Skip to main content

हेलो हेलो

लेखक सस्नेह
Published on गुरुवार, 14/01/2016
‘हेलो हेलो’ ‘कोण ?’ ‘उपाध्ये बोलते.’ ‘बोला’ ‘अमिको ची नवीन औषधे आलीयेत. एक महिन्यात चार केजी वेटलॉस.’ ‘अहो मला वजन कमी नाही करायचं, वाढवायचं आहे.’ ‘मग वेटगेनचं औषध घेऊन संध्याकाळी येऊ ?’ ‘नको, माझी डायेटीशियन आहे, ती खंबीर आहे माझी काळजी घ्यायला.’ ‘ताई, प्रोटीन टी आहे बघा अमिकोचा. वजन हमखास वाढणार. एक महिन्याची पावडर बाराशे रुपये फक्त. आणू ?’ ‘अहो नको उपाध्येवहिनी. मी कॉफी घेते फक्त.’ ‘मुलांना द्या. चांगली आहे हो.’ ‘मुलगा कॉम्प्लान घेतो.’ ‘कसलं पांचट ते कॉम्प्लान ! अमिको जेकप्रोट एकदा देऊन बघा, परत दुसरं काही पिणार नाही.’ ‘सॉरी उपाध्येवहिनी. महिन्याला बाराशे रुपयांचं प्रोटीन ड्रिंक मला परवडणार नाही आणि माझा मुलगा डाळी-उसळी भरपूर खातो.’ ‘ओके, मग थंडीसाठी कोल्डक्रीम ?’ ‘मुळात मी कॉस्मेटिक्स वापरत नाही. त्यातून माझी ठराविक ब्रँड सोडून इतर कुठलीही कॉस्मेटिक्स नाहीच नाही. आणि मला अमिकोमध्ये मुळीच इंटरेस्ट नाही.’ ‘राहिलं. संध्याकाळी घरी आहात का ? सुरतवरून साड्या आणलेत माझ्या बहिणीने. पाच हजारात पैठणी. बघा तरी.’ ‘सुरती पैठणी ?’ आता मात्र मला वैताग जाऊन हसू आलं. ‘अहो ताई, कमी करून देणार की तुम्हाला.’ ‘नको बाई. अलीकडे मी साड्या फारशा वापरतच नाही.’ ‘ड्रेस मटेरीअलपण आहे.’ ‘नको हो. आणि तुम्ही येणार असलात तर जरूर या, पण साड्या किंवा अमिको वगैरे घेऊन नको. कॉफी घ्यायला, गप्पा मारायला या. ओके ?’ अर्थात उपाध्येबाई काही नाही आल्या संध्याकाळी. गेले कित्येक महिने आणि नंतरचे बरेच महिने मला या अमिको-उपाध्ये आणि साड्या प्रकर्णाने दहशत बसवली आहे. रस्त्यात, ऑफिसात, घरात, स्कूटरवर, जेवणाचा पहिला घास घेतल्यावर, कुलूप काढून घरात शिरताना, उंबऱ्यावर, कुठेही मोबाईल अवेळी खणखणू लागला की डोळ्यासमोर उपाध्येबाई उभ्या रहात. तसा त्यांचा माझा परिचय हा सिग्नलला शेजारी उभ्या राहिलेल्या दोन वाहनांपेक्षा जास्त नाही. म्हणजे माझा मुलगा आणि त्यांची मुलगी (माझ्या दुर्दैवाने) एकाच शाळेत होते. एकदा माझे ग्रह अवघड ठिकाणी आले असता शाळेच्या गॅदरिंगला जाण्याची मला बुद्धी झाली. ग्रहांनी डाव साधला आणि उपाध्येबाई माझ्या शेजारच्या सीटवर येऊन बसल्या. तेव्हाच त्यांनी माझे पाणी जोखले आणि माझ्या भिडस्तपणाला कोपर लावले. आता माझा मुलगा शाळेतून कॉलेजात गेला. (देव दयाळू आहे.) पण उपाध्येबाईंनी माझा पिच्छा सोडला नाही. अमिको