मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

यक्षप्रश्न

आतिवास · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
१. गर्द जंगलात निरुद्देश भटकताना पाणी दिसले, तेव्हा त्याच्या काठाशी नकळत विसावले मी. पापणीच्या आतल्या पाण्याला अचानक बाहेरच्या पाण्याची ओढ. मी ओंजळ पुढे करताच कोठूनसा धारदार आवाज आला: “माझ्या प्रश्नाचे उत्तर दिल्याविना पाण्याला स्पर्श करू नकोस. अन्यथा प्राण गमवावे लागतील.” २. महाभारतातील कूटप्रश्न विचारणाऱ्या यक्षाची कथा वाचली होती मी फार पूर्वी, बहुधा त्याचाच वंशज असणार हा! पण आता अशा या सैलावलेल्या क्षणी कोण माथेफोड करणार? आणि ते करून ना काही सिद्ध करायचे होते, ना काही साधायचे होते. प्राण, जीवन क्षणभंगुर आहे हे खरे, पण ते उगाच दुसरे कोणी म्हणते म्हणून विनाकारण उधळून देणेही शहाणपणाचे नाही. म्हणून मग “यक्षबुवा, तुमच्या विद्वत्तेला प्रणाम,” म्हणत मी दोन पावले मागे फिरले. पाण्याचे एक बरे असते. ते नेहमीच जवळ भासते. आणि भिजणे, डुंबणे, ओलावणे या साऱ्या क्रिया तसे पाहिले तर मनाच्या पातळीवरच घडत असतात; शरीर एक साधनमात्रच असते अनेकदा. शिवाय समोर आलेली सगळीच आव्हाने हाती घ्यायची गरज नसते. काहींना वळसा घालून तर काहींना तात्पुरते शरण जाऊन काम भागते. दूरचे ध्येय गाठायचे तर ऊर्जा, शक्ती, संघर्षाची प्रेरणा सारे काही टिकवून ठेवावे लागते. मुख्य म्हणजे आव्हान घ्यायचे की नाही हे आपण स्वत: ठरवायचे असते निर्णयाचा अधिकार साक्षेपाने वापरून! ३. मी मागे फिरल्यावर का कोणास ठाऊक यक्ष जरासा लटपटला. आवाजातील अधिकार, गुर्मी कमी करत तो म्हणाला, “येथे जवळ दुसरे पाणी नाही, आहे ते हेच, इतकेच, तृष्णा शमवणारे. त्यामुळे माझ्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्याचा पर्याय खरे तर तुला नाही.” त्यावर गप्प राहत मी स्वत:शीच हसले. संदर्भ बदलला तरी 'पर्याय नसण्याचा' मुद्दा पुन्हा समोर येतोच तर! दोन क्षण वाट पाहून यक्ष पुढे म्हणाला, “किती वेळ विचार करणार आहेस? कधी ना कधी जे अटळपणे करणे भाग आहे, ते लगेच का करत नाहीस?” हा यक्ष बऱ्यापैकी गप्पिष्ट होता तर! बोलावे का याच्याशी मनातले? मी जराशी घुटमळले. घायकुतीला येत यक्ष म्हणाला, “हे आजवर असे कोणी केले नाही. मी प्रश्न विचारायचे आणि माणसांनी उत्तरे देत जगण्याचे वा मृत्यूचे मार्ग स्वीकारायाचे अशीच हजारो वर्षांची इथली परंपरा आहे; त्याला सुरुंग लावण्याचा तुला अधिकार नाही.” हेही जुनेच. परंपरा, अधिकार वगैरे. ४. खरे तर एवढे ऐकल्यावर तेथे थांबायचे काही कारण नव्हते. पण त्या यक्षाबद्दल माझे कुतूहल जागृत झाले. महाभारताचा दाखला ध्यानात घेतला तर उणीपुरी पाच हजार वर्षे (इतिहास पंडितांनो चूकभूल माफ करावी काळाला गणना नसते तसे पाहायला गेले तर!) हा बेटा प्रश्न विचारत येथे अदृष्यपणे का होईना पण उभा आहे - हा किंवा याचे बापजादे! इतक्या साऱ्या वर्षांत याने प्रश्न तरी काय विचारले असतील? दहावी -बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेसारखे हा तेच तेच प्रश्न आलटून पालटून विचारतो? की प्रत्येकाला नवा प्रश्न विचारतो? समोरच्या व्यक्तीचा संदर्भ लक्षात घेऊन हा प्रश्न विचारतो? की लॉटरी पद्धतीने? एकदम चार-पाचांचा गट आला तर प्रत्येकाने उत्तर द्यायचे? की प्रतिनिधीचे उत्तर चालते याला आपल्या लोकाशाहीसारखे? प्रश्न गटाला असतो? की व्यक्तीला? उत्तर