Skip to main content

अपने होने पे मुझको यकीन आ गया...

लेखक मोदक यांनी बुधवार, 12/12/2012 16:37 या दिवशी प्रकाशित केले.
********************************************************************************* सदरचा लेख मिपावर प्रकाशित करण्यासाठी परवानगी दिल्याबद्दल सुचेता कडेठाणकर यांचे खास आभार. "महा अनुभव" या मासिकामधून साभार. ********************************************************************************* चीनच्याही पलिकडे आहे मंगोलिया. या देशातल्या गोबीच्या वैराण वाळवंटातून तब्बल सोळाशे किलोमीटर चालून आलीय सुचेता कडेठाणकर. सलग ५२ दिवस चाललेल्या या कष्टप्रद पायपिटीतून ती तावून सुलाखून निघालीय. गोबी हे आशियातलं सर्वाधिक लांबीचं वाळवंट. ते अंतर पायी पार करणं म्हणजे भल्याभल्या गिर्यारोहकांनाही आव्हान वाटतं. हे आव्हान जगभरातल्या अशा इतर १२ आव्हानप्रेमींसोबत सुचेता कडेठाणकरनेही स्वीकारलं. २५ मे २०११ ते १५ जुलै २०११ अशी तब्बल ५२ दिवसांची खडतर कसोटी पाहणारी ही मोहीम फत्ते करणा-या सहाजणांमध्ये सुचेताही होती. गोबी पार करणारी ती पहिली भारतीय आहे. सुचेता एका आयटी कंपनीत टेक्निकल रायटर म्हणून काम करते. गिर्यारोहण आणि विशेषत: स्वत:च्या क्षमता जोखण्याची संधी देणा-या मोहिमा हे तिचं पॅशन आहे. या मोहिमेत तिला स्वत:विषयी जे शोध लागत गेले त्याबद्दल तिने लिहिलंय इथे. ********************************************************************************* आंखें मूंद किनारे बैठो, मन के रखो बंद किवाड | इंशाजी लो धागा लो, लब सिलो खामोश रहो| अशा शांततेचा अनुभव आपण किती वेळा घेतो? रोजच्या जगण्यामध्ये तर नक्कीच नाही. अगदी ठरवून मुद्दाम शांत-रम्य ठिकाणी गेल्यावर आपण अनुभवतो तीदेखील खरं म्हणजे शांतता नसतेच. शांत-रम्य ठिकाणी जवळच्या व्यक्तीला बरोबर घेऊन गेल्यावर शांततेत तरंग उठल्याशिवाय राहतील कसे? अगदी आपण एकटे गेलो तरी आपल्या आत चाललेली अनागोंदी, गडबड आणि उसळलेला विचारांचा डोंब आपल्याला शांततेचा सविस्तर अनुभव घेऊच देत नाही. वर सांगितलेल्या दोह्यामध्ये लिहिल्याप्रमाणे ‘मन के रखो बंद किवाड’, म्हणजे मनाची दारं बंद करून टाकायची, बाहेरचं काही आत येऊच द्यायचं नाही, हे अशक्यप्राय वाटतं... किंवा ‘लब सिलो खामोश रहो’, ही शक्यता तर फारच दूरची. विचार करताना वाटतं, सुपरफास्ट प्रगतीची घाई झालेल्या कोणत्याही देशात, शहरात, खेड्यात अशी शांतता अनुभवायला मिळणं शक्यच नाही. मी मात्र गोबीच्या वाळवंटात शांतता तिच्या अगदी नैसर्गिक स्वरूपात अनुभवली. मंगोलियामधलं गोबीचं वाळवंट आणि त्या वाळवंटामध्ये राहणारे हाताच्या बोटांवर मोजता येतील इतके भटके लोक. आवाज निर्माण करणारी कोणतीच यंत्रं त्यांच्याकडे नाहीत, त्यामुळे कोणताच कृत्रिम आवाज त्यांच्या ओळखीचा नाही. अथांग वाळवंटाच्या मध्यात दिसणारं या लोकांचं एखादंच घर. त्या घरामध्ये राहत असणारं एकच कुटुंब- सात-आठ लोकांचं. हे लोक आणि त्यांच्या शेळ्या, मेंढ्या, घोडे आणि उंट असा त्यांचा तांडा. शेजार कमीत कमी तीनशे किलोमीटर लांब. अशा स्थितीत आवाज होणार तरी कशाचा आणि किती? एकमेकांशी बोललं तरीसुद्धा त्या आवाजाचा त्या वाळूच्या पसार्याशमध्ये इवलासा तरंग उठणार आणि विरून जाणार... वाळवंटातली सुंदर थंड रात्र, वेगाने वाहणा-या वा-यांमुळे अधिकच जाणवणारी थंडी, स्वच्छ निळं आकाश, त्या निरभ्रतेमध्ये अगदी जवळ दिसणारा मोठ्ठा चंद्र, चंद्राच्या प्रकाशामध्ये उठून दिसणारे आमचे हिरवे तंबू... अगदी चंद्रमौळी झोपड्यांची आठवण करून देणारे...आवाज म्हणावा असं काहीच नाही. एका सरळ रेषेत बांधून ठेवलेल्या आमच्या उंटांपैकी कोणी शिंकलाच तर त्याच्या शिंकेचा आवाजसुद्धा गडगडाटासारखा भासणार. रात्री तंबूमध्ये जमिनीला कान लावून स्लीपिंग बॅगमध्ये झोपल्यावर तंबूच्या बाहेर वाळूवरून चालणार्याज एखाद्या सापाची किंवा विंचवाची सळसळसुद्धा थ्री-डी सिनेमासारखी अंगावर येणार... शांततेची त्या वेळी मला भीती वाटली तशी मला कधी वाटेल असं वाटलं नव्हतं. मोहिमेला सुरुवात झाली त्या वेळी नऊ वेगवेगळ्या देशांमधून आलेले आम्ही तेरा जण होतो. नवीन ओळखी होत होत्या. त्यामुळे सुरुवातीच्या दिवसांमध्ये भरपूर गप्पा होत. दिवसभर चालताना, संध्याकाळी कॅम्प केल्यावर ते अगदी रात्री झोपेपर्यंत गप्पा रंगत. हळूहळू मोहिमेची तीव्रता वाढत गेली. उन्हाचा तडाखा वाढत गेला. प्रत्येकाने आपापला ताल पकडून चालायला सुरुवात केली. प्रत्येकाचा वेग वेगळा, काना-मनात वाजत असलेलं गाणं वेगळं, त्याच्या तालाशी पावलांचा मेळ घालत पकडलेली लय वेगळी. आपसात बोलणं हळूहळू कमी होऊ लागलं. आठ तासांच्या चालण्यामध्ये मुश्किलीने चार-पाच वाक्यं बोलली जात. कॅम्प केल्यावरदेखील रात्रीचं जेवण होईपर्यंत सगळेजण तंबूच्या बाहेर येऊन बसत, पण गप्पा नाहीच. प्रत्येकाकडे आपापलं साधन... स्वतःशीच संवाद साधण्यासाठी. कोणाकडे लिहायला डायरी, कोणाकडे वाचायला पुस्तक, कोणाकडे ऐकायला संगीत, कोणाची नुसतीच शून्यामध्ये लागलेली तंद्री, कोणी उंटांबरोबर न बोलता रमलेला, तर कोणी स्वयंपाकघराच्या तंबूमध्ये आमची (केवळ कझाक भाषा येणारी) कुक यंका हिच्याबरोबर स्वयंपाकात रमलेला. विचित्र गोष्ट अशी, की कुणाला एकमेकांशी बोलायची गरजही वाटायची नाही. माणूस हा समाजप्रिय प्राणी, त्याला माणसांची गरज असते वगैरे वगैरे म्हणतात. मग त्या इतक्या खडतर परिस्थितीमध्ये, शरीराला प्रचंड थकवल्यावरसुद्धा आम्हाला एकमेकांशी बोलायची गरज का बरं वाटत नव्हती? कदाचित आम्ही सगळे एक टीम म्हणून एकत्र होतो, तरीही सगळेजण एक-एकटेच होते. शरीराला सर्वाधिक वेदना होत असताना माणसाला माणसाच्या संगतीची ओढ का वाटत नाही? हा अनुभव खूप विचित्र आणि