तमिको ढमिको सगळ्यांच्या मदतीने मला सळो की पळो करून सोडायचे त्यांनी मुळीच सोडले नाही. अखेर मागच्या महिन्यात एके दिवशी मी हिय्या करून मी त्यांचे दोन्ही नंबर ब्लॉक केले. त्यानंतर एक महिना बरा गेला. एकदोन दिवसाआड माझा मोबल्या त्यांचे काही मिस्ड कॉल्स दाखवून मला दचकावत असे, तेवढे सोडले तर काही त्रास नव्हता. पण ही खुषहाली थोडेच दिवस टिकली. काही दिवसांनी वेगळ्याच नंबरवरून कॉल आला. ‘हेलो हेलो’ ‘कोण, उपाध्येबाई ?’ ‘हो. अहो ताई, केमीना कंपनीची स्कीम आहे. इंडक्शन बर्नरबरोबर तीन पॅन्स आणि मिनी कुकर फ्री.’ हैला, आता मात्र कमाल झाली ! आता मी स्पष्ट बोलायचे टाळून काही खरं नाही. मग त्या तिरीमिरीत धडकन सांगून टाकले. ‘उपाध्येवहिनी, तुम्हाला एकदाच सांगते, मला काहीही खरेदी करण्यात बिलकुल इंटरेस्ट नाही. त्याशिवाय इतर काही काम असेल तर अवश्य सांगा. नसेल तरी नुसत्या निवांत बोलण्यासाठी वगैरे केव्हाही घरी या. पण इथून पुढे कृपया काहीही खरेदी करण्यासाठी मला फोन करू नका. ‘ ‘बरं, बाई. आणि हा नंबर माझा आहे, हो, घेत जा फोन. आता नाही काही घ्यायला सांगणार तुम्हाला.’ ‘ठीक आहे.’ साधारण एक आठवड्याने आज पुन्हा फोन वाजला. उपाध्येबाई. न धास्तावता फोन घेतला. ‘हेलो हेलो’ ‘बोला उपाध्येवहिनी, काय म्हणताय ?’ ‘आज आहात का ऑफिसात ?’ ‘हो, पण आत्ता जरा बाहेर आले आहे.’ ‘ऑफिसात आलात की फोन करा.’ ‘का हो ? येताय का ? मग ऑफिसात कशाला ? घरी या की.’ ‘काये, की मुलीची फी भरायची आहे एक तीन हजार रुपये कमी पडताहेत. अर्जंट हवे होते. ऑफिसात आलात की या नंबरला नक्की फोन करा.’ ‘हं’ एकदाच झालेल्या एका तासाच्या भेटीवर आणि अल्पतम परिचयावर कुणी कुणाकडे पैसे मागावेत का हा विषय वेगळा. तरीही पैसे द्यायला हरकत नव्हती. तशीही मदत म्हणून द्यायला हरकत नाही. पण त्यांनी सांगितलेले कारण खरे की खोटे हे पडताळून पाहण्याइतकासुद्धा त्यांचा माझा परिचय नाही. शिवाय बाईंची पार्श्वभूमी आणि चिकट स्वभाव लक्षात घेता मदत केल्यावर हे इतक्यावर थांबेल असे वाटत नाही. ऑफिसात आले. काय करावे समजेना. तासभर गेल्यावर मोबाईल वाजला. पुन्हा उपाध्येबाई. माझा निर्णय अजून झाला नाही. ...फोन घ्यावा की नाही याचासुद्धा. आता दर दहा मिनिटांनी वाजतोय. कामावर लक्ष केंद्रित करता येत नाहीये. काहीतरी केले पाहिजे. फोन घ्यावा की हाही नंबर ब्लॉक करावा ? ......टु डू ऑर नॉट टु डू ?
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचन संख्या 7827
प्रतिक्रिया 53

