"चला, गाणं शिकुया, समजून घेउया!" - भाग १
राम राम मंडळी,
शीर्षक वाचून दचकलात ना? :)
पण घाबरू नका, मी काही इथे आपल्याला गाणं शिकवण्याकरता आलेलो नाहीये कारण मी स्वत:च अजून एक विद्यार्थी आहे. आणि म्हणूनच माझ्या लेखाचं शीर्षक मी, 'चला गाणं शिकवतो, समजावतो!' असं न देता 'चला, गाणं शिकुया, समजून घेऊया!' असं दिलं आहे! :)
असो..!
एक गोष्ट नमूद करू इच्छितो ती अशी की इथे मी गाण्यातल्या काव्याविषयी, त्याच्या चाली/संगीताविषयी न बोलता ते गाणं कश्या रितीने गायलं गेलं आहे या विषयावर बहुत करून बोलणार आहे. प्रत्येक गाण्याला एक गायकी असते. मी त्या गायकीविषयी बोलणार आहे. मला ती गायकी कशी दिसली, कुठे आवडली याबाबत माझं म्हणणं मी आपल्याशी शेयर करणार आहे. त्यामुळे कदाचित येथील काही वाचक मंडळींचा एखाद्या गाण्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलूही शकेल, ती मंडळी ते गाणं अधिक चांगल्या प्रकारे, डोळसपणे एन्जॉय करू शकतील असं मला वाटतं म्हणून हा लेखनप्रपंच! एखाद्या गाण्याच्या गायकीविषयी काही गोष्टी समजून घेतल्या तर आपल्यालाच ते गाणं अधिक चांगल्या रितीने गाता येईल, ते ऐकतांना अधिक चांगल्या रितीने ऐकल्याचा आनंद मिळेल. कारण प्रत्येक मनुष्य जेव्हा गाणं ऐकत असतो तेव्हा तोही ते गाणं मनातल्या मनात गातच असतो. त्याकरता कुठे जाहीर गायलं पाहिजे असं नाही, ष्टेजशो वगैरे केले पाहिजेत असंही नाही. गाण्यासारखा दुसरा सोबती नाही, त्यामुळे एखादं गाणं समजून घेऊन स्वत:पुरतं गातांनाही मजा येते. त्यातला स्वानंद सर्वात महत्वाचा! सबब, गाण्यातली काही सौंदर्यस्थळे समजून घेऊन, जाणीवपूर्वक ते गाणं मनातल्या मनात का होईना, परंतु अधिक चांगल्या रितीने गाता यावं, गुणगुणता यावं असं वाटणार्यांकरता हा लेखनप्रपंच! :)
एखादं गाणं आपल्याला का आवडतं? याची ढोबळमानाने उत्तरं द्यायची झाली तर त्या गाण्याची चाल/संगीत खूप छान असतं, संबंधित गायक/गायिकेचा आवाज खूप छान असतो, त्या गायक/गयिकेने ते गाणं खूप चांगल्या रितीने गायलेलं असतं, इत्यादी काही उत्तरे मिळतील. यापैकी आपण 'गायक/गायिकेने ते गाणं खूप चांगल्या तर्हेने गायलेलं असतं' या मुद्द्यावर आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत.
बाबूजी, दिदी, आशाताई इत्यादी मंडळी एखादं गाणं खूप छान गातात तसं मला गाता येत नाही. असं का बरं होतं? फक्त त्यांचा आवाज माझ्यापेक्षा कितीतरी अधिक छान असतो म्हणून? नाही, एवढं एकच कारण नक्कीच नाही. इतरही अनेक कारणं आहेत. ह्या मंडळींनी गायलेलं एखादं गाणं ऐकायला खूप छान वाटतं यामागे ह्या मंडळींचा आवाज, त्याचा पोत हे मुख्य क्वालिफिकेशन आहे/असतं हे मान्य! परंतु 'आवाज' हे एवढं एकच कारण नसतं! मुख्य मुद्दा असतो तो त्यांच्या गायकीचा. स्वर ठेवण्याच्या, स्वर लावण्याच्या पद्धतीचा. गाण्यातली अदृष्य लय अतिशय लीलया सांभाळण्याचा, संगीतकाराने त्या गाण्यात ठेवलेल्या खास खास जागांचा, शब्दांच्या उच्चारांचा!
आता पहिलं उदाहरण म्हणून आपण खूबसूरत सिनेमातलं पंचमदांनी संगीत दिलेलं आणि आशाताईंनी गायलेलं 'पिया बावरी' हे गाणं पाहू. हे माझ अतिशय आवडतं गाणं आहे. हे गाणं आपल्याला येथे ऐकता येईल व येथे पाहताही येईल. आज पहिलाच भाग आहे म्हणून आज आपण फक्त या गाण्याच्या अस्थाईबद्दल बोलू, त्यातली गायकी समजून घ्यायचा प्रयत्न करू. आज आपल्या सगळ्यांच्या गुरू आहेत या गाण्याच्या गायिका आशाताई! चला तर मंडळी. आशाताईंना मनोमन वंदन करून व्हा तैय्यार! गाणं समजून घेण्याचा हा पहिला धडा गिरवायचा आपण सगळेच प्रयत्न करू! आधी म्हटल्याप्रमाणे मीही एक विद्यार्थीच आहे तेव्हा माझंही काही चुकू शकतं. तसं काही चुकलं तर अवश्य सांगा, मला ती चूक कबूल करायला जराही संकोच वा कमीपणा वाटणार नाही! :)
'निसागम निधप' या सरगमने या गाण्याची सुरवात होते. यात 'निसागम' हा आरोह आहे व 'निधप' हा अवरोह आहे. 'निसागम' या आरोहानंतर 'निधप' हा अवरोह आशाताईंनी किती सुरेख गायला आहे पाहा! 'नि' वरून किती सुरेख वळण घेऊन त्या 'धप' या अवरोहावर येतात ही माझ्या मते शिकण्यासारखी गोष्ट आहे!
