Skip to main content

दु:खचा महाकवी ग्रेस

दु:खचा महाकवी ग्रेस

Published on 28/03/2012 - 14:00 प्रकाशित मुखपृष्ठ
मराठी भाषेत काव्य प्रकारात विपुल साहित्या निर्मिती झाली आहे. गेली २०-२५ वर्षात जे कवी झाले किंवा आधीपासून होते त्यांना आपण ढोबळ मानाने २ प्रकारात वीभागु शकतो. एक मुख्य प्रवाहातले आणि दुसरे मुख्य प्रवाहातून वेगळे असलेले. या दुसर्‍या प्रकारच्या कवींना फार प्रसिद्धी लाभली नाही पण जे त्यांचे चाहते आहेत ते अत्यंत निस्सीम आणि निष्ठावान चाहते आणि रसिक आहेत. या प्रकारात अशा निस्सीम चाहत्यांच्या हृदयावर ज्यांनी खर्‍या अर्थाने अधिराज्य केले त्यात अग्रक्रमांकावर निसंशयरीत्या माणिक गोडघाटे उर्फ ग्रेस यांचे नाव आहे. ग्रेस यांच्या कवितेचे वैशिष्ठ्य हे की एकदा ती वाचून झाली की तिच्या पासून सुटका मिळत नाही. मन त्याच गूढ अशा अर्थाचे मनन करत रहाते. जेवढा वेळ विचार कराल तेवढेच वेग वेगळे अर्थ त्यातून निघतात. "स्तोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख कुणाचे हे सरता संपत नाही, चांदणे तुझा स्मरणाचे || " या ओळींचे जेवढा विचार कराल तितके विविध पैलू आणि अर्थ दर वेळी लागतात. यात सतत एक हूर हूर असल्याची जाणीव मनाला होत असते. त्यांची प्रत्येक कविता मनाला एक वेगळीच चुटपूट लावून जाते. ग्रेस यांच्या कवितेचे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे तिच्या मध्ये कधीही कृत्रिम यमक जुळवणे किंवा कवितेला गती देण्याचा प्रयत्न दिसत नाही. जे सुचलं आणि जसं सुचलं तसं कागदावर उतरवलं असं वाटतं. त्यामुळे ही कविता जास्त नैसर्गिक बनते आणि कवीच्या भावना त्यात नेमक्या उतरतात. त्यांनी कधीही सर्वांना समजले पाहिजे, याचा अर्थ लागेल का याचा विचार केलेला असेल असे वाटत नाही. बर्‍याचवेळा अशी टीका केली जाते की ग्रेसांच्या कविता समाजत नाहीत, शब्द रचना किचकट आहे. या सर्व टीकांना ग्रेस यांनी दिलेले उत्तर फारच बोलके आहे. ग्रेस म्हणतात "मी माझ्या कवितेचा प्रियकर किंवा पाठीराखा नाही". यावरून असे लक्षात येते की त्यांनी कधीही कविता निर्माण करायचा प्रयत्न नाही केला. जे आतून आले तेच लिहिले. ग्रेस यांचे अजून एक केले गेलेले वर्णन म्हणजे दु:खचा महाकवी. पण ग्रेस यांच्या कवितेतून दिसणारे दु:ख हे इतरांपेक्षा वेगळे आहे. "सुज्ञ देखणा चेहरा माझा, बिगुल मुखातून वाजे पराभवाच्या पर्वांमध्ये, जसे उजळती राजे || " या ओळींमधून लक्षात येते की ग्रेस यांच्या कवितानमध्ये दिसणारे दु:ख हे वेगळे आहे. त्यात नवी उभारी घेण्याची धमक आहे. माझा मते ग्रेस यांची कविता समजावी लागत नाही. त्यांच्या कविता वाचायला सुरुवात केली की एका वेगळ्याच trance मध्ये आपण जातो आणि मग जो अनुभव येतो त्याचे खरच वर्णन करता येत नाही. सर्वच कविता सगळ्यांनाच समजतात असे नाही पण एकदा त्या trance मध्ये आपण गेलो की मग कविता समजली काय किंवा नाही समजली काय, फार फरक पडत नाही कारण अर्थापेक्षा मिळणारे जे समाधान किंवा लागणारी हूरहूर आहे तीच जास्त महत्वाची असते. आज ग्रेस हयात नाहीत. सर्वांना काव्यसुतकात ढकलून त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांची जागा भविष्यात कोणी घेईल की नाही हे सांगणे कठीण आहे पण त्यांना जे मराठी काव्य विश्वात जे आढळपद मिळाले आहे ते कायमच अढळ राहील याचाशी कोणाचेही दुमत असणे शक्य नाही.
लेखनप्रकार

