Skip to main content

निरोपाचा क्षण

लेखक नाना चेंगट यांनी सोमवार, 31/12/2012 11:33 या दिवशी प्रकाशित केले.
जपून जा. पोचल्यावर पत्र पाठव, गाडीतून उगाच उतरु नकोस. वेळच्या वेळी जेवत जा. जीवाला घोर लागेल असा वागू नकोस. अभ्यास नीट करत जा. खुशाली कळवत जा. रात्री लवकर झोपत जा. तुला भान रहात नाही. वाचत तर वाचत बसतोस. सकाळी लवकर उठत जा. अंघोळ नीट करत जा. दोन मिन्टात पाणी अंगावर घेऊन बाहेर पडू नको. आईच्या सुचनांचा भडीमार चालू होता. आणि मी हसत हसत अग हो आई किती काळजी करतेस. मी आता मोठा झालो आहे. आई म्हणायची असू दे माझ्यासाठी लहानच आहेस. पहिल्यांदा इतक्या लांब चालला आहेस. काळजी वाटते. आईच्या डोळ्यात पाणी तरारले होते आणि मी हसत होतो. हसु नको. जे सांगितलं ते नीट लक्षात ठेव. हो हो म्हणत आईला म्हटले गाडी सुटेल तु कशाला थांबतेस जा आता घरी. नाही गाडी गेल्यावर जाईन असे म्हणून आई थांबूनच राहिली. डोळ्यांच्या कडा ओल्या होत्या. मला हसू आवरत नव्हते. गाडी सुटली. वळुन पाहिले आई दिसेनाशी झाली. कॉलेजच्या गावी पोचेपर्यंत अधून मधून आईचा आविर्भाव आठवून हसू येत होतं. आज पंचवीस तीस वर्षांनी ते आठवून डोळ्यात पाणी येतं, ते पुसायला आई नाही. लहानपणी घरी पाहुणे आले आणि ते जायला निघाले की मी रडून आकांत करायचो. पाहुणे आले की मस्त वाटायचे. खेळायला मिळायचे. मला ते बाहेर घेऊन जायचे. खाऊ द्यायचे. परत त्यांची जाण्याची आवराआवर सुरु झाली की मी बावरुन जायचो. काहीतरी मोठे गमावत असल्याची जाणीव व्हायची. पोटात खड्डा पडायचा. आणि डोळे ओले होऊन जायचे. पण मी गावी गेलो कुणाकडे की खुश असायचो. प्रवास मला आवडायचा. खिडकीतून बाहेर पहायला मजा वाटायची. परत तिकडून निघतांना सुद्धा मी खुश असायचो. कारण परत प्रवास. मी जसा कुणी प्रवासाला निघाले की रडतो तसे मी प्रवासाला निघाल्यावर कुणी रडत नाही हे समजेपर्यंत माझे रडण्याचे दिवस संपले होते. प्रवासाला निघालेला माणुस परत कधीतरी येईलच हे समजत होते. त्यामुळे माझे कुणी प्रवासाला निघाला की रडू येणे कमी कमी होत संपून गेले. ते इतके की नंतर कधीतरी आई परत न येण्याच्या प्रवासाला गेली तरी डोळ्यात पाणी आले नव्हते. कोडगा आहे पहा. आई गेली तरी काही वाटत नाही त्याला. पुटपुटणारे उद्गार कानावर यायचे पण मी गेल्यावर अजिबात रडायचे नाही. हातपाय गाळायचे नाही. स्वतःची काळजी घ्यायची. दुसर्‍यावर बोज बनायचं नाही. वेळच्यावेळी खात पित जायचं. कुणाच्या अध्यात मध्यात पडायचं नाही. अन मदतीला नाही म्हणायचं नाही. आई बजावून बजावून सांगायची. अग आई हो गं अजिबात काळजी करु नको. आणि तुला काही धाड भरली नाही. अजुन पन्नास वर्ष काही होत नाही तुला. हो पन्नास वर्ष असं तुझ्या हातुन सगळं करुन घेत मजेत जगते, आई हसून म्हणाली. मग