मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सर्पमित्र

चाफा · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
शप्पत, जॅक डी ची थट्टा करण्यासाठी नाही लिहीलेलं, बरंच आधी लिहीलेलं आज आठवलं, ********** " तुमच्या ऑफीसला मघापासून फोन करतेय, कुणीच उचलत नाहीये " " त्या तुम्ही होतात होय ? मला वाटलं परत कुणीतरी मस्करी करतंय, हल्ली लोकांना काही सिरीयसनेसच राहीला नाही. म्हणे "मी मुंगूस बोलतोय मला सापाची भीती वाटतेय", काय पण.. " " बरोबर आहे मुंगूसच बोलत होता फोनवरून " " म्हणजे त्या तुम्ही होतात ? आणि वर तोंड करून परत ऑफीसला येऊन मस्करी करताय ? हे पहा, हे एका सेवाभावी संस्थेचं ऑफीस आहे, टाईमपास कसला करताय.." " ऐकून तर घ्या, आमचं आडनांव मुंगूस, मघाशी फोनवर बोलत होता तो माझा नवरा.." " मुंगूस असून सापाला घाबरता ? " " तुमचं आडनांव काय ? " " मानकापे.. " " किती मुंडकी छाटलीत आजवर ? " " भावना पोचल्या, सांगा साप कुठाय ते .." " ते सांगते हो पण तुमची हत्यारं कुठायत ?" " कसली हत्यारं ? मी सर्पमित्र आहे शत्रू नाही.. " " नाही म्हणजे पुंगी वगैरे.." " मी गारूडी वाटलो का तुम्हाला ? माझ्याकडे पुंगी नाही " " कमाल आहे, असूदे हे घ्या गाजर " " हे कशाला ? " " याची पुंगी करून वाजवा ना ! " " पण ही वाजेल का ? " " नाही वाजली तर मोडून खाऊन टाका, `गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहितर मोडून खाल्ली' " " आता म्हणी म्हणून संपल्या असतील तर आपण साप पकडू या ?" " पण मला एक सांगा हो तुम्ही साप कसा पकडता ?" " त्याचं काय आहे, आधी त्याच्या पायात पाय घालून पाडतो आणि पडला की पकडतो, तुम्हाला काय करायचंय ? ती एक कला आहे," " मलाही शिकायचेय," " आधी साप विषारी आहे की बिनविषारी ते समजून घ्यावं लागतं ! " " ते कसं कळणार ?? " " सोबतच्या माणसाला सांगायचं ना ! "पकड तो साप बिंधास्त मी आहे ना !" मग साप त्याला चावतो, मग आपण अर्धातास थांबायचं " " ते कशाला ? लगेच हॉस्पिटलला न्यायला नको का ? " " मग आपल्याला कसं कळणार साप विषारी की बीन विषारी ? समजा तो मेला, तर साप विषारी " " ओह असं आहे काय " " चला पकडताय ना साप ? बिंधास्त पकडा मी आहे ना ! " " माझ्यावरच प्रयोग कसला करताय ? माझ्या घरातला साप पकडा `तुम्हीच' " " आधी मला सांगा तो कसा दिसत होता ?" " लंबूळका.... " " बसं ? फक्त लंबूळका ? त्याचा काही रंग काही वर्णन ?" " म्हणजे बघा तो असा लांब होता, त्याच्या पाठीवर काळे पांढरे पट्टे होते, असं लांब शेपूट होतं " .. " झुपकेदार असेल ना ! " " हो, आणि जोरात धावत होता " " बाई घरात नक्की साप शिरलाय की झेब्रा ? असा साप नसतो नीट सांगा " " नाही म्हणजे , तो पिवळा होता, असा दणकट होता पांढर्‍या मिशा, आयाळ..." " हे सिंहाचं वर्णन सांगताय तुम्ही सापाचं सांगा " " मला नाही आठवत, मी घाबरलेले त्या सापड्याला पाहून " " सापाला सापड्या म्हणता तुम्ही ? " " उपरोधानं म्हणतेय हो, कळत नाही का ? " " आणि मग नाग असेल तर ? " " नाग.. काहीही काय विचारताय ? बरं मला सांगा तुम्हाला एखादा विषारी साप चावलाय का हो कधी ? " " हो, नाग चावलेला एकदा " " अरे बापरे मग ? मेलात का तुम्ही ?" " काय बाई आहे, मेलो असतो तर इथे आलो असतो का ? सिरीयल आहे का ही ? मेलं की पब्लिकडिमांड म्हणून परत यायला ?" " सॉरी पण मग नाग चावल्यावर पुढे काय झालं ? " " काय होणार ? एक आठवडा आय सी यू त " " अरे बापरे, पण तरी वाचलात हे काय कमी आहे का ? " " मी नाही तो नाग होता आय सी यु त " " तो कसा काय ? " " त्याचं काय झालं आधी नाग मला चावला मग मी त्याला चावलो, सत्तेचाळीस टाके पडले त्याला " " ओके, मी हे सगळं रेकॉर्ड केलेलं आहे " " काय लेख वगैरे लिहीणार आहात का ? वर्तमानपत्रात ? फोटो पण घ्या की, कुठल्या पेपरच्या वार्ताहर आहात तुम्ही ?" " वार्ताहर नाही मी, सर्पोद्यानातून आलेय, तो जखमी नाग आमच्याकडेच आहे, आणि हे पुरावे घेऊन मी तुमच्यावर केस टाकणार आहे " " ओ..ओ बाई मी सगळं फेकत होतो हो, मी सापच काय साधा गांडूळही पकडलेला नाही आजवर " " माहित होतं मला, मी न्युज रिपोर्टर आहे, आजची ब्रेकिंग न्युज मिळाली मला, नकली सर्पमित्राचा पर्दाफाश.."

