एलियनायटीसेलिया
{डिस्केमर} या कथेतली बरीचशी पात्रं खरी आहेत, आणि बय्राचशा घटनाही. कोणतं पात्र कोण, कोणत्या खय्रा, कोणत्या खोट्या हे ज्याने त्याने ठरवावं.
या गोष्टीसाठी प्रेरणा आनंदयात्री (हो तोच तो आंद्या ****), विजुभाऊ, माझी परमसखी मेघना आणि माझा एकमेव नातू टारूबाळ. मी आत्तापर्यंत फक्त एकमेव साय-फाय कादंबरी वाचली आहे, कार्ल सॅगनची "Contact" आणि एक साय-फाय मालिका पाहिली आहे, "Futurama". त्यातून काही कल्पना घेतल्या आहेत; इतर विज्ञानकथांशी या कथेचं साधर्म्य आढळलं तर इंग्रजीत जसं म्हणतात, wise people think alike, ते आठवा. {डिस्क्लेमर संपलं}
ईयनचं ईमेल आलं हे सांगणारं की मला मँचेस्टर विद्यापीठात PhD करण्यासाठी प्रवेश मिळाला आहे, आणि कनवटीला थोडे पैसे लागण्याची व्यवस्थाही, काय बोलावं मला सुचलंच नाही. मी काकांकडे होते, काका काकूंना लगेचच सांगितलं; बरोबर अशाच वेळी दादाचा मोबाईल लागत नाही आणि मी खूप चरफडते. पण त्याला काकांनी लावल्यावर लगेच फोन लागला. त्या महिन्याचं फोनचं बिल नेहेमीच्या दुप्पट आलं. अर्थातच सगळेच माझ्यावर जाम खूष होते त्यामुळे काही आरडाओरडा नाही झाला! मी BSc ला सुरूवात केली तेव्हा बाबांना माझ्या करीयरविषयी सल्ले देणारे लोक आता एकदम पुढे होते माझं कौतुक करण्यात! दोन-चार महिन्यांपूर्वी अनेकविध कारणांमुळे आलेली निराशा कुठल्याकुठे पळाली आणि आता मी यादी बनवायला लागले. तीन वर्ष सायबाच्या देशात जाऊन रहायचं होतं. फुकटचे, निरुपयोगी आणि क्वचित राग आणणारे सल्ले देणाय्रांची नेहेमीप्रमाणे याही वेळेला कमतरता नव्हती. पण मी मात्र फक्त योगेशचं ऐकायचं ठरवलं. योगेश आधी तीन वर्ष केंब्रिजला शिकायला होता आणि शिवाय त्याचे सल्ले नेहेमीच मानण्याजोगे असतात अशी त्याची प्रतिमा, त्यामुळे त्याचे सल्ले घेतले. खरेदी सुरू होती आणि एकीकडे एक प्रोजेक्ट करत होते तेही संपवत आणलं होतं.
कुर्ला स्टेशनमधे गाडी शिरत होती आणि फोन वाजला. "मी निरुपम बोलतोय, अजून एखाद तासानी येऊ का पुस्तक न्यायला?", त्याला रसलचं "Why I am not a Christian?" हवं होतं. "ये, मी आत्ता कुर्ल्यात पोहोचत्ये, गाडी बदलून तासाभरात घरी पोहोचायला पाहिजे." "ठीक आहे, ईमेलमधे मी तुला म्हटलं होतं ना, ती कार्ल सॅगनची Contact कादंबरी आणतो". खरंतर मला कादंबय्रा वाचायचा प्रचंड कंटाळा येतो, पण निरूपमला नाही म्हणायची इच्छा नव्हती. का कोण जाणे, तो हळूहळू आवडायला लागला होता, अगदी पूर्वी जेवढा विक्षिप्त होता तेवढा काही तो आता नाही वाटायचा; काय माहित मी पण थोडी बदलले आहे का नाही ते! पुस्तकांची अदलाबदली केली आणि मी एकदम "भक्तिभावा"नी Contact वाचायला सुरूवात केली. शिवाय दीडेक महिन्यात निघायचं होतं मँचेस्टरसाठी!
योगेशच्या सल्ल्याप्रमाणे अनेक लोकांनी आणून दिलेल्या अनेकविध गोष्टी घरातच ठेवल्या. फ्रिजतर पार भरून गेला होता. दादातर म्हणालाही नंतर त्या सगळ्या नारळाच्या वड्या, काजूकतरी, लाडू, चिवडे त्याला दोन महिने पुरले. चला माझ्या परदेशगमनाचा त्याला तेवढातरी फायदा! शिवाय आता खायला आवडणाय्रा गोष्टी बनवण्याची माझी तयारी काकूनी अगदी प्रेमानी करून घेतली. गंमत म्हणजे योगेशपण तेव्हा लंडनला एक वर्षाकरता आला होता, कसलातरी डिप्लोमा करायला. एकाच विमानातून आलो लंडनला आम्ही! मुंबईला विमानतळाबाहेर दादा, दोन मैत्रिणी, निरुपम असे लोक माझ्याकडून आणि योगेशकडून त्याचे आई-बाबा, त्याची बायको आणि स्वाती, बहिण, असे आले होते. स्वाती आणि माझी आधीपासून थोडी ओळख होतीच. मी घाम पुसत होते तेव्हा तिनी लगेच आपल्या बर्वे या आडनावाला जागून खडूसपणा दाखवलाच, "आता तीन वर्ष येणार नाही आहे घाम, तर आत्ता काय तो पुसून घे! आणि हो, उगाच फार तक्रारी नको करूस तिकडे, तू आधीच फार तक्रारखोर. तुला दीडशे वर्षांच्या गुलामगिरीचा बदला घ्यायला नाही पाठवत आहोत!". मी तिच्या कुत्सित बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. मी आयुष्यात पहिल्यांदा विमानात बसून, पहिल्यांदाच भारताबाहेर, सायबाच्या देशात आले.
