Skip to main content

चहा-साखरेचे डबे

लेखक कवितानागेश यांनी सोमवार, 02/07/2018 21:35 या दिवशी प्रकाशित केले.
चहा-साखरेचे डबे .... प्रत्येक घरात असतात. त्यांनी तसंच राहायचं असतं, एकमेकांच्या बाजूला, एकत्र शोभतील अश्या डब्यात! त्यांची जागाही ठरलेली असते. हाताशी सहज येतील, पटकन दिसतील अशी सोयीची जागा. आणि डबे सुध्दा ठरलेले असतात. जवळजवळ एकसारखे, थोडे लहानमोठे. त्यांनी तसं च राहायचं असतं. एकमेकांच्या बाजूला, एकत्र शोभतील अश्या डब्यात! त्यांच्या खुणेनी इतरही वस्तू आजूबाजूला येतात आणि जातात. पण या दोघांचा मात्र उल्लेखही एकत्रच होतो. चहासाखरेच्या डब्यांची फळी, असाच पत्ता असतो तिथला. वास्तविक चहा आणि साखरेत काहीही साम्य नाही. पण सोयीसाठी म्हणून, कधीतरी, कुणीतरी त्यांना एकमेकांजवळ मांडलं. आणि तीच त्यांची जागा ठरून गेली. एकमेकांच्या बाजूला, एकत्र शोभतील अश्या डब्यात! चहाच्या नशिबी दिवसातून दोनवेळा खळखळून उकळून घेणं. पण उकळूनही तो काही विरघळत नाही. तो कुणी खातही नाही. त्याचा अर्क तेवढा कामाचा- बाकीचा चोथा! पण बाकी स्वैपाकाशी त्याचा काहीकाही संबंध नसतो. साखर मात्र सगळीकडे हवी. दिवसाच्या सुरुवातीला एकदा का चहात विरघळून झालं, की पुन्हा अजून सतराशेसाठ पदार्थांच्या चवीची तिला संभाळायच्या असतात. प्रत्येकच पदार्थात विरघळून स्वतः चे वेगळे अस्तित्वच नाहीसं करून टाकते ती. त्याशिवाय चव चढेलच कशी त्या वस्तूला? पण म्हणून काही तिची जागा बदलत नाही! ती कायम तिथेच उभी. हाताशी, सहज सापडेल अशी. अन चहाही तिथेच. साखरेच्या बाजूला. आता चहाच्या सोयीसाठी साखरेला ती जागा मिळाली, की साखरेपायी चहाला ती जागा घ्यावी लागली, कुणास ठाऊक? पण गुण कितीही वेगळे का असेनात, त्यांनी आपली ठरवून दिलेली जागा सोडायची नाही.त्यांनी तसंच राहायचं असतं, एकमेकांच्या बाजूला, एकत्र शोभतील अश्या डब्यात! - कविता
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 6448
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

बऱ्याचशा या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात येत नाहीत किंवा आपण त्याचा विचार करत नाही. अस कोणी काही लिहिले की एकदम जाणवतं.

खूप छान

सामान्यतः रोज साखरही चहापुरतीच लागते.. भाजी / वरणात साखर टाकणारे लोक कमीच. त्यामुळेच त्यांची जोडी आणि बर्‍यापैकी कॉफी पिणार्‍यांकडे तिसरा डबा कॉफीचा.. पण कॉफी वर ओलसर वातावरणाचा लवकर प्रभाव पडतो म्हणून तिला हवाबंद डब्यात ठेवावे लागते.

छान!!!

आता मिसळणाच्या दब्याबद्दल (मसाले /हळद/तिखट वगैरे) पण येउ द्या

सर्व वाचकांचे आभार.

मुक्तक छान आहे माऊ, स्वाती

In reply to by चित्रगुप्त

असेच म्हणतो. खूप सुंदर लेखन! हे कसं सुटलं म्हणायचं वाचनातून! :-)

मस्त लेखन