Skip to main content

मूल दत्तक घेणे हा मूर्खपणा आहे का?

लेखक आदित्य कोरडे यांनी मंगळवार, 25/10/2016 या दिवशी प्रकाशित केले.
मूल दत्तक घेणे हा मूर्खपणा आहे का? मूलतः हा प्रश्नच मूर्खपणाचा आहे पण तो मला पडलेला नाही. वसुधाने(बायको) मानसिक समुपदेशक म्हणून काम करायला सुरुवात केल्यापासून एक एक वल्ली येऊन भेटतात त्यातल्याच एकाने विचारलेला हा प्रश्न. आता बायकोकडे येणाऱ्या रुग्णांबद्दल लिहिणे नैतिकतेला धरून नसल्याने त्याबद्दल जास्त लिहित नाही पण या प्रश्नाने विचार चक्र सुरु झाले. आम्ही आमची एकुलती एक मुलगी दत्तकच घेतली आहे आणि त्या सगळ्या सरकारी प्रक्रियेतून जाताना अनेक अनुभव आले,अनेक लोक भेटले त्यांच्या प्रतिक्रिया, अनुभव (बऱ्याचदा अननुभव). न मागता दिलेले सल्ले आणि मत, ह्या क्षेत्रात बोकाळलेला भ्रष्टाचार, सरकारी लोकांचा तुच्छ आणि बेदरकार असा attitude, सगळ्याचा यथेच्छ अनुभव घेतला आणि मूल दत्तक घेण हा एक मूर्खपणा आहे असं काहीकाळ मलाही वाटू लागलं होतं. (अर्थात वसूच्या पेशंटला काही हि अशी खुदाई खिन्नता नव्हती आली! त्याच्या दत्तक घेतलेल्या मुलामध्ये आणि त्याच्या मध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला होता आणि तो हे मूल जैविक दृष्ट्या आपलं नाही म्हणून असं झालय म्हणून मूल दत्तक घेणे मूर्ख पणा असतो का असे विचारात होता.) याबाबतीतला आमचा सरकार/ कोर्ट विषयीचा अनुभव दिव्य आहे. एकतर ह्यातला भ्रष्टाचार भयानक आहे. मला आश्चर्य वाटले, पण पुण्यात मुलगा दत्तक हवा असेल तर ३-४ लाख रुपये मोजावे लागतात आणि मूल जर १ वर्षापेक्षा कमी वयाचे असेल तर हि रक्कम वाढते. नाहीतर ३ ते५ वर्षाची प्रतीक्षा करावी लागते. मुलीला दत्तक घ्यायचे असेल तर काही पैसे लागत नाहीत. मुलगा असो मुलगी आम्हाला काही फरक पडत नव्हता आणि आम्ही पैसे मोजून काही मूल दत्तक घेणार नव्हतो म्हणून मग अह्मद्नगरच्या स्नेहालय या प्रसिद्ध अनाथालयाचे गिरीश कुलकर्णी( हीच ती आमीर खानच्या सत्यमेव जयते मध्ये दाखवली गेलेली संस्था-त्यावेळी त्यांच्याकडे एकही लहान मुल नव्हते) यांनी सल्ला दिला कि तुम्ही एक युनिवर्सल असा अर्ज तयार करून सगळ्या महाराष्ट्रात जिथे तुम्हाला माहिती मिळेल तिथल्या अनाथाश्रमात नेऊन द्या. तिथल्या कोर्टात वारंवार जायची तयारी ठेवा. मी देखील माझ्या ओळखी मध्ये सांगून ठेवतो पण सगळी सरकारी प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करावी लागेल त्यात काही पळवाट/ लाच देऊन काम करून हवे असेल तर माझी मदत अपेक्षु नका. झालं, मग आमची धावपळ सुरु झाली. पहिलं म्हणजे दोघांच्या चारित्र्याचा दाखला तो पोलिसांकडून घ्यायचा त्याकरता पुण्याच्या कामिशनर हाफिसात खेट्या मारल्या. मग तिथून आम्ही जिथ राहत आहोत तिथल्या पोलीस ठाण्यापर्यंत वाऱ्या केल्या २ महिन्यांनी माझा दाखला आला पण बायकोचा नाही, कारण ती मुळची नगरची, लग्न होऊन २-३ वर्षच झालेली,मग इथल्या पोलिसांना कसे कळणार कि ती कोणी डांबिस गुन्हेगार वगैरे तर नाही ना! मग पुणे ते नगर अन नगर ते पुणे अशा खेट्या झाल्या. अखेरीस तो दाखला मिळाला.मग केस पेपर,आम्ही दोघांनी “मला मुल दत्तक का घ्यायचे आहे” हे सविस्तर सांगणारा वेगवेगळा लिहिलेला निबंध वजा शपथनामा, आमचे वैद्यकीय अहवाल ( फक्त ससून च्या डॉक्टरांनी सही केलेलेच) उत्पन्नाचे दाखले, मालमत्ता, कर्ज वगैरे ची कागद्पत्र वगैरे सोपस्कार झाले. बायकोच्या आणि माझ्या ओळखीच्या दोघा मित्रांचे( म्हणजे वेगवेगळ्या हां, नवरा बायकोला ओळखणारा समान मित्र असला कि त्याची विश्वासार्हता संपते)आम्ही चांगले लोक असल्याची नोटरी समोर दिलेली ग्वाही ( मग पोलिसांचे character certificate कशाला?..सुरळी करून...जाऊ दे...)माझ्या आणि फक्त माझ्याच एका नातेवाईकाने मी आणि माझी बायको दोघेही गचकलो तर तो आमच्या दत्तक मुलीला साम्भाळेल अशी दिलेली ग्वाही( प्रतिज्ञापत्र ). आता आम्ही दोघेहि गचकलो आणि त्याने नाही सांभाळले तर? त्याला काय आत टाकणार का कोर्ट? काय पण मागतात? हे सगळ सगळ पूर्ण केल. तो चांगला २०० पानी दस्तऐवज तयार करून मुंबई, नाशिक, पुणे, नगर, नांदेड इथल्या अनाथाश्रमात दिला. कर्मधर्म संयोगाने नांदेडच्या नरसाबाई अनाथालयात एक ३ महिन्याची मुलगी दाखल झाली होती.