गावपातळीवरची एक अफलातुन राजकारणी खेळी
लेखनप्रकार
एका विधानसभेच्या निवडणुकीतील रणधुमाळीत जवळुन पाहीलेला किस्स्सा.
अमुक अमुक दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरायचा शेवटचा दिवस होता. त्या दिवशी घड्याळात दुपारचे २-४५ झाले होते तेव्हा एक स्त्री तिचा उम्देवारी अर्ज दाखल करण्यासाठी नियमाप्रमाणे आवश्यक असल्याने तिच्यासोबत ४ सहकार्यांना घेऊन आली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तिथे असलेले अधिकारी आधी चरफडले पण वरुन आदेश होते कि ३ वाजेपर्यंत येणारे अर्ज व्यवथित पडताळणी करुन एक तर जमा करुन घेणे अथवा परत पाठवणे. त्यानुसार अधिकार्यांनी अर्जाची छाननी करण्यास सुरवात केली. सदर महीला अ-हिंदु धर्माची होती व अर्जात कुठल्या पक्षातर्फे निवडणुकीला उभे आहेत त्या जागी एका लोकप्रिय पक्षाच्या नावाशी साधर्म्य असणार्या पक्षाचे नाव लिहिले होते. सदर पक्ष हा रजिस्टर्ड पक्ष नव्हता त्यामूळे महिलेला सांगण्यात आले कि ह्या ह्या कारणांनुसार तुम्हाला ह्या पक्षातर्फे निवडणुक लढवता येणार नाही. व तुमचा अर्ज रद्द होईल.पुन्हा वरुन "शक्यतो अर्ज रद्द न होईल" असे पहा असा आदेश असल्याने तिला सांगण्यात आले कि ह्याला एक पर्याय अजुनही आहे. तुम्ही अपक्ष म्हणुन निवडणुक लढवु शकता पण त्यासाठी कमीत कमी १२ कार्यकर्त्यांचे अनुमोदन घ्यावे लागेल. घड्याळात दुपारचे २.५५ होत आले होते. तिला सांगण्यात आले कि तुम्ही ३ च्या आत अर्ज दाखल करायला आला आहात म्हणुन तुम्हाला ३.३० पर्यंत वेळ देण्यात येतोय परंतु तोपर्यंत तरी १२ कार्यकर्त्यांना बोलवा व त्यांचे अनुमोदन म्हणुन सह्या घ्या. सदर महिलेने हे करण्यासाठीही दिलगिरी व्यक्त केली. सर्व कार्यकर्ते आता इतरत्र गेले असतील त्यामुळे त्यांना बोलावणे अशक्य आहे. अधिकार्यांना नाईलाजाने महिलेचा अर्ज रद्द करावा लागला. ह्यात विशेष बाब ही कि सदर महीला ह्याआधीही मागे निवडणुकीला उभी राहीली होती. जेव्हा तिला विचारले गेले कि अर्ज भरायची शेवटची तारीख वेळ तुम्हाला माहीती नव्हती का? त्यावर तिचे उत्तर असे होते कि आम्हाला आताच अर्ज दाखल करायला सांगितले वगैरे.महीलेचा एकुण आविर्भाव एखाद्या मुरलेल्या राजकारण्यासारखा जरी नसला तरी अगदी नवख्या राजकारण्यासारखाही नव्हता. त्यामूळे कोणाच्या तरी सांगण्यावरुन आता आलो ह्या उत्तरावर अधिकारी संभ्रमित झाले. अधिकार्यांनी सर्वतोपरी सहकार्य करायचा प्रयत्न करुन सुध्दा उमेदवाराकडुन सहाय्य न मिळाल्यामुळे अर्ज परत पाठवावा लागला.
हे सर्व चालु असताना व अर्ज रद्द होणार हे निश्चित होत असताना अर्ज पडताळणी करणार्या टीममधील अधिकारी व्यक्तीला त्या भागातील आमदाराचा फोन आला. सदर आमदार हा लोकप्रिय रजिस्टर्ड पक्षाचा होता. अधिकारी चक्रावले कि हा ह्या स्त्रीचा उमेदवारी दाखल करुन घ्यायला स्वतः रदबदली का करतोय.? अधिकार्यांनी सर्व कारणे सांगुन असा अर्ज दाखल करणे अशक्य आहे व बेकायदा आहे व आमची नोकरी ही जाऊ शकते वगैरे सांगितल्यावर त्या आमदाराने सांगितले कि सदर महिला अ-हिंदु असुन तिला उभे केले तर दुसर्या लोकप्रिय पक्षाची त्या धर्माची मते फोडता येतील वगैरे. आश्चर्य म्हणजे सदर आमदार स्वतःचा उमेदवारी अर्ज दाखल करायला एक सेलिब्रिटी व हेलिकॉप्टर व सोबत जंगी लवाजमा घेऊन आला होता. त्यामुळे इतक्या शेवटच्या क्षणी अशी खेळी खेळण्यामागचा उद्देश काय असावा असा प्रश्न तेथील अधिकार्याना पडला. सर्व कार्यकालीन कामे करुन निवांत झाल्यावर दिवसात घडलेल्या गमतीजमती चर्चा करत असताना पुन्हा हा प्रश्न चर्चेमध्ये आला आणि तेव्हा अनुमान असे निघाले कि सदर लोकप्रिय आमदाराला दुसर्या पक्षाची वोटबँक नुसती फोडायचीच नव्हती तर ती ही मते स्वतःकडे वळवायची होती व सदर महिलेला केवळ एक प्यादे म्हणुन वापरले गेले होते. व ही महिला आतापावेतो ह्याच भ्रमात होती कि हा आमदार व त्याचा पक्ष आपल्याला मदत करतोय. अर्थात आमदार व त्याच्या पक्षाने तरी तसेच इम्प्रेशन पाडले होते .आतापर्यंत त्यामहिलेने केवळ स्वतःचा प्रचार केला असता पण आतापावेतो ह्या आमदार व त्याच्या पक्षाकडुन मिळालेला पाठिंबा पाहता व जे घडले त्यात ह्या आमदाराची काहीही चूक नाही (महीला उमेदवार कार्यालयात असतानाच व तिचा अर्ज खात्रीने रद्द होणार हे माहीत असताना (किंबहुना तशीच तजवीज केली होती) तिच्या उपस्थितीतच अधिकार्याला फोन करुन तिच्यासंबंधी दस्तुरखुद्द आमदारसाहेबांतर्फे रदबदली करण्यात आली. ह्यामुळे आमदारसाहेबांची नीयत साफ आहे असा संदेश सदर महिले पर्यंत व तिच्या प्रभावक्षेत्रात पोहोचणे काही अशक्य नवह्ते) पुढचा प्रचार ही महीला व तिचे कार्यकर्ते आता ह्या आमदारासाठी व पक्षासाठीच करणार हे उघड होते. थोडक्यात ह्या खमक्या आमदाराला त्या महिलेच्या धर्मातील लोकांची फक्त मते फोडायचीच नव्हती तर स्वतःकडे वळवायचीही होती. व एकुण रागरंग पाह्ता आमदारसाहेब त्यात नक्कीच यशस्वी होणार ह्याबद्दल तेथील अधिकारी वर्गाची खात्री पटली. मुरलेले राजकारणी एखाद्याला हातोहात कसे उल्लु बनवतात ह्याचे उदाहरण म्हणुन नंतर काही दिवस हा किस्सा कुजबुजीच्या स्वरुपात तेथील कर्मचार्यांमध्ये चर्चिला जात होता.
वाचन
6285
प्रतिक्रिया
0