मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वन्ही तो चेतवावा रे .....

विटेकर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
॥ श्रीराम समर्थ॥ वन्हि तो चेतवावा रे.......... www.samarthramdas400.in महाराष्ट्रदेशीं संताचा महान वारसा आहे. भागवत संप्रदाय, नाथ संप्रदाय, महानुभाव संप्रदाय अशा अनेक समॄद्ध परंपरा आहेत. सर्व प्रकारची आस्मानी आणि सुल्तानी संकटे पचवून या साऱ्या परंपरा महाराष्ट्रात आणि भारतवर्षात केवळ टिकूनच नव्हे तर दिवसेंदिवस वर्धिष्णु होत आहेत, हे महाराष्ट्राचे परम भाग्यच! असाच एक प्रखर संप्रदाय - रामदासी संप्रदाय! १६ व्या शतकांत साडेतीनशे वर्षाची काळरात्र नष्ट करणाऱ्या शिवसुर्याचा उदय झाला आणि हिंदूपदपातशाही- मराठयांचे स्वराज्य निर्माण झाले. या स्वराज्य स्थापनेला आवश्यक ती सामाजिक मशागत आणि अध्यात्मिक आधिष्ठान रामदासी संप्रदायाने केले हे तर सर्वश्रुतच आहे. गावोगावचे मठ, महंत, शिष्य, बलोपासना, रामजन्मोत्सव, मारुती मंदिरे आणि सांप्रदायिक उपासनापद्धती याद्वारे समर्थ रामदास स्वामींनी सारा महाराष्ट्र ढवळून काढला आणि शिवबांच्या धर्म-संस्थापनेसाठी समाजमन तयार केले. समर्थ रामदास स्वामींचा सारा कर्तृत्वकाळ तात्कालीन महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, धार्मिक, आणि अध्यात्मिक उन्नत्तीसाठीच होता. वयाच्या केवळ आठव्या वर्षी आपल्या आयुष्याची पूर्ण blue print बनवून तसे कार्य घड्वून आणणारे समर्थ रामदास स्वामी हे अवतारी पुरुष होते, प्रत्यक्ष रामरायाने त्याने अनुग्रहीत करुन श्री हनुमंतांच्या स्वाधीन केले होते. समर्थांनी केवळ तत्कालीन महाराष्ट्राला जागे केले असे नव्हे तर आपल्या अलौकिक प्रतिभेद्वारे भावी पिढ्यांसाठी दीपस्तंभ होईल असे अक्षर वाड्मय निर्माण करुन ठेवले. भारतव्यापी निस्पृह महंतांची संघटना आणि मठांचे जाळे निर्माण केले. आद्य शंकरांचार्यांच्यानंतर अशा प्रकारचे देशव्यापी संघटन उभे करणारे समर्थ रामदास एकमेवच होत. श्री.समर्थांचे एकूण वाड्मय ३५००० ओव्यांचे आहे. त्यापैकी दासबोध, मनाचे श्लोक आणि आत्माराम हे तीन ग्रंथ समर्थ संप्रदायाची प्रस्थानत्रयी म्हणून मानले जातात. मनाचे श्लोक म्हट्ले अथवा ऐकले नाहीत असा मराठी माणूस विरळा! त्यातील साधे सोपे आणि गेय विवेचन अनेकांना मार्गदर्शक ठरले आहे. विनोबांनी म्हणूनच मनाच्या श्लोकांना "मनोपनिषद"असे म्हंट्ले आहे. तसेच दासबोधाइतका अध्यात्माबरोबरच व्यवहारचातुर्य, व्यक्तिमत्व विकास आणि व्यवस्थापन कौशल्ये सांगणारा सुबोध आणि रसाळ ग्रंथ मराठी वाङ्-मयात खचितच असेल आणि आत्माराम ही तर साधकांसाठी पर्वणीच होय. तसेच करुणाष्ट्के , आरत्या, ११ भीमरुपी, सवाया, अभंग असे उदंड वाड्मय समर्थांनी आपल्याला दिले आहे. हे सारे साहित्य अक्षर स्वरुपात समर्थ भक्तांना आणि अभ्यासकाना उपलब्ध असावे म्हणून श्री समर्थ रामदास स्वामी चतु:जन्मशताब्दी समितीने २००८ साली श्री समर्थ रामदासांच्या चतु:जन्मशताब्दी निमित्त www.samarthramdas400.in या संकेतस्थळाची निर्मिती केली.