Skip to main content

दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव २०: पुद्दुचेरी- चेन्नै १५० किमी

लेखक मार्गी यांनी गुरुवार, 04/06/2026 15:30 या दिवशी प्रकाशित केले.

✪ ईसीआर आणि समुद्राची सोबत 

✪ उलट्या दिशेने ढकलणारा वारा 

✪ थिऑसॉफिकल सोसायटी- ऐतिहासिक संस्था 

✪ खरंच हा सायकल प्रवास थांबवू? 

✪ "निरामयच्या" चेन्नै शाखेत सायकल उपक्रमाचा समारोप 

✪ २० दिवसांमध्ये ठरल्याप्रमाणे १८६१+ किमी पूर्ण 

✪ टीम वर्कचं यश आणि उद्दिष्टाची पूर्तता नमस्कार. 

३१ जानेवारीची सकाळ! आज शेवटचा दिवस! एका बाजूला आनंद होतोय आणि एका बाजूला दु:खही होतंय! बंगलोर- मलवली- उटी- केरळ- रामेश्वरम आणि पुढे असा हा प्रवास आज थांबणार! खूप वेगवेगळे लोक, संस्था, साधक, विलक्षण निसर्ग आणि अविश्वसनीय भारत ज्या प्रवासात बघायला मिळाला तो प्रवास आज थांबणार! आणि शेवटच्या दिवसाला साजेसं आजचं अंतर, आजची संस्था आणि आजचं आव्हानसुद्धा आहे! अंतर तर मोठं आहेच. पण त्या अंतरासोबत किनारपट्टीवरची आर्द्रता आहे आणि उलटा वारासुद्धा आहे! त्यामुळे ही शेवटची राईडसुद्धा अगदी थरारक होणार आहे. 

(माझा ब्लॉग इंग्रजीत इथे वाचता येईल. सायकल प्रवासातले फोटो बघता येतील‌ व सर्व लेख एकत्र वाचता येतील. त्याशिवाय विज्ञान प्रयोग, गणितातील गमती, ट्रेकिंग, ध्यान, आकाश दर्शन, फिटनेसबद्दलचे लेख तिथे वाचता येतील.) 

रोजच्या पेक्षा थोडं लवकर निघालो. वैद्य काका आणि वेदांतचा निरोप घेतला. मला सगळ्यांनी निघताना खाली येऊन शुभेच्छा दिल्या! खूप छान भेट झाली ही. सेवा भारतीचे डॉ. सिद्धार्थजी पुद्दुचेरीलाच असतात. पण ते हॉस्पिटलमध्ये खूप व्यस्त होते. त्यामुळे भेट राहिली.

  .  .  .  .   

आता नवीन दिवस सुरू! ३१ जानेवारी! माझ्या प्रिय काकाचा स्मृतीदिन. त्याला फिरण्याची व ड्रायव्हिंगची खूप आवड! माझ्या सायकल प्रवासाचा त्याला प्रचंड आनंद झाला असता! आणि सायकल प्रवासाचा समारोप त्याच्याच मुलीच्या घरी- माझी चुलत बहिण अदितीकडे आहे! आणि सगळा योग आल्यामुळे आजच्या दिवशी तिच्याकडे पोहचता येतंय. ती ह्या पूर्ण प्रवासात नियोजन, वाटेतलं जेवण- आहार, समन्वयन ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहेच. निरामयच्या टीमची सदस्य म्हणूनही बॅक स्टेजच्या कामामध्ये सहभागी आहे! शिवाय जेव्हा दक्षिण भारतात सायकल प्रवासाचा विचार मनात आला होता, तेव्हा आधी तिच्याशी बोललो होतो. तिने सांगितलं होतं की, कर असा प्रवास, शिवाय त्याला जोडून उपक्रमसुद्धा कर. तेव्हा मग हे ठरत गेलं होतं! म्हणून थिऑसॉफिकल सोसायटीबरोबर ह्या भेटीचीसुद्धा तितकीच ओढ आहे. 