धक्कादायक होता. वैयक्तिक माझ्याबद्दल सांगायचं, तर मलाही एकटीलाच राहायला आवडू लागलं होतं. दिवसभर ट्रेकिंग करताना सगळे एकत्र असत, एकत्र चालत. चालताना एकमेकांमध्ये कधी कधी एक-दोन किलोमीटरचंसुद्धा अंतर असे. कोणी दोघंजण अगदी एकत्र म्हणावं असे शेजारी शेजारी चालत असले तरी त्यांच्यामध्ये संवाद कधी तरीच व्हायचा. आता विचार करताना वाटतं, किती तरी दिवस मी एकही शब्द बोलले नसेन. विपश्यनेचा भाग म्हणून लोकांना असं मौनव्रत पाळावं लागतं हे ऐकलं होतं, पण मौनाचा हा अनुभव मी माझ्या नकळत घेत होते. स्वतःशीच होणारा संवाद वाढत होता. वयाच्या ३२ वर्षांपर्यंत कित्येक अनुभव मी घेतले असतील. पण आता वाटतं, त्या कोणत्याच अनुभवाची ख-या अर्थाने अनुभूती मला झाली नव्हती. खरं म्हणजे जोवर तुम्ही असे एकटेच संपूर्णपणे निसर्गाच्या अधीन जात नाही तोवर एखादा अनुभव घेणं म्हणजे नेमकं काय असतं हेच आपल्याला कळत नाही. सुख-दुःखाचे अनेक प्रसंग प‘त्येकावर गुदरतात, पण रोजचं जगताना लहानपणापासून आपण कायम स्वतःला तडजोडच करायला शिकवत असतो. दुःख झालं तर ते झटकून मनाची उभारी घेऊन पुढे जायला आपल्याला शिकवलं जातं. जवळच्या व्यक्तीचं निधन असो, परीक्षेत आलेलं अपयश असो, प्रेमभंग असो किंवा अजून काही. जो माणूस या सर्व दुःखाच्या प्रसंगांवर मात करून उभा राहतो तो आपल्या ठायी यशस्वी असतो. याच्या उलट, आनंदाच्या प्रसंगातही आपली विवेकबुद्धी आणि समतोल ढळू न देणारा मनुष्य आपल्या लेखी मोठा ठरतो. हे सगळं करताना असं वाटतं, की आपण हे सुख-दुःखाचे कोणतेही प्रसंग मुळात अगदी संपूर्ण असे अनुभवतच नाही. त्या प्रसंगांमधून आपल्याला मिळणारी अनुभूती आपल्यापर्यंत पोचण्याआधीच, त्या अनुभूतीची चाहूल लागताच आपण आपल्या मनाला शहाणपणाची शिकवण देऊ लागतो. मग तो अनुभव आपल्यापर्यंत पोचताना आपण त्याला सामोरे जायला पूर्ण तयार असतो. त्या अनुभवामधून मिळू शकणा-या सर्व भावनिक चढ-उतारांची कल्पना आपण खूप आधीच करून ठेवलेली असते. त्यामुळे आपल्यापर्यंत पोचणारा अनुभव पांचट झालेला असतो... तिखट, गोड, कडू, आंबट अशी कोणतीच चव नसणारा. आडाखे, विश्लेषण या सगळ्या आपण आपल्याला लावून घेतलेल्या सवयींमुळे एखाद्या गोष्टीचा मूळ गाभा बाजूला राहतो आणि आपल्याजवळ उरतात ते आपण त्या गोष्टीबद्दल बांधलेले आडाखे. माझ्या वडिलांचं निधन होऊन आता अकरा वर्षं होऊन गेली, पण माझ्या मते ते गेल्याचं दुःख मी अकरा वर्षांनतर गोबीच्या वाळवंटात एकटी असताना ख-या अर्थानं केलं. जगासमोर दुःख करण्याची लाज वाटत होती, हे याचं कारण नव्हे, तर बाबा गेले आणि ते आता माझ्या आयुष्यात माझ्याबरोबर नसणार, हे सत्य तोवर मला पूर्णपणे उमगलंच नव्हतं. हे सत्य मी आजवर रिचवलंच नव्हतं. दीर्घकालीन आजारामुळे बाबा गेले. त्यांच्या आजाराच्या तीव्रतेमुळे हे केव्हा तरी होणार याची मानसिक तयारी होती. कदाचित त्यामुळेच, ते गणेश चतुर्थीला गेले आणि त्याच्या दुस-याच दिवशी मी या सत्याशी जुळवून घेतलेलं होतं. माझी लहान बहीण तर तेव्हा दुःख करण्याच्यादेखील वयात नव्हती. ती आठ वर्षांची होती. तिच्यासाठी म्हणून अगदी नकळत, शक्य तितकं नॉर्मल राहण्याची आणि वागण्याची सवय मी लावून घेतली. आईलादेखील या दुःखामधून शक्य तितकं लवकर बाहेर येता यावं, म्हणून पुन्हा ऑफिसला जायला लावलं. आणि एकूणच महिन्याच्या आतच सगळं गाडं पुन्हा एकदा रुळावर आणलं. कालपर्यंत बाबा माझ्याबरोबर होते, आज नाहीत, इतकं मी ते सोपं करून टाकलं. गेल्या अकरा वर्षांत कित्येक कारणांनी कित्येक वेळा त्यांची आठवण आली असेल, पण मी स्वतःला त्या आठवणींमध्ये कधी रमूच दिलं नाही. कारण एकच.. यशस्वी व्हायचं असेल तर आपण खंबीर, कणखर वगैरे वगैरे राहायला हवं, ही मिळालेली शिकवण. पण वाळवंटामध्ये दिवसच्या दिवस एक अवाक्षरही न उच्चारता घालवल्यावर मनात गर्दी होत असे, ती याच सगळ्या अपु-या राहिलेल्या अनुभवांची. बाबांच्या जाण्याची पूर्ण जाणीव माझ्या मना-शरीरातल्या प्रत्येक कणाला झाली, ती या वाळवंटामध्ये. या वाळवंटामध्येच मी अकरा वर्षांत प्रथमच त्यांच्या जाण्याचं दुःख केलं. अगदी रडून नाही; पण ती जाणीव ज्या दिवशी मला झाली त्या दिवशी जणू आत्ताच बाबा सोडून गेल्याचं दुःख मला झालं. असे कित्येक अपुरे अनुभवलेले क्षण मी वाळवंटामध्ये पुन्हा एकदा पूर्णपणे अनुभवून घेतले. मला हा असा अनुभव वाळवंटामध्येच का आला असावा? विचार केल्यावर लक्षात येतं, की मुळात मी माझा स्वतःचाच अनुभव प्रथम घेत होते. खूप खूप सोपं उदाहरण देऊन सांगता येईल. परत आल्यावर मी ‘ज़िंदगी ना मिलेगी दोबारा’ हा चित्रपट बघितला. पैशांच्या मागे धावणारा हृतिक रोशन डीप सी डायव्हिंगचा अनुभव घेतो आणि आनंदाने त्याच्या डोळ्यांमधून अश्रू येतात. चित्रपटमधल्या या प्रसंगाशी मी स्वतःला खूप रिलेट करू शकले. श्वास घेणं आणि चालणं या दोन गोष्टी आपण रोजच्या जगण्यामध्ये प्रतिक्षिप्त क्रियेसारख्या करत असतो- त्यांचा कोणताच विचार न करता. पण आपला चालत असणारा श्वास, त्याची एकसारखी लय, आपल्या श्वासाच्या तालाबरोबर लयीत पडणारी आपली पावलं, पावलांचा वेग वाढवला की लगेच वाढणारी श्वासाची गती... हे सगळं सगळं किती रम्य आहे! आपल्या प्रत्येक श्वासाचा अनुभव आपण जेव्हा घेतो तेव्हा खरं तर आपण आपल्याच असण्याचा अनुभव घेत असतो. माझ्यासाठी हा अनुभव भारावून टाकणारा होता, आणि म्हणूनच कदाचित शरीराला प्रचंड कष्ट देऊनसुद्धा मी शीळ घालत, आनंदात त्या रखरखीत उन्हात १६३६ किलोमीटर चालू शकले. जावेद अख्तर यांचे शब्द उधार घेऊन मनाची ही अवस्था नेमकी सांगता येईल.. पिघले नीलमसा बहता हुआ यह समा नीली नीलीसी खामोशियॉं न कहीं हैं जमीं न कहीं आसमां सरसराती हुई टहनियॉं, पत्तियॉं कह रही हैं कि बस एक तुम