Skip to main content

स्वत्वाचा शोध

लेखक arunjoshi123
मंगळवार, 10/09/2013 या दिवशी प्रकाशित केले.
स्वत्वाची संकल्पना - मनुष्य स्वतःला 'मी' म्हणून संबोधतो. त्यात दोन भाग आले. मनुष्य एक जीव म्हणून कसा आहे याचे वर्णन हा पहिला भाग. अनेक शास्त्रांनी या भागावर चिकित्सा करून अधिकाधिक माहिती उपलब्ध करून दिली आहे. आपल्या असा एक जीव असण्याचे श्रेय सहसा कोणी विवेकी मनुष्य आपल्याकडे घेत नाही. म्हणजे मी अमुकराव आहे 'म्हणून' माझ्याकडे विचार करण्याची शक्ती आहे, अन्न पचवण्याची शक्ती आहे, असे कोणी मानत नाही. दुसरा भाग म्हणजे ज्याचे संपूर्ण श्रेय प्रत्येकजण आपल्याकडे घेतो. 'मला क्लासिकल संगीत आवडत नाही' असे जेव्हा कोणी म्हणतो तेव्हा त्याला या नावडीचा 'संपूर्ण' कार्यकारणभाव स्वतःमधे आहे, स्वतःच्या हातात आहे, असे वाटते. गरीबांची सेवा केली तर ती मी'हून' केली आहे असे वाटते. माझ्यातलं इतरांपासूनचं वेगळेपण हे आत्मजन्य आहे, स्वयंभू आहे असे प्रत्येकजण मानतो. मी असा आहे, माझे विचार असे आहेत, माझा स्वभाव असा आहे ही सर्व माझी स्वतःची निर्मिती आहे भलेही मग त्याच्यावर बाह्यजगाचा किती का प्रभाव असेना. स्वभाव, विचार ही स्वत्वाची बाह्यरुपे आहेत, त्यांची अंतःप्रेरणा म्हणजे स्वत्व. माझी जगापासूनची जी 'वेगळी' ओळख आहे, जी माझ्या संपूर्ण नियंत्रणात आहे, तिचा मूलाधार म्हणजे स्वत्व. माझी इच्छाशक्ती, माझी मुक्तेच्छा, माझे स्वातंत्र्य, माझे व्यक्तिस्वातंत्र्य या सार्‍या संकल्पना माझ्या स्वत्वापासूनच प्रसवल्या आहेत. स्वत्व आहे असे मानले तर या संकल्पनांना आधार आहे, अन्यथा ही सर्व माझी वैचारिक विमूढता आहे. म्हणून स्वत्वाचा शोध महत्त्वाचा आहे. सहसा आपल्या स्वत्वाचे धनी आपल्याखेरीज कोण असा कोणीही विचार करेल परंतु या लेखात भौतिक विश्वाची शास्त्रे वापरून स्वत्वाच्या असण्यावरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे. अस्तित्वविषयक भ्रांति - अवकाश, द्रव्य, उर्जा आणि काल ही अस्तित्वाची चार एकके आहेत. संपूर्ण विश्वाचे वर्णन या चार शब्दांत करता येते. प्रत्येक क्रिया, प्रक्रिया, भाववाचक नाम, संकल्पना यांच्या रुपात मांडता येते. परंतु यांच्याबाबत पहिला प्रश्न उद्भवतो तो हा की या चारही गोष्टी खरोखरीच अस्तित्वात आहेत की हे केवळ विश्वाचे वर्णन सोपे करण्याकरिता केलेले सोपे नामकरण आहे? अवकाश नावाची काही गोष्ट आहे की काहीच नसण्याच्या संकल्पनेलाच अवकाश म्हणतात? (आणि 'ठेवायला' अवकाश न लागणारी, निश्चित वा ससंदर्भ स्थानच नसलेली, आकारमान शून्य असलेली (आपण म्हणाल 'भावने'ला आकारमान नसते. असे नाही. भावना 'असायला' चांगला आडदांड माणूस लागतो.) गोष्ट असते का?) अवकाश नावाची जर काही बाब असेल तर मी माझ्या हाताच्या प्रत्येक फटकार्‍यानिशी अखिल ब्रह्मांड, अगदी 'अनंत' अंतरावरील कोपर्‍याला धरून, थोडे ना थोडे, ढवळून निघेल इतके असंतुलन स्वतःच निर्माण करू शकतो. माझी स्वत्व निदर्शक प्रत्येक चाचपड अवकाशात एक लाट निर्माण करेल आणि ती माझ्यानंतर देखिल अनंत काळ, मंदावत का होईना, आपले अस्तित्व टिकवून राहील. माझा