केवळ मराठी भाषेतीलच नव्हे तर अन्य देशी आणि विदेशी भाषेत ही समर्थ साहित्य अभ्यासकांसाठी उपलब्ध असावे म्हणून हे संकेत स्थळ सुरु केले आहे व उत्तरोत्तर या खजिन्यात भर पड्त आहे. या संकेतस्थळाचे ४ विभागात वर्गीकरण असून पहिल्या विभागात समर्थांचे मराठी, संस्कृत, हिन्दी, कन्नड, गुजराथी, सिन्धी या भारतीय भाषांतील आणि जर्मन व इंग्रजी भाषांतील साहीत्य उपलब्ध आहेत. सार्थ दासबोध, मनोबोधाचे विवेचन आणि समग्र समर्थ साहित्य ही काही उल्लेखनीय पुस्तके! दुसऱ्या विभागात श्राव्य माध्यमातील व्याखाने, प्रवचने, विवेचन, करुणाष्टके, समर्थकृत आरत्या, भीमरुपी स्त्रोत्रे, मनाचे श्लोक, हिंदी मनाचे श्लोक उपलब्ध आहेत. समर्थ शिष्य भगवान श्रीधर स्वामी, स्वामी वरदानंदभारती,आचार्य धर्मेंन्द्रजी, प्राचार्य शिवाजीराव भोसले, चैतन्य महाराज देगलूरकर, डॉ.सुषमताई वाटवे, समर्थभक्त श्री.सुनीलजी चिंचोलकर, मुज्जफर हुसेन अशा अनेक मान्यवरांचे विवेचन आणि मार्गदर्शन आपल्याला येथून उतरवून (download) करुन घेता येईल. तिसऱ्या विभागात वृत्त संकलन आणि प्रसंगविशेष वार्तांकन असा विषय असून सज्जनगड आणि अन्य ठिकाणी झालेल्या कार्यक्रमाचे संकलन या विभागात केले आहे. तसेच दर महिन्याचे सज्जन गडावरुन प्रसिद्ध होणारे " रघुवीर समर्थ " हे मासिक ही या विभागात उपलब्द्ध आहे. चौथा विभाग हा दासबोधाच्या पारायणाचा असून सांप्रदायिक पद्धतीने वाचन ध्वनी स्वरुपात उपलब्ध आहे. या audio files आपल्या संगणकावर अथवा सी डी वर उतरवून घेता येतील अशी व्यवस्था आहे, आपल्या उपलब्ध वेळेनुसार आपल्याला दासबोधाचे श्रवण करता येते. या संकेत स्थळाला जोडून मनाच्या श्लोकांवरील ब्लोग www.samartharamdas400.blogspot.com चालतो. दर आठवड्याला एक श्लोक आणि त्या श्लोकांवरील डो. सुषमाताई वाटवे यांचे श्राव्य निरुपण असे त्याचे स्वरुप आहे. या ब्लोगवर चर्चा तसेच त्या त्या श्लोकांवर निरुपण करण्याची सुविधा आहे. याच बरोबर दासबोधाच्या अभ्यासासाठी http://dasbodhabhyas.org/> या संकेत संकेत स्थळाची निर्मिती केली आहे पत्राद्वारे आणि ई-मेलद्वारे दासबोधाचा शास्त्रोक्त अभ्यास करता येतो. आणि अनेकांनी त्याचा लाभ घेतला आहे. श्री समर्थ कृपेने या संकेत स्थळाद्वारे हे सारे समर्थ साहित्य पुण्यातील समर्थ सेवक डॉ. राम साठये यांच्या विशेष प्रयत्नाने आणि सहकार्याने आपल्या साऱ्यासाठी उपलब्ध झाला आहे आणि आपल्या सर्वांच्या भरिव सहकार्याने आणि सक्रीय पाठिंब्याने हा उपक्रम आणि संकेतस्थळ उत्तरोत्तर वृद्धिंगत होणार आहे याविषयी तिळ्मात्र संदेह नाही. या संकेत स्थळाविषयी आणि इ-मेलद्वारे दासबोध अभ्यासक्रमाविषयी अधिक माहीतीसाठी : 1.info@samartharamdas400.in 2.dasbodh.abhyas@gmail.com 3.vitekar@gmail.com जय जय रघुवीर समर्थ !

