मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

राजस्थानची रोजनिशी : २ : सिटी पॅलेस, जंतर मंतर, हवा महल

आकाश खोत · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
जयपूरमधल्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात पेटपुजेने झाली. त्याला खरं तर महापूजा म्हणता येईल. प्याज कचोरी जयपुर ला प्याज कचोरी प्रसिद्ध आहे. रावत मिष्ठान्न भांडार, लक्ष्मी मिष्ठान्न भांडार अशी त्यासाठी प्रसिद्ध नावे आहेत. दोन्ही ठिकाणी खाण्याचा आम्हाला योग जुळुन आला. त्यापैकी माझ्या जयपूरलाच राहणाऱ्या सहकाऱ्याने रावतचे विशेष कौतुक केले. त्यानेच असंही सुचवलं की तिथे अगदी जाऊन खाण्याची गरज नाही, कारण तिथे प्रचंड गर्दी असते, तो स्वतः हल्ली पार्सल मागवुनच खातो. तर आम्ही आमच्या एअर-बीएनबीच्या पत्त्यावर सकाळी त्या कचोऱ्या आणि समोसे स्विगीमार्फत मागवले. मुलांचं आणि आमचं आवरे आवरेपर्यंत पार्सल येऊन त्यावर ताव मारून झाला. i1 मोठ्या शहरात तुम्हाला तिथले खास खाद्यपदार्थ खाऊन बघायचे असतील पण कधी तशा जागी प्रत्यक्ष जाणे तुम्हाला तुमच्या कार्यक्रमात बसवता येत नसेल तर हि एक चांगली सोय आता झालेली आहे. अर्थात काही पदार्थ हे तिथेच खाण्यात मजा आहे. पाणी पुरी, डोसे असे पदार्थ घरी मागवण्यात तेवढी मजा नाही. प्याज कचोरी मस्त होती. गंमत म्हणजे त्यात कांद्यापेक्षा बटाटा जास्त होता. आपण समोश्यात भरतो काहीसं त्या प्रकारचं सारण होतं, पण वेगळं होतं. आम्ही समोसासुद्धा मागवला होता त्यामुळे तेच सारण भरून फक्त वेगळे आकार काढले असं नव्हतं. आपल्याकडे मिळतात त्यापेक्षा वेगळीच होती कचोरी. नाश्ता अपेक्षेपेक्षा जरा गच्च झाला. सिटी पॅलेस त्यानंतर आम्ही भटकंतीची सुरुवात केली सिटी पॅलेस मधुन. सिटी पॅलेस आणि राजघराण्याची मालकी असलेल्या आणखी काही वास्तु आणि स्मारकांचे तिकीट तुम्ही एकत्र घेऊ शकता. ते किंचित स्वस्तही पडतं आणि मुख्य म्हणजे पुन्हा पुन्हा रांगेत उभे राहायचे कष्ट वाचतात. असंच जयपूरमधल्या इतर सरकारी व्यवस्थापन असलेल्या आणखी ३-४ गोष्टींचं एक संयुक्त तिकीट आहे आणि त्याची एक ऑनलाईन वेबसाईट आहे. ती अत्यंत फालतु आहे. मी आणि समीर आम्ही दोघांनी बरेचदा ऑनलाईन तिकीट काढण्याचे प्रयत्न केले, काही प्रयत्नांनंतर पेमेंटपर्यंत गाडी पोहोचली आणि आमच्या खात्यातुन पैसे कटूनही तिकीट मात्र निघालंच नाही. ते कटलेले पैसे ट्रिप संपल्यावर कधीतरी आम्हाला परत मिळाले. तोपर्यंत जीवाला घोर होता कारण आम्ही ६ तिकिटे एकत्र काढत होतो. i2 थोडक्यात सांगायचं तर तुम्ही जयपूरच्या कुठल्याही पर्यटन स्थळी गेलात तर तिथे तिकीट खिडकीवर जाऊन