बरोबर असले तर जीवन, चुकले तर मरण. म्हणजे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर याला आधीच माहिती आहे. मग तरीही हा इतके सारे प्रश्न का विचारतो? मी म्हटले, “पण यक्षदादा, तुम्ही प्रश्न का विचारता? हे प्रश्न तुम्हाला खरोखर पडतात? की कोणी तुम्हाला प्रश्न विचारण्याचेच काम लावून दिले आहे?” स्वत:च्या भावना काबूत ठेवत तो म्हणाला, “लक्षात घे, प्रश्न मी विचारायचे, तू नाही.” ५. मी आणखी दोन पावले मागे सरकले. तेव्हा माझी मनधरणी करत यक्ष म्हणाला, “घाबरू नकोस. सोपा प्रश्न विचारेन मी अगदी. वाटले तर पर्यायपण मीच देईन, त्यातला तू एक निवड. पण थांब जराशी. माझ्याकडे पाठ फिरवून न बोलताच अशी जाऊ नकोस.” आता मला जरासा राग येऊ लागला होता – ही काय सक्ती? प्रश्नाचे उत्तर देऊन हाती काय - तर जगणे किंवा मरणे. ते तर तसेही आहेच. जगणेही अपरिहार्य; मरणेही अटळ. शिवाय या क्षणी जगण्याचा सोस नाही, मरणाची आस नाही, तहान नाही, तृप्त आहे मी. मग या यक्षाची ही दादागिरी का? नकळत मीही हट्टास पेटले. आता परत फिरायचे नाही आणि या यक्षाला शरणही जायचे नाही. माझा अंदाज घेत यक्ष म्हणाला, “बस जरा निवांत. दमली असशील प्रवासाने. प्रश्न काय, आणखी थोड्या वेळाने विचारला तरी चालेल.” मग एक हलका निश्वास टाकत म्हणाला, “हल्ली इकडे कोणी फिरकत नाही फारसे. जे येतात ते काही बोलण्यापूर्वीच प्राण त्यागतात. एकटेपणामुळे आणि वय झाल्यामुळे मी जरासा चिडचिडा झालो आहे. मी तुझ्याशी आधीच नीट बोलायला हवे होते. मला माफ कर.” प्रश्नांतून सुटका नसणाऱ्या त्या यक्षाची दया आली मला. माफी मागून माझ्या संवेदनशीलतेला थोडे हलवले होते त्याने. ६. जमिनीवर ऐसपैस बैठक मारत मी म्हटले, “यक्ष आजोबा, मलाही पूर्वी हा शाप होता. समोर जे कोणी येईल त्याला मीपण प्रश्न विचारायचे, खूप प्रश्न विचारायचे, सतत विचारायचे.” “मग आता?” यक्ष जिज्ञासेने म्हणाला. मन उलगडत मी सांगितले, “दुसऱ्यांनी दिलेली उत्तरे पुरत नाहीत, कितीही प्रगल्भ असली तरी. आपली वाट आपल्यालाच निर्माण करावी लागते नव्याने हे समजले आहे मला. तेव्हापासून जणू प्रश्न विचारण्याची गरज संपली आहे जरी प्रश्न आहेत खूप तरीही ...” माझे बोलणे तोडत खूष होऊन स्वत:शी हसत म्हणाला, “माझ्या प्रश्नाचे बरोबर उत्तर दिल्याबद्दल (हाच त्याचा प्रश्न होता हे मला कळले नाही; हुषार आहे बेटा!) जगण्यासोबत आणखी एक वरदान देतो मी तुला. शेवटच्या श्वासापर्यंत तुला प्रश्न पडत राहावेत यासाठी माझा एक अंश तुझ्यात रुजवून देत आहे मी.” 'आता कशाला आणखी प्रश्न? पुरेसे आहेत माझ्याजवळ या जगण्यासाठी...' माझ्या चेहऱ्यावरचे भाव वाचत हळव्या मायेने यक्ष म्हणाला, “तुझी वाट तुलाच शोधावी लागेल, पण इतरांनाही प्रश्न विचार. कारण एका प्रश्नाचे एकच उत्तर अन तेही अचूक असे कधीच नसते. दुसऱ्यांचीही उत्तरे समजून घेशील गर्भगृहासह तर अंतर्ज्योत उजळेल.” आणि यक्ष अंतर्धान पावला त्या पाण्यासह. ७. तसे निरर्थक, निरुद्देश असे आयुष्यात काहीच असत नाही. प्रवास थांबण्यानेही नवे काही हाती लागते हादेखील रंजकच अनुभव! यक्षप्रश्नांचे एक गुंतागुंतीचे चक्र असते सत्याच्या एका स्तरावरून उच्चतर सत्याकडे नेणारे, वाटचालीस साहाय्य करणारे. रितेपणाच्या एका अमर्याद टप्प्यानंतर माझ्यातच रुजलेले ते घनदाट अरण्य, ते निळेसावळे पाणी ते यक्षप्रश्न सापडले आहेत मला आता पुन्हा एकदा! अन्यत्र पूर्वप्रकाशित

