मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आपल्यातलेच.... पण आदरणीय !

हेमंतकुमार · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
समाजात अनेक जण विविध क्षेत्रांत पारंगत असतात. त्यातले काहीजण त्यांच्या कामात चांगले यश मिळवतात. त्यानुसार त्यांची दखल विविध माध्यमांतून घेतली जाते. गौरव, सत्कार, पुरस्कार अशा अनेक प्रकारे त्यांचा यथोचित सन्मान केला जातो. त्यामुळे या व्यक्तींना एक वलय प्राप्त होते. आता थोडे सामान्य पातळीवर येऊ. आपल्या रोजच्या पाहण्यातही काहीजण आपला कामधंदा सोडून अन्य क्षेत्रांत झोकून काम करत असतात. त्यातले काहीजण तर त्या कामातून कुठलाही आर्थिक वा अन्य लाभ मिळत नसतानाही ते मन लावून करीत असतात. अशा कार्याला कुणी समाजसेवा म्हणेल तर कुणी 'लष्कराच्या भाकऱ्या' म्हणेल. अशा अनेकांचे कार्य खरोखर समाजोपयोगी असते. तरीसुद्धा त्याबद्दल त्यांच्या वाट्याला जाहीर आदरसत्कार वगैरे येत नाही. अर्थात त्यांना त्याचे काही सोयरसुतक नसते. केवळ निष्ठेने ते काम करीत असतात. आपल्याही परिचयाच्या अशा व्यक्ती नक्की असतील. या धाग्यावर आपण त्यांची थोडक्यात माहिती लिहावी असे मी आवाहन करतो. लिहिताना असे लोक निवडा की त्यांची कधी जाहीर दखल घेतली जात नाही. थोडक्यात ते तुमच्याआमच्यातलेच आहेत पण काहीतरी विशेष करताहेत, अगदी निस्वार्थी भावनेने. कामाचे स्वरूप कितीही 'लहान' भासले तरी त्यातून होणारा सामाजिक लाभ लक्षात घ्यावा. या प्रकारच्या संकलनातून आपल्यालाही काही प्रेरणा मिळावी हा या आवाहनाचा हेतू. नमुन्यादाखल मी एका उदाहरणाने सुरवात करतो. ……. यवतमाळ येथील प्रा. अनंत पांडे यांचा हा पहा अनोखा उपक्रम ! ते सार्वजनिक वीज-बचतीचे खूप छान काम करतात. दरवर्षी जून महिन्यात तेथे पहाटे ५ लाच लख्ख उजेड असतो. पण, रस्त्यावरील दिवे मात्र सकाळी ७ पर्यंत चालू असायचे. त्यांना ही उधळपट्टी पाहवेना. त्यांनी सरकारी लोकांकडून त्या दिव्यांची खांबावरील सर्व बटणे माहित करून घेतली. आता ते ५ ला व्यायामाला सायकलने बाहेर पडताना ते सर्व दिवे बंद करत जातात. या महिन्यातही अजून दिवस मोठाच असल्याने त्यांचे काम चालू आहे. गेल्या १० वर्षांपासून ते हे काम नेटाने करताहेत. आता त्यांच्या या कामावर सरकारी बाबू पण खूश कारण परस्पर काम होतंय ना ! पांडेंना मनापासून सलाम ! …. तर मग येउद्यात अशी अनेक उदाहरणे. धन्यवाद !

वाचन 12942 प्रतिक्रिया 0