प्रत्येक श्वास उच्छवास संपूर्ण जगाचे, थोडे फार, अनुक्रमे आकुंचन प्रसरण करेल. इतके शक्तिमान असल्याची कल्पना देखिल दडपण आणणारी आहे. शिवाय ज्या समुद्राच्या पृष्ठभागावर आपण येऊच शकत नाही अशा अथांग अवकाशरुपी महासागरात कुठेतरी हमेशा असण्याची कल्पना देखिल दडपण आणणारी आहे. उर्जा आणि द्रव्य खरोखरीच कसे अस्तित्वात आहेत का हा प्रश्न वैचारिक भौतिकशास्त्रासाठी चांगला आहे. समजा निसर्गाकडे 'सुरुवातीला' विश्व असावे कि नसावे असा प्रश्न होता. नसावे हे उत्तर एकदम सोपे आहे. जर जगात (चुकीचा शब्द, पण वापरल्याशिवाय गत्यंतर नाही)काहीच (अगदी अवकाश धरून) नसायचे आहे तर निसर्गाला माथापच्ची करायची गरज नाही. एकच प्रकारे नसता येते ते म्हणजे नसणे. पण जर काही असवावयाचे असेल तर हजारो (कि अनंत?) प्रश्न उभे राहतात. काय असावे? किती असावे? कसे असावे? काय काय असावे? कूठे असावे? इ इ. यातल्या एका प्रश्नाचे अगदी एकशब्दीय उत्तर (उदा. - जगात फक्त एक सिलिकॉनचा गोल गोटा असावा.) दिले तरी पुन्हा हजारो प्रश्न उभे राहतात. असे प्रश्न सोडवत जाऊन एक सुसूत्र (आणि कंपल्सरीली अनंत?) विश्व उभे करणे म्हणजे अशक्यच प्रकार आहे. पण तरीही विश्व आहे. ते नाही असे नाही. मग हे उर्जा आणि द्रव्य जसे आहेत तसेच ते असायला पाहिजेत असं काही आहे कि अजून काही? हे प्रश्न कोणी सोडवले किंवा कसे सुटले? कि आपल्या सकट जग हे सगळं त्या नसण्याची एक व्हर्च्यूअल प्रोटोटाइप आहे? पण काळ आहे की नाही हा प्रश्न गहन आणि महत्त्वाचा आहे. अस्तित्व तिथे काळ कि गती तिथे काळ? अचल अस्तित्व (अनंत काळ) त्यामधे गतीचे स्फुल्लिंग पडण्यापूर्वी एका ठिकाणी राहिले असले तरी हा सर्व काळ 'अस्तित्व काळ' शून्य? आणि गती तिथे काळ मानले तरी गतीचे एकसातत्य ब्रह्मांडाबाहेरचे घड्याळ मिळाल्याशिवाय छातीठोकपणे सांगता येणार. काल आहे कि नाही, त्याचा संदर्भ कोणता नि त्याचे मानक काय हा स्वत्वाच्या शोधामधला कायमचा अनुत्तरित प्रश्न राहणार आहे. म्हणजे मी कसा आहे (मी म्हणजे, या वाक्यात, माझा, मानवजातीचा, सजीवांचा आणि त्यापूर्वीचाही इतिहास.) त्याची मला संपूर्ण डीव्हीडी मिळाली आणि ती मी बघत बसलो तर ती पूर्ण पाहून होईपर्यंत दुसरी तितकीच लांब (मी डीवीडी बघत बसल्याची) दुसरी डीवीडी 'संपूर्ण' माहितीसाठी तयार असेल. मी कोण, कसा, कुठे , इ उत्तरे समाधानकारकरित्या माहीत आहेत असे गृहित धरले तरी कालिक पटलावर आपण नक्की कसे प्रवर्तलो आहोत हे गुह्य राहूनच जाते. आपले अस्तित्व क्षणभंगुर असल्याचा खात्रीलायक विषाद चालून जाईल, पण तेही माहित नसणे अस्वीकार्यच वाटते. खराखुरा फरक नाही. आपण द्रव्य आणि उर्जेने बनलेलो असतो. आपण काळाने बनलेलो नसतो आणि एका अर्थाने आपण अवकाशानेही बनलेलो नसतो. द्रव्य हे 'एकमेकांशी संपूर्णतः एकजात' अशा मोजक्याच कणांनी बनले आहे. उर्जा देखिल गुरुत्व, चुंबकीय, विद्युत्, गतीय/उष्मा अशा चारच प्रकारांची आहे. आपल्याला बनायला लागणारा मूलभूत खुराक हा इतका सोपा, सुटसुटीत आणि कमी आहे हा प्रकार एखाद्याच्या अहंला दुखवूनच जाणारा आहे. म्हणजे मी स्वतःला सघन, किचकट, गुंतागुंतीचा, बुद्धिमान