Skip to main content

कोणार्कच्या मंदिरातील शिल्पे

लेखक धनंजय यांनी बुधवार, 01/10/2008 07:28 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना : पुढील लेख कल्पनिक नाही. अनुभवाचे वर्णन आहे. --------------------------------------------------------------------------------- एखाद्या रणरणत्या दुपारी काही निमित्त असतं, आपण एकटे चालत चाललो असतो. म्हणतो, "रस्ता रिकामा कसा? इतकीही काही उन्हं नाहीत..." तसं आपलं आपल्याला ठीकठाकच वाटतं. पोचायचं तिथे पोचल्यावर कोणीतरी गडूभर पाणी आपल्यासमोर ठेवतं. पाणी घशाखाली उतरताना अंगावर काटा येतो. मग कळतं की त्या घोटाकरिता जीव केवळ तडफडत होता. अशीच, पण याहून कितीतरी मोठी जाणीव मला वयाच्या पंचविसाव्या वर्षी झाली. बदलणार्‍या शाळांत, मेडिकल कॉलेजमध्ये, नव्या हॉस्टेलात जायचं, नवीन ओळखी, नवीन समाजात रुळायचं, अशी आदली वीस वर्षे गेली. गप्पांचे नवीन विषय, करमणुकीची नवीन साधनं आपलीशी करत जायची. बालपणातून पौगंडावस्थेत जायचे हे अनुभव सर्वसामान्य आहेत. पण माझे काहीतरी वेगळेही होते. मित्रामित्रांच्या घोळक्यांत अर्धी रात्र उलटेपर्यंत मस्तपैकी गप्पा चालायच्या. त्यांच्यात मी सामील होतोही, पण एका प्रकारे नव्हतोही. मुलांच्या टवाळक्यांमध्ये पुन्हापुन्हा खाजवून येणारा एक विषय होता - मुली! लोकलज्जेला साजून दुरून-दुरून बोललेलो असतो, त्यांना कधी हात लावलेला नसतो. पण त्यांच्या विचारानेच बेजार होणारी आपली मनं, उत्तेजित होणारी आपली शरिरं. मीही टवाळक्यांत होतो - म्हणजे शरीर बेजार झाल्याचा अनुभव मलाही होता. रात्री ओला जागायचो तो बाकीच्यांसारखांच. पण त्यांची जागेपणी बेजार होणारी मनं काही माझ्या स्वत:च्या अनुभवातली नव्हती. वयात येणार्‍या शरिराचे पुस्तकी बदल मी शिकलेले होते. शरीररचनेचं, क्रियांचं ज्ञान तर अभ्यासक्रमातून उत्तम कळलं होतं. तरी मित्रलोक त्यांच्या मनात मुलींबद्दल जे काय चालतंय म्हणायचे, ते एक तर वखवखलेलं वाटायचं, नाहीतर पोरकट वाटायचं. आणि स्वानुभवात नसल्यामुळे, अगदी नाटकी वाटायचं. लपून-छपून फिरणारी ती पुस्तकं मला भडक आणि निरुपयोगी वाटायची. त्यांत उगाच थोडक्यात घुसडलेलं भावनातिरेकाचं वर्णन खोटं वाटायचं. बहुतेक अवांतर होतंच! तेव्हा त्या पोर्नो पुस्तकांचं सोडा. तसं बघता कालिदासासारखे कवीसुद्धा शारिर वर्णने करायला लागले की कमालीचे भावुक होतात... पण तीसुद्धा मला उच्च दर्जाची उदात्त अतिशयोक्ती वाटायची. कवी आपलेच विचार आपल्यापेक्षा प्रभावी शब्दांत मांडतो आहे, असे जाणवून मी कधी हुरळून जायचो नाही. थोडक्यात असं की मला शरीराचं तंत्र माहितीचं होतं, पण लैंगिकतेच्या भावविश्व अनोळखी होतं. आणि माझं दारिद्र्य इतकं की त्याच्यावाचून माझं काही आडलं होतं, हेसुद्धा ठाऊक नव्हतं. म्हणजे मूर्त विचारांत कधी या उत्कट शरीर-भावना संबंधाची गरज भासली नव्हती. अमूर्त विचारांत काय वावटळी चालू होत्या त्या स्वप्नांतच उधळायच्या, स्वप्नांतच थकायच्या. त्या काळात मला विचारलं असतं, तर मी मनापासून म्हटलं असतं, "अरे, आपल्या वयातल्या भडक स्वप्नांचं काय घेता... मला ती सकाळी आठवतसुद्धा नाहीत!" मेडिकल कॉलेजमधले मित्रांच्या लक्षात आलं होतं की मुलींच्या विषयी वैषयिक गप्पा स्वत:हून मी कधीच काढत नाही. पैकी काही म्हणायचे, "बैरागी"; काही म्हणायचे, "ढोंगी". पण