प्रतिक्रिया

सद्ध्या जमणार नाही, असे सांग. खरंच गरजू आहे का हे माहिती काढण्यासारखी असेल तर काढ आणि मग मदत करायची इच्छा असल्यास कर.

अशी उधारी मागणारी माणसे मला नेहमी भेटतात, असे नम्बर मीही रीजेक्ट लीस्ट मधे टाकले की दुसर्‍या नम्बरने फोन करतात. मग मी सान्गुन टाकते की पैसे मी कुणाला देत नाही पैशामुळे नाती खराब होतात. मला असा खुप अनुभव आहे की आपण दुसर्‍याची गरज समजुन मदत करतो पण समोरच्याला ती जाणीव नसते.

नुकताच याप्रकारचा एक अनुभव ऐकलाय.व्हाॅट्स अॅपवर जुने जुने शाळा काॅलेजांचे ग्रुप तयार होतात. आपला नंबर मोठ्या प्रमाणात बाहेर जातो.वीस पंचवीस वर्षात न भेटलेल्या लोकांचे अंदाज येईतो कोणीतरी फोन करुन,मेसेज करुन मी अडचणीत आहे मला पैशाची मदत करशील का सुरु करतं. नंतर कळतं ग्रुपमधे बर्यापैकी मिळकत असणाऱ्या सर्वांनाच हा मेसेज केलाय.कोणाकडून पाच हजार वगैरे मिळवले आहेत! ग्रुपवर जोरजोरात आपली वाईट परिस्थिती सांगून रडणे सुरु असते.मग लोकांना वाईट वाटते. आणि जाऊ दे दोन पाच हजार असा विचार करुन दिले जातात.नंतर कळतं या बाई शाॅपोहोलिक आहेत.त्यामुळे नवरा पैसे देत नाही तर असे उद्योग करुन मिळवणे सुरु आहे! तस्मात् खरी परिस्थिती माहित असेल तरच माहिती घेऊन पैसे देणे अन्यथा अपात्री दान होणार!

'नाही म्हणणे' ही पण एक कला असते. यावरून सविता ह्यांच्या 'बॉम्बस्फोट' कथेतला तो दाक्षिणात्य आठवला. 'इसमें मय क्या करेंगा?' म्हणणारा. ;-)

नॉट टू डू..

नंतर आयुष्यभर पश्चात्ताप करण्यापेक्षा एकदाच नाही म्हणणे बरे!! नाहीतरी आपण काय दानशुर कर्ण नाही. आणि मदत करुनही शेवटी बाहेर (आपल्यापाठी) कोणी कोणाबद्दल चांगले बोलत नाहीच. मग वाईटपणाच घेतलेला काय वाईट? उलट तुम्ही पैसे देत नाही याची जाहीरात त्या बाई करतील आणि तुमचे पुढचे प्रॉब्लेम आपोआप टळतील. अ‍ॅम्वे,स्वदेशी,पीअरलेस, आणि कुठल्या साउथच्या कंपन्या यांच्या स्कीम (एम.एल.एम.) घेउन आलेल्या लोकांना तर मी अपमान करुन हाकलतो.

अगदी समोरच्या घरात राहणारे एक काका नेहमी अशी सिलिंडरची चौकशी करत असतात. बरं रिकामा किंवा भरलेला, काहीही चालणार असतो. त्यामुळे अंदाज घेऊन उत्तर द्यावं लागतं. एरवी फटकून वागता येतं, पण त्यांचं वय बघता तसं बोलता येत नाही. त्यांचं कनेक्शन एकाच सिलिंडरचं आहे हे मी समजू शकतो, पण आता मला त्या घरात जाऊन वर्ष उलटून गेलं तरी त्यांचं तेच चाललं आहे. एव्हाना कनेक्शन बदलून घेता आलं असतं. सध्या गोड बोलून आजचं उद्यावर ढकलत असतो.