मानत असताना मला जर कोणी ठोकळा म्हटले तर मला कसे वाटेल? पण प्रकार तरी तसाच दिसतोय. शिवाय इतर जग, मग त्यात सर्व आणि सगळे आले, त्याच्यात आणि आपल्यात 'खराखूरा' असा काहीच फरक नाही, केवळ permutations and combinations चा फरक आहे हा विचारही अस्वस्थ करून सोडणारा आहे. तेच अणू, तेच रेणू, तीच उपप्रकण, त्याच उर्जा, त्याच उपोर्जा, तेच सगळं काही. स्वत्व म्हणून काही नसावं का? ७० किलोच्या एका अरुण जोशीचे एक हुशार शास्त्रज्ञ आरामात पस्तीस पस्तीस किलोचे दोन अरुण जोशी बनवून देईल. बरे हेही ठिक. अरुणजोश्यानियम नावाचे मूलद्रव्य (ज्याचे रुपांतरण होणार नाही असे मूलभूत द्रव्य या अर्थाने) देखिल नाही. म्हणजे अजून थोडा हुशार शास्त्रज्ञ त्याच ७० किलोच्या माझे एक ४० किलोचा चिदंबरम आणि एक ३० किलोचा जयराम रमेश बनवून देइल. आता मी जर खराखुरा वेगळा नसलोच तर माझ्यातून कोणी काहीही बनवून 'तू असा आहेस', 'तू तसा आहेस' असा आरोप करतील. हे हिरमोड करणारे नाही का? निसर्गाच्या नियमांचा तुरुंग निसर्ग अतिशय मूर्ख आहे आणि क्रूर आहे. निसर्गाचे नियम 'एका सुनिश्चित संदर्भात' कायम असतात, म्हणून मूर्ख. म्हणजे बाह्य असंतुलित बल नसेल तर, बाकी काहीही असो, पदार्थ आपले गतीय वा कसे जडत्व बदलतच नाही. स्थल, काळ आणि ज्यांच्यावर नियम लावायचा आहे ते कोण आहेत, काय आहेत याचा त्याला काही विधिनिषेध नसतो, म्हणून क्रूर. म्हणजे बलात्कारकर्ता कितीही विकृत असला तरी गर्भ राहायची शक्यता तीच. समजा अवकाश, द्रव्य, उर्जा आणि काल या व्यतिरिक्त निसर्गात अजून काही तत्त्वे आहेत. समजा उर्जेचे, द्रव्यांचे अजून काही प्रकारही आहेत. समजा अजून काहीबाही आहे. त्याने काय फरक पडतो? शेवटी विश्व हे निसर्गाच्या नियमांनी चाललेले आहे. माझे असणे, वागणे देखिल या नियमांना बांधिल आहे. म्हणजे ज्या स्वातंत्र्याचा, सार्वभौमत्वाचा, मुक्त इच्छेचा, व्यक्तिस्वातंत्र्याचा जगात इतका दिंडोरा पिटला जातो ते सगळे बालाचाच भात आणि बोलाचीच कढी आहे. ज्या मूर्खपणाने मूलाच्या जन्माचे सर्व (जीवशास्त्रीय कार्यप्रणालीचे या अर्थाने सर्व) श्रेय कोणी 'महान' पिता आपल्याकडे घेतो त्याप्रमाणे मी ऑटोपायलट मोडवर असलेल्या जगाच्या छोट्याश्या हिस्स्याला 'मी' म्हणून काही गोष्टींमधे स्वतःची पाठ थोपटून घेतो. वास्तविक सर्व काही नियमबद्ध असेल तर व्यक्तिस्वातंत्र्य, इच्छाशक्ती या अर्थहीन संकल्पना आहेत. निसर्गाच्या नियमांच्या क्रूर तुरुंगात मी आहे. मानवनिर्मित कारागृहामधे किमान शारीरिक हालचालींना वाव असतो, विचार करायला निर्बंध नसतो, पण निसर्गाचे कारागृह कडवट आणि जालिम आहे. निसर्गाला स्वातंत्र्य नावाची संकल्पना तसूभरही मान्य नाही. सगळं काही त्याच्या नियमांनी व्हावं असा त्याचा अट्टाहास आहे. अनंत जागेचा धनी असणार्‍या निसर्गाकडे माझ्यासाठी गणितातल्या लिमिट्स मधे वापरलेल्या tending to zero इतकीही जागा द्यायचे औदार्य नाही. सत्ययुगात कलिला जसे बांधले होते तसे निसर्गाने माझे पूर्ण अस्तित्व करकचून बांधले आहे. असले कसले हे स्वत्व? क्षितिजाचा शोध आम्ही जर सगळे असे निसर्गाज्ञेनेच