मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव ३: मलावली ते गुंडलुपेट ९८ किमी

मार्गी · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार

✪ कर्नाटकातील रम्य सरोवरे आणि कावेरी नदी
✪ छोटी गावं आणि शांत रस्ते
✪ बेगूरच्या ऐवजी गुंडलुपेटमध्ये मुक्काम
✪ बांदीपूर राष्ट्रीय उद्यान आणि मधुमलाई व्याघ्र राखीव क्षेत्रातून प्रवास
✪ दक्षिण भारतातील शिस्त आणि सहकार्याचा अनुभव
✪ गुडलूरमधील मराठी बोलणार्‍याची‌ भेट!
✪ दक्षिण भारतीय कुटुंबीयांची आपुलकी
✪ पोंगलची पूर्वसंध्या आणि उटीच्या उंबरठ्यावर

नमस्कार. जानेवारीमधल्या सायकल प्रवासाचे अनुभव शेअर करत आहे. १३ जानेवारीची‌ सकाळ. सायकल प्रवासाचा दुसरा दिवस. काल मलावलीमध्ये चांगला आराम झाला. आजचा टप्पा आधी बेगूरपर्यंत होता. पण ते छोटं गाव असल्यामुळे तिथे थांबण्याची सोय लगेच मिळत नव्हती. म्हणून श्री कृष्णा जी, श्री निरंजन कुमार जी आणि इतरांच्या सांगण्यानुसार बेगूरच्या पुढे १४ किलोमीटरपर्यंत जायचं ठरवलं. त्यामुळे थोडा उशीर होणार होता पण पर्याय नव्हता. कालच्या अनुभवावरून वाटलं की, फार तर एकच्या ऐवजी दीडपर्यंत पोहचेन. हा विचार करून पावणेसातला निघालो. आजचा टप्पा मोठा झाला तरी पुढचा टप्पा छोटा होईल.

<img src= "https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczMweXczVT0ve6128lXBfaQjB-JMCa…; alt=" "width= “500” />
.
<img src= "https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczMVVKIaCSOt-F1Hsw7mohj8JcYgSF…; alt=" "width= “500” />
.
<img src= "https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczPx23TylYjCIW_ai-V616OSaO1MgL…; alt=" "width= “500” />
.
<img src= "https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczNpqntqAd-ega2psRMs6aSlFFwnTj…; alt=" "width= “500” />

(<a href="https://niranjan-vichar.blogspot.com/2026/03/south-india-cycle-expediti… ब्लॉग इंग्रजीत इथे वाचता येईल, सायकल प्रवासातले फोटो बघता येतील‌ व सर्व लेख एकत्र वाचता येतील.</a> त्याशिवाय विज्ञान प्रयोग, गणितातील गमती, ट्रेकिंग, ध्यान, आकाश दर्शन, फिटनेसबद्दलचे लेख तिथे वाचता येतील.)

कर्नाटकातली जुनी राजधानी आणि सत्ताकेंद्र असलेल्या मैसूरच्या बाजूने जाणारा रस्ता! छोटी गावं, शांत रस्ते! आकाशही निरभ्र आहे. आता बंगलोरचे ढग आणि दमटपणाचा मागमूस नाहीय! सायकलिंगचा दुसरा दिवस असल्यामुळे मनही बरचसं शांत झालंय. फक्त पुढच्या टप्प्यावरच्या वन क्षेत्राची काळजी वाटते आहे. इथून उटीकडे जाणारा रस्ता राष्ट्रीय उद्यानातून जातो. तिथे हत्ती आणि इतर वन्य प्राणी आहेत. सायकल नेऊ देतील का आणि नेऊ दिल्यावर राईड करता येईल का ही शंका आहे. पूर्वी‌ तर इथे सायकलिस्टस गेलेले आहेत. ही गोष्ट मनामध्ये सतत येते आहे. अर्थात सुंदर आसमंत आणि हळु हळु मागे जाणारी गावं- लोक- दृश्य ह्यामुळे मन प्रफुल्लित होतं आहे.