मला माहीत होते की दोन्ही टोमणे खरे नव्हते - मला कसलं वैराग्यही नव्हतं, आणि माझ्या मनात भानगडीही नव्हत्या. वय वर्षे पंचवीस चालू असताना विद्यापीठाच्या गंथालयात मी गेलो होतो, आणि केवळ डोळ्यासमोर होते म्हणून कुतूहल वाटून एक पुस्तक ओढून काढलं - "समलैंगिकता". मेडिकल कॉलेजचंच ग्रंथालय, मोठे अभ्यासपूर्ण पुस्तक होतं. तसं वस्तुनिष्ठ, कोरडं. पण बाकीच्या वाचलेल्या सर्व पुस्तकांपेक्षा वेगळं. हे शारिरिक वर्णनं करत नव्हतं, भावनांचं विश्लेषण करत होतं. पानं उलटता-उलटता मी शाहारलो - यात माझं चरित्र लिहिलं आहे. पुस्तक लिहिलेलं होतं अमेरिकन वाचकांसाठी. त्यांची संस्कृती, धर्म वेगळे. त्यांचे शाळेतले अनुभव वेगळे. वास्तविक त्यातील तपशिलांशी मला जोडणारं काय असू शकत होतं? पण माझ्या आतड्याशी नातं जुळलं होतं. झोपेतून खाडकन जागं व्हावं तसं त्या क्षणी मी म्हटलं - हा "मी" आहे. ती स्पष्ट ओळख होती. एकेक मुद्द्याच्या तर्काची गरज नव्हती, कारण तर्क दहा वर्षांच्या अमूर्त आठवणींत सिद्ध होते. या क्षणी पहिल्यांदा मूर्त विचारांत जे प्रकट झालं ते आधीपासूनच माहीत असलेलं निर्विवाद ज्ञान होतं. ज्ञान इतके निर्विवाद होतं की माझ्या वैज्ञानिक मनाला कारणं शोधावीशीच वाटली, तर "इतका उशीर कसा काय झाला?" याबद्दल. अगदी शाळेतही शरिराला चाळवणारं कोण होतं, कोणीकोणी मुलगेच होते, हे स्पष्ट आठवलं. रात्री ओली करणारी, स्मृतीतून पुसून टाकलेली स्वप्ने कोणाकोणत्यातरी मुलग्यांबद्दलच होती, ते स्पष्ट आठवलं. इतक्या स्मृती खर्‍याखरच्या नाही पुसून टाकता येत. फारतर पुरून ठेवता येतात. मूर्त विचारांत पंचविसाव्या वर्षी आलेला हा विचार अमूर्त अंत:करणात उमलून एक तप झालं होतं. आजवर कुलूप लावलेलं एक दालन त्या क्षणी माझ्या मनात उघडलं. त्या दालनाच्या खिडकीतून जगाकडे बघायचा एक नवीन दृष्टिकोन मिळाला. माझ्या मित्रांची वखवख (होय, मुलींबद्दलची वखवख) त्यांच्या पौगंडावस्थेला अनुरूप, नैसर्गिक होती, असं इतक्या वर्षांच्या नंतर मला पहिल्यांदा जाणवलं. कारण त्याच्या समांतर एक ओढ त्या दालनात माझ्यापाशीही होती. पण ज्या वयात वखवख म्हणून दिसली असती, बंद दारामागे बेशुद्ध पडलेली होती. या उघड्या दालनातून कालिदासाचं उदात्त काव्य मला त्याच्या अनुभवाचं होतं, असं जाणवलं - त्यात एक तसूभर अतिशयोक्ती नव्हती असं जाणवलं. पूर्वी दूरदर्शनवर "बालिका वधू" नावाचा एक चित्रपट मी बघितला होता. अल्लड खेळकर मुलीचं दूरगावी शिकणाऱ्या मुलाशी लग्न होतं. लैंगिक प्रेम असं काही असतं याची जाण तिच्या बाल्यात अडकलेल्या मनाला होता होत नव्हती. मग कधी एकदा कोणार्कच्या सूर्यमंदिरात ती जाते. आणि तिथली मत्त शिल्पं बघताना अकस्मात शृंगार म्हणजे काय? ही तिची जाणीव जिवंत होते. पहिल्यांदा नवर्‍याच्या प्रेमपत्रांची आर्तता तिला मनापासून जाणवते. एका वैद्यकीय पुस्तकातले कोरडे शब्द वाचून, एका शांत ग्रंथमंदिराच्या कोनाड्यात तशीच काही जाणीव मला झाली. प्रेम, कामना, वासना, या सर्वांना थारा देण्यासाठी आपल्या हृदयात एक ठिकाण आहे, हे जाणवलं. तसंच जाणवलं, या सर्वांसाठी आपण किती व्याकूळ आहोत. मला माहीत होतं, की तहान जाणवण्यात तृप्ती नाही, पाणी मिळण्यात आहे. पण आपल्या नकळत अशी गरज आपल्याला होती हे कळलं, तशी ती गरज पुरवायचा मी प्रयत्न करेन, कधी काळी ती पूर्ण