आईच तर आहे..!
लेखनप्रकार
कुत्र्याचं पिल्लू त्याच्या आईकडं दुडूदुडू धावत येतं आणि पिल्लाची आई त्याच्यावर पाखर घालते,
असं काही दिसलं की त्याच्या पोटात तुटतं..!
आपल्यालाही आई आहेे, हे त्याला आठवतं..
आणि काही दिवस तो विस्कटून जातो..!
मग त्याला सांगावं लागतं की असं करू नये अरे...
एवढं तोडू नये..बोलावं अधूनमधून घरी..
विचारपूस करावी सगळ्यांची...
स्वतःबद्दल काही सांगण्यासारखं नाही, असं वाटत असेल, तरीही ठीक आहे..
पण किमान एवढं तरी सांगू शकतोसच की बरा आहे मी... काळजी करू नकोस.. होईल माझं सगळं व्यवस्थित...!
एवढंही खूप असतं आयांना..!!
फोन केलेलं तुला आवडत नाही, म्हणून मग तिला माहित असलेल्या तुझ्या जुन्या मित्रांना फोन करत राहते ती..
विचारत राहते तुझ्याबद्दल.. ते तरी काय सांगणार..!
आणि ती तरी असे इकडं तिकडं फोन करत राहण्याशिवाय, काळजी करत राहण्याशिवाय दुसरं काय करू शकते सांग बरं..
हे असं वर्षानुवर्षे दूर दूर राहणं, फोनला उत्तरं न देणं,
स्वतःबद्दल काहीही न कळू देणं, हे जरा जास्ती होतंय,
असं वाटत नाही का तुला ?
वयही झालंय आता तिचं आणि ह्या वयात कुणाच्या जीवाला असा घोर लावू नये..
शिवाय कधीतरी एके दिवशी हे फोन येणंही बंद होऊन जाईल कायमचं, हे ही लक्षात असू दे..
स्वतःवर नाराज असण्याचा एक काळ असतो..
त्या दिवसांत आपण जन्मदात्यांशी कसं वागतो, हे जाणवत नाही..
नंतर जेव्हा जाणवतं, तेव्हा मग आयुष्यभर स्वत:ला कुरतडत राहण्याशिवाय हातात काही राहत नाही, हे तुला आत्ता समजणार नाही...
असो.. चल ऊठ आता..खूप झालं.. तोंड धुवून घे...
आणि कॉल कर तिला...
शब्द सापडतात रे आपोआप...
आणि नाही सापडले तरी काय बिघडणार आहे..!!
आईच तर आहे..!!
वाचने
2456
वाचनखूण
प्रतिक्रिया
4
:(
.......
>>शिवाय कधीतरी एके दिवशी हे फोन येणंही बंद होऊन जाईल कायमचं, हे ही लक्षात असू दे..
:(
>>स्वतःवर नाराज असण्याचा एक काळ असतो..
>>त्या दिवसांत आपण जन्मदात्यांशी कसं वागतो, हे जाणवत नाही..
अगदी खरं !
वाह, सुंदरच !
+१
शब्द सापडतात रे आपोआप... आणि नाही सापडले तरी काय बिघडणार आहे..!! आईच तर आहे..!!क्या बात हैं !
:(