मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रॉय ३ - ग्लेशियरचं गाव

किल्लेदार · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
रॉय !!! रॉय २ - सेरो तोरे फार फार पूर्वीची गोष्ट…पातागोनियाच्या विशाल डोंगराळ मुलुखात, अँडीज पर्वतांच्या सावलीत, अनेक आदिम जमाती नांदायच्या. त्यातल्याच तव्हेलचे जमातीच्या सरदाराला एक मुलगी होती, कलाफाते. अत्यंत रूपवान असलेल्या कलाफातेचं दुसऱ्या जमातीतल्या एका तरुणावर मन जडलं. हे आंतर-जमातीय प्रेम पोरीच्या बापाला काही मान्य नव्हतं. आपली लेक त्या तरुणाचा हात धरून पळून जाऊ नये म्हणून त्यानं रागाच्या भरात जादूनं तिचं एका काटेरी झुडुपात रूपांतर केलं. हे कळल्यावर विरहानं व्याकुळ झालेल्या तरुणानं अखेर त्या झुडुपाशीच प्राण सोडला. तेव्हापासून त्या जोडप्याच्या प्रेमाचं प्रतिक असलेल्या “कलाफाते” झुडुपाची निळसर, आंबटगोड फळं जो कुणी चाखतो तो पुनःपुन्हा इथल्या ओढीनं एल कलाफातेला परतून येतो अशी एक दंतकथा आहे. Patagonia's Twilight and Glowing Berries निळ्याशार लागो अर्जेंटीनोकाठच्या उंचसखल टेकड्यांवर वसलेलं एक लहानसं गाव, एल कलाफाते. साधी, समाधानी लोकं. रंगीबेरंगी छपरांची छोटी, टुमदार घरं. दूर, क्षितिरेषेवर लांबच लांब पसरलेली, बर्फानं झाकलेली, उत्तुंग अँडीज पर्वतरांग. सरोवरावरून येणारा भराटवारा अंगावर घेत डोलणारी गवताळ माळरानं. सरोवर अन् आभाळाच्या लांबरुंद निळ्या कॅनव्हासवर काढलेले उंच पॉपलर वृक्षांचे पिवळेधमक फराटे. त्या रंगसंगतीत भर टाकायला म्हणून लांब लांब ढांगा टाकत चालणारे काटकुळ्या पायांचे गुलाबी फ्लेमिंगो. उथळ काठाजवळचा गाळ चिवडत, मासे टिपतांना भसाड्या आवाजात एकमेकांशी हितगूज करणारे अपलँड गूज अन् इतर नाना जातींची बदकं. उगाचच भुंकायचा वसा टाकून दिलेली, तळ्याकाठी शांतपणे सुस्तावणारी गुबगुबित कुत्री. कुणालाही कसलीच अनाठायी धांदल, गडबड नसते. ज्याला त्याला झेपेल त्या गतीनं इथं प्रत्येकाचं आयुष्य पुढं पुढं सरकत असतं. 20250724_125524 20250718_154812 20250718_160433 एका टेकाडावर असलेलं हॉटेल, लहानसंच पण टापटिपीचं होतं. भिंतीवरल्या मोठ्या खिडकीतून खालचं गाव, हिरवी पिवळी झाडं आणि पलीकडल्या निळसर टेकड्या भिंतीवर टांगलेल्या एखाद्या चित्रासारख्या दिसत होत्या. अगदी पहाटेच, थकलेल्या पायांनी रॉयचा निरोप घेऊन बसमध्ये चढलो होतो. तेव्हा निदान आज तरी फार वणवण नको म्हणून ठरवलं की तासभर पडी टाकायची आणि दुपारी उशीरा जेवायला बाहेर पडायचं. बसल्या बसल्याच गाढ झोप लागली. PXL_20240403_154235604 लहानश्या डुलकीनंही बरीच तरतरी आणली. टेकाडावरनं खालच्या लिबर्टादोर अवेन्यूवर उतरलो. गावामधून जाणारा लिबर्टादोर अवेन्यू म्हणजे या छोट्याश्या गावाची धमनीच. बाकी गाव शांत असलं तरी इथं मात्र सर्वत्र पर्यटकांचा उत्साह सळसळत असतो. रस्त्याच्या दुतर्फा रंगीबेरंगी सुवेनरची, ब्रँडेड मालाची झकपक दुकानं, टूर कंपन्यांची ऑफिसं, नाना तऱ्हेची लहान मोठी रेस्टॉरंटस्, ब्रुवरीज, आईसक्रीम पार्लर्स, सगळं काही पर्यटकांनी गजबजलेलं असतं. 