मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

धूमकेतू C/2025 R3 (PANSTARRS) बघण्याचा अनुभव

मार्गी · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार

सूर्यमालेच्या काठावरून म्हणजे उर्ट मेघ क्षेत्रातून (Oort cloud region) सूर्याला भेटायला येणारे पाहुणे म्हणजे धूमकेतूू! सध्या सूर्याला भेटायला आलेला हा पाहुणा म्हणजे धूमकेतू सी/ 2025 आर3 (पॅनस्टार्स) तब्बल एक लाख सत्तर हजार वर्षांनी भेटायला आला आहे. हा अवधी सांगता येणं ही, निरीक्षण, विज्ञान आणि गणिताची कमाल. सूर्यमालेत धूमकेतू येत असतातच. पण छोट्या टेलिस्कोप किंवा बायनॅक्युलरने बघता येतील असे धूमकेतूू दुर्मिळ असतात. त्यातला हा एक.

हा धूमकेतू गेले काही दिवस हळु हळु तेजस्वी होतो आहे. धूमकेतूू गोठलेले वायू आणि धुलीकणांपासून बनलेले असतात. धूमकेतूू जेव्हा सूर्याजवळ येतो, तेव्हा सूर्याच्या उष्णतेमुळे हे गोठलेले वायू वितळतात आणि धूमकेतूूला शेपटी येते आणि त्याची तेजस्वीताही वाढते. हा धूमकेतूू आता सूर्याच्या जवळ जाऊन परत फिरणार आहे. त्यामुळे पुढचे काही‌ दिवस तो अधिक तेजस्वी होईल पण आपल्याकडून बघताना सूर्याच्या जवळ दिसेल आणि म्हणून बघायला कठिणही होईल. हा धूमकेतूू छोट्या टेलिस्कोप व बायनॅक्युलरच्या "कक्षेत" येऊन बरेच दिवस झाले होते. तो बघण्याचा प्रयत्न दोन वेळेस केला. पहाटे पाचला दुर्बीण आणि बायनॅक्युलरने त्याला बघण्याचा प्रयत्न केला. पण शहरातल्या प्रकाश प्रदूषणामुळे तो दिसलाच नाही! धूमकेतूू सूर्याच्या आणखी जवळ जाऊन सूर्याच्या तेजामुळे दिसेनासा होण्याच्या आधी आज पहाटे मावळमधल्या अंजनवेलला अखेर हा धूमकेतूू बघता आला! नकाशात दिलेल्या जागी लगेचच सापडला. १५ X ७० बायनॅक्युलर आणि साडेचार इंची रिफ्लेक्टर दुर्बिणीतून सहज दिसला. बंदिस्त तारकागुच्छ किंवा देवयानी आकाशगंगेसारखा ठिपका! फोटोमध्ये त्याचा हिरवा रंगही स्पष्ट आला.

<img src= "https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczMUQNYHaS8MxmUHfJDNRyeMC4oU8c…; alt=" "width= “500” />
.
<img src= "https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczPeyzfrqwOpXUbPdBCPFeOEiaz6yz…; alt=" "width= “500” />
.
<img src= "https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczNApXOkSx3n7T6-MhI1n-OGL4MlRR…; alt=" "width= “500” />

(<a href="https://www.instagram.com/p/DXHeA8DiP_L/?img_index=1"&gt;धूमकेतूूसह काल रात्री व आज पहाटे घेतलेले विलोभनीय आकाशगंगेचा पट्टा, कृत्तिका तारकागुच्छ, ओमेगा सेंटारी तारकागुच्छ, हर्क्युलसमधला तारकागुच्छ व इतर फोटोज इथे बघता येतील.</a> पुण्याजवळ मुलांचं एक शिबिर ठरलं आहे.)

अंजनवेलच्या प्रकाश प्रदूषणापासून दूर आणि निसर्गरम्य जागेतून रात्री खूप सुंदर आकाश बघता आलं. नुसत्या डोळ्यांनी खूप जास्त तारे दिसले! दुर्बीण आणि बायनॅक्युलरमधून अनेक तारकागुच्छ दिसले. अंधार पडल्या पडल्या शुक्राने पहिला तास गाजवला. एप्रिलमध्ये मावळतीकडे कललेल्या सप्त मातृका म्हणजे कृत्तिकांचा सुंदर फोटो घेता आला. नंतर गुरूचे उपग्रह, पुष्य तारकागुच्छ अर्थात् बीहाईव्ह क्लस्टर, मृगातला तेजोमेघ आणि इतरांची मैफिल सुरू झाली. अंजनवेलचं आकाश इतकं नितळ की दिवसाचा निळा रंगही लोभस दिसतो! रात्री तर काय काय बघू असा प्रश्न पडतो. मनसोक्त निरीक्षण केलं आणि भरपूर फोटो काढले. बघता बघता माथ्यावर असलेली सिंह रास पश्चिमेला कलली! अनुराधा उगवल्या आणि ओमेगा सेंटॉरी तारकागुच्छही वर आला. सप्तर्षीतली आकाशगंगा M81 सुद्धा दिसली. अखेर पहाटे साडेचारला धूमकेतूूसाठी तयार राहायचं ठरवून पहुडलो. मोबाईलचं फोटो घेण्याचं काम सुरूच राहिलं आणि त्यातून नंतर वृश्चिक ते श्रवण असा आकाशगंगेच्या पट्ट्याचा सुंदर टाईमलॅप्स मिळाला.

पहाटे साडेचारला उठून पूर्व क्षितिज नीट दिसेल अशा जागी दुर्बीण नेली. मोबाईल आणि बायनॅक्युलर तयार ठेवले. आणि अगदी सहज धूमकेतूू सापडला! पूर्व भाद्रपदा नक्षत्र अर्थात् महाश्वच्या मध्यभागी अपेक्षित जागी बघितल्या बघितल्या सापडला. प्रकाश प्रदूषण अगदी कमी असल्यामुळे तो बघण्यामध्ये अडथळा नव्हता. डोळ्यांनी मात्र दिसला नाही. पण मोबाईलच्या एक्स्पोजर फोटोग्राफीमध्ये उमटला आणि टेलिस्कोपमधून स्पष्ट दिसला!

पुढचे तीन- चार दिवस हा धूमकेतूू शहराच्या बाहेरून पहाटे सूर्योदयाच्या थोडं आधी बघता येऊ शकेल. तो तेजस्वी होईल पण सूर्याच्या जवळ असल्यामुळे बघायला कठिण असेल. आणि धूमकेतूू सूर्याचं दर्शन घेऊन पुढच्या आठवड्यात परत फिरेल तेव्हा तो संध्याकाळच्या आकाशात येईल खरा आणि तेव्हाही तो तेजस्वी असेल. पण तेव्हा दक्षिण गोलार्धातून तो जास्त चांगला दिसू शकेल. त्यामुळे *त्याला बघण्याची सर्वोत्तम संधी पुढचे दोन दिवस हीच आहे.* अर्थात् त्यासाठी जवळ कोणतंही शहर नसलेलं अंधारं आकाश आणि एखादा बायनॅक्युलर लागेल. आणि स्मार्टफोनमधून योग्य पद्धतीने त्याचा फोटोसुद्धा घेता येऊ शकेल.

वाचल्याबद्दल धन्यवाद. माझ्या ब्लॉगवर ट्रेकिंग, आकाश दर्शन, विज्ञान प्रयोग, ध्यान, फिटनेस, सायकलिंग इ. बद्दलचे लेख उपलब्ध. -निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 14 एप्रिल 2026.


वाचने 7 वाचनखूण प्रतिक्रिया 0