६.५० ला निघालो. पुद्दुचेरी शहर ओलांडलं. मुख्य मार्ग सुरू झाला. हा पूर्व किनारी रस्ता म्हणजेच ईसीआर. पण त्याची मजा इथे येतच नाहीय. कारण "तो" दिसतच नाहीय. शहरांच्या बाहेरही घरं- दुकानं आहेत. ईसीआरचा मला खरा फील आला तो मंडपम- मल्लिपट्टिणम परिसरात. तिथे तो खराखुरा किनारी रस्ता वाटतो. इथे तर तो अतिशय गर्दीचा हायवे फक्त वाटतोय. 

पहिल्या तासात २२ किमी पूर्ण झाले. व्वा! वेग तर छान मिळतोय. इतका वेग असेल तर खूप कम्फर्टेबली पोहचेन. मनामध्ये गेल्या २० दिवसांमधले प्रसंग येत आहेत. काय काय लोक भेटत गेले! किती जणांनी केवढी सोबत केली, किती मदत केली! तिरूअनंतपूरमला पोहचताना शेवटच्या टप्प्यात ऊन्हाचा त्रास होता आणि हॉटेल न मिळाल्यामुळे ऊर्जा कमी होती. तेव्हा मोटरसायकलवर मागे बसलेल्या लहान मुलीने हात हलवला आणि किती छान वाटलं होतं! भाषा येत नसूनही लोकांच्या डोळ्यांमध्ये नेहमी दिसलेला आपलेपणा! ह्या विचारांमध्ये अंतर हळु हळु पार होतंय. 

आजचा टप्पा मोठा आहे. त्याचे मानसिक पातळीवर छोटे तुकडे केले. सकाळी ९ पर्यंत ४०, १२ पर्यंत ८५ असे छोटे टप्पे बनवले. आणि इतका तर विश्वास आहेच की, वार्‍यामुळे किंवा उष्णतेमुळे उशीर झाला तरी आजच पोहचणार आहे. फक्त ४ वाजता का ६ वाजता हाच तो फरक असेल. थिऑसॉफिकल सोसायटीमध्ये साधारण तीन वाजता पोहचेन असं श्री शिखरजी अग्निहोत्री सरांना सांगितलं आहे. तेसुद्धा खूप उत्सुक आहेत. 

सकाळी १०:४५. ७४ किमी झाले 

सकाळच्या वेळेमध्ये छान वेग मिळतोय. आज रोजच्यापेक्षा थोडे कमी ब्रेक्स घ्यायचे ठरवलं आहे. त्यामुळे थेट ७४ किलोमीटरनंतर पावणे अकराला पहिला मोठा ब्रेक घेतला. इथून थिऑसॉफिकल सोसायटी ६९ किमी बाकी आहे. जवळ जवळ अर्ध अंतर साडेतीन तासांच्या पेडलिंगमध्ये झालंय! वेगही छान आहे. इथे एक गंमत झाली. नाश्त्यासाठी अनेक हॉटेल्स होते. अनेक बघून शेवटी एका हॉटेलमध्ये थांबलो. आणि मी इथेच का थांबलो तेही कळालं! तिथला माणूस चक्क मराठी बोलतोय! तो बंगालमधला आहे पण महाराष्ट्रात राहिला आहे. नकळत आपल्याला अशा गोष्टी जाणवतात आणि आपण तशी कृती करतो. पुढचा ब्रेक १०० किलोमीटर पूर्ण झाल्यावर घेणार. काकूंनी दिलेलं जेवण तिथे जेवणार. तिथून पुढचा टप्पा छोटा असेल. 

