मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

धन्यवाद सचिन.....

सुहासदवन · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
गेली चोवीस वर्षे क्रिकेट नावाचा एक खेळत होतास तू, त्यातल्या खऱ्या खोट्या चांगल्या वाईट अनेक गोष्टी पचवून. का भारतीयांनी क्रिकेट फक्त पहायचं आणि टाळ्या वाजवायच्या. का फक्त इतरांनी केलेल्या विक्रमान्बद्दल बोलायचं. तू ते बदललस. क्रिकेट खेळता खेळता तू त्याला आपला गुलाम बनवलंस. जणू विक्रम हे फक्त तू आधी करायचेस म्हणूनच दैवाने लिहिलेले होते की काय असं खेळलास तू. अगदी दृष्ट लागण्यासारखा. पण कोणाचीही दृष्ट लागली नाही तुला. ना यशाची ना पैशाची ना टीकेची. इतकी वर्षे आभाळा एवढा उत्तुंग होऊन देखील तुझे पाय मात्र जमिनीवरच राहिले. इतकी वर्षात बऱ्याच वेळा आम्ही तुला बरंच काही बरळलो पण आतून लगेच वाईट वाटायचं की आमच्या देवाला हे दिवस का आलेत? पण प्रत्येक वेळी तू असा झोकात परत आलास की लगेच आम्हाला आमची लाज वाटायची. दुःखाच्या क्षणी तुझे डोळे पाणावलेले पाहिलेत पण विक्रम होताना डोळ्यात मर्ग्रुरी मात्र दिसली नाही कधी. मैदानावर तुझा ध्यास क्रिकेट होता, तू मैदानावर असताना विरुद्ध संघाचा धाक तू असायचास आणि मैदानाबाहेर आमचा श्वास देखील तू होतास. आज पासून तुला आम्ही क्रिकेट मध्ये कधीच पाहू शकणार नाहीस, तू केलेले विक्रम कधी तू स्वतःचे म्हटले नाहीस कारण ते आज ना उद्या कोणी ना कोणी मोडणारच. पण ह्या क्रिकेटला जंटलमन'स गेम म्हणून जे स्थान आहे ते तुझ्या नंतर चालवणारा एक तरी खेळाडू होईल का ह्या पुढे. आज सचिन तेंडूलकर मधला क्रिकेटर काढून टाकला तर निव्वळ एक साधा आणि सरळमार्गी माणूस म्हणून देखील तुझे प्रतिक होऊ शकते. आज ज्या कोणाशी तुझी तुलना होते किंवा जे तुझे विक्रम मोडू शकतात त्यांच्यातला क्रिकेटर काढून टाकला तर काय बाकी राहील? जे कोणी ते विक्रम मोडतील ते तुझ्या इतके विनम्र आणि सज्जन असतील का. मराठी माणसाचं एक उत्तुंग प्रतिक म्हणून सुनील नंतर सचिन म्हणून निदान क्रिकेटमध्ये तरी आमची कॉलर टाइट होती आता पुढे काय ह्याचं वाईट वाटतं. एक पर्व संपलं म्हणून उदास नाही पण जे नवीन पर्व सुरु झालंय त्यात जीव घुसमटतोय. निदान तू आधी मोकळा झालास ते बरं. एक उभं आयुष्य तुझ्यामुळे सुसह्य झालं होतं त्या बद्दल तुझे धन्यवाद. आता राहिलाय तो निव्वळ प्रवास.

वाचने 1642 वाचनखूण प्रतिक्रिया 2

टवाळ कार्टा 17/11/2013 - 14:41
एक उभं आयुष्य तुझ्यामुळे सुसह्य झालं होतं त्या बद्दल तुझे धन्यवाद. आता राहिलाय तो निव्वळ प्रवास.
आइशप्पथ .......एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत...एकदम कडक