हो यहॉं सिर्फ र्मैं हूँ, मेरी सॉंसे हैं और मेरी धडकनें ऐसी गहराइयॉं, ऐसी तनहाइयॉं और मैं, सिर्फ मैं अपने होनेपे मुझको यकीन आ गया... वाळूच्या अथांग पसरलेल्या त्या समुद्रापुढे, त्या भव्यतेपुढे आपलं अस्तित्व आणि आपल्या क्षुद्रतेची जाणीव होणं ही फार दूरची गोष्ट राहिली. त्याआधी मुळात आपल्या असण्याचीच जाणीव होणं आणि आपल्या शारीरिक आणि मानसिक रंध्रांना श्वास घेताना अनुभवणं, हा अनुभव अवर्णनीय आहे. मोहिमेतून परत आल्यावर माझ्या मनामध्ये भरून राहिलेली कोणती एक आठवण असेल, तर ती ही. शरीराला होणा-या वेदनांचं आपण एरवी स्तोम माजवून ठेवतो. गोबी मोहिमेच्या दरम्यान शरीराला होणा-या या वेदना शरीराचा एक भाग बनल्या होत्या. वेदना आणि शरीर हे जणू भिन्न नाहीच, असं वाटायचं. दररोज वाळवंटातल्या त्या उष्णतेमध्ये तीस-पस्तीस किलोमीटरचं अंतर चालल्यावर पायांना येणारे फोड, नखांना होणा-या जखमा या क्षुल्लक वाटू लागल्या. मोहिमेच्या साधारण विसाव्या दिवशी मला आमच्यातल्याच एका उंटाने जोरदार लाथ मारली. त्या लाथेमुळे माझ्या पायाला थोडंफार लागलं, पण खांद्याला जोरदार दुखापत झाली. त्या वेळी माझा खांदा खरं म्हणजे निखळला होता.(ही गोष्ट मला मोहिमेतून परतल्यावर समजली.) तेव्हा मोहिमेचे पुढचे तीसहून अधिक दिवस शिल्लक होते. खांद्यामध्ये होणा-या वेदना भयानक होत्या. त्यामुळे दररोज सॅक पाठीवर घेण्यासाठी नवनवीन युक्त्या मी शोधून काढीत असे. अर्थात, शेवटपर्यंत मला सॅक विनावेदना पाठीवर घेण्याची पद्धत सापडलीच नाही. पण या खांद्याच्या दुखण्यामधून मला आपल्या शरीराच्या वेदनेबद्दलचा एक शोध लागला. आपलं शरीर हे मुळात वेदनांचे वेगवेगळे स्रोत निर्माण करण्यात तरबेज असतं. खरं म्हणजे विसाव्या दिवसानंतर या संपूर्ण मोहिमेमध्ये माझा सर्वाधिक वेदनादायक भाग माझा खांदा असायला हवा होता. पण कित्येक दिवस असे जात असत की खांद्याची वेदना मला जाणवतच नसे. डाव्या पायाची करंगळी किंवा उजवा घोटा एखाद्या दिवशी कमालीचा दुखू लागे आणि शरीर वेदनेचा आणखी एक स्रोत निर्माण करी. मग माझं लक्ष जुन्या वेदनेला विसरून या नवीन स्रोताकडे वळे. शरीर दिवसागणिक असे दुःखाचे, वेदनेचे स्रोत निर्माण करत जाई, पण त्या सर्वांवरून लक्ष काढून घेतल्यावर आपल्याला त्या वेदनेचा विसर पडतो, मनाला त्या वेदनेची सवय होऊ लागते आणि मग शरीरही त्रास देत नाही, असं माझ्या लक्षात आलं आहे. कित्येक वेळा मी दिवस संपवून जेवण झाल्यावर माझ्या स्लीपिंग बॅगमध्ये शिरत असे, तेव्हा दिवसभरात मी चाललेलं प्रत्येक पाऊल मला आठवत असे. त्या पावलाखालचा रस्ता तसाच्या तसा माझ्या समोर जिवंत उभा राहत असे. काल दुपारच्या जेवणात आपण कोणती भाजी खाल्ली हेही जेव्हा इकडे आल्यावर आठवेनासं होतं, तेव्हा वाळवंटात आलेला हा अनुभव मोठा विचित्र वाटतो. प्रत्येक क्षण त्यामधल्या छोट्या छोट्या कंगो-यांसकट जगणं म्हणजे काय हे मला वाळवंटामध्ये उमगलं. दिवसा खूप ऊन आणि रात्री खूप थंडी, आजूबाजूला पसरलेली फक्त रेताड, नापीक जमीन- एकही हिरवा कोंब नसलेली. क्षितिजाच्या विस्तारापर्यंत स्वच्छ दिसणारं दृश्य- एकसुरी. अशा परिस्थितीमध्ये जगभराच्या काना-कोप-यां मधून आलेल्या अनोळखी लोकांबरोबर ५२ दिवस चालताना स्वतःच्या अनेक क्षमतांचा कस लागला, अनेक धडे मिळाले. लहानपणापासून शिकलेल्या काही शिकवणींची उजळणी झाली. मुळात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. आपल्यामध्ये असणा-या सर्व क्षमता अजमावून बघण्याची ही संधी आपण स्वतःला किती वेळा देतो? संयम आणि संस्कारांच्या आपण आखून घेतलेल्या मर्यादांमध्ये राहण्याच्या अट्टहासामुळे मर्यादेपलीकडे भासणा-या काही गोष्टी करण्यासाठी आपण धजावतच नाही. आपल्याला असलेल्या या मर्यादा खरंच मर्यादा आहेत की आपल्या सोयीसाठी आपणच घालून घेतलेले बांध आहेत, हे आपण पडताळूनच बघत नाही. आपल्यामध्ये असणा-या प्रचंड शक्तीची जाणीव आपण स्वतःला होऊच देत नाही. आपापल्या आयुष्यात आपापल्या परीने अशक्य आणि अवघड वाटणा-या गोष्टी करून बघण्याची, आपल्या सोयीच्या आणि सवयीच्या त्या परिघामधून बाहेर येण्याची थोडीशी तयारी दाखवली तर आपली आपल्या स्वतःलाच नवीन ओळख होते. मला माझी नव्याने खरं म्हणजे प्रथमच ओळख झाली. रूटिनमध्ये घडणा-या घटनाही रूटिनच असतात. त्यामध्ये धक्कादायक असं काही घडण्याच्या शक्यताच कमी असतात. त्यामुळे रूटिनमध्ये घडणा-या काही प्रसंगांमध्ये आपल्या प्रतिक्रिया काय असतात हे आपल्याला माहीत असतं. मात्र, एखाद्या अनपेक्षित प्रसंगामध्ये आपणच दिलेल्या अनपेक्षित प्रतिक्रियेमुळे स्वतःलाच चक्रावून टाकणारे प्रसंग किती येतात? आपण ते येऊच देत नाही. अगदी साधं उदाहरण द्यायचं, तर भूक लागली की आपण खातो. पण खूप खूप भूक लागूनसुद्धा, जेवण न मिळूनसुद्धा चालत राहिलं तर आपण कसे वागतो हे मी प्रथमच अनुभवलं. स्वतःच्या मनालाच खेळवत राहण्याचे, फसवण्याचे अनेक मार्ग आपण कुठून कुठून काढत राहतो तेव्हा आपल्यातल्या अचाट क्षमतेची जाणीव आपल्याला होते. स्वतःला अशा चित्रविचित्र परिस्थितीमध्ये टाकून स्वतःच्या प्रतिक्रिया काठावर बसून स्वतःच बघण्यामधली मजा आता मला येऊ लागली आहे. माझ्यासाठी हा एक नवीन खेळच होऊन बसला आहे. गोबी मोहिमेच्या दरम्यान मला आलेल्या या अनेकविध अनुभवांमुळे मी खूप समृद्ध झाले. परत आल्यावर हेच सगळे अनुभव मनात रुंजी घालत राहिले. चालणं, बदलतं हवामान, मोठ्ठं अंतर, खडतर प्रवास, गोबी वाळवंट चालणारी पहिली भारतीय, वगैरे वगैरे गोष्टी आता खूप खूप मागे पडल्या आहेत. मनःपटलावर कायमचे उमटून गेलेत ते फक्त हे अनुभव! ................... -सुचेता कडेठाणकर
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 10068
प्रतिक्रिया 72