20250222_142005 20250222_143202 उन्हं डोक्यावर आली असली तरी हवा बऱ्यापैकी गार होती आणि त्यात नाष्टाही चुकलेला असल्यानं सपाटून भूक लागली. मिटबॉल्स विथ मॅश्ड पोटॅटो आणि जोडीला उगाच जरा घोटभर मॅलबेक वाइन असा सुटसुटीत पण चविष्ट लंच करून लागो अर्जेंटिनोकाठी लांबवर भटकून आलो. 20250216_152319 PXL_20240403_185041313 सहज म्हणून एका सुपर शॉपी मधे डोकावलो. समोरच पिळाची खारी बघितली आणि वाटलं, इथं कोपऱ्यावर एखादी चहाची टपरी असती तर अशा गार हवेत, वाफाळता चहा अन् खारीनं काय बहार आणली असती. पण इथला "येरबा" झाडाची पानं उकळून केलेला "येरबा मात्ते" चहा आणि त्या खारीचा मेळ बसवणं माझ्या तरी कल्पनाशक्तीच्या पलिकडलं होतं. 20250218_210411 लगेच पॅटागोनियन वाईन आणि बियर सेक्शनकडं मोर्चा वळवला. खेळण्याच्या दुकानात गेल्यावर एखाद्या लहान मुलाची होईल तशीच अवस्था अशा वेळी माझी होते. दुर्दैवानं फक्त केबिन लगेज समाविष्ट असलेल्या स्वस्त तिकिटावर प्रवासाला निघालो असल्यामुळे काहीही खरेदी शक्य नव्हती. तेव्हा कॅमेरात मावल्या तेवढ्या दारू गोळा करून बाहेर पडलो. 20250222_143747 जेवायला जरा अवकाश होता म्हणून एक-दोन टूर कंपन्यांच्या ऑफिसमधे घुसून उगाचच थोड्या चांभार चौकशा केल्या. ग्लेशियर आईस वॉक टूरची नुसती किंमत ऐकूनच हात पाय गार पडले. सुदैवानं टूरच्या तारखा उपलब्ध नसल्यामुळं स्वतःची समजूत घालणं जरा सोयीचं झालं. वाटेतल्या वेस्टर्न युनियन बँकेत डॉलर-पेसो विनिमय दर बरा दिसला म्हणून, खिशातल्या काही डॉलर्सची, पेसोत मोड करुन घेतली. चिक्कार पेसो मिळाले. ते कोंबून खिसा अगदी टम्म फुगला. लागो अर्जेंटिनोकाठच्या गार वाऱ्याच्या माऱ्यापुढे काही तासांपूर्वी केलेला लंच फार टिकाव धरू शकला नाही. त्यात संध्याकाळ झाली तशी आजूबाजूच्या रेस्टॉरंट्स मधून येणाऱ्या खमंग वासांमुळे भूक अजूनच खवळली. काय बरं खावं? डोक्यात उत्तर तसं आधीच तयार होतं. “कॉरदेरो अल् असादोर!” इथली चुकवू नये अशी एक डेलिकसी. सोप्या शब्दांत सागायचं झालं तर चुलीवरची मेंढी. लिबर्तादोर ॲवेन्यूवरच्या बऱ्याचश्या रेस्टॉरंट्सच्या भिंतभर काचेमागे, मोठ्ठ्या चुलींवर, मेंढ्या अंग शेकताना दिसत होत्या. एरव्ही शेळ्या-मेंढ्याच्या वाटेला मी कधीही जात नाही पण एवीतेवी बिचाऱ्या मेंढीचा जीव गेलाच आहे असा विचार करून एका उंची रेस्टॉरंटमधे शिरलो. अदबीनं पुढे आलेल्या वेटरला, “ते जे काही बाहेरच्या काचेतून दिसतंय ते आणि त्याबरोबर ग्लासभर तुझी आवडती पॅटॅगॉनियन वाईन आण!” अशी सोपी, पण माझ्या स्पॅनिशचा आनंदीआनंद असल्यामुळे समजावून सांगायला तशी कठीण असलेली ऑर्डर कशीबशी देऊन मोकळा झालो. 