तिकीट काढणे आणि ते काढताना संयुक्त तिकीटाची चौकशी करून ते समक्ष घेणे उत्तम. एका ठिकाणी रांगेत जावे लागेल, पण हे पैसे कटून ते परत येण्याची वाट बघत बसण्यापेक्षा बरं. सिटी पॅलेसला तिकीट खिडकीवर जे कर्मचारी होते त्यांना तिकिटे विकण्यात जराही रस दिसत नव्हता. अतिशय कंटाळवाण्या सुरात एक एक वाक्य बोलायला जड होत असल्यासारखे ते बोलत होते. त्यांच्याकडून संयुक्त तिकिटांची माहिती घेऊन ते घेणे हे एक काम कसेतरी पार पडले. तिथे एक अत्यंत महागडे (जवळपास ४००० प्रत्येकी) तिकीट सुद्धा आहे, त्यात तुम्हाला इतर सामान्य पर्यटकांना मिळत नाहीत अशा महालाच्या आणखी अंतर्गत दालनांमध्ये जाण्याची परवानगी मिळते आणि शाही परिवार उपलब्ध असेल तर त्यांनाही भेटायची संधी मिळते असे ऐकले. जयपुर, उदयपुर दोन्ही ठिकाणच्या राजांनी मोठमोठे महाल बांधले, ते वाढवत नेले. स्वातंत्र्यानंतर त्यांचे राज्य तर खालसा झाले, परंतु त्यांना हे महाल आणि काही मोठमोठ्या खाजगी मालमत्ता मात्र तशाच ठेवता आल्या. त्यांना सुरुवातीला पेन्शन मिळत असे, पण इंदिरा गांधींच्या काळात तीही बंद झाली. पर्यटन वाढले तसे त्यांनी आपल्या या वास्तुंचे रूपांतर संग्रहालय, स्मारक, आलिशान हॉटेल अशा गोष्टींमध्ये केले आणि आज हेच त्यांच्या उतपन्नाचे एक प्रमुख स्रोत आहेत. i3 सिटी पॅलेसला आम्ही गाईड घेतला. जवळपास सर्व ठिकाणी गाईडची सेवा ठराविक दराने उपलब्ध आहे. तुमच्या समूहात किती लोक आहेत या नुसार गाईडची फी ठरते. शक्यतो लहान मुलांना तुम्ही स्वतः मोजु नका, मोठ्यांचा आकडा सांगा. त्यांना एखाद दुसऱ्या मुलाकडे पाहुन उंचीनुसार वाटले कि त्यांना सुद्धा पकडावे तर तशी बोलणी करता येते. आम्हाला सहसा ४ मोठे पकडुन ४००-५०० रुपये लागत होते. एक दोन ठिकाणी आम्ही गाईड नाही घेतला, त्याबद्दल पुढे लिहीनच. पण जिथे जिथे घेतला तिथे एक अपवाद वगळता आम्हाला गाईड सोबत घेणे योग्यच वाटले. काही मंडळी हल्ली अशा ठिकाणी फक्त फोटो काढायला, रील बनवायला येतात आणि जागेबद्दल, इतिहासाबद्दल काही न जाणून घेता पुढे जातात. इतिहास तुम्ही वाचुही शकता, पण सर्वांनाच तेवढा रस नसतो. सरावलेल्या गाईडला कुठल्या ठिकाणी काय सांगायचे, किती बोलायचे, सर्वसाधारणपणे लोकांना कुठल्या गोष्टी आवडतात, कुठे जास्त कुतूहल वाटते, हे माहित असते. ते त्यांच्या ठराविक वेगाने बरोबर तासाभरात तुम्हाला छान सफर करवुन आणतात. वाचनाची आवड असलेल्या आणि नसलेल्या सर्वांनाच इतिहासाची एक छोटी ओळख होते, ज्याला काही थोडीफार माहिती असेल त्याची गाईड सोबत रंजक चर्चाही होऊ शकते. जयपुर हे शहर अठराव्या शतकात राजा सवाई जय सिंग (शिवरायांच्या इतिहासातल्या