लंडनला विमान जमिनीवर उतरलं, सूर्य नुकताच उगवत होता. क्षितीजावर एखाद अंशाचं वर्तुळ सोडून बाकी सगळ्या आकाशात पांढुरके ढग होते. त्याआडून सूर्य डोकावत होता. योगेश म्हणाला, "बघून घे सूर्य, पुन्हा कधी मिळेल सांगता येत नाही". म्या आज्ञाधारी बालकानी लगेचच अर्धवट झोपेमुळे अर्धवट मिटलेले डोळे अर्धवट उघडले आणि सूर्यदर्शन घेतलं. काल ठाण्यातून जसा दिसला तसाच होता तो! पण असं काही बोलण्याची फारशी इच्छा नव्हती. योगेश हा एकदम भला माणूस, त्याच्यासमोर असली भंकस काय करायची, गप्प बसले. पण काल मी ठाण्यात होते, आणि आज लंडनमधे, आणि हे काहीतरी वेगळंच आहे हे जाणवत होतं. लंडनच्या हीथ्रो विमानतळावर उतरलो, योगेशनी त्याचं सामान घेतलं, त्याला "बाय" केलं आणि मी माझं पुढचं, मँचेस्टरकडे जाणारं विमान कधी, कुठे, कसं याच्या चौकशीला गेले! इमिग्रेशनचे सोपस्कार उरकत असतानाच त्या ऑफिसरनी गप्पा मारायला सुरुवात केली. हे माझ्यासाठी नवीनच, विमानतळावरची कर्मचारी माझ्याशी साता जन्माची मैत्रीण असल्याच्या थाटात चौकश्या करत होती, "तू कुठची?", "पासपोर्टावरून समजत नाही, भारतीय आहे मी!" हे वाक्य गिळून, "मी मुंबईची, भारतातून आले." असं तिच्या प्रश्नाएवढंच मैत्रीपूर्ण उत्तर दिलं. (आता लंडनच्या विमानतळावरून मुंबई आणि ठाणे फार काही निराळे नाहीत याची संबंधितांनी दखल घ्यावी.) तीपण काही कमी नव्हती स्नेहवर्धक बोलण्याच्या बाबतीत, "मला माहित आहे मुंबई भारतात आहे! आणि आता तुम्ही पुन्हा बॉम्बेचं मुंबई केलंत, मुळचं नाव परत जागी!". आता मात्र मी मनातून वरमले, "हो, हो" म्हटलं. "मग, युकेमधे कुठे? शिकणार काय, आणि रहाणार कुठे?". याही प्रश्नाचं उत्तर मला माहित होतं, "मला मँचेस्टर विद्यापीठात PhD करण्यासाठी प्रवेश मिळाला आहे, तिथे "जॉड्रल बँक ऑबझर्व्हेटरी"मधे! आणि रहाणार तिथेच जवळच एका घरात. विद्यापीठाचंच आहे ते घर, विद्यार्थ्यांसाठीच". "वाव्वा, मस्त", मावशीनी पासपोर्टावर ठप्पे उमटवले आणि मी मँचेस्टरच्या विमानाच्या गेटकडे कूच केलं.
विमान मँचेस्टरला उतरलं. आता इथेच तीन वर्ष काढयची, पोटात पुन्हा थोडं ढवळलं. लोकं सामान घेऊन रांगेत शिस्तशीरपणे दारं उघडण्याची वाट बघत होती. इयन मला न्यायला येणार होता. आता याला कसं ओळखणार हा माझा प्रश्न त्याने कधीच निकाली लावला होता, "एक पांढरी दाढी आणि झालरटाईप लांब पांढरे केस असणारा मी हे तर तुला नक्की समजेल. आणि मी शोधे एखादी दमलेली, भारतीय मुलगी!" इयन कधीकधी गोष्टी एवढ्या सोप्या बनवतो की मला जरा धास्तीच वाटते. मी "ठीक आहे" याच्यापुढे ईमेलवर काय बोलणार होते? विमानतळाबाहेर आले, त्याने वर्णन केलं होता तसा एक "सांताक्लॉज" दिसला; हातात एक कागद होता, त्यावर अत्यंत गचाळ अक्षरात लिहिलं होतं Jodrell Bank Observatory. त्याचं लक्ष नव्हतं माझ्याकडे, मीच पुढ्यात उभी राहिले आणि म्हटलं, "तू इयन का? मी संहिता, संहिता जोशी."
क्रमशः
या गोष्टीचं नाव आणि हे वरचं लिखाण पाहून प्रश्न पडलाच असेल तुम्हाला की या दोन गोष्टींचा संबंध काय? नसेल पडला तर आता पडू द्यात. कारण आता पुढे उत्तर आहे.
एलियन्स कोण ते तर आपल्याला सगळ्यांनाच माहित असतं. एलिनायटीस म्हणजे हृतिक रोशनला जो रोग झाला होता ना "कोई मिल गया"मधे, तो! आणि तो चित्रपट पाहून मला झाला तो रोगः "एलिनायटीसेलिया"!! आणि संबंध काय ते पुढच्या भागांमधे कळेलच!
वाचन
17997
प्रतिक्रिया
0