20250216_155151 अतिशय निगुतीनं मंद आचेवर भाजलेलं, ताजं, चविष्ट आणि लुसलुशीत “कॉरदेरो असादोर” खाताना वाटलं आपल्याकडे प्रचलित असलेली, “शेळी जाते जीवानिशी आणि खाणारा म्हणतो वातड!” ही म्हण निदान कालाफातेमधे तरी कधीही लागू पडणार नाही. मी अगदी तृप्त झालो आहे याची एक दोनदा खातरजमा करून झाल्यावर लाकडी बाऊलमधे वेटर अर्जेंटेनियन पेसोतलं बिल घेऊन आला. पेसोचं माप असतं हजारात. कुठलाही लहानसहान खर्च हजारांच्या घरात. सर्वसाधारणपणे एका अमेरिकन डॉलरला हजार अर्जेंटेनियन पेसो असा हिशोब. आतापावेतो हजारो अर्जेंटेनियन पेसो उडवून या गणिताला जरी मी सरावलो होतो तरीसुद्धा बिलाचे तब्बल छपन्न हजार पेसो बघून माझी छपन्न इंची (नसलेली) छातीही जराशी दडपलीच. माझ्यासाठी आपली मान उतरवलेल्या मेंढीने निदान माझा खिसा कापून का होईना, माफक सूड उगवला. भरल्या पोटानं अन् रोडावलेल्या खिशानं, रमत-गमत, टेकाड चढून हॉटेलवर परतलो आणि मस्त ताणून दिली. आधीच शांत असलेलं कलाफाते, पहाटे अजूनच चिडीचूप झालं होतं. रस्त्यावर चिटपाखरूही नव्हतं. पांढरी, पातळ दुलई डोक्यावरून घेऊन टेकड्यासुद्धा गपगार पसरल्या होत्या. जरा वेळानं घरांच्या छपरांमागनं निळाशार लागो अर्जेन्टीनो चकाकू लागला. पांढऱ्याशुभ्र टेकड्यांना सकाळच्या तिरकस उन्हात सोनेरी झळाळी मिळाली. अशा या जादुई वातावरणात बस पेरिटो मोरेनो ग्लेशिअरकडे निघाली. 20250615_214412 बसमध्ये कुठल्याही बाजूची खिडकी मिळाली तरीही मी नेहमीच असमाधानी असतो. डावीकडे बसलो तर वाटतं, अरे उजव्या बाजूला जास्त चांगलं दिसतंय. उजव्या बाजूची जागा असली की डावीकडे बघून तळमळ होते. त्यातल्या त्यात पार मागची जागा मला आवडते कारण बस थोडी रिकामी असली तर डावी-उजवीकडे मुक्त संचार करता येतो (एकदा विमानातसुद्धा माझा असा उद्योग चाललेला बघून वैतागलेल्या हवाईसुंदरीने माझ्यावर डोळे वटारले होते). दुर्दैवानं बस तुडुंब भरली होती. 20250225_174535 यापूर्वी हिमालयातल्या झन्स्कार खोऱ्यातली ड्रान्ग ड्रुन्ग हिमनदी जवळून म्हणजे काही मैलांवरनं बघितली होती. इथे मात्र या अफाट हिमनदीला अगदी खेटून चालायला भक्कम लाकडी वॉक वे बांधलाय. सुमारे तीस किलोमीटर लांब आणि अडीचशे चौरस किलोमीटर्स क्षेत्रफळाच्या या महाकाय हिमनदीच्या प्रवाहात कित्येक फूट उंचीचे अजस्त्र हिमनग धक्काबुक्की करत पुढे-पुढे सरकतात तेव्हा ढगांच्या गडगडाटसारखा आवाज सर्वत्र घुमतो. या चेंगराचेंगरीत सगळ्यात पुढच्या रांगेतले हिमनग कडाडत नदीत कोसळतात. प्रचंड मोठ्या लाटा वर उसळतात. तो रोमहर्षक थरार अनुभवायला जगाच्या कानाकोपऱ्यातून गर्दी जमते. PXL_20240404_143729038 20250222_142256 20250225_173915 PXL_20240404_141717499 PXL_20240404_151135256 सतत हळूहळू सरकणाऱ्या हिमनदीवरच्या आईस वॉक टूरचा मार्गही यामुळे नेहमी बदलत असतो आणि या धोक्यामुळे काटेकोर पूर्वनियोजन अत्यावश्यक असतं. हा टूर एवढा खर्चिक