वाचने 11577 वाचनखूण प्रतिक्रिया 35

बॅटमॅन 22/01/2013 - 15:54
चला, महाराष्ट्राच्या मान्यवरांपैकी अजून एकाची वर्णी नेटावर लागली :) हे बाकी छान काम केलेय समितीने. बसल्याजागी रामदासांचे वाङ्मय वाचायला मिळणे , तेही हिंदी-कन्नड-सिंधी-जर्मन आदि भाषांमध्ये म्हणजे भारीच!

चौकटराजा 22/01/2013 - 16:09
रामदास स्वामी , कबीर या संतांचे स्थान माझ्या सारख्या हार्ड नास्तिकाच्या ही मनांत आदराचे आहे. विवेक हा रामदासांच्या उपदेशाचा गाभा आहे. रामनाम नव्हे, हे आपण समजून घेतले पाहिजे.आणि रामनामात तोटा काय आहे ? कबीराने तर जीवनाचा शोध ज्या अलौकिक पद्धतीने घेतलाय त्याला तोड नाही. या दोन संतांच्या शिकवणुकीची तिजोरी ज्याला लाभली त्याला सुखाची शिदोरी मिळाली म्हणून समजा. आपल्या लेखाबद्द्ल आभार.

विटेकर 22/01/2013 - 16:47
धन्यवाद तुमच्या प्रतिसदाबद्दल ! "मराठी संत निवृत्तीवादी आहेत" या आरोपाला समर्थ रामदास हे सणसणीत उत्तर आहे. प्रवृत्तीपर अध्यात्म हा समर्थांच्या अध्यात्माचा प्राण आहे. विवेक हा तर गाभाच आहे. या बाबतीत मला लोकमान्य टिळकांचा प्रयत्नवादी कर्मयोग पण पटतो. या दोन महापुरुषांच्यात कमालीचे साम्य होते. शिवाजी महाराज असल्याने समर्थांनी लढाया मारल्या नाहीत एवढेच !

In reply to by विटेकर

अर्धवट 22/01/2013 - 16:49
>>शिवाजी महाराज असल्याने समर्थांनी लढाया मारल्या नाहीत एवढेच ! तुम्हाला नक्की असंच म्हणायचंय का? की लेखनाच्या भरात झालेली चूक आहे?

विटेकर 22/01/2013 - 16:57
शिवाजी महाराजांसारखा पराक्रमी राजकारणी असल्यामुळे समर्थांना प्रत्यक्ष लढाईत भाग घेण्याची अथवा राजकारणात भाग घेण्याची आवश्यकता नव्हती ! दोघांचे स्वप्न एकच होते. टिळक महाराज मात्र प्रत्यक्ष राजकारणात होते.

In reply to by विटेकर

अर्धवट 22/01/2013 - 17:18
बरं.. म्हणजे हायपोथेटीकल सिनारीओ म्हणून असं म्हणायचे का? की केवळ महाराज होते म्हणून समर्थांना प्रत्यक्ष लडावे लागले नाही, समजा महाराज नसते तर समर्थांनी लढाई मारून जिंकलीही असती तेवढ्याच पराक्रमाने. ? चेष्टा करण्याचा उद्देश नाही, केवळ आपली मते आणि काही मुद्दे समजून घेतो आहे.