काय बिघडलं लहानपणी मी त्रास दिला ना तुला.. त्याची भरपाई नको का व्हायला. अशी का भरपाई होत असते आई म्हणाली. झोपवून देऊ का पाठ भरली ना? हो झोपते आता. आईला अलगद मागची उशी काढून झोपवले. अंगावर पांघरुण घातले. आईचा एक खोल निश्वास ऐकू आला. अन मग सगळं शांत. डोळ्यात पाणी दाटून आलं ते मागे रेटता रेटता आयुष्य १० वर्षांनी सरुन गेलं. इंजीनियरींगची परिक्षा झाली सुट्टीत घरी आलो होतो. मध्यमवर्गीय कुटुंबातील संरक्षित वातावरणात वाढलेल्या मुलाच्या जशा नोकरीच्या अपेक्षा असतात त्याच अपेक्षा ठेवत सुटीत एका ठिकाणी काम करु लागलो. आजोबांनी टायपिंग शिकून घे असा त्यांच्या दृष्टीने मोलाचा सल्ला दिला. मी हो म्हटलो पण सल्ला मानला नाही. त्यांच्या काळातुन ते बाहेर आलेले नव्हते. त्यांचा दोष नव्हता. मी सुद्धा जेव्हा आज विचार करतो तेव्हा मी माझ्या काळातुन बाहेर पडू शकत नाही हे प्रखर वास्तव बोचत असतेच. नव्या पिढीचे फेसबुक, गेम्स, मोबाईल मला भावत नाहीत. फोनवर तासंतास गप्पा मारण्यापेक्षा समोरासमोर १० मिनिटे मित्र भेटतात ते जास्त जवळचे वाटते. काळाचा दोष. मी ज्याकाळात तरुण होतो त्या काळात फोन असणे श्रीमंती होती. तातडीचा निरोप म्हणजे तार होती. मध्यमवर्गीय कुटुंबातील मोठे सदस्य एकमेकांना पत्र लिहून हे पत्र म्हणजे तार समजून ये अशी विनवणी करायचे. तारेचा खर्च अफाट वाटायचा. कधीतरी अमुक तारखेला निकाल आहे असं कळालं आणि मी निकाल काय लागला आहे हे पहायला गेलो. निकाल अपेक्षेपेक्षा सुखद होता. लगेच घरी परतलो. सगळे वाट पहातच होते. दारातुनच मी पास झालो असे सांगितले, अन सगळे घर आनंदाने भरुन गेले. आईच्या डोळ्यात पाणी आले. वडीलांनी हलकेच पाठ थोपटली. पण त्यांना बोलवेनाच, अन थोडंस पाणी डोळ्यात आलं. आजी आजोबा सुद्धा डोळ्यात पाणी आलेलं पुसत होते. त्यादिवशी कळलं की आनंदाचे सुद्धा अश्रु असतात. निकालाची बातमी जसजशी पसरली तसतसं अनेकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया मानवी स्वभावाचे नमुने देऊन गेल्या. खराखुरा आनंद कुणाकुणाला झाला याची खुणगाठ आयुष्यभराची शिदोरी म्हणून उपयोगी पडली. त्यानंतर दु:खात अन आनंदात डोळ्यात पाणी आणुन सहभागी होणारे एक एक कमी होत गेले. एकेकाने निरोप घेतला. आपल्यापेक्षा वयाने मोठे असलेले जातात तेव्हा आभाळ कोसळतं पण जेव्हा वयाने लहान असलेले जातात तेव्हा पायाखालचा आधारच निसटतो. त्रिशंकुप्रमाणे अधांतरी लटकत रहाणं नशिबी येतं. अधांतरी लटकलं की कुठे जावे ही दिशा सुद्धा कळत नाही. आणि मग केवळ सेकंद, मिनिट, तास, दिवस, महिना, वर्ष मोजणं हाती असतं. २०१२ संपलं. २०१३ चालू होईल.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 10151
प्रतिक्रिया 66

प्रतिक्रिया

सुंदर मुक्तक. आवडले.