प्रतिक्रिया

ग्रेट आहेत सुचेताबै. या उपक्रमाबद्दल "सुरू होणार" इतकंच वाचलं होतं, आज त्याच्या सुफळ संपूर्णतेचा लेख वाचला. अनुभव तर खतरनाक आहेच, पण इतक्या खतरनाक अनुभवावर एखादे पुस्तक तरी नक्कीच लिहिले पाहिजे असे मला वाटते. त्यासंदर्भात कुणाकडे काही माहिती आहे का?

In reply to by बोलघेवडा

सब्जेक्टिव्ह आहेत हे शब्द तसं पहायला गेलं तर जगातल्या कोणत्या गोष्टीला लाँग लास्टींग मिनिंग आहे ?

अनुभव एकदम थरारक आणि मस्त, रुहानी की काय म्हणतात तसे वाटले. सुचेता कडेठाणकर मॅडम गोबीचे वाळवंट का चालत गेल्या? नर्मदा परिक्रमा करतात किंवा वारी करतात त्याप्रकाराचा (धार्मिक नसलेला) हा प्रकार आहे का? प्रस्तावनेत थोडी ह्या उपक्रम बद्दल माहिती दिली असती तर बरे झाले असते.

लेख आवडला मोदकभाऊ...

In reply to by आबा

+१

अनुभव कथन आवडलं. लेख विनोदी अंगानं अजिबात जात नाही उलट थोडीशी दु:खाची किनार आहे. पण हे वाक्य वाचल्यावर फिस्सकन हसलो. :(
मोहिमेच्या साधारण विसाव्या दिवशी मला आमच्यातल्याच एका उंटाने जोरदार लाथ मारली.

अप्रतिम!! मक, लोकसत्तामधल्या बाकीच्या लेखांची लिंक मिळेल का?

In reply to by किसन शिंदे

+१ लोकसत्तामधल्या बाकीच्या लेखांची लिंक मिळेल का?

सुंदर अनुभव. मोदक ह्यांना आम्हा महाराष्ट्राबाहेर राहणा-यांना एक चांगला लेख वाचयची संधी दिली म्हणून धन्यवाद

एका संसारी माणसाचा सवाल - हे करुन मिळवलं काय ? वर बोघे म्हणतात तसं - अनुभव थरारक पण निरर्थक स्वरुपाचा. मॅसोचिस्ट प्रकारचा.म्हणजे आबा म्हणतात तसं लाईफ मध्ये लाँग लास्टिंग काहिच नाही, बरोबर हे ५२ दिवस ऑफिसात बसुन काम केल्यानं काही भारत लगेच महासत्ता झाला नसता हे मान्य, पण हे केल्यानं तरी काय झालं ? ही शंका अतिशय प्रामाणिक आहे, त्या मनरावचा धागा वाचुन मलादेखील एक क्षण वाटलं होतं, निघावं उद्या सकाळी गाडी घेउन, आता देखील वाटतंय निघावं त्या वाळवंटात, पण तिच्यायला गोरेगाव चौपाटीवर चालता चालता दम लागतो वाळुत, तिथं वाळवंटात जाउन काय करणार आहे,? पुन्हा ५२ दिवस रजा कोण देणार, मिळालीच तर पहिल्या ३० दिवस पगारी होईल पुढचे २२ दिवस बिनपगारी, मग त्यापुढच्या महिन्यातल्या कर्जहफ्त्यांचं काय ? खरंच कुणी समजावेल का हे का आणि कशासाठी, निदान मी माझ्या प्रॅक्टिकल मनाला एक दोन ऑर्ग्युमेंट तरी देउ शकेन, पुन्हा अशी इच्छा स्वप्नाळु मनाला झाली की.

In reply to by ५० फक्त

"केल्याने तरी काय झालं ?" हा प्रश्न विचारून कॉसॅलिटीच चक्र पूर्ण केलंत कारण "केल्याने काय झालं?" या प्रश्नाला "नाही केल्याने काय झालं असतं?" असा प्रश्न परत विचारता येतो, आणि हे चालूच राहतं. आणि खरं तर त्याला "कारण" काहीच नाही, (हेच वरच्या प्रतिसादात म्हणायचा प्रयत्न केला आहे) शेवटी काय "सिसिफस मस्ट बी हॅपी" http://en.wikipedia.org/wiki/The_Myth_of_Sisyphus

In reply to by ५० फक्त

रिस्क बाय चॉईस आणि रिस्क बाय फोर्स हाच काय तो फरक. संसारीक जबाबदार्‍या पार पाडताना घेण्यात येणार्‍या रिस्कची मजा येते म्हणुन ते कोणी घेत नाहि. त्या रिस्क टाळता येण्याजोग्या नसतात म्हणुन माणुस त्या निभवतो. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

आजकाल घरासाठी कर्ज घेणं आणि लग्न करणं या रिस्क बाय फोर्स आहेत असं वाटत नाही, दोन्ही मध्ये चॉइस असतोच.

In reply to by ५० फक्त

तुम्हाला लग्न म्हणायचय कि लग्नाकरता कर्ज घेणं म्हणायचय? लग्न रिस्क बाय चॉईस आहे हे मान्य :) ज्याच्या कडे कर्ज न काढता उत्तम घर बांधायची ऐपत असेल तो कर्ज घेणार नाहि... आणि अशा परिस्थितीत जर त्याने कर्ज घेतलच ते रिस्क नाहिच मुळी. सोईकरता रिस्क घेणं वेगळं आणि आनंदाकरता रिस्क घेणं वेगळं. अर्धवटराव

अनुभव थरारक.

सुचेताबाईंचे अनुभव विलक्षण खरेच. असेच काहिसे अनुभव विपश्यना व ध्यान करणार्‍यांना प्राथमिक पायरीवर असताना आलेले आठवतात.

लेख आणि अनुभव खूपच उत्तम आहे. वाचून आपणही असाच एखादा अनुभव घ्यावा अशी इच्छा पुन्हा जागृत झाली. :) ५० फक्त दादा/काका, संसारी, कर्जबाजारी आणि प्रॅक्टिकल माणसांसाठी नसतातच असे अनुभव. :) आपण इतरांचे अनुभव वाचायचे आणि खुश राहायचं.. हे न केल्यानं काही झालं नसतं तरी केल्यामुळे निदान करणार्‍याला जगावेगळं काही केल्याचं समाधान मिळालं हे महत्वाचं. तसंही आपण रोजच्या जगण्यात ज्या काही गोष्टी करतो, त्या सगळ्याच अर्थपूर्ण असतात का? उदा. वन रुम किचन मधे ४ जणांचा संसार किमान गरजा भागून चालू शकत असतानाही आपण २/३ बेडरुम फ्लॅट (कर्ज काढून) घेतो आणि तेच कर्ज फेडत १०-१५-२० वर्षं जे काम करण्यात आपल्याला काडीचाही इंटरेस्ट नाही ते करत राहातो.