त्यांनी फोन केला म्हणून धावत गेलो.बायकोची मावशी तिकडे राहते त्यांनीच सगळी माहिती काढली होती. तिथल्या राठोडनावाच्या समाजसेवकाने सांगितले कि मुलगी दत्तक मिळेल पण प्रक्रिया पूर्ण करायाला २-३ वर्ष जातात. पण मधल्या काळात फोस्टर केअर( यशोदा-नंदासारख )म्हणून मुलगी तुंमच्या कडे देऊ पण काही घोळ झाला तर मुलगी काढून घेऊ ( जशी हप्ते नीट भरले नाहीत कि गाडी उचलून नेतात तसे) शिवाय त्याची अपेक्षा होती कि आम्ही काही तरी देणगी द्यावी त्याच्या अनाथालयाला.नसती दिली तर समाज सेवकाचा सर्च रिपोर्ट आणि न हरकतीचा दाखला त्याने अडकवला असता हे सांगणे नकोच (हे अनाथालय नांदेडच्या तत्कालीन नायब तहसिलदाराच्या बायकोच्या वडिलांचे होते हेही मुद्दाम सांगायाला हवे). मी म्हटले देतो पण चेकने देणार आणि रीतसर पावती घेणार, तो आढेवेढे घेऊन तयार झाला... हे काय चेकने दिलेले पैसे लंपास करू शकत नाहीत कि काय! आमची आपली मनाची एक समजूत झालं अन काय! मग आमच्या कोर्टाच्या वाऱ्या सुरु झाल्या. विशेष गोष्ट म्हणजे कोर्टात हि केस म्हणून उभी राहते. कौटुंबिक न्यायालय वगैरे नाही, आपलं( आपलं कसलं डोम्बलाच..) नेहेमीचं सत्र न्यायालय. तिथे मी, सासू,सासरे, बायको, तिची मावशी, मावशीचे यजमान दीपक काका आणि ३ महिन्याची हि पोरगी घेऊन आम्ही उभे. न्यायाधीशाला पुरावा म्हणून जिवंत पोर दाखवायला नको? शेजारी हातकड्या घातलेले गुन्हेगार येजा करतायत, त्यातले कोणी आमच्या शेजारी येऊन बसतात (आपली काय हिम्मत त्यांना इथे बाई माणसाच्या शेजारी बसू नका म्हणायची). संडास लघवी करायची सोय तर दिव्यच. वकील म्हटला सकाळी ११ वाजता कोर्ट सुरु होते तुम्ही १०.३० ला या पहिली तुमचीच केस घेऊ १० मिनिटात सोडतो. म्हटलं १०.३० का १०.०० वाजता येतो पण न्यायाधीशाला काय सुरसुरी आली काय माहित, आमच्या ऐवजी त्याने त्याच्या मनानेच एक दरोड्याची केस पहिली घेतली. मग दुसरी असं करत तिथे बाहेरच ४.०० वाजले. तिथे आम्ही १० ते ४.०० काहीही न खाता पिता ( म्हणजे चहा आणि बिस्कीट फक्त आणि मी आणि दीपक काका मध्ये मध्ये खाली जाऊन सिगारेटी ओढून यायचो तेवढच) उभे. आपण कुठे गेलो आणि आपल्याला पुकारले तर! नकोच ते म्हणून. शेवटी माझा संयम तुटला, वकिलाला म्हणालो ३ महीन्याच लहान पोर घेऊन हे इथे आम्ही असे ६-६ तास उभे राहतो तुम्हाला काही लाज वाटत नाही ?... वगैरे वगैरे बराच बोललो असेल . वकील शांत पणे म्हणाला," माझ्यासमोर काय चिडायचं ते चीडा आत जाऊन काही बोलू नका . माझा एक अशील होता. म्हणजे आहे अजून त्याने अशीच मुलगी दत्तक घेतली आणि त्याची बदली झाली मद्रासला. खेट्या घालाव्या लागतात म्हणून जज समोर किरकिर केली. माझे ऐकले नाही, आज ७ वर्ष झाली ७ वर्षाच्या मुलीला घेऊन दर ६ महिन्यांनी येतो. त्या मुलीला काय वाटत असेल? पण कोर्टाला त्याच्याशी घेण देण नाही. बघा बुवा!" झालं, आपण गार. सगळी हवाच निघून गेली. शेवटी बेलीफाने ४.३० ला आत घेतले. तिथे मागे उभे राहिलो. अशीच काहीतरी दोन भावांच्या भांडणाची केस चालू होती मी आता आजचा दिवस गेला अशी मनाची तयारी करून केस ऐकायला लागलो . जजचं काही आमच्याकडे लक्ष नव्हत पण अचानक मिहीकानी ( आमची मुलगी) आईच्या गळ्यातले मंगळसूत्र ओढले( माझी बायको मंगळसूत्र घालत नाही पण वकील म्हटला, “तुमचे पुढारलेले विचार घरी ठेवा पुण्याला आणि नवऱ्याकरता नाही तर जज करता म्हणून मंगळसूत्र घाला) म्हणून बायकोने ते सोडवून घेतले तसं तिने जोरात भोकाड पसरले. आता जजच काय, अख्ख्या कोर्टाचं लक्ष गेल आणि जजने आम्हाला पुढे बोलावलं म्हणाले, “अरे यांची केस तर आजची पहिलीच होती ना, मग हे वेळेवर आले नाहीत का?” घ्या आता कमाल झाली पण मी काही बोललो नाही कसनुसं हसलो फक्त. “हा, घ्या ह्यांचे पेपर्स” जज म्हणाला “काय करता तुम्ही?.” “टाटा मोटर्स मध्ये नोकरी करतो सर, पुण्याला.” “टाटा मोटर्स ते काय आहे?” जज (अहाहा ! काय विद्वान, बहुश्रुत माणूस जज बनतो.