का याचं सोपं उत्तर समोरच दिसत होतं. पण हिरमुसून जायची गरज नव्हती. ग्लेशियर अगदी जवळून बघण्यासाठी, जिवाला (आणि खिशालाही) कमी धोकादायक अशा ग्लेशियर नौकविहाराचीही सोय होती. सुमारे शंभर दीडशे हौशी पर्यटकांना पाठीवर बसवून लाँच त्या भीमकाय हिमनगांजवळ घेऊन गेली. या स्वप्नवत ठिकाणी प्रत्यक्ष येऊन गेलो होतो याचे पुरावे गोळा करायला डुचमळणाऱ्या लाँचच्या डेकवरून फोन सावरत थोडं छायाचित्रण केलं. PXL_20240404_162852478 20250222_142105 20250718_133602 एल चॅल्टेन च्या दऱ्याखोऱ्यात दिसलेली रंगीबेरंगी ग्वानाको झुडपं, करड्या माळरानावर मनसोक्त उंडारणारे ग्वानाको हरणांचे कळप भरपूर बघून झाले होते. तो ग्वानाको चवीला कसा आहे हे कुतूहल आणि पोटातली भूक शमवण्यासाठी लिबर्टादोर अवेन्यूवरच्या “वानाको बार” मधे शिरलो. बार तरुण तरुणींनी खच्चून भरला होता. गप्पांना ऊत आला होता. बियर, वाईनचे पेले किणकिणत होते. खिडकीला लागून असलेल्या लाकडी बेंचवर मोकळी जागा होती. बाजूला माझ्यासारखाच एकांडा, एक युरोपियन आरामात बियर चाखत बसला होता. वेट्रेस हातात मेन्यू टिकवून त्या गर्दीत गुप्त झाली ती कायमचीच. जरा वेळानं माझी चुळबूळ बघून बाजूच्या युरोपियनाने वेट्रेसला स्पॅनिशमधून मारलेल्या हाकाही आजूबाजूच्या त्या गदारोळात लगेच विरल्या. घड्याळ्यात रात्रीचे नऊ उलटून गेले होते. उद्या पहाटेचे उशुवायाचे विमान गाठायला, लवकर बिछाना गाठणं गरजेचं होतं. समोरच्या कोपऱ्यावरच आईस क्रीम पार्लर होतं. डूल्स दे लेच्चे किंवा कलाफाते बेरीज् इथले सगळ्यात प्रसिद्ध आणि आवडते फ्लेवर्स. पण कारुण्याची झाक असलेल्या कलाफाते बेरीजपेक्षा मादक मॅलबेक द्राक्षीच्या आईसक्रीमची सोबत त्यावेळच्या मूडमध्ये जास्त आश्वासक वाटली. 20250222_143351 गार वारा सुटला होता. पावसाची भुरभुर सुरू होती. रस्त्यावरची वर्दळ आटली होती. हॉटेल फार काही लांब नव्हतं तेव्हा पावसातच झपझप चालू लागलो. काळवंडलेल्या आभाळाच्या पार्श्वभूमीवर टेकाडावरची निळ्या रंगाची “El Calafate” पाटी उठून दिसत होती. या नावासाठी निळ्याइतका समर्पक रंग दुसरा कुठला सापडणार नाही. टेकाडावर जायचा लोखंडी जिना चढून शॉर्टकटनं हॉटेलवर पोहोचलो. सामानाची नीट बांधाबांध केली. जवळच्या दोन फोन्समध्ये पहाटेचे चार गजर लाऊन उशाशी ठेवले अन् गुडूप झोपी गेलो. PXL_20240403_224114874 मला उशुवायाला घेऊन जाणारं विमान आकाशात उडालं. विमानाच्या खिडकीतून अँडीजच्या भव्य पटावर एवढा धिप्पाड रॉयसुद्धा एखाद्या लहानश्या सोंगटीसारखा दिसत होता. मी हात हलवत पुटपुटलो, “बाय बाय रॉय ! पुन्हा नक्की भेटू”. मनात म्हटलं, दंतकथेप्रमाणं इथं पुन्हा परतून येण्यासाठी कुठलीही फळं खायची काहीच गरज नाही. तेवढंच कशाला, कुणी जादूनं मलाही कुठलंसं झुडुप बनवलं असतं तर रॉयच्या दऱ्याखोऱ्यात मी अगदी आनंदानं नांदलो असतो. PXL_20240331_130420934 क्रमशः