याद्या 4097
प्रतिक्रिया 26

म्हातारी मेल्याचे दु:ख आहे आणि काळ देखील सोकावला आहे अशी अवस्था हे एकाच विषयाला वाहिलेले धागे पाहून झाली आहे. परवा फेसबुकवरती तर ग्रेसप्रेमाचा बहर आला होता. आपल्याल्या कवितेतले किती कळते आणि आपण किती ग्रेसप्रेमी आहोत हे दाखवण्याची नुसती चढाओढ लागली होती. ह्यातला एक गंमतीदार किस्सा म्हणजे ग्रेस गेल्याची बातमी शेअर करून त्या खाली अश्रुत बुडालेली पोस्ट टाकणार्‍या आमच्या एका मित्राने, काही वेळाने दुसर्‍या मित्राने टाकलेल्या 'माणिक गोडघाटे कालवश' ह्या पोस्ट खाली 'आमदार होते का? असे विचारुन धमाल उडवून दिली साला. आमच्या एका तिसर्‍या मित्राने ह्याचा स्क्रीनशॉट घेतला आहे म्हणे, मिळाला की खरडवहीतच डकवणार आहे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

पराशी सहमत. आयला आपल्याला तर शरदिनीच्या कवितेचा अर्थ समजत नाही. ग्रेस तर लय पुढची गोष्ट. आता ज्या कवितेचा अर्थसुद्धा समजत नाही त्या कवीला लोक "माझे आयुष्य त्यांना का नाही दिले ?" असे म्हणतात. असे ग्रेस्प्रेमाचे उमाळे सध्य अनेकांना फुटतायत. --आपल्याल्या कवितेतले किती कळते आणि आपण किती ग्रेसप्रेमी आहोत हे दाखवण्याची नुसती चढाओढ लागली होती. एकदम सहमत !! काल अनिल अवचट सांगत होते" ग्रेस माझा मित्र.. तो सांगायचा की माझ्या मनात आलेले शब्द मी लिहित जातो आणि त्यंची कविता बनते.. अर्थ नंतर मी लावत बसतो.." आता खुद्द कवीलाच " नंतर" अर्थ समजून घ्यायला लागायचा, तिथे बाकीच्यांची काय कथा? ग्रेस ग्रेस असा फुकाचा अंत करणार्‍यांनी कालची अवचटांची मुलाखत पहायला हवी होती.

In reply to by कपिल काळे

"आयला आपल्याला तर शरदिनीच्या कवितेचा अर्थ समजत नाही. ग्रेस तर लय पुढची गोष्ट." च्यामायला... लय्य हसलो... :)))) शरदीनीतैंच्या कवितांना, उगवते ह्रद्यनाथ, पक्षी सलील कुलकर्णी संगीत देतायेत, आनी त्याचे रसग्रहण करतायेत अस चित्र डोळ्यासमोर आलं..

In reply to by कपिल काळे

ग्रेस बोलायला अतिशय ठाम होते. जे त्यांच्या कवितेस दुर्बोध म्हणत त्यांना ते असेच सांगत (जे अवचटांनी सांगितले). ज्यांना ग्रेस जाणून घ्यायचा आहे असं त्यांना वाटे त्यांनाच त्यांनी ते उलगडून सांगितलं. या बाबतीत पं हृदयनाथ मंगेशकर यांची मुलाखत खूप सुंदर होती. अनिल अवचटांचं व्यसनमुक्तीच्या क्षेत्रातलं कार्य अजोड असं आहे. ते ही आदरणिय व्यक्तिमत्व आहे. गेलेल्या (कुठल्याही) व्यक्तीविषयी ( किमान) चार दिवस तरी संयम बाळगला जावा असं वाटतं.

In reply to by सांजसंध्या

सांजसंध्या जी , तुमच म्हणण बरोबर आहे. ग्रेस हे कवी म्हणुन , माणुस म्हणुन थोर होते आणी ते थोर च राहणार.