वाचने 5354 वाचनखूण प्रतिक्रिया 29

जॅक डनियल्स 12/08/2013 - 04:21
काळजी नसावी, माझी थट्टा होणार नाही कारण मी स्वतःला सर्पमित्र म्हणवत नाही, साप पकडणारा म्हणतो.. विनोदी पण सत्यकथा ! वाट्टेल त्या एस्टोऱ्या ऐकल्या आहेत, आत्ता तर फेसबुक चे एवढे फ्याड आहे की कॉल वरच साप पकडायचे सोडून, विदिओ आणि फोटो काढत बसतात. अबतक ५६ मध्ये एक नानाचा 'अध्यात्मिक' विचार आहे- "encounter की आदत से बचना जादा जरुरी है!" तेच सर्प मित्रांनी लक्षात ठेवले पाहिजे. कॉल ला साप नाही मिळाला तर ताम्हणी मधून साप आणून त्यांचे फोटो शूट करणारे मला काही महाभाग माहित आहेत. माझ्या आधीच्या भागात हेच लिहिले होते, सुदैवाने सर्पोद्यान आणि आण्णांची शिकवण असल्याने सर्पोद्यान ची लोकं हे प्रकार कॉल वर करत नाहीत. बाकीच्या दिखावू सर्पमित्रांना शेवटी नाग किंवा मण्यारच धडा शिकवते.

In reply to by जॅक डनियल्स

चाफा 12/08/2013 - 16:49
मला माहित होतं, तुम्ही लाईटली घ्याल ते ;) यावरून कॉल च्या वेळचे सापाचं वर्णन सांगणारे काही मजेदार किस्से वाचायला मिळतील ही अपेक्षा :)

In reply to by खटपट्या

भुमन्यु 13/08/2013 - 19:23
अवांतार: एकही कमरेखालचा विनोद नसतांना अश्या लेखणाला कॉमेडी एक्सप्रेसची उपमा देणे हे अपमानकारक आहे ---- सही शिक्के बनवायला दिलेत ----

धमाल मुलगा 12/08/2013 - 19:44
कडकडीत एकदम! :) फू बाई फू... ;) ह्ये एव्हढं हिट स्किट घेऊन औंदाच्या गणेशोत्सवात एक ष्ट्यांडप करावा (लेखकूला मानधन न देता ;) ) असा हलकट विचार मनात तरळलाच. :)

ब़जरबट्टू 14/08/2013 - 10:20
मस्त जमलय !! आधी नाग मला चावला मग मी त्याला चावलो, सत्तेचाळीस टाके पडले त्याला =)) =))