१२:१५. १०४ किमी झाले 

कल्पक्कमच्या आधी मोठी खाडी लागली! खूप वेळानंतर "तो" छान दिसला! हळु हळु ऊन आणि वारा दोन्ही वाढतंय. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे वेग कमी झाला. महाबलीपूरम जवळ येतंय! रस्त्यावर बरेच डायवर्जन्स येत आहेत. काही ठिकाणी काम सुरू आहे. रहदारीसुद्धा वाढते आहे. इथे मुख्य रस्त्यापासून मला उजवीकडे वळायचं आहे. ते वळण नीट लक्षात आलं नाही. त्यामुळे थोडं पुढे गेल्यावर दुसरं वळण घेतलं. पण त्यामुळे महाबलीपूरम गाव थोडं मागे पडलं. गाव संपताना मी त्या रस्त्यावर आलो. हा रस्ता तुलनेने थोडा रुंद आणि जास्त शांत वाटला. १०० किलोमीटर पूर्ण झाले! दुपारचे बारा वाजले आहेत. समुद्र थोडा पलीकडे आहे आणि मधून मधून दिसतोय. इथे मला हॉटेल नकोय, पण सावली हवीय. सावलीसाठी अजून पुढे जावं लागलं. काही बस स्टॉपही आहेत. त्याच्या पुढे एका ठिकाणी रस्त्याच्या बाजूला एक शेड आहे आणि दूर किनाराही‌ दिसतोय. कोणाचं तरी दुकान असावं. तिथे बसलो आणि घरच्या जेवणाचा आनंद घेतला आणि लगेच निघालो! 

चेन्नै हळु हळु जवळ येतंय! वस्ती वाढताना दिसते आहे. माझा पहिला थांबा अदितीची बँक ऑफ महाराष्ट्र असेल. तिथे ती माझं स्वागत करणार म्हणाली आहे. तिथे शौनकजी भेटतील आणि तिचे काही सहकारीही भेटतील. तिथून थिऑसॉफिकल सोसायटीचं अडयार साधारण ७ किलोमीटर पुढे आहे. आता अंतर तसं कमीच आहे. पण ऊन फार जास्त आहे. पाणी पीत राहिलो. सोबत असलेली चिक्की- अंजीर खाल्लं. आता हा ह्या राईडमधला सगळ्यांत खडतर टप्पा! दुपारी दीड वाजला आणि साधारण १२२ किमी पूर्ण झाले. अजून १२ किलोमीटरवर बँक ऑफ महाराष्ट्र असेल. 

प्रचंड ऊन! त्यात शहर सुरू झाल्यामुळे अजून जास्त गरम होतंय. एनर्जाल किंवा ओआरएसची गरज भासतेय. नेमकं त्या टप्प्यात मेडीकल दिसत नाहीय. तसंच बघत बघत पुढे जात राहिलो. चेन्नैची उपनगरं सुरू झाली! दूरवर उंच इमारती दिसत आहेत! समुद्र आता घर आणि दुकानांमुळे झाकला गेलाय. उलटा वारासुद्धा अजिबात थांबत नाहीय. एका हॉटेलमध्ये बिसलरी बाटली विकत घेतली- प्रवासात पहिल्यांदाच. सोबत असलेली इलेक्ट्रॉलची‌ पावडर त्यात पूर्ण मिसळली. ते पाणी हलवून घेतलं! थोडा आराम मिळाला. पुढे जात राहिलो! अदितीची कोटीवक्कम ब्रँच जवळ येते आहे! समोर मेडीकल आलं. तेव्हा एक ओआरएस घेतलं. आता एकदम बरं वाटलं. 