होईल, याची आशा मला मिळाली. आणि या आशेच्या तोलामोलाची दुसरी कुठली मिळकत मला मिळालेली नाही. --------------------------------------------------------------------------------- समारोपाचे शब्द : वास्तविक ज्या मराठी संकेतस्थळावर मी केवळ साहित्यिक आनंद मिळवायला येतो, तिथले वाचक हे या अनुभवासाठी योग्य वाचकवर्ग आहे की नाही याबद्दल मला पुर्वी शंका होती. हल्लीच "आपण आणि आपले 'ठराविक साचे'" या चर्चेच्या संदर्भात हा अनुभव काही वाचकांना वाचावासा वाटेल, असे समजून पूर्वीच लिहिलेला हा लेख येथे प्रकाशित करतो आहे. वरील लेख अनुभवाचे वर्णन आहे. वैद्यकीय माहिती देणारा नाही आणि तार्किक ऊहापोह करणाराही नाही. तसे कुतूहल असणार्‍यांनी हल्लीच लोकप्रभेत आलेला लेख वाचावा, बिंदुमाधव खिरे यांची मराठी पुस्तके वाचावीत, किंवा इंग्रजीतली या विषयावरची पुस्तके वाचावीत. तुम्ही विधिमंडळात नसल्यास, न्यायाधीश नसल्यास, तुम्हांपैकी कोणास समलैंगिकता नैसर्गिक वाटते, की अनैसर्गिक या बाबतीत मला विशेष स्वारस्य नाही. माझा डावखुरा भाऊ डाव्या हाताने खातो. ढुंगण पुसताना घाण खात्या हाताला लागणार नाही याची काळजी तो घेतो, पण ते कोणाला दिसते? मग कोणी त्याला "घाणेरडा" म्हटल्यास त्यांच्याकडे यथेच्छ दुर्लक्ष करतो. माझेही तसेच. तुम्ही विधिमंडळाचे सदस्य असल्यास, किंवा तुम्ही न्यायाधीश असल्यास मी तुम्हाला एक आठवण करू इच्छितो. "नैसर्गिक" काय अशी वैयक्तिक व्याख्या करायची मुभा तुम्हाला घटनेने दिलेली नाही. मॅकॉले साहेबाच्या ख्रिस्ती धर्माची व्याख्या स्वीकारायची मुभा तुम्हाला घटनेने दिलेली नाही. (हिंदू धर्माने व्याख्या केलेलीच नाही, पण केली असती, तर तीही स्वीकारायची मुभा घटना तुम्हाला देत नाही. मनुस्मृतीत पुरुष समलिंगी संबंध ठेवल्यास "कपडे घालून स्नान" आणि गव्यप्राशन हे प्रायश्चित्त दिलेले आहे. स्त्री समलिंगी संबंध ठेवल्यास, स्त्रीचा लग्नाच्या बाजारात भाव उतरला-की-नाही त्यावर दंड अवलंबून आहे. आंतर्जातीय विवाहाला याच्यापेक्षा कितीतरी भयंकर दंड सांगितलेला आहे. त्यामुळे त्या स्मृतीप्रमाणे काय अधिक विचित्र आहे, तो निर्णय तुमचा तुम्ही करा. पण जो काही धार्मिक निर्णय कराल त्याचा भारताच्या, किंवा अमेरिकेच्या कायद्याशी काहीही संबंध जोडता येणार नाही.) तुम्ही कायदेमंडळात असाल, तर आरोपाची अनैतिकता सिद्ध करण्याची जबाबदारी आरोपकर्त्याची आहे, हे जाणून व्यवहार करावा. ज्या कोणाला कायदेशीर कारवाई करायची जबाबदारी नाही, त्याला हवा तो नैतिक-अनैतिक, नैसर्गिक-अनैसर्गिक विचार करण्याचा पूर्ण अधिकार आहे, हे मी येथेच मान्य करतो. माहितीशिवायही दृढ कल्पना असणार्‍या लोकांना समर्थन देणे फार शिणवणारे काम आहे. ज्यांच्याबद्दल मला जिव्हाळा आहे, नव्हे, ज्यांना माझ्याबद्दल जिव्हाळा आहे, त्या सर्वांना सर्व वैज्ञानिक, नैतिक, स्पष्टीकरणे देऊन मी पटवलेले आहे. तसे करताना भावनिक श्रमाने थकलेलो आहे. अनोळखी लोकांना मी फक्त आपले अनुभव सांगू शकतो, ते वर सांगितलेत. अनोळखी लोकांना पटवण्याचे भावनिक श्रम घेण्याइतपत जिव्हाळा मला वाटत नाही. त्यांना पटले पाहिजे असा माझा आग्रहही नाही. ---------------------------------------------------------------------------------
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 66277
प्रतिक्रिया 88