मिर्झा जयसिंग यांचे वंशज) यांनी वसवले. आमेर ही त्यांची आधीची राजधानी होती. तिथे वाढती लोकसंख्या आणि पाण्याची कमतरता या कारणामुळे त्यांनी तिथुन काही अंतरावर असलेल्या जागेत हे शहर वसवले. नव्याने वसवल्यामुळे इथे त्यांना बऱ्यापैकी नियोजन करणे शक्य झाले. इथला महाल हा त्यांच्या वंशजांनीच वाढवत वाढवत आपल्याला दिसतो त्या स्वरूपात आणलेला आहे. i4 इथे सुरुवातीला एका संग्रहालयात आम्ही फिरून आलो. राजवंशातल्या वेगवेगळ्या व्यक्तींनी वापरलेली उंची वस्त्रे, रेशमी, सोन्याचा मुलामा असलेले कपडे, त्यांची हत्यारे, त्यातही सोने चांदीच्या मूठ असलेल्या तलवारी, भाले, त्यांच्या मनोरंजनाची साधने इत्यादी गोष्टी होत्या. त्यापैकी एका राजाची उंची कमी आणि जाडी अत्यंत जास्त असं असल्यामुळे त्यांचे कपडे फारच वेगळ्या आकाराचे होते. i5 i6 मध्ये एका दालनामध्ये सूक्ष्मचित्र, जयपुरी साड्या आणि शाली रजया वगैरे, अत्तरे असे बनवणारे कलाकार कारागीर बसले होते. याला ३६ कारखाना असं नाव होतं. जयपूरच्या राजघराण्याशी संबंधित असलेले पिढीजात कलावंत, ज्यांनी पूर्वी राजांसाठी अशा गोष्टी बनवल्या असतील, आज त्याच गोष्टी त्या सर्वसामान्यांना विक्रीसाठी उपलब्ध आहेत आणि राजघराण्याने त्यांना हि जागा विनामूल्य उपलब्ध करून दिली आहे अशी माहिती गाईडने दिली. राजाश्रयाने इथली कला किती बहरली हे तर आम्ही ठिकठिकाणी पाहतच होतो. i7 i8 i9 i10 त्यानंतर आम्ही महालाच्या २-३ भागांमध्ये फिरलो. वेगवेगळ्या प्रसंगी आणि जमलेल्या संख्येनुसार जिथे दरबार किंवा सभा भरत असे अशा जागा होत्या. तिथे एका ठिकाणी महालाच्या मधोमध अशी मोकळी जागा होती जिथे चार दिशांना चार दरवाजे होते. चारही दरवाजांवर खूप सुंदर रंगकाम केलेले होते. राजा प्रत्येक ऋतूमध्ये वेगळ्या दाराने प्रवेश करत असे. हौसेला अंत नसतो. इथल्या राजांच्या लहरी आणि ऐशो आरामाचे प्रकार पाहुन थक्क व्हायला होतं. i11 i12 पुढे एक चांदीची महाकाय घागर पाहिली. याची चांदीचे सर्वात मोठे पात्र असा विश्वविक्रम म्हणून नोंद झालेली आहे. ब्रिटिशांच्या काळात इथल्या एका राजाला इंग्लंडला जायचे होते. तो अत्यंत धार्मिक होता, फक्त गंगाजलानेच अंघोळ करत होता म्हणे. तिकडे जाऊन कसं हे करता येईल यासाठी हे पात्र खास बनवले गेले. या घागरीत गंगाजल भरून ते जहाजात घेऊन राजा इंग्लंडला गेला. त्या काळात भारतीय राजांची छानछोकी कुठल्या स्तरावर गेली होती याचा यावरून अंदाज येतो. i13 जयपुरमध्ये राहणारा राजा धार्मिक आहे म्हणुन तिथे गंगाजल मागवुन रोज फक्त तेच वापरतो. म्हणजे त्याच्याच राज्यातले इतर लोक, भारतात राहणारे इतर लोक धार्मिक नाहीत