दुपारी ३:१५: कोटीवक्कम ब्रँच, बँक ऑफ महाराष्ट्र, १३४ किमी 

हळु हळु पुढे जात राहिलो. त्यात ट्रॅफिक आणि सिग्नल्स! एक बरं आहे की, ही शाखा माझ्या रस्त्यावरच आहे. त्यामुळे शोधावं लागलं नाही. अदिती आणि तिचे एक सहकारी रस्त्यावर येऊन थांबलेले दिसले! त्यांनी मला थांबवलं आणि रस्ता ओलांडून शाखेकडे नेलं! व्वा! “अरे तू असा कसा दिसतो आहेस!” अदितीला प्रश्न पडला! शौनकजीसुद्धा इथे आले आहेत. सगळ्यांनी अभिनंदन केलं. अदितीने भर रस्त्यात ओवाळलं! तिचे काही सहकारी भेटले. पंधरा मिनिटं थांबून पुढे निघालो. शौनकजी खूप कामात आहेत. पण तरी ते मला थिऑसॉफिकल सोसायटीचा रस्ता दाखवायला आले. इथून साधारण ७-८ किलोमीटरच पुढे असेल.

  .  .   

दुपारी ४: थिऑसॉफिकल सोसायटी, १४२ किमी 

गर्दी आणि सिग्नल्स कमी लागतील अशा रस्त्याने ते मला घेऊन गेले. अडयार! जुनं चेन्नै! आतले प्रशस्त रस्ते! पोहचलो थिऑसॉफिकल सोसायटीमध्ये! इथले मुख्य अधिकारी शिखरजी अग्निहोत्री भेटायला आले. ते खूप व्यस्त आहेत. पण त्यांनी मला सोसायटीची माहिती दिली. माझ्या प्रवासाबद्दल अभिनंदन केलं. शंभर वर्षांपेक्षा जास्त जुनी ही संस्था! भारतातल्या ध्यान किंवा अध्यात्म ह्यावर काम करणार्‍या संस्थांमधली एक अतिशय मोठी संस्था. आणि तिचं स्वरूप खूप वेगळं आहे. डॉ. ऍनी बेझंटना आपण स्वातंत्र्य लढ्यातील सहभागासाठीच ओळखतो. पण ही संस्था स्थापन करण्यात त्यांचा मोठा सहभाग होता. शिवाय लीडबीटर सारखे लोक होते. सगळ्या पंथांना एकत्र आणून सगळ्या पथिकांसाठी काम करणारी ही संस्था. गुरू नानक किंवा रामकृष्ण परमहंसांनी जे केलं होतं, काहीसं तसंच. ज्याला ज्या साधना मार्गाने जायचंय त्याने तो मार्ग घ्या, इथे तुम्हांला सगळे साधना मार्ग मिळतील, ही सोसायटीची व्हिजन. 

ओशोंकडून लीडबीटर, ब्लॅवटस्की, गुरजीफ आणि कृष्णमूर्तींबद्दल ऐकलं होतंच. इथे त्या व्यक्तींचा परिसर आणि घर, रस्त्यांची नावं बघून छान वाटलं. झरत्रुष्ट, बोधिधर्मा, कृष्ण, जीसस अशा सगळ्यांचा इथे समावेश आहे. शिखरजींनी मला सोसायटी फिरून बघायला सांगितली. सायकलवरच तिथे मस्त फिरलो! एक जणसुद्धा माझ्यासोबत सायकलवर दाखवायला आले. खूप वेगळी ही संस्था आहे आणि खूप वेगळं काम चालतं. इथे कार्यशाळा होतात. साधक एकत्र येतात. ह्या योग प्रवासाचा समारोप करायला खूपच उत्तम संस्था मिळाली! सुंदर परिसर. ध्यान करण्यासाठी छान वातावरण. तासभर फिरलो. अनेक कक्ष, सभागृह, ध्यानासाठीची छोटी मंदिरं असं खूप काही इथे आहे.

  .  .  .  .  .  .   