प्रतिक्रिया

In reply to by प्रियाली

Some resources on the sexual politics in India: 1. Film--> Sancharam (Journey) Synopsis: In Sancharram ("The Journey"), Kiran is mortified by her growing lesbian desire for the effervescent Delilah, in an idyllic Indian village where arranged marriage is the only acceptable form of coupling. [http://www.thejourney-themovie.com/] 2.Online Articles: A Special Issue on Marriage: http://ghadar.insaf.net/November2005/MainPages/MarriageUnethical.htm Books: 1. Sakhiyani: Lesbian Desire in Ancient and Modern India. by Giti Thadani 2.Same-Sex Love in India: Readings from Literature and History by Ruth Vanita and Salim Kidwai

In reply to by Kamgaar_mahila

"I think the best way to discredit your opponent is to find out the craziest person on your enemy's side of the spectrum and give him credence. That crazy person and his theories will bury your opponent much more easily." (एकलव्याच्या खरडवहीतून कॉपीराइट-उल्लंघनाचा फारसा विचार न करता साभार.) Nice try! :)

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

की डोळे उघडले. वरचे दुवे वाचून तर ते कधी बंद होणार नाहीत अशी परिस्थिती आली आहे. :) परंतु, असो. या लेखावर, प्रतिसादांवर आणि एकंदर विचारांवर माझी प्रतिक्रिया मांडून झाली आहे. तेव्हा माझ्याकडून पूर्णविराम. जाहीर स्थळांवर एखाद्याची इच्छा नसेल तर त्याची पाठ पकडून संवाद चालू ठेवण्यात फारसे हशील नसते हे कामगार_महिलाबाईंना माहित असावेच.

In reply to by Kamgaar_mahila

All the time I read this website, I thought okay, this is for typical "भट" who have "typical" experiences like what bhaji their "wife" made etc.
एका स्टीरियोटाइपचे उत्तर दुसरा स्टीरियोटाइप होऊ शकत नाही. बायकोने बनवलेल्या भाजीइतकाच रेष्टारंटातल्या शेफाने बनवलेल्या ष्टेकात रस घेणारा एक "सर्वभक्षी" "भट" म्हणून यावर मी तीव्र आक्षेप नोंदवू इच्छितो. (आणि हो, माझी बायको कोंबडीही बनवते हो कधीमधी...)
Yes, there are queers (gays, lesbians and others) in all streams of life.
And so are there "Bhat"s in all streams and spheres of life... So kindly keep your own stereotypes where they rightfully belong...

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

प्रियालि व ट्ग्या तुमचे अनेक आभार. माझा हेतू स्टीरियोटाइप कर्णे हा न्व्ह्ता. सम्वाद सुरु रहावा हि प्रामाणिक इच्छा.

