मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सुहास एकबोटे यांच्याकडील एक कल्लाड दिवस

चौथा कोनाडा · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
फेसबुक पानं चाळता चाळता एका पानावर हे पोस्टर पाहिलं आणि थांबलो. ekb1 कार्यक्रमाचं स्थळ पाहिलं, वार, वेळ पाहिली आणि जायचं नक्की करून टाकलं. स्थळ माझ्या घरापासून जवळच, पाच-दहा मिनिटांच्या अंतरावर, अन्वर हुसैन सारखा चित्रकार, आणि रविवार सुट्टीचा दिवस म्हंजे मला मेजवानीच होती. नुकतीच माझ्या पाहण्यात अन्वर हुसैनची पेन्सिल स्केचेस पाहण्यात आली होती, मी त्यावर बेहद्द फ़िदा झालो होतो, लगेच फेबुवर फॉलोअर म्हणून टिकमार्क केली आणि एक-एक सुंदर चित्रं, विविध पुस्तकांची अनोखी देखणी मुखपृष्ठं माझ्या पाहण्यात येवू लागली, तेंव्हा आपोआपच अन्वर हुसैन आणि त्यांच काम पहायची संधी माझ्याकडून कशी चुकविली जाणार ? अन्वर हुसैन यांच एक अप्रतिम पेन्सिल स्केच: ANH21 त्यांचीच एक क्लासिक रंगकारी: ANH22 साडे अकराला जरा गडबडीत कार्यक्रम स्थळी पोहोचलो, स्थळ होतं सुहास एकबोटे यांच्या नुकतीच नुतनीकरण केलेलं चिंचवड येथिल सुहास एकबोटे डिझाइनर फर्निचर शो-रूम. प्रवेशद्वारापाशी रेंगाळावं लागलंच. वाड्याचा लूक असलेलं रंगीबेरंगी प्रवेशद्वार स्वागत करायला तयारच होतं. ekb2 फुलं आणि रांगोळी यांची सजावट केलेलं ग्रेनाईटचं प्रसन्न तुळशी वृंदावन: ekb3 मुख्य शो-रूम पर्यंत जायला रेड कार्पेट, व्ही आयपी झाल्यासारखं वाटलं. ekb4 मुख्य कार्यक्रम पहिल्या मजल्यावर होता. जिन्यानं वर जायला लागलो, तर असं जुन्या लाकडी खुर्च्या रंगवून असं लोभसवाणं इन्टॉलेशन टांगलं होतं, हे फोटोत कसं पकडायचं कळेना, मग हा असाच फोटो काढला. ekb5 ekb6 पहिल्या मजल्यावर प्रवेश केला तर बरीच गर्दी दिसत होती. उत्साही रसिकांच्या बातचितीमुळं वातावरण भारून गेलं होतं. थोडं पुढं गेलो तर एकदम व्हीआयपी मंडळींची भेटीगाठीची लगभग दिसली. माझ्या सारखे सामन्य रसिक त्यांच्या भोवती कोंडाळं करून त्यांची बातचित ऐकण्याच्या प्रयत्न करत होते. स्मृतीला थोडा ताण दिल्यावर पांढरे केस, नीळा हाफ़ शर्टवाले सुप्रसिद्ध चित्रकार सुभाष अवचट असल्याचं लक्षात आलं. मोठा थोर आंतरराष्ट्रिय सेलिब्रेटी कलाकार ! यांची बरीच चित्रं, रंगकारी पाहिली होती. त्यांच्या बद्दल बरेच लेख वाचले होते. (त्यांच स्टुडियो हे पुस्तक गाजलं, नावाजलं आहेच पण ते वाचायचा योग अजून आला नाहीय.) या थोर कलाकाराला मनोमन वंदन केले ! ekb7 वरील फोटोत गुलाबी रंगाचा हाफ़ कुर्त्यात हात बांधून उभे राहिलेले (डावी कडून तिसरे) चष्मेधारी अन्वर हुसैन ! हे मला जरा नंतर समजलं. एकंदरीत मोठ्या कलाकारांच्या भेटी, हास्य विनोद यामुळं वातावरण भारावून गेलं होतं. या सर्वाच व्हिडियो शुटिंग सुद्धा जोमात चालल होतं. सुभाष अवचट यांचं एक सुंदर पेंटिग: ekb8 तिथला उच्चभ्रू वर्ग पाहून मला बुजल्यासारखं झालं, कलटी मारावी की काय असाही विचार मनात येवून गेला. पण संधी दडवायची नाही हा विचार प्रबळ ठरला आणि मी पण त्या गर्दीचा भाग झालो. सुहास एकबोटे कोण अन कसे दिसतात याची उत्सुकता होतीच. एका दोघांना विचारल्यावर एकाने पोनीटेल वेणी असलेले सुहास एकबोटे दाखवले. सुहास एकबोटे, कलाकार आणि या डिझाइनर फर्निचर शो-रूमचे मालक. येणाऱ्या रसिकांचं, कलाकारांचं मोठ्या जातीनं स्वागत करत होते. चहा, कॉफ़ी घेण्याचा आग्रह