का? धार्मिक असण्याचा संबंध आपल्या वैयक्तिक आचरणाशी आहे कि आपल्याकडे असलेला पैसा अडका वापरून, इतरांना राबवुन त्याचा दिखावा करण्यात आहे? राजाला गंगाजल न्यायचंच होतं तर साध्या ५००-१००० घागरी घेऊनही नेता आलं असतं. परंतु एवढी नजरेत भरणारी महाकाय आणि तीही चांदीची घागर नेण्याचा हेतु धर्मपालन कि आपल्या धर्माचं स्तोम दाखवुन इतरांसमोर प्रदर्शन? आणि हे सगळं बघणारे इंग्रज याचा कसा विचार करत असतील? आपल्या धर्म आणि संस्कृतीबद्दल त्यांच्या मनात काय प्रतिमा तयार होत असेल? असे अनेक प्रश्न मला पडले. असो. शेवटी असे दालन पाहिले जिथे स्वातंत्र्यानंतर जयपूरच्या राजांच्या भेटीस सरदार वल्लभभाई पटेल आले, आणि यांच्यासमक्ष जयपूर भारतात विलीन झाले. तेव्हा त्यांना राजाच्या समान मानाचे आसन देण्यात आले होते. तेव्हा जी बैठक व्यवस्था होती, ती तशीच जपुन ठेवली आहे. i14 इथे आजूबाजूला जयपूरच्या अनेक पिढ्यातल्या राजांची चित्रे आणि छायाचित्रे आहेत. त्यापैकी एक राजे असे होते, ज्यांनी एकोणिसाव्या शतकात आपल्या आवडीची कॅमेरा आणला होता. त्यांनी हौस आणि सराव म्हणुन आपल्या दरबारातल्या अनेक माणसांची छायाचित्रे काढली होती. आज त्या माणसांना नावाने ओळख नसली तरी भारतात काढली गेलेली अगदी सुरुवातीची छायाचित्रे म्हणुन आजही ते अनामिक दृश्य स्मृतीत आहेत. हे राजेही भारतातले सुरुवातीचे छायाचित्रकार असावेत. i15 इथल्या शिल्प, चित्र आणि सर्वच रंगकामांमध्ये फार सुंदर बारकावे असतात. उदाहरणार्थ महालाच्या प्रवेशद्वारापाशी असलेले हे छोटेसे संगमरवरी हत्ती पहा. i16 आता या हत्तीवर बसलेला माहुत सुद्धा किती बारीकीने बनवलाय बघा. त्याची पगडी, त्याची दाढी, सगळं सुंदर पद्धतीने दाखवलं आहे. i17 मध्ययुगीन राजस्थानात प्रचलित असलेल्या अनेक प्रकारच्या पगड्या आणि पागोटे. यातले काही ग्रामीण भागात अजुनही वापरात आहेत. i18 इतर छायाचित्रे i19 i20 i21 i22 i23 जंतर मंतर सिटी पॅलेसच्या समोरच जंतर मंतर नावाचं स्थळ आहे. या भागातच (सिटी पॅलेस आणि चार दिवारी) मुख्य पर्यटन स्थळे असल्यामुळे तिथे इलेक्ट्रिक रिक्षावाले सतत फिरत असतात. तिथे तुम्ही शेअरिंग बेसिस वर इथुन तिथे जाऊ शकता किंवा तेच तुम्हाला आम्ही हि हि स्थळे फिरवुन आणतो असं पॅकेज देऊन सुद्धा ठरवायचा पर्याय देतात. हा भाग छोट्या रस्त्यांचा आणि गल्लीबोळांचा आहे त्यामुळे इथे कॅब करून अडकण्यापेक्षा हा पर्याय बरा आहे. तुम्ही कुठल्या वेळी तिथे पोहचुन सुरुवात करत आहात, किती वेळ शिल्लक आहे त्यानुसार तुम्ही हा निर्णय करू शकता. माझ्या मते जयपूरच्या अंतर्गत फिरण्यासाठी रिक्षा आणि काही बाहेरची ठिकाणे करण्यासाठी