In reply to by Kamgaar_mahila

सम्वाद सुरु रहावा हि प्रामाणिक इच्छा.
ज्यांच्याशी संवाद साधायचा आहे / साधायची गरज आहे, त्यांना (१) नावे ठेवून, (२) त्यांच्याबद्दल चुकीची गृहीतके / स्टीरियोटाइप्स बनवून आणि (३) ती गृहीतके अपमानकारकरीत्या बोलून दाखवून, संवाद सुरू राहणे सोडा, पण मुळात संवाद सुरू होणे शक्य आहे असे प्रामाणिकपणे वाटते का याचा थोडा विचार व्हावा. उलटपक्षी जर थोड्याफार प्रमाणात संवाद सुरू करण्यात जर कोणी किंचित का होईना, पण यशस्वी झाला असेल, तर त्यावर अशा वक्तव्यांनी पाणी पडणार नाही असे प्रामाणिकपणे वाटते का, यावरही थोडा विचार व्हावा. समलिंगींच्या काही अपेक्षा ('अपेक्षा' हा शब्द 'positions'साठी दुसरा चांगला मराठी प्रतिशब्द सापडला नाही म्हणून) समजू शकतो, जसे की expectation of tolerance from and greater acceptance within society on an equitable basis, equal civil rights वगैरे, किंवा इतरही अनेक न्याय्य बाबी असू शकतील ज्या समलिंगी नसल्यामुळे अननुभवामुळे माझ्या (किंवा समलिंगी नसलेल्या माझ्यासारख्या इतरांच्या) आकलनशक्तीच्या सध्या बाहेर असतील, आणि त्यातून काही विधायक आणि सर्वांसाठी न्याय्य असे सामाजिक बदल होण्यासाठी संवादाची आणि दोन्ही बाजूंना एकमेकांच्या बाजू, concerns समजून घेण्याची गरजही समजू शकतो. पण ज्यांच्याशी संवाद साधायचा त्यांना नावे ठेवण्याने त्यांना आपली बाजू ऐकून घेण्याची उपरती होईल असे का वाटावे हे कळत नाही. शेवटी सध्याची समाजरचना जशी आहे त्यात समलिंगींच्या बाजूतील न्याय्यता समजून न घेण्याने समलिंगी नसलेल्या समाजघटकाचे काडीचेही नुकसान होत नाही, आणि त्यांना नावे ठेवण्यातून त्यांना ती बाजू समजून घेण्याची इच्छा होण्याची सुतराम् शक्यता नाही, उलटपक्षी यदाकदाचित त्यांपैकी कोणाला अशा संवादाचे वावडे नसले किंवा काही अंशी काही बाबींमागील न्याय्यता समजूही शकत असली तरी अशा (विरळा) व्यक्तीची एकंदर बाजूतील न्याय्यतेबद्दलची सहानुभूती गमावण्याचीही शक्यता नगण्य नाही, हेही लक्षात घेतले पाहिजे. आपली बाजू, आपल्या मागण्या कितीही रास्त असल्या तरी ज्यांच्यासमोर त्या मांडायच्या, ज्यांना त्यांमागील न्याय्यता पटवून द्यायची त्यांना नावे ठेवण्याने ते आपली बाजू सहानुभूतिपूर्वक ऐकून घेण्यास बांधील राहत नाहीत, आणि संवाद साधणे तर सोडाच, पण उलट दरी वाढत राहते. आपल्या "संकेतस्थळाविषयीच्या आपल्या (stereotypical) निरीक्षणा"तून किती जणांचा अपमान अथवा किती जणांवर यातून अन्याय झाला, ते पाहू. १. सर्वप्रथम, अर्थातच, ज्यांच्यावरून हा stereotype होता तो गट, अर्थात जे मिसळपावावर येतात आणि ज्यांची पत्नी भाजी बनवते आणि ज्यांना आपली पत्नी कोणती भाजी बनवते यात रस आहे असे सर्व समलिंगी नसलेले विवाहित "भट" जातीतले शाकाहारी पुरुष. २. मिसळपावावर येणार्‍या सर्व (समलिंगी नसलेल्या) महिला (जात आणि आहार-निरपेक्ष), कारण यांना "पत्नी " असणे शक्य नाही आणि त्यामुळे १. मधील stereotypeमध्ये बसणे शक्य नाही, तरीही केवळ मिसळपावावर येत असल्यामुळे stereotypeमध्ये विनाकारण ढकलल्या गेल्यामुळे. (याचप्रमाणे १. मधील stereotype मध्ये न बसतासुद्धा केवळ मिसळपावावर आल्यामुळे त्या stereotypeमध्ये घुसडले जाणारे इतरही अनेक गट आहेत. जसे:) ३. मिसळपावावर येणारे अविवाहित पुरुष-सदस्य (जात, आहार आणि लैंगिकता-निरपेक्ष). यांनाही "पत्नी" नाही. ४. मिपावर येणारे/र्‍या मांसाहारी/सर्वभक्षी सदस्य. (जात, लिंग आणि लैंगिकता-निरपेक्ष). यांना केवळ "भाजी"त रस नसावा. ५. मिपावर येणारे परंतु आहारात फारसा रस नसणारे सदस्य (जात, लिंग, लैंगिकता आणि वैवाहिक स्थिती-निरपेक्ष). यांनाही "भाजी"त रस नसावा. ६. मिपावर येणारे समलिंगी (किमानपक्षी पुरुष-समलिंगी) सदस्य (जात-निरपेक्ष). यांना "पत्नी" नसावी. हे भिन्नलिंगीही नाहीत. त्यामुळे stereotypeमध्ये बसत नाहीत. तरीही घुसडले गेलेत. ७. मिपावरील "भट"खेरीज इतर जातींतील सदस्य (लिंग, लैंगिकता आणि वैवाहिक स्थिती-निरपेक्ष आणि केवळ "भट नाहीत" इतक्याच प्रमाणात जात-सापेक्ष). ८. मिपावरील अ-हिंदू सभासद (जात, लिंग, लैंगिकता आणि वैवाहिक स्थिती-निरपेक्ष). (आणखीही काही गट राहिले असल्यास चूभूद्याघ्या.) आता इतक्या जणांच्या शेपटावर पाय देऊनसुद्धा जर संवादाची अपेक्षा असेल तर धन्य आहे!