मुख्य हायवेला इडलीचा नाश्ता केल्यानंतर आतला रस्ता घेतला. काही अंतर अगदी निर्जन परिसर आहे. छोटी गावं, शेतं आणि शांत परिसर! पण रस्ते अगदी चांगले. वाटेत छान सरोवरं लागली. पुढे नरसीपूराजवळ दोन नद्या लागल्या. त्यातली एक कावेरी! कावेरीवरचा पूल अगदी छोटा आहे, त्यामुळे थांबता आलं नाही. अंतर्गत रस्त्याला अनेक वळणं आहेत, त्यामुळे थोडं बघून बघून जातोय. ह्या आतल्या रस्त्यांवर वाटेतले लोक थोडं बोलत आहेत. एका रिक्षावाल्याशी थोडा वेळ गप्पा झाल्या. हळु हळु दूरवर डोंगर दिसायला लागले! पुढे नंजानगुड गाव आणि श्री‌ वेंकटेश्वरा मंदिर लागलं. इथे रेल्वे लाईनही आली आणि मैसूर- उटी महामार्ग आला.

आज हेडविंड बराच जास्त आहे. त्यामुळे अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागतोय. दुपारचं ऊनसुद्धा आहे. आणि आज दुसराच दिवस असल्यामुळे मूमेंटम तेवढा नाहीय. त्यामुळे थोडा जोर लावावा लागला. आसमंत मध्ये मध्ये बदलतोय. शेतं आणि छोटी गावं जाऊन आता औद्योगिक परिसर आला आहे. डोंगरही जवळ येत आहेत. हळु हळु बेगूर आलं. तिथून पुढे उतार असेल असं वाटलं होतं. पण तसा उतार नाहीय. परत एक ब्रेकफास्ट केला आणि जात राहिलो. अपेक्षेपेक्षा थोडं उशीरा म्हणजे दोन वाजता गुंडलुपेटला पोहचलो. इथे अशोकजींनी गेस्ट हाऊसमध्ये व्यवस्था केली होती. पण राहुल गांधींच्या दौर्‍याच्या प्रोटोकॉलमुळे ते बदलावं लागलं. नंतर त्यांनी दुसर्‍या एका लॉजमध्ये व्यवस्था केली. त्यात थोडा वेळ गेला. नंतर त्यांनी आपुलकीने जेवणाचीही व्यवस्था करून दिली. असं आजचं अंतर ९८ किमी अधिक दोन म्हणजे शंभरच झालं! गुंडलुपेट! दमायला झालं, पण पुढे व्यवस्था चांगली झाली.

दुपारी आराम करून लॅपटॉपवर काम केलं. परभणी आकाशवाणीच्या कार्यक्रमासाठी फोनवरून रेकॉर्डिंगही केलं. हॉटेलचं खाऊन पोटाला थोडा त्रास होतो आहे. पण अपेक्षितच आहे. विशेष म्हणजे मला हव्या त्या चिक्क्या सगळीकडे मिळत आहेत. त्यामुळे तेवढी अडचण नाहीय. आता प्रश्न आहे की, उद्या वनातून जाताना कसं होईल???

<img src= "https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczO_2wFRUx03jOi6vq4wS43_ZzFEfn…; alt=" "width= “500” />
.
<img src= "https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczOioeBIggLLGjpUw4pv6U4-VbZpbQ…; alt=" "width= “500” />
.
<img src= "https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczOGmjT7VchgzCSYNeowbl48M7a4fu…; alt=" "width= “500” />

<strong>जंगलातला थरारक प्रवास!
</strong>
१३ जानेवारीला गुंडलुपेटमध्ये आराम चांगला झाला. १४ जानेवारीची सकाळ! सायकल प्रवासाचा चौथा दिवस! आवरून निघालो. मनामध्ये शंकाकुशंका तर आहेतच. हत्ती- वाघ समोर असताना सायकलवर कसं जाता येईल हा प्रश्न आहे! पण जे होईल ते बघू म्हणून निघालो! सकाळचं स्वच्छ आकाश आणि नुकताच झालेला सूर्योदय! इथून बांदीपूर राष्ट्रीय उद्यानाचं गेट साधारण १४ किलोमीटरवर आहे. ह्या महामार्गावर चक्क नागापट्टीणमची पाटी दिसते आहे!