In reply to by अर्धवट

बॅटमॅन 22/01/2013 - 17:31
+१११११११११. रामदासांचे इतर संतांपेक्षा वेगळेपण म्हणजे "राजकारणा" वर त्यांनी दिलेला भर. त्यांच्या या तत्वज्ञानाची शिवाजीमहाराजांच्या स्वराज्यस्थापनेला मदत झाली असे म्हणू शकता येईल. पण नक्की रामदासांचा प्रभाव कितपत होता, याबद्दल प्रो आणि अँटी अशा दोन्ही बाजूंनी खंडीभर मते आलेली आहेत. पण काही झाले तरी स्वराज्याची कल्पना ही शिवाजीमहाराजांची स्वतःच्या डोक्यातून आलेली आहे, त्यात रामदासांचा संबंध नाही. शिवाजीमहाराज संस्कारक्षम वयाचे असताना दोघांची भेट झाल्याचाही पुरावा नाही. शिवाजीराजांनी रामदासांना स्वत:चे गुरू मानले, त्यांच्या नावे परळीचा किल्ला ऊर्फ सज्जनगड करून दिला, चाफळच्या रामनवमीउत्सवाला रायगड अकौंटमधून फंडिंग सुरू केले, या सर्व गोष्टी खर्‍या आहेत पण बर्‍याच नंतरच्या. शिवाजी आणि रामदास या दोघांच्याही मनात सारखीच कल्पना इंडिपेंडंटली होती, आणि भेट झाल्यावर ते कळाले आणि वय, प्रभाव, इ. मधील ज्येष्ठता पाहून शिवाजीने रामदासांचे शिष्यत्व स्वीकारले. पण प्रत्यक्ष स्वराज्यस्थापनेत रामदासांनी नेमकी कशा प्रकारची मदत केली, हे धूसरच आहे. फार फार तर असे म्हणता येईल, की रामदासी महंतांकरवी स्वराज्य कसे चांगले आहे वगैरे सांगून लष्करी रिक्रूटमेंटसाठी मदत केली असेल किंवा एखाददुसरा रामदासी गुप्तहेर म्हणून मदतीला दिला असेल. पदरी असलेल्या संघटनेचा असा कल्पक उपयोग करणे हे नक्कीच भारी काम आहे, पण हेदेखील तर्कच आहेत- त्यांना ठोस पुरावा नाही. मुख्य म्हणणे इतकेच आहे, की हे काँट्रिब्यूशन ओव्हरएस्टिमेट करू नये. बाकी काही नाही.

In reply to by बॅटमॅन

मालोजीराव 22/01/2013 - 19:00
चाफळच्या रामनवमीउत्सवाला रायगड अकौंटमधून फंडिंग सुरू केले
चाफळ चा मठ उभा करण्यास आमच्या पूर्वजांनी मदत केल्याचे आठवते ते पण आदिलशाही पैक्यातून ;) १६४८ साली...अंदाजाने हेच साल असावे. तेव्हापासून आतापर्यंत अजूनही विश्वस्त मंडळात आहे लोक

In reply to by मालोजीराव

बॅटमॅन 23/01/2013 - 00:40
वा सहीये हे, मस्तच :) आणि ही नोंद हेच दर्शवते की शिवाजी महाराजांच्या सुरुवातीच्या काळात त्यांचा समर्थ रामदासांशी संबंध आला नव्हता. रायगड अकौंटमधून फंडिंगची नोंद मला वाटते १६७० नंतरच्या एका पत्रात आहे. बहुतेक दिवाकर गोसाव्यांना उद्देशून लिहिले असावे- कन्फर्म करून पाहतो.