वाचने 19121 वाचनखूण प्रतिक्रिया 64

एस 20/11/2015 - 11:27
पण हे प्रश्न का बरे पडतात आपल्याला हा प्रश्न मला कित्येक वर्षांपासून पडला आहे. उत्तरांचंही तसं बरंच असतं म्हणायला. त्यांच्या मनात असलं तरंच ती प्रश्नकर्त्याला गवसतात. पण प्रश्नांवाचून उत्तरांचं वेगळं असं अस्तित्त्व असतं का हाही एक प्रश्न मला पडलाय. बर्‍याच वर्षांपासून.

In reply to by एस

इडली डोसा 21/11/2015 - 08:08
उत्तरांचंही तसं बरंच असतं म्हणायला. त्यांच्या मनात असलं तरंच ती प्रश्नकर्त्याला गवसतात.
छान विचार. कधी कधी उत्तर गवसलेलं असतं प्रश्नकर्त्याला पण त्याला योग्य उत्तर नकोचं असतं फक्त जे सोयीस्कर असेल तेच उत्तर हवं असतं.
“तुझी वाट तुलाच शोधावी लागेल, पण इतरांनाही प्रश्न विचार. कारण एका प्रश्नाचे एकच उत्तर अन तेही अचूक असे कधीच नसते. दुसऱ्यांचीही उत्तरे समजून घेशील गर्भगृहासह तर अंतर्ज्योत उजळेल.”
__/\__

घाटावरचे भट 20/11/2015 - 12:16
मस्त! ७ विशेष आवडले.

प्रसाद१९७१ 20/11/2015 - 12:34
उजव्या बाजूचे मार्जीन खूप च जास्त झालय का? प्रत्येक ओळीवर जस्तीत जास्त ५-६ शब्द्च दिसतायत):-( स्क्रोल करुन थकलो

तिमा 20/11/2015 - 13:00
सर्वच भाग आवडले. आणि ते आवडणारच, याची आधीपासूनच खात्री होती. पाण्याचे एक बरे असते. ते नेहमीच जवळ भासते. आणि भिजणे, डुंबणे, ओलावणे या साऱ्या क्रिया तसे पाहिले तर मनाच्या पातळीवरच घडत असतात; हे खूपच आवडले. माझी तर याहून वेगळी स्थिती आहे. माझ्या मनांतला यक्ष, मलाच प्रश्न विचारत असतो.

सस्नेह 20/11/2015 - 13:10
छान मुक्तक. बाकी, आम्ही आमचे व्यवहारातले प्रश्न विचारले तर यक्षबुवा कुठल्याकुठे पळून जातील याची खात्री आहे... HDFC चा व्याजदर कधी फिक्स होणार ? तूरडाळीचा दर कधी उतरणार ? इन्कमटॅक्सचे भूत (फक्त) नोकरदारांच्या मानगुटीवरून कधी उतरणार ? सर्कारी भ्रष्टाचार कधी थांबणार ? ...आणि हो, अच्छे दिन कधी येणार ? हम्म... विचारून दम लागला !

In reply to by सस्नेह

आतिवास 20/11/2015 - 15:32
म्हणूनच यक्ष म्हणतो आहे - स्वत:च्या भावना काबूत ठेवत तो म्हणाला, “लक्षात घे, प्रश्न मी विचारायचे, तू नाही.”