हा सरगम पूर्ण करून लागलीच त्या 'पिया बावरी..' ही अध्ध्या त्रितालातली चीज गाऊ लागतात व अतिशय सुरेलतेने 'बावरी' शब्दातल्या 'री' वर सम घेतात. एका क्षणात त्यांची स्वर-ताल-लय यांच्यावरची हुकुमत दिसून येते व आशाताईंनी या गाण्याचा संपूर्ण ताबा घेतल्याचे आपल्या लक्षात येते!
पिया बावरी, पिया बावरी, पी कहा, पी कहा, पिया पिया बोले रे, पिया बावरी!
'पी कहा, पी कहा' हे शब्द कसे टाकले आहेत पाहा व त्यानंतर लगेच 'पिया पिया बोले रे' या शब्दांतलं लयीला धरून असलेलं चापल्य किती सुरेख आहे पाहा! चापल्य हा शब्द मी अश्याकरता वापरला की पुढे लगेच 'पिया बावरी' हे शब्द घेऊन सम गाठणं महत्वाचं आहे! 'पिया पिया बोले रे' या शब्दांनंतर 'पिया बावरी' हे शब्द घेऊन आशाताई इतक्या सुंदर रितीने समेवर येतात की अगदी ऐकत रहावसं वाटतं. तालास्वरालयीवर घट्ट पकड, कुठेही शब्दांची खेचाखेच नाही की मोडतोड नाही! इथे आपल्याला आशाताईंच्या गायकीचा आनंद मिळतो अन् मन प्रसन्न होतं! लगेच पुढच्या आवर्तनात त्यांनी 'बावरी' शब्दातल्या 'बा' वर इतकी जीवघेणी जागा घेतली आहे की की क्या केहेने! साला, दिल एकदम खुश होऊन जातो! :)
असो,
तर मंडळी, आज प्रस्तावनेचा हा पहिलाच भाग आहे तेव्हा आपल्याला जास्त त्रास न देता इथेच थांबतो. पुढील प्रत्येक भागात आपण एखाद्या गाण्यातलं धृवपद व एखादा अंतरा यातलं सौंदर्य बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. ते मी माझ्या परिने शब्दात मांडण्याचा प्रयत्न करीन. बसंतच लग्न या मालिकेत मी मला आवडणार्या काही रागांचं सौंदर्य उलगडून दाखवायचा प्रयत्न केला आहे. तशी मला आवडणार्या काही गाण्यांबद्दल लिहिण्यासाठी मी ही लेखमाला सुरू करत आहे. आपल्याला आवडली, त्यातून काही चांगले विचार मिळाले तर चांगलंच आहे, नाय आवडली तर द्या सोडून...! :)
-- तात्या अभ्यंकर.
वाचने
19090
वाचनखूण
प्रतिक्रिया
35
पडद्यामागचं क्रेडिट...
मस्त तात्या
In reply to मस्त तात्या by वरदा
असेच म्हणतो
ह्म्म्म
In reply to ह्म्म्म by पुष्कर
:)
नमस्कार तात्या...
सम म्हणजे
छान मालिका!!
अजुन एक.
वाहवा!
In reply to वाहवा! by ऋषिकेश
असेच म्हणतो
In reply to असेच म्हणतो by धनंजय
हेच म्हणतो
उत्तम उपक्रम
In reply to उत्तम उपक्रम by चकली
हेच म्हणतो...
In reply to हेच म्हणतो... by मनिष
हेच म्हणते.
In reply to उत्तम उपक्रम by चकली
+१
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
In reply to उत्तम उपक्रम by चकली
लै भारी उपक्रम
देव तुझं भलं करो, बाबा!!
In reply to देव तुझं भलं करो, बाबा!! by पिवळा डांबिस
+१
In reply to देव तुझं भलं करो, बाबा!! by पिवळा डांबिस
+१
In reply to देव तुझं भलं करो, बाबा!! by पिवळा डांबिस
एकदम पर्फेक्ट
रेखा/दादामुनी..
In reply to रेखा/दादामुनी.. by विसोबा खेचर
या चित्रपटाबद्दल ...
In reply to या चित्रपटाबद्दल ... by मुक्तसुनीत
आठवण..
आता निवांतपणे..
खुप खुप सह्ही.......
गाणं सुंदरच आहे
क्या बात हे
चांगले सदर!
मस्त गाणं आहे!
तात्या,
स्मृतीगंध
प॑चम मॅजिक
चांगला उपक्रम
आभार/उत्तरे...