कॅब हा चांगला पर्याय आहे. जंतर मंतर या नावावरून हल्ली आपला समज काही तांत्रिक मांत्रिक गोष्टींची किंवा जादुटोण्याची जागा असा होऊ शकतो. जंतर हा यंत्र या शब्दाचा अपभ्रंश आहे, मंतर हा मंत्र या शब्दाचा. जंतर मंतर हे खगोलशास्त्राशी संबंधित भव्य आकाराची यंत्रे असलेले ठिकाण आहे. इथे मंत्र हा शब्द आपले देवाचे मंत्र या अर्थाने नाही तर खगोलीय गणिते करताना वापरलेली सूत्रे असा आहे. तुम्ही वैदिक गणिताशी परिचित असाल तर त्यात पाहिले असेल. त्यात गणिताच्या संकल्पना आणि सूत्रे सुद्धा श्लोक किंवा मंत्राच्या स्वरूपात लिहिलेली आहेत. i24 i25 i26 जयपुर शहर वासवणाऱ्या राजाला स्वतःस खगोल, ज्योतिष या विषयांमध्ये प्रचंड रस होता. त्यामुळे त्यांनी भारतात तीन शहरात जंतर मंतर बनवले. इथे सूर्य प्रकाश ज्या कोनात येतो त्यावरून वेळ समजेल, राशी, नक्षत्र वगैरे समजतील अशी यंत्रे आहेत. आधी ती यंत्रे छोट्या आकाराची बनवुन चाचणी केली गेली आणि मग त्याच्याच बाजूला मोठ्या आकाराची यंत्रे बनवली गेली. ज्योतिषशास्त्री या गोष्टी आकडेमोड करून मांडु शकतात, पण इथे ते अगदी सुलभ होते. इथे उजेड असतानाच जायला हवे तर आपण गाईड घेऊन या गोष्टी उत्तम रित्या समजावुन घेऊ शकतो. अशा ठिकाणी येऊनही या ठिकाणाचा फक्त फोटोसाठी पार्श्वभूमी म्हणुन वापर करून जाणारे लोक येतातच. i26 i27 i28 i29 इथल्या राजांच्या छानछोकीसोबतच कलाकुसर, छायाचित्रण, स्थापत्य, खगोल, ज्योतिष अशा विविध विषयांमधील आवड, त्यावर अभ्यास आणि त्याच्या विकासासाठी सढळ हस्ते केलेली मदत, असे विविध पदर समोर येत होते. जंतरमंतर मध्येसुद्धा कठपुतळी कार्यक्रम एका कोपऱ्यात चालु होता. चार लोक जमले कि एक गाणे सादर करून मग त्यांना बक्षीस मागणे, हि पद्धत इथे बऱ्याच ठिकाणी आहे. i30 बाहेर पडल्यावर आम्ही कुल्फी घेतली. त्याचा विशेष उल्लेख यासाठी, कि त्यांची देण्याची पद्धत अनोखी होती. कुल्फीच्या काडीला खालच्या बाजूने एक कागदी डिश मधोमध छिद्र करून वर सरकवुन त्याने दिली. याचा फायदा असा कि कुल्फी खाताना बऱ्याचदा जे ओघळ हातावर येतात ते रोखण्यासाठी हा एकदम साधा मस्त उपाय वाटला. i31 हवा महल जंतरमंतर नंतर आम्ही हवा महलला गेलो. हि जागा आजकाल प्रचंड लोकप्रिय आहे. याच्या आत काय आहे त्यासाठी नसून ती बाहेरून अतिशय सुंदर दिसते त्यामुळे. हल्ली लोक इंस्टाग्रामेबल प्लेसेस अशा रिल्स बनवतात, तशा जागा शोधून येतात, त्यात हि जागा टॉपला आहे. i32 i33 हि जागा सिटी पॅलेस च्याच एका बाजूला आहे आणि मुख्यतः राणी आणि राजवंशातल्या स्त्रियांसाठी हा महाल बनवला गेला होता. याची जी दर्शनी बाजू लोकप्रिय आहे त्याचे