In reply to by आतिवास

सस्नेह 20/11/2015 - 15:39
=))

कंजूस 20/11/2015 - 13:45
???????????/?????????/????????/????????? ???????????/???????//????????///??????? ???//////??????///////??????/////???? ???///////////////////??//////////////?? ??///////////////////////////////////?? ?////////////////////////////////////? //////////////////////////////////// >>>>>>>>>>>>>>>>> ----------------------------

In reply to by आतिवास

कंजूस 20/11/2015 - 20:12
तुमच्या कवितेचे भाषांतर-भाषा नसलेले. प्रथम प्रश्न होते खूप, नंतर कमी झाले, आता कोणतेच नाहीत, चालू पडलो/पडले. >>>>>>>>>>

आनंद कांबीकर 20/11/2015 - 14:28
छान लिहिता तुम्ही.

मारवा 20/11/2015 - 15:22
When we close the windows and doors of our house and stay inside, we feel very secure, we feel safe, unmolested. But life is not like that. Life is constantly knocking at our door, trying to push open our windows that we may see more; and if out of fear we lock the doors, bolt all the windows, the knocking only grows louder. The closer we cling to security in any form, the more life comes and pushes us. The more we are afraid and enclose ourselves, the greater is our suffering, because life won’t leave us alone. We want to be secure but life says we cannot be; and so our struggle begins. Life Ahead, p 54

तात्या 20/11/2015 - 19:06
लोकरीची गोल गोल गुंडी गुंडाळावी तसे शब्द फिरवले आहे ! मुक्तक म्हणले की छंद , सूत्र यांचे सोयर पाळावे लागत नाही पण अर्थाचे सुतकही सोडले आहे.

सूड 20/11/2015 - 19:08
सुंदर!
शिवाय समोर आलेली सगळीच आव्हाने हाती घ्यायची गरज नसते. काहींना वळसा घालून तर काहींना तात्पुरते शरण जाऊन काम भागते.
हे विशेष आवडलं!!

यशोधरा 20/11/2015 - 20:21
दुसऱ्यांनी दिलेली उत्तरे पुरत नाहीत, कितीही प्रगल्भ असली तरी. आपली वाट आपल्यालाच निर्माण करावी लागते नव्याने हे समजले आहे मला.
तुझी वाट तुलाच शोधावी लागेल, पण इतरांनाही प्रश्न विचार. कारण एका प्रश्नाचे एकच उत्तर अन तेही अचूक असे कधीच नसते. दुसऱ्यांचीही उत्तरे समजून घेशील गर्भगृहासह तर अंतर्ज्योत उजळेल.
तसे निरर्थक, निरुद्देश असे आयुष्यात काहीच असत नाही. प्रवास थांबण्यानेही नवे काही हाती लागते

यशोधरा 20/11/2015 - 20:23
हे पण खूप आवडले, लिहिलेलं खरंय अगदी.
यक्षप्रश्नांचे एक गुंतागुंतीचे चक्र असते सत्याच्या एका स्तरावरून उच्चतर सत्याकडे नेणारे, वाटचालीस साहाय्य करणारे. रितेपणाच्या एका अमर्याद टप्प्यानंतर माझ्यातच रुजलेले ते घनदाट अरण्य, ते निळेसावळे पाणी

चांदणे संदीप 21/11/2015 - 00:10
हे म्हणजे यक्षांच्या पुढच्या पिढ्यांबरोबर वाढत वाढत राहून आपण त्यालाच प्रश्न करण्याइतके सुधारलो आहोत किंवा त्याने प्रश्न विचारावे किंवा नाही हेही आपणच ठरविण्याची धमक मिळवून गेलो आहोत! पण आता हे यक्षप्रश्न मोडीत निघणार बहुतेक नव्या मनुष्यप्रश्नांच्या उदयामुळे! यक्षप्रश्नांचं एक बरं होत पण! उत्तर दिले की प्रश्न संपायचा. मनुष्यप्रश्नात असे नसते बरंका.... एका प्रश्नाचं उत्तर दिलं की त्यातूनच नवीन प्रश्न निर्माण होतो किंवा मनुष्यप्रश्नाला प्रतिमनुष्यप्रश्न असाही उत्तराचा पर्याय असतो म्हणजेच प्रश्न विचारणारी बाजू फक्त एकाचीच असेल असं काही नाही! शिवाय मनुष्यप्रश्नांच उत्तर बरोबर आल काय किंवा चुकल काय पुढचा मनुष्यप्रश्न हा ठरलेलाच! हे मनुष्यप्रश्न कधी सुटतील का? हाच खरा "यक्षप्रश्न!" (च्यायला, रात्री झोप येत नसेल तर हे असलं काहीबाही येत!) मुक्तक आवडले हेवेसांन :-)) Sandy

अरुण मनोहर 21/11/2015 - 03:02
खूप छान लिहीले आहे!. प्रश्नच नाही! इक सवाल तुम करो, एक सवाल मैं करू हर सवाल का जवाब, ही सवाल हो! मस्तच!

