मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कल्पनेतील चव!

लई भारी · · जनातलं, मनातलं
'सेक्रेड गेम्स' खूप चर्चेत असली तरी मला खूप शिवराळ भाषा आणि विनाकारण असलेली काही दृश्ये यामुळे इतकी आवडली नाही. त्यात आपली जुनाट बॉलीवूडी विचारसरणी असल्यामुळे एका सीझन मध्ये सगळी गोष्ट संपली नाही की झेपत नाही! :) बाकी अभिनय, कथासूत्र, निर्मितीमूल्य वगैरे उत्तम आहेच. असो, तर लिहिण्याचा मुद्दा म्हणजे एक आवडलेला प्रसंग. एका प्रसंगात नवाजुद्दीन आपल्या बायको ला घेऊन बाहेर जेवायला जातो. महाराष्ट्रीयन थाळी असणारंच ठिकाण असत पण तिला ते सगळं नवीन असतं. जेवताना तिचा संकोच दिसतो. शेवटी 'खरवस' येतो स्वीट-डिश म्हणून. तिला आग्रह करतो आणि सांगतो कि छान असतं खा. पण ती खात नाही. नंतर एका समारंभात गेल्यावर ती १२ जिलेबी खाते. मग नंतर गाडीत तिला विचारतो तुला गोड इतकं आवडत तर 'खरवस' का नाही खाल्लास? तेव्हा ती सांगते की लहान असताना त्यांच्या घरी खरवस फक्त गणपतीला नैवेद्य म्हणून यायचा आणि तिला खायला मिळायचा नाही. घरात आल्या आल्या त्याच्या वासाने तिला कळायचं. खूप आवडायचा खरवस पण कधीच मिळाला नाही. त्यामुळे त्याची चव कशी असेल याची तिने एक कल्पना केलेली असते; खूप चांगली किंबहुना स्वर्गीय सुख देणारी चव तिने कल्पलेली असते. त्यामुळेच ती म्हणते की, मला असं वाटलं की प्रत्यक्षात ते खाल्ल्यावर ती चव त्या कल्पनेच्या जवळपास जाणार नाही कदाचित; म्हणून मग ती नाकारते. ती कल्पनेतली चवच तिला जास्त आनंददायी आहे. आयुष्यात बऱ्याच गोष्टींच्या बाबतीत असंच होत, आणि एखाद्या मोठ्या गोष्टीकडून अपेक्षाभंग झाल्यावर वाटत की 'याचसाठी का केला होता अट्टाहास?' त्यामुळे कधी कधी अशा अपूर्णतेतच आनंद असतो असं वाटत!

वाचन 6140 प्रतिक्रिया 0