-हे आम्ही मनात)सर आम्ही गाड्या बनवतो इंडिका वगैरे.” ‘बर बर. मुलीला सांभाळणार ना नक्की. टाकणार तर नाही ना?” “(वा काय प्रश्न आहे!) नाही सर, नीट सांभाळू”.मी अहो पण नाही सांभाळले तर आम्ही काय करणार? आता याच काय उत्तर देणार! मी कसनुसा चेहरा करून म्हटलं, “नाही नाही , नीट सांभाळू.” “पण टाकली तिला तर, तिने काय करायचे ?काही पैसे ठेवले का तिच्या नावाने ?” हे असे काही असते हे आम्हाला काही माहित नव्हते? म्हटले नाही ठेवले मग ठेवले पाहिजेत कि नाही? किती ठेवाल?”. जज म्हणाला ( sorry म्हणाले) म्हटले माझी साधारण ३-४ लाख ठेवायची तयारी आहे जज म्हटला, “ठीक आहे १ लाखाची FD करा तिच्या नावाने, १८ वर्षाची आणि पावती जमा करा कोर्टात आणि मग ६ महिन्यांनी कोर्ट ऑर्डर घेऊन जा. आता प्रोविजनल ऑर्डर द्या ह्यांना” आश्चर्य म्हणजे वसुधा म्हणजे जी बाई मिहीकाची आई होणार होती तिच्याकडे मिहीकाच्या काळजीने प्रश्न विचारणाऱ्या जजने ढुंकूनही पाहिले नाही. आता हि FD फक्त सरकारी बँकेतलीच लागते बरं का! खाजगी किंवा सहकारी बँकेतली चालत नाही. मग पुण्याला आलो आणि SBI मध्ये गेलो FD करायला तर ते म्हणाले जास्तीजास्त ८ वर्षांची FDहोते. त्यांना कोर्टाची ऑर्डर दाखवली पण ते पण सरकारी कर्मचारीच , नाही म्हणजे नाहीच बधले. मग महाराष्ट्र बँकेत गेलो. तिथे माझी ओळख होती. तिथले ओळखीचे काका म्हणाले FD १८ वर्षाची होणार नाही पण मी त्यावर शिक्का मारून शेरा देतो कि PAYABLE TO THE RECEIPT HOLDER ON OR AFTER HER 18TH BIRTHDAY’ आणि तू एक बाहेरून नोटराइज्ड प्रतिज्ञापत्र करून घे बँक १८ वर्षाची FD देत नाही म्हणून असा शेरा घेतला आहे त्यावर मी सही शिक्का देतो. मग मी तसे करून ती FDघेऊन कोर्टात( नांदेडला) गेलो आणि त्यानंतर परत ६ महिन्यानंतर जाऊन ऑर्डर घेतली. तुम्हाला वाटेल झालं सगळ, गंगेत घोडं न्हालं एकदाचं, पण नाही आता तिचा जन्म दाखला तो काढायचे आणि बाप म्हणून माझे नाव लावायला गेलो, तर नांदेड महानगर पालिका म्हणते तिचा जन्म दाखला कांचन राठोड ह्या नावाने आधीच बनला आहे. (काय असते , हे अनाथाश्रम्वाले मुलांची काही नाव ठेवून त्यांचे दाखले आधीच काढून ठेवतात. त्यांचा दोष नाही) मग पुन्हा निरनिराळी कागदपत्र, ना हरकत दाखले हे अन ते असले सगळे सोपस्कार केले त्याकरत नांदेडला ७-८ दिवस राहिलो. मे महिन्याच्या चांदण्यात फिरलो आणि ते काम केले. सगळ होऊन तो जन्मदाखला हातात घेतला तर त्या जन्ममृत्यु नोंदणी कार्यालयातली बाई म्हणते कशी,” घ्या झालं सगळ तुमच काम. आता नीट काळजी घ्या मुलीची?” एरवी मी चिडलो असतो काहीतरी खारट तुरट बोललो असतो. पण मी इतक्या कष्टानंतर मिळालेलं ते मिहिकांच birth certificate डोळे भरून बघण्यातच गुंगलो होतो. जाता जाता आणखी एक, कोर्टात भिंतीवर दिशा लिहितात तिथे उत्तरच्या ऐवजी डोंगराकडे , पूर्वेच्या ऐवजी रानाकडे, पश्चिम च्या ऐवजी नदी कडे आणि दक्षिणच्या ऐवजी समुद्राकडे असे लिहिल होतं. तुरुंगाकडे, फाशीघराकडे अंदामानकडे असे काहीतरी लिहायला हवं होतं नाही का ? मूल दत्तक घेणे हा एक मूर्खपणा खरतर नाही. पण तयारी नसताना मूल दत्तक घेणे हा ठार मूर्खपणा आहे. म्हणजे समुद्रात पोहायला जाणे हा मूर्खपण नाही पण पोहायला येत नसताना पोहायला जाणे हा नक्कीच मूर्खपणा आहे. आमच्या आयुष्यात मिहिका आल्यापासून ती आमची जैविक मुलगी नाही हे जणू विसरूनच गेलो आहोत. म्हणजे पाहिल्या रात्री, सासुबाईंनी जुन्या साडीची झोळी करून त्यात तिला झोपव म्हणून सांगितले, आम्ही तिला झोळीत घातले तेव्हा तिने रडून हलकल्लोळ केला होता. तिला झोळीतून काढून दोघांच्या मध्ये घेतले तेव्हा ती तिच्या नव्या आईच्या कुशीत शिरून एकदम शांतपणे झोपली, जणू जन्मल्यापासून ती आईच्या कुशीतच झोपत आली आहे. तिची आई वसू तिच्याशी कधीमधी बोलताना, तुला ९ महिने पोटात वाढवलय... वगैरे बोलुन जाते, तेव्हा मला जरा तिला जमिनीवर आणावं लागतं. ---आदित्य
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 26431
प्रतिक्रिया 67