अशा मागे लागणा-यांचा सॉल्ल्ल्लिड राग येतो. पण वाईट स्वभाव नडतो अशा वेळी. अनुभवातून आलेल्या शहाणपणावरून सल्ला देईन, सरळ नाहीयेत सांगा. गट्ट फिलिंग असं येतंय की समजा तुम्ही दिलेत ते ३०००.... तर त्या ती मदत स्वीकारतील, अनेक अनेक थँक्यूंचा वर्षाव करतील, पुढे काही दिवसांनी 'देईन हं परत जरा थांबा इतका महिना झाला की कमिशन यईल' इत्यादी आश्वासनं देतील, आणि पुढे... 'नाहीतर असं करूया का? त्या पैशाच्या बदल्यात मी तुम्हाला हे नवीन प्रॉडक्ट देते. याची किंमत खरं तर खूप जास्त आहे पण तुमच्यासाठी म्हणून.....' धंदा सुरू ! उपाध्ये रॉक्स... स्नेहांकिता शॉक्स! -------- असं होईलसं वाटतं.

मस्त लिहीलं आहेस ग!! काही पंचेस तर खुप आवडले.. पैशाचं म्हणशील तर देऊ नको..! अशा लोकांना कोण पैसे उधार देणार रे बाबा...

आमची पॉलिसी लै भारीये ! मी आणी माझ्या भावाने केल आहे ट्राय . एमएलएम वाल्यांचे प्रेझेंटेशन नीट , लक्षपुर्वक पहायचे, मधेमधे प्रश्नही विचारायचे अन् सगळं झालं की म्हणायचं नॉट इंटरेस्टेड सॉरी ! लै भारी मज्जा येते. करून पहा. पुन्हा एमएलाएम वाले तुमच्या कॉलनीतपण येणार नाहीत.

In reply to by उगा काहितरीच

एम एल एम वाले अतिशय चिकट असतात आणि सगळे गरजू असतात असे मुळीच नाही. मुंबईतील एक प्रथितयश डॉक्टर बाई, नवरा डॉक्टर. दोघांना मिळून भरपूर पैसे मिळतात. दोघंही खरंच चांगले डॉक्टर आहेत. एकदा आमच्या ओळखीच्या डॉक्टर बाईंची ओळख काढून त्यानाही घेऊन आल्या आणि रात्री साडे आठ ते पावणे दहा AMWAY मध्ये सहभागी होण्यासाठी डोकं खाल्लं. मी पण टिचवून किल्ला लढवला आणी त्यांच्या साखळीत सहभागी झालो नाही कि एक पैशाचं उत्पादन घेतलं नाही. माझा रूम पार्टनर पण या नादाला लागला आणि एक दिवस माझे डोकं खायला आला होता. मी त्याला स्पष्ट सांगितले कि यात तुझा नफा किती तितके पैसे माझ्याकडून घे पण मला हि उत्पादने नकोत. तो रागावून म्हणाला मी काही पैशासाठी आलो नाही. तुला चांगली उत्पादने द्यावीत म्हणून आलो. मी त्याला स्पष्ट पणे म्हणालो मला AMWAY आवडत नाहीत ते सोडून दुसरे काही असेल तर बोल. तो रागावून निघून गेला थोडे दिवस बोलत नव्हता, नंतर आपो आप बोलायला लागला. एम एल एम वाल्यांच्या चिकट पणाला अंत नसतो. तुमचाच धीर सुटतो आणी नको ती कटकट म्हणून लोक उत्पादने घेतात.

पण खरेच सांगायचे तर मदत न केलेलीच बरी

..अगदी घालमेल होत असेल तर. थोडसं लष्कराच्या भाकरया भाजल्यासारखं वाटेल.. त्यांना सांगा पैसे देइन पण तुमच्याबरोबर येउन जिथे फिस भरायचेय तिथे थेट. तुमच्या हातात देणार नाही. बघा स्वर बदलतो का त्यांचा ? खरच फिस् ची अडचण असेल, तर तयार वायला हव्या. शेवटी निर्णय तुमचाच. -- श

मला अश्या एजंट मित्राचा फोन आला आणी काय चाललय अस विचारल की लगेच ओळखुन,"बस चल रही है उधार की जिंदगी",म्हणायच आणी लगेच अलाना फलाना,उधारीपाधारी देणपाणी चालु करायच.. गप फोन ठेवुन देतात.