करण्यात व्यग्र होते. ते थोडे मोकळे झाल्यावर त्यांना जाऊन भेटलो. आपुलकीनं माझ्याशी दोन शब्द बोलले, छान वाटलं. नंतर त्यांचे फेसबुक पाहिल्यावर त्यांचा फॅन झालो आणि फॉलोअर म्हणून टिक करून टाकली. स्टुडियोच्या एका दालनात सुहास एकबोटे: ekb9 सुहास एकबोटे यांच्या "मॉर्निग कँपातून वॉकताना" या फेसबुक अल्बम मधील एका जुन्या कलात्मक इमारतीचा फोटो. त्यांच्या विविध फेसबुक अल्बममध्ये अश्या कित्येक क्लासिक फोटोंचा खजिना आहे. ekb10 मी चकित होत तिथलं स्केचेस, पेंटीग्ज, कॅलीग्राफी, जुनी तांबा-पितळी भांडीकुंडी, ऍन्टीक फर्निचर पाह्ण्यात रमलो. समोरून मा. गिरिश प्रभूणे सर या सर्वांचे फोटो काढण्यात एकटेच रमलेले दिसले. त्यांना पाच दहा वेळा भेटलो होतो, ऋषीतुल्य माणूस, लेखक, चित्रकार, शिल्पकार. भटके विमुक्त समाजासाठी आपले अवघे आयुष्य समर्पित केलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते. सामाजिक कार्यासाठी रोज शकडो लोकांच्या भेटीगाठी घेणारे. असंख्य पुरस्काराचे मानकरी. त्यांच्या गुरुकुलम या प्रकल्पाला काही वेळा भेट दिलेली. त्यांचं पारधी हे खुप गाजलेलं पुस्तक माझ्या आवडीचं ! GPS123 गिरिश प्रभूणे सरांना भेटावं, बोलावं जरा रेंगाळलो, पण सर घाईत असल्यामुळं पटकिनी निघून गेले होते. . ekb12 ekb13 काही वेळानं वातावरणातली कुजबुज वाढली. कॅलीग्राफर अच्युत पालव यांचे आगमन झाले. जोरदार टाळ्यांनी स्वागत केले गेले. खालील फोटो मध्ये सुभाष अवचट अन्वर हुसैन यांना प्रेमानं झप्पीत पकडताना दिसताहेत, तर अच्युत पालव फॅनशी बोलताना व फोटो काढून घेताना. ekb14 मुख्य उदघाटन तर मी येण्यापुर्वी नुकतंच झालं होतं. पण अच्युत पालव आल्या नंतर त्यांच्या हस्ते अजुन एकदा उदघाटन करायची कल्पना पुढे आली. लाकडी भोवरा, दोरा आणि मडकं वापरून केलेली कलाकृती: ekb20 सर्व कलाकार आणि रसिक बाहेर गच्चीत आले. एका टेबलावर लाकडी भोवरा, त्या भोवती रंगानं ओला केलेला दोरा गुंडाळून तो भोवरा पांढऱ्या शीटवर फिरवला अन टाळ्यांचा कडकडाट झाला. अतिशय सुंदर डिझाईन तयार झाले होते. (अच्युत पालव यांच्या कॅलिग्राफीचा डेमो पाहणे हा एक भन्नाट अनुभव असतो. ज्यांनी पहिले असेल त्यांना कल्पना असेल) बाकीच्यांनी पण असाच भोवरा फिरवून त्यांची त्यांची हौस फेडून घेतली. ekb21 मग मी या डिझायनर फर्निचर शोरूम कम आर्ट गॅलरीत चक्कर मारायला घेतली. काही आधुनिक फर्निचर वगळता क्लासिक आणि अँटिक अश्या प्रकारच्या वस्तूंनी ही हा स्टुडिओ समृद्ध आहे. जुन्या प्रकारच्या खुर्च्या, डायनिंग टेबल्स, भिंतीवरची लाकडी हँगिंग्ज, जुने फोन्स, स्वयंपाक घरातील भांडी, छोट्या वस्तू इ प्रकारच्या य गोष्टी आहेत. आपण पाहताना हटकून जातो. आणि अर्थातच पेंटिंग्ज, स्केचेस, म्युरल्स, शिल्पं इ ! एकदा भेट द्यावीच असं हे ठिकाण ! स्टुडिओतील कलात्मक बैठक: ekb632 गॅलरीतील निळ्या भिंतीच्या पार्श्वभूमीवरील स्केचेस, पेंटिंग्ज: ekb487 अर्बन स्केचर्स, पुणेचे प्रसिद्ध चित्रकार संजीव जोशी यांचे स्केच: ekb795 खालचे दोन फोटो : न्यान्दी वूडन आर्ट्सचा लाकडी कलाकृतीचे दालन: ekb258 ekb693 या अभिनव स्टुडिओचे धनी सुहास एकबोटे हे अभिनव कलामहाविद्यालयात शिकलेले पदवीधर आहेत त्यामुळे त्यांच्या कलादर्दी नजरे बद्दल बोलायायालच नको. त्यांचं फेसबुकची पानं पाहिली तर पुण्यातल्या जुन्या कलात्मक वास्तू, वस्तूंचे काढलेले असंख्य फोटो दिसतील