त्यानंतर दु:खात अन आनंदात डोळ्यात पाणी आणुन सहभागी होणारे एक एक कमी होत गेले. एकेकाने निरोप घेतला. आपल्यापेक्षा वयाने मोठे असलेले जातात तेव्हा आभाळ कोसळतं पण जेव्हा वयाने लहान असलेले जातात तेव्हा पायाखालचा आधारच निसटतो. त्रिशंकुप्रमाणे अधांतरी लटकत रहाणं नशिबी येतं. अधांतरी लटकलं की कुठे जावे ही दिशा सुद्धा कळत नाही. आणि मग केवळ सेकंद, मिनिट, तास, दिवस, महिना, वर्ष मोजणं हाती असतं.
तंतोतंत!!!!!

मग केवळ सेकंद, मिनिट, तास, दिवस, महिना, वर्ष मोजणं हाती असतं.
तुम्हाला २०१३ साठी शुभेच्छा देणं अवघड करून ठेवलंत. असो. तरीही माझ्यातर्फे शुभेच्छाच!

निरोपाचा हळवा क्षण नेहमीच अस्वस्थ करुन जातो. या क्षणाचं नेमकं चित्र उभे केले. आवडले.

एकदम भावस्पर्शी मुक्तक! नाना तुम्हाला सलाम.

In reply to by अविकुमार

+१

- नानाला नववर्षाच्या शुभेच्छा. - छोटा डॉन

हे असं डोळ्यातलं पाणी दिसू नये म्हणूनच बहुधा जुने वर्ष सरताना जल्लोष करत असावेत लोक..

सुरेख रे !

खरंच अतिशय छान! तुमच्या लिखानाणे अनेक आठवणीनां उजाळा मिळाला.

खूप छान लिहिलय. आवडलं

खरंय. या वर्षात निरोपाचा हात हलवून निघून गेलेल्या अनेकांच्या आठवणी आज येत आहेत. अख्खं वर्ष समोर घेण्यापेक्षा अशावेळी 'one day at a time' चा फार आधार वाटतो..

सुरेख आणि हळवं लिखाण! वाचतांना कुठल्याश्या क्षणाला डोळ्यात पाणे तरळलं होतं.

सुरेख नाना! डोळ्यात पाणी आणुन तुमची काळजी करणारं, निघताना निरोप देणारं, अन अगदी सुखाच्या क्षणीही तुमच्या आनंदात सहभागी होणारं कुणी लाभलं यातच तुमच भाग्य! आठवायला काही हळव आहे, सारच कटु नाही हे ही नसे थोडके.

वडिलांनी शेवटचा श्वास घेतला तेंव्हा ते इस्पितळाच्या अतिदक्षता विभागात होते आणि मी बाहेर.त्यांनी ह्या जगाचा निरोप घेतल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मन सुन्न झालं.बालपणापासूनचे त्यांच्या सोबत घालविलेले सर्व क्षण एकदम डोळ्यांसमोरून उलगडून गेले. व्यक्तिगत आयुष्यात झालेली पोकळी भरून येत नाही. आई गेली तेंव्हा मी तिच्या जवळच होतो. अगदी दोन फुटांवरून तिचा शेवटचा श्वास पाहिला.मनाने हादरलो. पोरका झालो. नाना, आज तुमच्या ह्या मुक्तकाने ते दोन्ही क्षण मनांत आणि डोळ्यांत तरळले.

तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. असं लिहून माझ्याही आठवणी जाग्या केल्यात. लहानपणी भावनाप्रधान असलेली व्यक्ती, मधल्या वयांत निबर होते आणि वय वाढल्यावर परत हळवी होते. माझं असच झालंय, बहुतेकांचं होत असावं!

आणि मी का वाचलं???? आपल्यांचा निरोप घेता येत नाही असा. फक्त ते सध्या जवळ नाहीत एवढंच जाणवतं.