In reply to by जेपी

मी नसलेल्या देण्यांची यादी दिल्याने बर्याच जणांनी वाळीत टाकल्याचे भाग्य कपाळी आहे !!! निर्लज्ज व्हा सुखी रहा असे मुवी फेम (बाबा महाराज) म्हणतात ते खोटे नाही. संदर्भ बाबा संपादीत वचने आणि वाचणे खंड ५ भाग तीन पान २६

हल्ली तुम्ही प्रत्येक प्रतिक्रिया २ वेळा का देताय म्हणे?

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

बरीच कारणे आहेत.... १. माऊस बिघडला. २. संगणकात व्हायरस शिरला. आणि महत्वाचे म्हणजे.... ३. संपादकांना कामाला लावण्यासाठी....

जर खरोखर हेतु चोरी फसवणुक असेल तर ठीक आहे. अन्यथा मला असे कोणीही पैशासाठी आर्थिक दबावातुन लाचारी लाळघोटेपणा चिकटपणा करतात तेव्हा तो त्यांना करावा लागतो याचाच खेद खरच खेद वाटतो. चोरी फसवणुक नसेल तर मी जमेल तसा प्रतिसाद देतो. अर्थात नेहमीच शक्य होत नाही. पण अस मला त्यांची गंमत खेचुया जरा अस नक्की वाटत नाही.

आईग्ग! अगदीच कोंडीत पकडल्यासारखं............त्यांनी तुला पकडलय पण हे विचारून तू आम्हाला पकडलयस. ;)

ह्म्म.. छान लिहिलयेस. असं नर्मविनोदी लिहिणं आता तुझं होम पिच झालंय :) पैसे नको देऊस. वरच्या खेद वाटतो, पोटासाठी करत असतील आशयाच्या प्रतिक्रियांसाठी सहमत. घरोघरी जाऊन प्रॉडक्ट विकणारे लोकं पण अशीच मिळणार्‍या पैशांच्या मानाने बरीच मेहनत करत असतात. पण त्यांच्याकडुन त्यांना मदत म्हणुन १०० रुपयांचा एखादा मॅजिक ब्रुम घेणं वेगळं आणि हे असे पैसे उधार देणे वेगळे. काही ही करा दोन्हीकडुन मनाला टोचणी लागण्याची संभावना आहे च.

उधारी वरून एक सत्य घटना आठवली. २००८ साली मी म्हैसूर ला होतो इन्फोसिस मध्ये ट्रेनिंग साठी. त्यावेळी एक चेन्नईचा मुलगा पण आमच्या batch मध्ये होता. एकदा अचानक माझ्याकडे येउन म्हणाला, त्याच्या मित्राचा कारने जाताना अपघात झालेला आहे. जरा अर्जंट पैसे दे २५०००/- . एक आठवड्यात परत देतो म्हणाला. ही रक्कम २००८ साली (आणी आता देखील) खूप जास्त होती. मी त्याला पैसे देऊन टाकले. एक आठवड्यात परत देतो असे सांगून साहेबानी ४-५ महिन्यानी परत दिले. नंतर सगळे ट्रेनिंग संपवून पुण्याला आले. ह्याला काहीही करून चेन्नई ला जायचे होते. मग त्याने वर्षभर प्रयत्न केला आणी काहीतरी जुगाड करून आपली ट्रान्स्फर चेन्नई ऑफिसला करून घेतली. पण त्या पूर्वी एक अतिशय महान काम केले. जाण्याच्या १५ दिवस अगोदर जवळपास ५० जणांकडून (कुणाकडून ५ हजार, कुणाकडून १० हजार) जेवढे मिळतील तेवढे पैसे उधार घेतले. एक महिन्यात परत देतो म्हणून. मला पूर्वीचा अनुभव असल्याने मी नाही म्हणालो. चेन्नईला गेल्यावर तिकडे त्याने अवघ्या महिन्यात राजीनामा दिला. आणी कुणाचाही एक पैसा देखील परत न करता निघून गेले. नंतर सगळ्यानी मिळून बेरीज केली तर जवळपास २.५ लाख रुपयाचा चुना लावला होता त्याने सर्वाना.