अपेक्षेप्रमाणे गेटवर वन रक्षकांनी अडवलं! युटर्न घे म्हणाले! दुचाकी तर जात आहेत, जाऊ द्या म्हणून सांगितलं. पण ते नाही म्हणाले. त्यांनी सांगितलं की, पूर्वी सायकली जायच्या. पण आता जाऊ देत नाहीत. आणि इतर दुचाकी वेगात जाऊ शकतात. हत्ती अंगावर आला तर सायकल काय करणार! मुद्दा रास्त होता. त्यांना सांगितलं की, असा असा प्रवास करतो आहे. काही उपाय सांगा. किंवा अनेक ट्रक- लॉर्‍या जात आहेत. त्यामधून सायकल नेऊ‌ द्या. ते तयार झाले! वन रक्षकांनी खूपच सहकार्य केलं! अजिबात उद्धटपणा किंवा नकार नाही! थोडं‌ थांबावं लागलं, पण त्यांनी एका गाडीला थांबवून सायकल चढवूनही दिली! आणि जंगलातला थरारक प्रवास सुरू झाला!

अनेक ठिकाणी मोर, लाल माकडं, ससे दिसलेच. पण दोन ठिकाणी अगदी‌ जवळून हत्ती दिसले! लॉरीमधून वन अगदी‌ जवळून बघता आलं. ड्रायव्हर आणि एक वन रक्षक ह्यांच्यासोबत वेगळ्याच गप्पा झाल्या! थोडं हिंदी, थोडं इंग्लिश असं करत बोलणं झालं! पुढे बांदीपूर राष्ट्रीय उद्यानाची‌ हद्द संपून मधुमलाई व्याघ्र राखीव क्षेत्राची हद्द सुरू झाली! आणि तमिळ नाडूही सुरू झाला! खूप दाट जंगल. जवळून वाहणार्‍या नदीमध्येही हत्ती दिसले! काही आदिवासी गावंही इथे दिसले. ३० किलोमीटरचा प्रवास वनातून झाला. पलीकडच्या गेटवर लॉरीतून उतरलो. तो गुडलूरला सोडायला तयार होता, पण पुढचं अंतर सायकलवरच जावसं वाटलं. अर्थात् ते फार नव्हतं. साधारण १० किलोमीटरचा प्रवास करून गुडलूरला पोहचलो! उटीचे डोंगर अगदी जवळ आलेले आहेत!

गुडलूर! उटीच्या पायथ्याचं‌ वेगळंच गाव. इथे कालिकतचाही‌ बोर्ड दिसला! केरळची सीमासुद्धा फार लांब नाहीय. चढ- उतारांवर वसलेलं आणि कोकणची आठवण करून देणारं गाव. तमिळ नाडू आणि पोंगलची पूर्व संध्या! इथेसुद्धा सुरूवातीला कोणत्या संस्थेची माहिती‌ मिळाली नव्हती. पण चिन्मय मिशनच्या स्वामी सुंदर चैतन्यजींनी ओमप्रकाशजींशी जोडून दिलं. ते इथे संघाचं काम करतात. ते खरं तर बाहेर जाणार होते. पण मला थोडा वेळ भेटले. संघ कार्यालयात त्यांनी माझी व्यवस्था केली. बस स्टँडपासून संघ कार्यालयापर्यंत त्यांनी मला रस्ता दाखवला. वाटेत त्यांच्या ओळखीचे अनेक जण भेटले! ते बाहेर जाणार होते, म्हणून नंतर त्यांनी पप्पू सामीजींशीही माझं बोलणं करून दिलं. ह्या दोघांना भेटताना कुठेच पहिल्यांदा भेटलोय असं वाटलं नाही.