प्रतिक्रिया

_/\_ सर्वात पहिले तुमचे अभिनंदन आणि दंडवत. जिथे लोक विचारसुद्धा करु शकत नाही तिथे तुम्ही करुन दाखवले. एवढा सगळा मनस्ताप सहन करून एका निरागस जीवाची जबाबदारी खंबीरपणे घेतल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.. बाकी आपल्याकडे कायद्याचा वापर सुव्यवस्थेपेक्षा भ्रष्टाचार करायला जास्त कामी येतो. नविन कायदा आला की सर्वात पहिले त्याचा गैरवापर कसा करता येईल हे पाहिले जाते. :(

In reply to by आदित्य कोरडे

आदित्य भौ. तुम्ही एका जीवाचा सांभाळ करण्याची जबाबदारी घेतलीत. अभिनंदन. मूल दत्तक घेणे ही नंतरची गोष्ट आहे. पण मूल असणे हीच एक अनावश्यक गोष्ट आहे असे मला वाटते. मुले असणे ही खरेतर अनावश्यक लायॅएबलिटी असएत. मूल होऊ देणे , ते वाढवणे या बदल्यात काय मिळते हो? तर ते मोठे झाल्यावर त्याच्याक्डून हाडूत हुडूत करुन घेणे.... त्याची मग्रुरी सहन करणे , मूल दत्तक घ्यायचे असल्यास किंवा होऊ द्यायचे असल्यास या सर्व गोष्टीम्चा विचार करून स्वतःच्या हाताने पायावर धोंडा मारून घ्यविचाराहे असा विचार करून मग मूल होऊ द्यावे , दत्तक घ्यावे.

In reply to by विजुभाऊ

जिवंत राहूनही तसा काय फायदा असतो म्हणा, शेवटी लाकडं रचून फुंकून टाकतेत... त्यापेक्षा कळायला लागेल त्याक्षणी मेलेलं बरं! ;)

छान लिहीलंय. हा सगळा अनुभव बहिणीच्या वेळेला आहे. पैसे लागले पण ते मुलीच्या नावानेच ठेवलेत. आणि एक मुल घ्यायचं तर इतके सोपस्कार असायलाच हवेत. चुकीच्या माणसांकडे मुल जाणार नाही हे तर त्यांना बघावं लागेलच ना. कोर्ट आपलं भारी आहेच, पण ते आवश्यक आहे. जाता जाता - अनुनभव म्हणजे अनुभव नसणे. नकारात्मक अनुभवाला अनुनभव म्हणत नाहीत. तुम्हाला बहुदा वाईट अनुभव असे म्हणायचे आहे का? की लोकांना अनुभव नसतो तरी सल्ले देतात असेच म्हणायचे आहे? {छान लिहीतय, पण रोज २-३ लेख टाकु नका. थोडा दम धरा. आणि मुख्य म्हणजे तुम्ही सुद्धा लोकांना प्रतिसाद द्या}

मी ह्यावर एक लेख अर्धवट खरडून ठेवलाय. टाकेन कधीतरी. आम्ही (बायको आणि मी) मुलगी दत्तक घेतली ३ वर्षांपूर्वी. मोठा मुलगा झाला तेव्हाच ठरवलं, कि दुसऱ्या मुलाचा विचार करताना मुलगीच घायची दत्तक. आमचा अनुभव मात्र खूपच छान आणि वेगळा होता. लिहीन सविस्तर अरे हो, तुमचं अभिनंदन! लोकं काय म्हणतील ह्याकडे फारसं लक्ष देऊ नका. आम्हाला मुलगी हवी होती आमचं कुटुंब चौकोनी व्हावं म्हणून, त्यामुळे एवढाच स्वार्थी विचार होता, आणि आम्ही प्रचंड खुश आहोत.