In reply to by सांजसंध्या

आणि रोज अत्यंत भिकार धागे येतात ते नाही दिसत पण ग्रेस सारख्या मोठ्या कवीवर लिहिलं तर मात्र त्रास होतो.. आणि नाही कळालं की काय अर्थ आहे कवितेचा तर काय बिघडलं? जगातलं सग्गळ सग्गळ आप्ल्याला कळायलाच हवं का? नाही कळत म्हणुन कुणी त्यावर लिहायच पण नाही का? साधे मंत्र म्हणले तरी प्रसन्न वाटतं... अर्थ थोडिच कळत असतो.. तसच काहिसं आहे हे... साधी -सोपी आवडल्याची भावना लोक व्यक्त करत आहेत... " आम्ही फार काव्य प्रेमी... आम्हला ग्रेस कळला" असली टिमकी वाजवल्याचा भास कुणाला होत असेल तर तो त्याच्या मनाचा कोतेपणा आहे...

In reply to by सांजसंध्या

आम्ही गेलेल्या व्यक्तीबद्दल काहीही वाइट लिहिलेले नाही.. साधे मंत्र म्हणले तरी प्रसन्न वाटतं... अर्थ थोडिच कळत असतो.. तसच काहिसं आहे हे... आम्ही जे सगळे मंत्र म्हणतो त्याचा अर्थ आम्हाला समजतो ..

In reply to by सांजसंध्या

आम्ही गेलेल्या व्यक्तीबद्दल काहीही वाइट लिहिलेले नाही.. पं हृदयनाथ मंगेशकरांची गोष्टच निराळी आहे. ते एका सारेगामापच्या शेड्युलचे परिक्षक होते, तेव्हा त्यांनी बर्‍याच कवितांचा अर्थ उलगडून दाखवला होता. ते पाहून ते गुप्तहेर खात्यात गूढ संदेशांचे डिक्रीप्टींग चांगल्या प्रकारे करु शकतील अशी आमची खात्री झाली होती. आमची भावना आम्ही व्यवस्थित लिहिली आहे, ती फक्त ग्रेस ग्रेस असा फुकाचा अंत करणार्‍यांप्रती आहे, ग्रेसप्रती नाही हे कृपया लक्षात घ्यावे.

In reply to by कपिल काळे

तुमच्या भावनांबद्दल काही म्हणायच नाहीये हो.. तुम्ही शरदीनीतैंची ग्रेसशी केलेली तुलना वाचुन मजा वाटली इतकच..

In reply to by शैलेन्द्र

शैलेन्द्र माझा प्रतिसाद आप्ल्यासाठी नव्हता. पं. मंगेशकरांना ग्रेस ह्यांची कविता समजली असा दावा करणार्‍यांसाठी होता.

In reply to by कपिल काळे

तुमचा रोख मा़झ्यावर आहे का ? ठीक आहे . अनिल अवचटांना ग्रेस कळाले हे तुमचं म्हणणं मान्य करू. पंडितजींना कदाचित कवितेतलं काही समजत नसेल... वाद नको.

In reply to by कपिल काळे

>>काल अनिल अवचट सांगत होते" ग्रेस माझा मित्र.. तो सांगायचा की माझ्या मनात आलेले शब्द मी लिहित जातो आणि त्यंची कविता बनते.. अर्थ नंतर मी लावत बसतो.." आता खुद्द कवीलाच " नंतर" अर्थ समजून घ्यायला लागायचा, तिथे बाकीच्यांची काय कथा? हॅहॅ... ग्रेस काय मार्कोव्ह चेन टेक्स्ट जनरेटर वापरायचा की काय :P http://www.haykranen.nl/projects/markov/demo/

In reply to by बॅटमॅन

हॅहॅ... ग्रेस काय मार्कोव्ह चेन टेक्स्ट जनरेटर वापरायचा की काय
काय हा असा एकेरी उल्लेख ? अरे आता ग्रेसभक्तांच्या हृदयातून अश्रु आणि डोळ्यातुन रुधिर वाहू लागेल की रे. ह्या पापास देहांत प्रायश्चित्तावाचून सजा नाही !

In reply to by परिकथेतील राजकुमार

परासाहेब, एकवचन काय आणि अनेकवचन काय, आदर-अनादराशी त्याचा संबंध नाही. ग्रेस एक कवी म्हणून नक्कीच भारी आहेत, त्यांची लायकी मी १/अनेक वचनी संबोधल्याने आजिबात कमी होणार नाही. आपल्याला हे नक्कीच माहीत आहे, परंतु बाकी अजून कोणी आरडाओरडा करू लागले तर आधीच खुलासा केल्या गेलेला बरा, म्हणून हे विवेचनाचं शुक्लकाष्ठ..असो.