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

संवाद साधायचे त्यांच्याशी समेटीने, सहानुभूतीने बोलावे, हा टग्या यांचा मुद्दा उपयुक्त आणि व्यवहार्य आहे. पण त्रागा हा कोणाला चुकला आहे? मुळात माझा वरील लेखच देण्याचे कारण स्टीरियोटाइप्सबद्दल मुक्तसुनीत यांच्या लेखाला आलेल्या काही सदस्यांच्या प्रतिक्रिया होत्या. त्या तिथे नीट वाचून असे जाणवले की त्यातही काही जहर जहरासाठी होते, तर काही प्रतिक्रिया विचारी लोकांनी माहिती अभ्यासली नसल्यामुळे होत्या. हा नीरक्षीरविवेक जमण्यात सुज्ञ धोरण असते, हे मान्य. आणि काही प्रमाणात या "कोणार्क" लेखात त्या दुसर्‍या गटापुढे माहिती ठेवणे मला जमले, असे मला या लेखावरील प्रतिसादांतून जाणवले. पण तो नीरक्षीरविवेक सुरुवातीपासून जमलाच पाहिजे अशी अपेक्षा ठेवणेसुद्धा मानवसुलभ भावनांबद्दल अनभिज्ञता दाखवते. चवताळलेला, हल्लीच आवाज सापडलेला, जेव्हा त्रागा करतो, त्यात घट्ट विणलेला वाद सांगितलेला नसतो. त्यात खरे दुष्ट, आणि उदासीन म्हणून दुष्टपणा चालवून घेणारे, यांच्यात फरक केलेला नसतो. जगन्नाथाच्या रथाच्या एका चाकाखाली मी चिरडला जात असेन तर "हेच चाक वाईट/बाकी चाके केवळ त्याच गाड्याला जोडलेली" असे चित्र मला लगेच स्पष्ट दिसणार नाही. "रथाची सगळीच चाके लोकांना चिरडतात"="रथाची सगळीच चाके उजवी-पाठीमागची माझ्या रक्ताने माखलेली-[माझ्या वडलांसारखे विवाहित भट, किंवा असे काही]" असतात असा स्टीरियोटाईप सुरुवातीला होणे शक्य आहे. हे साहजिक आहे हे विचारी लोकांनी ओळखावे. चिरडला जाणार्‍याने चाकाचाकात फरक करणे दूरगामी महत्त्वाचे आहे खरे - चिरडणारे चाकच उचलून मी सुटणार आहे, दुसर्‍या चाकांनी हे चाक उचलत असताना थोडेच हलायचे आहे. (पण थोडेतरी हलायचे मात्र आहेच!) त्राग्याच्या बोलांनी संवाद खुंटणे ही फार पुढची बाब आहे. जिथे कोणी खाली चिरडले जाते आहे, याबाबत हूं-की-चूं नाही, संवादच नाही, तिथे सुरुवातीच्या स्टीरियोटाईप करणार्‍या आरड्याओरड्याने संवाद सुरू होईल. हा विचार अधिक आशावादी आहे. (टग्या यांनी १-२-३ असे स्टीरियोटाईपचे केलेले विश्लेषण मुद्देसूद असले, तरी मला त्यांच्या पहिल्या विवेक-सूचक परिच्छेदांना पुरवणी म्हणून अनाठायी वाटले. दलित कवितेचे आणि साहित्याचे अशा प्रकारचे "चळवळ्या दलितांचे सवर्णांबद्दल स्टीरियोटाईप काय" असे विश्लेषण करता येईल - पण ते जळजळीत साहित्य वाचताना अशा विश्लेषणात गुंतल्यास काही सारभूत हरवेल, असे मला वाटते.)