वागत असू, तर अशात कोण चूक आणि कोण बरोबर? विशिष्ट कालात, विशिष्ट पार्श्वभूमीवर, विशिष्ट संदर्भात निसर्ग कोणाकडून काय वागवून घेतो (कोण कसा वागतो असे म्हणणे चूक आहे) याचे खापर कोण कोणाच्या माथी फोडणार? सगळे नशीबाचे धनी! करता करविता निसर्ग! ते कश्या कोण्या अज्ञात आधारांनी बनलेले नियम. इतरांच्या कर्मांबद्दल माणसे जेव्हा अभिनिवेषाने बोलू लागतात, वागू लागतात, कोणत्याही उच्च वा नीच वा सामान्य मानवी मूल्याचे प्रदर्शन करतात, आपल्या स्व चा झेंडा घेऊन उभे आयुष्य कंठतात, तेव्हा निसर्गाला, निसर्गाबाहेरचे माणसासारखेच व्यक्तित्व असते तर तो उपहासाने गडगडून हसत सुटला असता. आणि स्वत्वाचा शोध घेणारांना क्षितिजाचा शोध घेणारांत, पढतमूर्खांत, गिनले असते.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2211
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

लेखक नागपूर/ विदर्भाकडील असावा असा माझा प्राथमिक कयास आहे. स्वत्वाचा शोध घेणारांना क्षितिजाचा शोध घेणारांत, पढतमूर्खांत, गिनले असते.>>> प्रत्येक सजीव स्वतंत्रपणे जगतो, वागतो, स्वेच्छा-व्यवहार करतो, त्याच्या अस्तित्वात त्याच्या स्वत्त्वाचे स्फुल्लिंग पाहता येते. हे खरेच आहे. म्हणूनच, “कुछ बात है की हस्ती मिटती नहीं हमारी” म्हणणारे अस्तित्व कुठे ना कुठे तरी स्वायत्त असावे असे समजण्यास वाव आहे. त्याचाच शोध म्हणजे स्वत्त्वाचा शोध! त्यामुळे तुम्ही कितीही स्वत्त्व नाकारायचा प्रयत्न केलात तरीही, ह्या लेखाचा विषय तुम्ही स्वत्त्वाचा शोधच घेत आहात, असे सुचवत नाही काय? काय म्हणता? पर्म्युटेशन – काँबिनेशनला मराठीत अनुक्रमे सक्रम-संयोग आणि संयोग म्हणत असावेत. हिंदीत क्रमचय आणि संचय म्हणतात.

“कुछ बात है की हस्ती मिटती नहीं हमारी”
स्वसृजित असं जगात काही असू शकत नाही. अगदी एक साधा विचार सुद्धा ! कारण असं कशाचं हून, 'शून्यातून' सृजन करणं निसर्गबाह्य आहे. A single illogicality or absurdity or unnaturality collapses the model of a consistent universe. विश्व जेव्हापासून असत आलं आहे तेव्हापासून अनैसर्गिक असं काही झालेलं नाही. तेव्हा आपली हस्ती मिटत नसली तर असे हस्ती न मिटण्याचा नियम निसर्गाच्या अधिकृत गॅझेटमधून नोटीफाय करण्यात आला आहे म्हणूनच.
अनुवाद रंजन या माझ्या अनुदिनींवरही आपले स्वागतच आहे.
marathiblogs.net वर आपले ब्लॉग लिस्टेड आहेत. मी ते ३-४ वर्षापासून तरी वाचत असावा. उर्जा, इ आपण काही लेख लिहिले आहेत ते वाचले आहेत. मी लातूरचा आहे. १३-१४ वर्षे दिल्लीत राहत असल्याने भाषेवर हिंन्दीचा प्रभाव आहे.

चिंतन आवडलं. स्वत्व 'बाहेर' शोधायचं की 'आत' याचा निर्णय हासुद्धा 'स्वत्व' जागे होण्याच्या प्रक्रियेतला एक भाग असतो. दृष्टिकोन बदलला की या शोधाचा मार्ग बदलतो आणि मग त्यातले बारकावे, वळणं, अडथळे आणि कदाचित आनंद आणि 'सापडलं ...' असं वाटण्याचे क्षणही बदलतात :-)

हा विषय शब्दात पकडणं कठीण. पण छान पकडलाय. जींदगीको जींदगीभर तलाश थी कि जींदगी क्या है. जब जेंदगीको जींदगानी का एहसास हुआ तो वो बोली "व्वाह, क्या जींदगी है"