भिडस्तपणा हा गुण नसून अवगुण ठरावा असा सध्याचा काळ आहे आभासी जगतात भटकंती करतांना आपले असे अनेक अनुभव येतात. खुद मिसळपाव ह्या अवस्थेतून एकेकाळी गेले आहे. आता येथे कोणतेही आर्थिक व्यवहार कटाक्षाने न करण्याचा स्तुत्य निर्णय मालकांनी घेतला त्यामुळे सगळे सुरळीत चालले आहे. आपले पंचतारांकित नगरीत स्वागत आहे

बरोबर लिहीलेय.. मी सुद्धा भीडस्तपणामुळे बर्‍याच वेळा फसलोयं. राग या गोष्टींचा येतो की ही अटळ लोकं एकदम निर्लज्य असतात. आपल्यालाच त्यांचा अपमान करायची सुद्दा लाज वाटते. असाच एकाला मी शिकवलेला धडा.. http://www.misalpav.com/node/5171

In reply to by योगी९००

गोष्ट वाचली. पैसे मिळाल्याबद्दल अभिनंदन. तुम्ही जी गोष्ट लहानपणी वाचल्याचं सांगितलंत ती बहुतेक चिं. वी. जोशींची. " राइसप्लेट" मधली . मीही वाचलेली आहे. एक विनोद म्हणून ठिक आहे. पण जर खरंच असं झालं असेल तर प्रत्यक्षात त्या कारकुनाने एक गंभीर चुक केली होती याची आपल्याला जाणीव होती का? त्याने सरळ सरळ आपल्या एका खातेदाराची अत्यंत खाजगी आणि संवेदनशील माहिती आपल्याबरोबर शेअर केली आहे - आपल्या मित्राच्या खात्यावरील शिल्लक रक्कम!! कदाचित त्यामुळेच नंतर त्या शाखेच्या मॅनेजर आणि त्या कारकुनाला आपल्या मित्राला घोळात घ्यावे लागलेले आहे - या आशेवर की त्याला असं घाबरवून टाकलं तर तो बँकेवर कायदेशीर कारवाई व्हावी म्हणून प्रयत्न करणार नाही.

In reply to by असंका

असंका तुमचे म्हणणे बरोबर वाटतेयं..मागच्याच वर्षी मी आयसीआयसीआय च्या एका कारकुनाला माझा बॅलन्स पाहून मला काहीतरी सेव्हींग ची ऑफर देत होता त्यावर झाडले होते. जो अनुभव मी लिहीला आहे तो १९९५ काळी घडला आणि त्या काळात अशा गोष्टींबद्दल तितका काही awareness नव्हता. त्याकाळात बँकेत गेल्यावर कोणीही काही scheme माथी मारायचा प्रयत्न केलाय असे झाल्याचे आठवत नाही. गपगुमान बॅकेचे कर्मचारी काय म्हणतात ते आम्ही ऐकायचो. बर्‍याचदा चेक वटायला फक्त इतके इतके रु. कमी पडत आहेत असे ऐकल्याचे आठवते. ज्या कारकुनाने मला सहज मित्राचा बॅलन्स सांगितला तो जरी मुळ तामिळ असला तरी पुण्याला राहिलेला होता आणि माझ्याशी शुद्ध मराठी बोलायचा. त्यामुळे मुद्दाम नसेल पण सहज त्याने सांगितले असावे. (मला नक्की आठवत नाही की मी त्याला विचारले का की कितीने बॅलन्स कमी पडतोय..). पण तुम्ही म्हणाल्याप्रमाणे सर्व प्रकार घडल्यावर त्यांनी आपली कातडी वाचवण्यासाठी मुद्दाम माझ्या मित्राला घोळात घेतले असावे.