वैशिष्टय म्हणजे अनेक मजले एकावर एक असलेले सुंदर सज्जे आणि खिडक्या. इतक्या खिडक्या असल्यामुळे याचे नाव हवा महल पडले असावे. इथे फार काही ऐतिहासिक घटना किंवा रोचक गोष्टी नाहीत. इथे गाईड फक्त राणी इथून जात असे, तिथून खाली बघत असे, राणीला सर्व दिसत असे पण राणी कोणाला दिसत नसे, किंवा अमुक काच इकडून आली, तमुक माणके तिकडून आली अशा प्रकारची माहिती सांगतो. i34 i35 अगदी ह्याच गोष्टी आमेरच्या किल्ल्यामधील महालात सुद्धा आहेत, त्यामुळे तुम्ही तो बघुन येथे आलात किंवा तिकडे जाणारच असाल तर इथे गाईड नाही घेतलात तरी चालेल. i36 i37 i38 इथल्या बहुतांश सर्वच गाईडला तुम्हाला कुठल्यातरी दुकानात न्यायचंच असतं. त्यांचं कमिशन किंवा एक ठराविक फी असणार त्यामागे. पण इथल्या गाईडने कहर केला. आम्हाला हवा महल आतुन पाहुन झाल्यावर त्याची बाहेरची प्रसिद्ध असलेली बाजु बघायची होती. त्याच्या अगदी समोरच एक टॅटू कॅफे नावाचा कॅफे प्रसिद्ध झालेला आहे. तिथे मुख्य आकर्षण हवा महालाचा व्ह्यू तर आहेच पण तिथले खाद्यपदार्थही छान असल्याचा फीडबॅक होता. तिथे जायचं होतं. संध्याकाळी तिथेच काही तरी खायचा आमचा बेत होता. तसं मुलांनाही सांगुन ठेवलं होतं. या गाईडने मात्र परस्पर ओळखीची रिक्षा ठरवुन एक दीड किलोमीटर वर असलेल्या एका दुकानात न्यायचा प्रचंड आग्रह केला. आम्ही टॅटू कॅफेत जायचं आहे, इथे ग्रुप फोटो काढायचा आहे वगैरे सांगत होतो, त्यावर अरे वहा क्यू पैसे बरबाद करने है आप को, वहा बस फोटो खिचने के लिये लोग जाते है, उससे बढिया फोटो मै आपको खिचके दूंगा. (त्याने हवा महालाच्या आत फोटो मात्र खरंच चांगले काढले होते) बस दस मिनट आप चलिये. वहिपे आप को यहांसे बढिया खानेकी जगह दिखाऊंगा असा आग्रह लावला. आमच्यातल्या एक दोघांची त्याच्याशी हि हुज्जत चालु असताना इतरांना, मुलांना नीट न समजल्यामुळे ते रिक्षात जाऊन बसलेही होते. प्रचंड ट्राफिक आणि मागच्या गाड्यांचे भोंगे वाजायला लागले होते. शेवटी आम्ही बसलो. या दुकानाचं वर्णन त्याने दुकान असं न करता इथले कलाकार कारागीर रंगमहालात काम करायचे. त्यांच्यावर राण्यांचे नियंत्रण असायचे. आता इथल्या राणीच्या निगराणीखाली असलेल्या ठिकाणी तुम्हाला नेतो, ब्लॉक प्रिंटिंग दाखवतो असं केलं होतं. पण तिथे समोर गेल्यावर एखाद्या कारखाना किंवा महालाऐवजी साधं दुकान पाहुन सगळ्यांचा, विशेषतः मुलांचा फार हिरमोड झाला. त्यांना प्रचंड भुक लागली होती. तिथे एक गाईडने सांगितलेलं प्रसिद्ध थाळी रेस्टॉरंट खरंच होतं आणि गुगलवर उत्तम रेटिंगही होतं. पण ते सुरु व्हायला आणखी पुष्कळ वेळ होता. मग आम्ही मुलांना आजूबाजूला कुठेतरी