सर्वांना एकच शुभेच्छा: येत्या नववर्षात दु:खात अन आनंदात डोळ्यात पाणी आणुन सहभागी होणारे आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तिमत्व जाणवून घेण्याची कुवत अंगी असो!

सुंदर ... या व्यतिरीक्त काहीच म्हणता येणार नाही! तुम्हा सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा!

नाना, जबरदस्त सुंदर.. एकदम टचिंग..

मागच्या वर्षी माझी आई आम्हाला सोडून गेली आणि नंतर उमजले कि आई साठी खूप काही करायचे राहून गेले. सौदी अराबियाच्या ( Exit re-entry visa) कठीण कायदे पालन करत एक दिवस उशिरा पोहचलो आणि अंत्यविधीला मुकलो. फार वाईट वाटले. तो दिवस आठवला.

खूप मस्त लिहिलंय. वाचताना आतून काहीतरी तुटतंय असं जाणवलं.. :(

हळव केलेस अगदी लिखाणातून मला एकदम एका गाण्याच्या ओळी आठवल्या मेला ह्या भिकार सिनेमातून मला आवडलेली गोष्ट म्हणजे त्यातले शीर्षक गीत ह्यात दरवषी भरणारा मेला , जत्रा म्हणजे भूतलावर आपले आपल्या भोवतालच्या माणसांची जत्रा असते. जीवन मृत्यूचे चक्र असते. आणि मग त्या गाण्यातील ओळ मेला दिलो का आता हे , ऐक बार , आके चला जाता हे आते हे मुसाफिर , जाते हे मुसाफिर , जाना हि हे सबको तो क्यो आते हे मुसाफीर

आपण ज्याच्या सानिध्यात असू त्याला फक्त आनंद्च देऊया. लक्षात राहू दे फक्त आपला हसरा चेहरा. चटका लावणारे क्षण प्रत्येकाच्याच आयुष्यात असतात, आपल्यानंतर एवढेच ठेवू शकतो आपण मागे!!

In reply to by अनन्न्या

धन्यवाद अनन्न्या, इतका हळवा करणारा लेख वाचून 'आवडला' की काय म्हणावे कळत नव्हते, तुम्ही नेमके मांडलेत... सद्ध्या घरापासून लांब असल्याने जास्तच हळवा होतोय.

मागच्या वर्षी मित्रांना निरोप देतानाचे क्षण आठवले....

आई गेली तो दिवस आठवला!! :( तेव्हा पसुन आज पर्यान्त आत्ल्या आत खुप त्रास होतोय हे वच्ल्या नंतर तर डोल्यात पानि आलं. ....

सुरेख उतरलय!!आवडलं...!

अनेकांना निरोप दिला...अनेकांनी निरोप घेतला...सगळं डोळ्यासमोर उभं राहिलं !

धीस इज वॉट नाना ईज !

__/\___ नाना ... असे निरोपाचे क्षण नको वाटतात..पण इला़ज नाही आहे . सुरेख लिहिलंय

नानांनी हे लिहिलच नाही, मी ते हापिसात ( आणि नंतर घरी आल्यावर )वाचलं नाही, मला आईबाबांची अज्जाबात आठवण आली नाही आणि मी रडले तरी कुठे?

खूप छान आणी भावस्पर्शि असे लिखाण.....

साधेच शब्द पण सच्चा लिहिलयस, संदीपची 'हे भलते अवघड असते..' आठवली..

अप्रतिम... फारच थोड्यावेळा डोळ्यात पाणी येत असतं. त्यातला तुमचा हा लेख आहे. गेली ती माणसं आणि ते क्षण..पण ते क्षण आयुष्यभर हृदयात जपुन ठेवावे असेच...त्यावर पुढील आयुष्य नक्कीच तरुन जाता येईल... - वाटाड्या...

केवळ अप्रतिम..... वडिल आणी आई एक वर्षाच्या अन्तराने गेले ते दिवस डोळ्यासमोर उभे राहिले.... खरोखर जवळच्या माणसान्चा निरोपाचा क्षण कधी येऊ नये असे वाटते :(