अश्या प्रसंगांमधे बरेचं वेळा चुना लागुन गोरा व्हायचे प्रसंग आलेले असल्याने उपाध्ये गरजु नसतील तर फाट्यावर मारा हे सांगणं. ३००० रुपये हि छोटी रक्कम नाही. शिवाय पैसे गेल्यापेक्षा मुर्ख बनण्याचं दुख्ख: जास्तं होतं. त्यामुळे मित्रांशी आणि त्यातल्या त्यात जवळच्या मित्रांशी पैशाचे व्यवहार टाळतो. :(

@तसा त्यांचा माझा परिचय हा सिग्नलला शेजारी उभ्या राहिलेल्या दोन वाहनांपेक्षा जास्त नाही >>> lola lol .. Mlm वाल्यांना गप करायचा एकमेव उपाय म्हणजे , "तुम्ही मला या पुढे एकदा जरी त्रास दिलात,तर मी पोलिसात तक्रार करिन!" असे ठणकावून सांगणे. मी वर्ष भरापूर्वी एका माझ्या (अश्याच पाठी पडलेल्या)एका क्लाएंट ला अत्यन्त साध्या शब्दात हि धमकी दिलेली होती.

In reply to by अत्रुप्त आत्मा

ह्यापेक्षा भारी उपाय सांगतो. अशी लोकं आली की चक्क आणि चक्क त्याच्याकडे पैसे मागायचे. त्याची ऐपत १०० रुपयाची असेल तर आपली गरज ५०० रुपयाची दाखवायची =))

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

ह्यापेक्षा भारी उपाय सांगतो. अशी लोकं आली की चक्क आणि चक्क त्याच्याकडे पैसे मागायचे. त्याची ऐपत १०० रुपयाची असेल तर आपली गरज ५०० रुपयाची दाखवायची =)) भीडस्त लोकांना हे जमत नाही. एकदा त्यांनी तोंड वेंगाडले की आपण आपले प्रॉब्लेम सांगू शकत नाही. समजा तसे केले तर मुद्दाम सांगतोय असेही ही अटळ लोकं म्ह्णतील.

मस्तच लिहिलं आहेस गं. अजिबात मदत नको करू गं.

वेगवेगळ्या सूचना आणि सल्ल्यांबद्दल. एमएलएम वाल्यांनी आजवर एक सूचक नकार दिल्यांनतर इतका चिकटपणा केला नव्हता कधी. या बाई एक अपवाद. आता अशांना टाळण्यासाठी मीच एखाद्या कंपनीचे प्रॉडक्ट बाळगावे म्हणते जवळ. आले की आपल्या प्रॉडक्टच्या मार्केटिंगचं कुत्रं अंगावर सोडायचं ! आणि उधार पैसे मागणारेही खूप येतात, पण न घेतलेला फोन हा इशारा समजून पुन्हा येत नाहीत. तेही या बाईंनी चिवटपणे पार केले. परत फोन आला नाही. पण एखादेवेळी बाई ऑफिसमध्ये येऊन बसल्या तर नकार देणे मला काही शक्य होणार नाही, हे मात्र खरं !

मी कधी कधी दिलेत आणि विसरून गेलोय. मजा म्हणजे ज्यांना दिलेत तेही तितकेच निवांतपणे विसरून गेलेत. भेटले चुकून कधी कुठे तर काय काय एवढं म्हणून वाटेला लागतात. नेकी कर और दरीया मे डाल...

मस्त लिहिलं आहेस गं. सल्ले काय तुला मिळतीलच. मी आपला नेहमीप्रमाणे तुझ्या लिखाणाचा आनंद घेतला.

माझा असाच एक चेन्नईचा मित्र खुप जणांचे पैसे घेऊन तिकडे पुण्यातुन पळाला आहे, लग्नासाठी पैसे लागणार म्हणुन. माझे ५००० घेउन गेला. रुममेटचे १०००० घेतले. नंतर काही संपर्क नाही. नंतर असे कळले की एकूण ५ लाखाच्या आसपास त्याने पैसे गिळले होते खुपजणांकडुन उधार घेऊन. व्यवसायाने अभियंता, आयआयटी पासआउट. तेव्हापासुन नाही म्हणन्याचे फायदे लक्षात आले आहेत.