मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अन्नपुर्णा

शरद · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
अन्नपुर्णा आपल्या येथे भक्त व देव यांचे एक अतूट नाते आहे. देव आपला माय-बाप असतो, बंधु-भगिनी आणि सखा-शेजारीही असतो, आपल्यातलाच एक असतो. आता शेजारी म्हटले की आपण शेजारच्या घरांत चाललेले नवरा-बायको यांचे तंटे-बघेडे जेवढ्या चवीने ऐकतो व इतरांना रसभरीत भाषेत, थोडा पदरचा मसाला घालून, सांगतो, तेचढ्याच तन्मयतेने कवींनी देवांच्या घरी चाललेली भांडणे रंगविली आहेत. आता घरांत लक्ष्मीची चणचण असेल तर भांड्याला भांडे जास्त वेळेला लागणार व आवाजही मोठा होणार हे ओघानेच आले. एकदा काय झाले आता शंकर हा "विश्वनाथ", विश्वाचा अधिपती, पण यांनी त्याच्या हातात दिले काय तर भिक्षापात्र ! " जा, चार घरांत जाऊन भिक्षा माग, मिळेल काय ते घरी आण, मगच जेवण !" बिचारा हिंडायचा खरा, पण रोज मिळेलच याची खात्री काय ? एक दिवस हात हलवत घरी आले व पार्वतीला म्हणाले " मला तर काय मिळाले नाही, आज तू जा व बघ काही सोय होते कां." घरांत काहीच नाही म्हटल्यावर चरफडत का होईना पार्वती बाहेर पडली, जगन्माता घरी आली म्हणून लोकांनी भरभरून दिले. पोटभरून खावयाला मिळाले म्हटल्यावर खुष होऊन शंकर म्हणाले, " देवी, तू खरी "अन्नपूर्णा" ". आता मात्र पार्वती भडकली. आधीच लोकांकडे जाऊन पदर पसरावा लागला म्हणून अपमान झाला असे वाटणाया प्रजापतीदुहितेला संताप आवरेना. ती जरा तडकलीच व रागाने, थोड्या तिरस्कारानेच म्हणाली रामाद्याचय् मेदिनीं धनपतेर्बीजं बलाल्ला रामाद्याचय् मेदिनीं धनपतेर्बीजं बलाल्लाङ्गलं प्रेतेशान्महिषं तवास्ति वृषभ:फालं त्रिशुलं तव ! शक्ताहं तव चान्नदानकरणे स्कंदोस्तिगोरक्षणे, खिन्नाहं हर भिक्षया कुरू कृषिं गौरीवच: पातु व: ! ( रामात्. ..परशुराम, मेदिनी ..पृथ्वी, धनपती ..कुबेर, बालाल्लाङ्गलं .. बलरामाकडून् नान्गर, प्रेतेश् .. यम फालं ..नान्गराचा फाळ, गोरक्षणे .. गाय-रेडा राखावयाला, स्कन्द् ...कार्तिकस्वामी, पातु व: जगाचे कल्य़ाण करो.) या जगताच्या मातापित्यांचे गीर्वाणभारतीतील संभाषण जरा मराठीत बघू. गौरी म्हणते, " देवा, या भीक मांगण्याचा खरचं कंटाळा आला आहे. थोडी शेती कां करत नाही ?" आता बायकोने कुठलेही काम सांगितले की नवरा ते टाळण्याकरित सबबी शोधतोच. शंकर म्हणतो, " बाई, तू म्हणतेस ते ठीक माहे पण माझ्याकडे जमीन कुठे आहे ?" गौरी म्हणते " तो परशुराम, तुमचा शिष्य, तर सगळी पृथ्वीच वाटावयास निघाला आहे, मागवा त्याच्याकडून ".( क्षत्रिय संहारानंतर परशुरामाने सगळ्या पृथ्वीचे दान केले होते) "अग, पण बियाणे ? " शंकराचा प्रश्न. शेतकरी सावकाराकडून बियाणे उसने आणतो, ते लक्षात ठेऊन गौरी म्हणते " आणा कुबेरा (जगाचा सावकार)कडून " "आणि नांगराचे विचारू नका, बलरामाकडून मिळेल." पुढच्या प्रश्नाचे उत्तर आधीच. "पण माझ्याकडे तर एकच बैल आहे ". "मग ? यम देईल की त्याचा रेडा नांगरणीपुरता." आणि हां, फाळाचे विचारू नका, तो काय तेथे त्रिशुल पडलाय !" शंकराला काळजी आपल्या न्याहरीची, गौरी म्हणते, " मी आणीन बांधून". आता प्रश्न न्याहरीच्या वेळी बैल-रेड्याकडे कोणी लक्ष द्यावयाचे. गौरी म्हणते, "तो रिकामटेकडा कार्तिकेय, त्याला काय उद्योग आहे, बघेल त्यांच्याकडे." असा गौरी-शंकराचा॒ संवाद जगाचे कल्याण करो. मित्रहो, " नवरा काय प्रश्न विचारणार व त्याचे उत्तर काय " हे बायकांना आधीच कसे माहित असते या तुम्हाला नेहमी सतावणार्‍या प्रश्नाचे उत्तर मिळाले ? आदीमातेने ते बाळकडून आपल्या सगळ्या लेकींना जन्मजातच पाजलेले असते ! शरद

वाचने 5470 वाचनखूण प्रतिक्रिया 17

धन्या Wed, 03/27/2013 - 16:38
संवाद छानच आहे. देवांना माणसानेच निर्मिले आणि मग माणसांचेच गुणावगुण त्यांना चिकटवले याचा हा पुरावा.

पैसा Wed, 03/27/2013 - 18:44
मस्त संवाद आहे. देवांना मानवी गुण अवगुण लावून लिहिलेले असे खूप मजेचे संवाद आहेत. आणखी येऊ द्या.

स्पंदना गुरुवार, 03/28/2013 - 05:35
एक फार मोठा बदल म्हणजे बदललेली भाषा. इतकी खेळीमेळीची इतकी छान की बस! सर तुम्हाला ९८/१०० भाषेसाठी. लेख आतिशय आवडला. देव झाला तरी काय झाल? जरा शरीराला कष्ट पडले तर काय बिघडल नाही का? का सगळ्यांनीच राहुल गांधीचा मार्ग धरायचा नाही का?

इन्दुसुता Mon, 04/01/2013 - 08:30
शरद, लेख आवडला. पण मी म्हणत्ये आदिमायेने सौम्य भाषा वापरलीन बरीक !! ( नाही म्हणजे काये की मला संस्कृत समजत नाही म्हणून तसं वाटलं ). तस्मात् आदिमायेचा मिपाप्रथेनुसार निषेढ ! :)