In reply to by अरुण मनोहर

आतिवास 22/11/2015 - 12:44
इक सवाल तुम करो, एक सवाल मैं करू हर सवाल का जवाब, ही सवाल हो! हे समजलं नाही. इथं प्रश्न एकतर्फी आहेत.

अरुण मनोहर 21/11/2015 - 03:05
एका प्रश्नबंबाळने ( http://www.misalpav.com/node/33759 ) आतीवास ह्यांचा लेख जरूर वाचावा !

इडली डोसा 21/11/2015 - 08:11
तुम्ही तुमच्या मनातले संवाद, आणि विचार किती स्पष्ट्पणे मांडता. तुम्हाला काय म्हणायचयं ते अगदी पोहोचतं समोरच्यापर्यंत. त्यामुळे तुमचं नेहमीच खूप कौतुक वाटतं. मुक्तक छानचं जमलयं.

मुक्त विहारि 21/11/2015 - 08:58
विशेषतः एका प्रश्नाचे एकच उत्तर अन तेही अचूक असे कधीच नसते. दुसऱ्यांचीही उत्तरे समजून घेशील गर्भगृहासह तर अंतर्ज्योत उजळेल.” ----------------------- तसे निरर्थक, निरुद्देश असे आयुष्यात काहीच असत नाही. प्रवास थांबण्यानेही नवे काही हाती लागते हादेखील रंजकच अनुभव!

पैसा 21/11/2015 - 19:03
खरे तर प्रत्येक उत्तर शोधण्याची गरज नसतेच, किंवा एखाद्या प्रश्नाच्या उत्तरावर आयुष्य अवलंबून नसतं. हे ज्या दिवशी उमजते त्या दिवशी कोणताच प्रश्न त्रास देत नाहीसा होतो! :)

गामा पैलवान 21/11/2015 - 21:04
अतिवास, मस्त रचना. आवडली. यक्ष जरासा गंडलेला वाटतो. एकीकडे म्हणतो की दुसऱ्यांची उत्तरं समजावून घेतलीस तर गर्भगृह उजळेल. ठीकाय. मग कवयित्रीचे प्रश्न ऐकून पहिल्यांदा तिला धमकावलं आणि मग विनवण्या केल्या त्या कशासाठी? तिची उत्तरं समजावून घ्यायला काय झालं होतं? हा एक यक्षप्रश्न पडलाय! :-) आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

आतिवास 22/11/2015 - 12:50
तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे का? प्रश्न यक्ष विचारतोय, मी नाही. (कवितेतली 'मी')

In reply to by आतिवास

गामा पैलवान 22/11/2015 - 14:55
अतिवास, आता असं बघा की, यक्ष अतिवासला अगोदर दरडावतोय. मग जरा नरमलाय आणि शेवटी घायकुतीला आलाय. तरीही हट्ट कायम आहे की प्रश्न तोच विचारणार. हे अतिवासच्या बोकांडी बसल्यागत वाटंत नाही काय? मग कबुली देतो की उतारवयामुळे चिडचिडा झालोय. शेवटी तिला उपदेश देतो की उत्तरं ऐकत जा. आता, म्हाताऱ्या माणसांची हीच सार्वकालिक व्यथा नव्हे काय? हा यक्ष आहे की वार्धक्याने खचलेला माणूस? पात्र गंडलेलं वाटतंय. पण कविता सुंदरच आहे. पोहोचायची तिथे पोहोचतेय. धन्यवाद! :-) आ.न., -गा.पै.

आतिवास 22/11/2015 - 12:51
सर्व वाचकांचे आणि प्रतिसाददात्यांचे आभार.

नीलमोहर 23/11/2015 - 11:27
“दुसऱ्यांनी दिलेली उत्तरे पुरत नाहीत, कितीही प्रगल्भ असली तरी. आपली वाट आपल्यालाच निर्माण करावी लागते नव्याने हे समजले आहे मला. तेव्हापासून जणू प्रश्न विचारण्याची गरज संपली आहे जरी प्रश्न आहेत खूप तरीही ...” हे कळतं पण वळत नाही..

