✪ पूर्वेकडचा प्रचंड वारा!
✪ शेकडो पवनचक्क्यांच्या आसमंतात
✪ तमिळ नाडूची शांत गावं!
✪ "तो" जवळच आहे पण दिसत नाही (जलवा जो ओझल भी है सामने भी है)
✪ तिरूचेंदूरचं विलक्षण अरूलमिगु सुब्रमनिया स्वामी मंदिर
नमस्कार. २२ जानेवारीची पहाट. विवेकानंद केंद्रातल्या बीचवर जायचं असल्यामुळे थोडं लवकर आवरलं. केंद्राच्या कँपसच्या आतमध्ये बीचकडे जाणारा रस्ता आहे. परिसर खूप छान जपला आहे. सूर्योदयासाठी अनेक जण आलेले आहेत! महाराष्ट्रात बीचवर सूर्यास्ताची सवय असते! इथून पुढे बीचवर सूर्योदय असेल! खूप शांत आणि सुंदर बीच आहे. काही क्षण तिथे थांबलो. पूर्वेला ढग आहेत, त्यामुळे सूर्योदय तर दिसणार नाहीय. केंद्राच्या रिसेप्शनमधल्या व्यक्तींकडे रूमची किल्ली देऊन निघालो. आजपासून खूप वेगळ्या गावांचा टप्पा सुरू होईल! वाटेतमध्ये विशेष ओळखीसुद्धा नाही आहेत आणि संस्थापण माहिती नाही आहेत. बस ९०- ९५ किलोमीटर अंतरावर थांबायचं, इतकंच माहिती आहे.
(माझा ब्लॉग इंग्रजीत इथे वाचता येईल. सायकल प्रवासातले फोटो बघता येतील व सर्व लेख एकत्र वाचता येतील. त्याशिवाय विज्ञान प्रयोग, गणितातील गमती, ट्रेकिंग, ध्यान, आकाश दर्शन, फिटनेसबद्दलचे लेख तिथे वाचता येतील.) .
.
.
.
सकाळी रहदारी अगदी कमी आहे. त्यामुळे कन्याकुमारीच्या बाहेर लगेचच आलो. पण हाsss वारा! तोही पूर्वेकडून पश्चिमेकडे येणारा! म्हणजे माझ्या बरोबर विरुद्ध दिशेला. हा असाच राहिला तर नक्कीच माझा वेग कमी होईल! आणि मनात लगेचच शंका आली, इथेच किनार्यावर इतका वारा असेल तर पुढे पंबनचा पूल आणि धनुषकोडीला तर किती जास्त वारा असेल! थोडं पुढे आल्यावर मोकळा निसर्ग परत मिळाला! गेले अनेक दिवस दाट वस्तीच्या केरलममध्ये होतो. त्यामुळे झाडं, शेतं, मोकळा निसर्ग बघायला मिळाला नव्हता. इथून पुढे परत तसा परिसर मिळणार! रस्तेही तसे आतलेच. पण उत्तम दर्जाचे!
एका चौकात हॉटेलमध्ये थांबलो. चहा बिस्किट आणि बाजूला दुसर्या हॉटेलात इडली चटणी असा नाश्ता केला. केळीच्या पानावरच इथे पदार्थ वाढले जातात. इथल्या एका मंदिरात पुणे जिल्ह्यातल्या एका गावाने देणगी दिलेली दिसली! मध्ये मध्ये लागणारी मंदिरंही सुंदर आहेत. चर्चसुद्धा काही ठिकाणी आहेत. पुढे मुख्य मार्गाला आलो तेव्हा अनेक सायकलिस्टस दिसले. बहुतेक ते २०० किलोमीटरची राईड करत असावेत. काही अंतर महामार्ग लागला. नंतर तिरूचेंदूरसाठी रस्ता परत किनार्याच्या बाजूला वळला. इथे चक्क ECR लिहीलंय! म्हणजे ईस्ट कोस्ट रोड सुरू झाला! व्वा!
तिरूचेंदूर बहुतेक प्रसिद्ध गाव आहे. त्यामुळे खूप ठिकाणी त्याचं अंतर लिहीलेलं दिसतं आहे. त्याबरोबर तिरूनेलवेली, टुटीकोरीन (तूतुकडी) अशा गावांचे अंतरही दिसत आहेत. पण वारा फार जास्त आहे! वेग लक्षणीय प्रकारे कमी होतोय. साधारण २१- २२ प्रति तास मिळणारा वेग अगदी १७- १८ किमी तास इतका कमी होतोय. इतक्या वार्यामुळेच पवनचक्क्याही आहेत इथे. आणि पुढे गेल्यावर तर अक्षरश: शेकडो पवनचक्क्या लागल्या! नक्कीच इथे मोठा वारा नेहमी वाहत असला पाहिजे. पण ह्याचाच अर्थ मला पुढेही हा उलटा वारा लागणार! रोज पोहचायला एक तास उशीर होणार! असो.
रस्ते अतिशय सुंदर. कुठेच काही कमतरता नाही. शाळांमध्ये जाणारी मुलं हात करतात! एखादी बस जाते तेव्हा बसमधून मुलं वळून बघतात! आज अकरावा दिवस आहे. सायकलीला काहीही झालं नाहीय. कदाचित पुढेही साधं पंक्चरही होणार नाही असं वाटतंय. तिच्याकडे लक्ष मात्र द्यावं लागेल. तिच्याशी बोलत राहावं लागेल, तिचं ऐकत राहावं लागेल!