आता प्रोसेस अशी नाही. सेंट्रलाईज्ड आहे. कारा च्या गाईडलाईंस पाळाव्याच लागतात. ॲजंसीचे काम फक्त आधीची तयारी आणि नंतरची तपासणी इतकीच. प्रत्यक्ष दत्तक सरकारी मध्यवर्ती कार्यकारणीनुसार होतात. त्यात एजंसीचा काहीही संबंध येत नाही. तसेही काराच्या तत्वानुसार तुम्हाला मुल मिळवून देणे हे त्यांचे काम नसून मुलाला सुयोग्य आई वडील मिळवून देणे हे त्यांचे क्म आहे. जे अतिशय बरोबर आहे. न्यायालयाचे प्रश्न आणि पैसे बाजूला ठेवायला सांगणे ही योग्य. ही त्या मुलाकरताची सेक्युरिटी आहे. आणि godparents - जे दोन्ही पालकांना काही झाल्यास मुलाची काळजी घेतील ते ही असावेतच ना. मुलाची पुन्हा पुन्हा होरपळ होऊ नये म्हणून. तुमचा लेख खूप निगेटिव वाटला. आता दत्तक घेतानाचे ठरवलेत ते का आणि दत्तक घेतल्यानंतरचा +ve अनुभव ही येउद्यात

In reply to by nanaba

सध्या प्रोसेस बदलली आहे. आमच्या वेळी मात्र सोफेश (श्रीवत्स) मध्ये फारच वेगळा आणि उत्तम अनुभव आलेला. त्यांनी त्यांच्या अनुभवातून एक प्रोसेस केली आहे/होती , ज्यात ते कौन्सेलिंग सुद्धा करतात/करायचे, दत्तक आई वडिलांचा एक संपुर्ण दिवसाचा सेमिनार घ्यायचे, पूर्वी दत्तक गेलेली मुलं आणि त्यांच्या पालकांना मुद्दाम बोलवून त्यांचे अनुभव शेर करायचे. अर्थात हे सगळं आता बददललाय. आता कारा सगळं हॅन्डल करते, त्यामुळे महाराष्ट्रातून (का देशातून, नक्की नाही आठवत) तुम्हाला कुठूनही मुलं दत्तक मिळू शकते, पण ह्यामुळे ह्या अश्या संस्थांचा एक जो आपुलकीचा टच आहे, तो निघून गेलाय. लिहीन हे सगळं लवकरच.

In reply to by nanaba

"आता दत्तक घेतानाचे ठरवलेत ते का आणि दत्तक घेतल्यानंतरचा +ve अनुभव ही येउद्यात" म्हणजे काय? आता ती आमची मुलगी आहे. तिचे दत्तक असणे अथवा नसणे ह्याचा पुढे येणाऱ्या बऱ्या वाईट अनुभवांशी संबंध नाही. ती दत्तक आहे हे तिला अजून माहीतही नाही.

In reply to by आदित्य कोरडे

म्हणजे दत्तक घेतानाची विचार प्रक्रिया आणि नंतरचे +ve अनुभव लिहा. नाहीतर कुंपणावरचा पळून जायचा तुमचे -ve अनुभव वाचून.

राजे ,दंडवत __/\__. एका निरागस जीवाची जबाबदारी खंबीरपणे घेतल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.. __/\__.

सुरेख लेख. मिहिकाला भावी जीवनाच्या शुभेच्छा. तिच्या जीवनात मायेची कमतरता पडु नये अशी देवाकडे प्रार्थना करतो.

बाप रे दत्तक घेणे इतके कटकटीचे असते हे माहित नाही. माझ्या मित्रांपैकी किंवा नातेवाईकांपैकी काहींनी मूल दत्तक घेतले आहे त्यांच्या बद्दल आदर दुणावला आहे.

तुमच अभिनंदन आणी सामान्य माणसारखा फक्त विचार करत बसण्यापेक्षा खरोखर एवढा मोठा निर्णय घेवुन जराही भ्रष्टाचार न करता पुर्णत्वास नेला त्याबद्दल दंडवत.

अभिनंदन...! वाटले नव्हते कि एक मूल दत्तक घ्यायला एव्हढा खटाटोप करावा लागत असेल.

अतिशय जबरदस्त लेख अन तुमचे कौतुक, एरवी मी सरकारी नोकरांची तथाकथित तरफदारी करणारा म्हणूनच प्रसिध्द आहे इथे तरीही तुमची धावपळ अन तुटणारा जीव पाहून मनापासून विषण्ण वाटले, फक्त मला कोर्टातल्या प्रश्नोत्तरांचे नवल वाटले नाही, जज ने कितीही बेसिक प्रश्न विचारले (टाटा मोटर्स म्हणजे काय वगैरे) तरीही ते त्याच्यात असलेल्या बहुश्रुततेचा अभाव असे पाहिले जाऊ नये, अशी विनंती. ह्यात तुमचा अधिक्षेप करायचा हेतू नाही हे पण स्पष्ट करतो, कोर्टात जे सवाल जवाब होतात ते सगळे ऑन रेकॉर्ड असतात , त्यामुळे अगदी बाळबोध वाटणारे प्रश्न मुद्दाम विचारले जातात (उदा टाटा मोटर्स म्हणजे काय??) ही एल लीगल प्रोसिजर आहे अन कायदा भावनाहीन असतो असेच म्हणावे लागेल, ते प्रश्न अन तुम्ही दिलेली उत्तरे ही कोर्ट प्रोसीडींग मध्ये लिखित असतात (आठवा जज समोर/शेजारी बसलेला यंत्रवत टंकनिक) म्हणून ते प्रश्न विचारतात, आम्हालाही कधी कोर्टात काम असले तर दरवेळी वेगळी केस असल्यास आपला पूर्ण झाडा (कितीही बाळबोध असला तरी) द्यावाच लागतो.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