In reply to by धनंजय

जगन्नाथाच्या रथाच्या एका चाकाखाली मी चिरडला जात असेन तर "हेच चाक वाईट/बाकी चाके केवळ त्याच गाड्याला जोडलेली" असे चित्र मला लगेच स्पष्ट दिसणार नाही. "रथाची सगळीच चाके लोकांना चिरडतात"="रथाची सगळीच चाके उजवी-पाठीमागची माझ्या रक्ताने माखलेली-[माझ्या वडलांसारखे विवाहित भट, किंवा असे काही]" असतात असा स्टीरियोटाईप सुरुवातीला होणे शक्य आहे.
रथाचे एकच चाक चिरडत असताना त्राग्यातून "रथाची सगळीच चाके लोकांना चिरडतात" असा स्टीरियोटाइप होणे एक वेळ समजण्यासारखे आहे. परंतु येथे नेमका उलटा प्रकार होत आहे असे वाटते. समलिंगींना न समजून घेण्याचा मक्ता फक्त बायकोने बनवलेल्या भाजीत रस घेणार्‍या भटांनी घेतला आहे आणि उर्वरित सर्व समाजाचे समलिंगींशी सख्य आणि सामंजस्य आहे असा काही दावा आहे काय? माझ्या कल्पनेप्रमाणे समलिंगींबद्दल असामंजस्य हे कोणाही एका समाजघटकापुरते मर्यादित नाही. हे म्हणजे रथाच्या कोठल्याही चाकाखाली आले असता चिरडले जाण्याची शक्यता असली तरी केवळ मला हंडई गाड्या आवडत नसल्याने "हंडई गाडीच्या चाकाला लावलेली कोरियन कंपनीची टायरे वाईट कारण चिरडताना त्यांचे विशिष्ट आकृतींमध्ये वळ उठतात" असे म्हणण्यातला प्रकार आहे. एखाद्या संकेतस्थळावर समलैंगिकतेवर आर्टिकले येण्या-न येण्याचा आणि त्या संकेतस्थळाचे वाचक बायकोच्या हातच्या भाजीव्यतिरिक्त इतर अनुभव नसलेले भट असण्यानसण्याचा संबंध काय? बायकोच्या हातच्या भाजीव्यतिरिक्त इतर अनुभव नसलेल्या भटांखेरीज इतरांना समलिंगींबद्दल सहानुभूती असते असे यातून सुचवायचे आहे, की त्यांना समलिंगींचे (पॉझिटिव्ह) अनुभव पदोपदी येत असतात असे, की समलिंगींबद्दल सहानुभूती नसलेले सगळे एकजात बायकोच्या हातच्या भाजीखेरीज इतर अनुभव नसलेले भट असतात असे? बायकोच्या हातच्या भाजीखेरीज इतर अनुभव नसलेल्या भटांचे एक वेळ सोडा (का सोडा? पण तूर्तास सोडा.), पण इतर गटांना तरी यातील कोणतेही कॅरेक्टरायजे़शन योग्य किंवा न्याय्य वाटते का (बा. हा. भा. खेरीज इ. अ. न. भटांसाठी योग्य किंवा अयोग्य नव्हे; त्यात्या इतर गटांसाठी योग्य किंवा अयोग्य!) याची विचारणा केली आहेत काय? मला तरी हा अन्यायाखाली दडपण्यातून येणार्‍या त्रागात्मक स्टीरियोटाइपच्या प्रकारापेक्षा समलिंगींच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपले असलेले इतर असंबद्ध स्टीरियोटाइप्स उधळण्याचा प्रकार वाटतो. असो.

In reply to by धनंजय

धनजंय यांचा प्रतिसाद आणि त्यावर टग्या यांचा प्रतिसाद. आनंदपर्वणी....धन्य धन्य.. जय हो.... मुक्तपणें मुक्त मुक्ताई रत । हरिनाम सेवीत सर्वकाळ ॥ (मुक्तछंदी) धम्मकलाडू "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

Dear Shravan and others, Thanks for responding. And please be patient with me as I learn to use marathi fonts here. I will continue to respond in English till then. I totally agree that as sexual minorities (gay, lesbian, bisexual) we are connected by a common thread (of sufferings, discrimination, joys, happiness) with all sexual minorities around the world (not just Dhule but any small town in Brasil or Mexico as well) Because we share similar life experiences, we know and we understand the joys and pains of all sexual minorities (just in the same fashion any minority does this -like women can connect with other women on lot of gender related issues across the globe in same way. Indians in US can corelate to other immigrants etc..). The only reason I stated my education and background was to establish my authenticity. I am new to this forum and have never written here. Before coming out publicly on this forun, I wanted to make sure I establish my credentials as unfortunately based on previous experiences I hear from my straight friends (to whom I am still not 'out') that gay people do not exist among us. They are some type of psycho or something like that. It is unfortunate we have to prove our authenticity before we claim our sexuality. Anyway, hope this helps. As I said, I will definitely be regular member on this site, not because we are talking about this issue, but because I really liked the range of topics this forum is handling (and I must say with lot of maturity). So keep them coming. I am telling my partner to sign up and create an account as well. :)

मिसळपाव वर जी काही मोजकी प्रामाणिक आणि संवेदनशील लोक आहेत, त्या पैकी धनंजय हे एक आहेत. लैंगिकता हा खाजगी विषय आहे. ---- सखाराम गटणे © २००८, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