तिसर्‍या दिवसाचं सायकलिंग अगदी थोडं झालं. ५१ किलोमीटरच्या ऐवजी ८ आणि १४ असे फक्त २२ किमीच झाले. एका अर्थाने बरंच झालं. उद्या उटीच्या वाटेवर २० किमीचा विशाल घाट आहे! त्यामुळे आज आराम मिळाला ते चांगलंच. दुपारी‌ जेवायला शोधत शोधत एका ठिकाणी गेलो. आणि काय गंमत! हॉटेलवाला चक्क मराठी बोलणारा निघाला! त्याने १० वर्षं तळेगांव दाभाडेत काम केलं होतं! दोघांनाही छान वाटलं. मराठी चांगल बोलत होता! आणि त्याला इतकं मस्त वाटलं! योग असं जोडतो आणि परत जोडतो! तिथेच थोडा वॉक केला आणि नंतर एक जवळचं मंदिरही बघितलं. चहावर संशोधन करणारं महामंडळही दिसलं!

लॉरीमधून सायकल आणताना एक नट निघालेला दिसला होता. लॉरीमध्ये सायकल आडवी केली होती, तेव्हा धक्का लागून निघाला. आधी वाटलं की तो सायकल स्टँडचा नट असेल. पण इकडे पोहचल्यावर नीट बघितल्यावर कळालं की, तो कॅरीअरच्या एका रॉडचा आहे. त्यामुळे कॅरीअर थोडं लूज झालं आहे. सोबतच्या ऍलेन की च्या मदतीने त्याला थोडं घट्ट केलं. अगदी योग्य नाही, पण तात्पुरतं जमलं. पुढे ते नीट करून घ्यावं लागेल. अन्यथा सामान घसरू शकतं. असो.

संध्याकाळी पप्पू सामीजी भेटले. त्यांना इंग्लिश नीट येत नव्हतं, म्हणून त्यांनी दुभाषी म्हणून त्यांच्या मुलीला आणलं. त्यामुळे बोलणं छान झालं. नंतर ते घरी घेऊन गेले. तिथून उटीच्या घाट वाटेवरचा परिसर छान दिसला! त्यांच्या घरी सुरू असलेली पोंगलची तयारी बघता आली. नंतर त्यांनी गुडलूरच्या थोडं बाहेर असलेलं एक मंदिर दाखवलं. अगदी निर्जन आणि वनातून जाणारा रस्ता! रात्रीच्या स्वच्छ आकाशात तेजस्वी गुरू आणि इतर तारे दिसले! नंतर सर्वाणा भवनमध्ये जेवण झालं. ओमप्रकाशजी आणि पप्पू सामीजींना भेटून खूप छान वाटलं. आणि एका अर्थाने खरा भारत कसा असतो, संघ काय असतो, हेसुद्धा जाणवलं. गावात सगळीकडे पोंगलची तयारी आणि सजावट सुरू झाली आहे! तिसरा दिवस तसा सायकलिंगच्या दृष्टीने शांत गेला. पण जंगलातला थरारक प्रवास झाला! आणि आता उद्या घाटाची मोठी परीक्षा! बघूया कसं होतंय. वाचल्याबद्दल धन्यवाद!
<strong>
पुढील भाग: दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव ४: पोंगल आणि गुडलूर- उटी- वेलिंग्टन ६७ किमी</strong>

वाचल्याबद्दल धन्यवाद. माझ्या ब्लॉगवर ट्रेकिंग, आकाश दर्शन, विज्ञान प्रयोग, ध्यान, फिटनेस, सायकलिंग इ. बद्दलचे लेख उपलब्ध. -निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 19 मार्च 2026.


वाचन 26 प्रतिक्रिया 0