In reply to by चिर्कुट

वन रुम किचन मधे ४ जणांचा संसार किमान गरजा भागून चालू शकत असतानाही आपण २/३ बेडरुम फ्लॅट (कर्ज काढून) घेतो आणि तेच कर्ज फेडत १०-१५-२० वर्षं जे काम करण्यात आपल्याला काडीचाही इंटरेस्ट नाही ते करत राहातो. - यासाठी जे धाडस लागते, ते गोबीचंच काय पण आख्खं सहारा वाळवंट चालुन जाणं किंवा माउंट एव्हरेस्ट चढुन जाणं, यापेक्षा खुप खुप जास्त आणि आत्महत्याकरण्यापेक्षा थोडंसंच कमी असतं. या एक दोन महिन्यात होणा-या जखमा आणि पायदुखी काहीच नसते, घराच्या अन पोराच्या शिक्षणाच्या कर्जाचे हफ्ते भरण्यासाठी टॅक्सीप्रवास टाळुन केलेल्या पायपिटिच्या दुखण्यासमोर. याच पायपिटितुन निर्माण होउन म्हातारपणी मोठी दुखणी हेच घर आणि हीच पोरं सांभाळुन घेतील या अपेक्षेनं केलेलं दुर्लक्ष फार महत्वाचं वाटतं मलातरी. महिना तीन महिन्यात गो थ्रु होउन संपणा-या रिस्क ह्या फार चिल्लर असतात माझ्यामते, या रिस्कमध्ये एक रुट आउट नेहमीच असतो, पराभव, जो आपण सोडुन आणि असले रिकामपणाचे उपद्याप करणारी चार सहा लोकं सोडुन कुणाच्या लक्षात देखील येणार नाही, तो मान्य करायची तयारी असेल तर ह्यातुन कधीही आणि केंव्हाही बाहेर पडता येतं, पण १५-२० वर्षे बँकेची कर्ज + पोरांची शिक्षणं + आईबापांचे आजार + बायकोच्या इच्छा + जमलंच तर आपल्या पण ह्या सगळ्या इव्हन वाढत्या पगारात बसवणं, ह्या फार फार मोठ्या रिस्क आहेत. हां अर्थात या जगावेगळं करण्याच्या इच्छापुर्ती नसतील अशा आयुष्यात पण, काही अंशी आईबापाचं फेडलेलं ऋण, लेकाच्या घरात पहिला पाय टाकताना आई बाबांच्या चेह-यावर आलेलं हसु, माझी रुम म्हणुन हरखुन गेलेली १०-१२ वर्ष जुनी बायको आणि तिचा आनंद, इथं भिंती घाण केल्या तरी बाबा ओरडणार नाही ही पोरांना मिळालेली निश्चिती, सरकारी फॉर्मवर परमनंट अ‍ॅड्रेस चा रकाना भरायला मिळालेली हक्काची चार अक्षरं ही फार जास्त मोलाची असतात, फार मोठी असतात त्या सो कॉल्ड जगावेगळं करण्याच्या इच्छापुर्तीपेक्षा.

In reply to by ५० फक्त

हां अर्थात या जगावेगळं करण्याच्या इच्छापुर्ती नसतील अशा आयुष्यात पण, काही अंशी आईबापाचं फेडलेलं ऋण, लेकाच्या घरात पहिला पाय टाकताना आई बाबांच्या चेह-यावर आलेलं हसु, माझी रुम म्हणुन हरखुन गेलेली १०-१२ वर्ष जुनी बायको आणि तिचा आनंद, इथं भिंती घाण केल्या तरी बाबा ओरडणार नाही ही पोरांना मिळालेली निश्चिती, सरकारी फॉर्मवर परमनंट अ‍ॅड्रेस चा रकाना भरायला मिळालेली हक्काची चार अक्षरं ही फार जास्त मोलाची असतात, फार मोठी असतात त्या सो कॉल्ड जगावेगळं करण्याच्या इच्छापुर्तीपेक्षा.
सहीच. हा प्रतिसाद वाचल्यावर काही वर्षापुर्वी रिक्षाचे पैसे वाचवण्यासाठी उन्हात चार-पाच किलोमिटर पाय ओढत चालायचो त्याची आठवण आली. पण तो नाईलाज होता ऐच्छीक नव्हतं त्यामुळे त्याचे विशेष कौतुक नाही. रोज बस-लोकल मध्ये गर्दीत लोंबकळत प्रवास करणार्‍या, पावसाळ्यात कमरे इतक्या तुंबलेल्या पाण्यातून जाणार्‍या लोकांचं कसलं कौतुक? कार ने एसी ऑफीस मध्ये बरणार्‍यांनी अ‍ॅडवेंचर म्हणून पॅरॅग्लायडींग, रॅफ्टींग केलं तर ते कौतुक. अवांतरः खरं तर वरचा प्रतिसाद लेखाच्या दृष्टीने अस्थानी आहे. लेख फक्त एक वेगळा अनुभव म्हणून आहे याची जाणीव आहे. पण वर काही प्रतिसादात आल्याप्रमाणे नुसत्या प्रपंचिक चौकटीमध्ये जगणार्‍या बहुतेक लोकांपेक्षा थोडसं वेगळं करणार्‍यांचं जे कौतुक दिसलं त्यामुळे हे लिहावसं वाटलं. :(

In reply to by ५० फक्त

सामान्य म्हणावे अशा आयुष्यात रिस्क बरीच आहे याबद्दल दुमत नसावे-विशेषतः सध्याच्या काळात. पण त्याच्या उदात्तीकरणापायी अन्य कोणी काही वेगळे, अवघड करून दाखवले तर त्याचे मूल्यमापन निव्वळ उपयुक्ततेच्या निकषाने करणे हा तर्कदुष्टपणा होतो.
हां अर्थात या जगावेगळं करण्याच्या इच्छापुर्ती नसतील अशा आयुष्यात पण, काही अंशी आईबापाचं फेडलेलं ऋण, लेकाच्या घरात पहिला पाय टाकताना आई बाबांच्या चेह-यावर आलेलं हसु, माझी रुम म्हणुन हरखुन गेलेली १०-१२ वर्ष जुनी बायको आणि तिचा आनंद, इथं भिंती घाण केल्या तरी बाबा ओरडणार नाही ही पोरांना मिळालेली निश्चिती, सरकारी फॉर्मवर परमनंट अ‍ॅड्रेस चा रकाना भरायला मिळालेली हक्काची चार अक्षरं ही फार जास्त मोलाची असतात, फार मोठी असतात त्या सो कॉल्ड जगावेगळं करण्याच्या इच्छापुर्तीपेक्षा.
या पूर्ण परिच्छेदातील अधोरेखित वाक्य बहुतांश जनांना अपील होण्याजोगे आहे पण सब्जेक्टिव्ह आहे. शेवटी, हे सगळे मान्य करूनही सुचेताबैंनी जे केले त्याचे कौतुक का असू नये, हा प्रश्न उरतोच. आणि हे सगळं करून मिळवलं काय? तर काहीतरी एक गोष्ट करायची लै इच्छा होती, ती पूर्ण झाली, हेच एक समाधान पुरेसे नाही काय? दुसरा एक प्रश्न म्हणजे या प्रकारचे धागे जेव्हा येतात, तेव्हा हा प्रश्न टिपिकली विचारला जातोच, मुळात "स्वांतःसुखाय" यापलीकडे या प्रश्नांचे उत्तर नसते हे माहिती असूनसुद्धा हा प्रश्न का विचारला जावा हे मला कळत नाही. अवांतरः तुमच्या दृष्टिकोनाशी सहमत व्हायला अडचण फारशी नसली तरी त्यात ही दुसरी बाजू विचारात घेतल्या गेली नाही, सबब तो अंमळ एकांगी झालाय असे मला आपले वाटते.

In reply to by बॅटमॅन

बरेचदा सहमत रे बॅटम्याना... "बँकेत ठेवलेल्या एफडी प्रमाणे प्रत्येक गोष्टीतून काहीतरी मिळतेच" हे लॉजीक कितीही प्रॅक्टीकल असले तरी ते प्रत्येक ठिकाणी वापरण्याची आवश्यकता नसते. "परताव्याच्या" प्रत्येकाच्या कल्पना वेगवेगळ्या असतात. अपेक्षा वेगळ्या असतात आणि "काय मिळाले" हा प्रश्न तेंव्हा तयार होतो जेंव्हा एखाद्याचा अपेक्षीत परतावा हा दुसर्‍याच्या अपेक्षीत परताव्या पेक्षा वेगळा असतो. प्रश्न फक्त 'मोजपट्टीच्या फरकाचा' आहे आणि बहुदा याच फरकामुळे बरेचसे प्रतिसाद एकांगी झाले आहेत. अगदी तसाच विचार केला तर निव्वळ खाण्यासाठी जगून तरी "काय मिळते..?" सकाळी फोडणीच्या भाताला साधे वरण आणि रात्री साध्या भाताला फोडणीचे वरण खावूनही शरीराचे चलनवलन सुरूच राहते, तरीही वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळे पदार्थांनी जिव्हा तृप्त आणि जठराग्नी शांत करून "काय मिळते..?" थोडेसे अवांतर.. (मागच्याच आठवड्यात 'तैलबैला' ला काढलेला फोटो) . वरील फोटोमध्ये कड्याच्या मध्यभागी, रोपच्या रेफरन्सने बघितले तर छोटे छोटे पांढरे ठिपके दिसताहेत. तीन क्लाईंबर आहेत त्या धोकादायक ठिकाणी. या लोकांना काय मिळाले हे धाडस करून..? भरारत्या वार्‍यात त्या जिवघेण्या ठिकाणी चढून काय मिळाले..? "आत्मविश्वास - स्वत:च्या क्षमतेचा" सिंहगडावर हरवलेल्या कॉलेज युवतीला शोधताना, मध्यरात्री वरंधा घाटातून अपघातग्रस्त महिलेचा मृतदेह काढताना, रात्रीबेरात्री किर्रर्र अंधारात अनोळखी जंगले तुडवताना, अचानकपणे समोर येणार्‍या कोल्हे-रानडुकरांना सामोरे जाताना आणि कोणत्याही वेळी मदतकार्यासाठी बोलावणे आल्यानंतर हेच लोक हाकेला ओ देतात, पाय थरथरू न देता.. गोबीचे वाळवंट असो की एव्हरेस्ट, हिमालय असो की सह्याद्री.. अशा मोहीमांमधून कुणी स्वत:वरचा विश्वास कमवला तरी भरपूर आहे. बावन्न दिवस चालून तिला ती स्वतः "सापडली" असेल तर ते बॅलन्सशीटमध्ये कसं दाखवणार..?