वाचने 3883 वाचनखूण प्रतिक्रिया 19

Bhakti गुरुवार, 07/24/2025 - 15:12
सतत हळूहळू सरकणाऱ्या हिमनदीवरच्या आईस वॉक टूरचा मार्गही यामुळे नेहमी बदलत असतो आणि या धोक्यामुळे काटेकोर पूर्वनियोजन अत्यावश्यक असतं.
नवीनच समजलं,खुपचं वेगळा अनुभव असणार.

कर्नलतपस्वी गुरुवार, 07/24/2025 - 15:34
भन्नाट प्रचि आणी वर्णनही. उर्वरित आयुष्यात जायला मिळेल किंवा नाही पण पुनर्जन्म पेंग्वीन(भलते सलते राजकीय अर्थ काढू नये) झालो तर किती मज्जा येईल. लेख आवडलाच.

गोरगावलेकर गुरुवार, 07/24/2025 - 15:41
स्वप्नवत आहे हे सर्व . शब्दांकन आणि अप्रतिम फोटोंमुळे भटकंती अगदी जिवंत झालीय. वर्णन वाचताना जणू आपणही त्या मोहक निसर्गात फिरतोय, असे वाटते. खरोखरच उत्कृष्ट लेखन आणि अनुभव!

नि३सोलपुरकर Fri, 07/25/2025 - 15:38
अप्रतिम निसर्ग आणि प्रचि. निशब्द किल्लेदार साहेब धन्यवाद . _/\_

श्वेता२४ Sat, 07/26/2025 - 13:04
तुमचे भटकंतीचे वर्णन एखादी कादंबरी वाचतोय असे वाटते. खूप छान लिहीता तुम्ही. आणी फोटो तर निव्वळ अप्रतीम. बघु इथे जायचा योग येतो का ते.

सौंदाळा Mon, 07/28/2025 - 10:42
अप्रतिम असे कॉकटेल (सुंदर वर्णन + अप्रतिम फोटो) असलेले लेख वाचले की मिसळपाववर आल्याचे सार्थक झाले असं वाटतं. छापील माध्यमात असे लेख वाचणे किंवा नुसते फोटो बघणे यात ही मज्जा नाही. क्रमशः बघून जीव भांड्यात पडला पुभाप्र

लेखतील चित्रे बघुन या ठिकाणाला भेट द्यायलाच पाहीजे असे वाटायला लागलेय. सर्व छायाचित्रे सुंदर्च पण सहाणेवरचे मॅश पोटॅटो, आईस्क्रीमचा फोटो आणि कॉरदेरो असादोर बघुन तोंपासु लिहिते रहा!!

सुधीर कांदळकर Mon, 07/28/2025 - 14:49
वेगळा निसर्ग. शब्दचित्र छान रेखाटले आहे. प्रकाशचित्रांबद्दल काय बोलावे? तीही सुंदर आणि उत्कृष्टच. पेसो म्हटल्यावर जुने वेस्टर्न सिनेमे डोळ्यांसमोर येतात. एका सिनेमात फ्रॅन्को नीरो त्याला पकडून देणार्याला पोलीस ५००० पेसोचे बक्षीस लावले आहे अशा अर्थाचे पोस्टर रस्त्यावर पाहातो. त्यावर तो खडूने आणखी पाचदहा शून्ये काढून किंमत वाढवतो. वरील प्रकाशचित्रांची किंमत अशीच वाढवावीशी वाटते. एल कलाफाते प्रकाशपाटीचे चित्र आणि रेलिंग लावलेल्या पाण्याकाठीच्या मातीतल्या सज्जाचे वरून घेतलेले दृश्य फारच आवडले. धन्यवाद.

अमीबा गुरुवार, 07/31/2025 - 04:11
प्रवासवर्णन आणि छायाचित्रे, दोन्ही अतिसुंदर! एक शंका - स्थानिक भाषा येत नसताना भाषान्तरासाठी चॅटजीपीटी वा तत्सम अँप कितपत उपयोगी येऊ शकतात, याबद्दल आपण पडताळणी केली होती काय?

किल्लेदार Fri, 08/01/2025 - 18:13
मी गुगल ट्रान्सलेट ॲप फोन मधे टाकून घेऊन गेलो होतो. बऱ्यापैकी फायदा झाला. माणूस समोर असेल तर ठीक आहे पण कुठे फोन करायचा असेल तर भयंकर पंचाईत होते. एअरपोर्ट वरून हॉटेल ला फोन केला होता तेव्हा एसी मधेही घाम फुटला होता.

श्वेता व्यास Wed, 08/13/2025 - 18:00
ग्लेशियरच्या गावाची सफर घडवून आणल्याबद्दल धन्यवाद. वातावरण आणि खाद्यसंस्कृती पाहता जाण्याची इच्छा तर नाही, पण लेख आणि चित्रांनी हा निसर्ग पुरेपूर अनुभवता आला.