धमाल मुलगा 22/01/2013 - 17:11
रामदासस्वामींची पुरती ओळख पुन्हा एकदा करुन द्यावी लागावी अशी दयनीय परिस्थिती झालीये महाराष्ट्राची. त्या अनुशंगाने हे पाऊल स्तुत्यच! -(दासबोधातली मुर्खांची एकजात सगळी लक्षणं लागू पडणारा) धम्या

पैसा 22/01/2013 - 18:38
उत्तम माहिती. अभ्यासकांना अतिशय उपयुक्त अशी संस्थळाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद! चिंता करितो विश्वाची म्हणणार्‍या संन्याशाच्या लेखनाची माहिती एकत्र करून या मंडळींनी खरेच फार मोठे उपकार केले आहेत.
मला रामदास स्वामी आणि तुकाराम महाराज हे समकालीन संत खूप आवडतात. समाजातील कुप्रथा आणि उदासीनतेवर त्यांनी ज्या परखडपणाने काव्यरचना केली ती अफलातून. एकेक शब्द म्हणजे चाबूक... ते गुरु-बिरु वाद फोडणीला घालू नका रे भावांनो. आधीच समाजाची डोकी फिरलीत. त्याऐवजी गाथा आणि दासबोध वाचला तरी जन्माचं सार्थक होईल.

In reply to by योगप्रभू

बॅटमॅन 23/01/2013 - 02:16
सहमत आहे योगप्रभूजी. एक छोटीशी दुरुस्ती म्हणजे समाजाचे डोके फिरायला डोके असावे लागते, ते मुळातच नाहीये त्याला काय करणार म्हणा. असो.

In reply to by योगप्रभू

बॅटमॅन 23/01/2013 - 02:21
बाकी पुलंनी या दोघांची हसतहसत मजा केली होती ती कळण्याइतका प्रगल्भ आजचा समाज नाही राहिला. सगळे साले पराभूत मानसिकतेचे.

In reply to by बॅटमॅन

दासबोधाबद्दल पुल म्हणाले होते : मूर्खाची इतकी लक्षण वाचून माझ्यासारख्या सामान्य वाचकाला शहाणा कोण असा प्रश्न पडतो! दुसर्‍याबद्दल काय म्हणाले होते?

In reply to by संजय क्षीरसागर

अर्धवटराव 23/01/2013 - 11:07
हंद्याबिंद्यचं वाटोळ झाल्यावर तुकाराम "तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता" म्हणाला असेल, गंपू जन्मलाच मुळी परोपकार करण्यासाठी :) "नेहमीच्या गिर्‍हाईकाला बनवु नका मिस्टर" वाला हाच तो :) अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

बुद्धिमत्ता! `माझे अध्यात्मिक जीवन'मधे त्यांनी लिहीलय. दत्तात्रेयानं अकरा गुरू केल्याच ऐकून होतो पण आमच्या या अध्यात्मिक मित्रानं केलेले गुरू पाहून त्यानं देखील दोन्ही हाताची दाही बोटं तिन्ही तोंडात घातली असती... आणि शेवटचा फोटो बघून मला तोंडात बोट घालण्याची पाळी आली... त्या फोटोत मित्राची बायको त्याला नमस्कार करत होती!

In reply to by योगप्रभू

आदूबाळ 23/01/2013 - 02:22
ते गुरु-बिरु वाद फोडणीला घालू नका रे भावांनो. आधीच समाजाची डोकी फिरलीत. त्याऐवजी गाथा आणि दासबोध वाचला तरी जन्माचं सार्थक होईल.
हे एकदम पटलं. कोण कुणाचा गुरू होता किंवा नव्हता याची वायफळ चर्चा करण्यापेक्षा "अभ्यासोनि प्रकटावे"ची वृत्ती अंगी बाणवली तर बरं...

आजानुकर्ण 23/01/2013 - 02:29
वरती अनेकांनी स्तुती केल्याने मी संकेतस्थळावर जाण्याचा गेले तासभर प्रयत्न करत आहे मात्र मला खालील संदेश येत आहे. This site is temporarily unavailable. Hosted by Network Solutions.