In reply to by मोदक

अश्या अश्या गोष्टींमधुन एकच गोष्ट मिळते ती आत्मविश्वास् कारण अस काही जगावेगळ जो पर्यंत तुम्ही करत नाहीत तोपर्यंत दुसर्‍यासाठी काही करण्याची हिंमत येत नाही.शेवटी माणुस हा इतर प्राण्यांपेक्षा निच्छित वेगळा आहे तो स्वताबरोबर दुसर्‍यासाठीही उपयोगी पडु शकतो पन हे चार भिंतीच्या आड राहुन नाही करता येत, त्यासाठी हिंमत लागते,थोडक्यात डोक्यात सुलेमानी किडे लागतात आणी अंगात माज लागतो....

In reply to by बॅटमॅन

मला नाही वाट्त, ५० रावांच्या प्रतिसादातून 'सुचेताबैंचे कौतुक नाही' असा अर्थ निघतो.. एका संसारी माणसाच्या अन अजून संसारास सुरुवात न केलेल्या उमेदवारांच्या भाषेतला हा फक्त फरक आहे...

In reply to by सस्नेह

एखादी व्यक्ती संसारी आहे का बिन लग्नाची याबे काही फरक पडत नाही,काही गोष्टी जन्मतःच येतात,.....

In reply to by सस्नेह

अगदी हेच लिहायचं होतं, पण इथल्या संसारात न पडलेल्या, म्हणजे लग्न न झालेल्या मिपाकरांना अजुन या सगळ्याची जाणिव नाही, वास्तवाचे चटके नाहीत, तोपर्यंत हे सगळं लिहिणं आणि करणं फार सोपं असतं, पण मित्रांनो, ते पलीकडचं जग फार वेगळं असतं, हे असं दोन - तीन दिवसाच्या ट्रेकमध्ये टिमवर्क करुन आत्मविश्वास कमावणं वेगळं आणि तो आत्मविश्वास नेहमीच्या जगण्यात उतरवणं वेगळं, एक उदाहरण देतो, प्रोपेशनल क्रिकेटर्सना टेस्ट मधला आत्मविश्वास २०-२० मध्ये उपयोगी पडत नाही, डोंगरं चढण्यातला आत्मविश्वास घरची अन ऑफिसची कामं करण्यात काय टिकावा. तुम्ही तैलबैला काय किंवा माउंट एव्हरेस्ट चढुन आलात काय, पुढच्या वर्षी सहाच सिलेंडर ४१५ ला मिळणार आहेत , त्यानंतरचे १२०० ला मग ते द्यायचे कसे का गहु तांदुळ भाज्या कच्च्याच खायच्या, या बद्दल आत्मविश्वास कुठुन आणणार आहात.

In reply to by ५० फक्त

अगदी हेच लिहायचं होतं, पण इथल्या संसारात न पडलेल्या, म्हणजे लग्न न झालेल्या मिपाकरांना अजुन या सगळ्याची जाणिव नाही, वास्तवाचे चटके नाहीत डोंगरं चढण्यातला आत्मविश्वास घरची अन ऑफिसची कामं करण्यात काय टिकावा. कै च्या कै विचारसरणी - लॉजीक आहे का काही या फालतू वाक्यांमागे? तुम्ही तैलबैला काय किंवा माउंट एव्हरेस्ट चढुन आलात काय, पुढच्या वर्षी सहाच सिलेंडर ४१५ ला मिळणार आहेत , त्यानंतरचे १२०० ला मग ते द्यायचे कसे का गहु तांदुळ भाज्या कच्च्याच खायच्या, या बद्दल आत्मविश्वास कुठुन आणणार आहात. ते ज्याच्या त्याच्या ऐपतीवर अवलंबून आहे. बाकी साखरेची साले काढण्यामधे कोणताही रस नसल्याने.. तुमचे चालूद्या.

In reply to by ५० फक्त

डोंगर चढायला गॅस सिलेंडर नाय लागत राव्,कायचै काय पन राव.विषय काय ?संसार काय ?अन प्रतिक्रिया काय ?काहीच कळत नाय राव....

In reply to by बॅटमॅन

काचं मणिं काञ्चनमेकसूत्रे मुग्धाः निबध्नन्ति किमत्र चित्रम् | विचारवान् पाणिनिरेकसूत्रे श्वानं युवानं मघवानमाह ||

In reply to by ५० फक्त

अर्थातच सामान्य माणसाच्या कष्टांना कमी लेखण्याचा प्रश्नच येत नाही. वरील सगळ्या गोष्टी या धाडसाच्याच आहेत. पण हे धाडस १०० मधील ९९ लोक करतात म्हणून त्याचे वेगळेपण उठून दिसत नाही. लेखिकेनेही या गोष्टी केलेल्या असण्याची शक्यता आहे. या लेखातील धाडसाचं कौतुक हे 'वाळवंट पार केलं' याच्या कौतुकापेक्षा ते कुणालातरी करावयास मिळालं याचं कौतुक/अप्रूप जास्त आहे. अजून एक, जर प्रत्येकाने वरीलप्रमाणे विचार करायचं ठरवलं, तर शेर्पा तेनसिंग, बचेंद्री पाल, जिम कॉर्बेट, गेला बाजार दर वीकांताला कुठ्ल्या ना कुठल्या गडांवर ट्रेकिंग करणारे या सगळ्यांचे उद्योग हे 'रिकामपणाचे उपद्याप' ठरवायचे का? आपण जगताना नेहमीच इतरांचा (कुटुंब, नातेवाईक, समाज इ.) विचार करत, काही गोष्टींमध्ये मन मारत जगतो. ही आपली संस्कृती आहे. ती बर्‍याच प्रमाणात बरोबरही आहे. पण म्हणून फक्त स्वतःच्या आनंदासाठी एखाद्याने एखादी गोष्ट केली तर तिची 'रिकामपणाचे उपद्याप' अशी निर्भत्सना होऊ नये असे वाटते. कृ. वैयक्तीक घेऊ नये.

In reply to by चिर्कुट

आपण जगताना नेहमीच इतरांचा (कुटुंब, नातेवाईक, समाज इ.) विचार करत, काही गोष्टींमध्ये मन मारत जगतो. ही आपली संस्कृती आहे. ती बर्‍याच प्रमाणात बरोबरही आहे. पण म्हणून फक्त स्वतःच्या आनंदासाठी एखाद्याने एखादी गोष्ट केली तर तिची 'रिकामपणाचे उपद्याप' अशी निर्भत्सना होऊ नये असे वाटते. कृ. वैयक्तीक घेऊ नये.
हेच, अगदी हेच म्हणायचं होतं, धन्यवाद.

In reply to by चिर्कुट

स्वतःच्या आनंदासाठी एखाद्याने एखादी गोष्ट केली तर तिची 'रिकामपणाचे उपद्याप' अशी निर्भत्सना होऊ नये असे वाटते सहमत...

In reply to by मोदक

स्वतःच्या आनंदासाठी एखाद्याने एखादी गोष्ट केली तर तिची 'रिकामपणाचे उपद्याप' अशी निर्भत्सना होऊ नये असे वाटते - १००% मान्य, पण मग अशा गोष्टीचं कौतुक तरी मांडु नये, आपण, आपला आनंद, आपलं दु:ख एवढ्या वर्तुळात सुखी राहावं. तुम्ही तुमचं फाटकं बनियन, ते तुम्हाला आवडतं असलं तरी, एकदा गॅलरीत वाळत घातलं की लोकं निर्भत्सना करणारच फाटके कपडे घालतो म्हणुन, मग त्याचा राग येउ नये.

