कभी तनहाईओंमे
सर्वसाधारणपणे कवितेत किमान तीन कडवी असतात. गझलमध्येही अशीच अपेक्षा असते. अपवाद शास्त्रीय संगीताचा. तेथे अंतरा एक ओळीचा व अस्ताई दोन एक ओळींची असली तरी चालते. पण तेवढे काव्यच गायक तासभर आळवत बसतात व शब्दांना महत्व नाही म्हणून त्यातही कसेही शब्द बदलतात. ते सोडा. पण शब्दप्रधान काव्यात, हायकू सोडून, तीनपेक्षा जास्त कडवी असतातच. कवीला काय सांगावयाचे ते सांगावयाला काही जागा तर मिळाली पाहिजे ना ? आज मात्र मी एक चार ओळींची कविता आपणासमोर सादर करत आहे.
कभी तनहाईओंमें यू हमारी याद आयेगी !
अंधेरे छा रहे होंगे, की बिजली कौंध(?) जायेगी !!
ये बिजली राख कर जायेगी, तेरे प्यारकी दुनिया !
ना फिर तू जी सकेगा और ना तुझको मौत आयेगी !
केदार शर्मा
चांगल्या कवितेत, विशेषत: भावकवितेत, कवी प्रत्यक्ष काय सांगतो त्यापेक्षा जास्त काही तरी सुचवत असतो. यामुळे दोन गोष्टी साध्य होतात. तो तुमच्या रसिकतेला, तुमच्या भावनाशीलतेला, आकलनशक्तीला, आणि तुमच्या अभ्यासाला आवाहन करत असतो. यामुळे काय होते की तुम्ही कवितेत "गुंतता". हे गुंतणे फार महत्वाचे आहे. आता कवीला काय सांगावयाचे आहे यापेक्षा तुम्हाला काय वाटते ते महत्वाचे होते. बरे ही बाब "वैयक्तिक" आहे. मला काय सुचते हे तुम्हाला काय वाटते याहून भिन्न असणारच व मग ही कविता केदार शर्माची रहात नाही, ती माझी होते, तुमची होते, वाचणार्या प्रत्येकाची होते ! आणि प्रत्येकाने निराळा अर्थ लावल्याने बिघडत नाही. "अ"चे वाचन जास्त असेल, अनेक श्रेष्ट कवींच्या लिखाणाचा "अ"चा अभ्यास असेल तर सहज शक्य आहे की "अ"चे विचार जास्त खोल, काव्यात्मक, आशयाला भिडणारे असतील. पण ही ही एक शक्यताच. "ब"ने बिनधास्तणे आपले विचार मांडावेत. तुम्ही जितके यांत गुंताल तितकी ती कविता दीर्घकाळ तुमच्या ध्यानात रहाते. कवीला दुसरे काय पाहिजे असते हो? असो. जरा कवितेकडे वळू.
कविता सरळसरळपणे "दोन बिछडे पंछियोंकी", "दोन धृवांवरील विरही प्रेमिकांची" आहे. गंमत बघा. तिने प्रियकराला पाठवलेला हा निरोप. पण तिनेच कां ? चौथ्या ओळीतील " सकेगा" या ऐवजी "सकेगी" एवढा छोटासा बदल केला तर हा निरोप जसाच्या तसा "त्याने" पाठवला आहे असेही म्हणता येईल. किती कवितांमध्ये अशी अदलाबदल शक्य असते ? इथे हे शक्य झाले कारण चार ओळींत तिच्याबद्दल किंवा त्याच्याबद्दल काहीच माहिती दिलेली नाही. त्याने तिला अव्हेरले, झिडकारले आहे कां ? की भातुकलीच्या खेळामधील राजाराणींप्रमाणे त्यांना अनिच्छेने विलग व्हावे लागले आहे? पहिली शक्यता जास्त वाटते. कशी ? ती म्हणते आहे, "कधी काळी तू एकटा असतांना तुला माझी आठवण येईल. अंधार दाटत आलेला असेल, वीज कडाडत असेल; ती वीज तुझ्या प्रेमाच्या दुनियेची राखरांगोळी करून टाकेल. तुला जगणेही अशक्य करून टाकेल" आणि ... आणि मग ती त्याला एक फार कठोर शाप देते.. " आणि मग तुला मरणही मिळणार नाही !"