बापूसाहेब हे पटले नाही. न्यायाधीशांनी प्रत्येक प्रश्न विचारणे अजिबात आवश्यक नाही. आपल्याला जे सांगायचे आहे ते आपण शपथपत्राद्वारे लिखित देऊ शकतो आणि त्यावर न्यायाधीश फार तर फक्त एक प्रश्न विचारतात कि हे शपथपत्र तुम्ही दिले आहे हे तुम्हाला मान्य आहे ना? किंवा त्या तीळ काही गोष्टींबद्दल शंका असेल तर ती वकिलांना विचारून शंका निरसन केले जाते. हे शपथ पत्र न्यायालयात सादर केले कि तेथील रजिस्ट्रार ते नोंदीवर घेतोच. न्यायाधीशाच्या टॅंकनिकाला लिहिण्याची अजिबात आवश्यकता नाही. आपण सांगितलेली गोष्ट हि फौजदारी खटल्याबाबत असेल जेंव्हा विरोधी पक्षाचा वकील आपली उलट तपासणी घेऊ शकतो. नागरी खटल्यात असे प्रश्न विचारणे मुळीच आवश्यक नाही. माझी स्वतःची केस मुंबई उच्चं न्यायालयात साडे तीन महिने चालली तेंव्हा मला एकदाही असे काहीही विचारले गेले नाही. एवढेच नव्हे तर वगैर बाजूच्या कोणत्याही खटल्यात तसे विचारले गेले नव्हते. सर्वोच्च न्यायालयात तर मी दिल्लीत पाऊलही ठेवले नाही. फक्त मुंबईत शपथ पत्र करून स्पीड पोस्टाने माझ्या वकिलाला पाठवत असे आणि तेच न्यायालयात ग्राह्य धरले जात असे. खालच्या कोर्टातील न्यायाधीश "स्वतःचे वतन" असल्यासारखे खटले चालवतात आणि त्यातून पक्षकाराला अतोनात हाल काढायला लागतात हि वस्तुस्थिती आहे. टाटा मोटर्स म्हणजे काय हे विचारण्याची न्यायाधीशाला अजिबात गरज नाही. प्रथमच जे काही सांगायचे आहे ते शपथपत्रावर लिहून द्या सांगितले कि झाले.

In reply to by सुबोध खरे

मी तर यापुढे जाऊन असे म्हणेन कि अशा चांगल्या कामासाठी प्रयत्न करणाऱ्या माणसांना त्रास होणार नाही हे पाहणे न्यायालयाचे/ न्यायाधीशांचे आणि बाकी सरकारी यंत्रणेचे काम आहे. मुळात त्या माणसाला असे परत परत न्यायालयात उभे करण्याचे किंवा सरकार दरबारी खेटे मारायला लावण्याचे कारणच नाही. तो माणूस काही गुन्हेगार नाही. एक सत्कृत्य करण्यासाठी प्रवृत्त झालेल्या माणसाला असा त्रास झाला तर कोण माणूस अनाथ बालकाला दत्तक घेईल? मुंबईतील वात्सल्य ट्रस्ट ने या कटकटींना कंटाळून आपल्याकडील बालके दत्तक देणे थांबविले आहे असे ऐकिवात आले आहे मला खेदपूर्वक नमूद करावे लागत आहे.

हा अनुभव इथे विस्ताराने लिहला ह्याबद्दल धन्यवाद. तुमची लेखनशैली उत्तम आहे. मी असं सुचवेन की याबाद्दल एक औपचारिक लेख English वा हिंदीत लिहून पंतप्रधान कार्यालयाला पाठवता आला तर बघा.
पण वकील म्हटला, “तुमचे पुढारलेले विचार घरी ठेवा पुण्याला आणि नवऱ्याकरता नाही तर जज करता म्हणून मंगळसूत्र घाला)
काय म्हणावं अशा जजला. बाकी एकूणातच कोर्ट वगैरे म्हणजे त्रासदायक प्रकरण. आणि त्याविरुद्ध दाद मागणे ही कठीण. दुसर्‍या एखाद्या सरकारी कार्यालयात तुम्हाला त्रास झाला , खूप वाट पहावी लागली, खेटे मारावे लागले तर तुम्ही निदान बोंब मारु शकता, वरिष्ठांकडे तक्रार करु शकता, वृत्तपत्रांकडे , अगदी मंत्री-मुख्यमंत्री यांच्याकडेही धाव घेवू शकता. पण इथे विनाकारण तारीख पे तारीख होत तुम्हाला त्रास झाला तरी तो सहन करण्या पलीकडे तुमच्या हातात काही नसते
मे महिन्याच्या चांदण्यात फिरलो
हे खास आवडलं !! लिहित रहा ..

बऱ्याच कटकटी असतात दत्तक म्हणजे. माझ्या एका मैत्रिणीलाही तुमच्यासारखाच अनुभव आला. तीही एका दत्तक मुलीची आई आहे.

