला नाही... हा तपशील रेडियो मुलाखतीतून आठवतो [अनुवादकाची टीप]) या इतक्या सगळ्या कॅन्सरच्या गाठी या माणसाला होत्या, (आणि आपल्या डोळ्यांच्या देखतच जणू) त्या गेल्या - परत न येण्यासाठी! पण याबाबत आम्ही डॉक्टर भारावून गेलो का? नाही! डॉक्टर म्हणून आमची विवंचना झाली (फ्रस्टेट झालो.) म्हणून निदानाची पुन्हा चाचणी करण्यासाठी त्याच्या पॅथोलॉजीचे नमुने विश्लेषणासाठी आम्ही परत पाठवले. निदान अत्यंत घातक कर्करोग असेच होते. लोकांनी मग असा निष्कर्ष काढला, की ११ महिन्यांपूर्वी बंद केलेला तो किमोथेरॅपी उपचार, तो आता अकस्मात प्रभावी झाला होता, आणि कॅन्सरच्या गाठी नाहिशा होण्याचे ते कारण होते. आश्चर्य आहे! मला वाटते अतिरेकी "वैज्ञानिक वस्तुनिष्ठते"मुळे मनुष्य अक्षरशः आंधळा होतो. - - - - मी रेडियो स्टेशनाला लिहिलेले पत्र असे (पत्रातील काही चुका सुधारून) : वस्तुनिष्ठता डॉ. रेमेन यांचे बिंदूगामी निरीक्षण मला भावले. विज्ञानातील वस्तुनिष्ठतेमुळे अप्रूप वाटणाच्या आपल्या दृष्टी धुकाळते, असे त्या म्हणाल्या. ही बाब स्पष्ट दाखवणारे उदाहरण त्यांनी सांगितले : स्लोन केटरिंग येथील डॉक्टरांपुढे असा एक रुग्ण आला, काही स्पष्ट कारण नसता त्याचा कॅन्सर पार नाहिसा झाला. तर भारावून जाण्याऐवजी त्या डॉक्टरांना राग आला, कारण त्यांच्यापाशी स्पष्टीकरण नव्हते. ती कथा ऐकून मला शंका वाटली मला ज्या गुरूंकडून "वस्तुनिष्ठता" कळली, आणि या रागावलेल्या डॉक्टरांना जो अर्थ वाटतो, ते अर्थ एकच आहेत की वेगळे? हे शक्य आहे की विज्ञानाच्या क्षेत्रातील काही लोकांची दृष्टी अतिरेकी आत्मविश्वासाने गढूळ झाली असेल. विज्ञानाचे तत्त्वज्ञान वस्तुनिष्ठता कशासाठी सांगते, हे त्यांच्या दृष्टीआड झाले असू शकते. वस्तुनिष्ठता खरे तर नम्रतेबद्दलची श्रद्धा आहे. वस्तुनिष्ठता म्हणजे अनेकांना सहभागी करणारा अनुभव ओळखणे, आणि त्याचा गौरव करणे. जर मला एखादा अनुभव असा आला, तो दुसर्‍या कोणाला कधीच आला नाही, तर दुसर्‍या लोकांना अनुभव आला नाही, तेही ठीकच आहे, हे मी नम्रपणे मान्य केले पाहिजे. जर मला एखादा अनुभव आला, आणि दुसर्‍या कोणाला नंतर कधी तसाच अनुभव आला तर त्या पुनःप्रत्ययी अनुभवात आम्ही दोघे सहभागी आहोत. सह-अनुभवाला मूल्य देणे हे आपल्या मानव असण्यात अंतर्भूत आहे. तो रोग अनपेक्षितपणे बरा झाला, त्याचा अभ्यास करणार्‍या स्लोन-केटरिंगमधल्या डॉक्टरांना वाईट वाटायला काही कारण होते खरे - पण रोग बरा होणे हे ते कारण नव्हे. आपण भविष्यातील रुग्णांना आणि डॉक्टरांना या प्रकारे रोग बरा कसा करता येईल, हे नेमके सांगू शकलो नाही; अशा प्रकारे बरा होणारा रोग ओळखून पुढच्या काही रुग्णांच्या मानसिक यातना कमी करू शकणार नाही, याबद्दल वाईट वाटावे. त्या डॉक्टरांनी चर्चागट का बनवावा? त्यांच्या सर्वांचे अनुभव एकत्र करून या कोड्यात पाडणार्‍या रोगनिवारणाबद्दल अधिक जाणावे म्हणून. त्यांचे कर्तव्य होते, भविष्यातील डॉक्टरांसाठी आणि रुणांसाठी काही मार्गदर्शक तत्त्वे देणे. त्यांना तसे कुठले मार्गदर्शक तत्त्व सापडले नाही, तर त्यांची दिलगिरी त्या भविष्यातील रुग्णांच्यासाठी असावी. वस्तुनिष्ठता कशासाठी हवी, हेच ते विसरले, आणि जो रुग्ण बरा झाला, त्याच्यावर ते संतापले. खरे पाहता, ते वस्तुनिष्ठ नव्हतेच. विज्ञानातील वस्तुनिष्ठता दुसर्‍यांच्या अनुभवाचा आदर करण्यास उपयोगी पडते. अनेकांचा सहभाग असलेले (पुनःप्रत्ययी) अनुभव हे माझ्या खाजगी अनुभवांपेक्षा अधिक विश्वासार्ह आहेत असे ते तत्त्व सांगते. एकटाच असलो, तर मी स्खलनशील आहे, हे मान्य करण्यावेगळे वस्तुनिष्ठ असण्याचे काम काय? मी वस्तुनिष्ठ का आहे, हे नजरेआड केल्यास, ती दृष्टी भविष्यातील रुग्णांकरिता, आणि डॉक्टरांकरिता माझे कर्तव्य आहे, हे मी विसरेन. माझा आजचा अनुभव भविष्यातील ते डॉक्टर, ते रुग्ण सहभागी असतील त्या अनुभवांपेक्षा उच्च आहे, असे मानल्यासारखे होईल. असे करताच मी वस्तुनिष्ठ राहाणार नाही. काळजीपूर्वक विचार करता असे वाटते, की स्वतःच्या ज्ञानाबद्दल अतिरेकी अभिमान हा खर्‍या वस्तुनिष्ठतेबरोबर राहू शकत नाही. विज्ञानाच्या शिक्षकांनी भविष्यातील वैज्ञानिकांमध्ये नम्र वस्तुनिष्ठतेचे मूल्य गिरवून द्यायला हवे. असे केले नाही तर कथेतील संतापलेल्या आत्मगौरवी डॉक्टरांसारखे सोंग वस्तुनिष्ठता म्हणून वावरू लागेल. ज्ञानाच्या नैतिक शोधाला आडथळा होऊ लागेल. - - -