इथे मला जी.एं, च्या एका कथेची आठवण येते. गौतम एका संध्याकाळी प्रासादाबाहेर पडला व रस्त्याने हिंडत असतांना एक अनोळखी माणुसही त्याच्या बरोबर हिंडू लागतो. वाटेत गौतमाला एक जराग्रस्त माणुस, एक अतिवृद्ध माणुस व एक प्रेतयात्रा दिसते. जीवनातील या निराशामय नियती बद्दल गौतम हळहळ व्यक्त करतो पण तो दुसरा माणुस प्रत्येक वेळी म्हणतो "नशीबवान माणसे". गौतम त्याला विचारतो "अरे, हा जराग्रस्त, आठपंधरा दिवसांचा सोबती, दुसरा दोन दिवस तरी पाहील की नाही सांगता येत नाही आणि तिसरा तर स्मशानात पोचलाही असेल आणि तू त्यांना नशीबवान म्हणतोस ? आहेस तरी कोण तू ? " विषादाने सोबती उत्तरतो " गौतमा, मरण हा त्यांच्या सुटकेचा मार्ग आहे, त्यांच्या यातनांची समाप्ती होण्याची त्यांना आशा आहे. पण ज्याला मरणच नाही त्याचे काय ? मी, मी अश्वत्थामा आहे !"
(जीएंच्या कथांबद्दल लिहतांना भल्याभल्यांची दमछाक होते. म्या पामराला तर सारांश द्यावयाचा आहे, संभाळून घ्या. जाता जाता, असाच एक उर्दु गझलचा संदर्भ, आठ्वतो आहे कां कुणाला ? )
पण ती तळतळाट व्यक्त करते आहे असे तरी म्हटलेच पाहिजे कां ? तसेही नाही. ती स्वत:चे प्रेम असफल झाल्याने त्याला असा बोटे मोडत शाप देत आहे असे म्हणणेही तिच्यावर अन्याय करणारे असू शकेल. आज तिच्या प्रेमाचे विश्व तडिताघाते जळून गेले असल्याने विरहात जगता येत नाही व मरणाने मुक्तता मिळेल याचीही आशा नाही
असल्या खोल गर्तेत पडल्याने, निदान प्रियाकराचे तरी असे हाल होऊं नयेत म्हणून ती कळकळीने पूर्वसुचना देऊन त्याला सावध करण्याचा केविलवाणा प्रयत्न तर करत नाही ? तिच्या निर्व्याज प्रेमाचे हे अखेरचे नि:श्वास तर नव्हेत? ती आज जे जे काही भोगते आहे, तो आजचा वर्तमान काळच त्याचा भविष्यकाळ आहे असे तर तिला सुचवावयाचे नाही ना ? पण त्याला आधी कल्पना देऊनही त्याचा काही उपयोग नाही, हा नियतीचाच शाप आहे असेही तिला म्हणावयाचे असेल.
येथील दुसरा अर्थ कवीला अपेक्षित आहे का ? माझ्या एका मित्राने, ज्याने सिनेमा पाहिला होता व अजून तो आठवत आहे ,त्याच्या म्हणण्याप्रमाणे हा शापच आहे. पण मला मात्र वंचितेच्या बाजूने झुकते माप देऊन तिचे, भारतीय नारीचे, उच्च स्थान अबाधित ठेवणे आवडेल. फक्त " शक्यता आहे का ?" याचा विचार केला म्हणजे झाले. लक्षात घ्या, आपण केवळ कवितेचा आस्वाद घेत आहोत. सिनेमातील "सिच्युएशन" इथे गैरलागू आहे. असाच आणखी एक विचार..निष्ठुर प्रियकराचे आंतर्मन तर त्याला खात नाही ना ? .....
केदार शर्मा यांचे हे अप्रतिम गीत मुबारक बेगम यांनी "हमारी याद आयेगी" (१९६१) या चित्रपटात गायिले आहे. संगीत आहे स्नेहल भाटकर यांचे. आता थोडे सिनेमाबद्दल. सब कुछ केदार शर्मा यांचा हा चित्रपट फार काय चालला नाही. एक तनुजा सोडली तर इतर नावे कुणाच्याही लक्षात रहाण्यचेही कारण नाही. स्नेहल भाटकरांचे संगीत छान आहे. गायिका मुबारक बेगमने विसाव्या वर्षी हे गाणे गायले. पण पुढे काही फार वाव मिळाला नाही. "लता" नावाच्या झंझावातात मुबारक बेगम, राजकुमारी इ. चांगल्या गयिका कुठल्याकुठे फ़ेकल्या गेल्या. पराधिन आहे जगती..
गाण्यातील एक शब्द, बिजली कौंध जायेगी, मधील कौंधचा अर्थ लागत नाही. हिंदी व उर्दु शब्दकोषांत हा शब्दच सापडला नाही. तेव्हा माझी ऐकण्यात चूक आहे हे उघड. पुढच्या ओळीवरून कोसळेल, कडाडेल असा अर्थ पाहिजे. कोण जाणकार मदत करतोय ?
गाणे येथे ऐका
http://www.youtube.com/watch?v=GW2zZFLPLM8
शरद
याद्या
2794
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान रसग्रहण
+१
In reply to छान रसग्रहण by पैसा
माझंही हे आवडतं गाणं. रसग्रहण
नियतीचा शाप..
अनेकदा हे गाणं ऐकलं आहे...
माझे अतिशय आवडते गाणे!!
कौंध साठी ही लिंक पहा सर.
१९६१ वा जेंव्हा पहिल्यांदा हे
राग धानी
शरदकाका,