फारफार वेगळा आणि खरा अनुभव मांडला आहेत. त्यासाठी वेळकाळ पाहू नका. लिहा धडाधड. एक दोन नातेवाइकांनी दत्तक घेतलेत पण हे कसं अन काय केलं वगैरे विचारून भंडावणे बरोबर वाटले नव्हते.

भारी काम केलेत...पण इतक्य अडचणी असणे कदाचित फायदेशीर सुध्धा असु शकते...जर काही जण असल्या कटकटींमधून नाही जाउ शकले तर ते मुल सांभाळायचे कठिण काम करू शकतील?

In reply to by टवाळ कार्टा

तुमचे म्हणणे बरोबर आहे... त्या संस्थेच्या राठोड ह्या व्यवस्थापकाच्या म्हणण्या प्रमाणे 40-45% लोक दत्तक घेतलेली मुलं परत करतात.

निर्णयाबद्दल अभिनंदन, आणि सरकारी अनास्था/दिरंगाईला न कंटाळता तुम्ही उभयतांनी बेत तडीस नेला म्हणून कौतुक.आप्ल्या परिवारातील इतर सदस्यांनीही दिलेल्या पाठिंब्याचा /विश्वासाचा तुम्ही नक्कीच आदर ठेवाल हे पुरेपुर समजतो. मिहिकाला अखंड मायेची उब आणि उमेदीला बळ कायम मिळो हीच शुभेच्छा!!!

_/\_ धन्य आहात तुम्ही. मिहिकाला गोड पापा..आणि भावी आयुष्यासाठी शुभेच्छा.

मिहिकाला आणि तुम्हाला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा.. एवढ्या कटकटी पार कराव्या लागतात हे माहिती नव्हत.

राजे दंडवत स्विकारा ___/\____ माझ्या एका मित्राने काही वर्षापुर्वी एक मुल दत्तक घेतले, दुर्दैवाने त्या मुला मध्ये काही शाररीक व्यंग आहे असे नंतर काही काळानंतर समजले. ते दोघेही अर्थात त्यावर सर्व आवश्यक उपचार करत आहेत व त्यात थोडेफार यश आले आहे. त्यांची या बद्दल तक्रार तर सोडाच पण साधा नाराजीचा सुर कधीही नसतो. या उप्पर त्याच्या बायकोने या मुलाला आता माझी जास्त गरज आहे म्हणुन स्वता:चे मुल होउ देणार नाही असे ठरवले व पाळले आहे.

दत्तक मुल घेणार्यांचा मला नेहमीच हेवा वाटतो,कोरडे साहेब फार छान काम केले आहे तुम्ही.मिहीकाला भावी आयुष्याच्या शुभेच्छा.

एक प्रशंसनिय काम केलेत साहेब तुम्ही ! तुमचा अनुभव इथे लिहिल्याबद्दल धन्यवाद. सरळमार्गाने जाण्यार्‍याला सरकारी अनास्था/दिरंगाईला तोंड द्यावे लागणे व सर्पाकार मार्गाने जाणार्‍याचे तेच काम सहजपणे होणे, हा अनुभव नवीन नाही... दुर्दैवाने :(

मन सुन्न करणारा अनुभव आहे. सरकारी यंत्रणा इतकी कोडगी का असते ?

In reply to by गामा पैलवान

आमचे हि तेच म्हणणे होते, तिथे चक्क गुन्हेगार लोकांना पोलीस बेड्या घालून येत आणि ते लोक निगरगट्ट च असल्याने अत्यंत विकारी आणि घाणेरड्या नजरेने इतर बायका माणसांकडे पाहत......माझी तरी कोणत्याही प्रकारच्या कोर्टात जायची ती पहिलीच वेळ ....

प्रथमतः तुमचे हार्दीक अभिनंदन :) असलेच सगळे सोपस्कार बघुन मुलगी दत्तक घ्यायचा आमचा प्लॅन बारगळला :( आमच्या सौ. ची हि एक इच्छा पूर्ण करु शकत नसल्याचा फार मनस्ताप होतो :( जाता जाता..
तेव्हा मला जरा तिला जमिनीवर आणावं लागतं.
असु देत :) नका जमिनीवर आणु त्या माऊलीला. काहि क्षणांपुरतं त्यांना खरच वाटतं कि त्याच जनदात्या माता आहेत. असं वाटणं हे प्रत्यक्ष्य जन्मदात्री असण्यापेक्षा काहिच उणं नाहि.

In reply to by अर्धवटराव

+१ सरकारी कटकटी टाळण्याचा स्वभाव असल्याने इच्छा असूनही दत्तक मुलगी घेतली नाही. माझ्या मित्राचा अनुभव जवळून पाहीला होता. त्याच्या एवढी (आणि तुमच्या एवढीदेखील ) चिकाटी नसल्याने त्या वाटेस गेलो नाही.

In reply to by अर्धवटराव

असु देत :) नका जमिनीवर आणु त्या माऊलीला. काहि क्षणांपुरतं त्यांना खरच वाटतं कि त्याच जनदात्या माता आहेत. असं वाटणं हे प्रत्यक्ष्य जन्मदात्री असण्यापेक्षा काहिच उणं नाहि. +१००, किंबहुना, कांकणभर सरस !