खायला न्यायला पर्याय बघत असताना त्याचा "बस दस मिनट यहां चलिये" असा आग्रह सुरूच होता. मग मात्र आम्ही त्याला झापलं. म्हटलं आम्ही आता मुलांना खाऊ घातल्याशिवाय कुठेही जाणार नाही, तुम्हाला जायचं तर तुमचे पैसे घ्या आणि निघा. मग तो जरा नरमला, आणि मी इथेच थांबतो म्हणाला. गोविंद देवजी मंदिर आम्ही मुलांना थोडं खाऊ घातल्यावर ती शांत झाली. जो होता है अच्छे के लिये होता है म्हणतात तसं झालं. या हॉटेलच्या बाजूलाच गोविंद देवजी मंदिर होतं. काल तिथले पट बंद असण्याची वेळ होती म्हणुन दर्शन राहुन गेलं होतं. आता तिथे पुन्हा तशीच वेळ लवकरच होणार होती, म्हणुन आम्ही अक्षरशः पळत पळत मंदिरात गेलो. बाहेरून नेमका अंदाज येत नसला तरी आत प्रशस्त आणि सुंदर मंदिर आहे. i39 i40 या मंदिराची कथा अशी कि, औरंगजेबाच्या हल्ल्याच्या भीतीने वृंदावनातील कृष्णाची मूर्ती राजस्थानात आणली गेली. इथल्या राजाने या मूर्तीला आपल्या महालातच एका बाजूला प्राणप्रतिष्ठा करून मंदिर बांधले. आणि मूर्तीची आख्यायिका अशी कि हि मूर्ती कृष्णाच्याच वंशातल्या नातवाच्या पिढीतील एकाने घडवली. त्याने आपल्या आईच्या इच्छेसाठी मूर्ती बनवण्याचा तीनदा प्रयत्न केला. पहिल्या दोनदा बनवलेल्या मूर्तीने आईचे समाधान झाले नाही, पण इथे असलेली हि तिसऱ्या प्रयत्नात घडवलेल्या मूर्तीने मात्र आई खुश झाली आणि हमारे गोविंदजी ऐसेही थे अशी त्यावर कौतुकाची मोहोर उमटवली. हि माहिती आम्हाला गाइडनेच दिली. आमचं खाणं आणि दर्शन होईपर्यंत तो दुकानात थांबलेलाच होता. त्याने आम्हाला इकडे आणल्यामुळे आमचा प्लॅन बदलला पण देवदर्शन झालं. गोविंदजींचं बोलावणं असावं. आम्हाला दुकानात सोडल्यावर तो निघायच्या तयारीत होता. मी त्याला मुद्दाम आठवण दिली, भैया आप तो हवा महल के सामने हमारी फोटो खिचने आने वाले थे... त्याचा चेहरा जरा अडकल्यासारखा झाला. मुलांचं थोडं खाणं आणि न ठरवता दर्शन झाल्यामुळे आम्ही आता जरा शांत झालो होतो, पण मघाशी त्याने जे आम्हाला भरीस पाडून इकडे आणलं होतं त्यामुळे मी त्याला त्याच्याच आश्वासनाची आठवण फक्त करून दिली, आणि मग ठीक है.. निकलीये आप, हम देख लेंगे म्हणुन निरोप दिला. ब्लॉक प्रिंटिंग आतमध्ये गेल्यावर दुकानदाराने आम्हाला ब्लॉक प्रिंटिंगचे प्रात्यक्षिक करून दाखवले. तुम्ही राजस्थानी प्रकारचे प्रिंटेड कपडे पाहिले असतील. संपूर्ण कापडावर एका विशिष्ट प्रकारचे डिझाईन पुन्हा पुन्हा छापलेले असते. लाकडी साच्यांच्या मदतीने हे केले जाते. आता हे मशीनच्या साहाय्याने सुलभ झाले असले तरी हे असे साचे वापरून आधी हाताने केले जायचे. हि जयपूरची शैली प्रसिद्ध आहे. i41 i42 एकाच