लेख मनापासून आवडला. फार फार आवडला. अतिशय आवडला. किती प्रामाणीक, हळूवार, सुंदर, दर्जेदार!!!! धनंजय साहेब आपली लेखन शैली अ-प्र-ति-म!!!! एका प्रतिसादात वाचलं की सेक्सचा मूळ उद्देश आहे प्रजोत्पादन . मला ते चूकीचं वाटतं. माझ्या मते सेक्सचे अनेक हेतू/जीवनातील उद्देश आहेत आणि एकमेकांची मानसिक/भावनिक निकोपता राखणं, परस्परंची काळजी घेणं, परस्पर मैत्री संबंध दृढ करणं हे मला आकळलेले काही. मग ते स्त्री-पुरुष या जोडीने साध्य होवो वा अन्य स्त्री-स्त्री वा पुरुष-पुरुष ते स्वागतार्हच आहेत सामाजीक आणि मुख्य वैयक्तीक स्वास्थ्यासाठी. सहजीवन जगण्यास जोडीदार मिळणं यासारखं सुख सुख ते नाही. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ हम नहीं वह जो करें ख़ून का दावा तुझपर बल्कि पूछेगा ख़ुदा भी तो मुकर जायेंगे

In reply to by शुचि

एका प्रतिसादात वाचलं की सेक्सचा मूळ उद्देश आहे प्रजोत्पादन . मला ते चूकीचं वाटतं.
सेक्स ची जैविक प्रेरणा ही प्रजोत्पादनाशीच निगडीत आहे या अर्थाने तो मुळ उद्देश आहे असे म्हटले जाते. प्रजोत्पादनाशी निगडीत न ठेवता तो केवळ आनंददाय़ी करणे आता शक्य असते हे मान्य. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

मिसळपाववर वाचलेल्या प्रामाणिक आणि अभिनिवेशविरहित हृद्य लिखाणाचा शिरोमणी असा हा लेख लिहिल्याबद्दल धनंजयरावांना मनापासून धन्यवाद! कोणार्कच्या शिल्पांचा इतका समर्पक उल्लेख कुठेही आढळलेला नाही. बाकी प्रतिसादकांबरोबरची चर्चाही (काही स्थानं वगळता) अगदी वाचनीय आहे. धनंजयराव, या लेखामुळे तुमच्याबद्दलच्या आदरात वाढच झालेली आहे असं नमूद करू इच्छितो. आभारी आहे.

हा धागा वर काढल्याबद्दल प्रासभौंचे अनेक आभार. इतके प्रांजळ अनुभवकथन मराठीच का, कुठेही अतिशय विरळाच होय. समलिंगी संबंधांबद्दल माझे व्यक्तिगत मत सनातनी असले तरीदेखील धनंजय यांना अनेक सलाम. लेखन पाऽऽर भिडले.

अप्रतिम लेख.. वाचुन धक्का बसला..पण धनंजय ह्यांचे आधीचे लिखाण वाचुन जी प्रतिमा तयार झाली होती ती उलट अजुनच उंचावली. लोक हेटाळणी करतात, अनैसर्गिक म्हणतात, लोकांच्या संस्थळावर जर इतक्या जहाल प्रतिक्रिया येत असतील तर प्रत्यक्ष आयुष्यात किती त्रास सहन करावा लागत असेल? लैंगिकता हा माणसाचा केवळ एक पैलु आहे. त्यावरुन एखाद्या विषयी मत बनवणं चुकच.. खर तर आधीही म्हणल्या प्रमाणे मी हे आकर्षण समजु शकत नाही पण हे समजु शकते की ही विकृती नाही. आणि त्याहुनही महत्वाचं म्हणजे ही माणसाची अत्यंत खाजगी बाब आहे, त्यावर प्रतिक्रिया देण्याचा आणि भोचकपणा करण्याचा कुणालाच अजिबात अधिकार नाही.

मिसळपाववरचा एक सुंदर लेख. विचारांना प्रगट कबूल होण्याचं प्रामाणिक धारिष्ट्य एका विशिष्ट समाजरचनेच्या खुलेपणामुळं सहज होतं. धनंजयराव भारतात राहते तर कदाचित वेगळा प्रकार असता हे ते स्वतः देखील कबूल करतील. कदाचित अमेरिकन समाजरचनेमध्ये समलैंगिकतेबाबत स्वीकार आहे. त्यामुळं तिथं काही वेगळं वाटत नसेलच. मला वाटतं २००८ मध्ये मिसळपावची ओळख प्रकाश घाटपांडे काकांनी उपक्रम का मनोगतवर दिलेल्या ह्याच लेखाच्या लिंकमुळं झाली. तेव्हा उत्तम संपादकीय देखील सुरु होते. लेख वाचायला तेव्हा जास्त मजा यायची हे कबूल आहे. गेले ते दिन गेले.... ह्यात कुठलंही कमी जास्त करण्याचं कारण अथवा हेतू नाही. बदल आहे तो आहे.