खुप छान लिहिले आहे मित्रा. वाचतच रहावे असे वाटते होते. लेख आनखिन मोठा हवा होता असे वाटते आहे ..

ग्रेस ह्यांच्या कवितेचा धांडोळा घेणारा लेख असेल असे वाटून वाचले, पण पदरी निराशा आली, असे खेदाने नमूद करावे लागते आहे. या ओळींचे जेवढा विचार कराल तितके विविध पैलू आणि अर्थ दर वेळी लागतात. यात सतत एक हूर हूर असल्याची जाणीव मनाला होत असते. काही विशद करून सांगणे येथे जरूरीचे होते असे म्हटले तर ते वावगे ठरू नये. अथवा असे लिखाण 'शब्द बापुडे केवळ वारा' ह्या धर्तीचे होऊन जाते. ग्रेस यांच्या कवितेचे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे तिच्या मध्ये कधीही कृत्रिम यमक जुळवणे किंवा कवितेला गती देण्याचा प्रयत्न दिसत नाही. जे सुचलं आणि जसं सुचलं तसं कागदावर उतरवलं असं वाटतं. त्यामुळे ही कविता जास्त नैसर्गिक बनते आणि कवीच्या भावना त्यात नेमक्या उतरतात. त्यांनी कधीही सर्वांना समजले पाहिजे, याचा अर्थ लागेल का याचा विचार केलेला असेल असे वाटत नाही. ग्रेस मनातील भाव झरझर कागदावर उतरवीत, आणि ते लिखाण कविता होऊन आपल्यासमोर येई, हे समजू शकतो. पण हे, इतक्या महान कविचे वैशिष्ट्य म्हणून का बरे सांगावयास लागावे? तसेच त्यांच्या काव्यरचना अगदी नैसर्गिक असत, त्यात त्यांना कसलीही कलाकुसर करावी लागत नसे, हेही मुद्दाम सांगावयाची जरूर पडू नये. वास्तविक अनेक नामवंत कविंच्या बाबतींतही हेच म्हणता येईल. त्या सर्वांहून ग्रेसांची कविता वेगळी कशी ह्याविषयी चिकीत्सा अपेक्षित आहे. ग्रेस यांच्या कवितेतून दिसणारे दु:ख हे इतरांपेक्षा वेगळे आहे. "सुज्ञ देखणा चेहरा माझा, बिगुल मुखातून वाजे पराभवाच्या पर्वांमध्ये, जसे उजळती राजे || " या ओळींमधून लक्षात येते की ग्रेस यांच्या कवितानमध्ये दिसणारे दु:ख हे वेगळे आहे. त्यात नवी उभारी घेण्याची धमक आहे. पुन्हा वरीलप्रमाणेच म्हणतो. ग्रेसांच्या कवितांची लक्षणे न सांगता त्यांतील गूढार्थाचा, त्यांच्या प्रेरणांचा मागोवा आपापल्या परिने घेणारा एकतरी लेख अथवा प्रतिसाद दुर्दैवाने येथे अद्याप दिसलेला नाही.

In reply to by प्रदीप

द. भि. कुलकर्णी यांनी ग्रेस यांच्या कवितांचे रसग्रहण केले आहे, करीत असत बहुधा. कुठल्या वादामुळे माहित नाही, पण ग्रेस यांनी अशातच द.भिं.कडे निर्देश करुन 'माझी कविता आपल्याला एकट्यालाच समजते या भ्रमात कुणी राहू नये' असे तीव्र मत व्यक्त केल्याचे आठवते. अर्थात, जालावर कुणी तेवढा वेळ देऊन आणि व्यासंग करुन काही वेगळे समोर मांडले तर वाचायला नक्की मजा येईल.

हा लेख म्हणून नाही तर मनोगत म्हणून लिहिला आहे. मी ग्रेस याचे थोडे साहित्य वाचले आहे. त्यात सगळेच समजले असे नाही पण जे जाणवले ते लिहित गेलो. ग्रेस गेले म्हणून त्यांना आदरांजली म्हणून हे लिहिलेले नसून मनातल्या भावना कुठेतरी मोकळ्या करायच्या होत्या म्हणून लिहिले. खरतर हे परवा म्हणजे ते ज्या दिवशी गेले त्याच दिवशी लिहिले होते मीपा वर आज टाकले. आपल्या सर्वांना प्रतिक्रिया दिल्या बद्धल धन्यवाद. ज्यांनी सुधारणा सुचावाल्यात त्यांचे शतश: आभार.................. -- स्वानंद वागळे**