In reply to by ५० फक्त

या विधानातून काय सूचित होणारा प्रचंड डिफेन्सिव्ह सूर पाहून अवाक झालो. साहसी कामे करणार्‍यांबद्दलचा छुपा आदर हा असा तिरस्काररूपाने बाहेर पडेल असं वाटलं नव्हतं. असो. पण ५० रावांकडून असला तद्दन डिफेन्सिव्ह सूर येईल असं वाटलं नव्हतं आजिबात. जगात जन्माला आल्यानंतर तगून राहणं हासुद्धा स्ट्रगलचा भाग आहे, पण म्हणून सारखं सारखं त्या स्ट्रगलला गोंजारत राहणे म्हणजे जीवनात त्यापलीकडे काही पाहण्याची तयारी नसणे असेच म्हणावे लागेल. आणि त्यापलीकडे कैतरी पाहिले तरच खरी मजा आहे.- अर्थ वगैरे लोडेड शब्द मी वापरणार नाही, कारण आपल्या जीवनाचा अर्थ वैग्रे गोष्टी स्वतः प्रत्येकाने हुडकायच्या असतात. अजून एक मुद्दा दिसतो तो म्हणजे लग्न होण्याआधीपर्यंत या सगळ्या गमजा आहेत, एकदा लग्न झालं की मग असे काही करणे दुरापास्त होईल आणि त्यामुळे तात्विकदृष्ट्यासुद्धा अशा गोष्टींना कोणी पाठिंबा देणार नाही. हा तर सरळसरळ पराभूत दृष्टिकोन झाला. मी स्वतः लग्न झाल्यावरही "प्रौढत्वी निज साहसास जपणारे" आणि कौटुंबिक जबाबदार्‍या नीट निभावणारे कैक लोक पाहिलेत. लग्न, संसार, इ. गोष्टी या मानवाच्या वैयक्तिक आशाआकांक्षांशी नेहमी विरुद्ध असतात असे आजिबात नाही. पारंपरिक गृहस्थाश्रमाचे गोडवे गायलेले इथे स्पष्ट दिसतात-पण इथे सब्स्टन्सपेक्षा स्टाईलवर भर जास्त दिलेला आढळतो, बहुतांश आक्षेप हे त्याविरुद्ध आहेत. गृहस्थाश्रमी झाल्यावर अमुक एका प्रकारची विचारपद्धती येईलच/आलीच पाहिजे हा छुपा आग्रह हास्यास्पद आहे.

In reply to by ५० फक्त

हां अर्थात या जगावेगळं करण्याच्या इच्छापुर्ती नसतील अशा आयुष्यात पण, काही अंशी आईबापाचं फेडलेलं ऋण, लेकाच्या घरात पहिला पाय टाकताना आई बाबांच्या चेह-यावर आलेलं हसु, माझी रुम म्हणुन हरखुन गेलेली १०-१२ वर्ष जुनी बायको आणि तिचा आनंद, इथं भिंती घाण केल्या तरी बाबा ओरडणार नाही ही पोरांना मिळालेली निश्चिती, सरकारी फॉर्मवर परमनंट अ‍ॅड्रेस चा रकाना भरायला मिळालेली हक्काची चार अक्षरं ही फार जास्त मोलाची असतात, फार मोठी असतात त्या सो कॉल्ड जगावेगळं करण्याच्या इच्छापुर्तीपेक्षा.
लै वेळा शमत.

वन रुम किचन मधे ४ जणांचा संसार किमान गरजा भागून चालू शकत असतानाही आपण २/३ बेडरुम फ्लॅट (कर्ज काढून) घेतो आणि तेच कर्ज फेडत १०-१५-२० वर्षं जे काम करण्यात आपल्याला काडीचाही इंटरेस्ट नाही ते करत राहातो. हे पटले. सुसंगत वाटले. पण नकळतच आपण आज पेक्षा उद्याचा जास्त विचार करायला लागतो आणि मग त्यातूनच या गरजा जन्माला येतात व त्या पूर्ण करायला ही सगळी खटपट सुरू होते...

कधी तरी दुनियेला लाथ मारुन जगावस प्रत्येकालाच वाटत्,पन प्रत्येकालाच ते शक्य होईल अस नाही,ज्याला जमल त्याच्या आयुष्याच सार्थक झाल...हे अनुभवायच असेल तर 'एक उनाड दिवस' नावाचा मराठी सिनेमा आहे बहुतेक तो पहावा आणी जमल तर तस करुन पहा....बाकी काही नाही पन मजा नक्कीच येईल.....

आपण हे सुख-दुःखाचे कोणतेही प्रसंग मुळात अगदी संपूर्ण असे अनुभवतच नाही. त्या प्रसंगांमधून आपल्याला मिळणारी अनुभूती आपल्यापर्यंत पोचण्याआधीच, त्या अनुभूतीची चाहूल लागताच आपण आपल्या मनाला शहाणपणाची शिकवण देऊ लागतो. मग तो अनुभव आपल्यापर्यंत पोचताना आपण त्याला सामोरे जायला पूर्ण तयार असतो. त्या अनुभवामधून मिळू शकणा-या सर्व भावनिक चढ-उतारांची कल्पना आपण खूप आधीच करून ठेवलेली असते. त्यामुळे आपल्यापर्यंत पोचणारा अनुभव पांचट झालेला असतो... तिखट, गोड, कडू, आंबट अशी कोणतीच चव नसणारा. आडाखे, विश्लेषण या सगळ्या आपण आपल्याला लावून घेतलेल्या सवयींमुळे एखाद्या गोष्टीचा मूळ गाभा बाजूला राहतो आणि आपल्याजवळ उरतात ते आपण त्या गोष्टीबद्दल बांधलेले आडाखे अगदी सुरेख बोलुन गेल्या सुचेताताई. तसाही सुचेताचा अर्थ चांगल चेतवणारी असा आहे. चांगल्या गाद्या गिरद्या सोडुन, फुकटचा एसी सोडुन अस काही करायला बाहेर पडण खरच मला तरी अशक्य वाटत. मोदक भाउ, लेख पडल्या पडल्या दिसला होता, पण सुरवात वाचताना जाणवल की नाही हा "वाचायचा" लेख आहे. गडबडीन प्रतिसादुन पुढे जायचा नव्हे.म्हणुन इतका वेळ. धन्यवाद मोदक.

लोकसत्तेत वाचले होते लेख हा लेख आवडला ह्यात एक पर्यटक म्हणून प्रवासात आलेले अनुभव विशद केले आहेत ते मला भावले, ह्याला म्हणतात डेरिंग प्रत्येक मोठ्या पर्यटन मोहिमेतून आपले अनुभव विश्व समृद्ध होते. व अनेक संकल्पनांचा अर्थ नव्याने उमजतो. केल्याने पर्यटन असे म्हटलेच आहे.

मी आधी म्हणालो होतो कि हा अनुभव थरारक पण निरर्थक , मसोचिस्ट प्रकारचा !! अश्या धाडसी मोहिमा करणाऱ्या लोकांची अगदी ढोबळ वाटणी केली तर साधारणपणे १.वैयक्तिक आनंदासाठी - जसे कि ट्रेकर्स २. वैज्ञानिक हेतूसाठी - अंतराळवीर ३. सामाजिक / देशासाठी - सैनिक या सर्वांमध्ये एक गोष्ट मात्र सारखी असते ती म्हणजे यांचे निश्चित स्वरूपाचे ध्येय, लक्ष्य असते आणि जोडीला भरपूर तयारी असते. काही ठरविक कौशल्यांचा वापर अत्यंत काटेकोर पद्धतीने वापर करून लक्ष्य साधले जाते. सुचेता बाईंच्या मोहिमेत ना काही ध्येय आहे न काही तयारी. वरील १,२,३ मधील कोणत्याच प्रकारात त्यांची मोहीम मोडत नाही. ५२ दिवसांच्या मोहिमेसाठी कोणते विशेष कौशल्य त्यांनी वापरले (?), कोणती पूर्वतयारी केली (?). केवळ जगावेगळे काहीतरी क्कारायचे म्हणून किंवा मनाचा (सुप्त) अहंकार म्हणून शरीराची केलेली फरफट च जास्त समोर येते. मानसिक कथेर्सिस करायचा होते तर सरळ विपश्यन करून ह्याच्या पेक्षाहि जास्त दर्जेदार अनुभव घेत आला असता.