दुकानात राजस्थानी स्त्रिया पुरुष दोघांचे कपडे, बेडशीट, रजया, गालिचे असे सर्व उपलब्ध होते. दोन तीन मजल्यांचे ते दुकान होते. तिथे थोडी खरेदी करून झाल्यावर आम्ही पुन्हा टॅटू कॅफेत जायचे ठरवले. टॅटू कॅफे टॅटू कॅफेची खासियत तिथला व्ह्यू असल्यामुळे तिथे प्रचंड गर्दी असते. सगळे पर्यटक तिथे फोटो काढण्यात वेळ घालवतात. त्यामुळे त्यांनी प्रति माणशी २५० रुपये अशी किमान प्रवेश फी ठेवली आहे. तुम्ही ती रक्कम खाण्यापिण्यात वसुल करू शकता. म्हणजे ४ लोक गेले तर किमान १००० रुपये द्यावे लागतीलच, तुम्ही ८०० रुपयांचं बिल केलं तर तुमचा तोटा.. जास्तीचं बिल झालं तर उरलेले पैसे शेवटी भरायचे. मघाशी जर ते थाळी रेस्टॉरंट चालु असते तर व्यवस्थित जेवणच झाले असते. पण ते बंद असल्यामुळे फक्त चाट पदार्थ खाऊन आमचे पुरेसे जेवण झाले नव्हते. त्यामुळे इतर कुठे आणखी खाण्यापेक्षा आपण कॅफेत गेलो तर तेवढे बिलाचे पैसे वसुल करण्या इतपत तर आपण खाऊच, आणि ह्या बाजूचा व्ह्यु गाईडच्या गडबडीत राहून गेला तोही पाहुन घेऊ असा विचार करून आम्ही तिथेच जायचे ठरवले. i43 तिथे गेल्यावर टॅटू कॅफेत किमान २ तास वेटिंग असल्याचे कळले. त्याच बिल्डिंगमध्ये खालच्या मजल्यावर आणखी एक तसाच कॅफे होता. टॅटू कॅफे इतका प्रसिद्ध नव्हता पण तिथे वेटिंग नव्हते, आम्हाला तसाच व्ह्यू आणि बाल्कनीच्या कडेला टेबल मात्र मिळाले. खाद्यपदार्थही आता टॅटू कॅफेची चव न घेतल्यामुळे तुलना करू शकत नाही, पण सर्वांची चव समाधानकारक होती. i44 संध्याकाळचं वातावरण छान होतं. आमची सगळी ऑर्डर एक एक करत येऊन सगळ्यांचं खाणं पिणं होई पर्यंत आम्हाला निवांत वेळ मिळाला. भरपूर फोटो काढून झाले. व्ह्यू खरंच सुंदर होता. तिथे रस्त्यावर, बाल्कनीज मध्ये, कॅफे मध्ये सगळ्यांची फोटो सेल्फी चालू होते. प्री वेडिंग शूट वाले अनेक कपल आणि त्यांच्या फोटोग्राफर्सची टीम सुद्धा इकडे तिकडे दिसत होते. आम्ही गेलो त्या कॅफेमध्ये सुद्धा दोन कपल्स आणि त्यांची टीम आलेली होती. त्यांच्याकडून जास्त पैसे घेतले असा आम्हाला अंदाज आला. त्यांचे थोडे आपापसात आणि स्टाफशी थोडे खटकेही उडाले, पण काही तरी तोडगा निघाला आणि त्यांचे आळीपाळीने फोटो काढणे सुरु झाले. आमचे खाणे चालु असे पर्यंत स्टाफ एकदम खुशमिसाज होता, तेच आमचं बिल बनल्यावर मात्र त्यांची आम्ही निघण्यासाठी घाई सुरु झाली. त्यांचा धंदाच खाण्यापिण्यापेक्षा त्या जागेमुळे जास्त चालत असल्यामुळे हे अपरिहार्य होते. असो. आमचा आजचा दिवस हवा महालासमोर हवा खात निवांत टेरेस डिनरने संपला. क्रमशः राजस्थानची रोजनिशी : १ : गलताजी मंदिर आणि चोखी धानी

वाचन 540 प्रतिक्रिया 0