ज्ञानोबाचे पैजार 23/11/2015 - 12:16
कविता वाचली आणि आवडलीही. त्या वर विचार करत असतानाच दारात १०० रु किलो ने तुरडाळ विकणारा टेंपो आला. मी सगळे विचार झटकुन टाकले पटकन पिशवी उचलली आणि चटकन लायनीत जाउन थांबलो. मी पिशवी पुढे करताच कोठूनसा एक आवाज आला: “किती किलो पाहिजे?" मी गंभीर पणे या प्रश्नाचे उत्तर शोधू लागलो खरच माणसाला किती तुरडाळ हवी? खरच हवी की नको? तुरडाळिचा खरा भाव किती? मी विचार करता असतानाच परत एकदा आवाज आला "उत्तर द्यायचे नसेल तर उगाच टाइमपास करू नकोस . तुझ्या मागे बरेच से लोक उभे आहेत." मी खिशाचा अंदाज घेत सांगितले "तीन किलो द्या" विचार काय हो नंतरही करता येईल. पण १०० रुपयाने तुरडाळ परत कधी मिळेल ते सांगता येत नाही. पैजारबुवा,

राही 23/11/2015 - 13:07
प्रश्न मिटतो, मिटवता येतो असं जेव्हा म्हणतात तेव्हा विधानातले शब्द मिटले, पण शेवटचं प्रश्नचिह्न तसंच राहिलं असं काहीसं होत असावं. उत्तरं मिळाली तरी या खुणा मागे राहातातच. मिटत नाहीत. प्रश्नातून प्रश्न वजा केला, तरी हे चिह्न उरतं, प्रश्नाला प्रश्नाने भागलं तरी शेष (प्रश्न)चिह्न उरतंच. नि:शेष असं काही असतं का, हा पुन्हा एक प्रश्न. काही प्रश्न हे नुसतेच प्रश्न असतात, उत्तरांची अपेक्षा नसते, किंवा उत्तरे नसणार ह्याची जाणीव असते. काहींची उत्तरे प्रश्नातच असतात किंवा काही उत्तरांमध्ये पुन्हा प्रश्न असतात. "प्रश्न हा, प्रश्न तो, प्रश्नातून निघती प्रश्न ते, प्रश्न उणे प्रश्न, प्रश्नमेवावशिष्यते!" आणखी : जिज्ञासेपोटी प्रश्न असतात, ज्ञान मिळवण्यासाठी प्रश्न असतात, ज्ञान मिळाले की प्रश्न संपतात म्हणे. पण पूर्ण ज्ञान मिळालंय हे समजायचं कसं? तर ज्ञानातच ज्ञातेपणाची जाणीव असते का? ज्ञातेपणाची जाणीव म्हणजे ज्ञानाचा एक भाग? की प्रश्न मिटले ही खूण ज्ञात्याची? की प्रश्न आहेत, पण विचारायचं नाही, इतरांना भंडावून सोडायचं अथवा वेठीस धरायचं नाही, उत्तरं शोधत राहायची, मिळाली तर मिळाली, नाही तर नाही, हे कवयित्रीचं उत्तर हेच ज्ञान? खूप मोठी व्याप्ती आहे या रूपकाची. तोंड दाबून गप्प बसायला लावणारी आर्थिक, सामाजिक, (कधी कधी) धार्मिक परंपरा, कुटुंबसंस्था, अंतर्गत विद्रोह, मानवी नाती अशा कितीतरी बाबींचा वेध घेता येईल या मुक्तकातून. अर्थात मुक्तक अतिशय आवडलेच.

In reply to by राही

आतिवास 23/11/2015 - 14:29
प्रतिसाद आहे. तुमचे प्रतिसाद नेहमीच आवडतात. तुम्ही स्वतंत्र लेखन करत नाही अशी तक्रार पुन्हा एकदा नोंदवते.

अभिजीत अवलिया 23/11/2015 - 19:17
दंडवत ... मन उलगडत मी सांगितले, “दुसऱ्यांनी दिलेली उत्तरे पुरत नाहीत, कितीही प्रगल्भ असली तरी. आपली वाट आपल्यालाच निर्माण करावी लागते नव्याने हे समजले आहे मला. हे विशेष आवडले.

पिशी अबोली 24/11/2015 - 12:25
एका प्रश्नाचे एकच उत्तर अन तेही अचूक असे कधीच नसते. दुसऱ्यांचीही उत्तरे समजून घेशील गर्भगृहासह तर अंतर्ज्योत उजळेल.
लाखमोलाची गोष्ट सांगितलीत ताई. रोज वाचतेय हे यक्षप्रश्न. :)