मोदक आपल्या लेखांचा मी चाहता आहे. काहीतरी वेगळे अभ्यासपूर्ण नेह्मीच वाचायला.मिळते पण हा लेख वाचून अपेक्षाभंग झाल्यासारखे वाटले. सुचेता ताइंचे अनुभव अजून वेगळ्या अंगाने लिहीता आले असते असे मला वाटते.

In reply to by लाल टोपी

नमस्कार - अभिप्रायाबद्दल आभार. एक छोटासा खुलासा. वरील लिखाण संपूर्णपणे सुचेता कडेठाणकरांचे आहे. माझा स्वतःचा एकही शब्द मी त्यात वाढवलेला नाही. त्यांचे लिखाण त्यांच्या शैलीनेच वाचकांच्या पर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांच्या परवानगीने हा लेख इथे चिकटवायचे काम फक्त मी केले. -- मोदक.

In reply to by मोदक

परंतू मोद्क नांव वाचले की अपेक्षा उंचावतात. सुचेताइंचा लेख आपली निवड असल्यामुळे त्याच अंगाने जाणारा असेल असे वाटले होते स्वत: ट्रेकर असल्या मुळे हा विषय देखील चित्त्थरारक आहे, तसा तो करता आला नाही तसे फक्त झाले नाही एवढेच म्हणायचे होते

लेख छान आहे. बाकी कुणाकडे पैसे न मागता केलेला एक यशस्वी प्रयत्न म्हणून मला तरी चांगला वाटला. (मेरे मन को भाया मै कुत्ता काट खाया)

इथे साहसाचा विषय निघालाय तर एक सांगावस वाटतं, करायचच असेल तर एक साहस करून पाहा: ‘काय वाट्टेल ते झालं तरी पैसा मला हालवणार नाही’. वीसेक वर्षांपूर्वी केलेल्या या एका साहसानं सगळं आयुष्यच स्वच्छंद आणि मनसोक्त झालय. हे बहुदा जगावेगळं साहस असावं कारण त्यानंतर इतर कोणतही साहस करायची इच्छा उरली नाही.

सर्वसामान्यांचं रोजचं जगणं आणि त्यापेक्षा वेगळं म्हणता येईल असं काही करणं या दोन्हींमध्ये डावंउजवं करण्यासारखं काही नाही. दोन्हींमध्ये जोखीम, तयारी, कष्ट, किंमत, प्रयत्न, वेळ, या सर्व गोष्टी असतातच. तुम्ही कर्वे रस्ता ओलांडला काय आणि हरिश्चंद्राच्या कोकणकड्याच्या धारेवरून चालत गेलात काय, जोखीम तशीच असते. मला असं वाटतं की आयुष्य म्हणजे क्षणोक्षणी मृत्यूला दिलेली बगल आहे. मग ती जाणीवपूर्वक दिलेली असेल, किंवा नकळत असेल किंवा त्या दाढेतून सहीसलामत बाहेर पडल्याची जाणीव असेल. आपलं आयुष्य हे अशा कित्येक क्षणांचा समुच्चय आहे. कुणाला या सुटकेबद्दल हायसं वाटतं तर कुणी रगेलपणे चेकाळतो. गिरिभ्रमण असो, चांदोलीच्या जंगलात सड्यावर रात्री एकट्यानंच केलेली भटकंती असो, माणसांच्या तावडीतून वाचवलेली घोणस असो वा मृत्यूला ढप्पा दिल्याचा कुठलाही क्षण असो. तो निरर्थक अनुभव कधीच नसतो. त्यातून खूप आनंद वगैरे मिळतो असं मला कधीच वाटलं नाही. उलट स्वतःची ससेहोलपट करून घेऊन जेव्हा घरात पाऊल टाकतो तेव्हा स्वतःलाच प्रचंड शिव्या देत पुन्हा या आयुष्याच्या आडवाटांवर कधीच न फिरकण्याचा निश्चय मी दरवेळी करतो. आणि तरीही कधी कुठे तरी दिसलेलं, कुणी तरी सांगितलेलं शिखर, एखादा कडा, एखादी घळई, एखादं निबिड अरण्य, एखादा न केलेला किल्ला वगैरे मनात रुंजी घालत असतं. इथं स्वतःला आजमावून पाहण्याचाही प्रश्न नाही. पण तरीही मी तिथे का जातो? स्वांतसुखाय? हम्म.. अंहं. माहीत नाही. मला जावंसं वाटतं म्हणून मी जातो. पुन्हा एकदा ढप्पा द्यायचा असतो. पुन्हा एखादा टप्पा पार करायचा असतो. सुचेताजींचा हा अनुभव, ते बावन्न दिवस, हे सगळं फक्त त्यांचं आहे. आणि ते त्यांच्यापासून कुणीही हिरावून घेऊन शकणार नाही. कधीच नाही. आम्हांला ते विश्व दाखवल्याबद्दल मोदकजी, तुमचे व सुचेताजींचे आभार... असेच कुठेतरी भेटू. एखाद्या जंगलात, एखाद्या कड्यावरती, एखाद्या वाळवंटात, आम्हां पुणेकरांच्या वाहतुकीच्या जाळ्यात नाहीतर गेला बाजार मिपावर... :P

लेख अतिशय आवडला. येथे दिल्याबद्दल अनेक धन्यवाद, मोदकभाऊ.

एक अप्रतिम अनुभव मांडणारा लेख इथे वाचायला दिल्याबद्दल मोदक, तुझे आभार. हा सगळा प्रकार म्हणजे विपश्यनेचंच एक स्वरूप आहे, असं वाचताना वाटलं. स्वतःला सामोरं जाण्यासाठी पाऊल उचलणं हेच दोन्हीत महत्त्वाचं.. शेवटी हाती काय लागेल, त्याचा विचार तिथे दुय्यमच. बाकी गोबीच्या वाळवंटात झालेली किचनमध्ये सिलेंडरवर स्वयंपाक करणारे आणि गडकिल्ल्यांवर खिचडी बनवणारे अशी मिपाकरांची नवी वर्गवारी बघून अनपेक्षित करमणूक झाली!

जगावेगळं साहस, आणि त्या अनुभवाला तितकंच सुरेख शब्दबद्ध केलेला सुचेताचा लेख आमच्यापुढे आणून ठेवल्याबद्दल मोदकाला धन्यवाद!

बाकी सगळं ठीक आहे पण ट्रेकिंग करणारे (माझ्यामते ट्रेकिंग+ रॅपलिंग सर्व सारखेच) कधीकधी भयंकर रिस्क घेतात. आमच्या ओळखीतले एकजण सांगत होते. त्यांच्या एका ओळखीच्या कुटुंबातील मुलगा कुठेतरी ट्रेक करायला गेला, आणि दरीत कोसळला. बरोबरच्या ट्रेकर्स ने धावपळ करुन पोलिसांना कळवलं, पोलिस आले, पण दरीत उतरणार कसं ? मग त्यासाठी खास प्रशिक्षित ट्रेकर्स बोलावले. ते खाली उतरले आणि थोड्या वेळाने वाईट बातमीच घेऊन वर आले. त्याचबरोबर असंही म्हणाले की बॉडी वरती आणता येणार नाही कारण वर चढायचा मार्ग खुप कठीण आहे. मग घरच्यांच्या संमतीने ते ट्रेकर्स पुन्हा खाली उतरले आणि खालीच त्या मुलाला अग्नि दिला. आता माझा सिंपल प्रश्न- ट्रेक करुन, मृत्युला कवटाळुन आणि आईवडीलांना दु:खात लोटुन त्या मुलाने काय कमावलं ? मृत्यु रोड क्रॉस करताना येऊ शकतो वगैरे सर्व सर्व मान्य. पण ह्या केसमध्ये स्वतःला मजा मिळावी म्हणुन ट्रेक करायला गेला आणि पुढचं सगळं झालं. आता वरती तैलबैला चा फोटो मोदकाने लावलाय. क्लिअर रिस्की फोटो आहे. मी तर म्हणतो की अशा सर्व ठीकाणी ट्रेक करायला बंदीच घातली पाहिजे. मुलांना कळत नाही ठीकाय, पण सरकारचे काय ? मी जर वकील असतो तर नक्की एक जनहित याचिका टाकली असती.