पुनर्जन्म
आमच्या कोकणातल्या आजीच्या आयुष्यात दोन वैयक्तिक भूकंप आले, पहिला जेंव्हा आमच्या आईचे वडील गेले व दुसरा जेन्व्हा माझा मामा तरुण वयांत गेला तेंव्हा. तुमच्यापैकी कांहीना 'सारांश' या हिंदी चित्रपटातील रोहिणी हट्टंगडी ची भूमिका आठवत असेल; तिचाहि एकुलता एक मुलगा विदेशी असतांना एका अपघातात गेलेला असतो व तिला सारखं वाटत असतं कि तो पुनर्जन्माने परत येईल. आमच्या आजीचं थोडंफार तसंच होतं.
मामाच्या मृत्त्यू नंतर ज्यांचा जन्म त्या घरांत (घराण्यात या अर्थाने) झाला त्यांना, किंव्हा त्या घराच्या माहेरवाशिणिच्या घरी ती त्याला शोधत असे. फक्त कालक्रमानुसार पाह्यला गेलं तर माझा जन्म माझ्या मामाच्या निधनानंतर लगेचंच --म्हणजे या पुनर्जन्माचा पहिला मानकरी मी होतो. मला वाटतं नंतर तिला वाटत गेलं असावं कि माझ्या मामाचा पुनर्जन्म त्यांच्याच घरांत व्हायला हवा व पर्यायाने हा मान माझ्या पेक्षा लहान अशा माझ्या एका चुलत मामा कडे गेला व तो शेवटपर्यंत तसाच राह्यला.
मी फक्त कालक्रमाच्या जोरावर हा मानकरी नव्हतो, त्याला एक जोरदार पुष्टी मिळाली होती genes( अनुवंशिकतावाहक) ची. तो एक खूप छान किस्सा आहे……
--2--
मी फारतर सहावी-सातवीत असेन तेंव्हा. कोकणांत घालविलेल्या अनेक उन्हाळ्याच्या सुट्टी पैकी एक. बरोबर मोठी बहिण असल्याचं आठवतंय. आम्ही सर्व खाली जेवायला बसलो होतो. मला पाणी हवं होतं, आजी वाढत वगैरे असणार म्हणून जवळपास होती. मी हायस्कुलात जायला लागलो नव्हतो पण मोठी बहिण तेंव्हा आठवीत किंवा नववीत असणार. आम्हाला तेंव्हा आठवीतच इंग्रजी विषय शिकवायला सुरुवात व्हायची. बहिण इंग्रजीचा अभ्यास करतांना तिचे दोन चार शब्द माझ्या कानावर पडणे व ते लक्षातहि राहणं नैसर्गिक होतं. क्वचित इंग्रजीचा अभ्यास सुरु करण्यापूर्वीच मला ही भाषा आवडायला लागली होती हा देखील त्याचा भाग असू शकेल.
कांही का असेना पण आजीकडे पाणी मागण्याऐवजी मी तिच्याकडे water मागितलं आणि ती मट्कन खाली बसली, कांही क्षण रडली व नंतर पाणी आणायला आंत निघुन गेली. माझं काय चुकलं ते मला कळेना पण उगाचच guilty मात्र वाटायला लागलं.
... आजीला नेमकं काय झालं होतं याचा खुलासा दुसऱ्या दिवशी आमच्या आईने किंवा आजीनेच केला असावा.
माझ्या मामाला म्हणे (खरं म्हणजे इथं मी "देखील" हा शब्द वापरायला हवा) त्याच्या आई (आजी)बरोबर बोलतांना कांही इंग्रजी शब्द मध्येच वापरायची सवय होती. मी सुद्धा माझ्या नकळत का होईना पण तिला संबोधून water हा शब्द वापरला व आजीला ब्रह्मांड आठवलं. या गोष्टीला अजून एक, आजीच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास महत्वाची, बाजू होती. माझ्या जन्माच्या पूर्वी माझा मामा आजीच्या स्वप्नात आला होता तो एक लहान बाळ होऊन व त्याने आजीला सांगितलं कि तो sister कडे जाणार म्हणून.
आजीच्या स्वप्नाची मीमांसा मी इथं करत नाहीं पण मी माझ्या मामा सारखाच एखाद दुसरा इंग्रजी शब्द वापरणं हे अनुवांशिकते ला धरून होतं, त्यांत अपवादात्मक असं कांहीच नव्हतं. आपण देखील बऱ्याच वेळा लहान मुलांना संबोधून म्हणतोच की "ही माझी आजी जन्माला आलीय" किंवा किंवा "हे आमचे सासरेबुवा च " वगैरे वगैरे.
आपण सारेच अनुवन्शिकतेच्या सुताला धरून पुनर्जन्माच्या स्वर्गाकडे जातोच की पण आमची आजी या बद्दल जरा जास्तच serious होती एवढंच.
माझी आजी सोडून मी माझ्या मामाचा पुनर्जन्म आहे असं इतर कोणालाहि वाटत नव्हतं. माझ्या आईला नव्हतं व मामीला तर नव्हतंच नव्हतं. पुनर्जन्माची गोष्ट बाजूला राहूदेत पण गम्मत म्हणजे मी व माझा मामा या दोघांतील अनुवांशिक साधर्म्य आजी व्यतिरिक्त फक्त एकाच व्यक्तीच्या लक्षात आलं होतं--आमच्या तीर्थरुपांच्या. थोडंसं strange नाहीं कां?
वाचने
4051
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
चमत्कारिक
अगदी बसण्याची पद्धत सुद्धा
In reply to अगदी बसण्याची पद्धत सुद्धा by कवितानागेश
+१
ल्हानपनी मला आजोबाच्या वयाचे लोकं
आपल्या सर्वांच्या
इंटरेस्टींग आहे..
In reply to इंटरेस्टींग आहे.. by तुमचा अभिषेक
प्रतिक्रियेबद्दल आभार.
एखाद्या व्यक्तीचा पुनर्जन्म
In reply to एखाद्या व्यक्तीचा पुनर्जन्म by drsunilahirrao
Interesting view point.
पुनर्जन्म एक चर्चेची बाब
Interesting view point.