११.३० च्या सुमारास अजून एकदा ब्रेकफास्ट केला. हॉटेलमधल्या लोकांसोबत अनौपचारिक बोलणं छान होतं. लोक बघता येतात, वाचता येतात! ह्या सगळ्या रस्त्यावर "तो" अगदी जवळ आहे. पण जवळ असूनही दिसत नाही! अगदी कुठे कुठे दूरवर त्याची निळी पट्टी दिसतेय. पण जास्त करून तो "जलवा जो ओझल भी है सामने भी है" आहे!
तिरूचेंदूरजवळ सेवा भारतीच्या एका कार्यकर्त्यांचं फार्म हाऊस आहे असं कळालं. पण ते थोडं लांब आणि तिथे कोणीच राहात नाहीत. आणि तिरूचेंदूरचं मंदिर बघण्यासारखं आहे. त्यामुळे तिरूचेंदूरमध्येच थांबायचं ठरवलं. श्री. विजय राजमोहनजींनी तिथली व्यवस्था केली. इथे सध्या यात्रा सुरू असलेली दिसते आहे. लोक अनवाणी पायी जाताना दिसतात. सोबत ऊस घेतलेला दिसतो. जसं उटीच्या बाजूला दिसत होतं तसंच दृश्य. गावातही खूप गर्दी असेल, असं सांगितलं होतं. प्रत्यक्षात गावात सुरूवातीला तेवढी गर्दी वाटली नाही. प्रसिद्ध असलं तरी लहान रस्त्यांचं छोटं गावच वाटतंय.
उलट्या वार्यामुळे साडेचार तासांच्या ऐवजी साडेपाच तास लागले. दुपारी १.३० ला तिरूचेंदुरला पोहचलो. मंदिराजवळच्या एका हॉटेलमध्ये आज थांबेन. हॉटेलात थांबण्यापेक्षा होम स्टे आवडला असता. किंवा कार्यकर्त्यांच्या घरीसुद्धा. पण शेवटी श्री. विजय राजमोहनजींनी सांगितल्याप्रमाणे हॉटेलात थांबलो. आजचे ९१ किलोमीटर आणि ११ दिवसांचे १०१७ किलोमीटर पूर्ण झाले! .
.
.
.
.
.
.
संध्याकाळी मंदिर आणि बीच बघायला बाहेर पडलो. इथे मंदिरात जाताना ड्रेस कोडचा फार विचार करावा लागतो! इथल्या देवाच्या अटी फार असतात! मंदिर परिसरातही उघडेबंब फिरणारे लोक दिसत आहेत. त्यामुळे मी अगदी आत न जाता बाहेरून परिसर बघेन. अहा हा! काय सुंदर उंच मंदिर आहे! विलक्षण! इतक्या लहान गावात इतकं भव्य आणि सुंदर मंदिर कसं काय असू शकतं! आणि एकच नाही, तर परिसरात बरीच छोटी मंदिरं आहेत. अरूलमिगु सुब्रमनिया स्वामी हे मुख्य मंदिराचं नाव. तिरूचेंदूर, तिरूपती किंवा तिरूअनंतपूरममधला थिर शब्द सुंदर आहे. स्थिर, शाश्वत असा त्याचा अर्थ!
अरे! इतक्या गर्दीत चक्क एक हत्तीसुद्धा जाताना दिसतोय. लोक तर प्रचंड आहेतच! कोणी मला ड्रेस कोड न पाळल्यामुळे अडवेल का, अशी भिती बाळगत बाळगत पुढे गेलो. बरेचसे लोक चपला न घातलेलेही आहेत. पण काही जण चपलावालेही आहेत! पुढे तसंच जाऊन कठड्याकडे आलो! आणि समोर तो! अहा हा! समोरच बीच आहे! मंदिराचं शिखर खूप वेळ बघितलं. इतरही वास्तु सुंदर आहेत! कळसाच्या बरोबर वर चंद्र दिसतोय! वा! बीचवरही अनेक जण आहेत. थोडा वेळ नुसता उभा राहिलो. मनसोक्त परिसर बघितला. बीचवर चहासुद्धा मिळाला! दक्षिण भारतीय मंदिरं! वेगळी वेशभुषा- केशभुषा! पांढर्या आणि इतर रंगाच्या दक्षिण भारतीय साड्या नेसलेल्या महिला! गजरेही वेगवेगळ्या रंगांचे!
अंधार पडल्यावर "त्याच्या" वर उगवलेला गुरूसुद्धा दिसला. गर्दीमधून हळु हळु परत फिरलो. दुपारी जेवलो होतो तिथे उत्तप्पा घेतला. हॉटेलमधल्या लोकांशी थोडं बोलणं झालं. संध्याकाळचं जेवण घेऊन हॉटेलवर परत आलो. इथे कोणी भेटले नाहीत. किंवा शाळा- महाविद्यालयामध्येही भेटणं नाही झालं. पण लोक वाचता आले, गाव अनुभवता आलं! आणि मंदिर! खरंच माझा योग खूप चांगला आहे! चक्क ११ दिवस पूर्ण झालेसुद्धा! पुढचे दिवस खूप लवकर संपणार असं वाटतंय! शिवाय एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जवळ जवळ परत मी कधीही इकडे येणार नाहीय ही जाणीव! त्यामुळे एक एक टप्पा, एक एक किलोमीटर किंवा एक एक पेडलही खूप युनिक अनुभव देतंय!
पुढील भाग: दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १२: तिरूचेंदूर ते सायलकुडी १०४ किमी
वाचल्याबद्दल धन्यवाद. माझ्या ब्लॉगवर ट्रेकिंग, आकाश दर्शन, विज्ञान प्रयोग, ध्यान, फिटनेस, सायकलिंग इ. बद्दलचे लेख उपलब्ध. -निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 26 मे 2026.
मिसळपाव
प्रतिक्रिया