In reply to by आजानुकर्ण

सिद्धार्थ ४ 23/01/2013 - 03:18
Same here

मीनल 23/01/2013 - 03:19
श्लोकांवरील डो. सुषमाताई वाटवे यांचे श्राव्य निरुपण ऐकता येत नाही. 404: Page not found This error is generated when there was no web page with the name you specified at the web site. हा मेसेज येतो.

प्रसाद गोडबोले 23/01/2013 - 13:44
हा धागा इतका शांत कसा ? इथे मिसळपाववर कोणी बी ग्रेडी कार्यकर्ते नाहीत ? आश्चर्य आहे !! हाच लेख "मायबोली" वर टाकुन बघा काय मजा होते ते =))

विटेकर 26/01/2013 - 18:35
गेल्या ४ दिवसांपासून सर्वर ला अदचण आल्याने संकेतस्थळ बंद आहे!तंत्रज्ञ काम करत आहेत लवकरच सुरु होईल. पूर्वी खरे म्हणजे असे कधी झाले नव्हते ..

विटेकर 26/01/2013 - 18:48
श्री समर्थ आणि श्री शिवाजी महाराज ही दोन स्वतंत्र व्यक्तिमत्वे होती आणि त्यांचा परस्पर संबध आला होता अथवा नाही यांमुळे त्यांच्या महानतेवर तसुभरही फरक पडत नाही .. विखारी वाद पेटवणा-यांना निमित्तच हवे असते. त्यामुळे संकेतस्थळाने आपले धोरण "वाद टाळणे" असे ठरविले आहे. व्यक्तिश: मला उभयतांबद्दल आदर आहे आणि राहणार आहे. अगर शिवा न होता , तो सुन्नत सब की होती | हे मला शत प्रतिशत मान्य आहे ! परस्परांचे कार्य एकमेकांस पूरक होते असेच माझे नम्र सांगणे आहे. आणि ते ही सगळ्यांना मान्य व्हावे असा माझा आग्रह नाही. कोणाला ते ओवर इस्तिमेटेड वाटले तरीही माझा त्याला प्रत्यवाय नाही. Foe me it is something like sacred Cow !

In reply to by विटेकर

राघव 27/01/2013 - 21:42
खरंय.. तुकाराम महाराज अन्‌ श्रीसमर्थ, या दोघांमुळे झालेली जनमानसातील जागृती ही शिवरायांच्या श्रीकार्याला अत्यंत पूरक होती. स्वराज्य स्थापनेच्या कार्यात त्यामुळे मदतच झाली. सर्वांगीण वैचारीक बदलासाठी त्याकाळात तर त्याची फारच गरज होती. अर्थात्‌ तिघांचेही कार्य निराळेच. मला वाटतं शिवरायांच्या कालखंडाचे दोन ढोबळपणे भाग केलेत तर सुरुवातीचा भाग म्हणजे तुकाराम महाराजांचा कार्यकाळ. श्रीसमर्थांचा अगोदरचा काळ हा भारतभ्रमणाचा असल्यामुळे त्यांचा शिवरायांशी आधी प्रत्यक्ष संपर्क झाला नसावा असे वाटते. ते श्रीसमर्थांचे शिवरायांना जे प्रसिद्ध पत्र आहे, ते किती सालचे आहे बघावे लागेल.. त्यातच तर ते म्हणतात "समाचार नाही घेतला".. त्यामुळे त्याआधी त्यांची प्रत्यक्ष भेट झाली नसावी असे वाटते.

विकास 28/01/2013 - 20:16
प्रकल्प आवडला. शुभेच्छा! आत्ता त्या संस्थळावर जाऊन देखील पाहीले. रँडमली काही ध्वनीफितींवर टिचक्या मारल्या तर व्यवस्थित ऐकता आल्या.