आणि हीच कलादर्दी त्यांच्या स्टुडिओत दिसून येते ! आता जेवणाची वेळ झाली होती. घरी जाऊन झटपट जेवण करून परतलो. एका टेबलावर सुहास एकबोटे यांचे स्टुडंट्स स्केचिंग, पेंटिंग इ करण्यात गर्क होते. ekb843 ekb953 आता प्रसिद्ध शिल्पकार संदीप लोंढे यांचे शिल्पकलेचे प्रात्यक्षिक होते. त्यांना लवकर जायचे असल्यामुळे प्रात्यक्षिक लवकर सुरु केले होते. मी प्रात्यक्षिक संपताना पोहोचलो होतो. समोर बसलेल्या सुभाष अवचट यांचे शिल्प संपताच टाळ्यांच्या कडकडाट झाला. त्यांनी जलदपाणे माती माध्यमात अप्रतिम शिपलं साकारले होते. मी जवळ जाऊन शिल्पाचा फोटो काढण्याचा मोह टाळू शकलो नाही. संदीप लोंढे यांचा फोटो काढण्यासाठी रसिकांनी गर्दी केली. मी ही नंतर सुहास एकबोटे आणि शिल्पकार संदीप लोंढे यांचा फोटो काढला. ekb125 दुसऱ्या कोपऱ्यात अन्वर हुसैन यांचं ऑईल पेंट मध्ये पोर्ट्रेट रंगवणं सुरु होतं. मॉडेल होते अजित गाडगीळ. पी एन गाडगीळ ऍण्ड सन्सचे अजित गाडगीळ हे अजितकाका म्हणून प्रख्यात आहेत. दर्दी आर्ट क्युरेटर म्हणून प्रसिद्ध आहेत. सध्या पीएनजीच्या बऱ्याच शो रूम्स मध्ये दर्जेदार चित्रांची प्रदर्शेने भरत असतात याचं श्रेय अजितकाका यांचं आहे. पुणे परिसरातल्या चित्रकारांचे ते खंदे आधार आहेत. काही महिन्यांपूर्वी थोर चित्रकार राजा रविवर्मा यांचं जंगी प्रदर्शन पुण्यात बालगंधर्वला भरलेलं होतं त्यात त्यांचा प्रमुख सहभाग होता. जसजसं रंगमिश्रण, कुंचल्याचे फटकारे यांची जादू चालू होती, तसतसे प्रेक्षक चकित होत पाहत होते. ekb486 पूर्ण झालेले पोर्ट्रेट: ekb159 पोर्ट्रेट पूर्ण झाल्यावर अर्थातच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटानं जोरदार सलामी दिली. खालच्या फोटोत डावीकदडून अन्वर हुसैन, अजित गाडगीळ आणि सुहास एकबोटे ekb478 स्केचेसने नटलेला आणखी एक कोपरा: ekb219 स्टुडिओचा टेरेस हिरवाईने ने नटलेले आहेत. इथली सजावट सुखद अनुभव देते. एक छोटेखानी मंच देखील विविध कार्यक्रम, मैफिलीसाठी सज्ज आहे. ekb789 आज संध्याकाळी गोड करण्यासाठी मिलिंद जोशी यांची गझलेची मैफिल होतीच. त्याच वेळी माझ्या वैयक्तिक कामामुळे इथून निघावं लागल्यामुळं मी मैफिलीचा आनंद लुटू शकलो नाही याचे रुखरुख लागलीच. ekb951 एकंदरीत आजचा दिवस सुहास एकबोटे यांच्या डिझाइनर फर्निचर शो-रूम कम स्टुडिओत भन्नाट गेला होता. कलेच्या आस्वादाने हा पूर्ण दिवस कल्लाड झाला ! ************************ समाप्त ****************************************** संदर्भसूची: सुहास एकबोटे यांचं फेसबुक पान: https://www.facebook.com/ekbote.suhas.5 संदीप लोंढे यांचं फेसबुक पान: https://www.facebook.com/sandeep.londhe.372 अन्वर हुसैन यांचं फेसबुक पान: https://www.facebook.com/anwarhusainart शर्मिला फडके यांचा अन्वर हुसैन आणि अनहद हा वेध घेणारा नितांत सुंदर लेख: http://www.lokmat.com/manthan/non-existent/ सुभाष अवचट यांचं फेसबुक पान: https://www.facebook.com/subhash.awchat अच्युत पालव https://www.facebook.com/achyut.palav संजीव जोशी यांचं फेसबुक पान: https://www.facebook.com/sanjeev.joshi1 अजित गाडगीळ यांचं फेसबुक पान: https://www.facebook.com/ajit.gadgil.5 गिरिश प्रभूणे यांचं फेसबुक पान: https://www.facebook.com/girish.prabhune.3 *संदर्भ व काही फोटो आंजावरून साभार.

वाचन 21633 प्रतिक्रिया 30