वाचने 2601 वाचनखूण प्रतिक्रिया 3

विसोबा खेचर Wed, 01/14/2009 - 01:51
काळजीपूर्वक विचार करता असे वाटते, की स्वतःच्या ज्ञानाबद्दल अतिरेकी अभिमान हा खर्‍या वस्तुनिष्ठतेबरोबर राहू शकत नाही. विज्ञानाच्या शिक्षकांनी भविष्यातील वैज्ञानिकांमध्ये नम्र वस्तुनिष्ठतेचे मूल्य गिरवून द्यायला हवे. धन्याशेठ, लै भारी लिहिलं आहेस रे! तुझ्यातल्या विचारशक्तिला आणि बुद्धीवादाला आपला सलाम..! आपला, (धन्याशेठचा फ्यॅन) तात्या.

पिवळा डांबिस Wed, 01/14/2009 - 02:04
वा! वा!! अतिशय शास्त्रशुद्ध आणि विचारप्रवर्तक लेख!!!! (स्वगतः आम्हाला या लेखातलं काहीही कळलं नाही, सगळं डोक्यावरून गेलं!! म्हणून आम्ही आमचीच अब्रू झाकण्यासाठी वरील अभिप्राय वापरतो आहोत!!!!) :B -अंगठाछाप डांबिस

चतुरंग Wed, 01/14/2009 - 02:55
घातल्याबद्दल धनंजयचे आभार! तुझी आठवण चांगली लिहिली आहेस. तुझे पत्रही नेमक्या भाषेत विचार मांडणारे आहे. मानवी शरीरासारख्या अतिशय गुंतागुंतीच्या रचनेशी संबंध असणारे वैद्यकशास्त्र हे खरोखरच एक अजब रसायन आहे. समोर दिसणार्‍या शरीरातल्या कित्येक घडामोडी ह्या सद्यस्थितीतल्या ज्ञानाच्या आवाक्यात येत नाहीत, निकषांच्या तराजूत तोलल्या जात नाहीत आणि तरीही त्या घडताहेत हे समजत असतं! विश्वास ठेवावा तर ज्ञानाशी प्रतारणा होते की काय? न ठेवावा तर अहंमन्यतेचा ठपका लागेल की काय? अशा कात्रीत पकडणार्‍या काही घटना घडत असतात. आपल्या ज्ञानावरची श्रद्धा हाच ह्यातून एकमेव मार्ग आहे असे मला वाटते. आपल्याला ठाऊक नाही पण ते असू शकेल, पण त्याचवेळी सरसकट काहीही असू शकेल असे न समजता डोळस अभ्यास हाच पुढे नेऊ शकेल हे तत्त्व घट्ट असणे महत्त्वाचे. शेवटी खरे ज्ञान तुम्हाला नम्र आणि सश्रद्ध बनवते! चतुरंग