तुमच्या लेकीला आशीर्वाद आणि तुमचे अभिनंदन. आमच्या घरातही जवळच्या नात्यात आता दत्तक लेक आली आहे.त्यामुळे सर्व खटपटींशी परिचित आहे.या सर्व त्रासानंतर जे लेकरू घरात येतं ते सर्व कष्ट विसरायला लावतंच.

मुलगी दत्तक घेऊन तुम्ही स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही उत्तम सांभाळला आहेत. तुम्हा दोघांचे अभिनंदन! अनुभवही विनोदी अंगानी लिहिल्यामुळे अधिकच वाचनीय झाला आहे.

तुमचा अनुभव वाचून पाणी आले डोळ्यात. मुल घेणं असो किंवा होणे असो, त्रासाचे तर आहेच पण चला शेवट तर गोड झाला. मिहिकाला आणि तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा !!

मिहीकाला गोड पापा व शुभेच्छा!लागोपाठ लेख आले दत्तक प्रक्रियेवर. ह्या पूर्वीही लेख आले. एक उत्सुकता म्हणून विचारते की सरोगसीबद्दल विचार केला जात नाही का ? त्याचीही अशी काही अवघड प्रक्रिया आहे का ?

साहेब, 1. तुम्हाला एकूण अनुभव क्लेशदायक वाटला असेल हे मान्य. पण म्हणून पोलीस ते न्यायालय सर्वांच्या नावाने घाऊक खडे फोडणे योग्य नव्हे. चांगली आणि वाईट माणसे सगळीकडेच असतात. 2. मीही सुमारे आठ वर्षांपासून एका दत्तक मुलीचा बाप आहे. माझा कायदेशीर प्रक्रियेचा अनुभव इतका कठीण मुळीच नव्हता. उलट संबंधित संस्थेत अतिशय आपुलकी व सेवाभावी वृत्ती दिसून आली. आम्ही अजून त्या संस्थेच्या संपर्कात आहोत आणि मुलीला योग्य वेळी वस्तुस्थितीची माहिती आम्ही स्वतःच देणार आहोत. 3. पोलीस व न्यायालये ही अत्यंत अपुऱ्या मनुष्यबळात आणि विविध तणावाखाली काम करतात. त्यामुळे दत्तकविधाने, चारित्र्य प्रमाणपत्रे हे तुलनेत कमी महत्त्वाचे विषय होऊन जातात. त्याला इलाज नाही. 4. माझ्याकडे कुणीही पैसे मागितले नाहीत. उलट बाळाची दत्तकपूर्व वैद्यकीय तपासणी करायला गेलो, त्या डॉक्टरांनी कोणतेही शुल्क घेण्यास नकार दिला. 5. दत्तकविधानाची प्रक्रिया आता संपूर्णपणे बदलण्यात आली असून केंद्रीकृत करण्यात आली आहे. संस्थांच्या हातात आता फार कमी अधिकार राहिले आहेत. या बदलामुळे काही चांगले तर काही वाईट परिणाम झाले आहेत. बालकल्याणाच्या नावाखाली होणारे गैरप्रकार बरेच कमी झाले आहेत. पण त्याचबरोबर जिव्हाळा आणि जवळीक आटत चालली आहे.

आमच्या ओळखीतील एक परिवार आहे ज्यांचा ५ वर्षांचा मुलगा डॉक्टरांच्या हलगर्जी पणामुळे बालपणात दगावला. तर त्यांनी एक दुसरा मुलगा दत्तक घेण्याचे ठरवले. कायदेशीर मार्गाने जाऊन त्यांच्या टाचा जिझल्या. सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांची दया आली पण काही कारणास्तव ते जास्त मदत करण्यास भीत होते. (कारणात इथे जात नाही). परिवार सधन आणि प्रतिष्ठित होता. पोटचा पोर गेल्याचे दुःख आणि त्यांत कोर्टाची गडबड. हा परिवार फार सधन होता. शेवटी सर्व काही प्रयत्न सोडून दिले. एक धार्मिक संत महात्म्याने परिवाराला कर्नाटक मधील एका गावांत जायला सांगितले. तिथे एका गरीब ब्राह्मणाची पत्नी ६ व्या वेळी गरोदर होती. तिला घरी आणून तिची व्यवस्थीत काळजी वगैरे घेऊन शेवटी तिच्या मुलाला पहिल्या दिवस पासूनच दत्तक घेतले. कागदोपत्री आमच्या परिवारातील महिलाच गरोदर होती आणि तिलाच ते बायोलॉजिकली मूल घरी झाले असे डॉक्टर मंडळींनी वगैरेंनी प्रमाणित केले. सर्व काही सुरळीत झाले. गरीब ब्राह्मणाच्या पाचही मुलांच्या नावे प्रत्येकी ५० हजर रुपयांची ठेव ठेवण्यात अली, ह्याशिवाय त्या पाच मधील २ मुली होत्या त्यांच्या लग्नासाठी म्हणून २ सुवर्णमुद्रा बँक लोकर मध्ये ठेवण्यात आल्या. आणि ब्राह्मणाच्या पत्नीची नसबंदी सुद्धा केली गेली. हे संत कदाचित हीच कामे करत असावेत कारण त्या गरीब ब्राह्माणाचा पूर्ण विश्वास त्यांच्यावर होता. आर्थिक अपेक्षेने किंवा काही तरी स्वार्थी हेतूने हे काम केले जात होते असे आढळून आले नाही. पण एक मोठा कायदेशीर सोपस्कार बायपास करून हे करण्यात आले.