सायंकाळी ५: ५० निरामय शाखा चेन्नै १५० किमी 

निघण्याआधी शिखरजींच्या घरी गेलो. त्यांच्या कन्येचा वाढदिवस. त्यामध्ये ते व्यस्त आहेत. पण तरी थोडा वेळ भेटले. आणि तिथून निघालो! शौनकजी थांबलेले आहेतच. आता शेवटचा टप्पा- इथून निरामय संस्थेची चेन्नैमधली शाखा- म्हणजे अदितीचं घर! अंतर सहा- सात किलोमीटर. शौनकजींनी त्यांच्या बुलेटवरून मला गाईड केलं. अडयारमधून कोटीवक्कमला आलो. काही गर्दीचे रस्ते तर काही शांत रस्ते! अखेर त्यांच्या घरी पोहचलो! खरंच हा सायकल प्रवास आता थांबवू? इच्छाच होत नाहीय. किलोमीटर बघितले तर १४९ च्या थोडे जास्त! चला, थोडं फिरून येतो म्हणजे १५० होतील! दोन मिनिटांमध्ये फिरून आलो आणि १५० किमी पूर्ण झाले. एकूण १८६१+ किमी. सायकल प्रवास थांबवला! अर्ध्या अंतरानंतरचा उलटा वारा, उष्णता, शहरातले सिग्नल्स आणि ट्रॅफिक आणि थिऑसॉफिकल सोसायटीत गेलेला दीड तास ह्यामुळे प्रत्यक्ष निरामयच्या चेन्नै शाखेत पोहचायला ५:५० झाले! पेडलिंगचे ८ तास १२ मिनिट.

  .   

ह्या २० दिवसांच्या प्रवासात १३ योग केंद्रांना भेट दिली. तसंच त्या निमित्ताने आधीही आणि नंतरही अनेक योग संस्थांच्या व कार्यकर्त्यांच्या भेटी झाल्या. अगदी ठरल्याप्रमाणे २० दिवसांमध्येच पूर्ण प्रवास झाला. एकही दिवस जास्त लागला नाही. सायकल चालवताना आणि संपल्यावरही मला कुठेच "हे मी केलं" असं वाटत नाहीय. कारण मला स्पष्ट दिसतं आहे की, अनेक जणांची सोबत त्यात आहे. अनेकांनी मदत केली आहे. हा उपक्रम अनेकांच्या मदतीमुळेच पूर्ण होऊ शकला. त्या त्या टप्प्यावर मदत करणारे स्थानिक मित्र असतील किंवा निरामयमधून बॅक स्टेजला राहून मदत करणारे लोक असतील. किंवा स्वामी सुंदर चैतन्यजी- चिन्मय मिशनसारख्या संस्थांमधले साधक. ह्या सगळ्यांचाही पूर्ण प्रक्रियेत तितकाच वाटा आहे. आणि त्यामुळे सायकलिंग तर पूर्ण झालंच, पण त्याबरोबर अपेक्षित असलेला संवाद, लोकांना भेटणं, आपला देश समजून घेणं, योग संस्थांचा परिचय करणं आणि निरामय संस्थेचा परिचय त्यांना करून देणं, ह्या गोष्टीही होऊ शकल्या! सायकलनेसुद्धा खूप चांगली साथ दिली! 

अशी अविश्वसनीय राईड पूर्ण झाल्यावर मनामध्ये एकच भावना आहे- कृतज्ञता! फक्त कृतज्ञता! 

पुढील भाग: दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव २१ (अंतिम): फक्त कृतज्ञता! 

वाचल्याबद्दल धन्यवाद. माझ्या ब्लॉगवर ट्रेकिंग, आकाश दर्शन, विज्ञान प्रयोग, ध्यान, फिटनेस, सायकलिंग इ. बद्दलचे लेख उपलब्ध. -निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 4 जून 2026.

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 60
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

सुंदर लिहिलंय. सुंदर अनुभव. प्रकाशचित्रेही सुदर आहत. 

१८६१ किमी सायल चालविणे येरागबाळ्याचे काम नाही.   

 

 तुमच्या निर्धाराने,  धाडसाचे व दमदार प्रकृतीचे कौतुक वाटते.